आर्यअष्टांगिक मार्ग

Submitted by rkjumle on 9 September, 2011 - 12:32

अष्टांगिक मार्ग म्हणजे स्वत:नेच स्वत:चा मार्गदर्शक बनणे होय. येथे कोणीही मध्यस्थ नाही. आपणच सर्व काही आहे.
धम्मपदाच्या एकशेसाठाव्या गाथेमध्ये म्हटले आहे की,
‘अत्ताहि अत्तनो नाथो कोई नाथो परोसिया।
अत्तनाव सुद्न्तेन नाथं लभति दुल्लभं॥’
याचा अर्थ आपणच आपला मालक आहे. कोणी आपला मालक असू शकत नाही. स्वत:चे निग्रह करणारा दुर्लभ स्वामीत्व प्राप्त करीत असतो.
‘अत्त दिप भव’ म्हणजे स्वयंप्रकाशीत व्हा, असे भगवान बुध्दाने सांगितले आहे. आपणासच स्वत:चा उध्दार करायचा आहे. दुसरा कोणी आपला उध्दार करु शकत नाही. स्वत:चे जीवन पायरी पायरीने घडवायचे आहे. अष्टांगिक मार्गाचे पालन करुन आपण आपले जीवन उत्तमरितीने घडवू शकतो.
‘यो च बुध्दञ्च धम्मञ्च
संङ्घ सरणं गतो ।
चत्तारि अरियसच्चानि
समपञ्ञाय पस्सति ॥
दुक्खं दुक्ख्समुप्पादं
दुक्खस्स च अतिक्कमं ।
अरियञ्चट्ठङ्‍कि मग्ग
दुक्‍खुपसगामिनं ॥
एतं खो सरणंम खेमं एतं
सरणमुत्तमं ।
एतं सरणमागम्म सठबङक्‍खा
पमुच्चति ।।
याचा अर्थ म्हणजे बुध्द, धम्म आणि संघाला शरण जाणे. चार आर्यसत्यांना म्हणजे दु:ख, दु:खाची कारणे, दु:खाचा निरोध आणि दु:खाचा निरोध करण्याचा मार्ग, यासाठी आर्यअष्टांगिक मार्ग प्रज्ञेद्वारे योग्य प्रकारे जाणून घेणे, हेच कल्याणकारी उत्तम शरण होय. हेच शारण ग्रहण केल्याने मनुष्य सर्व दु:खापासून मुक्त होतो.
बुध्द, धम्म आणि संघाला शरण जाणे म्हणजे बुध्दाचे जे गुण आहेत त्याचे अनुसरण करणे, धम्माला आपल्या जीवनात उतरविणे आणि संघामध्ये असलेले गुणाचे अनुसरण आपल्या जीवनात करणे होय. आर्यअष्टांगिक मार्ग जो दु:खमुक्तीचा मार्ग आहे त्याला आपल्या जीवनात उतरविणे, त्या मार्गावर आरुढ होणे, हेच आर्यअष्टांगिक मार्गाचे अनुसरण होय.
आर्यअष्टांगिक मार्ग हा पाली ‘अरियअठठाङिगक-मग्ग’ याचा पाकृत अनुवाद आहे.
चार आर्यसत्यामधील चवथे आर्यसत्य म्हणजेच आर्यअष्टांगिक मार्ग होय. आर्यअष्टांगिक मार्ग हा मनुष्याला प्रकाश देणारा आहे. आपले संपुर्ण श्रेष्ठतम जीवन आणि व्य्क्तीमत्व घडविणारा मार्ग होय. या मार्गानुसार जीवन जगले तर आनंद प्राप्त होतो. जीवन सुखी आणि समाधानी बनते.
भगवान बुध्दाने सर्वप्रथम सारनाथ येथे पाच परिव्राजकांना मध्यम मार्ग म्हणजेच आर्यअष्टांगिक मार्गाचा उपदेश दिला. त्यांनी आर्यअष्टांगिक मार्गाचे महत्व समजावून सांगितले. तसेच त्यांचे अंतिम शिष्य सुभद्र यांना सुध्दा आर्यअष्टांगिक मार्गाचा उपदेश दिला. महापरिनिब्बाण सुत्तामध्ये भगवान बुध्द सुभद्राला म्हणतात, “सुभद्र, ज्या धर्म विनयामध्ये आर्यअष्टांगिक मार्ग उपलब्ध नाही तेथे प्रथम श्रमण - श्रोतापन्न, द्वितीय श्रमण - सकृदागामी तृतीय श्रमण – अनागामी व चतुर्थ श्रमण – अहर्त उपलब्ध होत नाही. ज्या धर्म विनयामध्ये आर्यअष्टांगिक मार्ग उपलब्ध होतो तेथे प्रथम श्रमण - श्रोतापन्न, द्वितीय श्रमण - सकृदागामी तृतीय श्रमण – अनागामी व चतुर्थ श्रमण – अहर्त उपलब्ध होतो. याप्रमाणे भगवान बुध्दाने सांगितलेला आर्यअष्टांगिक मार्ग हा सत्याचा मार्ग असून तो अत्यंत श्रेष्ठतम आणि महत्वपुर्ण आहे.
आर्यअष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी अशा आठ अंगाचा अंतर्भाव होतो.
आर्यअष्टांगिक मार्गाचे दृष्टिमार्ग आणि भावनामार्ग असे दोन प्रमुख भागात विभाजन केलेले आहे. दृष्टिमार्गात अंतिम सत्यतेच्या प्रथम अनुभवाचा किंवा अंतिम सत्यतेच्या अंतर्दृष्टिचा समावेश होतो. भावनामार्गात सत्यतेच्या या दृष्टिनुसार किंवा अनुभवानुसार आपल्या व्यक्तित्वाच्या आणि जाणिवेच्या सर्व बाबतीत आणि सर्व पातळ्यावर आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा समावेश होतो. म्हणून आर्यअष्टांगिक मार्गातील हा दुसरा भाग पहिल्या भागापेक्षा अधिक मोठा व अधिक गुंतागुंतीचा आहे. कारण की, अष्टांगिकमार्गाच्या या दोन भागापैकी पहिल्या भागात केवळ सम्यक दृष्टीच्या एका अंगाचा समावेश होतो. मात्र दुसर्‍या भागात सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी अशा सांत अंगाचा समावेश होतो.
आर्यअष्टांगिक मार्गातील प्रत्येक मार्गाला पायरी असे म्हणता येत नाही. कारण पायरी म्हटले की, जस-जसे आपण एक एक पायरी ओलांडून वर वरच्या पायरीवर जातो तस-तसे मागच्या पायर्‍या सोडत जात असतो. आर्यअष्टांगिक मार्गामध्ये सर्वच मार्गाचे पालन करावयाचे असते. कोणताही मार्ग सोडायचा नसतो. म्हणून प्रत्येक मार्गाला पायरी न म्हणता ‘अंग’ किंवा ‘अवयव’ किंवा ‘शाखा’ असे म्हणता येईल. आर्यअष्टांगिक मार्ग याचा अर्थ आठ निरनिराळ्या मार्गाचा किवा आठ पृथक टप्प्यांचा मार्ग असा होत नाही. तर त्याचा अर्थ आठ अंगाचा किंवा आठ अवयवाचा किंवा आठ शाखांचा असा होतो.
आर्यअष्टांगिक मार्गाचे पालन करतांना आपण आपल्या अस्तित्वाची आणि जागृतीची उच्चतम स्थिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असतो. आर्यअष्टांगिक मार्ग हे एक धार्मिक जीवन असून ती मानवाच्या विकासाची, जीवन फुलत जाणारी एक प्रक्रिया आहे. एखाद्या वृक्षाप्रमाणे त्याची वाढ होत जाते. एखादे रोपटे जमिनीत लावल्यानंतर त्याला उन, वारा, पाणी, खते इत्यादी पोषक द्रव्ये मिळाल्यावर काही काळानंतर त्याचे रुपांतर वृक्षात होत जाते. त्याला फुले, फळे लागतात. त्या वृक्षांच्या फुला-फळांचा व सावलीचा आस्वाद सर्व प्राणी घेत असतात. असाच काहीसा प्रकार आर्यअष्टांगिक मार्गाचे पालन करतांना अनुभवाला येत असतो. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधीच्या पालनामुळे आपल्या अस्तित्वाची निरनिराळे अंगे बदलून जात असतात. आर्यअष्टांगिक मार्गाच्या अनुसरनामुळे भावना बदलतात, श्रध्दा बदलते, दृष्टी बदलते, वाणी बदलते, कर्म बदलतात, जीवनयापनाची पध्दत बदलते,, मनाला उत्तम वळण लावते, सतत जागृतीत राहण्याची सवय लागते, मनाची एकाग्रता वाढवते. म्हणूनच मानवाच्या सर्वोत्तम कल्याणाचा मार्ग सुकर होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २२ प्रतिज्ञेचे पालन करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानी अकराव्या प्रतिज्ञेत सांगितले की, “मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करीन.”
अष्टांगिक मार्गाचे प्रज्ञा, शील व समाधी असे तीन विभाग पडतात.
प्रज्ञा
१) सम्यक दृष्टी
२) सम्यक संकल्प
शील
३) सम्यक वाचा
४) सम्यक कर्मांत
५) सम्यक आजीविका
समाधी
६) सम्यक व्यायाम
७) सम्यक स्मृती
८) सम्यक समाधी
शील, समाधी आणि प्रज्ञा याबाबतीत भगवान बुध्द म्हणतात-
सीले पतिपठठाय नरो सपञ्‍ञो
चितं पञ्‍ञंच भावयं।
आतापि निपको भिक्खु
सो इमं विजटयो जटं ॥
जो मनुष्य प्रज्ञावान आहे, वीर्यवान आहे, पंडित आहे, भिक्खु आहे तो शीलांचे आचरण करीत असतांना चित्त (समाधी) आणि प्रज्ञा यांची भावना करुन ह्या जटांना (जगातील दु:खाच्या प्रश्‍नाला) सोडवू शकतो.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिंदू धर्मात (फारतर आर्य सनातन वैदिक धर्मात म्हणूया) आधीपासुन असलेल्या अष्टांग योगावरूनच ही संकल्पना घेतली गेली असावी असे वाटत नाही का ? यात आर्य पण आहे अष्टांग पण आहे.

महेश,
हिंदु धर्म आणि बुध्द धम्म या दोन्हीच्या तत्वज्ञानात खूप अंतर आहे. हे खरे आहे की, पुर्वी बुध्द तत्वज्ञान हे हिंदु धर्माचा भाग असून बुध्द हे विष्णूचा नववा अवतार आहे असा समज निर्माण केला होता. परंतु आता बुध्द धम्मावर खूप साहित्य उपलब्ध झाले आहे. आपण जिज्ञासू व अभ्यासक असल्यामुळे आपण तटस्थ वृतीने वाचन करावे व सत्य ते जाणून घ्यावे.
ईश्वर, दैव्य, आत्मा, नशिब, स्वर्ग, नरक, कर्मकांड इत्यादी भ्रामक कल्पना बुध्द धम्मात नाहीत.
बुध्द म्हणतात की, “माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरनोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनूष्यप्राणी दु:ख, दैन्य आणि दारिद्रयात राहात आहेत. हे सर्व जग दु:खाने भरले आहे. म्हणून हे दु:ख नाहीसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे.
चातुर्वण्याची व जातीभेदाची कल्पना हिंदुच्या वेदात आहे. या मानवी विषमतेच्या व्यवस्थेला भगवान बुध्दांनी कडाडून विरोध केला आहे, ही गोष्ट सर्वश्रुतच आहे. तरीहे बुध्द तत्वज्ञान हे हिंदु धर्माचा भाग आहे असे कसे म्हटल्या जाते? समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, नितिमत्ता व विज्ञानावर बुध्द धम्म आधारीत आहे.
तसेच आर्य या शब्दाच्या बाबतीत बुध्द धम्मात वेगळा अर्थ आहे. आर्य म्हणजे ब्राम्हन असा अर्थ नाही. भगवान बुध्दांच्या काळात ‘आर्य’ या शब्दाचा अर्थ गुणवाचक होता. व्यक्ती कोणत्याही जातिचा असो तो धम्माच्या मार्गाने, शील-समाधी व प्रज्ञेचा अभ्यास करुन मुक्तीच्या चार पायर्‍यापैकी पहिल्या स्त्रोतापन्न या पहिल्या पायरीपर्यंत जरी कोणी पोहचला तरी त्याला ‘आर्य’ असे संबोधल्या जात असे. त्यानंतर दुसरी सकृदागामी, तिसरी अनागामी आणि चवथी पायरी अहर्त येथपर्यंत प्रवास करणारे अर्थात आर्य म्हणूनच संबोधल्या जात असे. आर्यसत्य म्हणजे आर्याचे किवा अहर्ताचे सत्य अशी व्याख्या वसुबन्धु आणि बुध्दघोष यांनी केली आहे. आर्य म्हणजे ज्यांचे सर्व अकुशल पापधर्म दूर झाले आहेत तो’ अशी मज्झिमनिकायात व्याख्या केली आहे. तर जो पापकर्मापासून अत्यंत दूर गेला आहे तो आर्य. असे अभिधर्मकोषभाष्यात म्हटले आहे. अशा आर्याचे सत्य म्हणजे आर्यसत्य. आर्य म्हणजे पवित्र, सर्वश्रेष्ठ असाही अर्थ होवू शकतो.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

आपला अभ्यास खुपच चांगला आहे. "आर्य" म्हणजे "ब्राह्मण" असे कोणी म्हणत नाही. माझा रोख होता तो बुद्धाने घेतलेल्या संकल्पनेवर. मुळात वैदिक धर्मात अष्टांग योगाची कल्पना होती, बुद्धाने यावरूनच "अष्टांगिक मार्ग" हे नाव घेतले असावे असे वाटले. दोन्हीतील तपशिल वेगळा आहे.

महेश,
'अष्टांग योग' म्हणजे काय? याचे विवेचन केले तर मुद्दा स्पष्ट होईल. मला वाटते "अष्टांगिक मार्ग" याच्याशी काहीही संबंध नसावा. योग आणि मार्ग याचा वेगवेगळा अर्थ असावा.

saatiजी,
आपल्या सुचनेप्रमाने मी 'सम्यक मार्गाचे विवेचन' असा दुसरा लेख लिहिला आहे. कृपया अवलोकन करावे.