योग की भोग ?

Submitted by prashant_the_one on 14 August, 2011 - 09:24

माझ्या मनाविरुद्ध (म्हणजे बायकोच्या आग्रहाखातर हे चतुर मंडळींना लगेच कळले असेल) मी माझी पत्रिका त्याच्या पुढे ठेवली. इकडचे तिकडचे विचारून बायकोने गाडी फॉरीनच्या योग कडे वळवली आणि माझा विश्वासच बसेना... "तुमच्या नशिबात परदेश प्रवासाचा योग अजिबात नाही" .. टीव्ही आणि हिंदी सिनेमाच्या प्रभावामुळे, एकदम "ऐसा होना कतई नामुमकीन है.. " असा एक फिल्लमबाज ड्वायलाक डोक्यात येऊन गेला आणि पाठोपाठ बालाजी टेलीफिल्म सारखे ढेडांग...ढेडांग...ढेडांग...असे गजाच्या भाषेतले "पाठीमागचे ब्याकग्राउण्ड म्युझाक" वेळा वाजून पण गेले.... गजाला इतर गोष्टींचेच भयंकर आकर्षण..त्यामुळे त्याला मुख्य गाण्यापेक्षा पार्श्वसंगीत कसे होते ते बघण्यात जास्त इंटरेस्ट, पडद्यावर हिरो हिरोईन सोडून तो एक्स्ट्रा लोकांकडे बघत बसतो आणि व्हिलन सोडून त्याचे पंटर लोकं.. मला पण त्याच सिनेमेंटिक धुंदीत "मिलोर्ड ये पाईन्ट नोट किया जाय ..." वगैरे वगैरे सुचायला लागलं. स्वत:ला घेण्यापेक्षा बरे म्हणून ज्योतीषीबुवालाच एक चिमटा काढून बघितलं.. कसनुसा तो हसला, म्हणजे जे ऐकत होतो ते खरे होते तर ? ( तेवढ्यात, ज्योतिष्याच्या नशिबात आज चिमटा काढून घेण्याचा योग असावा अं? असा पण एक विचार चमकून गेला)

त्याच्या या वाक्यावर "काय सांगता?" असं बायकोनी शेवटी म्हटलं पण ते अगदीच गुळमुळीत होतं हे मला पण कळत होतं.. "ह्यें sss .. अगदीच अशक्य .." परत एकदा ब्रह्मवाणी अवतरली.. "या असल्या पत्रिकेच्या माणसांनी जगून तरी काय फायदा ? " अशा काहीश्या अर्थाचे भाव त्याच्या चेह-यावर मला वाचता येत होते...कुणाचं काय असेल माहिती नाही पण माझा असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. आपल्या मनगटात जोर असेल तर काय वाटेल ते घडवता येते आणि स्वत:वरचा विश्वास उडाला की लोकं ज्योतिषाकडे जातात असं आपलं मला वाटते. अगदी ज्योतिषाला पत्रिका दाखवून भविष्य बघणे आणि समजा ते खरे होणार असे गृहीत धरले तरी ते शेजारी बसलेल्यांनी आता सिनेमात पुढे काय होणार, खरा व्हिलन कोण हे सांगण्या इतके त्रासदायक वाटते.. आयुष्यातली मजा ही काय घडणार ते आधीच जाणून घेऊन घालवू नये असंही आपलं मला वाटते पण लग्नानंतर तुमच्या या वाटण्याला वाटाण्याच्या अक्षता लागतात.

पण मला आश्चर्य वाटण्याचे कारण म्हणजे मी पहिल्यांदाच कोणत्यातरी ज्योतिषाला ठाम पणे काहीतरी बोलताना बघत होतो. बाकी सगळे "एवढे सहा महिने जाऊ द्यात.." अशीच सुरुवात करतात.. एक असाच कुडमुड्या नंतर "म्हणजे मागचे सहा बरे होते असं वाटेल .." असं पण निर्ल्लज पणे म्हणाल्याची आठवण झाली ...हा ज्योतिषी माझेच पैसे घेऊन माझ्या नशिबात कोणते योग नाहीत ते सांगत होता! हा योग काय माझ्या नशिबातल्या हायवे वरल्या रेस्ट एरिया सारखा त्याला दिसतो की काय? ज्योतिष्याच्या नशिबात दुस-याचे भविष्य सांगण्याचा योग असतो का? हा पण कुडमुड्या आहे का? परत एकदा मेंदू मध्ये अनेक प्रश्न काँग्रेस गवतासारखे उगवायला लागले होते.

याच ज्योतिष्याच्या हातावर पेढे ठेवून मी त्याला अमेरिकेत कायमचा जात असल्याची बातमी दिली. त्यांनी पण शांतपणे अख्खा पेढा गालात ठेवून "तुमची पत्रिका चुकीची असेल इथपासून सध्या तुमचा गुरु भाग्याचा आहे आणि अजून २-३ वर्षे शनी तुमच्या वाट्याला येणार नाही.. म्हणून तुम्हाला परदेशात जाण्याचा एक योग आला आहे " असली काहीतर अगम्य टेप लावली. ते बोलणे अगम्य असण्यातच आणि अतर्क्य पळवाटा काढण्यात त्याचे "ज्ञान" (आणि यश) दडलेले असावे कारण त्याच्या या बोलण्याला बायको मान डोलवित होती. कोणत्याही ज्योतिष्याकडे अश्या पळवाटा असतातच अशी माझी अनुभवाने (म्हणजे दुस-याबरोबर जाऊन जाऊन) खात्रीच पटलेली आहे. तुम्हाला छातीठोक पणे एक तर भविष्य सांगतच नाहीत.. हे होण्याची शक्यता आहे... ते होऊ शकेल..असंच भविष्य ऐकायला मिळते. त्यासाठी पैसे का घालवायचे हेच कळत नाही. साधा छापा-काटा केला तरी त्यात ५०% बरोबर येते असे शास्त्रद्य म्हणतात. याचे पेढा एका गालात ठेवून ते चघळत चघळत, तंबाखूचा बर लावून बोलणा-या सारखे बोलणे चालूच होते. "याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात आता काही नवीन योग येतील..तुम्ही आता एन.आर.आय व्हाल ..ते झाले की तुमचे भविष्य-योग सगळे बदलणार... " हे असं होणार की नाही हा प्रश्न मी विचारला नसल्यामुळे मला पैसे पडले नाहीत पण काय सांगू, अमेरिकेत आल्यावर ज्या काही गोष्टींचा सामना करावा लागतोय ते बघता या वेळेस मात्र त्याची फुकटची "भविष्य वाणी" कम शापवाणी खरी ठरली की काय असंच मला वाटायला लागलेले आहे. काही अतर्क्य असे नवीन योग मला २-३ महिन्यातच, नव्हे महिन्यापासून भोगायला लागण्यास सुरुवात झाली. आता अनुभवाने असे लक्षात आले आहे सगळ्या अमेरिकेतल्या लोकांच्या नशिबात ते थोड्याफार फरकानी असतातच आणि ते भोगून संपण्याचा योग येण्याची लक्षणे मात्र दिसत नाहीत... ट्रेलर सिनिमापेक्षा मोठा व्हायच्या आत त्यापैकी २-३ मुख्य योग सांगतो...

सुपर स्टोअर योग

हा एक महा(भयंकर)योग आहे. जसे महायज्ञ , महाआरती किंवा आजकाल सारेगामापा वरती सगळे महागुरु असतात तसा हा एक महायोग. याच्या अंतर्गत बरेच उप - योग येतात पण त्याचा आपल्याला काहीही उपयोग नाही असेल तर फक्त उपद्व्याप आहे. या प्रत्येक योगात आपल्या नशिबी आपला वेळ वाया जाण्याचे किंवा कुणाच्यातरी (बहुतेकवेळा बायकोच्या) फक्त शिव्या खाणे लिहिलेले आहे.

सुस्टो योग १ - आपण अगदी दोनच गोष्ठी घेऊन लाईन मध्ये येतो. आपल्या पुढच्या व्यक्तीला शेवटच्या आयटम ला स्कॅन करताना मोठा प्रोब्लेम. संपूर्ण स्टोअर मध्ये चौकश्या, स्टोअर मधल्या स्पीकर फोन वर बोंबाबोंब .. आपल्या १५ मिनिटांचा सत्यानाश. तुम्ही दुस-या आयल मध्ये गेलात तरी काही फायदा नाही कारण तिथे तेवढ्यात ही मोठी लाईन तयार झालेली असते. त्यापेक्षा इथे वेळ वाया गेलला परवडतो. शेवट बायकोचे "साध्या दोन गोष्टी आणायच्या तर मेलं.. " हे ऐकण्यात होतो.

सुस्टो योग २ - योग नंबर १ मध्ये अडकायला नको म्हणून आणि लवकर होईल सेल्फ चेक मध्ये कधी गेला आहेत का? तिथल्या मशीनचे प्रोग्रामिंग कुणीतरी अहक्य्य (नॉन-पुणेकरांसाठी- म्हणजे अशक्य ची पुढची स्टेप ) माणसाने केलेले असते. तिथे स्कॅन करताना ती ऑटोम्याटिक बाई (प्रत्येक ठिकाणी बाईचाच आवाज का?) प्रत्येक आयटमची - जणू मला माहितीच नव्हते घेताना - म्हणून किंमत सांगते. मग ते झाल्यावर "आता तो बेल्ट वर टाका". आता तो आयटम मी किंमत बघूनच मी घेतला आहे ना आणि स्कॅन केल्यावर बेल्ट वरच टाकणार आहे ना? पण नाही... ते झालं की मग आपल्या लक्षात येते की आपल्या कडे रोख नाही. मग कॅश ऐवजी कार्ड निवडा ... तो पर्याय निवडला की डेबिट किंवा क्रेडीट कार्ड निवडायला सांगते. आपण नीट बघून क्रेडीट असं निवडून जरी कार्ड स्कॅनर मध्ये डेबिट कार्ड घातलं तरी कार्ड स्कॅनर परत विचारतो डेबिट की क्रेडीट? मग परत एकदा क्रेडीट वर बोट दाबायच .. इतके करून पण तो परत पिन नंबर विचारतो, त्याला क्यानसल करायचा, मग तो विचारणार की बाबा रे रक्कम बरोबर आहे का? तर ते एकदा परत सांगायचं. की लगेच केंश बेंक पाहिजे का? तेही झालं की मग बाई म्हणणार की त्याच्या डावीकडे जे एक छोट पॅड आहे त्यावर सही करा. ती सही करायला ५ सेकंद उशीर झालं की परत एकदा ती केकाटणार. ते झालं की मुख्य स्क्रीन वरती येऊन परत "डन" नावाच्या ठिकाणी बोट ठेवायचं. खरेदी पेक्षा जास्त वेळ यातच जातो आणि बायको म्हणते एक दुधाचा क्यान आणायला एवढा वेळ?

सुस्टो योग ३ - आपल्या कडे २-३च गोष्टी आहेत. लवकरच होईल म्हणून आत्मविश्वासानी आपण एक एक गोष्ट बेल्ट वर टाकतो. शेवटच्या आयटमला ती बाई म्हणते की स्कॅनर वाचत नाही कोड... किंवा मग बायको म्हणते की थांब.. मे ४.९९ च्या सेक्शन मधून घेतला हे ..१४.९९ कसे काय? गेले १२ वर्षे इथे राहून, इथेच सगळ्या खरेद्या करून सुद्धा, आणि या आधी १३ वेळा सांगून सुद्धा, बायको बरोब्बर त्या ठिकाणी हे विसरते की कुणीतरी दुसरा कस्टमर १४.९९ चा आयटम ४.९९ वर लावून गेलेला आहे !! परत मलाच नंतर म्हणते की तुला काही कळत नाही..हे लोकं बाराचे आहेत !!

सुस्टो योग ४ - ह्याची लायकी खरेतर महायोग व्हायची पण थोडक्यात मार खाल्ला. आवाज आणि अभिनय चांगला असूनही अमिताभ होता होता रझा मुराद झाला ! तर सुरुवात कपडे खरेदीमुळे होते. कपडे घ्यायला गेलो की माझी खरेदी ५ मिनिटात होते याचे मुख्य कारण म्हणजे क्लिअरन्स सेक्शन मधून तर घ्यायचा आहे आणि त्यात सुद्धा पुरुषांसाठी व्हरायटी ती काय असणार? उभे किंवा आडवे पट्टे असलेले किंवा प्लेन टी-शर्ट, बीज ते खाकी कलर च्या प्यांट ... हे बघायला २ तास कशाला? पण बायकोची खरेदी असेल तर ती एक वेगळी इष्टोरी असते. तिला प्रत्येक इतर बाईने घेतलेला कपडा पाहिजे असतो. त्यामुळे स्टोर मध्ये एक छुपी पळापळ असते. कारण इतर दुस-या कोणत्या तरी बाईला पण हिच्या हातातील कपडा पाहिजे असतो. त्यामुळे बायकोनी हातातला कपडा टाकून दुस-याच्या (म्हणजे कपड्याच्या) मागे धावायला सुरुवात केली की त्या इतर बायका हिच्या कपड्यांकडे धाव घेतात. मग ते होऊ नये म्हणून माझी ते ड्रेसेस पकडून उभे राहण्याच्या कामावर नेमणूक होते. इतर बायकांचे पण नवरे तिथे असतील तर त्यांची पण याच कामावर नेमणूक झालेली असते. कधी कधी असं वाटतं की आम्ही अश्या नव-यांनी हळूच कपड्यांची (म्हणजे आमच्या हातातल्या) अदला-बदल करून टाकावी ! तर हातात हे एवढे कपडे, त्यात परत खांद्याला हिची ब्याकार जड अशी पर्स. श्रीकृष्णाचे विश्वरूप दर्शन कमी पडेल एवढ्या वस्तू त्यात. त्यातून एकही गोष्ट जेव्हा पाहिजे तेव्हा तिला मिळत नाही. लिपस्टिक साठी खोदाखोद सुरु केली की "अय्या हे साल काढणे इथे आहे होय" किंवा नेल कटर शोधताना "अरे परवा पासून मिक्सर शोधत होते..." असले काहीही ऐकायची तयारी पाहिजे. बायको खरेदी करताना नुसतीच काथ्याकुट करत नाही तर कार्ट मध्ये अनेक गोष्टी कोंबते. या अनेक गोष्टी कोंबण्या आधी स्वत:ला ड्रेस मध्ये कोंबत त्याची अनेक वेळा ट्रायल होते. प्रत्येक ड्रेस नंतर आपली साक्ष काढली जाते. ती प्रत्येक ट्रायल लवकर संपावी म्हणून मी "बेष्ट दिसतंय", "सुंदर", झकास अश्या प्रतिक्रिया (गीतेवर हात ठेऊन जसे सराईत पणे खोटे बोलतात तशी) देत असतो. प्रत्येक वेळा एकच प्रतिक्रिया दिली की दुसऱ्या तिस-या वेळा पासून बायकोचे झणझणीत प्रश्न यायला सुरुवात होते. कोर्टातल्या केस ला "ट्रायल" का म्हणतात ते मला प्रत्येक वेळी पटते. ही सगळी ड्रेस रिहर्सल करून सुद्धा शेवटी सगळे कपडे फायनली त्या कार्ट मध्ये येतातच. "अग हे २ च घ्यायचे तर इतर १८ ठेवून दे की.. " असं मी पण दर वेळा म्हणतो आणि ती पण दरवेळा म्हणते "राहू देत.. तिथे गेल्यावर कदाचित मी दुसरा घेईन किंवा की माहिती याची खरी किंमत काय आहे. स्वस्त असेल तर नंतर हळहळ होईल." नंतर म्हणजे जर तिच्या कोणत्या मैत्रिणीनी तोच ड्रेस नेमका घेतला आणि जर तो स्वस्त होता हे कळलं तर जी जळजळ होते तिला नव-या समोर हळहळ म्हणतात! आणि मग पैसे द्यायला उभे राहिलो की प्रत्येकाची किंमत बघून, नको-नको सुरु होते, त्यात इतर सुस्टो भावंडे डोकावून जातात आणि मग कधी ४.९९ विरुद्ध १४.९९ चे लफडे होते किंवा मग स्कॅनरच नीट वाचत नाही, असे करत करत दरमजल करीत शेवटी भलतेच दोन-तीन ड्रेस खरेदी होतात. आणि एवढे करून मग बायको विजयी चेहऱ्यानी माझ्याकडे बघत असते ..चेहऱ्यावर भाव असतात की "बघ अशी खरेदी करतात..." या योगात आपला संपूर्ण वेळ बरबाद होतो आणि शेवटी तरीही आपणच चुकीचे कसे होतो हे आपल्याला पटवले जाते. गुजराती भाषेत "नवरा" याचा अर्थ "रिकामा" आहे यात नवल ते काय... एरवी काय वाटेल ती असो पण या योगात आपल्या पुढच्या पार्टीची रास त्या वेळे पुरतीतरी "मीन" असते.. व्हेरी मीन ....

फिरती ढाल योग -

अनेक वेळा बायकोला मी आडून सूचना देऊन बघतो की आपल्याला कुणी दिलेली वस्तू परत तिस-या लोकांना देऊ नकोस किंवा ती देण्या आधी ती नीट तपासून बघ. एक तर परत त्याच व्यक्तीला त्यांनीच दिलेली गोष्ट परत द्यायला नको आणि दुसरे म्हणजे आधीची लेबल्स वगैरे काढून ते सगळे "ठीक" दिसत आहे ना ते पण बघितले पाहिजे ना? एकदा अशीच एक फिरती ढाल - म्हणजे एक पायरेक्स चा ट्रे किंवा असलाच काहीतर व्हास वगैरे होता- ते तिने दुसरीकडे खपवण्याचे ठरवले आणि नेहमी प्रमाणे एकदा ते बघून घे वगैरेची - रेकॉर्डचा जमाना गेल्यामुळे - मी एमपीथ्री लावली. आणि माझ्या कडे - आमच्या जर्सी मध्ये एका कॉपनी पकडलेल्या देसी व्यक्तीकडे जसे इतर देसी लोकं बघतात - तसे बघून मग एका अतीव परमोच्च दर्ज्याच्या आत्मविश्वासानी (हा फक्त बायकांनाच असतो आणि पुणेकरांना .. त्यात पुणेकर बाई असली तर देव तुमचे भले करो...) बायकोनी ते तसेच तिकडे दिले.. ज्यांना दिले त्यांचा मुलगा हा मराठी शाळेतून २-३ वर्षे शिकल्यामुळे मराठी वाचता येणा-या पैकी एक होता. त्या उपद्व्यापी कार्ट्यांनी नेमके ते उचलले आणि उचलले ते उचलले पण त्याच्या डेंजर मिन्ग्रजीत त्याच्या मम्मीला पुसता जाहला "मॉम .. ए बाग खाय लिहील .. फ्रीय व्हार्षा ला.... थुझ्या च्हालीस वर्षांच्या वहाड दिवासा निम्मित्त्ता ...ए मनजे खाय गा मॉम ? " .. म्हणजे एक तर फिरती ढाल दिली ती पण ४-५ वर्ष बेसमेंट मध्ये पडून ठेवून मग दिली हे जोरात जाहीर केले... यात बायकोला सगळ्यात जास्त वाईट काय वाटले ते म्हणजे तिचे वय जाहीर झाले. या योगात हे नसतं झंझट निस्तरायची जबाबदारी मात्र तुमच्यावर येऊन पडते.

कार प्रवास योग -

अमेरिकेत कार नसणे म्हणजे पाय नसण्या सारखेच आहे. त्यामुळे आपण काही नाठाळ कारसेवकांना कधी-ना-कधी भिडणार हे ओघानीच आले. आपण नेहमी घाईत असतो. अमेरिकेत घाईत कोण नसतो म्हणा. आपल्याला पेट्रोल - नाही गेंस - भरायचा असतो . आपल्या पुढच्या कार मधल्या माणसाला - हा बहुतेक "सोशल सेक्युरिटी" (अर्थात पेन्शनर) ड्रायवर असतो - आणि त्याला पंपावर हमखास काहीतरी प्रोब्लेम होतो - ग्यास कयाप डावीकडे आणि तो उजवी कडे आणि पंपाची नळी थोडी छोटी वगैरे... याचे काही आटपत नाही आणि नेमक्या आपल्या मागे दोन कार भिडलेल्या. त्यामुळे मागे कार घेऊन दुसरीकडे पण जाता येत नाही कारण तुमच्या गाडीतले पेट्रोल संपायला आलेले असते. त्यामुळे "सहन होत नाही आणि सांगताही येत नाही" सारखी अवस्था होते.
या योगात अजून एक उप-योग आहे - हायब्रीड कार योग - जर कुणी हायब्रीड घेत असेल ना तर मला काहीच प्रोब्लेम नाही. पण ही हायब्रीड घेऊन टर्नपाईक वरती बरोबर आपण असताना नेम धरून आल्यासारखे येतात आणि रेसिंग करतात. एक तर ह्या कार एकदम नाजूक आणि "अय्या गडे" छापाच्या दिसतात त्यांनी एकदम रेसिंग करणे म्हणजे एकदम उंदीर हत्ती बरोबर बॉक्सिंग ला उभा राहिल्या सारखे वाटते. पण ह्याच्याहून जास्त कठीण हायब्रीड योग म्हणजे ती हायब्रीड घेऊन तिच्या फ्युएल मीटर कडे बघत बघत "सावकाश" पन्नास च्या स्पीड ने जाऊन मग ग्रुप पार्टीमध्ये मायलेज बद्दल गप्पा मारणाऱ्यांची गाठ बरोब्बर आपल्याबरोबरच पडते !! Amway नंतर हा एक मोठा उच्छाद आहे असे माझे स्पष्ट मत आहे.
अजून इतरही काही छोटे उप-योग पण आहेत - आपण ज्या रस्त्यावर जातो तिथेच बरोबर त्या दिवशी रस्ता दुरुस्ती चालू असते..अगदी आड रस्त्यावर भर रात्री गेलो तरीही. तुम्हाला हवा असलेला एक्झिट अपघातामुळे बंद आणि पुढचा ५ मैलावर असणे. तुम्ही अगदी ६५ स्पीड-लिमिट वरती ८० नि चालले असलात तरीही तुम्हाला ९०-१०० नी पास करून लोकं लायटी मारत मारत जाणार आणि बायकोच्या चेह-यावरती या पेक्षा बैलगाडी का नाही चालवत असे भाव असतात. एकदा तर मी व्यवस्थित डाव्या लेन मधून लिमिट पेक्षा १०नि जोरात चाललेलो असताना मागून एक गडी येऊन एकदम भिडला वगैरे... आणि थोड्यावेळानी लायटी मारायला लागला. म्हटलं असेल कुणी घाईची लागलेला..म्हणून मधल्या लेन मध्ये आलो... हा गडी मला लूक देत पुढे गेला आणि अक्षरश: १/४ मैलात एकदम उजवीकडच्या लेन मध्ये वाकडा तिकडा घुसत गेला आणि एक्झिट घेतला !! सात खून माफ असते तर यातले काही निवडक नक्की टपकवले असते.

शेवटी या सगळ्याला वैतागलो. पण मग अमेरिकन उद्योजकतेच्या परंपरेला अनुसरून, जिथे मोठा प्रोब्लेम आहे तिथेच मोठी संधी पण असते या तत्वाला धरून काही निरीक्षणे सुरू केली. मग माझ्या लक्षात आलं की अमेरिकेतल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात हे योग-भोग आहेतच पण त्याचे अनुभव व्यक्तीनुसार बदलत आहेत. म्हणजे राशी नुसार या योगांची तीव्रता कमी-जास्त होते की काय बघायला पाहिजे. तसेच इकडे सुद्धा ज्योतिष, भविष्य, राशी, टेरेट, सायकिक रीडिंग हा बिझनेस(!) मोठ्ठा जोरात आहे.. हे नवीन योग पत्रिकेमध्ये कसे बसतात याचे देशकालमानपरत्वे (है शाब्बास ..काय शब्द आहे) कुणीतरी इकडच्या लोकांना मार्गदर्शन केले पाहिजे... आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे इकडचे सगळे बाबा, पंडितजी लोकं १-२ मिलींअनची घरे "केश" मध्ये घेऊन परत झी टीव्ही वरती सिरिअल्सचे प्रयोजक आहेत !! २+२=४ हे साधे गणित इथे लावून, आयटी मध्ये मरण्यापेक्षा ही आयती आलेली संधी घालवू नये म्हणतो. भविष्य, योग, न्युमरोलोजी, फेंग-शुई, वास्तू-शास्त्र, वस्तू-शास्त्र (कोणत्या रंगाची कोणती कार कोणत्या मुहूर्तावर घेता वगैरे) इ.इ. गोष्टींना तेजी-मंदी दोन्ही काळात हेअर कटिंगच्या धंद्यासारखेच मरण नाही.. शेवटी सेलीब्रीटी भविष्य ह्या लेव्हल ला एकदा पोचलो की मग बुक -डील, टीव्ही शोज काय वाटेल ते करता येईल..काय म्हणता? तेवढे एक नवीन नाव सुचवा माझ्या धंद्यासाठी - तुमचे भविष्य योग फुकट सांगेन!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त.. आवडला लेख Happy

सुस्टो योग नं. १ मला महिन्यातून दोनदा तरी येतोच. सुस्टो योग नं. ४ चा तर मी धसका घेतला आहे. चेंजिंग रूमच्या बाहेर उभ रहायचं आणि येणार्‍या जाणार्‍या सगळ्या बायकांकडे बघायचं (आपली बायको आली का ह्याची वाट बघत) ह्यात मलाच 'आक्रोड' होतं.

आणि आमच्या कार प्रवास योगामधे, ३५ स्पीड लिमिटच्या रस्त्यावर मधल्या लेन मधून २५ च्या स्पीडनी एकिकडे फोन वर बोलत गाडी चालवणार्‍या बायका, इंडिकेटर न देता बचकन आपल्यासमोरच एका दमात तीन चार लेन्स बदलणारे ते थोराड पिक अप ट्रक, आपल्याच एक्झिट पर्यंत तुंबलेला आणि नंतर मोकळा होणारा फ्रीवे, हे विविध 'उप-योग' रोज हजेरी लावून जातात.

सरकारी ऑफिसांमधे, विशेषतः DPS मधे येणार्‍या अनुभवांवर अजून एक नवा योग तयार होईल.

छान आहे लेख! आवडला Happy पण तो सहा महिन्यांचा जोक कुठेतरी वाचल्यासारखा वाटतो. आणि Tarot मधला 't' सायलेन्ट आहे.

हे सुस्टो योग भारतात सुपरमार्केट्स झाल्यापासून इथल्याही लोकांच्या राशीला लागलेत. कूपन्स घेऊन येणार्‍या लोकांबद्दल नाही लिहिलंत. तसंच विकेन्डला ह्या मार्केटसमध्ये जायची वेळ आलीच तर रांगेत आपल्यासमोर कोणी नवरा भरलेली कार्ट आणि १-२ कार्टी घेऊन उभा. वर मागून त्याची बायको येऊन आणखी ५-६ गोष्टी त्यात घालते. त्या वेळचा होणारा वैताग शब्दातीत आहे Proud