ऋणनिर्देश

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago
Time to
read
<1’

मायबोली सुरु झाल्यापासून वेळोवेळी अनेक जणांनी आपाआपल्या परीने मदतीचा हात पुढे केला, बहुमुल्य सुचना केल्या, वेळ दिला. त्या सगळ्यांची मायबोली ऋणी आहे.

वेबसाईट खरं तर "मायबोली" म्हणायच्या अगोदर १ महिना सुरु झाली होती. तिचं पहिलं नाव होतं "ऐसी अक्षरे". सनीव्हेल, कॅलिफोर्निया मधल्या उत्तरा आळतेकरांनी, मायबोली हे नाव सुचवून तिचं पुन्हा एकदा बारसं केलं.

त्यावेळेस मराठी फॉंट मिळायला लागले होते पण ते कामचलाऊ होते. सुंदर नव्हते. अशातच श्रीकृष्ण पाटील आणि त्याच्या फॉंटबद्दल कळालं. हे आजोबा निवृत्त झाल्यावर मुलाकडे आले. वयाच्या पासष्टाव्या वर्षी programming शिकले आणि त्यांनी अत्यंत सुंदर असे फॉंट केले. फॉंट प्रोग्रामिंग हा अतिशय किचकट आणि वेळखावू प्रकार आहे. म्हणजे तेंव्हा तरी होता. आता बराच सुलभ झाला आहे. श्रीकृष्ण पाटलांचा या वयातला उत्साह आणि भारतीय भाषांसाठी केलेली धडपड पाहिल्यावर मायबोलीसाठी आणखी स्फुरण चढलं. त्यांचा एकच फॉंट मायबोलीसाठी विकत घेतला होता. पण कुणीतरी मराठीसाठी इंटरनेटवर करतय हे कळल्यावर त्यांनी त्यान्च्याकडचे सगळ्या प्रकारचे फॉंट मायबोलीला भेट दिले.

हितगुज सुरु व्हायच्या जवळ जवळ एक वर्ष अगोदर "बकुळीच्या फुलांची" सुरुवात झाली. सुरुवातीला सगळं स्वत्: शोधून संकलित करत असे. पण ते बरोबर दर सोमवारी प्रकाशित करणं हि थोडी कसरत झाली होती. रविवारी दुपारी किंवा वीकेंडला बाहेर कुठे लांब जाणं शक्य नसायचं. यापुर्वी आय. आय. टी. त असताना तंत्रचं संपादन केलं होते त्यामुळे चांगलं आणि नवीन सतत लिहिणं अवघड आहे याची कल्पना होती. पण नुसतं लिहिणंच नाही तर वेळेवर प्रकाशित करणं आणि ते दर सोमवारी असं महिनोंमहिने करणं याच्या मागे जरी फार कष्ट नसले तरी खाजगी आयुष्यावर नक्किच परिणाम करणारं होतं. सुदैवाने रविंद्र गोडबोलेची मायबोलीवरुनच गाठ पडली. त्याने कधिही लिहिलेली बकुळीची फुले भविष्यात आपोआप प्रसिद्ध होतील अशी सोय करून दिली. ती नसती तर बकुळीची फुलं पहिल्याच वर्षी कोमेजली असती.
त्याच वेळेस तोच program वापरून सुंदर हट्टंगडी "नामाचा गजर" असा भक्ती वाङमयाशी निगडित असलेला भाग चालवत असे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
बकुळीच्या फुलांसाठी अनेकांनी संकलन केले आणि त्या सगळ्यांच्या नावाचा उल्लेख आम्ही करीत असू. पण यात सगळ्यात उत्साही म्हणजे ८६-८७ वर्षांचे अटलांटाचे दादा देशपांडे. त्यांचं मराठी काव्यावरचं प्रेम प्रचंड दांडगं. कुठुन कुठुन ते बकुळीच्या फुलांचं संकलन करून पाठवायचे. अशी माणसं भेटली की मला काही करायला जमत नाही अशी सबब सांगता येत नाही.

संतोष किल्लेदार यांनी सुरुवातीपासुन खुप मौल्यवान सुचना आणि वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली. त्यांची व्यंगचित्र मालिका बरीच गाजली. जरी हितगुज नसलं तरी जोरात V&C झालेला तो मायबोलीवरचा पहिला विषय असेल. त्यांची चित्र काढून टाका ती मायबोलीवर शोभत नाही असा निषेध करणारी आणि खूप दिवसांनी धमाल हसलो आणखी ठेवा असं म्हणणारी दोन्ही प्रकारची पत्र (ईमेल) यायची. मराठीत इंटरनेटवर प्रसिद्ध झालेली ती पहिली व्यंगचित्रं.

मायबोलीवरची पहिली interactive गोष्ट म्हणजे भेटकार्डे. खरंतर पूर्णपणे online असल्याने त्याला "कार्ड" म्हणावं का हा प्रश्नंच आहे. तेंव्हा कागदावरही मराठी भेटकार्ड कुणाला माहिती नव्हती. मराठीत हा प्रयोग पहिल्यांदा मायबोलीनं केला. जेष्ठ चित्रकार रवी परांजपे यांची चित्रं तेंव्हा वापरली होती (आजही काही आहेत) त्यावेळेस मायबोली हे नाव कुणालाच माहिती नव्हते. तेंव्हा थोडी भितभितच त्यांची परवानगी मागितली होती. पण त्यांनी अतिशय उदार मनाने मायबोलीवर चित्रे ठेवायला परवानगी दिली.

क्रमश्:
admin

विषय: 
प्रकार: 

ग्रेट वर्क!!

दीपू द ग्रेट
"वक्त रूकता नहीं कहीं टिककर
इसकी आदत भी आदमीसी है"

श्रीकृष्ण पाटील, रविंद्र गोडबोले, संतोष किल्लेदार, दादा देशपांडे, आपले अजय व अजूनहि मायबोलीसाठी नेमस्तक, व्यवस्थापक, स्वागत समिति इ. कामे करणारे यांना सादर प्रणाम.
मराठी भाषेवरील प्रेमामुळे या सद्गृहस्थांनी व कित्येक भल्या स्त्रियांनी एव्हढे काम करून मराठी भाषा प्रेमिकांवर उपकार केले आहेत.
म्हणूनच असे वाटते की आता मराठीत लिहीणे फार सोपे झाले आहे, तर जास्तीत जास्त शब्द मराठीत लिहावे, शक्यतो मराठी शब्द वापरावेत. ही इच्छा.
नाहीतर म्हणायचे मायबोली नि लिहायचे इंग्रजी नाहीतर हिंदी. जणू आपली अमृतातेहि पैजा जिंकणारी भाषा यांना 'तोकडी' वाटते!

पाटील अजोबा गेले (बहुदा २-३ महीन्यांपुर्वी) त्यापुर्वी त्यांना २ वेळा भेटण्याचा योग आला होता.

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

फार सुंदर .. मायबोलीची बखर लिहायला सुरवात व्हावी अशी माझीपण फार दिवसाची इच्छा होती... झक्कास.
मायबोलीच्या सर्वच नेमस्तकांना नम्र अभिवादन..

अजय दादा तुमच कौतुक कराव तितक कमी आहे आणि तुमचे आभार मानावे तितके कमी आहे.

"केव्हाहि कुठेही आपल्या माणसांच, आपल हक्काच घर म्हणाजे 'मायबोली'..."

सुरवातीपासुनची माहिती द्यायला सुरवात केल्याबद्दल धन्यवाद...कुठुन सुरवात झाली असेल हा प्रश्न नेहमी मनात यायचा. आता कळेल संगतवार, इतिहास कसा घडला ते...

साधना
______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

अजय,अतिशय चांगला उपक्रम हाती घेतलायस रे... खूपच छान... :)मायबोलीच्या इतिहासातली पाने आता सर्वांसमोर उलगडत जातील.. आणि सर्वांना कळेल की मायबोलीची उत्तरोत्तर प्रगती कशी कशी होत गेली ते..

आपको सलाम ! तुम्हाला माहीत नाही तुम्ही आम्हाला काय दिले आहे ते ....!
कधी कधी शब्द किंवा विचार तोकडे पडतात, त्याचा अनुभव घेत आहे.

मायबोलीला आणि त्यानिमित्ताने मिळणार्‍या मानसिक सुखसोयींना कितीही गृहित धरलं तरी, कधी तरी हे प्रश्न पडतातच... ह्या प्रचंड वृक्षाचं मुळ कुठलं, कधी रोवलं, कसा विस्तार...
सर्वात आधी हे चालू रहवं ह्यासाठी जे काही करता आहात त्या सगळ्यासाठी तुम्हा "टीमटीम"णार्‍यांचे शतशः आभार. आणि आता हे लिहायला घेतलत त्यासाठी तर खासच.

या पडद्या मागच्या यशस्वी कलाकारांना कोटी कोटी धन्यवाद ज्यांच्या मुळे आज मायबोलीवर वावरणं अगदी सुखकर झालं