आडदांड

Submitted by kaustubh004 on 5 September, 2011 - 10:10

आडदांड. अर्थवाही शब्द आहे. आणि असा शब्द जेव्हा एखाद्या स्निग्ध प्रकृतीच्या कवितेत आपला अंगभूत आडदांडपणा सोडून चपखलपणे अर्थ वाहून नेतो तेव्हा अशा प्रतिभेवर फिदा होणं भाग असतं.

"नको नको रे पावसा " - या कवितेची कथावस्तू, नायिकेची असहायता वाचकाला चटकन गुंतवून घेते (आणि नाजूक-हृदयी/अतिहळव्या वाचकांची सद्गदित व्हायची सोय करू शकते) . पण तूर्तांस त्यावरील नजर काढून कवितेच्या शरीरावर जरा फोकस स्थिर केला ही कविता, कविताच कशी आहे आणि नुसती गोष्ट का नाही ते पटतं.

नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी :
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली;

नको नाचू तडातडा असा कौलारावरून :
तांबे-सतेली-पातेली आणू भांडी मी कोठून?

नको करू झोंबाझोंबी : माझी नाजूक वेलण,
नको टाकू फुलमाळ अशी मातीत लोटून;

आडदांडा नको येऊ झेपावत दारातून :
माझे नेसूचे जुनेर नको टाकू भिजवून;

कौलावर तडातडा नाचून, नाजूक वेलींशी झोंबाझोंबी करून आता तो आडदांड तिच्यापर्यंत पोहोचू पाहतो आहे. "आडदांडा"! - कवितेतील राकटपणाची/रासवटपणाची ही मर्यादा आहे. कवितेच्या स्वभावाप्रमाणेच ही फार सौम्य मर्यादा आहे. मला वाटतं "आडदांडा" शब्द कवितेला जो अर्थ बहाल करतो त्यापेक्षा बराच अधिक अर्थ कविता "आडदांडा"ला बहाल करते. "आडदांडा" शब्दात सामावलेल्या अर्थाच्या शक्यता या कवितेच्या संदर्भामुळे उघड होतात.

यानंतर गोष्ट थोडा सूर बदलून पुढचा टप्पा गाठते. "आडदांडा" पासून मागे फिरून "पावसा, राजसा" चा निहायत सुंदर प्रास येतो. आणि परत फिरून सद्य वास्तवाचं धृपद - "नको" ची पुनरुक्ती टाळून - किंचित अधिक समजूतदारपणे.

किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐक ना :
वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आण ना;

वेशीपुढे आठ कोस जा रे आडवा धावत;
विजेबाई, कडाडून मागे फिरव पांथस्थ;

आणि पावसा, राजसा नीट आण सांभाळून :
घाल कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन;

पितळेची लोटीवाटी तुझ्यासाठी मी मांडीन,
माझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन;

नको घालू रे पावसा असा धिंगाणा अवेळी :
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली.

(- इंदिरा संत)

गुलमोहर: