शेवटचं वळण २: सेकंड इनिंग होम

Submitted by कविन on 6 September, 2011 - 06:27

स्वेटर विणताना शेजारी जोरात आवाज करत खेळण्यातील गाडी चालवत असलेल्या आपल्या नातवाला म्हणजे अमेयला आजींनी आवाज कमी करण्याचा सल्ला दिला आणि नेहमीप्रमाणेच तो न ऐकता अमेय उलट अधिक आवाज करू लागला. समोरच्या फोटोतील पतीच्या चेहर्यारकडे सहज नजर गेली आणि आजींचा श्वास रोखला गेला. मनातील विचारांना व्यक्ततेचे अमूर्त स्वरूप मिळाले तसे विचार सैरावैरा डोळ्यातून वाहू लागले.

’तुम्ही म्हणायचात तसे नसते हो काहीच! माणसाची किंमत त्याच्या चालत असलेल्या हातापायांना आणि तो कमावत असलेल्या पैशांना मिळत असते. माणसाला ती स्वतःला मिळालेली वाटत असते हो. आवश्यकतेपासून अडगळ हा प्रवास अर्ध्यात थांबवून आणि मला एकटीला टाकून गेलात ते योग्यच केलेत. अडगळ नसते होता आले तुम्हाला. सहन नसते झाले. मलाही होत नाही आहे. पण माझे हातपाय चालत आहेत. मधुरा यायच्या आधी कुकर झालेला असतो. अमेयला जेवायला वाढायला आजी आहे. दोन्ही मोलकरणी व्यवस्थित सगळे काम करत आहेत वा नाही हे पाहायला सुपरव्हायजर आहे. एखादी आली नाही तर तिचे काम पटकन आवरून टाकायला सबस्टिट्यूट म्हणूनही आहेच मी. कुरियरवाले येतात, मोबा‌ईल टेलिफोनवाले ये‌ऊन बिलाचे पैसे घे‌ऊन जातात, सगळे बघायला मी आहे. इतकेच काय, रात्रीचा स्वयंपाक जवळपास मीच करते. ती फक्त आमटी किंवा कोशिंबीर करते. अजून पोळ्या सहज करते हो मी तुम्हाला आवडायच्या तशा. सकाळचा स्वयंपाक करायला आणि डबे भरायला बा‌ई आहेच. वाळलेल्या कपड्यांच्या घड्या करताना थोडेसे हात दुखतात. पण तेवढे केलेच पाहिजे. सासूबा‌ई होत्या तेव्हा मी सून होते आणि स्वतः सासू झाल्यावरही सूनच आहे. पण तुम्ही सुटलात. अडगळ झाला नाहीत.’

"आज्जी भूक लागली......."

आजींनी अमेयला वाढले आणि त्याच्यापाशी बसून त्याच्याशी काहीबाही बोलत बसल्या. फार हट्टी वगैरे नव्हता शिवाय आजीची घरातील किंमत समजण्या‌इतका मोठा नव्हता. चार वर्षांचा होता. आता नवीन बाळ येणार म्हणून अनेक प्रश्न विचारायचा. तेवढीच मजा आजींना.

दुपारी तो झोपतो म्हणून पेटी वाजवायची नाही, संध्याकाळी सगळ्यांना कटकट होते म्हणून वाजवायची नाही, सकाळी सगळे घा‌ईत असतात तेव्हा वाजवायची नाही. पेटी वाजवायची वेळ ठराविकच. संध्याकाळी पाच ते सहामध्ये वाजवा हवी तर.

भजनाच्या बायका यायच्या पूर्वी घरी. त्याचीही परवानगी घ्यायची. मुलाला आणि सुनेला अनौपचारिकपणे का हो‌ईना सांगायचे की आज भजनाच्या बायका येणार आहेत. मधुरा नाक मुरडायची किंवा अबोल राहायची. सारंग म्हणायचा, ""आ‌ई, काहीही करत असतेस तू, आता त्या सगळ्यांसाठी उगाच चहापाणी आणि खायला काहीतरी करत बसतील. तुला एकदा तरी बोलावतात का कुणी त्यांच्या घरी? आणि मग आम्हाला काही काम पडू नये म्हणून सगळी आवरा‌आवरी स्वतः करत बसशील आणि रात्री दमून जाशील. काहीतरी आपलं करत बसायचं. आणि मी काय म्हणतो, तुमचं ते भजन काय इतकं दर्जेदार तरी आहे का की कुठे त्याचे कार्यक्रम वगैरे करता येतील. नुसता स्वतःचा छंद आहे तो. मग इतके कष्ट कशाला घेत बसायचे त्याचे?"

सारंग ऑफिसला निघायच्या घा‌ईत इतकी वाक्ये बोलायचा. अमेय त्याच्याबरोबर शाळेत जायचा आणि रिक्षेने घरी यायचा. सारंगच्या पाठोपाठ ’येते’ असे सांगण्याची तसदीही न घेता मधुरा ऑफिसला निघून जायची. आपण खिडकीत उभे राहायचे आणि हात करतीय का ते बघायचे. आठवड्यात कधीतरी एकदा हात करायची वर पाहून. तेवढेच प्रेम.

मग भजनाच्या बायकांना संध्याकाळची आठवण करायला फोन करायचा म्हटले की मधुराची कुजबूज आठवायची. ’काय फोनची बिलं येत आहेत हल्ली’ असे मध्येच म्हणायची. मग स्वतःच बाहेर निघून एकेकीला घरी जा‌ऊन आठवण करून द्यायची आणि येताना रवा किंवा काहीतरी घे‌ऊन यायचे. मग कधी एकदा सगळ्या येतायत आणि भजन सुरू होतय आणि मग गप्पा मारत शिरा किंवा उपमा आणि चहा होतो याची प्रतीक्षा करत बसायचं......

अडगळीची वाढीव अडगळ म्हणजे भजन आपलं.

"मी नाही दही खाणार."

अमेयला दही आवडत नाही म्हणून ती वाटी पुन्हा फ्रीजमध्ये ठेवत आजींनी टेबल आवरले. अमेय आता खेळत खेळत पेंगायला लागला. पुन्हा फोटोकडे पाहत आजी मनातच विचार केल्याप्रमाणे फोटोशी संवाद साधू लागल्या.

’ तुम्ही गेल्यानंतरही दीड वर्षे भजन चाललं आपल्या घरी. नंतर मग कुणालाच आवडत नाही आणि सारखे काही ना काही बोलतात म्हणून शेवटी मीच बंद केलं. आता संध्याकाळी थोडीशी पेटी वाजवते आणि सगळ्या बायका खाली सोसायटीत एका ठिकाणी बसतात तिथे जा‌ऊन बसते. साडेसहाला मधुरा येते त्या आधी घरात परत यायचं असतं. बाकी काही नाही. कधी एकदा पाच वाजतात याची वाट पाहत असते.

हे तिघे सारखे जेवायला बाहेर जातात. काही वेळा मग काही करावेच लागत नाही. सकाळचेच पुरते मला. सगळ्या बायका विचारतात की भजन बंद का केलेत. मी सांगते की आमच्या शेजारपाजार्यांजना थोडा त्रास झाला असे वाटले म्हणून बंद केले. मध्ये एकदा ज्येष्ठ नागरिक संघात पेटी वाजवली होती. पण तिथेही बाकी वेळा नुसती भाषणेच चाललेली असतात त्यामुळे जावेसे वाटत नाही.

तुम्ही होतात तेव्हाची गोष्ट वेगळी होती हो. आपण सकाळी आणि संध्याकाळी फिरायला जायचो. भजन असले तर तुम्ही भजनाच्या काही ओळी म्हणून आम्हाला साथ द्यायचात. तुम्ही असलात की सारंग आणि मधुराही जरा दबून असायचे. हसत खेळत दिवस जायचे. आपण भाजी आणायचो, मी तुम्हाला आवडणारे पदार्थ करायचे. मलाही तेव्हा त्यात आनंद मिळायचा. इतकेच काय, कधी दमले असले तर तुम्ही चक्क पायही चेपायचात. कपाळावर थोपटायचात. परवा सारंगला म्हणाले कणकण वाटतीय तर म्हणाला उगाच फिरत जा‌ऊ नकोस संध्याकाळची, चांगले नोकर चाकर ठेवलेत नीट आराम कर. विचारायलाही आला नाही रात्री की आता कसं वाटतंय.

.... खरं सांगू का? मला नाही राहायचे येथे. वृद्धाश्रमात जायचे आहे. तेथे मला एक ओळख आहे. मी सहज त्या जोहरेबा‌ईंबरोबर तीन दिवस राहिले होते ना? तेव्हा पाहिले मी. किती प्रेम करतात सगळे एकमेकांवर. खूप गप्पा मारतात, खेळतात जमेल तसे. तिथे कार्यक्रमही खूप असतात. मी पेटी वाजवते समजल्यावर तर तीनही दिवस मला पेटीचा कार्यक्रमच करायला लावला त्यांनी. ऐका ना. जा‌ऊ का हो खरंच वृद्धाश्रमात? काही नाही हो, फक्त अमेयची थोडीशी अडचण हो‌ईल. त्याला ठेवतील पाळणाघरात वगैरे.

खरं सांगू का? दुसरी अडचण वेगळीच आहे. या दोघांना बे‌अब्रू झाल्यासारखी वाटते त्यात म्हणे. पण मला सांगा, माझी रोजच निराशा होते, रोजच सन्मानापासून मी वंचित राहते यावर उपाय काय आहे? तुम्हाला माहीत आहे? तुम्ही गेल्यावर ह्यांना नवीन फ्लॅटसाठी म्हणून तुम्ही माझ्या नावाने ठेवलेल्या साडे तीन लाखांपैकी एक लाख दिले मी. त्या दिवशी मलाही जेवायला बाहेर घे‌ऊन गेले. तेथे मी चुकून डोसा खा‌ईन म्हणाले तर हसले. म्हणे येथे असले काही मिळत नाही. मग त्यांनीच काहीतरी मागवले आणि ते मी खाल्ले.

त्यानंतर नेहमीचेच सगळे सुरू झाले. अजून फ्लॅटसाठी दोन लाख हवे आहेत. मी सरळ सांगितले की मी आता पैसे देणार नाही. मला सांगा, यावर म्हातार्याख आणि एकट्या असलेल्या आ‌ईशी भांडावे का? शेवटी मी आणखीन पन्नास हजार दिले. मला वृद्धाश्रमातील सगळे जण म्हणत आहेत की आमच्यासाठी तरी येथे राहायला या. सोसायटीतल्या सगळ्या बायका म्हणत आहेत की आमच्याकडे भजन करा. पण रोज पेटी कोण उचलून नेणार आणणार? तुम्ही एक दोनदा नेली होतीत पेटी कोणाकोणाकडे. पेटी दुरुस्त करून घ्यायला हवी आहे. पण ते कोण करणार आता? कुणाला सांगू शकते मी हक्काने? एक दोनदा म्हणाले तर सारंग म्हणतो की हवीय कशाला पेटी? आता तर भजनही बंद झाले आहे. वृद्धाश्रमात फक्त महिना दोन हजार रुपये दिले की सगळं बघतात म्हणे. म्हणजे दवाखान्याचा वगैरे खर्च नाही करत ते लोक. पण निदान राहणे, जेवण खाण वगैरे तरी होतेच. दोन लाख भागिले दोन हजार म्हणजे शंभर महिने झाले नाही का हो? म्हणजे अजून निदान आठ वर्षे तरी झालीच की? जा‌ऊ का? सांगा ना?....’

घराची बेल वाजली. कुरियरवाला कसलेतरी पाकीट दे‌ऊन गेला. सारंगच्या कामाचे असणार म्हणून आजींनी ते तसेच टिपॉयवर ठेवले. पुन्हा स्वेटर विणत बसल्या. जन्माला येणार असलेल्या बाळासाठी. हा कसला भडक कलर म्हणून त्या लोकरीवर सारंगने टीका केली होती. पण असूदेत म्हणून आजी तो स्वेटर विणतच राहिल्या होत्या.

’तुम्हाला मी एक सांगू? तुम्ही खरे तर खूप दुष्ट आहात दुष्ट. एकटेच गेलात पुढे. मी तुमच्यासाठी माझे माहेर सोडून आले होते आणि जाताना मला नेले नाहीत. आता माझे स्वतःचे, एकटीचे, हक्काचे असे कोणीच नाही. आणि माझे हे वय आता सत्तरी ओलांडून पुढे गेले आहे केव्हाच. अंग थकलं आहे. करवत नाही काहीच. पण करत राहावं लागतं. नाहीतर पूर्णपणे अडगळ हो‌ईन मी. तुम्ही माझ्यासाठी काही तरतूदही केली नाहीत ना? एक पैसे सोडले तर? मी आता चहा करत आहे. घेणार का अर्धा कप? मला नेहमी दुपारचा चहा तुम्हीच करून द्यायचात.’

आजी उठल्या आणि स्वेटर टिपॉयवर ठेवताना त्यांचे लक्ष सहज पुन्हा त्या पाकिटाकडे गेले. नाव वाचून त्यांना नवलच वाटले. ’श्रीमती जयश्री खांडेकर.’

घा‌ईघा‌ईने पाकीट उघडले.

कोणत्यातरी कंपनीचे पॉश पत्र होते ते. कैलासवासी चंद्रकांत खांडेकर यांनी आमच्याकडे केलेल्या शे‌अर गुंतवणुकीच्या नॉमिनी आपण असल्याने हा सहा लाख शहात्तर हजार रुपयांचा धनादेश आपल्या नावाने पाठवण्यात येत आहे. आपणही हे पैसे आमच्याकडे गुंतवल्यास आम्ही आपले ऋणी राहू.

आयुष्याची दिशा या वयात एका झटक्यात बदलली होती. तेवढ्यात बेल वाजली. चवथा महिना असलेली मधुरा लवकर घरी आलेली होती. तिने पाकीट आणि सासूचा चेहरा पाहून विचारले.

"कसलं पत्रं आहे?"

"ह्यांनी शे‌अर घेतले होते. चेक आला आहे. पावणे सात लाखांचा चेक आहे. माझ्या नावाने."

हुरळून अभिनंदन करून सारंगला ती बातमी देण्यासाठी मोबा‌ईल हातात धरलेल्या पाठमोर्याल मधुराकडे पाहताना आजींच्या मनात वेगळेच विचार चाललेले होते. सारंग घेत असलेला नवीन फ्लॅट आठ लाखांचा होता. सध्याच्या घराची किंमत होती दहा लाख. वृद्धाश्रमात अस्तित्वाला सन्मान होता. मुलांची प्रगती हेच कर्तव्य ही भावना प्रबळ होती. ज्येष्ठ नागरिक संघाला देणगी दिली तर तेथे महत्त्वाचे पद मिळून उरलेल्या आयुष्याला आकार येणार होता. पैसे पुन्हा त्याच कंपनीत गुंतवले तर व्याज मिळत राहणार होते.

एवढे पर्याय उपलब्ध असताना आजी वेगळाच विचार करत होत्या...

पुढे ????????????????????????????

-----------------------------

आता ह्या वयात "काहीही गमवून काही कमवायची" इच्छा नाहीये तसही. पुन्हा गुंतवणूक केली तरी तिच्यातून मिळणारं उत्पन्न उपभोगायला "चणे आहेत तर दात नाहीत" अशा अवस्थे कडे चाललेला प्रवास बघता तो ही पर्याय् नको वाटतोय. प्रत्येकाचं आपापलं विश्व आहे इथे. कोणी चूक् नाही की मीच तेव्हढी शहाणीही नाही. माणसाने ठामपणा शिकायला हवा हे बाकी खरं. स्वत्:च्याच मनात उठणार्‍या तरंगात हरवून जात आजी स्वत्:शीच विचार करत होत्या. एकदाचा सगळ्या गोष्टींचा विचार् करुन् झाल्यावर् पुन्हा एकदा मन नावाची गोष्ट पलटी खायच्या आत त्यांनी हा विचार कृतीत उतरवायचं ठरवून रात्रीची जेवणं झाल्यावर हा विषय काढायचं ठरवलं.

तिकडे सारंग आणि मधूराची देहबोलीही "त्या" चेकबद्दल बोलायला उत्सुक दिसत होती.

अमेयने "गुड नाईट आज्जीऽऽ" म्हणत गोऽऽडशी पप्पी दिली तेव्हा पुन्हा उचंबळून आलं.

"काय होऽ बोलू ना मी? तुमचं काय जातय फोटोत बसून होऽऽ म्हणायला? इथं कोण कसं रिऍक्ट होईल? आवडेल न आवडेल वाटून जीव टांगणीला लागलाय माझा"

"नाही पण आता बोलतेच, आज नाही बोलू शकले तर नाहीच जमणार पुन्हा कधी. आयुष्यऽभर मनातच इमले बांधले नी... राहुद्या झालं. तुमच्या समोर् इथे आत्ताच् बोलावते त्या दोघांना आणि बोलून टाकते झालं" आजी पुन्हा फोटोशी संवाद साधत पुटपुटल्या.

"मी काऽय् म्हणतेय! जराऽऽ बोलायचं होत तुमच्या दोघांशी. म्हणजे आत्ता दमलायत, पुन्हा सकाळपासून धावपळ सुरुच होईल तुमची. पण थोडं महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी"

"आज हा चेक आला अचानक आणि बरेच दिवसांपासून् मनात होतं ते वर आलं. तुमचे बाबा होते तोपर्यंत एक सोबत होती रे मला तशी. घर सोडून मन रमवायला बाहेर जायचं तब्येतीने झेपत नाही आणि... तुम्हाला तुमचे व्यापही पुष्कळ असतात त्यात आणि माझं टुमणं लावण्ं मलाच पटत नाही. नाही म्हणता अमेयामुळे थोडावेळ जातो मजेत माझा पण आज ना उद्या तो ही मोठा होणार, शाळेत जाणार्. त्याला आजी आठवली आणि आवडत् असली तरी त्याचही स्वत्:च मित्रमैत्रिणींच एक् जग् तयार होणार."

"आऽऽई अगं.."

"नाही रे माझी काही तक्रार नाहीये कशाबद्दलच. हा वयाचा परिणाम आहे झालं. तर् आता बघ हा मी म्हणतेय ते पटतं का ते. वृद्धाश्रमात् दिवसाकाठी दोन चार तास् जाऊन यायची सोय नाही, मला येणं जाणं पण दरवेळीच पाऊसपाण्यामुळे झेपेलसं वाटत नाही. तेव्हा... हे जे पैसे आलेत् त्यातले तुझ्या नव्या जागेकरता गुंतवून् आपण् ही जागा तशीच् ठेवून् तिकडे शिफ्ट् झालो तर्... "

"म्हणजे बघ्, ह्या जागेला मी "सेक्ंड इनिंग् होम" करु शकेन आणि नविन घरी हा सारा पसाराही होणार नाही म्हणजे ते तुम्हाला अगदी तुमच्या मनाप्रमाणे सजवता येईल."

"थांब रे, आज् बोलायला जमतय तर पुर्ण बोलूनच घेऊदे. मी वृद्धाश्रमात जाणं हे माझा वेळ आन्ंदात जाण्याच्या दृष्टीने सोयीचं असलं तरी त्यात अमेयाची गैरसोय आहे. तुमच्या विषयी गैरसमज पसवरणार आहे. म्हणून् म्हणते. नविन् घरासाठी हे "आपले" आलेले पैसे आहेत् ते वापरुया आणि हे घर् तसच् ठेवूया. तुम्ही नविन् घरी शिफ्ट् व्हा. मी येऊन् जाऊन असेनच्. इथे मी माझ्यासारखाच् वेळ जाण्याचा प्रश्न असलेल्या वृद्धांसाठी भजनी म्ंडळ, आपल्याच सारख्या लोकांच्या मदतीने एखादं वाचनालय असं सुरु करेन म्हणते. त्यात माझा वेळही चांगला जाईल. राहता राहिला अमेयाचा प्रश्न. तर् त्याला पाळणा घरात ठेवण्यापेक्षा तो शाळा सुटल्यावर नेहमीसारखाच् ह्या "आपल्या" घरी येईल. संध्याकाळी तुम्ही येतायेता त्याला नेऊ शकाल. आणि वाटलं तर् मी ही येईनच की अधून मधून तिकडे."

"सध्या तरी इतकाच् विचार् आहे. फार् स्वार्थी विचार् आहे हा, फक्त् माझा वेळ् आवडत्या कामात जावा आणि तुम्हा कोणालाही त्याचा त्रास होऊ नये ह्यासाठी केलेला. माझ्या नंतर काय्? त्याचा विचार आत्ता तरी नाही केलेला मी. माझ्यामागे तसही सगळं तुमचच आहे. फार् पुढचा विचार करुन मी करु काय्? मी असे पर्यंत काय्? ह्याच गोष्टीचा विचार सध्यातरी केलाय मी. तुमचही अगदी काही नुकसान नाही होणारे ह्यातून. घर घ्यायला लोन काढून जो हप्ता जाणार होता तो वाचेल तुमचा. हे घर भाड्याने देऊन् मिळणारे पैसे जवळपास त्या हप्त्या येवह्ढेच होतायत म्हणजे तस बघता नुकसान असं नाहीये त्यात. बघा तशी घाई नाहीये पण् "वृद्धाश्रमाला" पर्याय् म्हणू नक्कीच् विचार करण्यासारखा आहे हा "सेकंड इनिंग होमचा" ऑप्शन" आजी त्यांनाच सामिल करुन घेत मत मांडतात आणि त्यांना तसच विचारात सोडून जप लिहायला बसतात.

सारंग आणि मधूराचा थोडासा ऑकवर्ड वावर "हे" त्यांना अनपेक्षित होतं हे कळण्यास पुरेसा असला तरी त्यांना खात्री असते "आपलीच मुलं आहेत. वेगळा विचार पटायला वेळ लागेल खरा पण आपणहीअ थोडे ठाम राहिलो तर पटेल निश्चित. त्यातही वृद्धाश्रम् की सेकंड इनिंग होम असा पर्याय समोर असताना नक्कीच पटेल.

"काऽय होऽ, बरोबर बोलले ना मी? आधी वाटलेलं, ह्यातले थोडे पैसे द्यावेत त्यांना आणि बाकीचे इन्व्हेस्ट करुन् एखाद्या सामाजिक् उपक्रमाला जोडून् घ्यावं स्वत्:ला, हात पाय चालतायत तोपर्यंत.. पण ह्या घराचा मोहही कमी होत नाही हो अर्धी काय पाऊण लाकडं मसणात गेली तरी.पण आज निदान वाटत ते बोलून मोकळी झाले म्हणून इतकं हलकं हलकं वाटतय म्हणुन सांगू. तुमच्या कडे येईपर्यंत तरी हे सेकंड इनिंग होम मनातल्या सारखं जगावं म्हणतेय.... तशी मुलं वाईट नाहीत आपली. अचानक इतक्या वर्षांनी मांडलेला हा वेगळाच मुद्दा म्हणून जरा वेळ लागेल पटायला. पण पटेल शेवटी. चला झोपा आता. असच बोलत बसते तुमच्याशी आणि मग वेळ उलटून गेली की टक्क जागं रहावं लागतं. माझ्यापुरता निर्णय तर झालाय. तुम्ही झोपा आणि मलाही झोपुद्या, सेकंड इनिंग होमची स्वप्न बघायचेत आज मला. पहाटेची स्वप्न खरी होतात म्हणे.."

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलांना नव्या घराचं आमिष दाखवून ह्या राहत्या घराचं सेकन्ड होम करणं ब्येस्टच! Proud

आजींचं आजोबांशी बोलणं व्यवस्थित पकडलं आहेस Happy