दिवाळी अंक लेखन मालकीहक्क (Copyright)

Submitted by संपादक on 6 September, 2011 - 17:16

मालकीहक्काबद्दल सूचना व खुलासा:

हितगुज दिवाळी अंकाच्या वाढत्या लोकप्रियतेला लक्षात घेता आम्हाला दिवाळी अंकासाठी आपण पाठवत असलेल्या कुठल्याही प्रवेशिकेच्या मालकीहक्काविषयी ( Copyright information ) स्पष्टीकरण आपल्या संरक्षणासाठी देणे महत्त्वाचे वाटते. यासाठीचे नियम खालीलप्रमाणे असतीलः

येणार्‍या प्रत्येक प्रवेशिकेचे पूर्ण मालकीहक्क ती प्रवेशिका पाठवणार्‍या यथायोग्य साहित्यिकाच्या किंवा कलाकाराच्या ताब्यात राहतील. परंतु पाठवण्यात आलेल्या व स्वीकारल्या गेलेल्या प्रत्येक प्रवेशिकेसाठी, तुम्ही मायबोली प्रशासनाला त्या प्रवेशिकेला maayboli.com वर प्रसिद्ध करण्याचा किंवा maayboli.inc ला त्या प्रवेशिकेचा इतर कुठल्याही माध्यमात वापर करण्याचा अमर्याद, कायमस्वरूपी व रद्द न करता येणारा परवाना देत आहात.
"दिवाळी संवाद"चे सर्व हक्क मायबोलीकडे रहातील.

याचा अर्थः

* प्रवेशिकेचे पूर्ण मालकीहक्क तुमचे असतील व तुम्ही त्या प्रवेशिका इतरत्र प्रसिद्ध करु अथवा तुमच्या वैयक्तिक आर्थिक नफ्यासाठी विकू शकता.
* परंतु मायबोली प्रशासन ती प्रवेशिका मायबोलीवर अथवा इतर कुठल्याही माध्यमांमधे अनिर्बंध वापरु शकते. (अमर्याद परवाना)
* भविष्यात ती प्रवेशिका मायबोलीवरुन अथवा इतर माध्यमांमधून काढून टाकावी असे तुम्हाला वाटले तरी मायबोली तसे करण्यासाठी बांधिल राहणार नाही. (कायमस्वरुपी परवाना)
* तुम्ही तुमची प्रवेशिका इतर कोणाला विकली, तरी नवीन मालक ती प्रवेशिका मायबोलीवरून काढून टाकण्याविषयी असमर्थ असेल. (रद्द न करता येणारा परवाना)

यासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कृपया संपादक मंडळाशी ईमेलद्वारे संपर्क साधावा. धन्यवाद.

Copyright of the work submitted to maayboli remains with the respective author or artist. By submitting your work, you are giving an unlimited, perpetual and irrevocable license to maayboli to publish on maayboli.com or wherever maayboli.inc wants to use it in any other medium.
"Diwali Sanwad" is a copyright of maayboli.

What it means:
* The copyright and ownership remains with the author/artist and they are free to use it in any way that they desire; such as sell or publish their work etc.
* However, by submitting their work, the author/artist has given the right to maayboli to publish on Maayboli web site or through any other media such as PDF, CD etc. in future. (unlimited)
* Maayboli is not obligated to remove the work from it's web site or any other media that has been used, though the author may want it done in future. (perpetual)
* Even though an author sells his/her copyright to a new owner, the new owner cannot ask maayboli to remove the work from maayboli web site. (irrevocable)

If you have any further questions related to the copyright issues, please e-mail the Sampadak Mandal. Thank you.

विषय: 

आपण म्हणता, "पाठवण्यात आलेल्या व स्वीकारल्या गेलेल्या प्रत्येक प्रवेशिकेसाठी, तुम्ही मायबोली प्रशासनाला त्या प्रवेशिकेला maayboli.com वर प्रसिद्ध करण्याचा किंवा maayboli.inc ला त्या प्रवेशिकेचा इतर कुठल्याही माध्यमात वापर करण्याचा अमर्याद, कायमस्वरूपी व रद्द न करता येणारा परवाना देत आहात."
समजा, उद्या मायबोली प्रशासनाने या लेखनाचा वापर एखाद्या अन्य प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित होणाऱ्या माध्यमात करावयाचे ठरवले किंवा संबंधित विषयाधीन मजकूर त्या प्रकाशनाला वापरू दिला तर अशा वेळी त्या संस्थेचे स्वामीत्वविषयक निर्बंध या लेखनाला लागू होणार का? उद्या असे होऊ शकते, की संबंधित लेखकाने त्या लेखनाचे पुस्तक स्वरूपात प्रकाशन करण्याचे ठरवले. त्याविषयी क्ष या संस्थेशी अर्थकारणासह करार केला. त्याच वेळी मायबोलीने हे लेखन अन्य एखाद्या प्रकाशन संस्थेला दिले, तर तेथे संघर्ष उभा राहणार का? लेखकाने करार केलेली प्रकाशन संस्था इतर संस्थेवर काहीही निर्बंध आणू शकणार नाही, असे आपली अट सांगते. पण, ती अन्य संस्था लेखकाने करार केलेल्या संस्थेला रोखू शकणार आहे का? मायबोली तशा पद्धतीने त्या संस्थेशी करार करू शकते, कारण या लेखनाचे सर्वाधिकार मायबोलीकडेच असल्यात जमा आहे.
माझी माहिती चुकीची नसेल तर असेच नियम मागील वर्षीही होते. पण त्या वर्षी मी ते विचारात घेतलेले नाहीत.

श्रावण मोडक, तुम्ही उपस्थित केलेल्या शंकेची नोंद घेतली आहे. मायबोली प्रशासनाशी सल्ला-मसलत करून तुम्हाला लवकरच प्रतिसाद देऊ.

धन्यवाद.

>समजा, उद्या मायबोली प्रशासनाने या लेखनाचा वापर एखाद्या अन्य प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित होणाऱ्या माध्यमात करावयाचे ठरवले किंवा संबंधित विषयाधीन मजकूर त्या प्रकाशनाला वापरू दिला.

लेखक मायबोलीला परवाना देत आहे. हक्क नाही. परवाना असल्यामुळे , मूळ हक्कधारकाच्या परवानगीशिवाय परस्पर अन्य प्रकाशनसंस्थेला कलाकृती देण्याचा विचार मायबोलीला करता येणार नाही. कुणाला कुठला परवाना द्यायचा हा हक्क मूळ मालकाकडेच शिल्लक राहणार आहे.

>त्याच वेळी मायबोलीने हे लेखन अन्य एखाद्या प्रकाशन संस्थेला दिले

मायबोलीला असे करता येणार नाही. मायबोलीकडे फक्त मायबोली या संस्थेच्या मालकीच्या माध्यमात प्रकाशीत करण्याचा परवाना आहे.

मूळात हा नियम कशासाठी केला याची पार्श्वभूमी सांगतो.
१) प्रशासनाच्या सुलभतेसाठी मायबोलीच्या एकाच विभागात लेख वर्षोनवर्षे कायमचा ठेवणे शक्य नाही. (आताच काही लेख १५ वर्षे जुने आहेत) आज www.maayboli.com असलेला मजकूर उद्या www.maayboli.co.in किंवा www.hitguj.com किंवा vishesh.maayboli.com किंवा kanokani.com वर ठेवला जाऊ शकतो. ही सगळी मायबोलीचीच संकेतस्थळे आहेत. तेंव्हा संकेतस्थळ बदलले (आणि ते जर मायबोलीचेच असेल)तर परत परवानगी मागायला नको.

२) उद्या मायबोलीचे मोबाईलच्या माध्यमातून पाहता येणारे पण वेगळ्या नावाचे संकेतस्थळ किंवा मोबाईल अ‍ॅप निघाले तर प्रत्येक लेखकाला परत परवानगी मागायला नको.

३) दिवाळी अंक, सीडी किंवा पिडीएफ माध्यमातून परत काढणे सोपे जावे

या मुख्य कारणांसाठी हे नियम केले आहेत, जास्तित जास्त स्वातंत्र्य घेऊन जास्त हक्क मायबोलीकडे ठेवण्यासाठी नाही. मूळातच मायबोलीने सुरु केले प्रकाशनाचे मॉडेल , लेखकाकडेच जास्त हक्क असावेत या मूळ हेतूमधून तयार केले आहे.

>मायबोली तशा पद्धतीने त्या संस्थेशी करार करू शकते, कारण या लेखनाचे सर्वाधिकार मायबोलीकडेच असल्यात जमा आहे.
हा निष्कर्ष चुकीचा आहे. आणि मायबोली असा करार करू शकत नाही. लेखनाचे सर्वाधिकार मायबोलीकडे आहेत असे तुम्हाला का वाटले? उलट ते नसावेत यासाठी आम्ही स्वतःहून प्रयत्नशील आहोत. मला वाटते परवाना (License ) आणि हक्क (Rights) यात तुमची गल्लत होते आहे. (मायबोलीवरच्या संवाद विभागात प्रकाशित झालेल्या सगळ्या लेखनाचे सर्वाधिकार मात्र मायबोलीकडे असतात, हा तितका अपवाद आहे. कारण असे लेखन मुद्दाम मायबोलीसाठी तयार केलेले असते. )

नाही पटलं , जर एखाद्या लेखकाने मायबोलीवरील विशिष्ठ कामासाठी / उत्सवासाठी एखादी कलाकृती अथवा लिखाण दिलं असेल तर ते लिखाण त्या प्रसंगासाठी वापरणं ठीक आहे पण जर त्याच पुर्नप्रकाशन अथवा दुसरीकडे वापरायचं असेल तर मायबोली प्रशासनाला त्या लेखकाची परवानगी घ्यायला हवी.
जर त्या वेबसाईटस कायद्याने मायबोलीचाच भाग असतील तर वेगळी परवानगी घ्यायला नको.

श्री,
तुम्ही जे म्हणता आहात, तेच मी म्हटले आहे. वर उदाहरण दिलेल्या सगळ्या वेबसाईटस कायद्याने मायबोलीचाच भाग आहेत. ज्या मायबोलिचा भाग नाही त्यांच्याशी परस्पर करार करायचा मायबोलीला कुठलाही हक्क किंवा परवाना पोहोचत नाही.

उदा. २०११ चा गणेशोत्सव, २०५० मधे archive.maayboli.com इथे नेला तर ते पुनर्प्रकाशन होणार नाही. स्थलांतर होईल.

श्रीदेवा, वरती अ‍ॅडमिन टीमने जे लिहीले आहे, तेच तूदेखील म्हणतो आहेस Happy

तुझे :

>>त्या वेबसाईटस कायद्याने मायबोलीचाच भाग असतील तर वेगळी परवानगी घ्यायला नको.

आणि अ‍ॅडमिन टीमचे वाक्य

>>तेंव्हा संकेतस्थळ बदलले (आणि ते जर मायबोलीचेच असेल)तर परत परवानगी मागायला नको.

नाही रे नंद्या <<< परंतु मायबोली प्रशासन ती प्रवेशिका मायबोलीवर अथवा इतर कुठल्याही माध्यमांमधे अनिर्बंध वापरु शकते. (अमर्याद परवाना) >>> ह्या वाक्याचा अर्थ घेण्यावर आहे .

मला वाटते "कुठल्याही माध्यमांमधे" यामुळे गोंधळ होत असावा. इतर माध्यमांमधे म्हणजे दुसर्‍याच्या मालकीच्या इतर माध्यमांमधे नाही.
एक लक्षात घ्या बाकी प्रकाशक "सर्व हक्क प्रकाशकास्वाधीन" म्हणतात. असे म्हटल्यावर त्यांच्याकडे सगळेच हक्क अनिर्बंध असतात. तसे आम्हाला सहज म्हणता आले असते आणि मग हे कुठलेच प्रश्न पडले नसते. मायबोली ते हक्क लेखकाकडेच रहावेत यासाठी प्रयत्न करते आहे.

मायबोली ते हक्क लेखकाकडेच रहावेत यासाठी प्रयत्न करते आहे. >> आणि यासाठी खरंच आभारी आहे.

>>> एक लक्षात घ्या बाकी प्रकाशक "सर्व हक्क प्रकाशकास्वाधीन" म्हणतात. असे म्हटल्यावर त्यांच्याकडे सगळेच हक्क अनिर्बंध असतात. तसे आम्हाला सहज म्हणता आले असते आणि मग हे कुठलेच प्रश्न पडले नसते. <<<
पण मायबोली कुठे खरोखर प्रकाशक आहे? जेव्हा सर्व हक्क प्रकाशकास्वाधीन असे पुस्तकावर म्हणले जाते तेव्हा लेखकाने ते हक्क दिलेले असतात आणि लेखकाला मोबदला मिळालेला असतो. कमी जास्त कसा का असेना पण असतो. तसेच मोबदल्याव्यतिरिक्त प्रकाशकाची पुस्तकाचे संपादन करून घेणे (तज्ञ लोकांना मोबदला देऊन. हौशी लोकांकडून नव्हे), छपाईचा खर्च, विक्री/वितरणाचा खर्च ही एवढी गुंतवणूक त्या पुस्तकामधे असते. तेव्हाच त्या प्रकाशकाला सर्व हक्क प्रकाशकास्वाधीन म्हणण्याचा अधिकार प्राप्त होतो.
नियतकालिके, विशेषांक यांच्यासंदर्भात हे नियम किंवा व्यवहार थोडे थोडे बदलत जातात.
परंतू तिथेही 'सर्व हक्क प्रकाशकास्वाधीन' हे म्हणण्यासाठी प्रकाशकाचे कॉन्ट्रिब्युशन 'उपलब्ध करून दिलेला प्लॅटफॉर्म' यापेक्षा बरेच जास्त असावे लागते.

ता. क.: मायबोलीच्या दिवाळी अंकाच्या नियमांबद्दल मला यत्किंचितही संदिग्धता वा असहमती नाहीये. 'मायबोलीची इतर अव्यावसायिक माध्यमे' हे मला मान्यच आहे. प्लीज नोट.

प्रशासक,
वरच्या नियमांमधून 'इतर माध्यमांमधे' हा प्रयोग वगळता / बदलता येईल का? जर मायबोलीव्यतिरिक्त इतर कुठेही हे साहित्य मायबोली.कॉमतर्फे प्रकाशित होणार नसेल, तर हा प्रयोग अनावश्यक ठरतो. Happy
बाकी, प्रकाशक जेव्हा 'सर्व हक्क प्रकाशकांकडे' असं म्हणतात तेव्हा त्यांनी लेखकाला त्याचा मोबदला दिलेला असतो. तसा करार केलेला असतो.

हक्क आणि परवाना अशी गल्लत मुद्दाम केली आहे. काल याविषयी माझी इतरत्रही चर्चा झाली होती. ती गल्लत केली, कारण त्याविषयीच स्पष्टता अपेक्षीत होती. त्या गल्लतीचा आधार, तुम्ही म्हणालात त्या " "कुठल्याही माध्यमांमधे" " या शब्दांमध्येच दडलेला आहे. मला वाटतं, की तुमची ही पोस्टमध्ये येणारी स्पष्टता त्या वरच्या निवेदनातही असावी. कारण हे निवेदन कायदेशीरतेविषयीचे आहे. कुठल्याही माध्यमांमध्ये हे शब्द इतके व्यापक आहेत की, मी फक्त एक चित्र डोळ्यांसमोर आणले आणि परवाना ऐवजी हक्क इमॅजिन केल्यानंतर संघर्ष उभा ठाकलेला दिसला. परवाना असल्यानेच, आर्थीक व्यवहार न करताही मायबोलीच्या संयुक्त सहभागाने (उदाहरणार्थ, मायबोली आणि क्ष ही प्रकाशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशीत होणारे अन्य संस्थळ आणि/वा पुस्तक आणि/वा ग्रंथ) तयार होणाऱ्या एखाद्या प्रकाशनात हे लेखन जाऊ शकते, असे गृहितक माझ्या लेखनामागे होते. तुम्ही म्हणताय त्याचा अर्थ अशा स्वरूपात संयुक्त उपक्रमही असणार नाही, असा घ्यावा का, एवढाच प्रश्न बाकी आहे.
व्यावसायीक प्रकाशक या विषयावर न बोललेलेच बरे. Happy
हे सगळे लिहिले, कारण चर्चा व्हावी या हेतूने. Happy

सगळ्यात अगोदर हे स्पष्ट करतो की वर कुठेही प्रकाशकांचे योगदान कमी लेखण्याचा किंवा त्या व्यवसायाला कमी महत्व देण्याचा उद्देश नाही. ते एक वेगळे मॉडेल आहे, हे एक वेगळे.

पारंपारिक प्रकाशन व्यवहारात प्रकाशक, लेखक, वाचक यांच्यात परस्परावलंबी एक संस्था असते. लेखक कलाकृती तयार करतो. ती प्रकाशकाला विकतो. त्याला प्रकाशकाकडून काही मोबदला मिळतो. प्रकाशक त्या लेखनावर संस्करण करतो आणि त्याचे मुद्रण करतो आणि ते वाचकापर्यंत पोहोचवतो. वाचक या कलाकृतीसाठी मूल्य देतो. सगळ्या वाचकांकडून आलेले मूल्य हे प्रकाशकाने केलेल्या सगळ्या ख्रर्चापेक्षा जास्त असणे अपेक्षित असते. तो त्या प्रकाशकाचा फायदा असतो. प्रकाशकाचे योगदान हे फक्त संस्करण आणि मुद्रण इतकेच नसून वाचकापर्यंत वितरण हे ही असते. किंवा इतर प्रकारचे योगदान (संस्करण, मुद्रण) हे सर्वसामान्य(Commoditize) होत चालले असताना ज्या प्रकाशकाचे वितरण जास्त चांगले तितका तो प्रकाशक जास्त यशस्वी असे समीकरण होत असेल तर ते फारसे नवलाईचे नाही. त्याची एक अत्यंत महत्वाची बाजू म्हणजे प्रकाशकांनी केलेली लेखनाची/लेखकाची निवड. एखाद्या लेखकाला (विशेषतः नवोदित) मोबदला जाऊदे, प॑ण लेखन प्रकाशीत होईलच याची कुठलीही खात्री नसते. त्यामुळे लेखनाचे हक्क जाऊदे , लेखक अस्तित्वात आहे हे वाचकांना कळण्याचे भाग्यही या मॉडेलमधे कित्येक लेखकांना मिळू शकत नाही.

मायबोलीसारखी संकेतस्थळे लेखनावर कुठलेही संस्करण करत नसतील तरी, पारंपारिक प्रकाशकाला जो मुद्रणाचा खर्च होतो तसाच मायबोलीला होस्टींगचा होतो. प्रत्येक प्रतीचा वेगळा खर्च नसला तरी बँडवीड्थ, सीपीयू, डिस्क अशा वेगळ्या सुविधांसाठी येतो. पारंपारिक प्रकाशनापेक्षा कितीतरी जास्त वाचकांपर्यंत लेखकाला पोहोचवण्याचे काम ही संकेतस्थळे करतात. इथेही जितके तुमचे वितरण जास्त, तितके ते स्थळ जास्त यशस्वी असे होत चालले आहे. इथे वाचकाकडून मूल्य घेतले जात नसल्याने संकेतस्थळांना खर्च चालवण्यासाठी कुठून तरी पैसे मिळवणे भाग आहे. लेखनाच्या बाजूला जाहिराती ठेवून ते मिळवणे हा एक त्यावरचा उपाय. मग त्यासाठी ते लेखन कायमस्वरूपी असणे भाग आहे. आणि त्यातून लेखकाने हक्क देण्याऐवजी दिलेला कायमस्वरुपी परवाना उदयाला आला. हे मॉडेल मायबोलीने शोधून काढले नसून इंग्रजी संकेतस्थळांवर अस्तित्वात होतेच. मायबोली पहिली मराठी वेबसाईट असल्याने मायबोलीवर मराठीत ते पहिल्यांदा आले इतकेच. लेखकाला यातून पैसे मिळत नसले तरी , त्या त्या वेबसाईटच्या वाचकांपर्यंत पोहोचण्याचा अनिर्बंध पर्याय उपलब्ध होतो. थोडक्यात लेखनाच्या दर्जाची चाचणी न करता, लेखकांना संधी देऊन एक प्रकारचा धोका त्यांनी पत्करला असतो (लेखन वाचकांनी वाचो ,वा न वाचो, डी़स्क, सिपीयू यासारखे खर्च असतातच). त्यामुळे सुरुवातीला घेतलेल्या धोक्याबद्दल , कायमस्वरूपी परवाना घेतला तर त्यात वावगे काय? मी नवोदित लेखक असताना मला संधी द्या, मी तुम्हाला परवाना देतो पण मी यशस्वी झाल्यावर परवाना आणि लेखन काढून घेणार अशी मागणी लेखकांनी केली तर हे मॉडेलच कोलमडून पडेल त्यामूळे असा कायमस्वरूपी परवाना घेणे आवश्यक आहे. प्रत्येक यशस्वी लेखकाबरोबरच ९९ अयशस्वी/नवोदित लेखनाला वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ही संकेतस्थळे करत असतात जे पारंपारिक प्रकाशन व्यवसायात शक्य नव्हते.

या दोन्ही मॉडेलमधल्या काही गोष्टी घेऊन एक तिसरे मॉडेल काही वर्षात उदयाला आले आहे. यात प्रकाशक कुठल्याही लेखकाचे प्रकाशन करायला तयार असतो. प्रकाशक लेखकाला काहीही न मोबदला ने देता उलट लेखकाकडूनच (मुद्रण , संस्करणाचे) पैसे घेतो. आणि ते पुस्तक खपवण्याची जबाबदारी ही पूर्ण लेखकावरच असते. लेखनाचे हक्क लेखकाकडेच राहतात पण त्या प्रति काढण्यापुरता परवाना लेखक प्रकाशकाला देतो. विशेषतः अनिवासी भारतीय लेखकांमधे हे मॉडेल लोकप्रिय आहे.

>'इतर माध्यमांमधे' हा प्रयोग वगळता / बदलता येईल का?
नाही. कारण तंत्रज्ञानामुळे वाचकांपर्यत पोहोचण्याचे मार्ग बदलत जातात.
उदा, २० वर्षांपूर्वी Text based Bulletin Boards होते. तेंव्हा जर एखादे License त्या माध्यमापूरते मर्यादित ठेवले असते तर आज Html वर आधारित वेबसाईटवर ते पाहता आले नसते. Text based माध्यमातही आधी EBCEDIC आणि नंतर ASCII अशी स्थित्यंतरे आली.
आज मायबोलीवर HTML वर आधारित लेखन आहे. उद्या सगळे तंत्रज्ञान XYZ वर आधारित झाले तर मायबोलीला सगळ्या लेखकांना पुन्हा गाठून परत परवाने घेत बसावे लागेल, जे प्रशासकीयदृष्ट्या अशक्य आहे.

कुठेतरी मायबोलीला स्वत:च्या अस्तित्वाची काळजी घेणे भाग आहे. असे करताना आम्ही दिलेल्या परवान्याचा दुरुपयोग केलेला नाही हे आतापर्यंत आमच्या कृतीतून दाखवून दिले आहे.

पण तो दुरुपयोग होणार नाही हे आता सिद्ध करण्यासाठी, भविष्यातला अस्तित्वाचा धोका पत्करावा लागणार असेल तर ते शक्य नाही.

मायबोलीवर लेखन करून त्याच लेखनाची पुस्तके , सीडी निघाल्या आहेत आणि आम्ही कधिही मूळ लेखकाला/कविला अडवले नाही. उलट प्रोत्साहन दिले आहे आणि मायबोली हे आणखी एक वितरणकेंद्र म्हणून मदतही केली आहे.

> जेव्हा सर्व हक्क प्रकाशकास्वाधीन असे पुस्तकावर म्हणले जाते तेव्हा लेखकाने ते हक्क दिलेले असतात >आणि लेखकाला मोबदला मिळालेला असतो. कमी जास्त कसा का असेना पण असतो.

बहुतेक बाबतीत हे खरे असेलही पण दुर्दैवाने नेहमीच असेल असे नाही.
माझ्याकडे आता एक आरतीसंग्रह आहे. त्यावर सर्व हक्क प्रकाशकास्वाधीन म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी सत्यनारायणाची पूजा आणि कथा अशी पोथी पाहिली होती. त्यावरही सर्व हक्क प्रकाशकास्वाधीन असे लिहले होते.

वेबमास्तर,

त्या आरत्यांचे, कथेचे, पूजेचे हक्क स्वतःकडे ठेवून त्या प्रकाशकाला काहीएक उपयोग नाही. कारण ते सारं अनेक वर्षांपासून प्रताधिकारमुक्त आहे. 'आरत्या छापू नका' असं कोणी कोणास म्हटल्याचंही ऐकिवात नाही. Happy सगळे मान्यवर प्रकाशक पुस्तकावर प्रताधिकार कोणाचा याचा स्पष्ट उल्लेख करतात.
बाकी, प्रकाशक लेखकांचे पैसे बुडवतात किंवा कसे, याचा मायबोलीवरच्या लेखनाशी, आणि परवान्याशी संबंध नसावा. (माझ्या समजुतीप्रमाणे) प्रश्न उपस्थित झाला तो 'इतर माध्यमांमध्ये' या प्रयोगामुळे. आपण लिहिल्याप्रमाणे ’माध्यम’ या शब्दात html, flash ही अप्लिकेशनं समाविष्ट होत नाहीत. त्यासाठी ’अनुप्रयोग’ हा शब्द आहे. ’इतर माध्यमांमध्ये’ असा वापर जेव्हा होतो, तेव्हा पुस्तक, चित्रपट, नाटक ही माध्यमंच लक्षात येतात. HTML, Flash किंवा इतर कुठलंही अप्लिकेशन वापरलं तरी वाचण्यासाठी / लिहिण्यासाठी माझं माध्यम संगणक हेच असणार आहे. योग्य शब्द वापरला जावा, गोंधळ होऊ नये, म्हणूनच मी केवळ तशी विनंती केली होती. Happy