रसग्रहण स्पर्धा : ' मास्तरांची सावली ' - कृष्णाबाई नारायण सुर्वे.

Submitted by आरती on 25 August, 2011 - 19:10

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दिसणार्‍या 'मास्तरांची सावली' आणि 'कृष्णाबाई नारायण सुर्वे' या पाच शब्दांपैकी 'नारायण सुर्वे' हे दोन शब्द वाचून हातात घेतलेले पुस्तक वाचताना कधी मी कृष्णाबाईंच्या आयुष्याच्या चक्रीवादळात अडकत गेले ते लक्षात आलेच नाही.

लेखक / कवी पत्नीने लिहिलेले पुस्तक हे आपल्या नवर्‍याला मोठे करण्यासाठी पत्नीने केलेल्या त्यागाची कथा असा एक ढोबळ अंदाज असतो. आणि इथेच या पुस्तकाचे वेगळेपण दिसते. कृष्णाबाईंनी जसा मास्तरांच्या [नारायण सुर्वे यांचा उल्लेख पुस्तकात 'मास्तर' असा येतो] जडणघडणीत आपल्या योगदानाचा उल्लेख केला आहे तसाच त्यांनी स्वतःच्या आचार-विचारात, व्यक्तिमत्त्वात होत गेलेला बदल हा केवळ मास्तरांच्या सहवासानेच आहे हे पण मान्य केले आहे. अत्यंत साध्या सरळ, जवळ जवळ बोली भाषेतच, लौकिक अर्थाने अशिक्षित असलेल्या स्त्रीने तिच्या मनात साठलेले विचार, केलेली धडपड, उपसलेले कष्ट, भोगलेलं पोरकेपण, आयुष्याच्या एका निवांत वळणावर कागदावर उतरवले आहे. त्यामुळेच वाचताना ते थेट मनाचा ठाव घेते.

एका दु:खाला सामोरे जाऊन मोकळा श्वास नाही घेत तर दुसरे दु:ख, दुसरी अडचण त्यांच्या मार्गात आयुष्यभर येत राहिली. समाजात वावरताना अत्यंत वाईट वागणूक, फसवणूक, अपमान, बदनामी सगळ्याला तोंड द्यावे लागले. पण इतके सगळे सहन करूनही कृष्णाबाईंना असलेली माणसांची ओढ, तिर्‍हाईता बद्दल सुद्धा वाटणारे प्रेम, अनोळखी माणसांच्या मदतीसाठी आसुसलेले त्यांचे मन, ही एक आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे, आणि तीच या पुस्तकाचा आत्मा आहे.

वयाच्या अवघ्या दुसर्‍या वर्षीच आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या कृष्णाबाई आणि जन्मत:च ज्यांना आईने कचराकुंडीजवळ सोडून दिले असे मास्तर, म्हणजे नारायण सुर्वे यांचे सांसारिक आयुष्य, शाळेत शिपाई ते 'शिक्षक' अशी प्रगती, झोपडपट्टीतले वास्तव्य, उपासमार ते स्वतःचे घर आणि आयुष्याची स्वस्थता असा प्रवास, कामगार नेता ते एक प्रसिद्ध कवी अशी ओळख, या सगळ्या घटनांमध्ये कृष्णाबाईं मास्तरांच्या पाठीशी भक्कम उभ्या राहिलेल्या दिसतात, अगदी त्यांच्या सावलीशी एकरूप होऊनच. तुमची सावली होऊन जगू द्या, मी तुम्हाला खंबीरपणे साथ देईन, असा लग्नानंतर कृष्णाबाईंनी मास्तरांना दिलेला शब्द त्यांनी आयुष्यभर पाळला.
अनेक लहान सहान गोष्टी शिकवून, प्रसंगी अंकुश ठेवून आपल्या मास्तरांना आपणच घडवलं आहे याचा आनंद आणि अभिमान कृष्णाबाईंना आहे, आणि त्यामुळे मास्तरांबद्दल खात्री, विश्वास पण आहे जो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांच्या मदतीला आलेला दिसतो.

आपल्या आजीजवळ (वडिलांची आई) वाढलेल्या कृष्णाबाईंना लहानपणापासूनच घरात राहणे, घरकाम करणे या गोष्टींमध्येच अधिक रस होता. पण जेव्हा संसाराला आधार द्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी शाळेत शिपायाची नोकरी पण केली. आवश्यक ते सगळे कामकाज शिकल्या. एखादा सुशिक्षित माणूस काय सोडवेल अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या पुढ्यात आलेल्या अनेक समस्या सोडवल्या. मग ते नोकरी सांभाळून मुलांचे संगोपन असो, की घरात सांडपाण्याच्या मोरीची सोय करणे असो, की फॅमिली प्लॅनिंग असो. त्यांच्या बुद्धीची चुणूक अशा कितीतरी प्रसंगामधून जाणवते. 'घाबरू नकोस कृष्णाबाई, हेही दिवस जातील' अशी स्वतःचीच समजूत काढत प्रपंचाचा गाडा त्या ओढत राहिल्या. मास्तरांना थोरल्या मुलाबरोबर सातवीची परीक्षा देण्याचा आग्रह कृष्णाबाईंनी केला. मास्तर सातवी पास झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी आवश्यक ते सर्वप्रकारचे बळ त्यांनीच मास्तरांना दिले. मास्तरांचे पहिले पुस्तक छापता यावे म्हणून आपला एकुलता एक दागिना 'मंगळसूत्र' पण त्यांनी विकले. ' मंगळसूत्र आणि कुंकू लावण्यापेक्षा, मनातल्या श्रद्धा आणि भावना महत्वाच्या नाहीत का ? ' हा एवढा विचारांचा मोठेपणा बघून आपल्याला कृष्णाबाईंसमोर अगदी लहान झाल्यासारखे वाटते. स्वतःची कुठलीही हौस नाही, कसलाही मोठेपणा नाही, फक्त मास्तरांनी मोठे व्हावे एवढा एकच ध्यास घेऊन त्या बाकी सगळे आयुष्य समोर आले तसे जगल्या. त्या ध्यासापोटी केलेली धडपड त्यांनी अत्यंत साध्या शब्दात आपल्या समोर मांडली आहे. साहित्यमुल्यांच्या तराजूत हे पुस्तक तोलणे म्हणूनच योग्य ठरणार नाही. काही ठिकाणी प्रसंगांची उलट-पालट आहे, काही वेळा घटनांची पुनरावृत्ती पण आहे. पण अगदी त्यांच्या नेहमीच्या वापरातल्या म्हणींसहीत जसेच्या तसे आलेले त्यांचे आयुष्याचे तत्त्वज्ञान, कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची एक वेगळीच शक्ती आपल्याला देऊन जाते.

मी तुमची सावली होऊन राहीन आणि मला तुमच्या सावलीत राहू द्या, असे जरी कृष्णाबाईं मास्तरांना म्हणत होत्या तरी त्यांच्या आयुष्यभर त्यांच्या मनावर कुणाची छाया होती तर ती त्यांच्या आजीची. आजीच्या सहवासात असताना त्यांनी रीतभात, आचारविचार यांची एक शिदोरी बांधून घेतली होती. पुढे मास्तरांशी लग्न झाल्यावर त्यात भर पडत गेली आणि कृष्णाबाईंचे आयुष्य समृद्ध झाले. आजीच्या माघारी बदललेल्या नातेवाईकांपुढे आपला निभाव लागणे कठीण आहे हे लक्षात येताच, घरातून निघून जाऊन, जात-पात नसलेल्या नारायणशी लग्न करण्याचे, आणि पुढे आयुष्यभर 'माणूस' या एकाच जातीवर विश्वास ठेवून नाती निर्माण करण्याचे आणि निभावण्याचे बळ त्याच शिदोरीने त्यांना आयुष्यभर दिले. ही आपली आजी एक ना एक दिवस परत येईल असा विश्वास ठेवून त्या स्वतः आजी झाल्यातरी तिची वाट बघतच राहिल्या. भरल्या घरातही वाटणार्‍या एकटेपणामुळे त्यांचे मन सारखे आजीला शोधत असावे. वरवर कितीही कणखरपणाचा आव आणला किंवा परिस्थितीने तो आणावा लागला तरी माणसाचे मन नेहमीच मायेचा आधार शोधत असते. आणि मग अशावेळी आयुष्यात ज्यांच्याकडून प्रेम, आपुलकी मिळाली त्या व्यक्तीच्या सहवासाची अपेक्षा करते.

मास्तरांना मिळालेल्या यशाने सुखावून जाऊन त्यांचे जसे त्या कौतुक करतात तसेच, बाहेरच्या जबाबदार्‍यांमुळे मास्तरांचे आपल्याकडे दुर्लक्ष झाल्याची खंत ही त्या सांगतात. नातवंडांची जबाबदारी आपल्यावर टाकून मुले त्यांच्या विश्वात दंग, मास्तर बाहेरच्या जगात व्यस्त, या सगळ्या एकटेपणात विचार करून करून त्यांना मानसिक त्रासही खूप झाला. प्रत्येक चुकीच्या घडलेल्या गोष्टीची जबाबदारी स्वतःकडे घेण्याची सवय त्यांना घातक ठरली. प्रपंच सावरला, पण आपण मुलांना वाढवायला चुकलो, त्यांचे आपापसात प्रेमाचे संबंध निर्माण झाले नाहीत, याला आपणच जबाबदार असल्याची बोच त्यांना सतत राहिली. घराबाहेर अत्यंत खंबीरपणे प्रत्येक गोष्टीचा सामना करणार्‍या कृष्णाबाईं, नवरा-मुलांच्या बाबतीत मात्र मनाने खूपच हळव्या असल्याचे जाणवते आणि कृष्णाबाईंचे सतत नकारार्थी विचार करून अस्वस्थ राहणे आपल्यालाही अस्वस्थ करून टाकते.

'ढळला रे दिन ढळला सखया, संध्या-छाया भिवविती हृदया', अशा मनाच्या अवस्थेतच त्यांनी मुंबई सोडून नेरळला जाण्याचा निर्णय घेतला तो मास्तरांचा सहवास मिळावा आणि मास्तर अधिक लिहिते व्हावे या हेतूने. त्याचा अजून एक परिणाम म्हणजे या पुस्तकाचा जन्म.

शीर्षकाला शोभेल असेच मुखपृष्ठ या पुस्तकाला लाभले आहे, मास्तरांच्या फोटोत सामावलेला कृष्णाबाईंचा फोटो. 'दुसर्‍या आवृत्तीच्या निमित्ताने', 'मनोगत', आणि 'योगायोग' असे तीन दरवाजे पार केल्यावरच आपण मुख्य दरवाजासमोर येतो, आणि आपल्या समोर उघडतो एका अनुभवसम्रुद्ध आयुष्याचा महाल ज्यात हरवून जाणे न जाणे मग आपल्या हातात राहतंच नाही.

+++++++++++++++++++++++++++++++

मास्तरांची सावली - कृष्णाबाईं नारायण सुर्वे.

प्रथमावृत्ती - १५ ऑगस्ट २००९
व्दितीयावृत्ती - १६ जानेवारी २०१०

प्रकाशक - डिंपल पब्लिकेशन
मूल्य - १९० रुपये

पृष्ठ संख्या - १८३.

++++++++++++

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलं आहेस आरती. Happy

लेखक / कवी पत्नी ने लिहिलेले पुस्तक हे आपल्या नवर्‍याला मोठे करण्यासाठी पत्नीने केलेल्या त्यागाची कथा असा एक ढोबळ अंदाज असतो. आणि इथेच या पुस्तकाचे वेगळेपण दिसते. कृष्णाबाईंनी जसा मास्तरांच्या [नारायण सुर्वे यांचा उल्लेख पुस्तकात 'मास्तर' असा येतो] जडणघडणीत आपल्या योगदानाचा उल्लेख केला आहे तसाच त्यांनी स्वतःच्या आचार-विचारात, व्यक्तिमत्त्वात होत गेलेला बदल हा केवळ मास्तरांच्या सहवासाने च आहे हे पण मान्य केले आहे. >>>> हे महत्त्वाचं !!

फारच छान लिहिले आहे.
कै. श्री. सुर्वे मास्तरांच्या कविता थोड्याफार वाचल्यात, पण हे पुस्तक व सर्व कविता जरुर वाचायला पहिजेत असे प्रकर्षाने वाटू लागले आहे.
मनापासून धन्यवाद आरती - असा सुरेख पुस्तक परिचय करुन दिल्याबद्दल.

प्रत्येक चुकीच्या घडलेल्या गोष्टीची जबाबदारी स्वतःकडे घेण्याची सवय त्यांना घातक ठरली. प्रपंच सावरला, पण आपण मुलांना वाढवायला चुकलो, त्यांचे आपापसात प्रेमाचे संबंध निर्माण झाले नाहीत, याला आपणच जबाबदार असल्याची बोच त्यांना सतत राहिली >>> Sad

लेखाची सुरूवातच खूप आवडली. Happy

मास्तरांच्या [नारायण सुर्वे यांचा उल्लेख पुस्तकात 'मास्तर' असा येतो] जडणघडणीत आपल्या योगदानाचा उल्लेख केला आहे तसाच त्यांनी स्वतःच्या आचार-विचारात, व्यक्तिमत्त्वात होत गेलेला बदल हा केवळ मास्तरांच्या सहवासाने च आहे हे पण मान्य केले आहे. >> इतका प्रामाणिकपणा अभावानेच आढळतो आत्मचरित्रात!

आवडले रसग्रहण.

छान

आण्णा, सिंडरेला, पौर्णीमा, माधव, ललिता, रैना, शशांक आणि पराग
सगळ्यांचे मनापासुन आभार.

माझापण हा पहिलाच प्रयत्न आहे रसग्रहण लिहिण्याचा.

चिनूक्स [पुस्तक सुचवल्याबद्दल] आणि सिंडरेला [पुस्तक उपलब्ध करुन दिल्याबद्दल] चे पण आभार. Happy

छान लिहिले आहेस. तू बायो कर्वे यांचे आत्मचरित्र वाचले आहेस का ?
हिमालयाची सावली, हे नाटक त्यांच्यावरच बेतले होते. दोन्ही आवडतील.