आमची ती एक कथा

Submitted by rkjumle on 17 August, 2011 - 06:24

मला कोणीतरी विचारले, “आम्ही खूप दिवसापासून पाहत आहे की, तुम्ही व पुष्पांजली एकमेकांशी बोलत नाहीत. एकमेकांच्या घरी जात नाही्त. काय रहस्य आहे त्यात? आम्हाला कळेल कां?”
मी म्हणालो, “हाच प्रश्‍न तुम्ही पुष्पांजलीला विचारला कां?”
“होय विचारला... पण ती चुप राहिली. काहीच बोलली नाही. म्हणुन तुम्हाला विचारत आहे.”
“मी पण सांगू शकत नाही. कारण आम्ही तसे ठरविले आहे.”
“तुम्ही जर सांगितले नाही तर ते शेवटपर्यंत रहस्यच राही्ल.”
मी थोडावेळ काहीच बोललो नाही. विचारांत गढून गेलो. मला वाटले, खरंच आहे. या जगातून निघून गेल्यानंतर ते एक नेहमीसाठी गुढच राहील.
“ठीक आहे.... आमची ती एक कथा मी तुम्हाला सांगत आहे....” अस म्हणून मी कथा सांगण्यास सुरुवात केली.
रात्रीला नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर लोकांच्या घोळ्क्यात मी झोपलो होतो. झोप कसली, नुसते आंग टाकले होते! डोक्यात अनेक विचाराने थैमान घातले होते. त्यामूळे डोळा काही केल्या लागत नव्हता. परत ते थंडीचे दिवसं होते. माझं सर्वांग थाटरत चालले होते. थंडीपासून बचाव करण्यासाठी नाही माझ्याकडे मफलर होते ना स्वेटर... कुडकुडत्या थंडीत कशी तरी रात्र काढली.
सकाळ झाल्याची जानिव होताच मी उठून बसलो. जाणार्‍या-येणार्‍या प्रवाश्यांची ये-जा सुरु झाली. प्रत्येकजन आपल्याच धुंदीत जात-येत होते. दुसर्‍याच्या व्यथांची कुणालाच काही देणे-घेणे नव्हते. असंच मानवी जीवन आहे, नाही कां? प्रत्येकजन आपल्याच व्यापात, गोतावळ्यात व वर्तूळात जगत असतो. कोणी कोणाकडे पाहत नाही. कोणी कोणाच्या व्यथा, दु:ख विचारत बसत नाही. प्रत्येकाला आप-आपले दु:ख भोगत राहावे लागते. स्वत:च्या कर्मामुळे किंवा दुसर्‍याच्या कर्माच्या परिणामामुळे त्याच्यावर दु:ख भोगण्याची पाळी येत असते. त्याच व्यथा, वेदना घेऊन तो जगत असतो.
सकाळी प्रातविधी करण्यासाठी मी लोकांच्या लाईनमध्ये उभा राहिलो. परत आंघोळ करण्यासाठी बाथरुमच्या लाईनमध्ये घुसलो. प्रातविधी व आंघोळ करतांना बॅग स्वत:जवळच ठेवावी लागत होती. कारण हीच तर माझी संपत्ती होती. म्हणून त्या बॅगला जिवापलीकडे जपत होतो.
तेथे कुठे घरच्यासारखे गरम पाणी? थंडगार पाण्याने आंघोळ आटोपून घेतली. त्यासाठी दिड रुपया मोजावा लागला. खर्च फार जपून करायला पाहिजे! कारण जवळ असलेले पैसे लवकर संपायला नको होते! आता मला पैशाची किंमत कळायला लागली होती. यानंतरचे असेच रोजचे जीवन मला जगावे लागेल कां, या विचाराने मी घाबरल्या सारखे झालो होतो. ही तर सुरुवात होती. आणखी बराच पुढला प्रवास करायचा होता!
घर सोडल्यानंतर पुढे माझे जीवन कसे घालवावे, ह्याचा विचार करण्यासाठी जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून मी त्या दिवशी नागपुरलाच थांबणार होतो.
मी सकाळी उठल्यावर रेल्वेच्या वेळा पाहिल्या. दिल्लीकडे जाण्याचा एक विचार माझ्या मनांत येऊन गेला. तेथून बाहेर गावंला जाणार्‍या गाडयांचा टाईमटेबल पाहिला. संध्याकाळी ४.३० च्या दरम्यान सुटणारी एक वेळ होती. रेल्वे तिकीटच्या कांऊटरची खिडकी अद्यापपर्यंत ऊघडली नव्हती. काही लोकं आजुबाजूला अजुनही झोपलेलेच होते. मी बसण्यासाठी एकांत स्थळ शोधत होतो.
रात्रीच्या घटनेने पुष्पांजलीची मानसिक अवस्था अत्यंत विचलित झाली होती. माझ्यावरील विश्वासाला अनेक तडा गेल्या होत्या. त्याच्या ठिकर्‍या ठिकर्‍या झाल्या होत्या. तिच्या सासरच्या एस.टी. स्‍टॅंडवर पोहचेपर्यंत ती निस्तब्ध राहिली. यावरुन तिच्या विमनस्क स्थितीचा मला अंदाज आला होता.
मी तर दवाखाण्यामध्ये माझ्या पत्‍नीने लोकांच्या व मामीजींसमोर केलेया पानऊतार्‍यामूळे पार हादरून गेलो होतो. त्यानंतर पुष्पांजलीच्या संबंधात घडलेल्या घटनेने तर माझी मनस्थिति दुहेरी दडपणामूळे कोलमडून गेली होती. मला पुष्पांजलीसोबत धड बोलणे सुध्दा जमत नव्हते. मी तिची क्षमायाचना करण्याचा प्रयत्‍न करीत होतो.. परंतु ती काहीच बोलत नव्हती. मी माझ्या मनातल्या व्यथा तिला कसे सांगू तेच कळत नव्हते.
मी रात्री, ती आंतमधल्या खोलीमध्ये झोपली असतांना तिच्याजवळ गेलो होतो. एवढीच घटना तिच्या मनाने घर करुन घेतली होती. मी कोणत्या अवस्थेमध्ये तिच्याजवळ आलो होतो याची तीला काहीच कल्पना नव्हती. मला सुध्दा ते सांगण्याची कोणतीही संधी मिळत नव्हती. सकाळी मी तिला ऊठविण्यास गेलो तेव्हा ती तोंडावर पांघरुन घेऊन रडत होती. मला अपराधीपणाची जाणीव बोचत होती. मला काहीच सुचत नव्हते. मी केलेल्या अपराधीपणाचं प्रायश्चित घेण्याचं पक्क केलं.
मी सकाळी चहा केला.
‘दवाखाण्यात चहा नेवून मामीजींना घेऊन येतो. त्यानंतर तुला गांवला पोहचवून देईन’ असे सांगून मी बाहेर पडलो.
दवाखाण्यातून मामीजींना घेऊन आलो. तेव्हा मी सुध्दा त्यांचे सोबतच घरात गेलो. माझ्या माघारी पुष्पांजली मामीजींना घडलेली परिस्थिती सांगेल अशी मला भिती वाटत होती. आम्ही घरात आलो. तेव्हा तिने जाण्याची तयारी केली होती. हे पाहून मामीजींना धक्काच बसला. त्यांना वाटले की, ‘मला दवाखाण्यामध्ये माझ्या व पुष्पांजलीच्या संशयीत संबंधाबाबत नको ते कुसुमांजली सर्वांच्या समोर बोलली, ते मी पुष्पांजलीला सांगितले असावे.’
पुष्पांजली ही कुसुमांजलीची लहान बहिन. म्हणजेच माझी साळी. कुसुमांजली आमच्या दोघाकडे नेहमीच संशयी नजरेने पाहत असे.
मागे पुष्पांजली वैद्यकिय उपचारासाठी आमचेकडे आली होती.
त्यावेळेस ती स्पष्टच बोलली, ‘ तुच यांच्याजवळ राहा. मी निघून जाते.’
तेव्हा पुष्पांजली खुप रडली होती.
‘यानंतर मी तुमच्या घरी येणार नाही.’ असे तिने म्हटले होते.
त्यावेळेस तिला समजाविले होते की, ‘तू तुझ्या आजाराकडे पहा. कुसुमांजलीचे बोलणे मनावर घेऊ नको.’
परंतु यावेळेस ती स्वत:च आजारी पडली होती. कमरेचे दुखणे ऊमळले होते. काही दिवसापूर्वी मी तिला सायकल शिकवितांना खाली पडली होती. तेव्हापासून तिला कमरेचा आजार जडला होता. ट्रॅक्‍शन घेण्यासाठी व इतर औषधोपचारासाठी तिला शासकिय दवाखाण्यामध्ये भरती करावे लागले होते.
नेमके त्याचवेळेस पुष्पांजली व तिचे पती तिच्या वैद्यकिय उपचारासाठी आमचेकडे आले होते. उपचार घेतल्यानंतर आमच्या स्वयंपाकाबाबत अडचण पाहून तिच्या पतीने तिला थांबण्यास सांगितले होते.
मी दवाखाण्यात जेवण, चहा व इतर उपयोगी वस्तू नेवून देत होतो. तेव्हा कुसुमांजली माझ्याशी धड बोलत नव्हती. ऊलट दोनदा तिने जेवण सुध्दा घेतले नव्हते. तसाच जेवणाचा डब्बा मला परत न्यावा लागला होता. म्हणून तिच्या सोबत कोणीतरी जवळचे असावे यासाठी मी मामींजीना गांवला जाऊन घेऊन आलो होतो.
त्यादिवशी दुपारी मामींजीना घेऊन मी दवाखाण्यात गेलो.
‘पुष्पांजली गेली काय?’ असे कुसुमांजलीने विचारले.
‘पुष्पांजली सकाळीच गेली.’ अशी खोटी माहिती मामींजीनी तिला सांगितले. ‘गाडीवर पोहचवून दिले असेल.’ असे कुत्सितपणे तिने मला टोमणा मारलाच! ती पुष्पांजली व माझ्यावर संशय घेते म्हणून मामींजीनी खोटेच सांगितले असावे असे मला वाटले.
पण खोटे कधी लपून राहत नाही असे म्हणतात! तेच येथे घडले होते. संध्याकाळी मी जेवणाचा डब्बा घेऊन गेलो.
कुसुमांजलीने मला विचारले, “डब्बा कोणी बनविला.?”
मी काहीच बोललो नाही.
त्यामूळे तिचा संशय बळावला. मी चूप राहील्यामुळे पुष्पांजली गेली नाही, हे तिने ओळ्खले असावे. मला वाटले कदाचीत मामींजीनी तिला समजावीले असेल व पुष्पांजली गेली नसल्याचे तिला सांगितले असावे.
ती रागातीरेकाने लालबूंद झाली होती. वार्डमध्येच ती माझ्यावर अतोनात भडकली. सर्व पेशंट आमच्याकडे पाहत होते. त्यावेळेस मामींजी तिच्या बेडजवळ नव्हत्या. ती आणखी बोलू नये म्हणून घाईघाईने मी बाहेर आलो. बाहेर येऊन मी गाडीचे कुलुप काढत असतांना ती माझ्या मागोमाग आली व मला अद्वातद्वा बोलायला लागली.
मी मामीजींना आणण्यासाठी वार्डमध्ये गेलो व त्यांना घेऊन आलो. तेव्हा त्यांना सुध्दा ती आवरत नव्हती. शेवटी त्या हतबल झाल्यात. काय भानगड आहे, म्हणून जाणारे-य़ेणारे लोकं थबकायचे. कोणी दूरुनच तर कॊणी खिडकीतून कान देऊन ऎकत होते. बराच वेळ झाल्यावर ती बेडवर नव्हती व तिचे जिव्हारी लागणारे बोलणे ऎकून कदाचित माझा सुध्दा तोल जाऊ शकतो अशी मला धास्ती वाटत होती. म्हणून मी स्वत:वर नियंत्रण ठेवण्याचा आटोकाट प्रयत्‍न करीत होतो. अत्यंत नरमाईने, मूकाटयाने तिचे ते कडवट बोलणे सहन करीत, तिची क्षमा मागत मागत कसे तरी तिला बेडपर्यंत पोहचवीले.
परंतू मला धमकी दिली की, ‘याबाबत पुष्पांजलीला काहीच सांगू नका.’
ह्या प्रकरणानंतर मी पार कोलमडून गेलो होतो.
दवाखाण्यातील हा दुसरा प्रसंग होता. तिला भरती केल्यानंतर मी लहान भावाला तो स्वत: डॉक्‍टर असल्यामूळे पत्र लिहले होते. दवाखाण्यातील त्याच्या डॉक्‍टर मित्रांकडून तिच्याकडे विशेष लक्ष देण्यास मदत होईल असा माझा पत्र लिहण्यामागे उद्देश होता. मात्र तिला हे आवडले नव्हते! ह्या बाबतीत ती मला वाटेल ते बोलली. त्याचे शिक्षणासाठी आम्ही अत्यंत आर्थिक अडचणीमधून गेलो होतो. त्यामूळे तिला कदाचीत चिड येत असावी.
त्याचप्रमाणे मी दवाखाण्यात येण्या-जाण्यासाठी भाऊजींची गाडी (मोपेड) आणली होती. मी गाडीवर पुष्पांजलीला घेऊन फिरवीत असावे असा तिला संशय आला होता. म्हणून दवाखाण्यामध्ये हजर असलेल्या लोकांसमोर मी भावाला पत्र कां लिहीले व भाऊजींकडून गाडी कां आणली यावरुन ती मला रागावत होती.
हा प्रसंग मी सहन केला. परंतू दुसरे हे प्रकरण मला सहन होण्याच्या पलिकडचे होते. माझी मनस्थिती अत्यंत खराब झाली होती.
ह्या प्रसंगामूळे माझ्या मनावरचा तोल जाऊन आता मला हयापूढे जीवन जगण्यात काही अर्थ नाही असे राहून राहून वाटत होते. म्हणून त्या रात्री आपली जीवनयात्रा संपवावी असे पक्के ठरविले होते. परंतू त्यापुर्वी आपले मन पुष्पांजलीकडे मोकळे करावे असे वाटत होते.
घरी येतांना रस्त्याच्या बाजूने असलेल्या सार्वजनिक विहिरीमध्ये ऊडी टाकून जीव द्यावा असा विचार मी मनोमन केला होता. त्यापुर्वी त्याच विहिरीमध्ये काही लोकांनी जीव दिल्याचे मी पाहिले होते. जीव देण्याचा विचार मनात थैमान करीत असतांना मी कसातरी घरी पोहोचलो.
घरी पोहचलो तेव्हा खुप रात्र झाली होती. घरी सर्वजन झोपले होते. पुष्पांजली आंत मधल्या खोलीत तर मुले, वडील व कामानिमित्त आलेला माझा मोठा भाऊ बाहेरच्या खोलीत झोपले होते. मी जेवण न करताच बाहेरच्या खोलीत आंग टाकले. झोप लागत नव्हती. पुष्पांजलीला कसे सांगावे हाच विचार मनात घोळत होता. इतके लोकं घरांत असतांना मी तिच्याशी कसे बोलणार? कुणाला ऎकु गेले तर? काही सुचत नव्हते.
काही वेळाने दचकत दचकत मी आंतमधल्या खोलीत गेलो. त्यावेळी मला जाणवलं की, माझं मानसिक संतूलन बिघडत जात आहे. मनावरील ताबा ढळत आहे. विस्तवाजवळ ठेवलेल्या तुपासारखी माझी गत होत आहे.
कुसुमांजली सतत मला चोर असलेल्या नजरेने पाहत होती. चोर-चोर म्हणून माझ्यावर आरोप करीत राहायची.
एखाद्या व्यक्‍तिला तो चोर नसतांना सुध्दा त्याच्यावर कोणी सारखे चोरीचा आळ आणत असेल व त्याला तशी जर संधी मिळाली तर तो सुध्दा खरोखरच चोरी करायला मागे पुढे पाहत नाही, असे मी कोणत्यातरी कादंबरीमध्ये वाचले होते.
कोणताही पुरुष मुलत: साधू नसतो. त्याच्या शरीरात नेहमी सैतान वास करीत असतो. त्याला तशी संधी मिळाली तर तो सैतान आपला कार्यभाग ऊरकवून घेत असतो, असेही मी कोणत्यातरी कादंबरीमध्ये वाचले होते. ह्या गोष्टीचा मला प्रत्यय येत असल्याचे जाणवत होते.
म्हणून आता खरोखरच माझ्या अंगात चोर शिरला काय असे वाटत होते. कारण चोरी करुनच माझी जीवन यात्रा संपवावी असा सैतानी विचार माझ्या मनात चमकून गेला होता. परंतू त्यासाठी पुष्पांजलीचा कां म्हणून बळी घ्यावा ? हे सुध्दा मी विसरुन गेलो होतो. त्याच भरात मी पुष्पांजलीच्या शरिराला स्पर्ष केला. तशीच ती आगीचा चटका बसल्यासारखी दचकून उठली.
‘भाऊजी तुंम्ही ?’ असा प्रश्‍न करुन ती बाहेर गेली.
तिचा प्रश्‍न म्हणजे माझ्या कानशिलावर सनसनित थापड मारल्यासारखे वाटले.
मी भानावर आलो. झालेल्या प्रकाराने मी अतोनात लज्जित झालो. अपराधिपणाची भावना बोचायला लागली. मी भयानक घाबरुन गेलो. त्यामुळे सर्वांग कापायला लागलं दरदरुन घाम सूटला. घसा कोरडा पडत चालला होता. माझ्या हृदयाचे ठोके वाढत चालले होते. हे काय घडले माझ्या हातून ? अस सारखं वाटायला लागलं होतं.
ह्या अचानक उद्‍भवलेल्या प्रकरणाने आधिच्या प्रकरणाच्या आगीत आणखी तेल ओतले होते. एका प्रकरणाने आता दुसर्‍या नव्या प्रकरणाला जन्म दिला होता.
मी माझ्या जागेवर येऊन झोपलो. आता यापुढे आपले जीवन संपविण्याशिवाय दुसरा मार्गच ऊरला नव्ह्ता अशी माझी मनोभावना सांगत होती.
मामीजींना पाहून पुष्पांजली रडायला लागली. ‘पुष्पांजलीला सांगायला नको होते’ असे त्या मला म्हणाल्या.
त्यांना वाटले असेल की, ‘मी रात्रीचे प्रकरण पुष्पांजलीला सांगितले असावे. म्हणूनच ती रडत आहे.’ परंतू त्यांना काय माहीत की, हे प्रकरण वेगळेच आहे म्हणून! पुष्पांजलीने हे प्रकरण मामीजींना सांगायची हिम्मत केली नाही. कदाचीत मी तेथेच असल्यामूळे ती सांगू शकली नसेल. तरीही तिने, ‘या घरात सर्वच xxxx आहेत. आता यापुढे या घरांत मी कधीच येणार नाही.’ असे अत्यंत जळ्जळीत शब्द तीच्या तोडाबाहेर पडले.
कदाचीत तिचे हे बोलणे मामीजींच्या लक्षात आले किंवा नाही, कोण जाणे? मात्र तिचे हे बोलणे मला जिव्हारी लागत होते. काळजाला जाऊन भिडत होते. त्यामूळे मी अर्धमेला झालो होतो.
त्यानंतर तिने माझ्याशी बोलणे सोडून दिले.
तिला घेऊन मी एस,टी.स्टॅंड वर जाण्यास निघालो. वाटेत मी तिला अपराधी भावनेने क्षमायाचना करीत होतो.
‘यापुर्वी माझ्या हातून असा प्रमाद कधिही घडला नाही. मला काय झाले होते, ते काही कळत नाही. जीवनामध्ये मी फार मोठी चुक करुन बसलो आहे. मी याचे प्रायचित्त नक्कीच घेणार. तुला पोहचवून दिल्यानंतर मी माझ्या जीवाचे बरे-वाईट करीन. मी तुझी क्षमा मागायच्या लायकीचा नाही आणि तू काय म्हणून मला क्षमा करावी.?’
तरीही ती माझ्याशी काहीच बोलली नाही. तिचे मौनधारण मला काटे टोचल्यासारखे वाटत होते. ती काहीतरी बोलली असती तर मला हलके वाटले असते. तिच्या मनातला धगधगता वणवा काही केल्या शांत होत नव्हता.
तिचे सासरचे गांव विस किलोमीटर अंतरावर होते
एस.टी.स्टॅंड आल्यावर तिच्या सासरच्या गांवला जाणारी बस ऊभी होती. आम्ही त्या बसमध्ये चढलो. बस मध्येही ती काहीच बोलत नव्हती. त्यामुळे माझी सुध्दा तिच्याशी काही बोलायची इच्छा राहिली नव्हती. दोघेही अबोल झालो होतो.
गांव आल्यावर आम्ही बस मधून खाली उतरलो. तिच्या घराकडे जात असतांना मध्येच मी तिची सुटकेस खाली ठेवली.
तिला म्हणालो की, ‘आता तू जा. मी तुझ्या घरी येणार नाही. मी माझ्य घरी सुध्दा परत जाणार नाही. येथूनच मी कुठेतरी जाऊन माझ्या जीवाचे बरे-वाईट करणार आहे.’
तेव्हा तीचे शब्द माझ्यावर कानावर आले की, ‘नाही नाही भाऊजी, असे करु नका. तूम्ही तुमचा संसार उध्वस्त करु नका. माझी शपथ आहे तूम्हाला! मी हे प्रकरण कुणाला सांगणार नाही. जे काही झाले ते विसरून जा. मला माझ्या घरी पोहचवून द्या. नाहीतर माझे सासू-सासरे तु एकटीच कशी आली म्हणून मला बोलतील.’ ती एवढं बोलल्यामूळे माझ्या मनावरील तान थोडंफार ऊतरल्याचे जानवले.
मी म्हणालो की, ‘ठिक आहे. तुला घरापर्यंत पोहचवतो. परंतू तुझ्या घरी थांबणार नाही. तुला पोहचल्यावर मी तसाच परत निघेन.’ असे बोलून मी सुटकेस उचलली व जायला निघालो.
आता ती बोलकी झाली होती.
रस्त्याने जातांना ती म्हणाली, “आत्महत्या करु नका. तूम्ही जर तसे केले तर मी सुध्दा आत्महत्या करीन.” अशी तिने मला भिती घातली.
मी तिला म्हटले की, ‘तुझा यात काहीच दोष नाही. खरं तर मीच दोषी आहे. मला प्रायचित्त घेतलेच पाहिजे. आत्महत्येशिवाय मला दुसरा मार्ग दिसत नाही.’
तरीही ती मानायला तयार नव्हती. शेवटी तिने मला आत्महत्येपासून परावृत केलेच. तरीही घर सोडून मी कुठेतरी निघून जावे. हा मनातला विचार मात्र मी सोडला नाही. तिला याबाबत काहीच सांगितले नाही.
तिचे घर आले. मी तिची सुटकेस खाली ठेऊन माघारी जायला लागलो, तेव्हा तिने मला जेवून जाण्याचा आग्रह केला.. कचाचित तिच्या हातचे हे शेवटचे जेवण राहील म्हणून तिचा आग्रह मोडून तिला नाराज करु नये असे मला वाटले..
स्वयंपाक झाल्यावर मला जेवायला बोलावीले. मी जेवायला बसलो. ती जेवण वाढत होती. कदाचीत ती यापुढे मला कधीच वाढतांना दिसणार नाही याचे मला वैषम्य वाटत होते. तिच्या घरचे जेवण हे माझ्यासाठी शेवटेचेच होते!
जेवण करुन मी जायला निघालो.
ती, जवळ कोणी नाही असे पाहून मला म्हणाली, “भाउजी विसरुन जा”
मी जाण्याच्या घाईतच तिला म्हणालो “मी तुला पत्र पाठवीन.”
असे म्हणून मी तिचा शेवटचा निरोप घेतला.
मी मनातच म्हणालो की, ‘मी तुला खरं काय ते सांगू शकलो नाही, ते मी पत्राने निश्चितच कळवीन. म्हणजे माझे मन एकदाचे मोकळे तरी होईल. यानंतर आपली भेट होईल की नाही काही सांगता येत नाही.’
मी मागे वळून पाहिले. ती तेथेच ऊभी होती. माझ्या डोळयात आतापर्यंत साचलेले अश्रूचे थेंब तुंबलेल्या पाण्याचा बांध फुटल्यासारखा अचानक बाहेर आलेत. ते तिला दिसल्या की नाही माहिती नाही.
मी पुन्हा जायला लागलो. अश्रूच्या धारा तश्याच वाहत होत्या. त्यामुळे मला पुढचा रस्ता दिसेनासा झाला होता.
आता माझ्या पुढच्या जीवनात काय वाढून ठेवले असेल या विचाराने मी गांगरुन गेलो होतो. येथूनच मी कुठेतरी निघून जावे असे वाटत होते. पण कुठे जावे ते सुचत नव्हते. गोंधळलेल्या अवस्थेत मी एस.टी.स्टॅंडवर आलो.
‘अरे तु कुठे आला होतास.’ माझे त्या आवाजाकडे लक्ष गेले. पाहतो तर ते माझे भाऊजी होते.
‘पुष्पांजलीला तिच्या घरी आणून दिले’ असे मी त्यांना सांगितले. ते बाजूच्या गांवला शिक्षक होते. ते शाळेच्या गांवला घरुनच जाणे-येणे करीत होते. आज शनिवार असल्यामुळे सकाळ्ची शाळा करुन ते गांवला जायला निघाले होते.
एस.टी. बस आली. त्यांच्या सोबतच मी बस मध्ये चढलो. त्यांनीच माझी तिकिट काढली. त्यामूळे त्यांच्यासोबत मला गांवला परत येणे भाग पडले. नाहीतर मी येथूनच कुठेतरी निघून जायचा विचार करीत होतो.
प्रवासामध्ये मी विचारमग्न होतो. भाऊजींसोबत सुध्दा बोलायची ईच्छा होत नव्हती. मी विचार केला की, ‘आता परत तर आलोच आहे. तेव्हा घरी जाऊन जे काही असतील-नसतील तेवढे पैसे, कपडे व सामान घेऊन निघून जावे.’
स्टॅंडवर जायच्या आधीच्या स्टॉपवर मी बसमधून खाली उतरलो. भाऊजींना जातो म्हणून सांगितले. ते स्टॅंडवर जाणार होते. कारण त्यांचे घर तेथून जवळ होते.
तेथून मी पायीपायीच घरी आलो. कारण जास्त पैसे खर्च करणे मला आता परवडणारे नव्हते. मी येता येता पुढच्या योजना आखीत होतो.
पुष्पांजलीला दिलेल्या शब्दाप्रंमाणे मी आत्महत्येचा विचार सोडून दिला होता. कुठेतरी निघून जावे, एवढेच आता माझ्या हातात राहिले होते. या गांवावरुन रेल्वे जात नव्हती. म्हणून .येथून पहिल्यांदा रेल्वेच्या ठिकाणी जावे व तेथे जाऊनच पुढे कुठे जावे ते ठरवावे असा मी विचार केला.
घरी आलो तेव्हा मामीजी झोपल्या होत्या. त्याना दगदगीमूळे व त्रानामूळे बरे वाटत नव्हते असे त्यांनी सांगितले.
‘दवाखाण्यात नेवून देतो’ असे मी त्यांना म्हणालो.
‘नंतर जाऊ’ असे त्या म्हणाल्या.
त्यामूळे मला सामानाची जुळवाजूळव व पैसे शोधण्यासाठी अवधी मिळाला. कारण कुसुमांजली कूठेतरी पैसे लपवून ठेवत असे.
मी शोधाशोध सुरु केली. आलमारीत, कुसुमांजलीच्या पर्समध्ये पैसे शोधत असतांना मला सहाशे रुपये मिळाले. मी एक ड्रेस, एक चादर, अंडरवेअर, बनियन, साबन, तेल इत्यादी आवश्यक ते सामान मूलीच्या रिकाम्या बॅगमध्ये भरभरा भरले.
एवढयात मुलगी आली. ती इंग्रजी माध्यमातून पाचवीला शिकत होती.
तिला मैत्रिणीसोबत डब्बा घेऊन पिकनिकला जायचे होते. घरी तिला डब्ब्यात देण्यासारखे काहिच नव्हते. म्हणून तिला रस्त्याने जाणार्‍या संत्रावाल्याकडून संत्रा विकत घेण्यास पैसे दिले. ती पैसे घेऊन निघून गेली.
मुलगा बाहेर खेळायला गेला होता. मोठा मुलगा एन.सी.सी.च्या कॅंपसाठी बाहेरगांवी गेला होता. बाहेरच्या खोलीत बाबा कॉटवर झोपले होते. माझा साळा बाहेरच्या खोलीत पुस्तक वाचत होता. तो दहावीत शिकत होता. माझ्याकडेच तो गेल्या चार वर्षापासून शिक्षणासाठी होता.
मी थरथरत्या हाताने चिठ्ठी लिहली. ‘मी घर सोडून जात आहे. नंतर पत्र पाठवीन’ एवढेच मी त्यात लिहले होते.
मुलीच्या कंपासपेटी मध्ये ती चिठ्ठी ठेवली. जेव्हा ती कंपासपेटी ऊघडेल तेव्हा तिला दिसेल. तोपर्यंत मी दूरवर जाऊन पोहचेल. या उद्देशाने मी ही चिठ्ठी ठेवण्यासाठी तिच्या कंपासपेटीचा उपयोग केला होता.
सामान भरलेली थैली स्वयंपाक खोलीमध्ये नेऊन ठेवली. बाहेरच्या खोलीत येऊन चप्पल घातली. तेथूनच चुपचाप आतमधल्या स्वयंपाक खोलीत येऊन थैली उचलली व पाठीमागच्या रस्त्याने जाण्यास निघालो.
एकदा पाठीमागे वळून घराकडे पाहिले. तेव्हा अश्रूच्या धारा वाहायला सुरुवात झाली होती. अनेक भावना व विचार मनामध्ये दाटून आल्या होत्या. एस.टी.स्टॅंडपर्यंत पायीच चालत गेलो. घरापासून.स्टॅंड तसे दूरच आहे. स्टॅंडवर येईपर्यंत डोळ्यातील अश्रू आणि नाक सारखे वाहत होते.
एस.टी.स्टॅंडवर आलो. नागपूरला सरळ बसने जाण्यापेक्षा धामणगांववरुन रेल्वेने जावे असा मी विचार केला. कारण बस पेक्षा रेल्वेचा प्रवास स्वस्त आहे. त्यामुळे पैसे वाचतील असे मला वाटले.
थोडया वेळाने धामणगांव रेल्वे स्टेशनला जाणारी बस आली. तिकीट काढून खिडकीजवळ बसलो. बस सुरु झाली.
गांव सुटल्याची तिव्र जाणीव झाली. त्याचबरोबर अश्रूचा बांध फूटला. खिडकीच्या बाहेरच्या बाजूने तोंड करुन आसवे रुमालाने पुसत होतो. कोणाच्या लक्षात येणार नाही याची मी काळजी घेत होतो. अश्रू आवरण्याचा खूप प्रयत्‍न करीत होतो. परंतू काही केल्या अश्रूच्या धारा थांबत नव्हत्या. नाकाची फुरफूर चालूच होती. माझ्यावर आदळलेल्या वेदनांचा बंध माझे अश्रू मोकळे करण्याचा प्रयत्‍न करीत होते.
बस थांबल्यावर भानावर येऊन मी खाली उतरलो.
रेल्वे स्टेशनला जात असतांना मला एक ऒळखीचा मित्र भेटला.
त्याने मला चहा घेण्यासाठी हॉटेलात नेले. मी चहा घेत नव्हतो. त्यामुळे दु्ध घेतले. दु्ध व पानाचा खर्च त्यांनीच केला. अगावूचा खर्च करायचा नाही असे मी ठरविल्यामूळे हॉटेलचा व पानपट्टीचा खर्च त्यालाच करु दिला.
तो निघून गेल्यानंतर मी दोन रुपयाचा पेन विकत घेतला. कारण मला घरी कुसुमांजलीला पत्र लिहायचे होते.
रेल्वे स्टेशनला आलो. रेल्वे येण्यास बराच वेळ असल्याचे कळले. त्यामूळे मी फ्लॅट फॉर्मवर एका बाजूला जाऊन बसलो. तेथे थैलीमधून एक कोरा कागद काढून पत्र लिहायला घेतले.
त्यात मी लिहले की, ‘मी जरी घर सोडुन जात असलो तरी मरणार नाही. आयुष्याच्या अखेरपर्यंत मी ओळख विसरुन जगणार आहे. त्यामूळे माझा तपास करण्याचा व्यर्थे प्रयत्‍न करु नये.’
त्यात असेही लिहले की, ‘तुला वाटलेच तर दुसरे लग्न करण्यास तुला मोकळीक आहे. माझे तूझ्यावर आता कोणतेही बंधन राहणार नाही. तू मुलांचा सांभाळ कर. त्यांना खूप शिक्षण दे.’ शेवटी माझ्या नोकरीचा सर्व पैसा तुलाच मिळेल. मी कसातरी जगेन, कुठेतरी असेन!’
त्यातच माझ्या साळ्याला उद्देशून लिहले की, ‘तुझ्यालडून मला खुप अपेक्षा आहे. खूप शिक्षण घेऊन तू समाजाची सेवा कर.’
कारण तो एवढया लहान वयात त्याच्यामध्ये सामाजीक जानिवा निर्मान झाल्या होत्या. तो उत्कृष्ट पेंटर होता. त्याने पेंटींगच्या कॅडर कॅंपमध्ये शिक्षण घेतले होते. अवघ्या दोन मिनिटात. तो सुंदर व सहज भिंतीवर हत्तीचे चित्र काढायचा. पुर्ण जिल्हाभर त्याला हत्तीचे पेंटींग करायला नेत असत. त्याचे अक्षर खुप चांगले व वळनदार होते.
चळवळीचे ज्ञान मिळावे म्हणून माझ्या घरी अनेक पुस्तके व ग्रंथाचा संग्रह केला होता. त्याची घरघुती लायब्ररी तयार केली होती. ते कार्यकर्त्याना वाचण्यासाठी देत होतो. त्याचे रजिष्टर ठेवले होते, ते सांभाळ्ण्याचे काम तो करीत होता. म्हणून त्याचेकडून अपेक्षा व्यक्‍त करणे साहजिकच होते.
शेवटी पत्र लिहणे संपवीलं.
तसेच माझ्या कार्यालयाला सुट्टीचा अर्ज लिहून दोन्हिही पत्रे तेथील पोष्टाच्या डब्ब्यात टाकले.
रात्रीला अकरा वाजताच्या दरम्यान नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर आलो. स्टेशनच्या बाहेर पडलो. मला जेवण करण्याची ईच्छा राहिली नव्हती. त्यामुळे बाहेर फिरुन कुठे झोपता येईल कां याचा अंदाज घेत होतो.
तेथे प्रकाशाचा झगमझाट दिसत होता. माझ्या जीवनात मात्र अधार वाढत चालला होता.
तेथे खुप लोकं दाटिवाटीने झोपले होते. त्यात काही खरोखरचे प्रवासी होते तर काही भटके व भिकारी होते, असे माझ्या लक्षात आले. मी सुध्दा आता त्यांचेपैकीच एक होणार होतो याची मला तिव्र जाणिव झाली.
लोकांच्या घोळक्यामध्ये माझा चेहरामोहरा लपून गेला होता. यानंतर मी एकटाच राहणार होतो. कोणिही नातेवाईक मला ऊरले नव्हते. मी अनाथ झालो होतो.
एका ठिकाणी थोडी जागा रिकामी दिसली. तेथेच मी खाली टॉवेल अंथरला. अंगावर चादर ओढून घेतली. दोन्ही पाय दुमडून झोपण्याचा व्यर्थ प्रयत्‍न करु लागलो.
मी पुष्पांजलीला तिच्या सासरी नेऊन दिले होते. त्यावेळी तिचा निरोप घेतांना मी जिथे जाईन तेथून तुला पत्र पाठविन असे सांगितले होते. म्हणून मी कधी पत्र लिहायला घेतो असे झाले होते.
मी एका कोपर्‍यात जावून बसलो. घरुन येतांना मी बॅग मध्ये काही कोरे कागदे भरले होते. आता मला ते कामी येत होते.
बॅग मधुन कोरा कागद काढला व तिला पत्र लिहायला घेतले.
पत्र लिहीतांना मनात भावणांचा काहुर व डोळयात अश्रुंचा पूर दाटुन आला होता. सारखे माझ्या डोळ्यातून आसवे गळत होते. त्या आसवाचे थेंब त्यावर पडून ओले होत होते. अत्यंत भावणाविवश होऊन मी ते पत्र पुष्पांजलीला लिहित होतो.
पत्र लिहितांना माझे डोळे कसे भरुन आले याचा उल्लेख त्या पत्रात केल्याशिवाय मला राहवले नाही. एक-एक शब्द मी लिहित गेलो. जवळपास पांच पानाचे ते पत्र झाले होते. मी माझे संपुर्ण मन त्यात मोकळे केले होते.
दवाखाण्यातील दु:खदायक व कधिही न विसरणारी ती घटना, जे मी तिला यापुर्वी सांगू शकलो नव्हतो ते सविस्तरपणे पत्रात लिहिले होते. नियतीने मला क्षणार्धात आरोपीच्या पिंजर्‍यात कसे अडकविले होते याची ईतंभुत माहिती मी त्यात दिली होती.
मी तिला लिहले की, ‘पुष्पांजली, येथे मला फार थंडी लागत आहे. माझ्याकडे ना मफलर आहे ना स्वेटर आहे! मी आता जास्त पैसे खर्च करु शकत नाही. मी जर आजारी पडलो तर माझे कसे होईल? माझी जीवननौका आता कुठे व कशी भरकटेल याची मला जबरदस्त भिती वाटत आहे. नाही मी आता आत्महत्या करु शकत की माघारी फिरु शकत! आणखी मी एखाद्या कोणत्या गुन्ह्य़ामध्ये अडकणार तर नाही ना याचे मला भय वाटत आहे. माझ्या नोकरीचं, माझ्या मुलांबाळाचे कसं होईल याची मला चिंता वाटत आहे. मला आता माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत स्वत:ची ओळख विसरून जगावे लागणार आहे. माझे आवडते पान सुध्दा आता विकत घेण्याची ऎपत राहिली नाही. त्यामुळेच स्वस्तातली तलफ म्हणून पुन्हा तंबाखू खाणे सुरु केले आहे. मी आता पेपर विकत घेऊ शकत नाही. विकायला ठेवलेल्या, मुडपलेल्या अर्ध्या पानावरच्या तेवढया बातम्या वाचून मला समाधान मानावे लागणार आहे. आता मला टी.व्ही. नको, पंखा नको की झोपायला पलंग-गादी नको! भिकार्‍यांना दान करणारा माझा हात आता आखडला आहे. माझं मन म्हणत आहे की, तू आता यापुढे भिकार्‍यांच्या रांगेत दिसणार आहेस! ज्या भुताटकीने माझा बळी घेतला आहे अशा कोणत्याही स्त्री सोबत यापुढे संबंध ठेवणार नाही.’
पुष्पांजली, तू सुखाचा संसार कर. तू महान आहेस. तुझे पती मोठया मनाचे आहेत. मी तुझ्या मनाचा विनयभंग केला ही बाब मला सतत बोचत राहील. प्रायचित्त घेतल्यानं मला बरे वाटेल. मी माझ्या पुढिल प्रवासाची जीवनागाथा जीवंत असे पर्यंत कळवित जाईन.’
माझ्या मनात जे काही होतं नव्हतं ते मी पत्रात रेखाटलं होतं. जे काही न आठवल्यामुळे सुटलं असेल ते माझ्या मनाच्या कंपनाने पुष्पांजलीपर्यंत पोहचवावं अशी मी सदिच्छा बाळगून पत्र संपवलं.
पत्र लिहिल्यावर पुन्हा पुन्हा वाचून पाहत होतो. वाचतांना जिथे जिथे माझ्या भावना हेलावत होत्या, त्या त्या वेळी पुन्हा डोळे पाणावत होते. पत्राची घडी करुन पाकिटात टाकले. पाकिटावर पत्ता लिहितांना पुष्पांजलीचे नांव लिहून त्यावर ‘वैयक्‍तिक ’ असे लिहीले.
पत्र लिहून बराच वेळ झाला होता. मन एकदाचं मोकळं झालं होतं.
मात्र पत्र पोष्टात टाकावे की नाही अशी द्विधा अवस्था निर्माण झाली. जर हे पत्र पुष्पांजलीच्या पतीच्या अथवा कुणाच्या हातात पडून त्यांनी वाचले तर त्यांना सर्वच कळेल.
पुष्पांजलीने मला सांगितले होते की, ‘याबाबतीत मी कुणाला सांगणार नाही.’ परंतू मीच तर तिला पत्र लिहून हे प्रकरण उघड केले आहे! त्यामुळे तिची पंचाईत होऊन तिला त्रास होण्याची शक्यता आहे याची मला भिती वाटायला लागली. पण त्याशिवाय तिला दवाखाण्यातील ती घटना कळणार तरी कशी? कारण मी तीला त्याबाबतीत काहीच सांगू शकलो नाही. मनाचा हिय्या करुन ते पत्र मी पोष्टाच्या डब्ब्यात टाकलेच.
मी माननीय कांशीरामजींच्या सामाजीक चळवळीत सक्रिय होतो. तेव्हा त्यांच्या दिल्ली येथील ऑफीसमध्ये कारकूनाचे काम करावे व माझ्या नोकरीच्या ऑफीस मधिल कामाच्या अनुभवाचा तेथे उपयोग करावा असा माझ्या मनात विचार येऊन गेला.
मी नोकरीमध्ये ‘सहाय्यक लेखापाल’ या पदावर काम करीत असल्यामुळे मला अकाऊंटींगचा, कॅशबुक ठेवण्याचा व ऑडीटचा खुप अनुभव होता. मला टाईपिंग, ड्राफ्‍टिंग, अकाऊंटींग, ऑडीटींग, फायलींग इत्यादी सर्व कामे करता येत होते. माझे शिक्षण बि.कॉम पर्यंत झाले असल्यामुळे मला अकाऊंटींगचे चांगले ज्ञान होते. त्यामुळे ते मला निश्चितच ऑफीसच्या कामासाठी ठेवून घेतील अशी आशा निर्माण झाली होती.
म्हणून मी दिल्लीलाच जायचे ठरविले. तेथे ऑफीसमध्ये काम करावे. त्यांनी राहण्याची-जेवणाची व्यवस्था केली तर ठिक, नाहीतर कुठेतरी अर्धवेळ काम करुन पोटापुरते मिळवावे व जसे ईतर अनेक लोकं फुटपाथवर झोपतात तसेच आपणही झोपावे. ऊरलेला वेळ ऑफीसमध्ये काम करण्यामध्ये घालवावा.
जर त्यानी ठेवलेच नाहीतर शहरांमधे फिरुन संघटनेचा पेपर विकत जावा व अश्या प्रकारे चळवळीमध्ये आपले योगदान द्यावे. पुढे आपण चळवळीमध्येच पुर्णपणे सक्रिय होऊन काम करावे व अशारितीने आपला जीवनमार्ग आखावा असे मी विचाराअंती ठरवीले.
दिल्लीला जाणारी ४.३० वाजताची रेल्वे होती. काऊंटरवर जाऊन मी तिकीट काढले. आत मध्ये फ्‍लॅटफॉर्मवर जाऊन रेल्वे येण्याची वाट पाहत होतो. त्यादिवशी मी सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते. पोटाची भुक कुठे पळाली ते कळतच नव्हते. कदाचित पैसे संपू नये म्हणून माझे पोट सुध्दा मला सहकार्य करीत असावे असे वाटत होते.
आता येथून माझ्या जीवनाचा खर्‍या अर्थाने पुढील प्रवास सुरु होणार होता. जसजसा पुढे जाईन तसतसा मी घरापासून-गांवापासून दूर जाणार होतो. आता डोळयातील अश्रू कदाचीत आटले असावेत. कारण जेव्हा मागील जीवनपट माझ्या डोळयासमोर ऊभा राहायचा, तेव्हा डोळे मात्र आधीसारखे पाणावत नव्हते.
रेल्वे येताच तिकिट सामान्य श्रेणीचे असूनसुध्दा. विचाराच्या तंद्रिमध्ये मी राखीव डब्ब्यात शिरलो.
तेथे खिडकीजवळ जावून बसलो. यापुर्वी कुठे जायचे असले की द्वितीय श्रेणी अथवा भारत भ्रमणची सवलत घ्यायची असली की प्रथम श्रेणीमध्ये प्रवास करीत होतो. आता मात्र माझ्यावर सामान्य श्रेणीच्या डब्ब्यात प्रवास करण्याची पाळी आली होती.
रात्र झाल्यावर लोकं बर्थवर झोपायची तयारी करीत होते. म्हणून मला तेथून ऊठणे भाग पडले. कारण त्यांनी बर्थचे रिझर्वेशन केले होते.
मी दरवाज्याजवळील रिकाम्या जागेत येऊन उभा राहिलो. रात्र वाढू लागली.
रेल्वे धाडधाड करीत पुढेपूढे जाऊ लागली. इतक्या लोकांना ती ओढत ओढत घेऊन जात होती. त्या लोकांसोबत माझाही प्रवास सुरु झाला.
दोन बंदूकधारी रेल्वेचे पोलीस येतांना दिसले. त्यापैकी एक पोलीस माझ्याजवळ येऊन माझी विचारपूस करु लागला.
“कहॉ जा रहे हो?”
“दिल्ली जा रहा हू.”
“ तिकीट निकाली है?”
“ हॉ.”
“किससे मिलने जा रहे हो?”
“मान्यवर कांशीरामजी से.”
हे एकून त्यांनी मला आपलेपणा दाखविला
मला म्हटले की, “ठिक है. बैठे रहो.”
एवढे बोलून काहीच त्रास न देता तो निघून जाऊ लागला. मान्यवर कांशीरामजीचे नांव घेतल्यामुळे तो इतका कसा नरमला याचे मला आश्चर्य वाटत होते.
दुसरा पोलीस लगेच माझ्याजवळ आला. त्यांनी मला विस रुपये मागितले. मी पहिल्या पोलीसांकडे केविलवाने पाहिले. त्यांनी माझा उदासलेला चेहरा पाहून त्या पोलीसाला हाताने इशारा करुन सोडून द्यायला सांगितले. त्यामुळे माझी पोलीस चौकशीतून सुटका झाली.
आता मी निश्चिंत झालो. थैलीमधून टॉवेल काढून खाली अंथरली व चादर अंगावर घेतली. तेवढया लहानशा जागेत पाय आखडून झोपायचा प्रयत्‍न करीत होतो. रात्र संपेपर्यंत झोप कशी लागली़च नाही. जस-जसी रात्र वाढत होती तस-तसी थंडी पण वाढत होती.
रेल्वेच्या हेलकावे प्रमाणे माझे जीवन सुध्दा आता हेलकावे घेत घेत पुढे जाऊ लागले होते. दिल्लीला जाऊन काय करायचे हा विचार पुन्हा पुन्हा माझ्या डोक्यात येत होते. त्याची उजळणी मनामध्ये राहून राहून होत होती. आता मला पुढचे वेध लागले होते.
रेल्वे दिल्लीला सकाळीच येऊन पोहचली. मी खाली ऊतरलो. पाण्याच्या नळाजवळ गेलो. बॅगेतून पेस्ट काढून दात घासले. तोंडावर पाणी फिरवले. डोक्यावरचे केस व्यवस्थित विंचरुन घेतले तसाच स्टेशनच्या बाहेर पडलो.
दिल्लीला मी पहिल्यांदाच आलो होतो. त्यामुळे एक अनामीक भिती वाटत होती. रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलो. रस्त्याच्या कडेला केळे विकणारा माणूस दिसला. आता मला पोटात भुक लागल्याचे जाणवू लागले होते. एक रुपयाचे दोन केळे विकत घेऊन खाल्लेत. थोडीफार पोटाची आग शमली होती.
पेपर विकणारा पोरगा दिसला. वाटलं पेपर विकत घेऊन काय बातम्या आहेत ते पाहू या! मी घरातून निघून गेल्याची बातमी तर त्या पेपरमध्ये नाही ना...मला कसंच तरी वाटले. पेपर मध्ये बातमी यायला मी इतका मोठा थोडाच आहे! आणि इतक्या लांबच्या पेपरमध्ये येईल तरी कसे? शक्यच नाही... मिच माझ्या मनाचे समाधान करुन पेपर विकत घेतला नाही. कारण पैशाचा सुध्दा प्रश्‍न होताच!
तसाच समोर जाऊन करोलबागला जाणार्‍या बसची चौकशी केली. बस आल्यावर मी करोलबागला पोहचलो. तेथील ऑफीसमध्ये चौकशी केल्यानंतर असे कळले की, महाराष्टाचे संयोजक नॉर्थ एव्हेन्यूच्या ऑफीसला आलेले आहेत, त्यामुळे मला हायसे वाटले! कारण ते माझ्या अगदी जवळच्या परिचयाचे होते. ते माझी निश्चितच शिफारस करतील अशी मला खात्री वाटत होती.
त्या ऑफीसचा पत्ता घेउन मी नॉर्थ एव्हेन्यूला गेलो. तेथे ते बसले होतेच. मला पाहून हसले व कसे काय आलांत म्हणून विचारु लागले. त्यांना मी येथे राहून ऑफीसमध्ये काम करण्याची ईच्छा व्यक्‍त केली. त्याचे कारण विचारले असतांना, मी माझे घरघुती भांडणाचा ऊलेख करुन परिस्थिती समजाऊन सांगितली. तेव्हा त्यांना सुध्दा धक्का बसल्याचे मला जाणवले होते.
त्यांनी व ऑफीसमधील इतर कार्यकर्त्यांनी मला सल्ला दिला की, ‘तुम्ही परत जाऊन तूमच्या नोकरीतील ऑफीसच्या भानगडी मिटवून या. नोकरीतील पैसे घेऊन कुटुंबाचे पालनपोषण करण्याची तजवीज केल्यानंतरच दिल्लीला या. तुम्हाला येथे ऑफीसमध्ये निश्चितच काम करता येईल. तुमच्या राह्ण्याची व जेवणाची व्यवस्था येथे होईल. त्याची काळजी करु नका. तुम्ही जर तसे न करता येथे ऑफीसमध्ये काम करतांना मान्यवर कांशीरामजीना दिसलेत तर त्यांना सुध्दा ते आवडणार नाही. ते आता दौर्‍यावर गेले आहेत. ते आल्यावर तुमची विचारपूस करतील. तेव्हा तुम्ही. वाटल्यास दोन-तीन दिवस येथे थांबा. तुमच्या मनावरील ताण कमी झाल्यावर तुम्ही जायला काही हरकत नाही.’
ऑफीसमध्ये काम करणारे तीन व्यक्‍ती महाराष्टाचेच होते. त्यांना पण माझ्याबाबतीत झालेल्या प्रकाराबद्दल सहानुभूती वाटत होती.
त्यांचे सर्वांचे बोलणे मला पटले.
कारण मी सुट्टीचा अर्ज पाठविण्यापुर्वी माझ्या ऑफीसची रितसर पुर्वपरवानगी घेतली नव्हती. विशीष्ट नमूण्यामध्ये, रजेचा कालावधी टाकून अर्ज दिला पाहिजे. परंतु. मी तसा अर्ज न दिल्यामुळे व साहेबांची पूर्व परवानगी न घेतल्यामुळे मला नोकरीतून काढण्याची ते कारवाई करु शकतात. अशा परिस्थितीत काही आर्थिक फायदे मिळाले नसते. सुट्टी मंजूर न झाल्यामूळे आता माझा पगार निघणे बंद होईल. मग घरचे लोकं काय खातील! पैशाअभावी कसा खर्च करतील!
ऑफीसच्या संदर्भात नोकरी सोडण्याच्या बाबतीत रितसर कार्यवाही व्हायला पाहिजे नाहीतर मला नोकरीतून काढण्याची शिक्षा करतील, अशी मला जबरदस्त भिती वाटायला लागली. म्हणून मला ह्यासाठी तरी गांवला परत जाणे आवश्यक झाले होते. त्यानंतरच मोकळया मनाने मी येथे पुन्हा येऊ शकत होतो.
खासदारांच्या क्वॉटरमध्ये जेवणाची व राहण्याची व्यवस्था होती.
मी संध्याकाळी तेथेच जेवण घेतले. मी नवीन असल्यामुळे जेवायला आलेले लोकं माझी आस्थेने विचारपूस करीत होते. महाराष्टातील लोकांचा ते आदर-सन्मान करीत असल्याचे मला जाणवत होते.
पुष्पांजलीच्या घरी मी जेवण केले, त्यानंतर दोन दिवसांनी आता जेवण करीत होतो. तिच्या घरच्या जेवणांनी माझी भुक दोन दिवस तरी टिकऊन ठेवली होती.
रात्रीला त्यांच्याच क्वॉटरमध्ये झोपलो होतो. हे प्रकरण घडल्यापासून मला पुरेशी झोप मिळाली नव्हती. ह्यावेळेस मात्र बर्‍यापैकी झोप लागली होती.
सकाळी ८.३० वाजेपर्यंत तयारी करुन मला ऑफीस जवळील कॅंटीन मध्ये यायला सांगितले. तेथे आमलेट, ब्रेड व दुध याचा नास्ता घेऊन ऑफीसमध्ये गेलो. तेथे मी कॅशबुक मेंटनन्स, टाईपिंग, फायलींग ईत्यादीचे कामे करु लागलो. दुपारी सर्वांसोबत क्वॉटरमध्ये जेवण करायला गेलो. त्यानंतर पुन्हा ऑफीसमध्ये येउन रात्री ९.०० वाजता ऑफीस बंद होईपर्यंत काम करुन आम्ही रात्रीचे जेवण करायला गेलो. असा तो दिनक्रम होता.
तेथे एक हिंदी भाषेत साप्ताहीक वृतपत्र निघायचे. त्यात चळवळीच्या संदर्भात बातम्या, लेख प्रकाशीत करुन संपुर्ण भारतात त्याचे वितरण करायचे. हे काम महाराष्ट्रातील एक कार्यकर्ता करीत होता. त्याबाबतीत मी त्याला मदत करायच काम करीत होतो.
तेथे मी दोन दिवस राहून गांवला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आलो. तिकीट काढून फ्‍लॅटफॉर्मवर जाऊन थांबलो. मी तंबाखू व चुन्याची पुडी काढली.
बाजूला एक गरीब बाई बसली होती. तिने मला तंबाखू व चुन्याची मागणी केली. मी तिला त्या दोन्हिही पुडया देऊन टाकल्या व तुझ्याकडेच ठेव म्हणून सांगितले.
तिने तंबाखूला चुना लाऊन घोटल्यावर तोंडात टाकला. नंतर तिने एका बोटाने चुना काढून तिच्या पायाच्या पोटरीला असलेल्या खांडकावर लावला.
तिच्या बाजूला एक लहान मुलगी अंगावर फाटकी चादर ओढून झोपली होती. तिच्या डोक्यावरील पांघरुन काढून तिच्या डोक्याला असलेल्या खांडकाला तिने चुना लावला. ती असे करतांना मी तिच्याकडे पाहत होतो. मी तिला त्या मुलीबद्द्ल विचारले असतांना तिला ताप आला होता असे ती सांगत होती. डोक्याच्या खांडकामुळे तिला ताप चढला असावा. मी तिला दहा रुपयाची नोट देऊन तिला दवाखाण्यात घेऊन जायला सांगितले. तीने पैसे घेतले, पण काहीच बोलली नाही. गरिबाचं दु:ख काय असते हे तिने शब्दाने न सांगता आपल्या पोटातच ठेवले होते. तिची अशी दिनवाणी अवस्था पाहून मला गहिवरुन आले होते.
लवकरच गाडी आली. सामान्य श्रेणीचा डब्बा पाहून मी त्यात चढलो.
त्या डब्ब्यात सी.आर.पी. पोलीस व सैनिक बसले होते. रात्र झाल्यावर ते झोपायची तयारी करीत असतांना दंडुकाचा धाक दाखऊन डब्ब्यात बसलेल्या प्रवाशांना त्या डब्ब्यातून दुसर्‍या डब्ब्यात जायला सांगत होते. कोणी जाग्यावरुन ऊठायला नकार दिला तर त्यांना दंडुकाचा धाक दाखऊन धक्काबूक्की करीत होते.
मला सुध्दा ते ऊठायला सांगत होते. त्यापुर्वी माझा तंबाखू खाण्याच्या निमित्ताने एका सैनिकाशी परिचय झाला होता. त्याने तंबाखू घोटण्यासाठी जेव्हा तंबाखू व चुना काढला तेव्हा मी त्याला ते मागितले होते. त्या बाईकडे मी पुडया दिल्यामुळे आता माझ्याकडे तंबाखू व चुना शिल्लक राहिल्या नव्हता. मला अनुभव आला होता की, कॊणी कां असेना तो सहसा तंबाखू व चुना द्यावला कधिच नकार देत नाही. त्या बाबतीत कोणालाही वाईट वाटत नाही. त्याच्यावर सुध्दा कधितरी तशी पाळी येतच असते. म्हणून तंबाखु खाणारे त्या बाबतीत मात्र फार ऊदारता दाखवितात.
जेव्हा एक पोलीस माझ्यावर दंडुका ऊगारायला लागला, तेव्हा तो सैनिक मध्येच पडून त्याला रोखले व मला दोन बेंचच्या मध्ये असलेल्या जागेवर बसण्यास सांगितले
अशा रितीने माझ्या जीवनाची ससेहोलपट त्यांनेच थांबविली होती.
तंबाखू व चुन्याने दुसर्‍या डब्ब्यात जाण्यापासून मला रोखले होते. एवढे मात्र निश्चित!
तंबाखू घोटून ओठात ठेवल्यामुळे तोंडाचा वास येत असेल, त्यामुळे कॅंसरचा रोग होण्याचा धोका असेल परंतु तंबाखू व चुन्याचा असाही एक फायदा होत असतो असे मला त्यावेळी नव्याने दिसून आले होते.
दुसर्‍या दिवशी दुपारी मी घरी आलो. तेव्हा बरेच लोकं घरात होते असे मला दिसले. माझा लहान भाऊ व भावसून आले होते. कुसुमांजलीला जेव्हा दवाखाण्यात भरती करण्यात आले होते, त्यावेळेस मी त्याला पत्र लिहीले होते. म्हणून ते दोघेही तिला पाहयला आले होते. घरी आल्यानंतर मी निघून गेल्याचे त्यांना कळले होते.
कुसुमांजलीचे बाबा व मावशी आले होते. मामीजी तर आधीच घरी होत्या.
मी घरी पोहोचलो त्याआधीच माझे पत्र येऊन पोहचल्याचे कळले होते. त्यात मी घरी परत येणार नाही,. माझी ओळख विसरुन मी जगणार आहे असे लिहले होते. त्यामुळे सर्वच दु:खात बुडले होते.
मी घरात पाय टाकल्याबरोबर मला पाहून घरातले वातावरण स्मशान शांतता पसरल्यासारखे झाले होते. कोणाच्याही चेहर्‍यावर दु:ख अथवा आनंदाच्या छटा न दिसता एकमेकांकडे पाहत होते.
मी घर सोडल्यानंतर त्या वेळी घरी काय घडले असावे याचा मी कानोसा घेतला. मला असे कळले की, त्या दिवशी रात्रीला पुष्पांजली नसल्यामुळे मामीजींनाच स्वयंपाक करावा लागला होता. दवाखाण्यात डब्बा पोहचवून द्यायचा होता म्हणून त्या माझी वाट पाहत होत्या. बराच वेळ झाला तरीही मी घरी न आल्यामुळे माझ्या साळयाला डब्बा घेऊन जाण्यास त्यांनी सांगितले. तो सायकलने एकटाच डब्बा घेऊन गेला.
दवाखाण्यात पोहचल्यावर त्याने त्याच्या ताईकडे डब्बा दिला.
‘भाऊजी व आई कां नाही आले.’ असे तिने विचारले.
‘भाऊजीने ताईला तिच्या घरी पोहचवून दिले व दुपारी घरी परत आले. त्यानंतर ते बाहेर गेले. अजूनही ते घरी आले नाहीत. म्हणून मीच डब्बा घेऊन आलो. तू आता जेवण करुन घे.’ असा तो म्हणाला.
‘अस्स! पुष्पांजली गेली गांवला! बरे झाले! गेली एकदाची कटकट! तुझे भाऊजी गेले असतील चळवळीच्या कामाला! माझी कुठे त्यांना फिकीर आहे?’ असे ती म्हणाली.
मामीजी न आल्यामुळे तिला आता एकटीलाच दवाखाण्यात राहण्याची पाळी आली होती.
इकडे घरी मी चळवळीच्या कामानिमित्त नेहमी बाहेर राहत असल्यामुळे कधी कधी ऊशिरा घरी पोहचत होतो, हे घरच्या लोकांना माहित्त होते. त्यामुळे ते माझ्याबाबतीत विशेष काळजी करीत नव्हते.
या दरम्यान शाळेला तिन दिवस सुट्ट्या आल्या होत्या.
मी घरी कां आलो नाही? कुठे गेलो असेल? याची काळजी सर्वानाच लागली होती. आज येईल, उद्या येईल म्हणून माझी सर्वजन भिरभीर वाट पाहत होते.
मी घरी आलो नसल्याबद्दल कुसुमांजलीला कुणीच सांगितले नाही. साळा रोज दवाखाण्यात डब्बा पोहचवीत होता. तिची तब्बेत खराब असल्यामुळे तिला आणखी काळजी नको म्हणून तो तिला सांगत नव्हता. आता ती मात्र एकटीच दवाखाण्यात राहात होती. तिसर्‍या दिवशी मुलीला शाळेचा होमवर्क कराय़चा होता. म्हणून तीने दप्‍तर काढले. दप्‍तरातील कंपासपेटी काढून अभ्यासाला बसली. पेन काढण्यासाठी तिने कंपासपटी ऊघडली. त्यात तिला मी लिहिलेली चिठ्ठी दिसली. ते वाचून ती जोरात रडायला लागली.
‘बाबा निघून गेले आहेत. ते आता घरी परत येणार नाहीत असे त्यांनी या चिठ्ठीत लिहिले आहे.’ असे ती रडता रडता सांगत होती.
ती चिठ्ठी सर्वांनीच पाहीली व खरोखरच तसे लिहले असल्याचे त्यांना खात्री झाल्यावर घरात शोककळा पसरली. बाबा, मुलं, मामीजी असे सर्वच जन रडायला लागले. कुणीच कुणाला समजावयाच्या मनस्थिति मध्ये नव्हते.
दुसर्‍या दिवशी ही बातमी कुसुमांजलीला सांगितली. तेथेच ती रडायला लागली. स्वत:ला दोष देत देत ती सारखी रडत होती.
वार्डमधील पेशंट तिच्याकडे पाहत होते. ‘
‘बाई तू तुझ्या नवर्‍यासोबत अशी भांडायला नको होते. पहा आता त्याचा काय परिणाम झाला.’ असे कुणीतरी तिला म्हणाले.
ती आता दवाखाण्यात राहायला तयार नव्हती.
‘मला घरी घेऊन चल.’ असे तिने भावाजवळ आग्रह धरला.
डिस्चार्जचे कागदपत्रे तयार करुन तिला घरी घेऊन आला.
घरी सर्वच शोकाकूल झाले होते.
कुसुमांजली सारखी रडत होती. तिची छाती दम्याने भरुन येत होती. तिची तब्बेत आणखी बिघडणार तर नाही ना! अशी सर्वांना भिती वाटायला लागली होती.
मला आता कुठे कुठे शोधायचे याचा ते विचार करु लागले.
पहिल्यांदा माझ्या बहिनीकडे विचारपूस करण्यासाठी कुसुमांजलीने भावाला पाठविले. तेथून तो परत आला. त्यानंतर तिने त्याला पुष्पांजलीच्या गांवला पाठवले. कदाचित मी तेथे गेलो असेन किंवा कुठे गेलो असेन हे तिला माहिती असेल असे त्यांना वाटले असावे.
मी घरुन निघून गेल्याची बातमी वार्‍यासारखी जिकडे-तिकडे परसरली होती. काही लोकं घरी येऊन सांत्वन करीत होते. ते परत येतील म्हणून आशा दाखवित होते.
मी घरी पाऊल टाकताच ती म्हणाली, “किती शिक्षा दिली मला!”
मी तिला म्हटले, “मी पुन्हा जाणार आहे. पुर्वी सांगून गेलो नव्हतो. आता सांगून जाणार आहे.”
बाबा मला म्हणाले, ”बाबू, तू कुठे गेला होतास रे, आम्हाला सोडून? तुझ्या आठवणीनं आम्ही किती हळहळ्लो! त्या दिवसापासून जेवणाचा घास आमच्या तोंडात जात नव्हता! तुझ्यासाठी पुष्पांजली किती रडत आहे. तिचा वेदनेचा ठणका काही केला कमी होत नव्हता! आता बरे झाले तू आलास! तू कुठे जाऊ नकोस आम्हाला सोडून!”
एवढे बोलून तो ढसाढसा रडायला लागला. त्याच्या रडण्यामूळे मुलेही फुसफुसून रडायला लागले. मलाही रडू कोसळले. सगळे वातावरण शोकने भारावून गेले होते.
मी लगेच तयारी करुन ऑफीसला गेलो. मी निघून गेल्याची चर्चा तेथे पण सुरु होती. जिकडे-तिकडे माझ्याबाबतची बातमी वार्‍यासारखी पसरली होती.
मला पाहून सर्वांना धक्काच बसला. मला खुप अवघडल्यासारखे झाले होते. कुठे गेले होते? कां गेले होते? ईत्यादी अनेक प्रश्‍न विचारुन ते मला हैरान करीत होते. त्यांच्या प्रश्‍नाचे ऊत्तर देता देता मला नको ते झाले होते.
माझ्याबाबतीत असे घडेल असे त्यांना कधिच वाटले नसल्याचे ते सांगत होते..
“बरे झाले तुम्ही आलांत.” असे ते प्रतिक्रीया व्यक्‍त करीत होते.
कुणालाही न सांगता अचानक निघून गेल्याने काय परिणाम होतात याचे रहस्य मला त्यावेळी कळले होते.
मी एक महिन्याच्या सुट्टीचा अर्ज विहीत नमूण्यात लिहून, माझ्या विभागीय लेखापालाची त्यावर शिफारस घेतली. तो अर्ज कॅबिनमध्ये साहेबांकडे घेऊन गेलो.
त्यांनी सुध्दा माझी आस्थेने विचारपूस केली. एरवी सुट्टी देतांना साहेब फार आढेवेढे घेत असायचे. परंतु आता माझी बिघडलेली मानसिक अवस्था पाहून त्यांनी सहज सुट्टी मंजूर केली. मी त्याचे आभार मानून कॅबिनच्या बाहेर आलो.
आता मला ऑफीसची काही काळजी राहिली नव्हती.
मी घरी येतांना माझी वैयक्‍तिक फाईल व पगाराची पुस्तिका सोबत आणली होती. त्यावरुन मी नोकरी सोडली तर किती पैसे मिळतील याचा हिशोब करता येऊ शकत होते.
संध्याकाळी मी माझा विचार सर्वांना सागितला.
यापुढे कुसुमांजली सोबत जीवन कंठने अत्यंत धोक्याचे वाटत असल्याचे त्यांना सांगितले. कारण तिच्या संशयखोर व वाईट वागण्याच्या वृतीमुळे एकतर मी वाईट मार्गाने जाण्याची किंवा रागाच्या भरात माझ्या हातून काहीतरी अनर्थ घडण्याची जोरदार शक्यता आहे, त्यामूळे मी व माझे कुटुंब उध्वस्त होण्याची मला खुप भिती वाटत असल्याचे त्यांना सांगितले.
म्हणून मी सांगितले की, ‘मी नोकरी सोडून दिल्लीला जाईन. तेथे कांशीरामजींच्या ऑफीसमध्ये काम करीन. तेथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था आहे. मी पुन्हा येथे परत येणार नाही. नोकरी सोडल्यानंतर जे काही पैसे मिळतील ते मी कुसुमांजलीला देईन. त्यात तिने कुटूंबाचा व मुलांच्या शिक्षणाचा खर्च करावा.’
यावर कुसुमांजली एकदम ऊसळून म्हणाली, “ नाही. नाही. तुम्ही कोठेच जाऊ नका. नोकरी सोडू नका. मला घटस्फोट द्या. मी माझे पोट कसेही भरेन. मला तुमच्या नोकरीतला पैसा नको आहे.” इतके बोलून ती जायला लागली.
तिने अत्यंत टोकाची भुमिका घेतली होती. तिला सर्वांनी समजाऊन परत आणले. घटस्फोट घेणे हा मार्ग मलाही पसंद पडला नाही. ती ऊघडयावर पडू नये असेच मलाही वाटत होते. तिच्याबद्दल मला आंतरीक ओढ होतीच. परंतु तिचे बोलण्याचे व वागण्याचे प्रकार आठवले की, तिच्याजवळ कधिच राहू नये असेच मला राहून राहून वाटत होते.
“सध्या तुम्ही नोकरी सोडून कुठेही जाऊ नका. काही दिवसांनी त्यावर विचार करा. सगळे काही बरोबर होईल. तुमच्या मुला-बाळांच्या पालणपोषणाचा व शिक्षणाचा प्रश्‍न आहे. दिवसोंदिवस शिक्षणाचा खर्च वाढत आहे. कुसुमांजलीला ती जबाबदारी पार पाडणे अवघड होईल ” असेच तेथे हजर असलेल्या सर्वांनी समजुतीच्या सुरात बोलून आपआपली भुमिका मांडली.”
मी अंतर्मूख होऊन त्यावर गंभीरपणे विचार करु लागलो.
खरेच मुला-बाळांच्या पालणपोषणाची व शिक्षणाची जबाबदारी कुसुमांजली व्यवस्थीत पार पाडू शकेल की नाही, शंकाच आहे. त्यांचे भविष्य पार मातीमोल होईल. त्यांना वनात ढकलण्यात मीच जबाबदार राहीन. नोकरी सोडणे खरेच चुकीचे पाऊल ठरेल असेच मला वाटले. लोकांना नोकर्‍या मिळत नाहीत व माझ्याकडे असलेली नोकरी मी सोडतो आहे. लोकं मला घरघुती भांडणात नोकरी गमाविली त्याबद्दल मुर्खात काढतील. मी स्तब्ध झालो. मला काय बोलावे ते सुचत नव्हते.
एवढयातच पुष्पांजलीचे पती व माझा साळा असे दोघेही बाहेर आलेले मला दिसले. मी त्यांचेशी बोलण्यासाठी घराबाहेर आलो.
मी त्यांना विचारले, “माझे पत्र मिळाले काय?”
त्यावर ते म्हणाले, “होय.”.
ते पुढे म्हणाले की, “पत्र पहिल्यांदा माझ्याच हातात पडले. मी ते पुर्णपणे वाचल्यावर झालेला प्रकार माझ्या लक्षात आला. काय घडले म्हणून मी तिला विचारले. त्यापुर्वी तिने मला काहीच सांगितले नव्हते. मी तिला सांगितले की, तुझे भाऊजी घर सोडून गेले आहेत. तुला तेथे नसते ठेवले तर बरे झाले असते. आता पहा काय हां प्रकार झाला. वाच हे पत्र म्हणजे तुला सर्व काही कळेल.”
मला ते म्हणाले की, ’त्यानंतर ते पत्र पुष्पांजलीला वाचायला दिले. पत्र वाचून ती सुन्न झाली. ती काहीच बोलत नव्हती. तेवढयातच हा साळा आला. घर सोडून जाण्याबाबत पुष्पांजलीला माहित असेल किंवा एखाद्यावेळेस भाऊजी येथे आले असतील म्हणून ते पाहण्यासाठी मला पाठवीण्यात आले होते, असे त्याने सांगितले.’
मी त्याना सांगितले की, ’पुष्पांजली स्वच्छ आहे. तिची काहीच चुक नाही, मीच अपघाताने तिच्या जवळ गेलो होतो. माझा केवळ स्पर्ष सुध्दा तिला सहन झाला नाही. त्यामुळे मीच दोषी आहे. बाकीचे सर्व तुम्ही माझ्या पत्रात वाचले असेलच. त्यात मी सविस्तरपणे लिहले आहे.’
माझे बोलणे एकून त्यांनी मला धिर दिला.
मला म्हणाले की, ‘हे प्रकरण आम्ही कुणालाही सांगणार नाही. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत रहा. झाले गेले आता सर्व विसरुन जा.’
माझ्या मनावरील ताण कमी करण्यासाठी माझ्या भावाने त्याच्याकडे येण्याचा आग्रह केला. माझी आई त्याच्याकडेच होती. म्हणून तिला सुध्दा भेटायची मला ओढ लागली होती.
दुसर्‍या दिवशी सकाळी जेवण करुन आम्ही एस.टी. स्‍टॅंडवर जाण्यास निघालो. आमच्या सोबत पुष्पांजलीचे पती सुध्दा त्यांचे गांवला जाण्यासाठे एस.टी. स्‍टॅंडवर आले. त्यांचे गांव माझ्या भावाच्या गांवाच्या अलिकडे त्याच रोडवर होते. त्यानी आमच्या सर्वांच्या एस.टी. बसच्या तिकिटा त्यांच्या गांवापर्यंत काढल्या होत्या.
त्यांचे गांव आल्यावर आम्हाला त्यांचेच गांवला उतरण्याचे सांगितले.
मी त्यांना म्हटले की, ‘तुम्ही सर्वजन त्यांचेकडे जा. मी मात्र येणार नाही.’ पुष्पांजलीने म्हटले होते की, ‘आता आपण यापुढे एकमेकांच्या घरी जावू नाही.’ म्हणूनच त्याच्या घरी न येण्याचे कारण त्यांना न सांगताच मी नकार दिला होता. मी बस मधून खाली ऊतरलो नाही. म्हणून माझा भाऊ सुध्दा खाली ऊतरला नाही. ते बसमधून एकटेच ऊतरले. आमची बस पुढे निघून गेली.
मध्ये एका गांवला बस थांबली होती. तेथे ऊतरुन माझ्या भावांनी शिंगाडे विकत आणले. आम्ही त्यापैकी काही शिंगाडे बसमध्येच खाल्लेत.
एखाद्या तासाने आम्ही भावाच्या घरी पोहचलो असेन.
आई मला पाहून घरातून लगबगीने बाहेर आली. नेहमीप्रमाणे तिने माझ्या दोन्ही गालाचे पटापट मुके घेतले. तिच्या मायेच्या उबेने माझ्या अंगावर मुठभर मांस चढल्यासारखे वाटले...
मी बर्‍याच दिवसानंतर तिला भेटलो की, ती असेच उल्ल्हासीत व आनंदीत होऊन माझ्या गालाचे मुके घेत असते. तसेच जाण्याच्या वेळेस तिचा निरोप घेतांना सुध्दा ती अशीच करे. असा तिचा नित्यक्रम असायचा.
‘आला माहा बाबा. बरं झालं आलास.’
तिला भेटल्यावर मलाही अतोनात आनंद झाला.
तिला याबाबतीत काहीच माहिती नव्हते ते बरे झाले... नाही तर तीने आक्रोश मांडला असता व पुष्पांजलीवर रागाचे अंगार फेकले असते. नंतरही आम्ही कोणीच तिला याबाबतीत सांगितले नाही.
मी एक महिना सुट्ट्या काढल्यामुळे घरी जायची घाई नव्हती. भावाने आम्हाला बाहेर फिरायला नेवून माझे मन रिझाविण्याचा प्रयत्‍न करीत होता.
आठ दिवस थांबून मी माझ्या गांवला घरी परत आलो.
सुट्ट्या आणखी शिल्लक असल्यामुळे मी घरीच आराम करीत होतो. आराम कसला? माझ्या कर्मचारी संघठनेचे व चळवळीचे लोकं घरी येत होते. कधी कधी त्या कामानिमित्त मला बाहेर सुध्दा पडावे लागत होते
मी आमच्या खात्याच्या कर्मचारी संघटनेचा सर्कल सचिव असल्यामुळे कर्मचार्‍यांच्या समस्याकडे मला लक्ष देणे भाग होते.
.हे प्रकरण घडण्यापुर्वी मी सर्कल अंतर्गत मिटींग आयोजीत केली होती. त्यासाठी वरिष्ठ पदाधिकार्‍यांना पाचारण केले होते. परंतु माझ्या गैरहजेरीमधेच ती मिटींग पार पडली असे मला नंतर कळले.
तसेच माननीय कांशीरामजींच्या सामाजीक चळवळीमध्ये मी सक्रिय काम करीत होतो. चळवळीसाठी लागणारा निधी जमा करण्याचे काम मुख्यत: माझ्याकडेच होते. हा निधी निरनिराळया खात्यात काम करणारे सरकारी-निमसरकारी कर्मचारी व अधिकार्‍यांकडून नियमीत दरमहा जमा करावे लागत होते. त्यामुळे माझा परिचय खुप वाढला होता.
तसेच त्यांच्या चळवळी अंतर्गत सर्व खात्यांच्या कर्मचारी-अधिकारी यांची एक ‘ट्रेड युनियन’ स्थापण करण्यात आली होती. तिचे रीतसर कायदेशीर रजिष्टरेशन करण्यात आले होते. त्या संस्थापकीय पहिल्या केंद्रिय कार्यकारणीत मला सहसचिव म्हणून नेमले होते. म्हणून मला त्या संघटनेचे सुध्दा कामकाज पाहावे लागत असे.
या कामामध्ये मी वाकबगार झालो होतो. या कामात सचोटीपणा, प्रांमाणिकपणा व चिकाटीपणा मी टिकवून ठेवला होता. कोणी विनोदाने म्हणायचे की, ‘भिक मागण्याचे काम मीच करावं, ते दुसर्‍याला जमणार नाही.’ त्यामुळे हे काम माझ्यावरच नेहमी सोपवीत असायचे.
एखाद्या कार्यक्रमासाठी मात्र मोठा निधी पाहिजे असला तर मला ईतर कार्यकर्त्यांची मदत घ्यावी लागत असे हे काही सांगायला नको!. कार्यकर्त्ये, वरिष्ट नेते, कर्मचारी व अधिकार्‍यांशी यामुळे माझा दांडगा संपर्क प्रस्थापित झाला होता.
त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांच्या दौर्‍यांसाठी त्यांना पैसे देणे, कार्यक्रमाचा खर्च करणे, केंद्राला निधी पाठवणे इत्यादी कामे मलाच करावे लागत असे. त्यामुळे कार्यकर्त्यांची सारखी घरी वर्दळ असायची.
तसेच कुसुमांजलीला सुध्दा महिला आघाडीमध्ये काम करायला मी प्रोत्साहित करीत होतो. तिला महिला आघाडीच्या कार्यक्रमाला घेऊन जात होतो. तिला भाषण लिहून देऊन ते कार्यक्रमात सादर करायला सांगत होतो. तिच्या नांवाने मी निरनिराळ्या विषयावर लेख लिहून ते प्रकाशीत करीत होतो.
एकदा माननीय कांशीरामजीचा कार्यक्रम घेतला होता. त्यावेळेस त्यांच्या कार्याची माहिती स्थानिक वृतपत्रात तिच्याच नांवाने प्रकाशीत केली होती. तसे मी माझ्या स्वत:च्या नांवाने राजकीय स्वरुपाचे लेख प्रकाशीत करु शकत नव्हतो. हेही त्यामागे एक कारण होते. परंतु याशीवाय माझा दुसरा खरा उद्देश यामागे असा होता की, सामाजिक कार्यामध्ये भाग घेतल्यामुळे समाजाच्या दडपणामूळे तिच्या वागण्यावर बंधन येईल. म्हणून मी तिला सामाजिक व राजकीय कार्यामध्ये भाग घेण्यास प्रेरीत करीत होतो.
खूप दिवसापासून मी ईगतपूरी येथे विपश्यना करण्याच्या बाबतीत विचार करीत होतो. मी एकदाही विपश्यना केली नव्हती. माझे नातेवाईक व मित्रांपैकी काही लोकांनी विपश्यना केली होती. मनावर नियंत्रन ठेवण्यासाठी व मन एकाग्र करण्यासाठी विपश्यना आवश्यक असून तो एक चांगला उपाय आहे. मी तसा विपश्यना केंद्राकडे अर्ज पाठवीला होता. मला प्रवेश मिळाल्याचे पत्र मला मिळाले होते. परंतु त्या दरम्यान कुसुमांजलीला दवाखाण्यात भरती केल्यामुळे मला तेथे जाणे रद्द करावे लागले होते.
खरे म्हणजे मी नोकरी सोडून दिल्लीला परत जाण्याच्या उद्देशाने घरी आलो होतो. पण येथे आल्यावर ऊलटेच झाले. माझी नियोजीत योजना नियतीने निष्फळ ठरवली होती.
दोन दिवस आमचा अबोला होता. भांडण झाले की एकमेकांशी बोलणे बंद व्हायचे असा हा नेहमीचाच प्रकार होता. काही दिवसांनी कोणत्यातरी निमित्ताने अबोला तुटायचा. त्या रात्रीला कुसुमांजली माझ्याजवळ आली. तिने मला झालेल्या प्रकाराबाबत क्षमायाचना केली. मी सुध्दा जास्त न ताणता तिला शरण गेलो. तुझे माझे जमेना पण तुझ्यावाचून करमेना, अशी आमची गत झाली होती.
शेवटी समझोता करावाच लागला आणि येथेच 'आमची ती एक कथा' संपली...

आर.के.जुमळे, अकोला

गुलमोहर: 

नाही.
माझ्या "अशा होत्या त्या काटेरी वाटा…" या आत्मकथेत फक्त मला नोकरी लागण्यापुर्वीच्या आठवणी आहेत.

छान Happy