रसग्रहण स्पर्धा: 'हिंदू' -भालचंद्र नेमाडे

Submitted by साजिरा on 24 August, 2011 - 07:12

कोण आहे?
मी मी आहे. खंडेराव.
ह्यावर स्तब्धता. मग मी विचारतो, तू कोण?
मी तू आहेस, खंडेराव.

..
इथून सुरू होणारी या 'मी' ऊर्फ 'खंडेराव'ची, खरं तर 'मी आणि खंडेराव'ची कथा सांगणारी 'हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ' नावाची कादंबरी आपल्या पुढ्यात पेश करते- तब्बल सहाशे पानांचे एक समृद्ध पाल्हाळ आणि तरीही शेवटी काही तरी राहून गेल्याची, काहीतरी अधुरेच असल्याची एक अस्वस्थ टोचणीही. आपल्या जातीजमातींच्या एकमेकांत अडकलेल्या अपुर्‍या-अधुर्‍या आयुष्यांच्या कहाण्या आणि त्यांचे एकमेकांवरचे, एकमेकांच्या जन्मांनाच संपूर्णत्व देणारे समृद्धसुंदर परावलंबित्वही. हिंदू म्हणून जन्माला आल्याचा, आयुष्यभर तोंडाची चवच बनून बसलेला कडवट विखार आणि या धर्मातल्या कधीही नीट न उमगलेल्या नितांतसुंदर गोष्टींचे मधाळ चवीचे निरूपणही. वारसा म्हणून पदरी पडलेल्या रीतीभातीपद्धतींतला निराशाजनक फोलपणा आणि पूर्वापार, बापजाद्यांपासून चालत आलेल्या अनंत आचाराविचारांतलं सौंदर्य आणि अर्थपूर्ण परिपूर्णपणही. आपल्या जातिव्यवस्थेतल्या सार्‍या जगाने धिक्कारलेल्या आणि आपल्या प्रगतीच्या रस्त्यातली कायमची धोंड बनून बसलेल्या करंट्या उतरंडीचा भयानक वास्तवपट आणि या उतरंडीमुळेच सहजसुलभ झालेल्या आपल्या जगण्याच्या प्रक्रियेचा मनमोहक चित्रपटही. स्वतंत्र-वेगळा विचार नाकारणारे, सतत दिवाभीतासारखे आणि मन मारून जगायला भाग पाडणार्‍या एकत्र कुटुंबपद्धतीचे जाणीवा विकसित-समृद्ध करण्यातले नाकर्तेपण आणि ग्रामीण समाजव्यवस्थेची वीण-एकजीवपण कायमस्वरूपी घट्ट ठेवणारे त्याच कुटुंबव्यवस्थेतल्या संस्कृतीचे असंख्य नयनमनोहर रंग दाखवणारे पीळही. नात्यानात्यांतले स्वतंत्रपणे ओळखू येऊ नयेत इतके बेमालूम मिसळलेले, लोण्या-तुपाचा संपन्न वास असलेले, जगण्यातल्या प्रत्येक वळणावर नव्या अर्थाने सामोरे येणारे, जगण्याला नवी ऊर्मी-उभारी देणारे पदर आणि त्याच नात्यांनी ठायीठायी व्यक्त केलेल्या अवाजवी अपेक्षांच्या ओझ्याचे पायांत बेड्या टाकणारे अनावश्यक रानटी लादलेपणही. नुसत्या श्रद्धांच्या बळावर उभ्या राहिलेल्या या हजारो वर्षांच्या एकूण व्यवस्थेच्या प्रचंड डोलार्‍यावरचे मार्मिक भाष्य आणि जातिजमातींसकट अख्ख्या संस्कृतीलाच पाषाणयुगाकडे नेऊ शकणार्‍या अंधश्रद्धांच्या जाळ्याजळमट्यांच्या भयप्रद वास्तवाचा आरसाही. थेट मोहेनजो-दडोचा संपन्नसमृद्ध वारसा सांगणारी सप्तसिंधु भूप्रदेशाची प्रतीकात्मक कडूगोड कहाणी आणि शतकानुशतके माणसाचे अवघे जीवन व्यापून शिल्लक राहिलेल्या रुढीपरंपरांच्या बर्‍यावाईटाची उभीआडवी वीण असलेल्या महावस्त्राच्या अवकाशाचे अंतरंगही.

***

तर, 'युनेस्को-मोहेनजो-दडो १९६३' या प्रकल्पांतर्गत 'दक्षिण भारतातल्या पश्चिम किनार्‍याजवळील उत्तर महाराष्ट्रातल्या पूर्व खानदेशात मोरगाव खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेला' आणि आता पुरातत्वज्ञ बनलेला 'श्री. खंडेराव विठ्ठल' पाकिस्तानात आपला शोधनिबंध सादर करतो- हीच खंडेरावच्या गोष्टीची सुरूवात.

आदि-वन्य-कृषी-नागरी-आधुनिक-उद्योग-इलेक्ट्रॉनिक- अशा बर्‍यावाईट क्रमाने झालेल्या, नैसर्गिक पद्धतीने किंवा नाईलाजाने किंवा बळ वापरून झालेल्या निरनिराळ्या संस्कृतींतल्या उत्क्रांतींवर धक्कादायक विधाने करत खंडेराव भाषण करतो, आणि हजारो वर्षांपूर्वीच्या मोहेनजो-दडो पासून गांधार-हडप्पाच्या ऐतिहासिक अवकाशावर हिंदूंचा, त्यांच्या जाणीवांचा अधिकार सांगतो, तेव्हा एकच गोंधळ उडतो.

त्यानंतर शेकडो फूट खोल खणून शोधून काढलेल्या त्या ऐसपैस रस्त्यांच्या मधून 'हिंदू संस्कृतीचा एक प्रतिनिधी' म्हणून चालत निर्मनुष्य चव्हाट्या-वाड्या-ढेलजांकडे बघत असताना 'नाहीसं झालेल्या माहेरा'सारखा या नगरीचा त्याला अभिमान वाटतो. 'पृथ्वीवर कोणत्या लोकांना एवढा समृद्ध वारसा नुस्ता बेंबीच्या बळावर मिळतो?' असं स्वतःलाच विचारून तो स्वतःला नशीबवान ठरवतो आणि त्याच वेळेला 'अनेकवचनी भूतकाळी' हा परवलीचा शब्दच ठरून गेलेल्या प्राचीन सिंधू संस्कृतीबद्दल वैषम्य बाळगत, सूतक 'साजरं' करत खंडेराव मनाने पोचतो तो थेट त्याच्या खानदेशातल्या मोरगावात. दोन्ही ठिकाणची लाखो साम्यस्थळं आणि त्याच त्या एकसारख्या ओळखीच्या जाणीवांचा अभूतपूर्व साक्षात्कार! सिंधू प्रदेशभर हाहाकार माजवलेल्या प्रलयाचा, चक्रीवादळाचा, उत्पाताचा जणू त्याला भास होतो, किंवा पुनःप्रत्यय. त्याला सिंधुचं पात्र या चंडवातात अचानक अनेक मैल पूर्वेकडे सरकलेलं जाणवतं. तिच्या महापुरातून गुजराथच्या किनार्‍यावर, आणि मग तापीच्या मुखातून उलटा प्रवास करत मोरनदीच्या पात्रातून मोरगावच्या वाळूवर येऊन पडल्यागत जाणवतं. आणि मग समोर गावच्या वेशीवरचा ढसळता बुरूज, त्यावरचा पिंपळ आणि आकाशात घिरट्या घालणारे कावळे बघून तो संभ्रमात पडतो- हा भान, शुद्ध आणि भ्रमाच्या अलीकडे-पलीकडे कुठेतरी असलेला हा गृहस्थ म्हणजे- मोरगावचा पंचविशीचा 'मी खंडेराव', की पाच हजार वर्षांपूर्वीच्या याच संस्कृतीतला-पितरांतला 'तो खंडेराव', की संस्कृतीची ही अनाकलनीय, अत्यावश्यक, अर्थपूर्ण स्थित्यंतरे हजारो वर्षांपासून बघत आलेला, त्या सगळ्याचा एक भाग होत आलेला नुसताच एक 'प्रतिनिधी खंडेराव'?

***

पाकिस्तानच्या आता त्या परक्या झालेल्या भूमीतही खंडेरावला त्याच्याच संस्कृतीची पाळंमुळं सापडतात- हे तर एक आहेच, पण त्याला या भूमीशी जोडणारा आणखी एक धागा आहे. जिने खंडेरावला तान्हा असताना अंगाखांद्यावर खेळवलं, ती- लहाणपणीच दीक्षा घेऊन संन्याशीण व्हायला भाग पडलेली अप्सरेसारखी दिसणारी त्याची त्रिवेणी ऊर्फ 'तिरोनी' आत्या फाळणीनंतर इकडेच अडकली आहे. तिथल्या कुठेशा महानुभावी मठांत सापडेल ही आशा. मुलतान, लाहोर, पेशावर, वजिराबाद, रावळपिंडी.. वणवण फिरूनही कुठेच सापडत नाही. तशातल्या सैरभैर अवस्थेतच तार येते- वडील मृत्युशय्येवर. मृदंगे विठ्ठलराव. वारकरीपण प्राणपणानं जपणारे. मोरगावात आब राखून असलेले. भल्या मोठ्या शेतीमळ्याखळ्याचा गाडा आणि भला मोठा कुटुंबकबिला चालवण्याचा भार सतत डोक्यावर घेऊन वावरणारे. शंभर लोकांचे पोट सांभाळणारे, शेकडो लोकांना आधार वाटणारे. भाऊबंदांच्या वाट्याचे, उत्पन्नाचे, खर्चाचे, सालदारांच्या-कामगारांच्या मजूरीचे, ट्रस्टचे हिशेब सतत करणारे. हे 'हरितक्रांतीमुळे पदरात पडलेलं पुढारपण' करत करत स्वतःला पार झिजवून टाकलेले. आणि आता शेवटचं अंथरूण धरलेले. आयुष्य संपवून टाकण्याइतकं काहीच महत्वाचं नसतं- हे या प्राचीन लाहोरपेक्षाही अतिप्राचीन तत्वज्ञान शिकवणार्‍या वडीलांशी खंडेराव कळत्या वयापासून सतत फटकून वागत राहिला. शेवटचं पाहिलं पाहिजे त्यांना लवकर आता. हिंदू परंपरेप्रमाणे मांडी दिली पाहिजे. हिंदू प्रथेप्रमाणे अग्नी दिला पाहिजे.

***

भावडू म्हणजे खंडेरावचा मोठा भाऊ. ह्याच्याइतकाच हुशार. सार्‍या गोष्टीत रस असलेला. गोठ्यातल्या मोत्या-मुत्या जोडीसारखी, खरं तर खंडेरावसारखी बाणेदारपणे शिंगे रोखून बंड केलं असतं, घराबाहेर पडला असता तर काहीतरी मोठा झाला असता. पण कितीही जणांनी कितीही जनावरागत राबलं, तरी कमीच पडावं अशा शेतीगाड्याच्या वाईट चिखलात वडिलांनी त्याला फसवला, रुतवला. या दुष्ट शेतीच्या रामरगाड्यात काळी ढेकळं, पाणी, औजारं, मनुष्यबळ, खतं, बियाणं- ही तर संपत्ती आहेच, पण 'उपणणी' सारख्या कामात 'वारा' देखील सोन्याच्या मोलाचा. तो सोन्यासारखा वारा आहे तेवढ्यात धान्याची उपणणी केली पाहिजे नाही तर सोन्यासारखा वेळ वाया. सूर्याचा उजेड पण किंमती. अंधार पडायच्या आत आवरा.. किती कामं पडलीत. रात्रही किंमतीच. लवकर खाऊन झोपा. नीट झोप झाली पाहिजे. कारण भल्या पहाटे पुन्हा तिफणी, गुरं, पेरण्या, औतं. रामप्रहर वाया गेला तरी तब्बल अर्ध्या दिवसाची लांबण.. कशी परवडणार शेतकर्‍याला? पहाटे पाचपर्यंत झोपून राहणं म्हणजे चंगळवाद समजणारे हे जिवंतपणी काबाडकष्टात मरणारे शेतकरी लोक म्हणजे खंडेरावला भुताच्या जातीचे वाटतात. स्वतःच्या बायकोकडेही नीट बघू न शकलेला भावडू राबत राबत आधीच गेलेला. खंडेराव अपरंपार द्वेष करत असलेल्या त्या करंट्या कृषीसंस्कृतीने त्याचा बळी घेतला- ही खंडेरावची पक्की धारणा.

आता खंडेरावच वंशाचा दिवा आणि घरदार-शेतीमळ्या-सालदारांसकटच्या, बलुत्या-गावगाड्यासकटच्या, जातिजमातींच्या कोळीष्टकांसकटच्या, ट्रस्ट-सोसायट्यांच्या कायम आतबट्ट्याचा व्यवहार ठरलेल्या फुकटपुढारपणासकटच्या, वारकरी संप्रदायातल्या भक्ती परंपरेचे प्रतीक बनलेल्या मृदंगासकटच्या- विठ्ठलरावांनी मागे सोडलेल्या त्या भल्यामोठ्या झेंगटाचा वारसदारही. चार बहिणी आहेतच. पण त्यांचा काय उपयोग? बोरीबाभळी कशाही वाढतात. आंबे सांभाळावे लागतात. भावडू गेला. आता राहिला खंडेरावच. आंबेराव. घराचा खांब. खांबेराव. हीच पद्धत आहे हिंदू धर्मात. खंडेरावच्या मराठा-कुणबी जातीत आणि मोरगावातही.

गोठ्यातल्या मोत्या-मुत्याची डौलदार कंसाकार शिंगे गणिताचे असंख्य कंस बनून खंडेरावच्या मनात. इतकी वर्षे टाळलेले समीकरण आता मांडायलाच लागणार आहे त्याला. बौद्धिक-शिक्षण-विद्यापीठ-पीएचडी-पुस्तकं-लेख-संशोधन-शोधनिबंध-उत्खनन-वाचनलेखन-सांस्कृतिकभानगडी-महानगरातलं वेगवान सुखासीन जीवन हे सारं यापुढे तसंच जगत राहायचं; की माजलेल्या खोंडांची शिंगे पकडून मोडून टाकावीत तसे हे सारे मोडून खुडून विसरून जाऊन नाहीसे करून विठ्ठलरावांचा एकुलता एक वंशज म्हणून आणि जन्मापासून चिकटलेल्या परंपरेचा, संस्कृतीचा प्रतिनिधी बनून शेतीवाडी-घरदार-गुर्‍हाळं-नातीगोती-सोयरिकी-शाळा-गावातली नेतेगिरी नि राजकारण-लोकसेवा-विठ्ठलविठ्ठल-ग्यानदेव तुकाराम- हे सारं सांभाळायचं?

लाहोर-अमृतसर-जालंधर-दिल्ली-भुसावळ-मोरगाव.
बापाला शेवटचे भेटायला निघालेल्या पोराच्या दोन दिवसातल्या या प्रवासात खंडेरावने जागवलेल्या स्मृतींचा अख्खा पट आणि त्याच्याभोवतीची 'त्या' खंडेरावला बुद्धिबळाच्या विरूद्ध बाजूला बसवून त्याच्याकडून वदवून घेतलेल्या तत्वज्ञानाची आणि त्याच्या 'विचारांच्या कृती'ची, त्याच्या मार्मिक भाष्यांची गुंफण- म्हणजेच 'हिंदू'तले उरलेले काहीशे पानांचे समृद्ध पाल्हाळ. समीकरणांशी-प्रश्नांशी झुंज. संस्कृती-समाजाशी झुंज. गावगाडा-बलुते-जातिजमातींच्या उतरंडीशी झुंज. नात्यांच्या तुटू पाहणार्‍या आणि अतूट धाग्यांशी झुंज. खंडेरावची स्वतःशी झुंज.

***

'साहित्यातले देशीपण' आणि 'साहित्यातली नैतिकता' हे नेमाडे गेल्या काही दशकांपासून अटीतटीने साहित्यिक आणि समीक्षाजगताला सांगत असलेले खास सिद्धांत, तत्वज्ञान- हे सर्वश्रुत आहे. हीच तत्वे त्यांनी त्यांच्या थेट पहिल्या पुस्तकापासून असोशीने पाळलेली आढळतात. 'हिंदू'मध्ये पुन्हा एकदा या तत्वांचा सुंदर साक्षात्कार आपल्याला पानापानातून घडतो.

साहित्यातून खास त्या त्या प्रदेशाची वैशिष्ठ्ये म्हणता येतील अशा 'देशी जाणीवा' (संगीत, उत्सव, समारंभ, शिल्पकला, परंपरा, पद्धती, भाषा, म्हणी आणि वाक्प्रचार, प्रतीके, कथनतंत्रे, सामाजिक आणि सांस्कृतिक घटक इ. मधून) व्यक्त होणे; त्या त्या साहित्यकृतीतली पात्रे, आशय, शैली, मूल्ये हे सारे त्या त्या भूमीशी, मातीशी जोडलेले असणे; त्या त्या समाज-संस्कृती-प्रदेशा-समूहाशी एकूणच त्या साहित्यकृतीची पाळेमुळे घट्ट रूजलेली असणे- हे देशीयतेचे तत्व. 'हिंदू'तले- भावडू असो की विठ्ठलराव, झेंडीगणिका असो की तिरोनीआत्या, हुनाकाका असो की निळूकाका, यारू असो की रघू नायक, उंटमारे देशमुख असोत की खंडेरावचे सातवे पूर्वज नागोराव, सोनावहिनी असो की सिंधुमावशी, खंडेरावच्या चार बहिणी असोत की चारही मेहुणे, चिंधुआत्या असो की खंडेरावची आई- ही सारी पात्रे आपल्याला अत्यंत जवळची ओळखीची वाटतील अशी खास वैशिष्ठ्ये, भाषा, लहेजा, वागण्याची पद्धत घेऊन आपल्यासमोर उभे ठाकतात. सतत नात्यांना भावनांनी पक्कं करत जाणारं स्थिर जग. नेमाडेंची इथली निवेदनशैलीही खास आपल्या ग्रामीण मातीतली- बहिणाबाईशी नाते सांगणारी- मारूतीच्या पारावर गावगन्ना पाल्हाळगप्पा ठोकताना मध्येच अचानक जगड्व्याळ तत्वज्ञान सांगून अवाक करून सोडणारी! या कहाणीतले छोटे मोठे प्रसंग आपल्याच आजूबाजूला कधीही केव्हाही घडू शकतात, घडून गेले आहेत असं वाटायला लावणारे. अस्सल ग्रामीण, खानदेशी, वैदर्भीय भाषेतले काही संवाद- शब्द (उदाहरणादाखल: झावर, आंडोर, भनका, गवरी, इतराने, रामपार, सैसान, पानकळा, बिल्लास, धंगडे, दिवटीबुधली, नितात, सावटं, वावधन, पावरी इ. शब्द; किंवा भांबरभुसक्या, भेंडसुमार्‍या, कावड्यामावड्या, सटार्‍या भपार्‍या, अडवंट्या अशा अस्सल ग्रामीण मातीतल्या, बाजाच्या शिव्या-संबोधने) हेही गावागावांतली बोली भाषा ही कितीही स्थानिक असली, तरी तिच्यातूनच 'वैश्विक' असे 'देशी' साहित्य जन्मते- हे बजावून सांगणारे.

आपल्या समाज-संस्कृती-प्रदेशा-समूहात जे अस्तित्वातच नाही अशा कल्पक गोष्टी, पात्रे, आशय असलेल्या साहित्यात अनैतिकता आहे, असं बजावून नेमाडेंनी एकेकाळी खांडेकर-फडके-खानोलकर सारख्या प्रस्थापित साहित्यिकांचेही वाभाडे काढले. देशी तत्वांचा अजिबात विचार न करता पाश्चात्त्य साहित्यातल्या पात्रा-प्रसंगांचे (जे देखील त्यांच्या त्यांच्या पाश्चात्त्य समाज-संस्कृती-भूमीशी प्रामाणिक आहेत!) सर्रास अनुकरण करून लिहिलेल्या यांच्या कादंबर्‍यांत अभिप्रेत असलेली नाजूक तरल कलावादी प्रेमप्रकरणे, मुक्त लैंगिक संबंधांच्या कल्पना ह्या फक्त महानगरांतच सापडू शकतात- तेही अपवादात्मक परिस्थितींत- त्यामुळे हे असले साहित्य आणि साहित्यिक आपल्या भूमीशी प्रामाणिक नाहीत- असे नेहमी ठासून सांगणार्‍या नेमाडेंच्या 'हिंदू'तला पुरातन 'हरिपुरा' गावातल्या लभान्यांच्या ('लमाणी' लोकांच्या?) बायकांचं त्यांनी केलेलं वर्णन अस्सल 'देशी' वाटतं, प्रामाणिक वाटतं. मनसोक्त खाणंपिणं आणि त्यानंतर उघड्यावर सामूहिक शृंगारक्रिडेसारख्या त्यांच्या पद्धती हजारो वर्षांपुर्वीपासूनच्या आपल्यातल्याच संस्कृतीशी, परंपरांशी थेट नाते जोडणारे वाटतात. अशा उघड्यावर बेभान होऊन केलेल्या सामूहिक शृंगारक्रिडांनंतर जवळपास बेहोश झालेल्या या सार्‍या लभान्यांवरचा ही नेमकी संधी साधून 'पेंढारी' लोकांनी केलेला हल्ला, त्यातून पळून आलेल्या दुपारच्या भट्टीसारख्या उन्हात स्वातीच्या नक्षत्रासारख्या अद्भूत रंगाच्या ह्या दोन सुकुमार लभान्या बघायला अख्खा गाव लोटणे, आता ह्या दोन जळत्या निखार्‍यांचे काय करायचे म्हणून भरलेली पंचायत, शेवटी गावातल्या घरंदाज सभ्य बायापोरींची इज्जत वाचावी, घरातच राहावी म्हणून गावाने त्यांना रीतसर 'गणिका' म्हणून स्वीकारणे- हे सारे बरेवाईट वाचताना आपल्याला 'आपले-आपल्यातले' वाटते. कुठेतरी बघितलेले, अनुभवलेले वाटते. लहानपणापासून ऐकत आलेल्या पुराणकथा-लोककथांशी थेट संबंध दाखवणारे आढळते. ब्राह्मण्या-बौद्धत्वावरचे खंडेरावचे चिंतन आपल्याला हजारो वर्षे मागे नेते आणि आजच्या वास्तवाचा चटकाही देते.

उंटमार्‍या देशमुखांच्या गढीचे वर्णन, त्याच्या घरी सून म्हणून गेलेल्या चिंधुआत्याने अतिशय थंडपणे आणि हिकमतीने केलेला नवर्‍याचा खून, झेंडीगणिकेचा इतिहास, हरिपुर्‍यातल्या लभान्यांची, मोरगावातल्या महारांची आणि स्वातंत्र्यसैनिक बनलेल्या खंडेरावच्या 'हुनाकाका'ची गोष्ट, फाळणीच्या वेळचे दोन्ही बाजूंचे उद्रेक आणि मानसिक आंदोलने आणि विठ्ठलरावांच्या मृत्युनंतर खंडेरावच्या आईने लेकींना हाताशी धरून त्याच्या अपरोक्ष चालू केलेले कारस्थान- यासारख्या आपल्याला सुन्न करून सोडणार्‍या 'हिंदू'तल्या काही गोष्टींचे अस्सलपण देखील आपल्याला नीट भिडते. अठराव्या शतकात खंडेरावचे सातवे पूर्वज नागोराव स्वार्थासाठी इंग्रजांना जाऊन मिळाले आणि खानदेशातली मराठेशाही संपुष्टात आणण्याची कर्तबगारी केली- ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्या-तालुक्या-गावागावांमधल्या हजारो खंडेरावांच्या पुर्वजांची कहाणी वाटून आपणही यातले एकतरी खंडेराव असूच- असा खिन्न विचार आपल्या डोक्यात येणे हे 'हिंदू'च्या देशीयतेचे आणि नेमाडेंमधल्या साहित्यिकाच्या 'नैतिकते'चे लक्षण. आणि हे फक्त उदाहरणादाखल.

***

'हिंदू'तला खंडेराव हा पांडुरंग आणि चांगदेवसारखाच अस्सल मातीच्या रंगाचा असला, तरी त्या दोघांपेक्षा याची जातकुळी वेगळी आहे. खंडेराव निसर्गतःच आशावादी आहे. तो 'जगण्या'कडे पाठ फिरवत नाही, तर नेहमी काहीतरी दैवी, निखळ आणि सुंदर शोधू पाहतो. 'कृती टाळण्याचा' नाकर्तेपणा, अनैतिकता करत नाही, तर तो 'विचारांची कृती' करतो. जरूर तिथे आसूड ओढतो. जरूर तिथे छद्मी, हेकट बनतो. लांबचलांब पाल्हाळातून काहीतरी ठोस असे स्वतःसाठी काढू पाहतो. हे पाल्हाळ त्याला स्वतःला एखाद्या निश्चित ठिकाणी, निर्णया-तत्वा-तत्वज्ञानाप्रत आणण्यासाठी आवश्यक वाटते. त्याच्या स्मृतींच्या पटातही सुसंगतता नसून नैसर्गिक विस्कळितता आहे. कारण त्याने मन हे मानवी आहे, यंत्र नाही. या विस्कळिततेमुळेच तो पट अत्यंत पारदर्शी, प्रामाणिक आणि भिडणारा झाला आहे. आठवणी मनात येतील त्या आणि येतील त्या क्रमाने तो न्याहाळू, मांडू इच्छितो, मानवी स्वभावाप्रमाणे गोंधळून जाऊ इच्छितो. कारण हे सारे रीतसर होऊन गेल्यानंतरच त्याला स्वतःचे असे काहीतरी सापडणार आहे.

दोर्‍यांच्या जंजाळातून टोकं शोधून काढावीत तसे वेळोवेळी खंडेराव स्वतःला 'अ‍ॅक्रॉस टेबल बसवून' जी कडूगोड बरीवाईट भाष्ये करत स्वतःला बजावतो- त्यातली काही वरकरणी कडू वाटत असली तरी मडक्याच्या घाटाच्या आत जन्माचं कारण सापडल्यागत अंतिम सत्य आणि आशावादही जाणवतो. काही वानगीदाखल-
'कुठच्याही नागरी संस्कृतीच्या घडणीतच त्यांनी आपोआप नष्ट व्हावं, असं पायाभूत तत्व जडलेलं असतं. महानगरे उद्ध्वस्त व्हायला शस्त्रे नि आक्रमणे लागत नाहीत. ऐतखाऊ नागरी समाज आधीच स्वतःच्या आतल्या हिंसेच्या भुसभुशीत पायावर उभा असतो..'
'राष्ट्रीय योजना, सामाजिक विमा अशा गोष्टी ज्या समाजांमधे अशक्य आहेत, त्याचा वाली कोण असणार..?'
'२६ जानेवारीचं संचलन बघताना एकसारखे युनिफॉर्ममधले मारायला ठेवतो- असे कोंबड्यांसारखे सैनिक. अमानुष..'
'नखं पंधरवड्याला कापावीच लागतात. कोट्यवधी वर्षांपासूनचा माणसाचा मूळ हिंस्त्रतेचा पुरावा काही शेपटीसारखा नाहीसा करता आला नाही..'
'..स्वार्थ सांभाळणार्‍याकडूनच कधीतरी परमार्थ घडू शकतो. स्वतःचं हित हेच सर्वश्रेष्ठ कर्तव्य असतं. आयुष्य ही उधळून लावायची गोष्ट नसते..'
'पुरुषासारखं अमानुष होणं स्त्रीला किती सोपं असतं! पण तेच तिला कठीण झालं आहे..'
'लिपी, घरे-रस्ते-नगरे-तटबंद्या यांच्या रचना, मुद्रा, चित्रं, मूर्ती-शिल्पं यांमागच्या जाणीवांना स्थळा-काळाच्या पलीकडचे अस्तित्व असते. त्या सार्वकालीन असतात. वैयक्तिक जाणीवा या खरं तर सामाजिक, ऐतिहासिक असतात..'

***

मडकं. त्याची खापरं. उत्खननात सापडलेली खापरं किती महत्वाची? थेट माणसाच्या अस्तित्वाशी-अंताशी जोडणारी. सांगाडा सापडणार तिथं मडकं आणि मडकं तिथे सांगाडा. आपल्या संस्कृतीचा-रीतीभातींचा, परंपरांचा पुरावा? नव्हे. आपल्या जन्माचा, अस्तित्वाचाच पुरावा. घाटदार मडकं. आत काहीही नाही. आशयशून्य घाट. जिवंत असताना संबंध युगाचा, स्थळाचा, काळाचा संदर्भ मिरवणारी डोके- मेल्यानंतर फक्त एक घाटदार आशयशून्य कवटी. मडकं. आयुष्य संपवून टाकण्याइतकं काहीच महत्वाचं नसतं, खंडेराव, तुझा वारसा केवळ तुझं घरदार जमीनजुमला शेतंशिवारं एवढाच नाही. १० हजार वर्षांपासूनचा कृषीसंस्कृतीचा हा सतत तुझ्यापर्यंत झिरपत आलेला वारसा आहे. धीर धर. ध्यान कर. दाट चिंतनात असं वारंवार शिरणं म्हणजे अज्ञाताचं कर्ज फेडण्याचाच प्रकार. अशा गुंगलेल्या अवस्थेतच खर्‍या जाणीवा समोर येतात. चंद्रावर जाणारी वाहनं निघाली असतील आजकाल. पण दोन्ही पाय झोकून कधीच कुदू नये. तुला वाचवेल तुझी स्वतःची पायवाट. ती तुला सोडून कधीच जाणार नाही. कारण तूच ती तयार करतोस..!

***
***

'हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ'
लेखक- भालचंद्र नेमाडे
पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
प्रथम आवृत्ती- २०१०
पृष्ठसंख्या- ६०३
किंमत- रु. ६५०

***
***

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मारुन मुटकून ते वाचण्याचा प्रयत्न करण्यात होतो >>>> टण्या एकदम दोन टोकावर रहाणारी लोकं नसतात रे. या ना त्या कारणाने अनेक प्रकारची पुस्तकं वाचनातच न आलेली लोकं पण असतात ज्यांना खरच असं काही आपल्याकडून वाचलं गेलं नाही ह्याची हळहळ असते. मग बरं-वाईट (किंवा हुश्शार/ढ) पुढची गोष्ट.

टण्या एकदम दोन टोकावर रहाणारी लोकं नसतात रे. या ना त्या कारणाने अनेक प्रकारची पुस्तकं वाचनातच न आलेली लोकं पण असतात ज्यांना खरच असं काही आपल्याकडून वाचलं गेलं नाही ह्याची हळहळ असते
>>>

ती हळहळ का असते? जर एखाद्याला विशिष्ट प्रकारचे साहित्य आवडते पण त्या प्रकारातील उपलब्ध अनेक पुस्तके वाचता आली नाहीत (पैसे नाहीत, वेळ नाही, उपलब्ध नाहीत वगैरे) तर हळहळ समजू शकते. पण मला अमूक तमूक प्रकारचे वाचन कळतच नाही पण कळत नाही ह्याची हळहळ वाटते कारण ते कळणे मी कुठल्याश्या सामाजिक/बौद्धिक स्तराच्या संदर्भात जोडले आहे.
उदा: मला शास्त्रीय संगीत कळत नाही, ते ऐकण्यात रस वाटत नाही. जर मी शास्त्रीय संगीत आवडत नाही ह्याची हळहळ करत बसलो किंवा 'ह्या, काय त्या शास्त्रीय संगीतात, उगीच अवघड काहीतरी करत बसतात आणि मूठभर लोक त्यास डोक्यावर घेतात' हे चूक ठरेल.

त्या प्रकारातील उपलब्ध अनेक पुस्तके वाचता आली नाहीत (पैसे नाहीत, वेळ नाही, उपलब्ध नाहीत वगैरे) तर हळहळ समजू शकते >>>> तरच हळहळ. मी म्हंटलं ना वाचलं की मगच बरं-वाईट (किंवा हुश्शार/ढ) काय असेल ते.

मुळात एकच एक किंवा ठराविक प्रकार वाचले गेले असतील आणि इतर प्रकारांविषयी कळल्यावर अरे हे राहिलय आपलं वाचायचं किंवा वाचलं पाहिजे असं वाटुनही पुस्तकं हाताशी नसणं/इ मुळे हळहळ वाटते त्याबद्दलच बोलतेय मी. उदा: एरवी मला न येणार्‍या भाषांमधील साहित्य वाचता येत नाही आणि मोठ्याच ठेव्याला आपण मुकतो असं पण वाटतं. विशेषतः अनुवादित पुस्तकं वाचताना. तसच हे पण.

बरं मी उद्या हॅरीपॉटर बद्दल लिहीले तर तुम्ही ते वाचणार नाही का? >>>> रैना.. ते तू काही लिहीणार त्यावर अवलंबून आहे.. Wink
म्हणजे पुस्तक वाचायचे की नाही हा निर्णय आपला कुठेतरी आधीच झालेला असतो. कोणी काही म्हणुन लिहुन फारसा फरक पडत नाही. >>>>> ह्या पुस्तकाच्या बाबतीत माझ्यासाठी तरी हे बरोबर आहे. त्यामुळे तू पोस्टी अजिबात उडवू नकोस. Happy

टण्या.. तुझी दुसरी पोस्ट अगदीच पटली.
यामुळे प्रत्येकाच्या वाचनाकडून (हेच इतर कलांबाबतही दिसेल उदा: चित्रपट, चित्रकला, संगीत) असलेल्या अपेक्षाच वेगळ्या असल्याने सर्वांस एखादी कलाकृती समजावी वा त्यादिशेने प्रत्येकाने धावावे अशी अपेक्षा चुकीची ठरते. >>>> बरोबर. मॅराथॉन न धावणे "इज नॉट माय कप ऑफ टी" हे ज्याचं त्यानं ठरवावं आणि "अरेरे.. हा/ही मॅराथॉन धावत नाही." असं बाकीच्यांनी न वाटून घेता ज्याचं त्याला ठरवू द्यावं.

सिंडी.. तू इतर भाषांमधल्या पुस्तकांचं म्हणते आहेस ते इथे लागू होणार नाही असं वाटतय. कारण ती माध्यमाची मर्यादा आहे. ती हळहळ आणि टण्या म्हणतोय ती हळहळ वेगळ्या आहेत. एखाद्या धावू न शकणार्‍या माणसाने मॅराथॉन धावता येत नाही म्हणून हळहळणे आणि प्रकृतीने अगदी व्यवस्थित, दुसरा काहितरी खेळ खेळणारा, उत्तम स्टॅमिना असणारा पण मॅराथॉनच्या वाट्याला न जाणार्‍याचे हळहळणे ह्या दोन मध्ये जो फरक आहे तोच तिथे आहे.
असो. साजिर्‍याच्या बाफवर अवांतर पोस्टी थांबवतो. Happy

रसग्रहण आवडले..पण त्याहीपुढे जाउन पराग यांचे अनेक आभार .कारण त्यांची पोष्ट आली नसती तर टण्या यांची अत्यंत मार्मिक पोष्ट वाचायला मिळाली नसती.
खुप पुर्वी इथे कधी तरी संध्या नामक कलाकार जी कलात्मक सिनेमात (छट !!सिनेमाचे असे काही प्रकार नसतातच मुळी अशी ओरड मला कुठुन तरी ऐकु येतीये) काम करायची ती आवडत नाही अशा आशयाचे पोष्त कुठे तरी आले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार करता त्यात काही अयोग्यही नव्हते (शिरीष कणेकर आणि माझ्या आईलापण नाही आवदत बुआ ती).काही लोकांनी ज्यांना असे सिनेमे कळतात किंवा त्यांचा रसास्वाद कसा घ्यायचा हे माहीत असते त्यांनी संध्या नृत्यकलाकर म्हणुन किती great आहे ते सुनावल्यानंतर अचानक युटर्न घेउन संध्याने अलान्या-फलान्या सिनेमात कसे चांगले काम केलय अशा पोष्ता यायला लागल्या.तेही त्या बुध्दीवान-हुशार गटाशी जोडल्या जाण्याच्या अट्टाहासातुनच येत असावे.

धन्यवाद मित्रांनो. Happy

रैना, लेखकाची नैतिकता त्याच्या मुख्य पात्रांवर आपोआपच लादली जात असावी. त्यामुळे पांडुरंग, चांगदेव, खंडेराव यांचा एकमेकांवर प्रभाव साहजिकच. भळभळत्या जखमा घेऊन फिरणार्‍या या नायकांच्या प्रश्नांना उत्तरे तुमच्या कादंबर्‍यांत का दिसत नाहीत?- असा प्रश्न जेव्हा नेमाडेंना विचारला, तेव्हा- 'माझ्या अनुभवविश्वाच्या पलीकडे जाऊन लिहिणे हे मला स्वतःला, त्या नायकांना आणि वाचकांना फसवणे वाटतेच (ही नेमाडेंची 'सो-कॉल्ड-नैतिकता'), पण मांडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी २५-५० कादंबर्‍या लिहित सुटणे ही त्याहीपेक्षा मोठी अमानुष फसवणुक. माझ्या नायकांचे प्रश्न कुठून आभाळातून आलेले नाहीत. ते अत्यंत सामान्य आहेत, रोजच्या जगण्यातुन पडलेले आहेत. थोडक्यात आजूबाजूच्याच भोवतालातून, वाचकांकडून लेखकाकडे आलेले आहेत. त्यामुळे ती उत्तरे शोधणे ही जितकी लेखकाची, त्याच्या नायकांची जबाबदारी आहे, तितकीच आपापल्या परीने शोधण्याची वाचकांचीही!' असं उत्तर ते देतात.

पण सतत काहीतरी दुखणी सोबत घेऊन फिरणार्‍या या तिन्ही नायकांत मला एक मूळ फरक नक्कीच जाणवतो- पांडुरंगाला ही नक्की काय वेदना आहे, ते नीट कळत नाही, किंवा आपल्यासमोर तो नीट मांडू शकत नाही. चांगदेवाला ती बरीचशी कळली आहे, नीट मांडूही शकतो आहे, पण उत्तरे शोधण्यात त्याला अजिबात रस नाही. त्या बाबतीत तो (बहुतेक मुद्दामच) निष्क्रिय, निरिच्छ झाल्यागत दिसतो आहे. खंडेराव मात्र या दुखण्याला काहीतरी ठाम आकार देताना दिसतो, त्याचा नक्की 'स्कोप' काय नि कुठेपर्यंत आहे, हे शोधताना दिसतो, इतकेच नव्हे तर या वेदनांना, दुखण्याला उत्तरही शोधताना दिसतो. हे शोधण्यासाठी तो २५ वर्षेच नव्हे तर २५००० वर्षेही मागे जाताना दिसतो.

दुसरे म्हणजे 'हिंदू' कुठच्या तरी 'अपरिहार्यते'वर संपताना दिसत नाही. पांडुरंग, चांगदेव संपतात, तिथे खंडेराव संपताना दिसत नाहीत. राहिला प्रश्न त्याच्या आयुष्यातल्या उरलेल्या चाळीसेक वर्षांचा प्रश्न, तर त्याची उत्तरे 'हिंदू चतुष्ट्या'मध्ये मिळतील, अशी आशा नक्कीच 'हिंदू' दाखवते. (हिंदू चतुष्ट्यातली ही पहिलीच कादंबरी. अजून तीन येणार आहेत- असं नेमाडे म्हणत आहेत. Proud )

एकरेषीय पद्धतीने वाचायला गेल्यास अवघड होऊन बसेल >> अनुमोदन.
--

अशोक, धन्यवाद. Happy 'खंडेराव विठ्ठल कुंडलीक' आणि 'लभान' हे बरोबर आहे. स्वतःचा उल्लेख त्या नायकानेच एका ठिकाणी 'खंडेराव विठ्ठल' असा केला आहे, त्यावरून तसे लिहिले होते.

सुर्यकिरण, 'हिंदू' वाचण्यासाठी, कळण्यासाठी नेमाडेंची आधीची पुस्तकं वाचायची गरज नाही, असं मला वाटतं.
--

पराग, सिंडरेला, बस्के, ललिता.. इत्यादी,
नेमाडेप्रेमी काहीही बोलू देत. पण खुद्द नेमाडेंची भाषा, शैली ही न समजण्यातली नाही. उलट त्यांनी अत्यंत डाऊन-टू-अर्थ आणि मातीतली भाषा वापरल्यामुळे त्यांच्या प्रत्येक पात्रा-वर्णना-आशयाशी आपण रिलेट करू शकतो असं माझं मत. आरती प्रभू, ग्रेस, मर्ढेकर मला संपूर्ण समजत नाहीत. इतर काही कलात्मक अलंकारयुक्त गद्य लिहिणार्‍यांचंही मला जास्त कळत नाही, इतकंच काय, पण नेमाडे शैली आणि नैतिकतेशी जवळचं नातं सांगणारे शाम मनोहर देखील मला कधी कधी कळत नाहीत.
यापलीकडे फारसं स्पष्टीकरण मी देऊ शकेन असं वाटत नाही. Happy वाचायला 'सुरूवात' करणे ही महत्वाची गोष्ट आहे, असं मात्र नक्की वाटतं. ते सारं नीरस आणि 'हे आपलं नाही' असं वाटलं तर सहाशे पानं पुढे उगाच कोण वाचत बसेल..? तर ते स्वातंत्र्य आपल्याला अर्थातच आहे.

टण्या, 'हिंदू' म्हणजे थोडक्याच लोकांसाठी असलेले 'मॅरेथॉन' वगैरे आहे, असं मला तरी वाटत नाही. उत्तर- वरचा परिच्छेद. पण एखादे पुस्तक आवडण्याची, न आवडण्याची कारणं वेगळी असू शकतात, आणि दुसर्‍यांची आहेत ती आपली नाहीत, म्हणून काँप्लेक्स येणे हे चुकीचे- याला अनुमोदन.
--

टण्या, 'हिंदू' म्हणजे थोडक्याच लोकांसाठी असलेले मॅरेथॉन वगैरे आहे, असं मला तरी वाटत नाही.
>>>
साजिरा, मला 'थोडक्याच' कधीच म्हणायचे नव्हते. मी रैनाच्या मुद्द्याला अनुमोदन दिले की एकदम 'हिंदू'ला हात घालून 'हे जामच अवघड' आहे हे म्हणणे चुकीचे इतकेच. तुम्ही विनोदी पुस्तकेच वाचताय वा रहस्यकथाच वाचताय, अगदी खूप वाचता. पण तिथून एकदम हिंदू घेउन हे नाय समजत असं म्हटलं तर दोष साहित्यप्रकाराचा वा लेखकाचा आहे हे पटत नाही.

हो टण्या. Happy 'हिंदू'ला हात घालून 'हे जामच अवघड' आहे हे म्हणणे चुकीच' हे परफेक्ट बोललास. तेच (नेमाडेंची भाषा, शैली ही न समजण्यातली नाही. उलट त्यांनी अत्यंत डाऊन-टू-अर्थ आणि मातीतली भाषा वापरल्यामुळे त्यांच्या प्रत्येक पात्रा-वर्णना-आशयाशी आपण रिलेट करू शकतो) मी पण वर लिहिले. ('पुस्तकांबद्दल माहिती मिळून पुस्तक वाचायला लोक उद्युक्त व्हावेत'- हा रसग्रहण स्पर्धेमागचा हेतूच बोंबलायचा नाहीतर. :फिदी:)
--

या रसग्रहणात मर्यादेमुळे बरेच कमी-जास्त महत्वाचे विषय चर्चा करायचे राहून गेले आहेत.
उदाहरणार्थ-
'हिंदू'मधली स्त्रीपात्रे. (विशेषतः याआधीच्या ५ कादंबर्‍यांत फारशी स्त्रीपात्रे नव्हती, या पार्श्वभूमीवर).
'हिंदू'मधला 'जातिव्यवस्थे'ला पाठिंबा आणि 'जातियते'ला विरोध.
'हिंदू'मधले 'बलुत्यां'वरचे भाष्य. 'दलित' दृष्टिकोन. 'गावगाड्या'ला या सर्वांची गरज.
'हिंदू'मधली 'शेतीसंस्कृती' आणि 'हरितक्रांती'वरची भाष्ये, दृष्टिकोन.
आणि इतर आणखी काही..

हे सारे खरंतर एकेक लेखाचा विषय आहेत. वर्तमानपत्रांत 'हिंदू'बद्दल चांगलंही अर्थातच छापून आलं आहे. बरचसं वाईट जे छापलं आहे, त्यापेक्षा वरच्या मुद्द्यांवर सांगोपांग चर्चा वर्तमानपत्रांनी घडवून आणली असती, तर बरं झालं असतं. पण आयुष्यभर वर्तमानपत्रांना आणि त्यांच्या धोरणांना, त्यांच्या जातीयतेला, राजकारणाला शिवीगाळ करणार्‍या नेमाड्यांबद्दल वर्तमानपत्रांनी काही बरं छापलं, तर तो 'बोनस'च समजावा. नेमाड्यांना अर्थातच या सार्‍याची फिकीर नाही.

मस्त पुस्तक आहे. मी तर खूप दिवसांनी वाचत आहे त्यामुळे पूर्वीचे पांडू, चांगदेव वगैरे वाचत काढलेले दिवस आठिवले. खंडेराव त्यादोघांहून जास्त मॅच्युअर वाटला. दिलवरचा धाबा, जास्त आर्य असलेल्या ड्रायवरचे कार्य हे व असे प्रसंग मी अनुभवले आहेत. त्यामुळे पटले. मी अजून पुस्तक संपिवले नाही पण जाम एन्ग्रॉसिन्ग आहे. भाषा आवडली. आपल्याला खो देणारे कोणी नाही हा खंडेरावाचा संघर्ष पटलाच जाम.
बापाने सोडलेले जोखड गळ्यात घालायचे कि नाही हा त्याचा मूलभूत प्रश्न आहे. काही काही अजाणता विनोद फार सुरेख आहेत. पिचडी कि खिचडी असले. परदेश देश आपला, आपला देश परदेश हे तर मला जामच आवडले. ( का ते लिहीत नाही Happy )

हिंदू कादंबरीतील स्त्री प्रतिमा ह्यावर स्वतंत्र लेख लिहीणार आहे. Because all the ladies in the book deserve it.

'नॉर्दन कोलफिल्ड्सची खाण संपली आहे' असे शासनाने जाहीर केल्यानंतर प्लॅन्टमधील स्टाफने एक वर्षभर कोळसा काढून दाखवला.

अभिनंदन साजिरा! Happy

नेमाडेही काही कमी नाहीत हो..
सारखे अस्तन्या सावरून अमके लेखकराव अन तमके थोर साहित्यिक वगैरे.. असोच. आणि किती तो गाजावाजा.

अरे मला उत्तरांचीही अपेक्षा नाही. जाणिवा आणि वास्तव यातील संघर्ष तुकोबांना चुकला नाही तर तो नेमाड्यांच्या सामान्य नायकांना कसला चुकतोय. पण करता काय हो त्याचे पुढे. कधी विचारावेसे वाटते की अहो पांडुरंगाने चडफडत संसार केला, कुटुंबाचा इस्कोट केला, बायकापोरांचे हाल केले, चांगदेवाने 'कागज के फूल' छाप ग्रँड आत्महत्या केली का हो?
एकाच कार्‍या पात्राच्या दृष्टीकोनाने जग मांडायचे तेही इतक्या ताकदीच्या कादंबरीकाराने ये बात कुछ हजम नही हुई. बरं कमी का लिहीले आजवर. पाच कादंबर्‍या लिहील्यानंतर पुन्हा त्याच प्रथमपुरूषी एकवचनी फॉर्मात सहावी कसली लिहीता. प्रत्येक कादंबरीत नुसता पट विस्तारत जातो. प्रश्नांची गुंतागुंत वाढत जाते. तो पिचलेला भावडु यांचा नायक का नाही? ते सर्वखटल्याचेकर्तेवडिल यांचा नायक का होऊ शकत नाही?
मग त्याच पिन अडकलेल्या 'लेखकरावांच्या' मांदियाळीत यांना का बसवू नये?
एकदाका कारेपात्र 'नायक' असे म्हणले की फुकटच्यावाझोंट्या प्रश्नांच्या संख्येत अर्धी तरी कादंबरी आपोआप गरगरते , किती liberty घेणार आँ लिहीताना? 'हिंदू' पर्यंत तुमची 'craft' वरची हुकुमत वाढली, मानवी जीवनाच्या शोषणाच्या अपरिहार्यतेची जाण वाढली, हा काही वाचकाचा दोष नाही. आणि मग दुसर्‍यांच्या नावाने बोंब मारता 'तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा तो धर्म' असे लोकांनी त्यांना म्हणले तर फारसे काही चुकले नाही.

शैलीचे प्रयोग थोर आहेतच. नाविन्यही ओसरत नाही. छोट्यामोठ्या तपशीलांना दाद देताना फार आनंद मिळतो. आणि अपुन फॅन आहेच.

असो , पूर्ण वाचून झाल्यावर पुन्हा लिहीन. पण याही मुद्यांवर चर्चा होऊ शकते
- हिंदूतील कालखंड (टण्याचा मुद्दा)
- काही टीपी निरीक्षणे. उदा 'दोन दिवस'. युलिसिसचा प्रभाव असावा का?
- शैलीतील प्रयोग
- इतर ५ कादंबर्‍यांमध्ये न आढळलेल्या अशा थीम्स

विनोद आणि स्त्रीपात्रांबद्दल अगदी अगदी.

मला टण्याचा मुद्दा पटलाय.

लेखकाची नैतिकता त्याच्या मुख्य पात्रांवर आपोआपच लादली जात असावी. त्यामुळे पांडुरंग, चांगदेव, खंडेराव यांचा एकमेकांवर प्रभाव साहजिकच.>>> म्हणजेच साजिर्‍या all writings are autobiographical हे खरे आहे. माझा तरी यावर विश्वास बसायला लागला आहे. कुठलाही लेखक घ्या. एखाददोन अप्रतिम आणि बाकी सगळे ठिक ते बकवास. हीच रेंज दिसते.
मग हे जेव्हा पुलं किंवा इतरांच्या नावाने शिमगा करतात तेव्हा इच्छा असूनही जसे तुम्ही तुमच्या पिंडाचा साचा बदलु शकत नाही तसेच प्रत्येक लेखकाचे होत असणार. आता तुमची प्रतिभाच वेगळी, पण तुम्हीही अडकुन पडलातच हे विसरु नका. मला संताप येतो तो याचा.
स्वतःला स्वतःच्याच निकषांवर तोलणारा साहित्यिक अजून जन्माला यायचाय बहुदा.

Because all the ladies in the book deserve it. >> अगदी अगदी मामी. मंडी, झेंडी, रेनी, तिरोनी, चिंधुआत्या, खंडेरावच्या बहिणी, सोनावहिनी, सिंधुमावशी या सार्‍यांना ज्या डिटेल्समध्ये तिथे रंगवले आहे, त्याला तोड नाही. नक्की लिहा यांबद्दल.

रैने, "पाच कादंबर्‍या लिहील्यानंतर पुन्हा त्याच प्रथमपुरूषी एकवचनी फॉर्मात सहावी कसली लिहीता." आणि ''शैलीचे प्रयोग थोर आहेतच. नाविन्यही ओसरत नाही." हे दोन्ही एकमेकांना छेद देत आहेत की. Proud असो. ते जाऊदे. पण रुढार्थाचे नायक यांचे कधीच नव्हते. 'भोवतालचे विस्तृत सामाजिक आवरण' हा एकच नायक सगळीकडे. आणि 'हिंदू'त तर केवढा विस्तृत पट आहे. प्रश्नांची गुंतागुंत असेल, किंवा वाढली असेल, तर ते महत्वाचे आहे. त्यांनी लिहिताना आजवर पाळलेल्या तत्वांना अनुसरूनच ते आहे. बाकी कुठे कुठे एकसुरीपण आहे, लांबचलांब कंटाळवाणे तेचतेपण आहे, याबद्दल अनुमोदन. पण ते शैलीतला प्रयोग आणि मी वरती म्हणल्याप्रमाणे "लांबचलांब पाल्हाळातून काहीतरी ठोस असे स्वतःसाठी काढू पाहतो. हे पाल्हाळ त्याला स्वतःला एखाद्या निश्चित ठिकाणी, निर्णया-तत्वा-तत्वज्ञानाप्रत आणण्यासाठी आवश्यक वाटते" या खात्यात टाकून दिले. पण फक्त 'रंजकता' एवढे एकच ध्येय ठेवून डझनावारी एकसूरी कादंबर्‍या लिहून पुरस्कार मिळवणार्‍यांबद्दल काय म्हणावे? पाच कादंबर्‍या म्हणजे काहीच नाही.
असो. तुझे संपूर्ण वाचून झाल्यावर लिही पुन्हा नक्की. मला वाचायची उत्सुकता आहे. Happy

पुन्हा त्याच प्रथमपुरूषी एकवचनी फॉर्मात सहावी कसली लिहीता.>> कारण ती वेगवेगळी माणसे आहेत. भारतीय आहेत हे एक कॉमन सोडल्यास त्यांचे सर्व जीवनसंदर्भ वेगळे आहेत. प्रत्येक पुरुषाच्यात एक स्टोरी असते. त्याला जर आपण तितका वेळ व पेशन्स दिला, न जज करता बोल बाबा तुझी कथा असे म्हटले तर तो जसे सांगेल तश्या मला ह्या वाटतात. सुरुवातीच्या अली ह्या त्याच्या कलीगची/ दिलावरची देखिल अशी वेगळी कथा होउ शकेल. आपल्या मनातले फ्री-फॉर्म विचार,फ्री- हँड चित्रासारखे उतरवत गेले तर ते असेच दिसतील( आपल्या संदर्भात) पण दुसर्‍यास ते कंटाळवाणे वाटू शकतात. किंवा पाल्हाळिक. मडके वाला धनाजी, तो एक मुलगा थोड्या अन्नावर दुसर्‍याकडे काही महिने ठेवलेला असतो तो. ह्यांच्याही कथा आहेत. महारांच्याही कथा आहेत. प्रत्येक कॅरेक्टरचे चित्रण असे समजून वाचले तर ते भावू शकेल.

पुरुषांच्या मनातली संवेदनशीलता ( जी व्यवहारी जगात साधारण लपविली जाते ) ती इथे खंडेरावाच्या
निरीक्षणातून व्यक्त होते.

ते भावतेच आहे मामी. न भावायचा प्रश्नच येत नाही. Happy भावते म्हणूनच जीव तुटतो.

त्यांचे जीवनसंदर्भ वेगळे वाटत नाहीत (हे फक्त मलाच वाटतेय बहुतेक), त्यांच्या प्रश्नांची आणि पिंडाची जातकुळी एकच आहे आणि ऑलरेडी कार्‍या नायकांनाच काय त्यानंतरच्या सात पिढ्यांनातरी पुरेल एवढे अजरामर करुन ठेवले आहे नेमाड्यांनीच. त्यांच्या कुटुंबाचा mileu वेगळा नाही. फक्त तो कमी-अधिक विस्तृतपणे मांडलाय. त्यांचे occupations वेगळे आहेत पण तो फक्त तपशील झाला. आशयात पूर्ण वेगळेपण जाणवत नाही.

ह्यांच्याही कथा आहेत. महारांच्याही कथा आहेत.>> करेक्ट कथा आहेत. शब्दचित्र आहेत. आणि याच साहित्यप्रकारांना त्यांनी हाणहाण हाणले आहे.

पण फक्त 'रंजकता' एवढे एकच ध्येय ठेवून डझनावारी एकसूरी कादंबर्‍या लिहून पुरस्कार मिळवणार्‍यांबद्दल काय म्हणावे? >> त्यांच्याबद्दल म्हणण्यासारखे काय असते? इथे एवढा जीव लावून कळकळीने आपण का बोलतोय. Happy

जबरदस्त ताकदीने लिहिलेस! नेमाड्यांच्या देशी घरंदाज शैलीचे रसग्रहण तोलून मापून, समर्पक पण 'आपल्या' शब्दात करणे खरच अवघड आहे. हे शिवधनुष्य पेलल्याबद्दल तुझे अभिनंदन! पहिल्याच परिच्छेदात संपूर्ण पुस्तकाचा 'बर्डसआयव्ह्यू'ने सपासप घेतलेला आढावा आणि मग प्रसंगाच्या तपशीलात जात जात नेमाड्यांच्या एकूणच लेखनतत्वावर भाष्य करून पांडुरंग, चांगदेव आणि पुन्हा खंदेरावावर 'लँड' होणं हे एका सुसंगत विचारपरिक्रमेचा अनुभव देतं! सुरेख!

सायबा, रसग्रहण, चर्चा वाचली. पुस्तकाला हात लावेन असं अजून तरी म्हणत नाही. पण एकदा तरी नक्की प्रयत्न करेन. टण्याला अनुमोदन. Happy

रैना / कुणीही कृपया पोस्टी डिलीटू नका.

पुस्तक आणि परीक्षण सारख्याच सकसतेने यावे हे फक्त पेंडसे गुरुजी आणि साजिरा यांचे बाबतीत घडू शकते , घडले आहे. यापेक्षा उत्तम परिक्षण कदाचित पेन्डसे गुरुजी च लिहू शकतील. (श्रीशिमटीमाहात्म्य !). असो. नेमाडेंनी खरे तर वेगळ्या अर्थाने 'वाट पहाणार्‍या' पब्लोकचा पोपट केला होता. 'हिन्दू मध्ये हिन्दू धर्माची चांगलीच 'चिरफाड' केलेली असणार आणि नेमाडे हे दुसरे सलमान रश्दी होणार त्यात आपणही आपला टीआरपी वाढवून घेऊ असे मांडे खात बरेच लेखकू,समिक्षकू वाट पहात होत्या. त्यात राजकीय संघटनाही होत्या. तेवढाच 'अजेंडा' मिळाल्याशी कारण. मग 'बंदी' 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' वगैरे नेहमीची क्रियाकर्मे आलीच. माफी मागा /मुळीच मागू नका वगैरे.

त्या अर्थाने नेमाडेंनी 'निराशाच' केली. त्यामुळे हे सगळे संधीसाधू 'भडभुंजे' (साहित्यप्रांतातले देखील, काही जुने हिशेब चुकते करण्यासाठी आलेले) पळत सुटले. त्यामुळे साहित्याच्या अंगानेही ही कादम्बरी तेवढीशी 'प्रोजेक्ट' झालीच नाही असे मला वाटते. त्यात साहित्य क्षेत्रातल्या 'टोळीयुद्धाचा ' मोठा वाटा असावा... आता तर ती 'मराठीतली आणखी एक कादम्बरी ' एवढ्यापुरतीच मर्यादित राहिली आहे असे दुर्दैवाने वाटते.त्यामुळे केवळ तपशीलातल्या खोड्या काढीत राहण्यापुरतीच तिची दखल आणि चर्चा होत राहिली.

पण त्यामुळे तिचे मोल अजिबात कमी होत नाही. मला ती मिळाल्यावर मी तर ती नॉन स्टॉप वाचून काढली. सुरुवातीस मोहेन्जोदारोतून बाहेर येईपर्यन्त वेग पकडायला जरा कठीन गेले. कादम्बरीतील विश्वाशी बर्‍यापैकी इन्व्हॉल्व्हमेन्ट असल्याने बांधला गेलो. पसरट पणा आहेच तो बहुधा तपशिलातिरेकाने येत असावा. सम्पूर्ण कादम्बरीच्या पार्श्वभूमीवर एक करुण पार्श्वसंगीत वाजते आहे असे वाटत राहते ....

साजिर्‍या, अप्रतिम लिहीले आहेस रे. कादंबरी वाचण्याआधी अनेक जणांकडून अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. त्यामुळे वाचताना सुरुवातीला थोडासा अनिच्छेचाच भाग होता मनात. पण वाचत गेलो आणि कधी त्या मोहजालात अडकलो हे कळालेच नाही.

'जगण्याची समृद्ध अडगळ' या शब्दाचा पुरेपूर अर्थ कळत गेला. बाकी तुझ्या लिखाणाबद्दल तर वादच नाही. मी नेहमीच तुझ्या लेखनाचा फॅन राहीलेलो आहे. धन्यवाद ! Happy

पुन्हा वर आणत आहे.

साजिर्‍या - यातली पहिले २-३ परिच्छेदच वाचले आहेत पण 'हिंदू' बद्दल जबरदस्त कुतूहल निर्माण झाले ते वाचून. या लेखातील माहिती व भाषा दोन्ही सुंदर आहे. तुझे इतर लेख वाचून यातील वाक्यावाक्यांमधले शब्द तोलून मापून वापरले असणार याची खात्री आहे, त्यामुळेच समजून वाचावे लागते (हे लाईट रीडिंग नव्हे असे लगेच लक्षात आले), त्यामुळेच अजून पूर्ण वाचलेले नाही.

पण हा लेख जर एवढा सुंदर असेल तर तो ज्या पुस्तकाबद्दल लिहीलेला आहे ते वाचायलाच हवे असे आता वाटू लागले आहे.

वाह!
हे वाचायचे राहून गेले होते.
सुरेखच लिहिलंय.

(अवांतर- हा खंडेराव शेवटी मला विरासतमधल्या अनिल कपूरसारखा वाटला.)

आणि एक तुमच्या लेखात त्या परदेशातून भारतात अभ्यासासाठी आलेल्या विदुषीचा उल्लेख नाही दिसला.
खरेतर बर्याचश्या लोककथा आणि कल्पना तिच्या अभ्यासातूनही उलगडतात.
शेवटी कुठेतरी ही स्त्री खंडेरावला (हिंदुचा भाग दोन आलाच तर) परत शेतीभातीच्या कामातून काढून इतिहाससंशोधनाला लावेल असेही वाटतेय.

नक्की बातमी कुठे द्यायची हे माहित नसल्याने इथे लिहीत आहे.
नेमाडेंची ६ तारखेला ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड झाली.

http://www.thehindu.com/books/books-authors/marathi-novelist-bhalchandra...

सगळ्या मराठी लोकांसाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे!
अभिनंदन.

Pages