नवीन दशकाच्या उंबरठ्यावर..

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

गणेश चतुर्थीच्या सर्व मायबोलीकरांना आणि त्यांच्या प्रियजनांना शुभेच्छा.

आज मराठी तिथीनुसार मायबोली.कॉम ११ व्या वर्षात पदार्पण करते आहे.

दहा वर्षांपूर्वी सुरू केलेलं हे साधं पान. मराठीसाठी आपल्याला जमेल तसं जमेल तितकं काहीतरी करायचं, इतकी छोटी इच्छा. खाज म्हणा हवं तर. तेंव्हा वेब नावाचं प्रकरण फारतर २ वर्ष जुनं असेल. तांत्रीकदृष्ट्या मराठीतर सोडाच, पण इंग्रजीखेरीच कुठल्याही भाषेतून प्रकाशित करण्याची अडचण होती. साठवण्याची जागा, बँडवीड्थ वगैरे सगळ्याच गोष्टी खूप महाग होत्या. मुक्त प्रणाली सॉफ्टवेअर अगदीच मर्यादित स्वरूपात उपलब्ध होते. आम्ही काही केलं असं म्हणण्यापेक्षा, आम्ही मायबोली सुरू करण्याचं निमित्त झालं असं म्हणुया. कारण जगभरचे मराठी भाषिक असं काहि व्हावं याची वाट पहात होते. मायबोलीवर उदंड प्रेम करून त्यानी दिलेल्या प्रतिसादामुळे परत कधी मागे वळून बघावं लागलं नाही. डॉट कॉमच्या फुग्यामधे ज्या वेगाने वेबसाईट सुरु झाल्या, तशा बंदही पडल्या. मायबोलीकरांच्या पाठींब्यामुळे सुदैवाने मायबोली आजही अस्तित्वात आहे. पण काळाबरोबर मायबोलीला बदलणं भाग आहे. म्हणूनच स्वत्:च्या पायावर उभं रहाण्यासाठी भक्कम आर्थिक पाया तयार करते आहे, व्यक्तिकडून संस्थेकडे वाटचाल करते आहे. पण एक गोष्ट अजूनही अगदी तशीच आहे. १९९६ मधे "आम्ही कोण" मधे लिहिल्याप्रमाणे
'सगळ्यात महत्वाचं आहे ते तुम्हाला, मायबोलीवरच्या पाहुण्याना, मायबोलीकरांना, मायबोली लाडकी वाटते, आपली वाटते. तुमची ही आपुलकी, जिव्हाळा आणि विश्वास संपादन करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं यातच या खटाटोपाचं सार्थक आहे."

भेटी, सरासरी दर महिन्यात १०७,७००
+ पृष्ठवाचने, सरासरी दर महिन्यात १,३७८,०००
+ वेळोवेळी मदत करणारे स्वयंसेवक / हितचिंतक १३०
+ दहा वर्षातला एकूण खर्च, डॉलरमधे १६, ८३०
+ पाच तासापेक्षा कमी झोप मिळालेल्या रात्री १०४०
-------------------------------------------------------------------------
= गेली दहा वर्ष जगभरच्या मराठी माणसांना एकत्र करणारं हे जिव्हाळ्याचं कुटुंब अमूल्य

-Admin

विषय: 
प्रकार: