तुम्हे याद हो के न याद हो - १६

Submitted by बेफ़िकीर on 16 August, 2011 - 05:52

स्तब्ध निसर्ग! गार हवेचे उद्दाम झोत समोरच्या वाफाळत्या आविष्काराच्या अधिकारवाणीमुळे मायूस झाल्याप्रमाणे तोंड पाडून पण तरीही हट्टी मुलासारखे लगडण्याचा प्रयत्न करत! रोज तीच हिरवळ पाहून कंटाळलेल्या पानांना अनोख्या हुरहुरीच्या जाणीवेने कुतुहलाची हिरवाई चढलेली! हिरवळीच्या पात्यांवर अमीट ओलसरपणा!

एक झाड! कसल्यातरी फेसाळत्या अनियंत्रीत बहराला पेलून वाकत सलज्ज आणि निर्लज्जतेच्या सीमारेषेवर ओणवे होऊन आपल्या अदृष्य डोळ्यांनी ती सीमारेषा किती आवेगाने नष्ट होत आहे हे टिपत!

सीमारेषेच्या एका बाजूला आवेग! जो स्वतःलाच सहन होत नसल्यामुळे निरंकुष लष्करासारखा फोफावू पाहात आहे. सीमारेषेच्या दुसर्‍या बाजूला प्रेमभावनेला युगानुयुगे जागृत ठेवण्यास भाग पाडणारी मूर्ती! जिच्यात वादळे सामावून घेऊन त्यांना शांत करण्याची आणि तृषेला तुष्टीत बदलण्याची क्षमता!

एक जग, ज्याला या क्षणाचेच आकर्षण असूनही हा क्षण कुणी उपभोगावा याची परिभाषा ठरवण्यास सरसावणारे! आणि प्रत्येक परिभाषेला अपवाद ठरणारे ते दोघे....

.... उमेश... आणि निवेदिता....

समीपतेला समीप करण्यास आतुरलेले! दुराव्याला दूर करण्यास! दोन पापण्या झुकलेल्या, दोन रोखलेल्या! एक हृदय असीम वेगाने धडधडणारे, दुसरे कावरेबावरे होऊन आकुंचणारे!

शब्दांच्या अस्तित्वाला बंदी असलेला तो क्षण! ओठांच्या ओलाव्याला थरथर प्रदान करणारा सभोवताल! बोटांची गुंफण मिळालेल्या बेकायदा स्वातंत्र्यातून नंदनवनाची निर्मीती करण्यास उद्यूक्त करणारी!

कालच्या रुसव्या फुगव्यानंतर आणि रात्रीच्या 'लुत्फ मुझपे थे पेश्तर' नंतर आजची दुपार अशीच जाणार यात शंका नव्हती.

आणि संध्याकाळी मोटरसायकलवर एकमेकांना बिलगून पुण्यात पोचताना 'आयुष्यात काहीही करून एकमेकांसाठीच आणि एकमेकांसहीतच जगण्याच्या' शपथा मनोमन मुरवून आणि आजचा मोहमयी दिवस आठवत आठवत दोघे स्वर्गातून जमीनीवर येत होते. नेहमीच्याच, कंटाळवाण्या, तडपवणार्‍या, एकमेकांपासून दूर करणार्‍या जगात कैद भोगायला लागणार्‍या वास्तवात!

पुढे काय होणार याची काहीही कल्पना नव्हती. उराशी फक्त स्वप्नच होते एकमेकांचे होण्याचे! स्वप्नाला सत्यात आणण्याचा मार्ग तर राहोच, स्वप्न सत्यात न येण्याच्याच शक्यता अधिक जाणवत होत्या. खरे तर त्या दोघांच्या सहजीवनाला परवानगी न मिळण्याइतके अंतर मुळीच नव्हते. जात एकच, राहणी समान, संस्कार समान आणि वयही शोभेलसे! पण 'इगो' ही बाब कोणत्याही गोष्टी कोणत्याही थराला नेते याचे प्रत्यंतर त्यांना मागेच आलेले होते.

विन्याची मोटरसायकल लवकर द्यायला हवी होती. निवेदिताचा पेपर साडे चारला संपत असताना ती पावणे सात झाले तरी वाड्यात कशी काय आली नाही याचे उत्तर द्यायला लागणार होते. आप्पा बळवंत चौकातच उमेश तिला सोडणार होता. तेथून वाड्यात चालत जाऊन ती आप्पाच्या वहिनीच्या चौकश्यांना सुचतील ती उत्तरे देणार होती. उमेश मोटरसायकल घेऊन विन्याला दगडूशेठ गणपतीपाशी भेटणार होता. तिथून विन्या आपली मोटरसायकल घेऊन वाड्यात येणार होता. आणि रात्री नऊच्या सुमारास उमेश सावकाश घरी परतणार होता.

संशयाल काहीही वाव ठेवलेला नसला तरीही मनात धाकधुक होतीच आणि त्यावेळेस अशी परिस्थिती नव्हती की रस्त्याला फार गर्दीअसावी. कुणीही कुणालाही कुठेही ओळखू शकले असते.

पण या वेळेस सुदैवाची साथ मिळाली. नितुला कुणीही काहीही प्रश्न विचारला नाही. फक्त वरून वर्षाने 'पेपर कसा गेला' इतकेच विचारले. तिच्यापाठोपाठ विन्या मोटरसायकलवरून आला यातील गोम कुणालाही समजलीच नाही. आणि रात्री ठरलेल्या वेळेला उमेशही वाड्यात परतला.

आज रात्री मात्र तो हनुमानाच्या मंदिरामागे चढून बसला नाही. कारण कालच गुरखा प्रकरण पेटलेले होते.

मिळालेले स्वातंत्र्य पूर्णपणे व शक्य तितके उपभोगून दोन प्रेमी जीव झोपून जात असताना........

..........

ठक ठक.... ठक ठक...

राईलकरांचे दार वाजले. बाहेर एक संथ पण जाणवणारी अशी गंभीर कुजबूज सगळ्यांनाच ऐकू आली.

काहीश्या कुतुहलाने आणि काहीश्या धास्तावलेपणाने अनंत राईलकरांनी दार उघडले. पाठोपाठ आजोबाही उठून आले. उमेश नुसताच स्वतःच्या पलंगावर उठुन बसला होता. क्षमा झोपलेली होती. उमेशची आई आता उठून उभी राहून दाराबाहेर पाहू लागली.

"हेरंब काकडे"

समोरचा टग्या दिसणारा माणूस पानाने रंगलेले दात दाखवत अत्यंत छद्मी हासत स्वतःची ओळख करून देत होता. त्याच्या मागे असलेली दोन माणसेही तशीच होती दिसायला! प्ण त्यातला एक अगदीच कोवळा पोरगा वाटत होता, पंचविशीचा! हेरंब आणि तो दुसरा माणूस मात्र साधारण चाळिशीचे होते.

"कोण हवंय??"

उमेशच्या वडिलांनी किंचित गंभीर सुरात विचारले तसा तो माणूस नाटकीपणे स्वतःचेच हात 'तौबा' केल्यासारखे स्वतःच्याच गालांना व कानांना लावत म्हणाला....

" 'मान्निय' उमेश राईलकर साहेब आहेत का??"

"होय, उमेश... तुझ्याकडे आलेत... कोण आपण??"

उमेश बाहेर आला. काही कळत नसले तरी प्रकरण भलतेच गंभीर असल्यासारखे मात्र निश्चीतच वाटत होते. तोवर वाड्यातील दहा बारा माणसे जमलेलीच होती. त्यात उम्याचे तिघेही मित्र होते. निवेदिता मात्र चोरून तिच्या खिडकीतून पाहात होती.

"मी हेरंब काकडे... काही नाही.... सलाम करायला आलो होतो साहेबांना... या साहेब... तुम्हीच का मान्निय उमेश राईलकर??"

"हो... "

"चला... जरा फिरून येऊ चला"

"कोण आहात तुम्ही??"

"सगळं सांगतो... घरच्यांना कशाला उगाच अडकवून ठेवायचं रातच्याला??? हैकानै?? चला... चला चला.."

आता अनंत राईलकर दाराच्या बाहेर आले आणि म्हणाले...

"एक मिनिट... तुम्ही कोण आहात ते आधी सांगा... हे सगळं काय चाललंय??? हा चांगल्या घरातला मुलगा आहे... तुम्ही कोण आहात??"

"लई चांगलं घर आहे साहेब तुमचं! अगदी सोवळ्याचं बामण घर है! क्काय??? पण जरा तुमच्या पोराशी प्रेमाच्या गोष्टी करायच्यायत... तेव्हा तुम्ही घरात निजा... आम्ही याला नेतोय..."

आता आजोबा पुढे झाले.

"काय प्रकरण आहे सांगतोस का??? आं??? "

"मास्तर.. वयाचा आब राखून घ्या.. असामाजिक तत्वांच्या कार्यात सहभागी असल्याचा आरोप आहे तुमच्या पोरावर... त्यात वर पोरी फिरवतोय चांगल्या घरच्या.... आता असा बांबू लागनारे की दोन वर्ष खडीच फोडंल... हे वारंट"

कोणतातरी कागद आजोबांसमोर नाचवत हेरंब काकडे डोळे संतापाने विस्फारून पाहात तीव्र स्वरात म्हणाला तसा वाड्यात जणू भूकंपच झाला.

उम्याची आई धसका घेतल्यासारखी भिंतीला चिकटून उभी राहिली. अनंत राईलकर स्तब्ध झाले. आणि आजोबाही!

"काय बे??? खोटंय का हे??"

हा प्रश्न विचारतानाच हेरंबने उमेशच्या एक खाडकन कानाखाली लगावली. तो आवाजच इतका होता की प्रचंड होता की गलबल झाली वाड्यात! उमेश तर अक्षरशः तोल जाऊन पडता पडता सावरला. गालाची अवस्था वाईट झालेली होती. उमेशची आई आणि नुकतीच झोपेतून उठलेली क्षमा रडू लागल्या होत्या. आप्पाची वहिनी त्यांना सावरायला धावली. उमेशच्या वडिलांनी आणि आजोबांनी हेरंबला आवरायचा प्रयत्न सुरू केला तसे इतर दोघांनी उमेशला धरून ओढत न्यायला सुरुवात केली. उमेश तर रडतच होता.

तेवढ्यात हेरंबने दुसरा बॉम्ब टाकला.

'आन ती पोरगीबी इथेच राहनारी आहे... कोनती पोरगीय ती??? "

आप्पाच्या वहिनीला कसलातरी संशय आला. न जाणवून तिने प्रतिक्षिप्त क्रिया असल्याप्रमाणे नितुच्या बंद घराकडे पाहिले तसा हेरंबला बोध झाला. नितुच्या दाराकडे जात असतानाच त्याला नितुच्या वडिलांच्या नावाची पाटी दिसली.

"आ??? सबइन्स्पेक्टर आपटे??? आपटे साहेबांचं घर आहे ल्येका हे??"

उमेशला ओढणारे दोघे थांबले.

तिघेही चक्रावलेलेच होते. हे प्रकरण आपल्या हातातील नाही याची त्यांना जाणीव झालेली होती. आपटे साहेबांच्या घराचे दार वाजवणेही त्यांना शक्य नव्हते.

तरीही इतका प्रकार होऊन कुणीच बाहेर कसे आले नाही हे न समजून हेरंबने आप्पाच्या वहिनीलाच मागे वळून विचारले.

"साहेब नाहीत काय घरात?? "

'खाड'!

निवेदिताच्या घराचे दार उघडले गेले होते. आणि दारात निवेदिता ठाम चेहर्‍याने उभी होती.

"तू... तुम्ही कोन??? साहेबांची मुलगी काय??"

"साहेब हीच होती दुपारी"

मागून तो कोवळा मुलगा एकदम ओरडला तशी हेरंबची पाचावर धारण बसली. तो एकदम निवेदिताकडे बघत म्हणाला..

"काय नाय बाळ काय नाय... तू झोप... तू काही टेन्शन नाही घ्यायचं... क्काय?? साहेब आपले साहेब आहेत... झोप तू"

पण चाललेला प्रकार निवेदिताला सहन होणे शक्यच नव्हते.

एक तर उमेशला नेत होते. त्यातच त्याच्यावरचा आरोप किती भयंकर असेल याची त्याच्या स्वतःपेक्षाही अधिक कल्पना नितुला आलेली होती कारण ती एका सब इन्स्पेक्टरची मुलगी होती. आणि त्यात पुन्हा तिच्या त्याच्याबरोबर दुपारी असण्याचाही थेट उल्लेख होत होता व हेरंब काकडेने 'आणि पोरीही फिरवतोय' असे म्हणून उमेशच्या 'त्या' प्रकरणात उगाचच नितुला गोवलेले होते. नितु आपल्याच खात्यातील आपल्यापेक्षा एका वरिष्ठ अधिकार्‍याची मुलगी आहे हे कळाल्यावर हेरंबने एकदम सावध पावित्रा घेतलेला होता. पण त्यामुळे नितु स्वतःच्या वडिलांपासून वाचणार नव्हती. भर वाड्यात हा प्रकार झाला होता. उमेशवरच्या खटल्यात त्याने आज दुपारी काय काय केले याची साद्यंत हकीगत येणारच होती. त्यात सब इनस्पेक्टर आपटेंच्या मुलीचा सहभाग लेखी नोंदवला जाणार होता. आपटे साहेबांनी जीवाचे रान करून तो रद्द करून घेतला असता तरी ही पुढची बाब होती. मुळात आपटे साहेब नितुला आणि उमेशला जन्माची अद्दल घडवणार हे आता नक्की होते.

आणि हे स्पष्टपणे दिसत असल्यामुळे निवेदिताला आत्ताच्या आत्ता या क्षणी काहीतरी ठाम भूमिका घेणे अत्यावश्यक होते.

निमिषार्धात विचार करून निष्कर्षावर येणे अशी या परिस्थितीने निर्माण केलेली गरज होती.

नितु प्रचंड वेगात विचार करत होती.

'मी स्वेच्छेने याच्याबरोबर गेले होते' हे सांगितले तर उद्या बाबा आल्यावर आपली खैर नाही हे तिला माहीत होते. 'याने मला फितवून नेले होते' म्हणावे तर पोलिसांचे लक्ष असणार आणि आपले वागणे त्यांना तसे वाटले नाही हे ते बाबांना सांगणार याची तिला खात्री होती. अर्थातच, ती कातडी बचाऊ पद्धतीने तसे सांगणार नव्हतीच! त्यात पुन्हा, 'त्याने तसे नेल्याचे' आल्यापासून तू पोलिसात का कळवले नाहीस हाही प्रश्न निघणारच होता. आणखीन एक मूर्खपणा तिने असा केला होता की आजचा पेपरच तिने दिलेला नव्हता. त्या विषयात ती सरळ नापास होणार होती आणि तेही शून्य मार्क्स मिळवून! हे एक साहसच होते. तो विषय तिने पुढच्या सेमला द्यायचे ठरवलेले होते. पण पोलिसी मामला म्हंटल्यावर हे सगळेच तपासले जाणार याची तिला कल्पना होती.

नितुला काहीही सुचत नाही आहे हे पाहून हेरंब मनातल्या मनात खुष होतोय तोवर वाड्याला आणखीन एक धक्का बसला.

शैलाताई तरातरा पुढे आली आणि सर्वांदेखत म्हणाली.

"आपटेंची मुलगी दिवसभर आमच्या घरी होती आज... आजारी आहे ती"

बोंबलले. आप्पाला जाणवले की आता या खटल्यात उगाचच तो आणि शैलाही ओढले जाणार! तो पुढे होऊन शैलाला रोखणार तोच हेरंब कडाडला.

"पुरावेत पुरावे... ही त्याच्याबरोबर फिरत होती आणि काय काय चाळे करत होते दोघे याचे.... तुलाही आत जायचंय काय??"

खाडकन चेहरा पडला शैलाचा! आता हेरंब कारण नसताना शैलालाही यात ओढता येतंय का ते तपासू लागला. तिची चौकशी करू लागला. त्यावर आप्पा समजावणीच्या स्वरात बोलू लागल्यावर त्याने घाबरलेल्या आप्पालाही चौकीवर चलायला सांगितले.

इकडे उमेशच्या आईची आणि क्षमाची रडारड आवरेनाशी झालेली होती. उमेशचे वडील आणि आजोबा उमेशला धरणार्‍या दोघांन रोखायचा प्रयत्न करत होते. हेरंबला आप्पाच्या स्वरुपात आणखीन एक घबाड उगीचच मिळण्याची शक्यता निर्माण झालेली होती.

तो आप्पाला ढकलून बाहेर निघू लागला तशी उमेशची आई धावली आणि हेरंबसमोर गयावया करत म्हणाली.

"उमेश असं काही करणं शक्यच नाही हो.. काहीतरी चुकतंय... आम्ही साध्या घरातली माणसं आहोत हो... सोडा हो त्याला"

"बाई... आईचं प्रेम खात्यातल्या माणसांनाही समजतं... पण एक लक्षात ठेवा.. अंजुमने इस्लामचा सभासद आहे तुमचा पोरगा... साधीसुधी संघटना नाही ती... धार्मिक दंगल करणार होते उद्या आणि परवा... "

आता आजोबा पुढे झाले.

"हे बघा काकडे साहेब... आम्ही आहोत हिंदू... आमचा नातू एका मुसलमानाकडे कामाला लागला हे खरं आहे.. पण त्याला फक्त चार पाच दिवस झालेत... एवढ्यात कोणीतरी सामील होऊ शकेल का?? आमचा नातू एक कोवळा पोरगा आहे.. तो कशाला दंगलीत भाग घेईल?? "

"मास्तर... नीट बोलताय तवा नीटच बोलतो... क्काय??? अंजुमने इस्लामच्या प्रत्येक ठरावावर त्याचे नांव लागलेले आहे सभासद म्हणून... प्रत्येक मीटिंगला त्याचे नांव ठेवलेले आहे.... प्रत्येक योजनेवर त्याचे नांव आहे.. आणि योजना काय काय आहेत माहितीय??? प्रक्षोभक भाषणे करणे, भावना भडकाविणे, मुस्लिम समाजाला हिंदू समाजाने कसे मागे टाकले याची माहिती देणे... नंतर मंडई गणपतीची विटंबना करण्याचा प्रयत्न करणे... त्यानंतर स्वतःच एक दर्गा फोडणे... तो हिंदूंनी फोडला असे पसरवणे आणि दंगल घडवून आणणे... आता मला सांगा.. तिथे तुमचं पोरगं काम करतंय... त्याला ह्यातलं काहीच माहीत नाही असं होईल होय?? ए ... अरे चल्ल... ने त्याला... "

अवाक होऊन वाडा पाहात असतानाच हेरंब दाराबाहेर निघाला खरा.... पण एका लबाड विचाराने त्याचे डोळे लकाकले.. इतक्या सोप्या प्रकारे हे प्रकरण त्याला अजिबातच संपवायचे नव्हते... दारातच रडत उभ्या असलेल्या नितुकडे पाहात त्याने विचारले....

"बाळा... तू कशाला रडतीस उगाच?? आ?? अगं मी काकाच आहे.. तू कशाला गेलीस असल्या समाजकंटकाबरोबर??? आं?? अगं अभ्यासाचं वय आहे हे है का नै?? आता बाबांना समजल्यावर ते काय म्हणतील???

आपल्या वाक्याने तिला किती भीती वाटली आहे हे पाहण्यासाठी हेरंब क्षणभर थांबला. अपेक्षित तशी तिला खूप भीती वाटून ती रडत होती.

"कोणाची मोटरसायकल होती बाळा ती??? "

ओक्साबोक्शी रडत नितुने उत्तर दिले...

"वि..... नीत... गुजर... हा.... ह्याची"

हेरंबची भयानक नजर विनीतकडे वळली तशी विनीतची आई मधे धावली. तिला सरळ बाजूला करून हेरंबने विनीतला सर्वांसमक्ष चार शिव्या दिल्या आणि त्यालाही दाराकडे ढकलले... त्यानंतर तो विनीतच्या आईकडे बघून कडाडला..

"हरामखोर पोरगा आहे तुमचा... दंगली करणार्‍याला पोरी फिरवायला मदत करतोय... तमाशा करण्याची गरजच न्हाई... त्यालाबी अडकवनारे मी"

वाडा त्या आवाजाने थबकला असतानाच... हेरंब मनातच खुष झाला... लबाडपणे नितुकडे लांबूनच बघत तो म्हणाला...

"ह्यानं मोटरसायकल दिली अन त्यानं तुला फिरवलं असणार.... नाही का??"

आता मात्र नितुला रडने आवरेना...

"आणि तू नको नको म्हणत असताना तुला पार त्या एन डी ए च्या तिकडे कुठंतर घेऊन ग्येलान हा... आं??"

नकारार्थी माना हालवत नितु फक्त रडत होती. चाललेला प्रकार पाहून सगळ्यांनाच धक्का बसलेला होता.

"आन तिथे नेऊन तुझ्याशी अतीप्रसंग क्येलान... है का नाही??"

संपूर्ण रास्ते वाड्याला माहीत होते... उमेश राईलकर आणि विनीत गुजर ही अशी मुले नाहीतच! सगळा वाडा वाट पाहात होता की आता निवेदिता म्हणेल की 'असे काहीही झाले नाही, मी स्वेच्छेने गेलेले होते'!

क्षमा! क्षमाला हे सगळे सहन होईना! हेरंब काकडेची खातिर न बाळगता ती सरळ पुढे झाली आणि कुणालाही काहीही कळायच्या आतच.... स्वतःच्या उंबर्‍यात उभ्या असलेल्या नितुच्या तिने खाडकन कानाखाली वाजवली...

ते सहन न होऊन नितु मटकन उंबर्‍यातच बसली तशी क्षमा बोलू लागली...

"निर्लज्ज आहेस... नालायक... माझा भाऊ असा आहे का???? तुला नव्हते वाटतं जायचे??? बोल?? बोल की तोंडाने??? तूच त्याला नादी लावलंयस.... तू वाड्यात आल्यापासूनच हे प्रकार चालू झाले आहेत... इथल्या सगळ्यांना माहीत आहे... की दादा असा कधीच वागत नाही... तूच... तुझ्याच वागण्यात खोट आहे.. "

आजोबांनी क्षमाला आवरेपर्यंत तिचे हे वाक्य सगळ्यांनी ऐकलेले होते. हेरंब हे सगळे प्रकार पाहून अधिकाधिकच खुष होत चाललेला होता. कारण आपटे साहेबांना हे प्रकरण मिटवणे जितके जास्त अवघड होईल तितके आपल्यासाठी चांगले होणार याची त्याला खात्री होती.

मात्र क्षमाचे हे वाक्य ऐकून नितुला संताप आला. उठून उभी राहात तिने सर्वांसमक्ष क्षमाकडे बघत हेरंबला खच्चून ओरडून सांगीतले...

"सर... मला पण कंप्लेन्ट करायची आहे.... ह्याने त्याला स्वतःची मोटरसायकल दिली.... तो माझ्या कॉलेजमध्ये आला... काहीतरी भलतेसलते खोटेनाटे सांगून त्याने मला कॉलेजच्या बाहेर काढले... मी नको नको म्हणत असताना जबरदस्तीने कुडजेगावाला घेऊन गेला... आणि... "

पुढचे बोलणे शक्य होत नसल्याने पुन्हा रडत ती उंबर्‍यातच बसली...

हेरंब पुढे झाला...

"बाळ.. रडू नको... रडतीस कशाला?? आं??? अगं मी काकाच आहे... चल चौकीवं... कंप्लेन दे ल्हियून... उद्या बाबा आले की सगळे निस्तरतीलच... पण ह्या असल्या समाजकंटकांना अद्दल घडायलाच हवी... चल बाळा... चल.. ऊठ... "

संपूर्ण वाडा निवेदिता आपटेच्या या बदललेल्या रुपाकडे पूर्णपणे हादरून बघत होता...

हेरंब विन्याला ढकलत बाहेर निघाला तेव्हा उमेशची आई धावत धावत उमेशपाशी गेली... त्याला धरणार्‍या दोघांकडे संपूर्ण दुर्लक्ष करत तिने कर्कश्श आवाजात उमेशला विचारले...

"उमेश... तू ... तू तिला जबरदस्तीने नेले होतेस????"

त्यानंतर मात्र उमेशच्या आईने... सात आठ फुटांवर पडलेली एक लहान डहाळी हातात घेतली... आणि पोलिस काय मारतील असे उमेशला सर्वांदेखत मारू लागली...

मात्र बाकीचे सगळेच..... उमेशने आईला दिलेले उत्तर ऐकून... चक्रावून आणि भयानक अविश्वासाने उमेशकडे पाहात होते... कारण उमेश म्हणाला होता...

"होय... ती मला आवडते... तिला मी पळवून नेले होते... ती नको नको म्हणत असताना... "

तीनही आरोपींना जीपमधून चौकीवर न्यायला लागले आणि ते पाहून राहुल आणि वाड्यातील दहा बारा जण आपापल्या पद्धतीने आपापल्या वाहनांवर बसून चौकीकडे धावले तेव्हा.....

शैलाताई संतापाने थरथरत निवेदितापुढे उभी राहून तिला विचारत होती...

"सतरा आणि अठरा या तारखा उमेशला स्वप्नात कळल्या होत्या ना???? या वाड्यातून चालते व्हा तुम्ही तिघेही"

त्यातच भूमकर काकू आल्या आणि म्हणाल्या....

"उम्या आणि माझा विनीत आता मार खातील... आप्पा बिचारा उगाचच अडकला .... तुझे आईबाप ही पापं कशी फेडतील गधडे???"

'माझा विनीत'???? विन्याची म्हातारी आई, जिचा भूमकर काकूंशी उभा दावा होता, तीही गलबलली.

आज रात्री निवेदिताने स्वतःचे काही बरे वाईट करण्याचा प्रयत्न वगैरे करू नये म्हणून वाड्यातले कुणीतरी तिला आपल्या घरी घेऊन गेले...

तेवढ्यात दोन महिला पोलीस एका पोलिसाबरोबर वाड्यात आल्या आणि निवेदिता आपटेला कंप्लेन्ट दाखल करण्यासाठी चौकीवर बोलावलंय म्हणू लागल्या...

.... हेरंबला तक्रार दाखल करून घेण्याची अत्तिशय घाई होती हे सरळ दिसतच होते....

आणि... त्या हुकुमाप्रमाणे निवेदिता वाड्याच्या चौकात येऊन उमेशच्या आजोबांच्या थरथरत्या आणि संतापलेल्या चेहर्‍याकडे अतीव पश्चात्तापाने बघत असतानाच....

..... कसबा पेठेतील त्या रास्ते वाड्यात ..... त्याच क्षणी... एक भयानक बॉम्ब फुटला... अख्खा वाडा शहारून ते वाक्य ऐकत होता... निवेदिता तर थिजलीच होती...

कारण मागून आणखीन एक पोलिस आलेला होता.... आणि म्हणत होता...

"या क्षणापासून वाड्यावर माझी गस्त आहे.... कारण आरोपी क्रमांक एक उमेश राईलकर निसटला.."

गुलमोहर: 

सही

सर्व प्रथम...
......साठी धन्यवाद!!! Happy

----------------------------------------------------

हा भाग जबरदस्त "तणावपुर्ण" झाला आहे......

झालेले कायदेशीर 'संवाद' फिट बसलेत.......

पुढील भाग लवकर येउ द्या.

__^__