तिथीनुसार

Submitted by Arnika on 16 August, 2011 - 06:44

सकाळी डोळे चोळत चोळत मी पलंगावरून उठले. पाणी प्यायला स्वयंपाकघरात जाणार इतक्यात माझ्या तीन मैत्रिणींचा फोन! ‘Happy New Year’ त्या एकसुरात ओरडल्या...मला काही कळेचना. ६ एप्रिल २००९ ला सकाळी साडेसहा वाजता मला या का गंडवत होत्या तेच कळेना! आंदोनीया म्हणाली, “चला! यावर्षी आम्ही लक्षात ठेवून मराठी नवीन वर्ष गाठलं...बरोब्बर एका वर्षापूर्वी आपण तुमचं नवीन वर्ष साजरं केलं होतं! यावेळी आम्ही अगदी तारीख-वार लक्षात ठेवलाय.”

अरे बाप रे! मग काय तो गोंधळ माझ्या लक्षात आला. आदल्या वर्षी मी गुढी पाडव्याला या तिघींबरोबर गुढी उभारली होती, नैवेद्याचं पान देवासमोर ठेवलं होतं. पण २००९ चा पाडवा २७ मार्चलाच हजेरी लावून गेला होता. मला गेल्या वर्षीची आठवण झाली...

“मग तुमची नवीन वर्ष एका इंग्लिश वर्षात येतात तरी किती वेळा? आणि आता कितवं शतक चालू आहे? बरं, मग पुढच्या एप्रिल मधे परत नवीन वर्ष सुरू ना? अरे! पण मधे तर दिवाळीही येईल. हे नक्की कसं असतं तुमचं कॅलेंडर?” कित्येक प्रश्न! आणि माझी नेहमीची उत्तरं, “हो असंच असतं, आता पुढच्या एप्रिल मधे परत पाडवा. कॅलेंडर सांगणं थोडं कठीण आहे आणि तसा बराच वेळही लागेल. जाऊ दे ना! मी सांगेन की पुढचा सण असला की!” त्यामुळे एप्रिल मधील तारखेची आठवण ठेवून तिघीजणींनी पाडव्याच्या शुभेच्छा द्यायला (रामनवमीनंतर) फोन केला होता!

अशा अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायला मी पूर्वी टाळाटाळ करायचे. ओवाळणे म्हणजे काय? दरवर्षी सणांच्या तारखा का बदलतात? भिंतीवर टांगलेल्या आमच्या कॅलेंडरमधे केवळ तारीख-वार दिसतात पण तुझ्या कालनिर्णयावर सण जास्त आणि आकडे कमी असं का? असे अगणित प्रश्न! माझ्या प्रत्येक असमाधानकारक उत्तरामागे अजून चार प्रश्न! त्यांची उत्तरं माझ्याकडे नव्हतीच असं नाही, सांगायला वेळ नव्हता असंही नाही, पण जे सण, ज्या परंपरा माझ्यासाठी अनुभवाने आणि आठवणींनी गोड झाल्या त्यांची ऊब इंग्लिशच्या पांघरुणात मावेल का, अशी एक शंका कायम डोकावत असे.

कॉलेजच्या दुस-या वर्षापासून मी तो प्रयत्न करायला लागले. एकदा महात्मा गांधींबद्दल वाचताना त्यांचा एक सुंदर विचार सापडला... ‘No culture can live, if it attempts to be exclusive.’ मग असं वाटलं की अनेकांच्या सहभागामुळे, उत्साहामुळे, आस्थेमुळे एखादी संस्कृती सजत जाते. ज्यांना खरंच उत्सुकता आहे त्यांना आपण मुद्दाम लांब का ठेवतो? शिवाय ‘आपल्या’ गोष्टी ‘त्यांना’ समजणार नाहीत असं गृहित धरून जेव्हा मी समजावण्याचा प्रयत्नच टाळते, तेव्हा कुठेतरी मीसुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर विसरत जाते!

त्यानंतर मात्र मला जमतील तशी सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी द्यायला लागले. माझी मलाच खूप गंमत वाटायला लागली. कारण कित्येक वर्ष सवयीने परंपरा, प्रथा आणि पद्धती जपताना त्यांमागचा विचार मात्र माझ्यासाठीही लहानपणी ऐकलेल्या गोष्टींपुरताच मर्यादित राहिला होता. मित्र-मैत्रिणींचं शंका निरसन करताना मलाही काहीतरी नव्यानेच माहिती झाल्यासारखं वाटायचं! गप्पा अधिकाधिक रंगायला लागल्या, ‘आपलं’, ‘तुमचं’, ‘त्यांचं’ यातला फरक अचानक कमी कमी होत गेला.

सगळ्यात जास्त मजा आली ती तिथी समजावून सांगताना! दोन वर्ष सतत पडलेल्या प्रश्नांचं उत्तर...दरवर्षी तुमचे सणवार इकडून तिकडे हलत का रहातात? मला जितकं माहिती होतं तितकं मी सांगितलं आणि आंदोनीयाने उजळणी करून दाखवली, “चंद्राच्या मर्जीनुसार बहुतेक गोष्टी चालतात. दर महिन्याच्या १४ तारखा दोनदा येतात. एकदा गो-या तारखा, मग काळ्या तारखा. गो-या तारखांनंतर चंद्र पूर्ण गोलगोल होतो, काळ्या तारखांनंतर एक रात्र दिसत नाही. आणि थोडक्यात काय, तर गुढी पाडवा कधी हलत नाही, शालिवाहनाचं वर्ष चैत्राच्या गो-या एक तारखेला सुरू होतं. विक्रमाचं वर्ष शालिवाहनाच्या आठव्या महिन्याच्या पहिल्या गो-या तारखेला!” वाह, जमलं की! मग तिला ठाऊक असलेल्या प्रत्येक भारतीय सणाला तिने या धड्याच्या चौकटीत बसवलं. एक नवीन छंद! माझ्या वाढदिवसापासून ते परीक्षेच्या तारखांपर्यंत सगळं ‘तिथीनुसार’ तपासणं सुरू होतं! ओळखीच्या सगळ्या भारतीयांना ती तिचं नवीन कौशल्य दाखवत होती ते कौतुकाच्या अपेक्षेने, पण व्हायचं उलटंच! तिच्यामुळे त्यांनाही पहिल्यांदाच या ‘कृष्णधवल’ तारखांचा उलगडा होत होता...

“आता मला लोकांशी भारतीय तिथींबद्दल, सणांबद्दल बोलता येईल, मस्त ना?” आंदोनीया आनंदाने म्हणाली.

मला लगेच पाच वर्षांपूर्वी स्टार वर झालेल्या अभिनेत्यांच्या मुलाखती आठवल्या. गोकुळाष्टमी कधी असते या प्रश्नाला प्रत्येकाने दिलेलं उत्तर आठवलं... एक म्हणाला होता, “यंदा जशी गुरुवारी आहे तशीच दरवर्षी गुरुवारी असते.” दुस-याने माइक ओढून घेत सांगितलं, “छे! गुरुवारचं काय घेऊन बसलास? १७ ऑगस्टला असते नेहमी.” तोपर्यंत मी कपाळाला हात लावलेला होताच. तिसरा मात्र जरा जाणकार वाटला. त्याने सुरुवात केली, “अजिबात नाही! तुम्ही कुठले वार आणि कसल्या तारखा सांगताय? आपलं कॅलेंडर काही ग्रेगोरियन कॅलेंडरसारखं नसतं.” मी त्याचं बरोबर उत्तर ऐकायला खुर्चीत सरसावून बसले. थोडं थांबून महाशय परत बोलायला लागले, “आपले सण इंग्लिश सणांसारखे त्याच त्याच तारखांना येत नसतात, त्यामुळे गोकुळाष्टमीही दरवर्षी अष्टमीच्या दिवशी नसते, कळलं?”

...“सांग ना अर्निका, आता मी बोलू शकते ना तिथींबद्दल सगळ्या भारतीयांशी?” आंदोनीयाच्या प्रश्नाने मी भानावर आले...मनात म्हणाले, “तू लाख बोलशील गं! पण त्या ‘सगळ्यांनाही’ बोलता आलं पाहिजे ना?”

~ अर्निका परांजपे

(साकार या साइटवर हा लेख २६ जुलै २०११ रोजी लिहिला होता. दर मंगळवारी मी
arnika-saakaar.blogspot.com वर नवीन लेख लिहिते. जमल्यास वाचून आपल्या प्रतिक्रिया कळवत जा , मला फार आवडेल.)

गुलमोहर: 

छान लिहिलयस अर्निका, आवडलं. या प्रश्णांबद्दल कधी विचार पण केला नवता पण आता आपल्याच मुलांसाठी करावा लागेल Happy

अर्निका,

भारतीय काल गणना कॉलेंडर फक्त क्रष्ण पक्ष शुक्ल पक्ष ह्यात विभागलेला नसुन त्याला तीथी,नक्षत्र,
योग, कारणा या चारची बैठक आहे.

गोकुळाष्ठमी ही नेहेमी श्रावण क्रष्ण पक्ष अष्ठ्मी लाच येते, पण त्याच वेळी रोहीणी नक्षत्र असते.

राम नवमी ही पुनर्वसु नक्षत्राला असते. आपल्यात ( महाराष्ट्रात) नक्षत्राला ईतके महत्व देत नाहीत पण
दक्षिणेकडे त्याला खुप महत्व आहे. तिथे एकाद्याचा वाढ दिवस ही त्या च्या जन्म नक्षत्रावरच साजरा
केला जातो. त्यामूळे त्यांना प्रत्येक देवतेच नक्षत्र सुद्धा ठावुक असते,

आणि थोडक्यात काय, तर गुढी पाडवा कधी हलत नाही, शालिवाहनाचं वर्ष चैत्राच्या गो-या एक तारखेला सुरू होतं. विक्रमाचं वर्ष शालिवाहनाच्या आठव्या महिन्याच्या पहिल्या गो-या तारखेला!”>>>>-_____/\______

Pages