'शांताराम' नावाचे गारूड !

Submitted by ज्ञानेश on 31 August, 2011 - 04:13

"I was a revolutionary who lost his ideals in heroin,
a philosopher who lost his integrity in crime,
and a poet who lost his soul in a maximum security prison."

-Lin.

कुठल्याही चांगल्या पुस्तकाचा एक असा निकष असतो की ते वाचून संपवल्यावर तुम्हाला कुठेतरी थकवा जाणवला पाहिजे. तुमच्यातून अचानक काहीतरी कमी झाल्याचे रितेपण जाणवले पाहिजे. कारण एक पुस्तक वाचून संपवणे हे अनेक आयुष्यं फास्ट-फॉर्वर्ड करून जगण्यासारखे असते.
"शांताराम" हे पुस्तक तुम्हाला असा अनुभव पुरेपूर देते.
’शांताराम’च्या थकव्यातून मी अजून बाहेर आलेलो नाही.

शांताराम ही एका विख्यात गुन्हेगाराची आत्मचरित्रात्मक, प्रथमपुरूषी निवेदनपर कादंबरी आहे. (आत्मचरित्र नाही.)
ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स हे त्याचे नाव. कादंबरीची ओळख करून घेण्याआधी आपण लेखकाचे ’प्रोफाईल’ विस्ताराने बघू.
ग्रेगरी हा ऑस्ट्रेलियाचा एक गुन्हेगार. खंडणी, दरोडे, सशस्त्र हल्ले, बॅंका लुटणे- यासारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी तब्बल २० वर्षांची सजा त्याला सुनावली गेली. ऑस्ट्रेलियातल्या सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणार्‍या ’Pentridge Prison’ मध्ये त्याची रवानगी झाली. मात्र अवघ्या दीड वर्षात ग्रेग भर दिवसा, दुपारी एक वाजता तुरूंग फोडून पसार झाला. त्याच्या या कृत्याने तो क्षणार्धात ’ऑस्ट्रेलियाज मोस्ट वांटेड’ क्रिमिनल्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आला. इंटरपोलने त्याच्या नावाने रेड कॉर्नर नोटिस लागू केली आणि जगभरातली पोलिसदले हात धुवून त्याच्या मागे लागली.
आणि मग सुरू झाला तो जीवघेणा पाठलाग आणि लपाछपीचा खेळ. ग्रेगरी एकामागे एक देश पालथे घालत- खोट्या नावांनिशी- खोट्या पासपोर्टसह पळत राहिला.
देशोदेशीच्या सुरक्षा व्यवस्थेला हूल देत भिरभिरत सुटलेलं ग्रेगचं परागंदा जगणं पहिल्यांदाच स्थिरावलं, ते ’मुंबई’ नावाच्या शहरात !

1982 साली ग्रेग मुंबईत उतरला, आणि पुढची तब्बल नऊ वर्षे त्याने मुंबईत काढली. या काळात त्याने मुंबईतल्या एका मोठ्या झोपडपट्टीत गोरगरिबांसाठी मोफत दवाखाना चालवला, रस्त्यावरच्या लढाया लढवल्या, मुंबईतल्या अंडरवर्ल्ड माफिया टोळ्यांमधे स्मगलर, गन-रनर म्हणून कामं केलं, लिओपोल्ड कॅफेमधे बसून दोस्त जमवले.. आणि शत्रूही. मरीन ड्राईव्हपासून धारावीपर्यंत, पंचतारांकित हॉटेल्सपासून ते अतिगलिच्छ झोपड्यांपर्यंत, प्रेयसीच्या चुंबनापासून ते तुरूंगातल्या छळापर्यंत आणि माफिया डॉनपासून भिकारी-हिजड्यांपर्यंत ’मुंबई’ नावाच्या या महान गूढाच्या प्रत्येक शक्यतांना त्याने स्पर्श केला- आणि नुसता स्पर्शच केला नाही तर कडकडून मिठी मारली ! ग्रेगने या शहराला आणि या शहराने ग्रेगला आपल्या कवेत घेतले.

"शांताराम" हे पुस्तक त्याच्या या मुंबईतल्या नऊ वर्षांची कहाणी आहे !

कादंबराची पाच भाग केलेले आहेत. प्रत्येक भागात क्रमाक्रमाने ग्रेगचे मुंबईतले आयुष्य उलगडत जाते. मुंबईत त्याला भेटलेला पहिला भारतीय माणूस- प्रभाकर किसन खाडे त्याचा सर्वात जवळचा मित्र बनतो. ग्रेग मुंबईत ’लिंडसे’ नावाने वावरत असतो, आणि प्रभाकरने त्या नावाचे भारतीयीकरण केल्याने ग्रेगचा ’लीनबाबा’ होतो. पुढे पुस्तकभर लेखक आपल्याला ’लीनबाबा’ या नावानेच भेटतो. यानंतर आपल्याला भेटत जातात कार्ला, विक्रम, डिडीअर, जॉनी सिगार, लेट्टी, अब्दुल्ला, रुखमाबाई, कानो, मारिझुओ, मोदेना, कादरभाई.... आणि इतर असंख्य लोक. "शांताराम" चे एक महत्त्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे यातल्या पात्रांची संख्या अक्षरश: बेसुमार आहे. दीड हजार पानाच्या या अवाढव्य पुस्तकात कादंबरीच्या शेवटच्या काही पानांपर्यंत नवनवी पात्रे येतच असतात, आणि तरीही आपण यातल्या प्रत्येक पात्राशी relate करू शकतो, आणि त्यांच्या पार्श्वभूमीवरच लीनबाबा आपल्याला समजत जातो, आवडत जातो. हे काहीसं मुंबईच्या गर्दीसारखंच ! आपल्याला घेरून घेणारं, आणि तरीही आपला चेहरा शाबूत ठेवणारं..

पुस्तकातला मला सर्वात जास्त आवडलेला भाग म्हणजे, ग्रेगचं क्रमाक्रमानं ’भारतीय’ होत जाण्याची प्रक्रिया ! एखाद्या परदेशी कलाकृतीत आपल्या देशाला समजून घेण्याचा इतका अस्सल प्रयत्न यापुर्वी माझ्या पाहण्यात आलेला नाही. Monk who sold his ferrari मधे रंगवलेले अति-आध्यात्मिक किंवा Slumdog ने दाखवलेले अति-दरिद्री चित्रं ही खरी असली तरी ’भारत’ समजून घ्यायला अपूर्ण होती. शांताराम मात्र कुठलेही पूर्वग्रह मनात न बाळगता, अतिशय स्वच्छ नजरेने आपल्यालाच आपल्याच देशाची सफर घडवतो. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातल्या लहानशा खेड्यात राहणार्‍या रुखमाबाई खाडेने- प्रभाकरच्या आईने- ग्रेगचे विधिवत बारसे करून त्याला ’शांताराम’ हे नाव देण्याचा प्रसंग असो किंवा मुंबईत प्लॅटफॉर्मवर निरुद्देश भटकणार्‍या लीनबाबाने त्रास देणार्‍या टॅक्सीवाल्याला अस्सल मराठीत शिव्या घालण्याचा प्रसंग असो- हे प्रसंग आपल्याला ’परके’ वाटत नाहीत. किंबहुना आपल्या भारतीय मनाला ते जवळचे वाटतात.

या पुस्तकाचा दुसरा एक विशेष म्हणजे त्यातला तपशिलाचा अचूकपणा- detailing ! मुंबईची प्रत्येक गल्ली- प्रत्येक रस्ता- अगदी झोपडपट्टीतला प्रत्येक बोळ इतक्या बिनचूकपणे वर्णन केला आहे, की पिढीजात मुंबईकरही त्याला दाद दिल्याशिवाय राहणार नाही. 26/11 च्या हल्ल्यामुळे जगभर ओळखला जाणारा लिओपोल्ड कॅफे या कादंबरीच्या बर्‍याच प्रसंगात केंद्रस्थानी आहे. लीनबाबाने मुंबईत घालवलेला काळ (1982-1990) हा शिवसेनेच्या उदयाचा काळ असल्याने, सेनेचेही काही तपशिल राजकीय संदर्भाने येतात. एका प्रसंगात इंदिरा गांधी यांच्या हत्येचे पडसादही उमटलेले दिसतात. बॉलीवूडचे काही रंजक संदर्भसुद्धा डोकावल्याशिवाय राहत नाहीत ! मुळात ते सगळे 80 चे दशक आपल्या शक्य तितक्या प्रभावांसह कादंबरीत उमटत राहते. या Detailing मुळेही कादंबरीचा आकार काहीसा मोठा झाला आहे.
पुस्तकात पुन्हापुन्हा आलेली लीनबाबाची स्वगते, त्याच्या कादरभाईसोबत वेळोवेळी होणार्‍या प्रदीर्घ अशा आध्यात्मिक आणि तत्त्वज्ञानपर चर्चा यामुळे कादंबरीला एक सखोल, चिंतनात्मक डूब मिळाली आहे. कादंबरीचा हा भागही अनेकांना आवडू शकतो.

असे असले तरी कादंबरीत काही खटकणारे दोषही आहेत. अनेक ठिकाणी कादंबरी पाल्हाळिक आणि अतिरंजित झालेली दिसते. भारतात घडू शकणार्‍या नाट्यमयतेच्या शक्यतांना काही ठिकाणी जास्तच ताणले असल्याचे दिसते- उदा. कानो अस्वलाची गणपतीच्या रुपात मिरवणूक करण्याचा प्रसंग हा अत्यंत फिल्मी आहे. ८० च्या दशकांतल्या मसाला हिंदी सिनेमात शोभेल असा हा प्रसंग आहे. असे प्रसंग बहुधा पाश्चात्य वाचकांच्या मनोरंजनासाठी घुसडलेले असावेत, मात्र त्यामुळे कादंबरीचा प्रखर वास्तवाशी घट्टपणे बांधलेला धागा सैलावतो, असे माझे मत आहे. कादंबरीच्या शेवटच्या भागातली अफगाणिस्थानाची स्वारी वगैरे भाग तपशिलाच्या बाबतीत अचूक असले तरी मला कंटाळवाणे वाटले. इथे जरासे editing करता आले असते असे वाटते.
असो !

काहीही असले तरी ’शांताराम’ ही सर्वार्थाने एक "महा-कादंबरी" आहे. तुम्हाला एक वाचक म्हणून समृद्ध करणारे हे पुस्तक आहे. प्रत्येकाने एकदातरी घ्यावा असा हा सुरेख अनुभव आहे ! सर्व अक्षरप्रेमींना माझी विनंती आहे की, त्यांनी आपल्या पुढे वाचण्याच्या पुस्तकांच्या यादीत "शांताराम"चा नक्की समावेश करावा.

-------------------------------------------------------------------

1990 नंतर ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स जर्मनीत इंटरपोलच्या हाती लागला, आणि उर्वरित शिक्षा भोगण्यासाठी त्याची पुन्हा तुरूंगात रवानगी करण्यात आली. आपली राहिलेली शिक्षा भोगून आल्यानंतर त्याने एक मल्टीमिडिया कंपनी स्थापन केली, आणि त्यामार्फत 2003 साली "शांताराम" या मराठी नावाचे पुस्तक इंग्रजीत प्रकाशित केले. यानंतर या पुस्तकाने जगभर विक्रीचे उच्चांक मोडले आहेत. आजवर ३८ भाषांमध्ये हे पुस्तक भाषांतरित झाले असून, त्याच्या पन्नास लाखापेक्षाही जास्त प्रती जगभर विकल्या गेल्या आहेत.

भारतीय भाषांपैकी पहिल्यांदा मराठीतच "शांताराम" आले आहे. मराठी अनुवाद अपर्णा वेलणकर यांनी केला असून, मेहता पब्लिशिंग हाऊसने ते प्रकाशित केले आहे. मराठी "शांताराम" ची पृष्ठसंख्या १४१२ इतकी असून, त्याची किंमत रु. ९९०/- इतकी आहे.

पुस्तकाबद्दल आणि लेखकाबद्दल अधिक माहितीसाठी खालील वेबसाईट पहावी-

www.shantaram.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्ञानेश ~

'अरेबियन नाईट्स' च्या धर्तीवरील कथानक असावे असे वाटू शकणार्‍या या कादंबरीचा आवाका खूप प्रचंड असाच असल्याने तिची लांबी, त्यातील असंख्य पात्रे आणि भारतीय वाचकाला वाटू शकणारे काहीसे पाल्हाळ [जे तुम्हाला खटकले....अस्वल मिरवणूक वगैरे] असले तरी ते तसेच असणे ही त्या लेखकाची एक गरज होती असे मला वाटते. मुळातील इंग्रजीतील ही कादंबरी [मी इंग्रजीच वाचली आहे] जगभरातील वाचकांना 'मुंबई' या मायानगरीची सर्वांगिण ओळख करून देत असल्याने साता समुद्रापलिकडील वाचकाला त्यातील बहुविध वर्णने आणि वैविध्यता बिलकुल खटकणार नाही. लाखांच्या संख्येने होत असलेला या कादंबरीचा खप हेच सांगतो की एका परदेशी युवकाच्या नजरेतून अफाट विश्व असलेल्या मुंबईतील घडामोडी बाहेरच्या वाचकांनी जशाच्यातशा स्वीकारल्या आहेत.

मराठी भाषांतरात [जे मी पाहिलेले नाही] 'Acknowledgment' चे पान आहे की नाही हे मला माहीत नाही, पण इंग्रजीमध्ये ग्रेगरीने सांगितले आहे की परत तुरुंगात रवानगी झाल्यानंतर पुढील सहा वर्षे तो ही कादंबरी लिहित होता आणि जवळपास सहाशे पाने लिहून झाल्यानंतर एके दिवशी ते सारे बाड तुरुंगातच नष्ट झाले. 'फ्रॉस्टबाईट' मुळे त्याच्या बोटांना बधीरता आली होती आणि तशाच अवस्थेत त्याने पुनश्च लिखाण चालू ठेवले होते....आजही ते रक्ताळलेले हस्तलिखित त्याने हळुवारपणे जपून ठेवले आहे.

मला वैयक्तिकरित्या या कादंबरीतील आवडलेला प्रसंग म्हणजे 'शांताराम' चा 'आर्थर रोड जेल' मधील कैदेचा काळ. स्टीव्ह मॅक्वीन अभिनीत 'पॅपिलॉन' अथवा क्लिन्ट ईस्टवूडच्या 'डर्टी हॅरी' ची आठवण यावी असेच भन्नाट वर्णन आहे तेथील वातावरणाचे.

जितके लिहावे तितके कमीच आहे या अवाढव्य कादंबरीबद्दल...इंग्लिशचीही बारीक टायपातील तब्बल ९१६ पाने आहेत....अर्थात सारीच वाचनीय.

एका महत्वाच्या कादंबरीचा तुम्ही छान परिचय करून दिला आहे.

अशोक पाटील

मी ही मूळ इंग्रजी कादंबरी वाचली आहे. अनेक ठिकाणी पाल्हाळीक आहे खरी. पण त्यातलं मुंबईचं, मुंबईबद्दलचं बारीकसारीक वर्णन वाचताना खरंच गुंगून जायला होतं.
मराठी अनुवाद उत्तम असणार यात वाद नाही. पण पुन्हा एकदा सग्गळं पुस्तक वाचायचा पेशन्स राहिलच याची खात्री देता येत नाही.

मी ही कादंबरी वाचायला चालु केली होती.. शंभरेक पानं वाचली असतील.. नंतर अनुवादीतही वाचायचा प्रय्त्न केला.. पण का कोण जाने ही कादंबरी संपवणं जमलच नाही... Sad

सुरेख लिहिलं आहेस ज्ञानेश! इतक्या मोठ्या कादंबरीचा परिचय करून देणं फार अवघड असतं. शांताराम मलाही आवडली. वाचता वाचता खरंच गुंगून जायला होतं खरं. काही पात्र, प्रसंग फिल्मी वाटतात, योगायोगही चिकार आहेत पुस्तकात, पण पुस्तक नक्कीच वाचनीय आहे.

तुम्ही छान लिहीले आहे. Quotation ही मस्तय.
('शांताराम' आवडले नव्हते. अनुवाद तर नाही वाचणार. पण इंग्रजीच पुन्हा मुड आला तर वाचेन.)

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार.

(एव्हाना मीसुद्धा विसरून गेलो होतो की हा पुस्तकपरिचय मी इथे प्रसिद्ध केला आहे. :))