धबधब्यांची जत्रा!!!

Submitted by इंद्रधनुष्य on 17 August, 2011 - 09:12

गेली काही वर्षे राहुन गेलेल्या महत्वाच्या ट्रेक पैकी एक म्हणजे भीमाशंकर... त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातील प्रथम प्राधान्य असलेला ट्रेक. भीमाशंकर करणारे बहुतांश ट्रेकर्स शिडीघाट / गणेशघाटाचा पर्याय निवडतात... त्याला आम्ही कसे अपवाद ठरणार... पण सुन्याच्या 'Offbeat Sahyadri' या ग्रुपने नावाला साजेसा ऑफबिट मार्ग निवडला होता. भीमाशंकर व्हाया वाजंत्री घाट ते बैला घाट असा निराळाच घाट घातला होता.

नारळी पौर्णिमेचे पक्वान्न आणि रक्षाबंधनाचा आनंद पाठीशी घेऊन सगळे ट्रेकर्स रविवारी सकाळी ८ वाजता कर्जतला भेटण्यासाठी निघाले. मुंबईवरून सुटणार्‍या सकाळच्या दोन्ही कर्जत लोकल मधे फक्त आणि फक्त भीमाशंकरचेच ट्रेकर्स खच्चून भरले होते. कारण दुसर्‍या दिवशीची श्रावणी सोमवारच्या स्वातंत्र्यदिनाची सुट्टी सगळ्यांना भीमाशंकर गाठून सत्कारणी लावायची होती. भीमाशंकरला सोमवारी कुंभमेळा भरणार याची जणू खात्रीच झाली होती. त्यातल्या त्यात आमच्यासाठी समाधानाची बाब म्हणजे गणेश / शिडी घाटाने जाणारे ट्रेकर्स नेरळ मधे उतरले... त्यामुळे गाडी निम्म्या पेक्षा जास्त रिकामी झाली. मात्र कर्जत एस्टी स्टॅण्डवरील गर्दी पाहून आमच्या समाधानी चाकाची पार हवाच निघून गेली. आम्हाला खांडस मार्गे जामरूखला जाणारी एस्टी पकाडायची होती. पण साडे आठच्या एकाच एस्टीत खांडस मार्गे जाणार्‍या ट्रेकर्सची गर्दी पाहून आम्ही एस्टीने न जाण्याचा निर्णय घेतला. स्टँण्डच्या पलिकडे टमटमवाले वाटच पहात होते.

साधारण एक तासाच्या प्रवासा नंतर आम्ही जामरूख मधिल कामथ पाड्यात पोहचलो. सह्याद्रीच्या पायथ्याला बिलगून असलेल्या ह्या छोट्याश्या गावा बाहेर धबधब्यांची जणू जत्राच भरली होती. तो थंडगार नजारा पाहताच न कळतच प्रत्येकाच्या हातातले कॅमेरे क्लिकू लागले. पाड्यातील एका घरात चहा, पोह्यांचा कार्यक्रम शिजत होता. तो पर्यंत तोंड ओळख पार पडली. पुण्या वरून श्री आणि सौ सुन्या तर मुंबईवरून मी, गिरीविहार, रोहित अशी मायबोलीकरांची टिम सज्ज झाली.

प्रचि१

गरमागरम नाष्टा आटोपून निघोलो ते थेट रणतोंडी धबधब्याच्या दिशेने.
प्रचि२

उजवी कडे पेठ (कोठलीगड)चा किल्ला लक्ष वेधून घेत होता... तर समोरील कातळ कड्यांवरून दरीत झेपावणार रणतोंडीचा रांगडा गडी खुले आव्हान देत होता... ते रौद्रप्रतापी रूप न्याहाळत आम्ही धबधब्याच्या डावीकडून वाजंत्री घाटाकडे सरकलो. एका टेकडीवर मागे राहिलेल्या गलबतांची वाट पहात असताना मधुनच धुक्यात हरवलेल्या हिरव्या कातळ कड्यांचे विहंगम दृष्य नजरेस पडत होते. दरम्यान, या घाटाला वाजंत्री घाट नाव कश्यावरुन पडले असेल? यावर चर्चा सुरू झाली. त्याचे रोहितने दिलेले उत्तर... "चोहो बाजुने वाजत गाजत कोसळणार्‍या धबधब्यांच्या आवाजामुळेच या घाटाला वाजंत्री घाट म्हणत असावेत".

प्रचि३

प्रचि४

प्रचि५

प्रचि६

प्रचि७

प्रचि८

घाट सुरू होताच उभा चढ चढताना हृदयांच्या ठोक्यांची नी पायांच्या वेगाची विषमता वाढू लागली. एका बेसावध क्षणी ढगांसारखा मोठ्ठा गडगडाट ऐकू आला. उजवी कडील कातळातील दरड कोसळताना पाहून क्षणभर का होईना पाय लटलटू लागले. जल्ला रोहितने त्याचेही प्रचि घेतले. :p एव्हाना मागे राहिलेल्या गलबतांचा धीर सुटला होता आणि त्यांनी सोबतीला आलेल्या वाटाड्या सोबत परतीचा मार्ग स्विकारला होता. ग्रुप मधे एक सुरत वरून खास सह्याद्री ट्रेकसाठी आलेला कॅमेरा बहाद्दर होता. फोटोच्या नादात हा वाट चुकला आणि त्याला शोधण्यात सुन्याची धांदल उडाली. त्यातच पुढे गेलेली तरुणाई दाट धुक्यामुळे दिसेना... त्यामुळे मधल्या फळीत रेंगाळणार्‍या आम्हा लोकांना दोन्ही आघाड्यांवर नजर ठेवत मार्गक्रमण करावे लागत होते.

प्रचि९

प्रचि१०

प्रचि११

प्रचि१२

घाटाच्या मध्यावर असताना डावीकडे पदरगडचा सुळका दिसत होता. पदरगडला पाठ करून थोड वर गेल्यावर खांडस कडिल दरीचा दाट धुक्यात हरवलेला भाग दिसत होता. दरीतून येणार्‍या भन्नाट वार्‍यामुळे तेथिल अरुंद वाटेवरून चढताना थोडी काळजी घ्यावी लागत होती. धुक्याचे साम्राज्य नसते तर त्या ठिकाणावर बराच वेळ रेंगाळता आले असते. साधारण साडे तीन तासांनी आम्ही वाजंत्री घाटाचा दरवाजा गाठला. घाटावरील विस्तृत पठारावर वार्‍याने तांडव मांडला होता. संपुर्ण चढाईत पावसाने हजेरी लावल्याने पठारावर येताच थंडीने अंग कुडकुडू लागले. शेवटच्या फळीतील गळंदाजांना घेऊन आम्ही खेतोबाच्या देवाळ कडे निघालो. मात्र वार्‍याच्या मार्‍यामुळे बिनीचे जलंदाज तेथून कधीचे पसार झाले होते.

प्रचि१३

प्रचि१४

प्रचि१५

वाटेत एका ठिकाणी घरगुती जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला होता. रोहितच्या आईने सकाळी तयार केलेल्या पोळ्या आणि गवारीची भाजी... सुधिरच्या आईने बनविलेला मसाले भात आणि तिखट पुर्‍या, कोणी पुरणपोळी तर कोणी शेंगदाण्याची चटणी... सगळे आत्मे तृप्त झाले.

पुढे एक ओढा पार करून अर्धा तासात भोरगिरीच्या एका पाड्यात मुक्कामाला थांबलो. नुकताच पार केलेल्या ओढ्याची आठवण ताजी असताना थकलेल्या जिवांनी श्रमपरिहारासाठी थंडगार पाण्यात डुंबण्याचा मनोदय अंमलात आणला.

रात्रीचे जेवण आटोपून झाल्यावर झोपेच्या जागेसाठी संगित खुर्चीचा खेळ सुरू झाला. कारण त्या पाड्यात मोजकीच चार पाच घरे होती आणि ज्या घरात आम्ही २० जण उतरलो होतो तेथे त्यांच कुटुंब मिळुन एकूण ३० माणसांना जागा करायची होती. दुसर्‍या दिवशी निघताना आम्हाला सामावून घेणार्‍या त्या कुटुंबाचे सगळ्यांनी मनापासून आभार मानले. सुन्याने त्या घरातील एक वर्षाच्या गौरवला कडेवर खेळवून आपली हौस भागवून घेतली.

प्रचि१६

प्रचि१७

सकाळी भरपेट नाष्टा केल्यावर सगळे धारकरी आपल्या अंतिम लक्षाकडे निघाले. वाटेतील दोन मोठे ओहोळ पार केल्यावर ग्रुप फोटो साठी सगळे एकत्र जमले. संधी मिळताच मायबोलीकरांनी तेथेही उड्या मारल्याच.

प्रचि१८

प्रचि१९

प्रचि२०

प्रचि२१

प्रचि२२

प्रचि२३

प्रचि२४

प्रचि२५

प्रचि२६

तासा भरातच गुप्त भीमाशंकरला पोहचलो. तिथे धबधब्यावर मात्र भाविकांची गर्दी लोटली होती. ती गर्दी पाहुन कालच्या दिवसातल्या एकांताला अचानक तडा गेल्याचे जाणवले. दर्शन घेऊन भीमाशंकर मंदिराकडे वाटचाल केली. तिर्थक्षेत्रांच्या परिसरातील घाण पाहून मन विषण्ण झाले. श्रावणी सोमवार असल्यामुळे दर्शनाच्या रांगेला ४-५ तासांचा वेळ लागत होता. पुरेसा वेळ नसल्यामुळे आम्ही दर्शन न घेताच निघायचे ठरवले. दुसर्‍याही दिवशी पावसाची हजेरी कायम होती.

प्रचि२७

एस्टी स्टॅण्ड जवळील एका टपरीवर भजी आणि चहा झाला. ऑफबीटच्या परंपरेला अनुसरून गणेश किंवा शिडी घाटाने न उतरता बैला घाटाने उतरण्यास सुरवात केली. मात्र या घाटाने बरेच भाविक येत होते. अरुंद वाटेमुळे थांबत रस्ता देत पुढे सरकत होतो. संततधार पावसाने या वाटेवरही धबधब्यांची पखरण केली होती. पहिला कडा उतरल्यावर पुढिल वाट तर चक्क ओढ्यातूनच उतरायची होती. जस जसे खाली येऊ लागलो तसे धुके कमी होऊ लागले.

प्रचि२८

सह्यकड्यावरील धबधबे नजरा वेधून घेऊ लागले.

प्रचि२९

प्रचि३०

अश्याच एका धबधब्यात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला.

प्रचि३१

प्रचि३२

एव्हाना पोटात कावळे ओरडू लागले होते. जेवण सुरू करणार इतक्यातच पाऊस हजर... मग काय छत्री लंच सुरू झाला.

प्रचि३३

बैला घाटाने नांदगावात पोहचायला आम्हाला तिन तास लागले. तेथून टमटम पकडून कर्जत गाठले.

भीमाशंकरचा ऑफबीटने ठरवलेला वाजंत्री घाटातील चढाईचा आणि बैला घाटाने उतरण्याचा अनुभव फारच सुंदर होता. अश्याच ऑफबीट रुटने पुढिल ट्रेक करण्याचा मानस बोलून दाखवून आम्ही निरोप घेतला.

प्रचि३४

प्रचिकार : गिरीविहार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिव्हलयस इंद्रा ... Happy
गिरी फोटु छान आलेत...
खरच या आडवाटांने भिमाशंकर चढणे म्हणजे एक वेगळीच मजा आली.
माझेही फोटू टाकेन लवकरच...

मस्तच इंद्रा.
झक्कास माहीती आणि प्रकाशचित्रपण....:स्मित:
धबधब्यातील पाण्याच्या आवाजाने गुंजत असतो म्हणून वाजंत्री घाट

ब्येष्ट!!!
प्रचि २६ लईच भारी!!
मी घरी गेल्यामुळे मिस्ला ट्रेक.. पण जल्ला यो कुठे उलथला होता मुंबईत?? हा कसा काय हुकवला त्याने??

पण जल्ला यो कुठे उलथला होता मुंबईत?? हा कसा काय हुकवला त्याने?? >> आता असे फालतू प्रश्न विचारायचे नाहीत... Proud मन सांगते एक.. करावे लागणार एक... Wink

इंद्रा.. मस्त चिंब चिंब लिहिलेस..
गिरी.. मस्त फोटोज..
रो.मा.. तू पण टाक रे लवकर.. याचवर्षी. Wink

बाकी काही वाचायच्या आधीच फोटो पाहिला आणि दुसराच प्रचि पाहून गार झालो...
बाप...केवळ बाप फोटो...बाकी अजूनही असतील त्यासाठी वेगळा प्रतिसाद देतो. पण हा खासच...काय जमलाय लेका...

इंद्रा जबरदस्त व्रुत्तांत...
थरारक ट्रेक... रणतोंडी धबधबा...वाजंत्री घाट्....धुक्यातील धबधब्याची वाट्...कोसळलेली दरड्...जोरदार वारा...ओढ्यातली आंघोळ्...धु़क्यातल्या उड्या...धबधब्यातली मजा... सगळं मस्त...:-)

सिद्धगड ते पदरगड डोंगररांग...

Pages