भ्रष्टाचार्‍यास हाण पाठी : पोवाडा

Submitted by अभय आर्वीकर on 23 August, 2011 - 02:37

भ्रष्टाचार्‍यास हाण पाठी : पोवाडा

कशी झाली देशाची गती, कुंठली मती
लाचखोरीचे पीक आले
भ्रष्ट पुढारी नेते झाले
नोकरशाहीची मस्ती चाले
भ्रष्टाचार्‍यांचे राज आले, रं जी जी .... ॥१॥

एक होता पाटील धांदे, खाण्याचे वांदे
बॅंकेला गहाण सातबारा
अवदसा होती घरादारा
मग तो सत्तेमध्ये गेला
पाहता मालामाल झाला
कसा हा चमत्कार झाला? रं जी जी .... ॥२॥

एक होता गोविंदा रेड्डी, पॅंट आणि चड्डी
मांडीवर उभी फाटलेली
चप्पल पायात तुटलेली
मग तो नोकरीत गेला
घरी पैशाचा पूर आला
सांगा कुठून पैसा आला? रं जी जी .... ॥३॥

गरीबाच्या घरी जन्मला, पदवीधर झाला
वणवण फिरे गल्लोगल्ली
डोनेशन मागे सारे हल्ली
संस्थेमध्ये हर्रासीला
पंधरा लाख भाव झाला
वाली गरीबांस नाही उरला, रं जी जी .... ॥४॥

सत्तेचे सर्व दलाल, करती हलाल
लुटीचा सारा बोलबाला
सरकारे खाती तिजोरीला
स्विस बॅंकेत पैसा गेला
अवकळा आली भारताला
रसातळाला देश नेला, रं जी जी .... ॥५॥

अरे मायभूच्या लेकरा, भानावर जरा
आता तरी ये रे देशासाठी
भविष्या उजाळण्यासाठी
भ्रष्टाचार्‍यास हाण पाठी
दोन ठुसे नी एक लाठी
अभय मणक्यास आण ताठी, रं जी जी .... ॥६॥

हो जीजीजीजीजी, हो जीजीजीजीजी
हो जीरंजीरंजी, जीरंजीरंजी, जीरंजीरंजी जी
.
बोला भारतमाता की जय!
वंदे मातरम्!

                                          गंगाधर मुटे
------------------------------------------------

गुलमोहर: 

हो जीजीजी, हो जीजीजी
हो जीरंजीरंजी, जीरंजीरंजी, जीरंजीरंजी जी

मस्त चाल लावता येईल याला..

छान

मुटेजी,
लई भारी !
ही "हलगीवर पडलेली थाप" जबरदस्त वाटली !
Happy

एक होता पाटील धांदे, खाण्याचे वांदे
बॅंकेला गहाण सातबारा
अवदसा होती घरादारा
मग तो सत्तेमध्ये गेला
पाहता मालामाल झाला
कसा हा चमत्कार झाला? रं जी जी ....

या अशा पाटीलकीनेच सगळं राज्य ताब्यात ठेवलयं, गावकरी लोकांना कस हवं तस हाकललं गेलयं.

भ्रष्टाचार्‍यास हाण पाठी
दोन ठुसे नी एक लाठी
अभय मणक्यास आण ताठी, रं जी जी ...

>>>>>>मुटेजी, आम्हां सर्वसामान्य माणसांच्या मनातल्या संतापाला अगदी योग्य शब्दांत व्यक्त केलेत! Happy धन्यवाद!!!!!!!!!!