ओळखीची माणसे..

Submitted by -शाम on 15 August, 2011 - 11:16

मी कुठे शोधू अता ती ओळखीची माणसे
वेगळे केले स्वतःचे विश्व ज्यांनी छानसे...

ओल नाही कालची, होतात भेटी कोरडया
फक्त देखाव्यास उरले चेहर्‍यावरचे हसे...

रोज होतो घात माझा रोजचे आघात हे
वेदना सोकावली तिजला नवे ना फारसे...

आर्त किंकाळी कळीची आजही मी ऐकली
वंशवेलीने किती घ्यावे बळी अजुनी असे?

दूर गेली पैंजणेही उंबरा ओलांडुनी
चार भिंतींना अता या घर म्हणावे मी कसे?

मी दिलेले ते खुलासे मान्यही झाले तरी
बोलणारे बोलले, काही असे.. काही तसे...

'शाम' का धुंडाळतो तू माणसांना त्या अता?
घेतले उचलून ज्यांनी सावलीचेही ठसे...

......................................................शाम

गुलमोहर: 

मी दिलेले ते खुलासे मान्यही झाले तरी
बोलणारे बोलले काही असे काही तसे...>>>> व्व्वा!

<<<<बेफिकीर यांची याच जमिनीतली एक गझल आगोदर वाचल्याने तो प्रभाव टाळू शकलो नाही.
त्या बद्द्ल क्षमस्व>>>>

प्रभाव नाहीच आहे मुळी या गझलेवर! मी येथे लिहीले आहे ते कृपया वाचून पाहावेत, पटल्यास कळवावेत. Happy

http://www.maayboli.com/node/21889?page=3#comment-1546305

धन्यवाद व शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

धन्यवाद , सुप्रियाताई!
धन्यवाद, वीरू!
बेफी, खूप खूप आभार....आपल्या धाग्यावर प्रतिक्रीया दिली आहे.
Happy

आर्त किंकाळी कळीची आजही मी ऐकली
वंशवेलीने किती घ्यावे बळी अजुनी असे?

दूर गेली पैंजणेही उंबरा ओलांडुनी
चार भिंतींना अता या घर म्हणावे मी कसे? >>> छान

बोलणारे बोलले काही असे काही तसे... >>> मस्तच मिसरा... थोडी विरामचिन्हे घातलीत तर मस्त वाटेल..

'बोलणारे बोलले - काही असे... काही तसे' असे काहीसे Happy

घेतले उचलून ज्यांनी सावलीचेही ठसे... >>> मस्त

काही काही शेरांच्या शेवटी ... का दिले आहे?

रोज होतो घात माझा रोजचे आघात हे
सोकलेल्या वेदनेला हे नवे ना फारसे...

मी दिलेले ते खुलासे मान्यही झाले तरी
बोलणारे बोलले काही असे काही तसे...

---शेर आवडले...
---छान ग़ज़ल

नक्कीच नचिकेत....सोकलेल्या चुकीचाच आहे,
कोण सांगतोय याचीच वाट पहात होतो...निफाडकर सरांनी आधीच बदलायला सांगितला होता....असो , बदलतोय!

खूप खूप आभार!:)

ह बा