रसग्रहण स्पर्धा - हौस - डॉ. समीर चव्हाण

Submitted by बेफ़िकीर on 23 August, 2011 - 03:07

पुस्तकाचे नांव - हौस

लेखक (कवी) - डॉ. समीर चव्हाण

प्रकाशन संस्था - सुचेतानंत प्रकाशन

प्रथम आवृत्ती - डिसेंबर २००८
========================

मधुर फळाचे रसग्रहण शक्य आहे कारण फळ खाताना त्याचा रस मुखाला व्यापतो व स्वादाने तृप्त करतो. मुळीच रस नसलेल्या फळाचे किंवा कोणत्याही निर्मीतीचे रसग्रहण शक्य नाही. मात्र आपल्याला एखाद्या फळाचा, एखाद्या कलाकृतीचा फक्त रसच मिळाला तर?

हौस असे मिश्कील, प्रामाणिक आणि अंतरंग काय असेल याची उत्सुकता चाळवणारे डॉ. समीर चव्हाण यांचे गझला व कविता एकत्रित केलेले पुस्तक हा निव्वळ रस आहे. ते पुस्तक वाचणे हेच जणू रसग्रहण! अर्थात, कलाकृतीच्या अगणित प्रकारांपैकी आणि माध्यमांपैकी एक म्हणजे कविता व त्यातही गझल हा प्रकार विशिष्टपणे आस्वाद घेण्याजोगा होण्यासाठी हा अल्पसा प्रयत्न!

वास्तव आयुष्यातील बर्‍या वाइट आघातांनी वितळलेल्या मनाची शाई शब्दांच्या रंगांनी रंगवून कल्पनांच्या आणि आशयाच्या पेनातून रसिकमनाच्या कागदावर उमटवली की साहित्यकृती निर्माण होते. तिला रंगरुपाचे बंधन नसल्यामुळे गद्य, समीक्षा, ललित, काव्य, मुक्तछंद यातील कोणत्याही स्वरुपात ती अवतरते. बर्‍याचदा मोठ्या गद्य लेखनाचे रसग्रहण हे सहाय्यकारक ठरते कारण पुस्तकातून काय घ्यायचे हे जाणकारांनाही ठरवता येते. मात्र कविता स्वतःच बोलकी असल्याने ती जरूर भासत नाही. तरीही डॉ. समीर यांच्या कवितेला रसग्रहणाची महिरप लावून मी आपल्यासमोर आणत आहे याचे कारण रसनिर्मीतीची प्रक्रिया त्यांची कविता एकदाच वाचून संपत नाही तर ती मनातच अनेकदा लेमन ड्रॉपसारखी अधिकाधिक गोडवा तयार करत राहतानाच मनाला चरचरतही राहते.

काहीतरी तुटल्याप्रमाणे वाटते
हातातुनी सुटल्याप्रमाणे वाटते

बोलायचे होते तुझ्याशी, राहिले
ही हौसही फिटल्याप्रमाणे वाटते

गझलेच्या नियमीत आकृतिबंधामुळे एखाद्या 'कॅरीज हरसेल्फ व्हेरी वेल' स्त्रीप्रमाणे गझलेच्या द्विपदी जरी सकृतदर्शनीच रसिकाला आकर्षित करत असल्या तरी दशकानुदशके अन्याय, भ्रष्टाचार, चांदणे आणि मोगरा यांच्या अनावश्यक सीमांमध्ये घुटमळणार्‍या गझलेला प्रामाणिकपणाची जोड लावल्यावर कोणतीही सीमा राहात नाही हे सिद्ध करणार्‍या अनेक ओळी यत आहेत.

चिंच गाभुळणे ही चिंच पिकण्याआधीची प्रक्रिया आहे असे म्हणतात आणि तीच चिंचेची अवस्था भूल पाडते.

समीर चव्हाणांची गझल महानतेचा मुखवटा घेत नाही. ती समाजाला न सोडवता आलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा यमकानुसारी प्रयत्न करण्याचा कृत्रिम आविर्भाव आणत नाही. ती द्विपदीमध्ये पूर्ण होत नाही. ती गाभुळते. पुस्तक वाचताना आरसा पाहिल्यासारखे होते. शिरा खाण्याआधीचा रवा भाजल्याचा वास जास्त तृप्त करतो तशी अर्धवट संवेदना जागृत करून प्रत्येक द्विपदी बाकीचा भावनिक कारभार आपल्या मनावर सोपवते. तिला जात पात, धर्म, भ्रष्टाचार, चांदणे, उश्या, मोगरे, गंधाळणे, रेशमाच्या मिठ्या आणि ऋतू, दव वगैरे गझलेच्या ठेवणीतल्या शालूंशी घेणेदेणे नाही. कणीक मळणारी स्त्री ज्या घरगुती साडीत वावरते तशी समीर चव्हाणांची गझल साधी वागते. रसिकाला 'व्वाह' म्हणायला लावण्यात तिला स्वारस्य नसतेच, वाचकाने किंवा रसिकाने एक आवंढा गिळला, क्षणभर पापण्या मिटल्या किंवा अर्ध्या क्षणापुरते अंतर्मुख झाल्यासारखे झाले किंवा मन काहीसे गलबलले की समीर चव्हाणांची द्विपदी वाचली असण्याची शक्यता आहे हे पटावे.

वर्षानुवर्षे चाललो नव्हतो दिशाहिन
शून्यातली आवर्तने नुसतीच नव्हती

वेडा आशावाद किंवा स्वतःचीच समजूत घातल्यासारखी ही द्विपदी कोणाला लागू होणार नाही?

मी समाधानी अश्यासाठीच आहे की
राखता आली मला आश्वासने माझी

अतिशय 'डाऊन टू अर्थ' अशी भावना!

कुठल्या प्रभावातून मी घडलो कळेना नेमक्या
मंजूर नाही राहणे त्याच्यात पहिल्यासारखे

जडणघडणीच्या काळातले संस्कार वास्तव आयुष्यात एक सामान्य जीव म्हणून झुंज देताना गैरलागू ठरतात की काय असे विचारणारी ही द्विपदी!

अशाच सर्व द्विपदी व जमीनीवरच्या आणि भावनांशीच व अतीसूक्ष्म संवेदनांशीच घेणेदेणे असलेल्या सूचक गझल व कवितांनी नटलेला हा काव्यसंग्रह संग्राह्य तर आहेच, पण वारंवार वाचून, चघळून, विरघळवून पुन्हा अनुभवण्यासारखा आहे.

अधिक आयुष्य सुंदर होत आहे
तुझे माझे नवे घर होत आहे

करू दे काम बघण्याचे मनाला
तुझा शृंगार जोवर होत आहे

शृंगार होताना बघण्याच्या इच्छेला नकळत 'मनाचे काम' असे संबोधून 'त्यातही नंतर तोचतोचपणा येतो' ही संवेदना भिडते.

==========================

सद्य परिस्थिती व पार्श्वभूमी -

भटसाहेबांच्या बाराखडीला गीता मानून वृत्तानुसारी, यमकानुसारी व इंजिनियरिंग इन्डस्ट्रीप्रमाणे गझल प्रॉडक्शन होत आहे. वेदना, आभाळ भरून आल्यानंतर असते तशी मनाची गच्च परिस्थिती, मनाला गलबलवण्याची, डचमळवण्याची क्षमता सलेल्या गझला या सर्वांचा अभाव असलेले काव्य गझल क्षेत्रात दिसत आहे. रुपके व प्रतिमा यांचा आवाकाही तोच राहात आहे. मराठी मातीचा सुगंध म्हणून रचल्या जाताना गझला आक्रोश केल्यासारख्या किंवा किंचाळल्यासारख्या अंगावर येत आहेत. आकृतीबंध अभिव्यक्तीवर व आशयावर 'हावी' होताना दिसत आहे. भर उकाड्यात एखादी सुगंधी थंड झुळूक यावी तशी एखादी गझल सुखद वाटणे अशी सद्य परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत काहीतरी सच्चे, आम माणसाला आपले वाटू शकेल असे, अत्यंत परिपक्व, प्रसंगी तंद्रीत असल्याप्रमाणे वागणारे आणि नम्रता व प्रामाणिकपणा या दोनच पावलांवर चालणारे काव्य 'मिस' होत आहे.

अपेक्षा -

साधे शब्द असलेले, दैनंदिन आयुष्यातील अनुभुतींमधील सूक्ष्म बारकावे सांगणारे, अधिक महत्वाच्या अनुभुतींबाबत एक रोखठोक पण असामान्य न भासवणारा दृष्टिकोन असलेले, थोडक्यात प्रत्येकाचे ठरू शकेल असे गझलकाव्य हवे आहे. आक्रमकतेच्या आणि आकर्षकतेच्या कॉकटेलने 'पाण्याची तहान' भागत नाही हे रसिकांना केव्हाचेच माहीत आहे पण पर्याय उपलब्ध नसल्याने झोपतानाही सफारी घालावा लागत आहे.

रसग्रहण -

डॉ. समीर चव्हाण यांचा हौस हा 'गझल - कविता संग्रह' प्रसादासाठी केलेल्या साजूक तुपातील शिर्‍यात चुकून आलेल्या बेदाण्यासारखा वाटतो. अप्राप्याची हौस नसलेली त्यांची प्रत्येक ओळ कवितेच्या माध्यमातून स्वत्वाचा शोध घेण्यास आणि आपले चुकून उडालेले पाय जमीनीत आणण्यास रसिकाला मदत करते खरी, पण तेही 'मी तुला हे शिकवतो' अशा आविर्भावात नव्हे तर 'बघ बुवा, माझे तरी हे असे झाले' असे सांगत! हा गझलसंग्रह मैफिलीत टाळ्या मिळवण्याच्या बेगडी रंगाचा नाही तर सच्च्या अनुभुतींच्या कायमस्वरुपी रंगाचा आहे. तंत्र शरणता टाळण्याचा मोह विश्वामित्राच्या मोहापेक्षा काहीसा कमी मानला जावा. डॉ. समीर चव्हाणांनी शंभर टक्के संवेदना शरणता दिलेली आहे. पटकन चाळावा, तासनतास पुन्हा पुन्हा वाचावा, वेळ असेल तेव्हा वाचावा, भिनवावा, स्वतःशीच खुष व्हावे, गलबलावे असा हा संग्रह आहे. मदिरेची संगत, मित्रांच्या टोळक्याची वाहवा आणि मुशायर्‍याची भव्यता या पुस्तकाला नको आहे. त्याला हवे आहे आपल्यातले 'आपलेपण'! अतिशय कौटुंबिक स्वरुपाची अभिव्यक्ती, परिपक्वतेचे ठायीठायी आढळणारे उदाहरण आणि चीझ चेरी पायनॅपलमधील फक्त आशयाची चेरीच मिळत राहणे अशा गुणांनी नटलेला हा गझलसंग्रह जरूर मिळवावात.

धन्यवाद

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता-गझलांपासून मी तशी चार हात लांबच असते, पण हा लेख आवडला. Happy (कारण तेच नेहमीचं - मला मुळात पुस्तकपरिचयपर / रसग्रहणात्मक लेख वाचायला खूप आवडतात.)

बाकी, साजूक तुपातला शिरा तुमच्या खास आवडीचा दिसतोय Wink

लेख आवडला. विचारही पटले.
या रसग्रहणामुळे एका "सात्विक" गझलकाराची ओळख झाली.
माझ्या वाचनाच्या नावडीमुळे कदाचित मला डॉ. समीर चव्हाणांची ओळख कधीच झाली नसती.

परत एकदा धन्यवाद. Happy

भूषणः

हा लेख ब-याच दिवसांनी पुन्हा वाचला.
मी मागे म्हटल्याप्रमाणे माझे बरेच शेर आपल्याला माझ्यापेक्षा अधिक समजलेत असं प्रकर्षाने जाणवलं.
आभार मानण्यापलीकडचेच आहे सगळं.