माझे काही भाग्ययोग - पक्षीभेट

Submitted by पुरंदरे शशांक on 17 August, 2011 - 01:49

माझे काही भाग्ययोग - पक्षीभेट

आपल्यापैकी बर्‍याच जणांना हे तसं जुनं बालगीत नक्कीच आठवत असेल .......
"माझ्या या ओटीवर कोण कोण येतं, कोण येतं..........
चिमणी येते नी चिमणा येतो ...टिप टिप दाणे टिपून जातो".
यात पुढे बर्‍याच पक्ष्यांच्या जोड्यांचे - राघू - मैना, मोर - लांडोर असे वर्णन होते.
या गाण्यात वर्णन केलेल्या चिमण्या, कावळे, मोर, पोपट अशा नेहेमीच्या पक्ष्यांशी आपला बर्‍यापैकी परिचय असतो.
मी ही लहानपणापासून हे पक्षी पहात आलो आहे.
पण आता मागे वळून बघताना त्या काही "भाग्ययोगी" क्षणांची आठवण होते - हो माझ्या दृष्टीने हे भाग्ययोगच - ज्यात मला - पक्षीसेवा / पक्षीभेट / पक्षीनिरीक्षणाची आगळीच संधी मिळाली. हा मोठाच भाग्ययोग मला वाटतो. मी काही मोठा पक्षी तज्ज्ञ नाही वा या क्षेत्रातील जाणकारही नाही. पण काय योगायोग होते माहित नाही - नेहेमीपेक्षा वेगळ्या पक्ष्यांना जवळून पहाता आले, त्यांच्या गंमतीशीर सवयी न्याहाळता आल्या. या सर्व गोष्टी आठवल्या तरी मनात विविधरंगी लाटांचा समुद्र उसळून येतो. खरंच, पशू - पक्षी - कीटक हे इतके काही शिकवतात, वेगवेगळे अनुभव देतात की त्याचे वर्णनच करता येत नाही असे मलातरी वाटते. अनुभव तो अनुभवच !

१] अगदी कुमारवयात - एका ब्राह्मणी मैनेच्या पिल्लाचा जीव वाचवता आला ...
(पिल्लू घरी येता... http://www.maayboli.com/node/23471 )

२] पुढे एका शिंजीर पक्ष्याचे पिल्लू दिवसभर पाहुणे म्हणून आले -
(एक दिवसाचा पाहुणा - http://www.maayboli.com/node/24654 )

३] तर ही कॉलेजमधील एक गोष्ट -
गरवारे कॉलेजमधे डॉ. मिलिंद वाटवेसर यांच्यामुळे - एक जखमी केस्ट्रेलच्या (खरुची - एक प्रकारचा शिकारी पक्षी - ससाण्यातला एक प्रकार) पिल्लाची देखभाल करायचा योग आला.
हा पक्षी अत्यंत देखणा व रुबाबदार असतो. कमालीची तीक्ष्ण भेदक नजर, बाकदार चोच व अणकुचीदार नखे लाभलेला हा निसर्गदत्त शिकारी पक्षी आहे.
जेव्हा याला पहिल्यांदा पाहिले तेव्हा भितीच वाटली याच्या नजरेची.
वाटवे सर म्हणाले - चला, त्या झूलॉजी डिपार्टमेंटमधील झुरळांच्या पिंजर्‍यात ठेवू याला.
अंदाजे २ फूट बाय २ फूट बाय २ फूट जाळीचा पिंजरा होता तो - ज्यात झूलॉजीच्या विद्यार्थ्यांना डिसेक्शनसाठी लागणारी झुरळे ठेवत. पिंजर्‍यात त्याला ठेवले मात्र - त्या पिंजर्‍यातील सुमारे १५ - २० झुरळांचा फन्ना या पक्षी महाशयांनी केव्हा उडवला हे ना त्या झुरळांच्या लक्षात आले ना आमच्या - अक्षरशः काही क्षणात हे घडले - हे सर्व करताना हे पक्षिराज आपल्या जागेवरुन अजिबात हलले नव्हते - फक्त मानेची अतिशय वेगवान हालचाल घडत होती व झुरळे याच्या पोटात जात होती एवढे आम्ही केवळ अचंबित होउन पहात होतो. एरव्ही - एवढे चपळ झुरळ - पण एकही झुरळ त्याला चकवून निसटू शकले नाही - एकाही झुरळाकरता त्याला दोनदा चोच मारावी लागली नाही. १८० अंशात त्याची मान अशी काही गर्कन डावीकडून -उजवीकडे, उजवीकडून -डावीकडे वळत होती की वाटले हा पक्षी ३६० अंशात आपली मान गरागरा वळवू शकतोय बहुतेक ! त्याच्या या अतिचपळ हालचाली व सफाईदार शिकारी अंदाजाने आम्हाला सर्वांना नजरबंदच केले होते जणू !
सरांच्या लक्षात आले हे पक्षिराज फार भुकेलेले दिसतात - जखमी होता बिचारा, कुठून खाणे मिळवणार ?
त्या पक्षासह आम्ही कॉलेजबाहेर नदीकाठी आलो. सर म्हणाले - बघा रे आसपास काही किटक, छोटे बेडूक मिळतात का ते.
आम्ही दोघे तिघे या कामगिरीवर निघालो. तोच एकाजणाला सुदैवाने लगेचच एक गलेलठ्ठ बेडूक मिळाला. आता प्रश्न पडला की हा एवढा मोठा व चपळ बेडूक हा जखमी पक्षी (पिल्लूच असलेला) कसा खाणार ?
पण सर म्हणाले - बघू या, याच्याकडेच सोपवून नाहीतर आपण मदत करु त्याला.
तो बेडूक, तो पक्षी व आम्ही ४-५ जण अशी सगळी वरात कॉलेजच्या ग्राऊंडमधे. ग्राउंडच्या एका कोपर्‍यात जिथे काहीबाही फूट अर्धा फूट गवत वाढले होते तिथे पोहोचलो.
हेतू असा की या पक्ष्याच्या जेवण चारचौघांसमोर कशाला ? शिवाय हे जेवण कोणालाच "प्रेक्षणीय" होणार नव्हते.
त्यात एखादी सोज्वळ, सात्विक कॉलेज कन्यका (शेवटी गरवारे म्हणजे पुण्यातील (?) कॉलेज आणि मी गोष्ट करतोय ती १९८० च्या आसपासची - जेव्हा साडीमधेही मुली येत असत - रेग्युलर कॉलेजला - फक्त "साडी (का सारी ?) डे" ला नव्हे ) टपकलीच कुतुहलाने तर तिच्या चित्कार कम् किंकाळ्याने तो पक्षी व बेडूक दोन्ही गायब व्हायला नको.

आम्ही कोंडाळे करुन बसलो व बेडूक त्या पक्षिराजासमोर ठेवायचा अवकाश ! त्या पक्षाने एकाच पंजात अशा ताकदीने त्या गलेलठ्ठ बेडकाला पकडले की तो चपळ व मोठा बेडूक काही हालचालच करु शकत नव्हता. दुसर्‍या क्षणाला आपल्या धारदार चोचीने त्याने बेडकाचे डोळे फोडले...... - त्या पक्षाला वाचवण्यासाठी शक्य होईल ती मदत करायची असे किती ही मनात असले तरी...... त्या क्रूर घटनेकडे आम्ही निष्ठूरपणे पाहू शकत नव्हतो - बहुतेकांनी माना फिरवल्या.
मनात आता त्या असहाय बेडकाची कीव येउ लागली - पण कोणाचाच इलाज नव्हता. "जीवो जीवस्य जीवनम्" ही ओळ अशी कठोर वास्तव घेऊन समोर येईल असे वाटले नव्हते.
जरा वेळाने परत समोर पाहिले तर बेडूक व पक्षी दोघेही नाहीसे झालेले ! मी चकीत होऊन सरांकडे पाहिले तर त्यांनी जवळच्याच एका झुडुपाकडे बोट केले. नंतर सरांनी सांगितले की ते पिल्लू एका पंजात त्या बेडकाला फरफटत घेऊन एका पायाने त्या झुडपामागे घेऊन गेले - त्याचा फन्ना उडवण्या करता... . तो बेडूक किंचीतही प्रतिकार करु शकत नव्हता - आम्हाला कोणालाच त्या शिकार्‍याच्या ताकदीचा व भुकेचा अंदाज आलेला नव्हता.....
पण अशी ओळख झाली एका शिकारी पक्ष्याची !
त्यावेळेस कुठले कॅमेरे असणार ? हा फोटो आंतरजालावरुन मिळालेला -

kestrel.jpg

असेच पुढे लिहित जाईन अशा अकस्मात भेटलेल्या काही इतर अद्भूत मित्रांविषयी..........

गुलमोहर: 

सुपर्ब Happy

असेच पुढे लिहित जाईन अशा अकस्मात भेटलेल्या काही इतर अद्भूत मित्रांविषयी..........>>>>>नक्की लिहा. वाचायला खुप आवडेल. Happy

.

शेवटचे प्रचि "शिक्रा" या शिकारी पक्ष्याचे वाटतंय. नक्की खात्री नाही. शिक्रा हा पण एक भयंकर शिकारी पक्षी आहे. हा साळुंकी सारख्या इतर पक्षांना मारून खातो.

शशांक, आमच्या बाल्कनीत कधी कधी कडक ऊन्हामुळे पक्षी चक्कर येऊन पडतात, मी बर्‍याचदा त्यांना पाणी पाजून नंतर सोडून दिले आहे, पण कधी फोटो नाही काढले..
कोकीळा, बुलबुल, पारवे अणि अजून खुप सारे पक्षी आहेत.. इथून पुढे नक्कीच फोटो काढेन..

वा सारिका, तू जे पक्ष्यांना जे अशा प्रकारे जीवदान देत आहेस त्याबद्दल तुझे कुठल्या शब्दात कौतुक करावे हे कळत नाहीये - या कामासाठी तुला मनापासून शुभेच्छा........ फोटो काढणे ही अगदी गौण गोष्ट आहे -त्या पक्षांचा जीव वाचवणे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे........
सर्व प्रतिसाद देणार्‍यांना मनापासून धन्यवाद.....

शाब्बास सारीका Happy

फोटो काढणे ही अगदी गौण गोष्ट आहे -त्या पक्षांचा जीव वाचवणे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे........>>>>>१००००० मोदक Happy

शशांक,

मस्त योग...... अजून अनुभव लिहा.

मलाही "हॉर्नबिलचं पिल्लू" एक आठवडा पाळायचा दुर्मिळ अनुभव मिळाला होता गावाला. तेंव्हा शाळेत होतो त्यामुळे फोटो काढणे शक्य नव्हते झालं पण गावाला घरातल्या सर्वांनी तो अनुभव घेतला होता.... पिल्लाचे आई-वडील आमच्या समोर अक्षरशः ४ फुटावर येऊन पिल्लाला सरडे आणि इतर खाद्य भरवायचे. ते पिल्लूच कोंबडीएवढं होतं...... त्यांचं वात्सल्य पाहून डोळे भरून यायचे. आम्ही त्याला काजूची बोंडं पिळून रस खायला द्यायचो. आठवड्याभराने मग ते उडून गेलं पालकांबरोबर.
BNHS मधून नंतर कळलं की, याचे फोटो काढता आले असते तर हा खूप दुर्मिळ ठेवा झाला असता... Happy Sad

जीवः जीवस्य जीवनम हे खरं आहे पण जीवंत पक्षांची/प्राण्याची [टि.व्ही. वर!] शिकार बघवत नाही!:अरेरे: आमच्या घराभोवती वृक्ष आहेत. ब-याचदा कावळे छोट्या पक्षांची शिकार करतात. तेव्हा ते केविलवाणे ओरडणे ऐकवत नाही. दोन तीनदा असे जख्मी पक्षी घरात येऊन लपून बसले होते. प्रचंड थरथरत होते. मग सगळं अलबेल झाल्यावर उडून गेले.
एकदा दिवसा एक घुबड कावळ्यांचा ससेमिरा चुकवण्यासाठी हॉलमधल्या पंख्यावर येऊन बसलं होतं!
बाहेर शांत झाल्यावर उडून गेलं.
एकदा पाँड हेरॉन पक्ष्यांनी झाडावर घरटं बांधलं होतं. त्यांच्या लोकरीच्या गुंड्यासारख्या ३ पिल्लांना ते छोट्या बेडकाच्या पिल्लांचा खुराक देत असत. एक दोनदा ती पिल्ले चोचीतून खाली पडली आणि उड्या मारत गेली तेव्हा आम्हाला कळलं ते काय भरवतात ते!
एरवी पक्षी निरिक्षण म्हणजे निखळ आनंद!!

शशांक, उन्हाळ्यात खुपदा उन्हामुळे पक्षी चक्कर येऊन पडतात, आम्ही त्यासाठी बाल्कनीला वरून उन लागू नये म्हणून हिरवे कापड वजा नेट लावतो, पण कित्येकदा त्यातच पक्षी अडकतात.. बाल्कनीच्या वर फिक्स्ड बार आहेत, फोटो टाकेनच, त्या बार वर उडताना कदाचीत त्यांचे डोके आपटत असावे.. ते बार काढणे शक्य नाही त्यामुळे रोज तिथे लक्ष ठेवावे लागते.. इतर पक्ष्यांच्या हल्ल्यामुळे जखमी झालेले पक्षी तिथे आश्रयाला येतात, पण मी एक निरीक्षण केले तिथे ठेवलेले दाना पाणी ते खात पित नाहीत.. असे का होते.. बागेत इतर ठिकाणी ठेवले तर लगेच फस्त होतात, पण बाल्कनीतले दाने महिनोंमहीने तिथेच पडून असतात..

भुंगा, ग्रेटच काम!!! आपल्याकडून अशीच मदत करत रहावी शक्य होईल तेवढी असे मला वाटते.
फोटो जमले तर ठीकच आहे; पण मदत मात्र महत्वाची. आणि तू तर हे केलेलंच आहेस त्यामुळे तुला अजून वेगळे काय सांगणार? अशा कामांसाठी तुला शुभेच्छा!!

सारिका, नक्की पक्षी येतील. फक्त अन्नपदार्थ साधरणत: फळांच्या फोडी, बाजरी,राळं असे ठेवून बघ.

अनिताताई, घुबडाला दिवसा नीट दिसत नाही त्यामुळे बिचारे गोंधळलेले असते. आणि कावळे तर काय! कुणाही पक्ष्याला हुसकावून लावतात. ते कायम सांघिक कामगिरी करत असल्यामुळे संरक्षणाला प्राधान्य! आणि आपल्या हद्दीत घुसलेल्यांना हाकलून लावणे!! त्यामुळे अगदी साप,तसेच ससाणा,शिक्रा यांसारख्या भक्षक पक्षी अथवा मांजर वगैरे आले की इतरांना अ‍ॅलर्ट करतात. साळुंक्यापण हेच काम करतात.
अ‍ॅलर्ट करण्याच्या वेळचे त्यांचे ओरडणे वेगळेच असते.

"जीवो जीवस्य जीवनम्" हे जरी खरं असलं तरी जिवंत बेडूक खायला देणं बरं वाटलं नाही.
बाकी माहिती, लेख, फोटो छान.