केरळ्-१-अथिरापल्ली वाळाझाल

Submitted by इंद्रायणी on 20 August, 2011 - 05:56

काही दिवसांपूर्वी केबलवर पुन्हा एकदा मणिरत्नमचा ’गुरु” पाहिला. “बरसो रे मेघा मेघा” म्हणत धो धो पवसात चिंब भिजणारी ऐश्वर्या पाहीली आणि पुन्हा एकदा केरळच्या अथिरापल्ली वाळाझालची आठवण झाली. या गाण्यातल्या काही भागात जो धबधबा दिसतो, तो आहे अथिरापल्ली वाळाझाल! (वाळाझाल मधला “ळ” चा उच्चार करताना जीभेचे वेटोळे करुन ते स्वतःच्या टाळ्याच्या मागच्या बाजूला टेकवावे)

ही खूप छान पण खूप कमी लोकांना माहीत असलेली जागा आहे. केरळ मधली मुन्नार, अलेप्पी, पेरीयार, थ्रिसूर सारखी टिपीकल स्थानं सगळयानाच माहीत आहेत पण केरळ मधे अशी वेगळी स्थानं खूप आहेत. केरळला “देवभूमी” का म्ह्णतात ते तिथे गेल्यावर कळ्तं.

अथिरापल्ली वाळाझालचं दॄश्यात्मक सौन्दर्य फोटो मधे पकडता येतं पण तिथलं रोमँटिक वातावरण मात्र तिथे जाऊनच अनुभवायला पाहिजे. हे धबधबे घनदाट जंगलात आहेत. मी तिथे नोव्हेम्बर मधे गेले होते तेव्हा पाऊस संपत आला होता. वातावरण ओलसर दमट पण आल्हाददायक होतं. घनदाट जंगलातल्या अथिरापल्ली धबधब्याकडे जायच्या अरुन्द वाटेवर अगदी छोट्या चान्दणी सारख्या सफेद फुलांचा सडा पडला होता. पावसाळ्यात केरळच्या जंगलात जळवा खूप असतात म्ह्णुन फार आत जाऊ नका असं तिथल्या लोकानी सांगितल होतं. जळू काय बिनविषारी असते. चिकटली पायाला तर काढून टाकायची पण त्यासाठी जंगलातली भटकंती का सोडायची? म्हणून आम्ही थोडं पुढे गेलो. वाटेवर छोटे छोटे झरे लागतात. पक्षांचे तर इतके वेगवेगळे आवाज ऐकायला मिळतात आणि पार्श्वभूमीला असते अथिरापल्लीचा आसमंत भारुन टाकणारी घनगंभीर साद.

अथिरपल्ली पासून वाळाझाल अगदी जवळ आहे. हा धबधबा ऊंचीनं छोटा पण पसरट आहे. अथिरापल्लीचा धबधबा आक्रमक, लांब रहायला सांगणारा तर वाळाझालचा धबधबा खळाळता खोडकर जवळ बोलावणारा आहे. अथिरापल्लीचा आनंद लांबूनच घ्यायचा पण वाळाझाल मधल्या एखाद्या खडकावर आपण अरामात पाय सोडून बसू शकतो. या परीसरात अलिशान होटेल्स नाहीत पण खास केरळी चवीचं मस्त आणि स्वस्त जेवण देणारी काही छोटी छोटी टिपीकल होटेल्स आहेत.

केरळ मधलं रेंजरवूड रिसॉर्ट्स आणि रिसॉर्ट्सचे व्यवस्थापक श्री. सतीशकुमार आणि श्री. सज्जीकुमार पर्यटकांना केरळची अशी वेगळी ओळख करुन देण्यासाठी, अशी ऑफबीट ठिकाणं सुचवण्यासाठी आणि तिथली सहल आयोजित करण्यासाठी नेहमी तत्पर असतात.

केरळच्या अशाच काही खास ठिकाणांची आणि केरळी संस्कॄतीची माहीती मी तुम्हाला देतच राहीन पण लवकरच केरळची माहीती देणारा एक रेडिओ प्रोग्राम मी सुरु करते आहे. आकाशवाणीच्या विविध भारतीवर, एफ.एम. १०१ मेगा हर्टझवर २४ ऑगस्ट पासून दर बुधवारी सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी हा कार्यक्रम प्रसारीत होईल. या कार्यक्रमाचे सध्या सात भाग तयार आहेत.

भारताच्या वेगवेगळ्या भागात भटकायला आणि तिथल्या वैविध्यपूर्ण संस्कॄतीची ओळख करुन घ्यायला मला आवडतं. सहलीला जाताना केवळ मनोरंजन आणि खरेदी एवढेच उद्देश पर्यटकांनी ठेवू नयेत तर तिथली लोकसंस्कॄतीही जाणून घ्यावी हाच या कार्यक्रमांचा उद्देश आहे. शक्य झालं तर हे कार्यक्रम ऐका आणि तुमच्या प्रतिक्रियाही कळवा.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वाह, पुन्हा एकदा केरळची अप्रसिद्ध माहिती मिळाली. किती छान ठिकाण आहे हे.
हा लेख दोनदा प्रसिद्ध झाला आहे. अ‍ॅडमिनला सांगून एक उडवता येईल.
तसेच तुझ्या सर्व लेखांच्या लिन्क्स प्रोफाईल मधे देता आल्यास चांगले. पु.ले.शु.
रेडिओ प्रोग्राम अ‍ॅडमिनला विचारून इकडे अपलोड करता येऊ शकेल कदाचित.

इंद्रायणी ,थोडी भर घालून हा धागा नवीन करता येईल का पाहा .त्या रेडिओ कार्यक्रमातली माहिती लिहिता येईल .
मी एक धागा काढला होता परंतू त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता ( http://www.maayboli.com/node/46203 )
मुन्नार -,अळैप्पि बोटिंग शिवाय केरळ कोणाला पाहायचे नसेल बहुधा .