अध्यात्मिक गुरु लोकांना राजदूताचा दर्जा देण्यात यावा!

Submitted by फेसबुके on 22 August, 2011 - 03:58

तर सरकार,राजकारण आणि अध्यात्मिक गुरु यांच्या नादी लागू नये,असे आमचे बेम्भाटे मास्तर नेहमी म्हणायचे म्हणून आम्ही पूर्वीपासूनच या गोष्टी टाळत आलो.कारण हे विषय किचकट असून एकमेकांशी इंटरनेट किंवा इंट्रानेट( शबुद बरुबर हाये का?) ने जोडलेले असतात,असेही बिल गेट्स किंवा बिल क्लिंटन नामक तत्वज्ञ व्यक्तीने म्हटल्याचे आपणास् माहित असेलच.त्याचा प्रत्यय आपल्याला काल आला.नव्हे काल खात्रीच झाली,की अध्यात्म हा राजकारणी लोकांचा विषय आहे.आता सरकार हे एक अत्यंत किचकट आणि चिवट यंत्र असते,हे आपणास माहित आहेच.अनेक लहान लहान किंवा छोट्या मोठ्या असंख्य स्पेअर पार्टस्‌नी मिळून बनलेले असते.हे पार्टस म्हणजे वेगवेगळ्या आकाराच्या 'खुर्च्या'असून त्यावर मानवसदृश्य ढेरपोटे लोक बसलेले असतात.ह्यांचे काम पूर्वी लोकांची सेवा करायची असे होते,असे म्हटले जाते.पण अलीकडे म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच पैसे खाण्याचे काम आवडू लागल्याने ते तेवढेच काम अत्यंत इमानेइतबारे करीत आहेत.कारण काम कोणतेही असो,ते आनंदाने करावे असे आमचे बेम्भाटे मास्तर जीव तोडून शिकवायचे.पण तिकडे लक्ष न दिल्यामुळे आम्ही मागे राहिलो,आणि म्हणून शेवटी इथे आलो.कारण इथे रिकामटेकडे बुद्धीवादी लोक काहीनाबाही चर्चा भांडणे इत्यादी गोष्टी करत असल्याचे समजते.तर ते असो.

आता सरकार म्हटले की ते एखाद्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालते.त्यात अनेक हार्डवेअर,सोफ्टवेअर आणि अप्लीकेशनस् असणारच.आणि ओघानेच त्यात जंक फाईल्स नावाचा कचरा जमा होतो,असेही आपण ऐकून आहोतच.आणि काही सॉफ्टवेअरस् अप्लिकेशनस्,इंकोन्पिटीबल होणे,हार्ड ड्राईव्ह फेल्युअर हे प्रॉब्लेम्स येतातच.हे प्रॉब्लेम्स भ्रष्टाचार,वाचाळपणा,दंडुकेशाही आदी व्हायरसच्या उद्भवामुळे होतात.अलीकडे या यंत्रणेतील सिब्बल आणि इतर दोन-तीन नावाचे हार्ड सोफ्टवेअर(आता हा काय प्रकार,ते आम्हाला अर्थातच कसे माहित असणार?)व्हायरसप्रमाणे काम करू लागल्याने सिस्टीम अर्थातच फेकून द्यावी की काय अशा निष्कर्षाप्रत जनता नामक लोक आले.(कारण जनता नावाचे जे लोक असतात,त्यांच्यासाठीच मुळात सरकार नावाची सिस्टीम अस्तित्वात आल्याचे आम्ही कधीतरी म्हटलेच आहे).तत्पूर्वी दुरुस्तीचा एक मोठा प्रयत्न करून पहावा यासाठी त्यांनी अण्णा या महान इंजिनिअरला या सिस्टीमच्या दुरुस्तीसाठी बोलावून आणले. कारण हा मनुष्य आणि त्याचे लाखो करोडो शिष्य कैक वर्षांपासून सिस्टीमला दुरुस्त करून शिस्त लावण्याचे काम फुकटात करीत आहेत.या माणसाने आजपर्यंत अनेकदा सिस्टीमला दुरुस्त केले आहे.आता हे थोडे विषयाला धरूनच बरेच विषयांतर झाले ,त्याला आमचा नाईलाज आहे.

तर अण्णाजींनी आपले सत्याग्रह नावाचे टूलकीट सोबत आणले(ह्याच्याने सर्व निखळलेले स्क्रू फिट केले जातात असे म्हणतात.)आता सारी यंत्रणाच खिळखिळी झाल्याने लाखो,करोडो जनता नामक लोकांची आवश्यकता असल्याने आणि शेवटी हे जनतेचेच काम असल्याने जनताही स्वयंस्फूर्तीने या कामात अण्णांच्या पाठीशी उभी राहिली आहे.

एकंदरीत आता मूळ विषयाकडे वळू का? ठीक आहे.तर अण्णांनी आपल्या कार्यास एका उपोषणस्थळावरून सुरुवात केली कारण अण्णांची ही कार्यपद्धती गांधी आणि जेपी या अत्यंत महान इंजिनिअर लोकांसारखीच सत्याग्रह नामक तंत्रावर आधारलेली आहे.पण सरकार ही यंत्रणा स्वतः च"मी नादुरुस्त नाही,मी अजिबात नादुरुस्त नाही"असे स्वतःच सांगू लागल्याने अण्णांनी सोबत "जनलोकपाल" टीम व्युअर,रजिस्ट्री बुस्टर,जंकफाईल क्लीनर वगैरे सोफ्टवेअरस् आणली असून रिमोट स्थळावरून अण्णांचे काम जोरात चालू आहे.आता सिस्टीमचे प्रमुख जे एम.एम.एस.(MMS) हे अत्यंत मनमोहक व्यक्तिमत्व असून ते "मौनीबाबा"( इथे मला कुसुमाग्रजांच्या "अनंताचे मौनीबाबा हसले थोडे अंधारात!" अशा गूढ ओळींची आठवण झाली.आहेत) कारण ते क्वचीतच बोलतात.यांना बोलणे फारच जड वाटत असल्याने त्यांनी आपल्या वतीने बोलण्यासाठी सिब्बल आणि इतर दोन तीन सोफ्ट-हार्डवेअरस् ची नियुक्ती केल्याने गाडे आणखीच फसत गेले.हे फसलेले गाडे काढण्याची प्रक्रिया साधारणतः अशी: १)अण्णांनी उपोषण नामक तंत्राचा यशस्वी अवलंब केल्याने सरकारची पाचावर धारण बसते,२)नंतर ते चर्चेला लोक पाठवते,अशा अनेक बैठका होऊन मग ३)सिस्टीममध्ये काय बदल करावेत म्हणजे आम्ही(म्हणजे सरकार) दुरुस्त होऊ अशी विचारणा करते, ४)मग स्वतःत सुधारणा करते.पण यावेळेला सरकारने आधीच वाचाळपणा केल्याने सरकारला तोंड दाखवायला जागा अशी उरली नाहीच म्हणून 'आम्ही नाही जा!' असा बालीश हट्ट सरकार धरून बसले होते.आणि आता थोडे ठिकाणावर येऊ घातले असून सरकारने चर्चेसाठी अध्यात्मिक गुरूंना बोलावले आहे.

आता अध्यात्माचा आणि राजकारणाचा आणखी आंदोलनाचा नेमका काय संबंध असतो,हे आपल्याला कधीच कळले नव्हते;पण मागे रामदेवबाबा नामक प्रकरणात रवीशंकर नामक महाराज यांनी मध्यस्ती केल्याचे ऐकिवात आहे.आणि हेच बाबा अलीकडे उपोषणस्थळीही आढळून येत आहेत.याशिवाय भैय्या नामक आणखी एक गुरु संदेशवहन करण्यासाठी नेमण्यात आल्याचे समजते कारण दुरुस्तीसाठी चर्चा आणि संदेशवहन या गोष्टी प्रकृतीच्या विचारपुशीच्या नावावर सर्रास हे लोक साधून घेतात म्हणून यांना सामान्यतः"साधु" असे म्हटले जाते.या सर्वांची डाळ न शिजल्यास मदतीला "सारंगी"नामक जुनेच सोफ्टवेअर अपडेट करून सरकारने स्वतःत इन्स्टाल केल्याचे समजते. सारंगी हे सोफ्ट पद्धतीचे अत्यंत हार्ड सोफ्टवेअर असल्याचे समजते.हे सोफ्टवेअर दोन्ही बाजूने म्हणजे इंजिनीअरच्या आणि सिस्टीमच्या बाजूने वंगणाची कामे करतात.म्हणजे हे असे अवघड प्रकार असतात, कारण ते आपल्या समजण्यापलीकडचे असतात.मात्र या वेळेला सरकार दुरुस्त होतंय की फेकून द्यावं लागतं,हे आता लवकरच समजेल.सरकार तरले तर यात महत्वाची भूमिका निभावणाऱ्या अध्यात्मिक गुरूंना सरकारने देशांतर्गत राजदूताचा दर्जा देऊन त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यास काय हरकत आहे? अर्थातच धन्यवाद! जय भारत!

(टीप: लेखक हे आंतरराष्ट्रीय वा राष्ट्रीय राजकारणाचे,अध्यात्माचे,बुवाबाजीचे,अजिबात विश्लेषक नाहीत.
(c) All Rights Reserved! हे लिखाण फक्त लेखकाच्या नावावरच शेअर करण्यास परवानगी आहे.कृपया स्वतःच्या नावावर खपवू नये.)

गुलमोहर: