विनोद पुराण

Submitted by विस्मया on 17 August, 2011 - 14:03

आज राहवलं नाही म्हणून ते केलं. नाही नाही, आपल्याला माहीत नाही असं होऊन चालणार नाही. म्हणून आज गूगल सर्च दिला आणि चक्क विनोदाचे प्रकार पाहीले. ज्या विनोदावर लहानपणापासून प्रेम केलं त्याचं वर्गीकरण आणि कुठल्या प्रकारच्या विनोदाला काय म्हणायचं हे डोळे भरून वाचलं. काही शब्द कानावरून गेलेले, त्यांचे अंदाजाने लावलेले अर्थ बरोबर निघाल्याचं पाहून तितकाच दिलासा मिळाला मनाला.

विनोदाची ओळख ज्याने करून दिली त्या चार्ली चॅप्लीनच्या विनोदाला स्लॅपस्टिक कॉमेडी म्हणायचं हे आता चांगलं समजलं. लॉरेल हार्डीच्या विनोदालाही स्लॅपस्टीकच म्हणायचं असं श्री गूगळे सांगत होते. आता इथून पुढे आपण कुठल्या विनोदाला हसतोय हे माहीत होणार होतं. इतके दिवस अज्ञानापोटी आपण हसत होतो. आता ज्ञानचक्षू उघडल्याने त्या हसण्याला अर्थ प्राप्त होणार होता. ज्याला ब्लॅक कॉमेडी असं म्हटलं जातं त्याला डार्क ह्युमर देखील म्हणतात हे ही कळालं. खरं तर दोन्ही शब्द माहीत नव्हते तेव्हा जाने भी दो यारो या सिनेमाला डोळ्यात पाणी येईपर्यंत आपण हसलेलो हे आठवून स्वतःचीच लाज वाटली. तेव्हा आपल्याला हे शब्द माहीत असायला हवे होते.

मराठी नाटकं फार्स मधे गुंतून पडलेली असताना डी डी ज कॉमेडी शो सारखे टीव्ही शो खळाळून हसवून जायचे. त्याचं नावच नॉन स्टॉप नॉनसेन्स असं होतं. बाबा द ल्युसी शो पाहून खुदुखुदू हसायचे. आम्ही त्यांना पाहून हसायचो. कारण ल्युसी शो मधले विनोद तेव्हां कुठले कळायला ? कुणी तरी टॉम अँड जेरी शो ची कॅसेट घेऊन यायचं. ती पाहताना मुलांबरोबरच मागून बाबांचाही हसायचा आवाज यायचा. गजरा सारखा मराठी कार्यक्रम अधून मधून व्हायचा. मग गजराच्या दिवसांबद्दल कुणीतरी भरभरून बोलायचं.

खरं सांगायचं तर आता गजरा पाहताना हसू येत नाही. पण मागची पिढी आजही हसते. विनोद जुना होत जातो का ? पण कॉमेडी ऑफ एरर किंवा त्यावर आधारीत अंगूर हा सिनेमा पुन्हा पुन्हा हासवू शकतो. असं का ?
हेरा फेरी सारखा तद्दन धंदेवाईक सिनेमा. पण बाबूराव आपटे आजही हासवून जातो. मागे यदा कदाचित पाहीलं तेव्हा सगळे हसत असताना एकाही सेकंदाला हसू न आल्याने मी स्वतःलाच दोष दिला होता. माझं हसणं संपलं कि मी स्वतःला खूप शहाणी समजायला लागलेय, हे कळत नव्हतं. आणि मागच्या खेपेला थ्री इडियटसला खळाळून हसू आलं तेव्हा नेमकी त्यातल्या विनोदावर सडकून टीका झाली !

हसवणं हे सर्वात अवघड काम आहे असं मला वाटतं. हसवण्याचा धंदा सेहवागच्या बॅटिंगसारखा आहे. सिक्सर बसले तर प्रेक्षक डोक्यावर घेतात पण अंदाज चुकला तर विकेट पडण्याचा धोका कायम असतो. कुचाळक्या करणा-या कौटुंबिक मालिका, तेच ते दळण दळणा-या चर्चा यांना असा तात्काळ निकालाचा धोका नसतो. स्टँड अप कॉमेडी हा प्रकार तर ट्वेंटी ट्वेंटी सारख्या निसरड्या वाटेवरचा विनोद आहे. पण तो रुजला तोच जॉनी लिव्हर, राजू श्रीवास्तव यासारख्या कलाकारांच्या उस्फूर्त अभिनयामुळे आणि देहबोलीमुळे. त्यावेळी त्यांच्यावर हीन अभिरुचीचे आरोप झाले. क्लासेस कडून अवहेलना झाली. पण त्याची पर्वा न करता ज्यांना ते आवडतंय त्यांच्यासाठी या कलाकारांनी पोटाला चिमटे घेत शोज केले. कॅसेट्स काढल्या. त्याचा परिणाम म्हणून आज ते सर्वमान्य झालंय. कुठल्याही वाहिनीवर स्टँड अप कॉमेडी आहेच आहे. आज तीव्र स्पर्धेमुळे वाहिनांवर स्टँड अप कॉमेडीचा धुमाकूळ सुरू आहे. मात्र या स्पर्धेमुळं रोज नवं काय द्यायचं हा प्रश्न त्यांच्याइतकाच माझ्यासारख्यांनाही पडतो.

मग पुरूषांनी स्त्रियांच्या गेट अप मधे केलेले विनोद , महिला कलाकारांचे लाऊड विनोद हे देखील आता सवयीचे होऊन गेलेय. मात्र फु बाई फू सारख्या मालिकांमधून आनंद इंगळे, सतीश तारे, भाऊ कदम यासारख्या हसवण्याची नैसर्गिक क्षमता असलेल्या विनोदवीरांनी हे आव्हानही पेलल्याचं दिसून येतं. (जितेंद्र जोशी हा अभिनेता परीक्षकाच्या खुर्चीऐवजी स्टेजवर हवा होता हे हा कार्यक्रम पाहताना नेहमी वाटतं). कोणतेही ओंगळवाणे हातवारे न करता एक्स्प्रेशन्स आणि विलक्षण देहबोली यावर आजही हसवता येतं हे या कलाकारांनी दाखवून दिलंय.

हसवणूक या शो मधून पुढे आलेले दीपक देशपांडे आणि अजितकुमार कोष्टी ( आमचा गणा फेम) यांच्यासारखे गुणी कलाकार आजही लक्षात राहीलेत. फु बाई फू ला मायबोलीचं पाठबळ मिळालंय हे आता सर्वश्रुत आहेच. पूर्वी लेखकाचे नाव आतासारखे येत नसतानाही कौतुक शिरोडकरांचा भाग कुठला हे नेमकं ओळखता यायचं. आता धुंद रवी यांच्यासारखा (लुंगीखरेदी फेम) लेखक फु बाई फू ने पळवल्याने झी टीव्हीचा प्रश्न सुटला ! अर्थात रसिकांची सेवा मोठ्या प्रमाणात करण्याची संधी आपल्या या मित्रांना मिळाल्याने त्याबद्दल तक्रार असण्याचं कारण नाही. Happy

बोचरा विनोद हा एक प्रकार हिंदीत आहे. कपिल शर्माचा हात या बाबतीत कुणी धरू शकत नाही. पण कित्येकदा हा विनोद सहकलारांच्या किंवा राजकारणी, अभिनेते यांच्या अपमानास्पद उल्लेखाकडे झुकताना दिसतोय. सहकलारांचा अपमान देखील होताना दिसतोय. टवाळीच्या पलिकडे जाणारा हा विनोद मराठीत मान्य होणार नाही असं वाटतं. पुलंनी विनोदाचे जे मापदंड / मर्यादा घालून दिल्यात त्या मर्यादेत राहणं हे किती आवश्यक आहे हे हिंदी शोज पाहताना जाणवतं. आज हसण्याची आपली गरज ही ब-याच अंशी टीव्हीवर अवलंबून आहे. आपल्या एकूण मनोरंजनामधेच टीव्हीचा हिस्सा मोठा आहे.

मात्र दर्जेदार आणि टिकाऊ विनोद हा असा पैलू पडलेला हिरा आहे जो कथेच्या कोंदणात नेहमीच अधिक खुलून दिसलाय. मग पुल, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, दमा, रमेश मंत्री असे विनोदी लेखक या पिढीला मिळणार कि नाही असा प्रश्न निर्माण होतो. त्यानंतरच्या पिढीतही मुकुंद टाकसाळे, ब्रिटीश नंदी, तंबी दुराई यांनी नवे प्रवाह आणले. पण विनोदी साहीत्य पूर्वीसारख चर्चेत राहताना दिसत नाही. कि वाचक आता प्रेक्षक झालेत ? पण हे ही खरं नाही हे नेटवरच्या लिखाणाला मिळणारा प्रतिसाद पाहताना लक्षात येतं. नवे लिहीणारे दमदार लेखक उदयाला येत आहेत. मायबोलीवरच्या काही जणांचा इथे उल्लेख केला त्याचप्रमाणे मिसळपाववरच्या प्रसाद ताम्हणकर (परीकथेतला राजकुमार) यांचा उल्लेख करावासा वाटतो. या लेखकाकडे विलक्षण विनोदबुद्धी आहे. त्याच्या पुढच्या वाटचालीबद्दल उत्सुकता आहे. असे अनेक दमदार लेखक नव्या पिढीत असतील ज्यांचा उल्लेख वाचनमर्यादेमुळे शक्य झालेला नाही. अशांकडून अपेक्षा ठेवणे , त्यांना प्रोत्साहन देणे हा नेटवर आढळणारा प्रकार म्हणूनच आश्वासक वाटतो. वाचकांची सेवा आणि वाचकांकडून अशा लेखकांना पैलू पाडले जाणे हे एकाच वेळी पहायला मिळतंय. थोडक्यात काय तर तंत्रज्ञान बदललं, राहणीमान बदललं त्याप्रमाणे विनोदाचं रुपडं बदललं तरी विनोद आहे तोच कायम राहीलाय. माणसाची हसण्याची उर्मीही तीच कायम राहीलीय. नाही का ? असो.

खरं तर विनोद या जिव्हाळ्याच्या विषयावर गंभीरपणे कंटाळवाणा लेख लिहीणं ( आणि ते ही कुवत नसताना ) हा एक गंभीर अपराध आहे याची जाणिव ठेवून आता समारोपाकडे वळणे हे आता अत्यंत आवश्यक झालेले आहे. कृपया विनोदाचा आढावा, धांडोळा घेण्याचा प्रयत्न असा कोणताही विचार या लेखामागे नसून क्षण दोन क्षण खळखळून हसण्यासाठी मला काय हवं हे सांगण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे असं समजण्यात यावं. विनोद हा प्रकारच साक्षेपी असल्याने आणि लेखिकेच्या असंख्य मर्यादांमुळे विनोद या विषयावरचे विचार व्यक्त करताना काही गंभीर चुका झाल्या असाव्यात त्या ही दाखवून दिल्या जाव्यात ही नम्र विनंती. लेखात काही व्यक्तींचे उल्लेख केवळ उदाहरणादाखल आणि अपवादात्मक असून त्यामुळे कुणाचे उल्लेख राहून गेले असतील तर क्षमा करण्यात यावी ही विनंती.

- Maitreyee Bhagwat

गुलमोहर: 

गेल्या वर्षीच्या ऑगस्टमधे हा लेख लिहून अप्रकाशित ठेवला होता. लोकनाट्य, तमाशा, बतावणी, गौळण यासारख्या पारंपारिक मनोरंजनातून समोर येणारा विनोद, गावाकडच्या गप्पांमधे आढळणारा विनोद असं बरंचसं भरभरून लिहायचं होतं , ते राहूनच गेलं आणि नंतर (वेंधळेपणामुळे) विसर पडला. Happy

मैत्रेयी, लेख छान झाला आहे. आवडला. काही लेखकांचे संदर्भ मुद्दाम वगळलेत का राहून गेलेत उदा. आचार्य अत्रे? Happy

अतुलनीय आभार. आचार्य अत्रेंना वगळण्याची पात्रता कुणाच्यातच नाही. या चुका म्हणजे म्हणजे माझी मर्यादा आहे असं वाटतंय. चिंवि जोशी, दिलीप प्रभावळकर देखील राहून गेलेत.. क्षमस्व !

फु बाई फू ला मायबोलीचं पाठबळ मिळालंय >>>>>अजून एक मायबोलीकर आशिष निंबाळकर हे सुद्धा फु बाई फू मध्ये स्क्रिप्ट लिहितात

बाकी लेख छान आहे Happy

छान जमलाय लेख. लिहायचे राहिले होते, ते दुसर्‍या भागात लिहिता येईल.

ल्यूसी तर भन्नाट होतीच, पण मॅड मॅड मॅड वर्ल्ड, कॅरी ऑन... वगैरे पण अभिजात विनोदी चित्रपट होते.

जाने भी दो यारो नंतर असेच, तेरे बिन लादेन ने पण हसवले होते.

छान {आणि तितकाच मोजकाही} आढावा घेतला आहे 'विनोदरावाचा'. मी टीव्हीवर सादर केल्या जाणार्‍या विनोदी कार्यक्रमापासून खूप दूर राहतो, त्याला कारण तिथे जितके चांगले कलाकार आपली कला सादर करीत असतात तितकेच वाईटरितीने [विशेषतः शेखर सुमन संचलित कार्यक्रमातून] विनोदाच्या नावाखाली धुडगूस घालणारेही पाहिले आहेत. त्यामुळे टीव्हीने विनोद खुलविला की बिघडविला हाही एक चर्चेसाठी पैलू होऊ शकतो.

तुम्ही उल्लेख केलेल्या विविध प्रकारातील 'स्लॅपस्टिक कॉमेडी' ने [वर 'स्लॅपेस्टिक' असे टंकले गेले आहे, ते 'स्लॅपस्टिक' असे हवे....नावात 'स्टिक' आहे आणि त्या स्टिकची 'स्लॅप' विनोदी ढंगाने मारायची या संकल्पनेतून 'स्लॅपस्टिक' संज्ञेचा जन्म झाला आहे] जगभरात मानाचे स्थान मिळविल्याचे दिसून येते तर त्याचाच सख्खा भाऊ शोभावा अशा 'फार्सिकल कॉमेडी'नेही चांगलेच अंथरुणपांघरुण पसरल्याची उदाहरणे आपल्या भाषेतूनही सापडतात. लॉरेल हार्डी जोडीचे नाव वर आले आहे. तरीही माझ्या दृष्टीने [म्हणजे मी पाहिलेल्या उदाहरणावरून] त्यांची कॉमेडी ही खास मध्यमवर्गीय स्तरावरील होती....म्हणजे तुमच्याआमच्या रोजच्या घडामोडीवर बेतलेली.... ज्याला काहीसी 'तू मोठा बाबा, तुझेच खरे.... मी बारका....;' अशी प्रसंगी कमीपणा घेण्याचीही छटा लाभली होती....दोन घटका निर्भेळ करमणूक अशी त्यांची धाटणी....तर दुसरीकडे चॅप्लीनच्या विनोदाला करुणेची जी झालर होती तिच जगभरातील प्रेक्षकाला खूप भावली. 'थ्री स्टूजेस' यांचा विनोदही स्लॅपस्टिक गटात येतो.

'आयोर्निक....Ironic...' हा खरा बोचरा विनोद.....लेकी बोले सुने लागे धाटणीचा... तसेच उपहासात्मक नमुन्यासाठीही वापरता येतो....उदा. "फार शहाणा दिसतोस तू लेका.." या वाक्यात खरे तर "त्या लेका' चा गाढवपणा दाखवायचा आहे, पण तो थेट न दाखविता "शहाणा" नामाचे Irony मध्ये प्रयोजन केले गेल्याचे दिसते.

अजूनही खूप नमुने देता येण्यासारखे आहेत....या धाग्याच्या निमित्ताने त्यांची इथे चर्चा झाली तर तो एक चांगल्या अभ्यासाचा विषय होऊ शकतो.

छान अभ्यास,

घडलय बिघडल हा सुध्दा तत्कालिन राजकारणावर विनोद करणारा चांगला कार्येक्रम होता.

आर्मस्ट्राँग म्हणजे भुजबळ, तेलआणि घी म्हणजे तेलगी इ विनोद मार्मिक होते.

अशोक,

सटायर फटायर वाचता का, त्यात खरेच दर्जेदार विनोद असतो.

हो अतुलनीय, फेरारी आवर्जून बघितला होता मी. छानच होता. ( बरंचसं श्रेय त्यातल्या मराठी नाट्यकलाकारांना )

गजरा, मधे सादरकर्ते वेगवेगळे असल्याने, तसाच तो केवळ विनोदी नसल्याने, अजूनही लक्षात आहे.
किशोर प्रधान, आत्माराम भेंडे, दिलीप प्रभावळकर, सई परांजपे, अरुण जोगळेकर, दया डोंगरे, माया गुर्जर.. हे खास आवडीचे होते.

आवर्जून लक्षात राहिलेली दर्जेदार मराठी विनोदी नाटके
बे दुणे पाच ( प्रशांत दामले )
पळा पळा कोण पुढे पळे तो ( भक्ती बर्वे / दिलीप प्रभावळकर )
दिनुच्या सासुबाई राधाबाई ( मनोरमा वागळे / बबन प्रभू )
दिवसा तू रात्री मी,
चार दिवस प्रेमाचे ( सविता प्रभुणे / कविता लाड / अरुण नलावडे / प्रशांत दामले )
जेव्हा यमाला डुलकी लागते ( सुधा करमरकर / लक्ष्मीकांत बेर्डे )
हा तेरावा ( सुधा करमरकर / भावना ),
जादू तेरी नजर ( प्रशांत दामले, सतीश तारे )
झोपी गेलेला जागा झाला ( आत्माराम भेंडे / कानन कौशल)
एका रविवारची कहाणी ( पुलं, आशालता, श्रीकांत मोघे, नीलम प्रभू )
लफडा सदन (अविनाश खर्शीकर / प्रकाश इनामदार )
सौजन्याची ऐशीतैशी ( राजा गोसावी )
मोरूची मावशी ( विजय कदम )
वटवट सावित्री ( दिलीप प्रभावळकर / अर्चना पाटकर )

आणखी एक, आता नाव आठवत नाही पण त्यात दिलीप प्रभावळकर, सुहास जोशी, निर्मिती सावंत आणि हेमु अधिकारी होते. शिवाय रसिका ओकचे जातीपातीवरचे एक मस्त नाटक, हलकंफुलकं ( तिच्या ८ भुमिका होत्या )

कलाकारांची नावे वाचूनच, दर्जेदारपणाची खात्री पटली असेल. अजून आठवली तर लिहितोच.

अतिशय नेटकेपणानं मनोगत व्यक्त केलंय. चांगला, दर्जेदार विनोद करणं खरोखर फार अवघड याच्याशी पुरेपूर सहमत. त्यामुळंच त्याच्याविषयीची चर्चा गंभीरतेकडे झुकली तर हरकत नाही.

योगायोग म्हणजे मीही परवाच याच विषयावर सर्च केला आणि विनोदाचे २० प्रकार असतात हे समजले. काहींमधला फरक नीट कळला नाही. निमित्त हे झालं की गेल्या काही दिवसातच लिहायला सुरुवात केली होती आणि आपलं कडमडण नक्की कुठे बसतं याची उत्सुकता होती.

''यात हसण्यासारखे काय आहे?' हा माझा लेख वाचून [''यात हसण्यासारखे काय आहे?' असे लिहिले असूनही] आपण 'विनोदी लिखाण असावं या अपेक्षेन वाचलं.' असे म्हटले आहे.

मग आता 'विनोद पुराण' लेखात विनोदाची अपेक्षा करावी कि नाही?

दिनेश...

"सटायर" आणि "अ‍ॅलेगोरी" हे प्रकार तर आमच्या इंग्रजी अभ्यासक्रमाचे अविभाज्य घटकच होते. चॉसरचा पेपर होता आणि त्याच्या 'कॅन्टरबरीज् टेल्स' ची पारायणे व्हायची या निमित्ताने. दुर्दैवाने म्हणा वा काही तांत्रिक बाबीमुळे गेली कित्येक वर्षे 'चॉसर' आपल्या अनेक विद्यापीठाच्या सिलॅबसमधून हद्दपार झालेला दिसतोय, कायमचा. कुतूहलाने मी शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी विप्र ना कारणमीमांसा विचारली होती तर उत्तर मिळाले...."अहो काय सांगायचे पाटील, हा पेपर शिकविण्यासाठी शिक्षक मिळत नाही....' म्हणजे 'मॉडर्न इंग्लिश' ने ' १७ व्या १८ व्या शतकातील अभिजात इंग्रजी खाऊन टाकले.

'इसाप' च्या नीतिकथा हा प्रकारही एकप्रकारचे 'सटायर' च मानले जाते....म्हणजे आमच्या अभ्यासक्रमात 'इसाप' जरी नव्हता, तरी प्रोफेसर "होरेशिअन सटायर" लेक्चर दरम्यान त्याचा आणि बोकॅसिओचे उल्लेख जरूर करत. एका लेक्चररच्या दृष्टीने शहराजादीच्या १००१ अरेबियन नाईट्स हा देखील सटायर गटातच येतो.

आचार्य अत्रे यांची 'झेंडूची फुले' हा मराठी भाषेतील 'सटायर' चा एक दणदणीत मैलाचा दगड, तर दत्तू बांदेकरांचे वृत्तपत्रीय विनोदी लिखाण हा 'अ‍ॅलेगोरी' चे उत्कृष्ठ उदाहरण ठरावे.

"अ‍ॅलेगोरी" - अन्योक्तीरुपक विनोद ~ हा प्रकारही सामाजिक/राजकीय व्यंग दर्शविण्यासाठी प्रभावीपणे वापरता येतो....जरी मराठीत तो क्वचितच वापरल्याची उदाहरणे सापडतील. टॉल्कीनची गाजलेली 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' ही मालिका खरे तर जागतिक महायुद्धाची भीषणता दाखविणारी अ‍ॅलेगोरी आहे, जरी त्यात विनोदाचा शिडकावा नसला तरी.

पु.ल.देशपांडे यांचा 'खुर्च्या....एक न नाट्य' हे मराठीतील अ‍ॅलेगोरीचे छान उदाहरण होऊ शकते.

तुम्ही प्रतिसादात दिलेल्या नाटकातील विनोदाची अशी जातकुळी सांगता येईल ? म्हणजे दुसर्‍या शब्दात विचारायचे झाल्यास त्या त्या नाटकातील विनोद आपल्याला कोणत्या गटात घेता येईल ? जेणेकरून अभ्यासकाला ते उपयुक्त होईल. तुम्ही उल्लेखलेली सर्वच नाटके आता पाहाता येणार नाहीत हे तर स्पष्टच आहे.

@ मुंगेरीलाल
"त्यामुळंच त्याच्याविषयीची चर्चा गंभीरतेकडे झुकली तर हरकत नाही...."

~ सहमत. खूप सखोल असा हा 'विनोद पुराण' विषय आहे. त्यावर सर्व बाजूंनी सविस्तर चर्चा होणे रोचक ठरू शकेल.

अशोक, या बहुतेक नाटकात मिस्टेकन आयडी असा प्रयोग होता, पण कुठेही विनोद बीभत्स झालेला नव्हता.
आणि सगळ्यात जास्त श्रेय, त्या त्या कलाकारांचे.

उदा, लफडा सदन नाटकात, जयमाला इनामदार, रात्री प्रोग्राम आहे, या एकाच वाक्याने अनेकवेळा धमाल उडवत असत.
हा तेरावा मधे, दोन म्हातार्‍या, खून करुन आपण त्या जीवाला मुक्ती देतोय, अश्या प्रामाणिक भावनेने खून करत असतात.
बे दुणे पाच मधे प्रशांत दामलेच्या, ५ भुमिका असत, आणि त्यापैकी ३ जण एकाच वेळी स्टेजवर असत.
जादू तेरी नजर, मिडसमर नाईट्स ड्रीम चे रुपांतर होते ( याचेच ऐन वसंतात अर्ध्या रात्री, असेही एक गंभीर रुपांतर आले होते ) वटवट सावित्री मधे, एका प्राध्यापकाची आजी बायको आणि दिवंगत बायकोचे भूत, अशी जुगलबंदी होती.

खुप वर्षे झाली हि नाटके बघून, पण अजूनही आठवणी ताज्या आहेत.

हिंदीमधे, देवेन वर्मा, कुठलेही अंगविक्षेप न करता, केवळ मुद्राभिनयाने उत्तम विनोद सादर करत असे.

इधर उधर नावाची एक धमाल विनोदी मालिका होती ( रत्ना पाठक, सुप्रिया पाठक, टॉम आल्टर, लिलिपूट, दिना पाठक ) पण ती मधेच बंद पडली. मग परत सुरु पण झाली होती.

येस मिनिस्टर पण अशीच दर्जा राखून केलेली मालिका.

सटायर फटायर हे लोकसत्तामधले, शआफत खान, यांचे सदर आहे.

मालिकांमधे.. ....जबान संभालके आणि देख भाई देख या सुध्दा चांगल्या होत्या...... विनोदाची अचुक टायमिंग च्या जोरावर या मालिकेंनी दर्शकांची मने जिंकलेली.....
.
टायमिंग चा उल्लेख आलेलाच आहे तर....पाकिस्तानी रंगमंच नट... उमर शरिफ.... याचे सुध्दा विनोदाचे टायमिंग अफाट होते......त्याचे : बुढ्ढा घर पर है: हा डायलॉग तर फेमसच झालेला ( यावरुन सुदेश भोसले अभिनित एक नाटक ही आलेले)

ये जो है जिंदगी ( शफी इनामदार, स्वरुप संपत, राकेश बेदी आणि सतीश शाह ) शेवटपर्यंत दर्जा राखून होती.

थॅन्क्स मैत्रेयी....खरं सांगायचे झाल्यास 'विनोद' हा असा एक विषय आहे की याला जगात सर्वत्र स्थान आहे....मानवी जीवन दु:खाने भरलेले असणे हे जरी नैसर्गिक असले तरी त्याची तीव्रता कमी करण्यामध्ये विनोदाने जितके बहुमोल कार्य केले आहे तितके औषधही करू शकत नाही....आणि त्यामुळेच विनोदाच्या नवनवीन पताका नित्यदिनी उलगडलेल्या आपण पाहतोच....हा एक निर्विष असा मार्ग आहे आपल्या रोजच्या उलाढालीत शीतलता आणण्यासाठी. तुमचा लेखही चांगल्याच लेखन उंचीचा असल्याने सदस्य प्रतिसादही त्याच पातळीचा देत आहेत असे चित्र इथे दिसत्ये.

@ दिनेश ~

तुम्ही म्हणता तसे वरीलपैकी कोणत्याही नाटकात विनोदाची पातळी बिभत्सरसाच्या जवळ गेली नसेल तर मग ती आपल्या नाट्यपरंपरेची पुण्याई होय. अत्रे यांच्या 'साष्टांग नमस्कार', 'लग्नाची बेडी', 'मोरुची मावशी' तसेच पु.लं. च्या 'तुझे आहे तुजपाशी' या नाटकात विनोदाचे स्थान प्रामुख्याने जरी नसले तरी त्यातील विनोदाच्या पेरणीनेच सार्‍या महाराष्ट्राला जिंकले होते. विनोदाला बिभत्स रूप दिले ते दादा कोंडके यांच्या चित्रपटातील द्वर्थी संवादांनी {पण, समाजातील एका विशिष्ट वर्गाला ते भलतेच पसंत पडल्याचे दिसल्यावर 'विनोद' = अश्लिलतेची पेरणी असाच समास सुटत गेला....आणि मग तर ते प्रकरण हाताबाहेर गेले...असो, हा विषय वेगळा होईल.]

देवेन वर्मा यांचा छान उल्लेख केला आहे तुम्ही. अतिशय 'टॅलेन्टेड' अशी ही व्यक्ती. त्याने साकारलेल्या बहादुर या 'अंगुर' मधील धमाल भूमिकेचे संजीवकुमारच्या मुख्य भूमिकेपेक्षा कौतुक झाले होते. त्याबद्दल तबस्सुम यानी दूरदर्शनवरील एका कार्यक्रमात देवेन वर्माला निमंत्रित केले होते. त्यावेळी त्याने 'आपल्यावर नॉर्मन विज्डम या ब्रिटिश विनोदवीराचा फार प्रभाव आहे' अशी कबुली दिली आहे. नॉर्मनची अभिनयाची जातकुळीही याच धर्तीची....विनम्रतेने केलेले विनोद.... होती.

सटायरचा उल्लेख आला आहेच, त्या अनुषंगाने बब्बन खान यांचे 'अद्रक के पंजे' हा एकपात्री धमाल नाट्यप्रयोग तुम्ही पाहिला आहे ? गॉश्श.....गिनेश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती बब्बन खान यांच्या या 'पोलिटिकल सोशल सटायर' ची.

अशोक. - सटायर व अ‍ॅलेगोरी बद्द्लच्या माहितीबद्दल धन्यवाद. पुलंचे 'गच्चीसह- झालीच पाहिजे' हे मला कायम 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' या घोषणेवर व एकूणच त्या चळवळीवर भाष्य होते असे वाटत आलेले आहे. ते खरे आहे का आणि हा प्रकार अ‍ॅलेगोरी मधे बसेल का?

दुसरे म्हणजे मग अ‍ॅनिमल फार्म ही त्यात बसते का?

मैत्रेयी - लेख आवडला. चांगला विषय चालू केला आहेस Happy

थॅन्क फारएण्ड....'अ‍ॅनिमल फार्म' ला या धाग्यात आणल्याबद्दल. जॉर्ज ऑर्वेलची ही अशी एक कादंबरी आहे की जी 'इंग्रजी' विषय घेऊन पदवी/पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणार्‍यांच्या मार्गात या ना त्या निमित्ताने येतेच. जगभरातील जवळपास सर्वच विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अ‍ॅनिमल फार्मचा समावेश झालेला दिसेल....अपवाद फक्त रशिया आणि क्युबा...तिथे या कादंबरीवर बंदी अगदी प्रकाशनाच्या सालापासून आहे.

त्याला कारण ऑर्वेलने कादंबरीसाठी निवडलेला अ‍ॅलेगोरी फॉर्म. यातील दोन पात्रे "नेपोलिअन" आणि 'स्नोबॉल' ही दोन डुकरे 'मोअर दॅन नेसेसरी इंटेलिजन्ट' ["सिम्बॉलिझम सेटिंग" दाखविता येते].... दाखविली असून ऑर्वेलने त्यासाठी अनुक्रमे रशियाचा सर्वेसर्वा 'जोसेफ स्टालिन' आणि 'लीआँ ट्रॉटस्की' याना नजरेसमोर धरले होते आणि रशियातील १९१७ ते १९४२ दरम्यानची राजकीय लष्करी उलाढाल.

२. ....आणि हो....'गच्चीसह झालीच पाहिजे....' ह्या पुलंच्या लेखालादेखील अ‍ॅलेगोरी कॅटेगरीत जरूर बसविता येईल. तरीही अ‍ॅलेगोरी म्हटले की 'इंटुकां' वर केलेली दाहक टीका जशी अपेक्षित असते तिचा लवलेश मात्र 'गच्ची...' त नाही, त्याला कारणही हेच की पु.लं. ना प्रथम 'चाळीतील जीवन' रंगवायचे होते आणि त्या अनुषंगाने येणारे किरकोळ पॉलिटिक्स.

'बोचरा विनोद' ही राजकीय खिल्लीसाठी कसा वापरता येतो त्यासाठी 'अ‍ॅनिमल फार्म' हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

'गच्ची' मधले बाबा बर्वे, 'डायरेक्ट अ‍ॅक्शन घ्यायला पाहिजे' म्हणणारे बाबुकाका खरे, मेंढे पाटील व शेवटी फायदे उपटणाते ते त्या भय्याचे लोक यात बरेच त्या चळवळीतील व मुंबईतील काही त्यावेळच्या व्यक्तींमधे साम्य वाटते.

गच्ची वाचताना तर हसवतेच पण पुलंच्या कथाकथनाच्या जबरदस्त ताकदीमुळे ऐकताना कितीतरी जास्त परिणामकारक होते. कितीही वेळा ऐकले तरी ते बाबा बर्वे 'वेदकालीन जंगलात' जाऊ लागल्यावर तो एकजण थोड्या कोकणी हेलात 'अरे पण गच्चीचा काय? हा हे काय बोलतोय?' म्हणतो तेव्हा हसू आवरत नाही.

अशोकजी

चार्ली चॅप्लीनच्या सिनेमात कायिक विनोद प्रामुख्याने होता. त्यातही एकमेकांना दिलेल्या स्लॅप्स ( अगदी घाऊक प्रमाणात ) आणि त्याच्या हातात कायम दिसलेल्या स्टिकच्या सहाय्याने केलेल्या करामती या आजही हसवतात. यावरून तर हे नाव नसेल ना पडलेले ?

मैत्रेयी.....

'स्लॅपस्टिक' नामाची पूर्वपिठीका चार्ली चॅप्लिनच्याही अगोदर पासून आहे. ती रुढ होती 'सर्कस' या मनोरंजन प्रकारात. तुम्ही एकदा तरी सर्कस पाहिली असेल असे गृहित धरतो. तेथील अक्राळविक्राळ वन्य पशूंना....सिंह, वाघ, अस्वल आदीं... लिलया खेळविणारा एक रिंगमास्टर असतो. त्याच्या हाती चाबूक असतो ज्याच्या फट्क्यांच्या आवाजाने ते वाघसिंह नेमून दिलेल्या करामती त्या वर्तुळात करीत असतात. तुमच्या लक्षात येईल की रिंगमास्टर कधीही त्या चाबकाचा फटकारा त्या प्राण्यांच्या अंगावर टाकत नाही......मारायची वेळ आलीच तर मग डाव्या हातात असलेल्या वेताच्या छडीने हलकेच एक 'स्लॅप' मारायाची....ती आपल्या पंजात पकडण्यचा प्रयत्न एखादा सिंह करतोच......

....त्याचवेळी त्याची करामत पाहून वर्तुळाबाहेरील विदूषक अगदी तसाच अवतार करून आपल्याकडील 'स्टिक' चा 'स्लॅपिंग' साठी वापर आजुबाजूच्या ज्युनिअर्सवर करतो....मग ती मंडळी उगाचच 'मला फार लागले, रे लागले....' असा धिंगाणा घालतात.....प्रेक्षक खूष.

अशा त्या स्टिकचा स्लॅपसाठी मनोरंजनात्मक उपयोग होत असे....तीच पद्धत मग अन्य क्षेत्रातही 'खोटी खोटी भीती' दाखविण्यासाठीही होऊ लागला....चार्लीने ती छडी आपल्या दुडक्या-तिडक्या चालीसाठीही उपयोगात आणल्यावर ती जशी लोकप्रिय झाली, तद्वतच 'स्लॅपस्टिक' संज्ञाही.

अशोकजी, सा. दंडवत Happy

फारएण्ड, मुंगेरीलाल, विनिता, नितीनचंद्र, अतुलनीय धन्यवाद.

विनोदाच्या बाबतीत महाराष्ट्र आणि इतर प्रांतातही फरक दिसतो. दक्षिणेकडे सिनेमामधून मोठ्या प्रमाणात बालिश विनोद दिसतो. अर्थात तिथे तो लोकप्रिय असल्याने आपल्याला तक्रार असण्याचं कारण नाही. महाराष्ट्राला एकेकाळी विनोदाचं वावडं होतं त्या काळात आचार्य अत्रेंनी विनोद रूजवला. लेखात त्यांचं विस्मरण झाल्याबद्दल वाचकांनी क्षमा करावी. अर्थात इथे लेखक आणि त्यांचं साहीत्य यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न नाही.

Maitreyee Bhagwat,

चांगला मुद्देसूद आणि माहीतीपूर्ण लेख. विनोदाची व्याप्ती एव्हढी आहे की लेख सैलपणे विस्तारण्याचा धोका होता. पण तुम्ही योग्य रीतीने काबूत ठेवला! Happy

अशोकरावांचे अभिप्रायात्मक प्रतिसादही वाचकांच्या आकलनात मोलाची भर घालतात.

खूप लोकांचं मत आहे की विसंगती हे विनोदाचं मूळ आहे. मला हे मत अगदी १००% पटतं. ही मायाच मुळी विरोध आणि विसंगतीयुक्त आहे. साहजिकच विनोद हे मायेचं प्रमुख अंग धरायला हरकत नसावी. (असं म्हणून मी आचरटपणा करायला मोकळा! :खोखो:) टवाळा आवडे विनोद असं समर्थ रामदास म्हणून गेले आहेत. पण टवाळक्या करू नयेत असं कुठेही म्हंटलं नाही! Lol

एक उदाहरण देतो. रामदासस्वामी जेव्हा नारायण ठोसर होते तेव्हाची गोष्ट. त्यांच्या गावच्या गवळ्याचं गावातील थोरामोठ्यांशी भांडण झालं. गवळी काही त्यांचं ऐकेना. त्यामुळे त्याला धडा शिकवला पाहिजे असं नारायण आणि त्याच्या माकडफौजेने ठरवलं. एके दिवशी गवळी काही कामानिमित्त गावाबाहेर गेला होता. नारायणाच्या बाळगोपाळ चमूने तो बरोब्बर मोका साधला. संध्याकाळी परत आला तेव्हा त्याला आपल्या म्हशींच्या ओरडण्याचा आवाज आला. कान देऊन ऐकलं तर तो आवाज धाब्यावरून येत होता. बाहेर जाऊन बघितलं तर गोठ्यातल्या म्हशी छपरावर गेलेल्या दिसत होत्या. तहानेने व्याकूळ झाल्याने हंबरत होत्या.

आता काय करावं बरं असा प्रश्न पडला. गावातले लोक मजा बघत होते. शेवटी एकाने सांगितलं की नारायणाला विचार म्हणून. नारायणाने बुजुर्गांची माफी मागण्याच्या अटीवर मदत करायचं कबूल केलं. यथावकाश गवळ्याने क्षमायाचना केली. त्यावर थोरामोठ्यांनी क्षमा केली. मग गवळीबुवा नारायणाकडे गेले. म्हशी कशा उतरवायच्या असं विचारलं.

नारायण म्हणाला की जश्या म्हशी चढवल्या तश्याच उतरवायच्या! असं म्हणून आपल्या सवंगड्यांना आदेश दिला. घटकाभरात घराच्या भिंतीपाशी दगडांची रास पडली. चांगली धाब्यापावेतो उंच होती. त्यावरून म्हशी चालत खाली आल्या. मग धोंडे गोळा करून जागा मोकळी केली.

ही गोष्ट ऐकल्यावर प्रचंड हसलो होतो. धाब्यावर म्हशी ही कल्पनाच मुळी पराकोटीची विसंगत आहे. हास्यामागील प्रेरणा ही टवाळकीयुक्त विसंगती आहे. यातून उत्पन्न झालेल्या विनोदाची जातकुळी (इंग्रजी व/वा भारतीय) काय आहे? पारंपारिक भारतीय पद्धतीने विनोदाची विभागणी केली गेली आहे का? तसं असेल तर हास्यरस आणि विनोद यांचा परस्परसंबंध काय आहे?

जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.

आ.न.,
-गा.पै.

मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे पण असेच एक निखळ विनोदी नाटक. मला वाटतं जितेंद्र जोशी यात भुमिका करत असे, पण मी बघितलेल्या प्रयोगात तो नव्हता. विषयच भन्नाट होता.

मी वर दिलीप प्रभावळकर यांच्या नाटकाचे नाव आठवत नाही असे लिहिले होते, त्याचे नाव चुक भूल द्यावी घ्यावी, एक वयस्कर गृहस्थ आपल्या पत्नीला, आपण केलेल्या फसवणुकीबद्द्ल कबूली द्यायचे ठरवतात आणि देतातही, पण त्यानंतर पत्नी अशी काही कबूली देते, कि सगळ्या फसवणुकी चिल्लर वाटाव्यात. प्रभावळकर आणि सुहास जोशी, मस्त भुमिका करत. शिवाय निर्मिती सावंतच्या ३ भुमिका होत्या त्यात.

दादा कोंडके यांचा उल्लेख केलात त्याबद्दल सहमत, पहिले २/३ चित्रपट बघितल्यावर, मी नंतरचे बघितलेच नाहीत.

००००

प्रकाश संतांचा, लंपन काही विनोदी म्हणता येणार नाही. पण त्याच्या सर्व कथा गुदगुदल्या करतात एवढे नक्की.