भिंत

Submitted by कौतुक शिरोडकर on 26 July, 2008 - 01:54

भिंतीवरी रंगार्‍याने शेवटचा हात फिरवला
कैक कोरीव कलांवर पांढरा पडदा सारवला
चालता-चालता क्षणभर मी ही थबकलो
ओळ्खीच्या खुणाना नकळत शोधु लागलो
चुन्याआड कुठेतरी सार्‍या खुणा दडल्या होत्या
मनाच्या कोण्या कप्प्यात गुपचुप अडल्या होत्या
आठवणींच्या गुंडाळीतला एक छेडा हाती आला
गेला एकेक क्षण भिंतीवरी दृश्यरुप झाला
याच भिंतीच्या अंगावर, किती काळ, किती वेळा
डावी उजवी बाजु रेलुन, सोसल्या उन्हाच्या झळा
याच भिंतीच्या सहवासात, मोगरा फुलला होता
सुप्त व्यक्त भावनांचा खेळ रंगला होता
याच भिंतीच्या पाटीवर ह्रदयाचा परिघ आखला होता
आत दोघांच्या नावाचा राजहंस रेखला होता
याच भिंतीच्या आडोशाला नयनी नयन भिडले होते
हातात हात अन जिवात जीव गुंतले होते
याच भिंतीच्या सावलीत, आणाभाका घेतल्या होत्या
मावळ्तीच्या साक्षीने स्वप्नांच्या वाटा शोधल्या होत्या
भिंतीचा कॅलेंडर करुन तारीख वार खरडले होते
आपल्या नोंदीसाठी बरेच प्लास्टर उखडले होते
हल्ली हल्ली भिंतीला तडेसुद्धा गेले होते
त्यातही परवापर्यंत सगळे आलेख खडे होते
येता जाता आता खुणा काही दिसणार नाही
मनाच्या डोहात सहसा तरंग उठणार नाही
काहीतरी हरवल्याची जाणिव होऊ लागली
ओळ्खीची भिंत अनोळ्खी वाटु लागली
निघता-निघता मनातली खंत विरघळली
भिंतीच्या कोपर्‍याला एक नवी जोडी बिलगली
पुन्हा भिंतीच्या आधारे नवा अध्याय रचला जाईल
पुन्हा नवी कहाणी नवे कोरीव काम होईल

गुलमोहर: 

आभार.

छानय, कौतुक. कल्पना आणि मांडणीही.