न्या. महादेव गोविंद रानडे

Submitted by अवल on 8 August, 2011 - 23:21

----------------------------- ranade_mg.jpg-----------------------------

भारताच्या इतिहासात एकोणिसावे शतक हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो. या शतकामध्ये सुरु झालेल्या प्रबोधन प्रक्रियेने येथील समाजाचा चेहरा-मोहरा बदलून टाकला. समाजातील अनेकविध गोष्टींमध्ये याच काळात मोठे आणि महत्वपूर्ण बदल घडून आले. येथील समाजजीवनातील धर्मकल्पना, जातीव्यवस्था, स्त्रियांचा दर्जा, शिक्षणपद्धती, अर्थव्यवस्था, राजकीय व्यवस्था, वाङमय, न्यायव्यवस्था या सर्वांवर प्रबोधनाने आपली छाप उमटवली.
राजा राममोहन रॉय, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, भाऊ महाजन, दादोबा पांडुरंग, दादाभाई नौरोजी, न्या. रानडे, म. फुले, कृष्णशास्त्री चिपळूणकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, गो.ग. आगरकर, लो. टिळक या आणि अशा अनेकांनी प्रबोधनाची धुरा सांभाळली.
सर्वांगीण सुधारणा हे भारतीय प्रबोधनाचे वौशिष्ट्य होय. समाजातील सर्व घटकांबाबत या प्रबोधन काळात विचारमंथन झाले. या प्रबोधनाचे एक उत्तम उदाहरण म्हणून न्या. म.गो. रानडेंचे विचार आणि कार्य यांकडे पाहता येते.
इ.स. १८४२ साली नाशिकमध्ये महादेव गोविंद रानडे यांचा जन्म झाला. कोल्हापूर, मुंबई येथे शिक्षण पूर्ण करून मुंबई उच्चन्यायालयाचे न्यायाधीश व पुढे सर्न्यायाधीश म्हणून त्यांनी जबाबदारी पेलली. पुढे बदली निमित्याने पुण्यात आल्यावर न्या. रानडेंचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अशा सर्व आघाड्यांवर कार्य सुरू झाले.
भारतीय समाज, भारतीय व पाश्चात्य परंपरा, भारतीय व पाश्चात्य ग्रंथ आणि भारतीय व पाश्चात्य तत्वज्ञान या सर्वांच्या सखोल अभ्यासातून त्यांच्या विचारांना खोली प्राप्त झाली होती. एकीकडे येथील संतपरंपरा आणि दुसरीकडे पाश्चात्य उदारमतवाद या दोन्हींचा समन्वय येथील सुधारणेसाठी त्यांनी योग्य मानला.
न्या. रानडेंच्या मते, समाज हा एखाद्या सजीवाप्रमाणे असतो. समाजाची धर्म, राजकारण, अर्थकारण ही विविध अंगे एकमेकांशी संलग्न असून, एकमेकांना पूरक असतात. एका शरीराचे काही अवयव दुबळे आणि काही शक्तीमान असे असू शकत नाहीत. तसेच मानवी समूहाचे काही भाग सुधारलेले आणि काही भाग मागासलेले असू शकत नाहीत. समाजातील विविध भागांची एकत्रित प्रगती होणे हे न्या. रानडेंनी आवश्यक मानले.
भारतातील सामाजिक परिस्थितीचा विचार करताना येथील समाजातील विविध समस्यांबद्दल न्या. रानडेंनी विचार मांडले. धर्म, जातीव्यवस्था, स्त्रियांचा दर्जा, शिक्षण, इ. बाबत सुधारणा त्यांनी सुचवल्या. येथील समाजव्यवस्थेमध्ये काही दोष आहेत आणि त्यात सुधारणा घडवून आणायच्या, तर काही मूलभूत बदल करावे लागतील याची जाणीव न्या. रानडेंनी करून दिली. येथील समाजातील दोष - उदा. कुपमंडूक वृत्ती, तुटकपणा, ग्रंथप्रामाण्य, जातीभेद, चुकीच्या रुढी-परंपरांना चिकटून राहणे, दैववाद, इतिहासाबद्दलची अनास्था या सर्वांना दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी मांडले. कोणत्याही समाजामध्ये बदल सहजासहजी होत नाहीत, तसेच ते अचानकही होत नाहीत; यावर न्या. रानडेंचा विश्वास होता.
समाजात वेगवेगळ्या मनोवृत्तीचे लोक असतात आणि या सर्वांना बरोबर घेऊन सुधारणा करावयाची असल्याने सुधारणेचे तीन मार्ग त्यांनी सुचवले. समाजातील काही बदल परंपरेचा, धर्माचा आधार घेऊन केले पाहिजेत; काही बदल बुद्धीला पटेल अशा तर्कशुद्ध विवेचनाने घडवून आणले पाहिजेत; तर काही बदलांसाठी प्रसंगी कायद्याची मदत घेतली पाहिजे असे न्या. रानडे मानत.
समाजव्यवस्थेतील बदल ताबदतोब साध्य होणार नाहीत याची त्यांना कल्पना होती. सामाजिक सुधारणेसाठी विविध प्रवृत्तीच्या लोकांना आणि विविध संस्थांना एकत्र आणून सुधारणेस योग्य अशा वातावरण निर्मितीसाठी न्या. रानडेंनी प्रयत्न केले. सार्वजनिक सभेतील त्यांचे कार्य याची साक्ष देते.
भारतातील आर्थिक परिस्थितीचा विचार करताना मुख्यत: तीन गोष्टींवर त्यांनी भर दिला. ब्रिटिश राज्यकर्ते गोळा करीत असलेली खंडणी, व्यापाराच्या बदललेल्या स्वरूपातून होणारी हानी आणि भारतीयांची उद्योगाप्रति असलेली उदासीनता.
ब्रिटिश राज्यकर्ते हिंदुस्थानामध्ये राहून राज्य करीत नसल्याने येथील संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे वाहू लागला. महसूल, इतर कर, अधिकार्‍यांचे पगार, कर्जाचे व्याज इ. मार्फत हिंदुस्थानातील पैसा इंग्लंडमध्ये जात होता. याला न्या. रनडेंनी 'खंडणी' मानले. ब्रिटिश काळात व्यापाराच्या स्वरूपात बदल झाला.
कच्च्या मालाची निर्यात आणि पक्क्या मालाची आयात वाढली. त्यामुळे येथे येणार्‍या पैशापेक्षा येथून बाहेर जाणार्‍या पैशामध्ये वाढ झाली. आकडेवारीच्या सहाय्याने न्या. रानडेंनी हे सिद्ध केले. येथील लोकांची बचत न करण्याची वृत्ती आणि उद्योगाप्रति असलेली उदासीनता यांमुळे येथील पैशाच्या वाढीला चालना मिळाली नाही, असे मत त्यांनी मांदले.
येथील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतकर्‍यांच्या प्रश्नात सरकारने लक्ष घालणे, उद्योगीकरणाला प्रोत्साहन देणे, उद्योग व शेतीवर सरकारचे नियंत्रण असणे, व्यापारात समतोल राखणे इ. मार्ग त्यांनी सुचवले. तत्कालीन विविध आर्थिक विचारप्रणालींच्या सखोल अभ्यासातून त्यांनी, 'हिंदुस्थानची आर्थिक परिस्थिती आणि त्यावरचे उपाय' यावर विवेचन केले.
राजकीय संदर्भात विचार मांडताना कायद्याचे राज्य, कायद्याची अंमलबजावणी, जनतेचे हक्क आणि कर्तव्ये, समानता, संसदेतील प्रतिनिधित्व यांचे महत्व त्यांनी विशद केले. या सर्व गोष्टी प्राप्त करावयाच्या तर जनतेने आवश्यक तर सनदशीर मार्गांनी चळवळ उभी केली पाहिजे असे विचार त्यांनी मांडले. मात्र ही चळवळ टप्प्या-टप्प्याने केली पाहिजे असे मतही त्यांनी मांडले. 'स्वाभाविक विकासक्रमाच्या अनुषंगाने जे नजिकचे उद्दिष्ट्य आपल्या दृष्टिपंथात येईल त्यावर लक्ष केंद्रित करावयाचे आणि औचित्य व व्यासबुद्धी यांच्याशी सुसंगत अशा तडजोडीच्या वृत्तीने ते प्राप्त करून घायचे' असे धोरण ठेवण्याकडे न्या. रानडेंचा कल होता. म्हणूनच, सार्वजनिक सभेच्या मार्फत लोकांना राजकीय शिक्षण देण्याचा त्यांचा मानस होता.
न्या. रानडे हे स्वभावाने नेमस्त व संयमी होते. कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश व अतिरेकीपणा हे त्यांच्या प्रकृतीमध्ये नव्हते, तसेच परंपरेचा धागाही त्यांनी तोडून टाकला नाही. प्रा. गं. बा. सरदार लिहितात त्याप्रमाणे, ' आतताईपणे परंपरेची मोडतोड करण्यापेक्षा संथपणे तिची पुनर्घटना करण्यावर त्यांची भिस्त होती.' मराठ्यांच्या इतिहासाचे परिशीलन करताना न्या. रानडेंची ही भूमिका दिसते.
न्या. रानडे यांच्यावरील पाश्चात्य उदारमतवादाचा प्रभाव, त्यांची समन्वयवादी वृत्ती आणि क्रांतीपेक्षा उत्क्रांतीवर त्यांचा असणारा विश्वास यांमुळे त्यांचे सुधारणेबाबतचे विचार आणि कृती ह्या नेमस्तवादी होत्या. कोणत्याही टोकाला न जाता, जास्तीत जास्त लोकांना बरोबर घेऊन, कोणालाही न दुखावणारे मार्ग त्यांनी स्वीकारले. लोकापवाद वा व्यक्ती दुखावल्या जाण्यापेक्षा वेळप्रसंगी आपल्या तत्वांना मुरड घालणे त्यांनी पसंत केले. कोणत्याही सुधारणेसाठी सक्तीपेक्षा संमतीलाच त्यांनी प्राधान्य दिले.
एकोणिसावे शतक सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भारतीय इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे. मध्ययुगीन परंपरा ते आधुनिक मूल्ये यांच्यातील तो संक्रमणकाळ होता. एकीकडे ब्रिटिश राजवटीला विरोध व त्यासाठी ब्रिटिशपूर्व परंपरेची ओढ आणि दुसरीकडे मध्ययुगीन जीवनपद्धतीला विरोध व त्यासाठी ब्रिटिशकालीन मूल्यांची ओढ अशी दोलायमान स्थिती त्या काळात होती. ब्रिटिश राज्याचे दोष दिसत होते; पण त्यामार्फत येणार्‍या आधुनिक मूल्यांचा स्वीकार आवश्यक वाटत होता. अन परंपरेतील दोष दिसत होते; पण आपल्या स्वराज्याचा उच्चार-आचार आवश्यक वाटत होता. या दोन्हींचा योग्य समन्वय न्या. रानडेंनी आपल्या विचार व कार्यात साधला होता.
ब्रिटिश राज्यातली राजकीय धोरणे, आर्थिक धोरणे, शेतकर्‍यांवरील अन्याय, पाश्चात्य आर्थिक विचारप्रणाली यांविरुद्ध त्यांनी स्वच्छ आणि स्पष्ट मांडणी केली. आणि त्याच बरोबर पाश्चात्य उदारमतवाद, उद्योगशीलता, व्यक्तीवाद त्यांनी तितक्याच स्वच्छ आणि स्पष्टपणे उचलून धरला. येथील चुकीच्या रुढी-परंपरा, ग्रंथप्रामाण्य यांवर बोट ठेवले. आणि येथील मराठ्यांच्या इतिहासाचे अत्यंत संयमित असे परिशीलनही केले. पाश्चात्य संस्कृतीतील श्रेष्ठ मूल्ये स्वीकारताना आपल्या संतपरंपरेचे श्रेष्ठत्वही त्यांनी अधोरेखित केले.
तत्कालिन समाजाची नस त्यांनी बरोब्बर ओळखली होती. ' येथील समाज स्थितीशील आणि पुराणप्रिय आहे. जरा कुठे नव्याचा वास आला की तो बुजतो.' त्यामुळे कोणताही बदल सुचवताना तो नवा आहे असे सांगण्यापेक्षा जुन्या परंपरेचे हे नवे रूप आहे असे सांगण्याचा प्रघात न्या. रानडेंनी पाडला. लोकांच्या श्रद्धा व विश्वास यांचा उपयोग त्यांच्या मतपरिवर्तनासाठी केला, तर समाजपरिवर्तनासाठी ते अत्यंत उपयोगी साधन ठरेल, असे ते मानत.
एकविसाव्या शतकात, आज भारतासमोर पुन्हा पूर्वीसारखी दुही उभी आहे. एकीकडे पाश्चात्यांचे आर्थिक वर्चस्व व त्यातून उदभवणारे तोटे दिसताहेत. परंतु त्यामार्फत येणार्‍या माहिती-तंत्रज्ञानाचा स्वीकार अपरिहार्य आहे. दुसरीकडे येथील 'विकसनशील' परिस्थितीतील अपूर्णता व दोष दिसताहेत. परंतु आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याची ऊर्मीही आहे. या नव्या संक्रमणावस्थेत न्या. रानडेंचे समन्वयवादी, संयमित परंतु अचूक व नि:संदिग्ध विचार मार्गदर्शक ठरावेत. भारतीय संस्कृतीतील सातत्य आणि पाश्चात्य संस्कृतीतील बदल या दोन्हींचा मिलाफ आपण कसा साधू यावर आपला भावी इतिहास अवलंबून राहील.

गुलमोहर: 

लेखातील विचारांशी सहमती दर्शवित असताना मला हेही नोंद करणे गरजेचे आहे की लेखिकेने पहिल्या पॅरामध्ये ज्या थोरांची न्या. रानडे यांच्या परंपरेशी तुलना करताना घेतली आहेत तीमध्ये लोकहितवादी देशमुख यांचाही समावेश होणे नीतांत गरजेचे होते. "प्रार्थना समाज" स्थापनेमागे खरेतर देशमुखांचीच प्रेरणा होती. हिंदु धर्मशास्त्रामध्ये स्त्री ला दिलेल्या दर्जाबद्दल असो वा विधवाविवाह तसेच मुलींच्या सर्वांगिण विकासासाठी त्याना शिक्षण देणे, प्रसंगी सरकारकडे धरणे धरून 'कंपल्सरी प्रायमरी एज्युकेशन' चा मार्ग चोखाळावा लागला तरी तो करावा या उदात्त हेतूने प्रेरित झालेली मंडळी म्हणजे न्या.रानडे, विष्णूशास्त्री पंडित, आत्माराम पांडुरंग आणि गोपाळ हरि देशमुख. याना नंतर गोपाळ कृष्ण गोखले आणि आगरकर येऊन मिळाले.

स्त्री शिक्षणावरून न्या.रानडे आणि लो.टिळक यांच्यात खूप मतभेद होते, पण तो विषय इथे नको.

"कोणत्याही समाजामध्ये बदल सहजासहजी होत नाहीत, तसेच ते अचानकही होत नाहीत; यावर न्या. रानडेंचा विश्वास होता."

~ नक्की. त्यामुळे ज्या सुधारणांविषयी त्याना जास्त तळमळ होती (उदा.स्त्री शिक्षण) तीमध्ये समाजधुरीणांची - किंवा सनातन्याची - प्रसंगी आडकाठी येणार असे दिसत असले तर तिथे तुटेल इतके ते ताणत नसत. मिशनर्‍यांच्यासमवेत चहा प्याले आणि बिस्किटे खाल्ली म्हणून पुण्याच्या गोपाळराव जोशांनी 'धर्मबाह्य वर्तन केले' म्हणून टिळक व रानडे यांच्यावर धर्मपंडितांकडून 'प्रायश्चित' घेतले पाहिजे असे दडपण आणले त्यावेळी जास्त खळखळ न करता रानडे यानी माफीपत्र लिहून दिले व आपल्या सार्वजनिक कार्याकडे तात्काळ लक्ष देऊ केले. त्याना माहीत होतेच की शेवटी [त्या काळातील सनातन्यांची समाजावरा असलेला प्रभाव पाहता] धर्मसभेपुढे शक्ती खर्च करण्यापेक्षा आपले कार्य महत्वाचे.

प्राथमिकच नव्हे तर मुंबई विद्यापीठातील अभ्यासक्रमांची सिलॅबसेस ही जनसामान्याना रुचतील अशी करावी अशी त्यानी आग्रहाची मागणी केली होती. केवळ भाषा नव्हे तर गणित आणि विज्ञान या विषयांचीही सर्व थरावरील विद्यार्थ्यांना गोडी निर्माण होणे किती गरजेचे आहे हे त्यानी सरकारला पटवून दिले होते अन् त्यानुसार विद्यापीठाने आल्या सिलॅबसची नव्याने सादरीकरण केले होते. याचे सर्वे श्रेय न्या.रानडे याना दिलेच पाहिजे.

खूप लिहिता येईल या महान समाजसुधारकाविषयी.

अवल यांचे अभिनंदन आणि आभारही.

अशोक पाटील

मंदार आणि अशोक धन्यवाद !
अशोक >>> पहिल्या पॅरामध्ये ज्या थोरांची न्या. रानडे यांच्या परंपरेशी तुलना करताना घेतली आहेत तीमध्ये लोकहितवादी देशमुख यांचाही समावेश होणे नीतांत गरजेचे होते. <<< घातलेले आहे आधीच, त्यांना कसे विसरेन ? Happy >>>खूप लिहिता येईल या महान समाजसुधारकाविषयी. <<< अगदी अगदी . त्यांच्या प्रत्येक क्षेत्रातल्या कार्याबद्दल कितीतरी अजून लिहिता येईल. आपण लिहिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद Happy

अवल....

प्रतिक्रियेतील भावना आवडल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही म्हणता तसे खूप लिहिण्यासारखे आहे त्या महान विभूतींच्या जीवनधारेविषयी.....आणि शिकण्यासारखे तर आहेच आहे.

अशोक पाटील

छान लेख आहे.
मध्यंतरी टिळकांच्या जिवनावरील कादंबरी "दुर्दम्य" वाचली. त्यामधे असा उल्लेख आहे की टिळकांना रानड्यांची मते पटत नव्हती आणि त्याचा सार्वजनिक जिवनात टिळक हमखास उल्लेख करत, एवढेच नव्हे तर वेळप्रसंगी रानड्यांची मते खोडून देखील काढत असत. असे का असावे ? कधी कधी वाटते की एवढी महान माणसे जर एकत्र येऊन काम करती तर इतिहास काही वेगळाच घडला असता का ?

महेश, खरय. पण टिळक हे प्रथम राजकारणी होते, मग समाजकारणी Happy (कृपया कोणीही हे वाक्य चुकीच्या अर्थाने घेऊ नये ही विनंती ) अन टिळकांचा काळ अन रानड्यांचा काळ यात लौकिक अर्थाने फार अंतर नसले तरी राजकारणाच्या दृष्टीने खुप अंतर होते, त्याचा हा परिणाम असावा.

@ महेश...

टिळक हे 'स्वराज्य प्रथम' ह्या मुद्द्यावर ठाम होते. एकदा स्वराज्य आले की बाकीच्या सुधारणा वगैरे गोष्टी आपसूकच येत राहतील असे ते म्हणत. तर न्या.रानडे, लोकहितवादी, आगरकर याना 'इंग्रजी शिक्षणा'चे महत्व अतोनात पटले होते. त्यांच्या दृष्टीने समाजाला 'सुशिक्षित' करणे ही काळाची गरज असून त्यातही 'स्त्री शिक्षण' ही त्यांच्या दृष्टीने प्रथम प्राधान्याची बाब होती....जिला टिळकांनी कडाडून विरोध केला.

इतिहासकार म्हणतातच की टिळक हे राजकारणाच्या भूमिकेत 'रॅडिकल' तर समाजसुधारणांच्याबाबतील 'कॉन्झर्वेटिव्ह' च होते.

(अर्थात इथे हेही स्पष्ट केले पाहिजे की त्यामुळे टिळकांच्या एकूण कार्याला काहीही उणेपण येत नाही. येणारही नाही. फक्त स्त्री शिक्षणाच्याबाबतीतच त्यांच्या मते आजच्या काळात जुनाट वाटतात, इतकेच. या एका तुलनेपायी न्या.रानडे यांची काळाच्या पुढे जाणारी नजर आपल्याला अचंबित करते.)

चांगला लेख आहे.

कोणत्याही टोकाला न जाता, जास्तीत जास्त लोकांना बरोबर घेऊन, कोणालाही न दुखावणारे मार्ग त्यांनी स्वीकारले. लोकापवाद वा व्यक्ती दुखावल्या जाण्यापेक्षा वेळप्रसंगी आपल्या तत्वांना मुरड घालणे त्यांनी पसंत केले. कोणत्याही सुधारणेसाठी सक्तीपेक्षा संमतीलाच त्यांनी प्राधान्य दिले.>>> असा माणूस राजकारणात नक्कीच यशस्वी झाला असता.

अवल,

खूप चांगला लेख आहे. अगदी न्या. रानड्यांसारखा समतोल! Happy

न्या. रानड्यांचा The Rise of Maratha Power हा ग्रंथ कोण विसरेल? इंग्रजांनी पद्धतशीरपणे शिवाजी दरोडेखोर होत अम्हणून अपप्रचार चालवला होता. महाराष्ट्रात आणि देशभरात स्वकीयांना त्यांच्या उज्ज्वल भूतकाळाची आठवण करून देण्यासाठी या भंपक समजुतीचा प्रतिवाद करणं नितांत आवश्यक होतं. ते कार्य रानड्यांनी सुरू केलं. इ.स. १८३४ साली शिवाजीमहाराजांचे एक चित्रं प्रसिद्ध झालं होतं. तेव्हापासून महाराजांविषयी जनतेत आदरमिश्रित कुतूहल होतं. यास देशभक्तीचे योग्य वळण देण्यात रानड्यांचा सिंहाचा वाटा आहे.

पुढे इ.स. १८९२ साली लो. टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला तेव्हा या धडपडीस मूर्त आकार आला. उण्यापुर्‍या ६० वर्षांचा या वैचारिक लढाही तितकाच रोमांचकारी आहे. महाराजांनी आणि त्यांच्या वंशजांनी औरंग्या पडेपर्यंत उभारलेल्या ६२ वर्षीय (इ.स. १६४५ ते इ.स. १७०७) लढ्याशी तुलना करण्याचा मोह आवरता येत नाही. Happy

रानड्यांचं आर्थिक दुरवस्थेचं आकलन किती योग्य होतं ते वर लेखात आलं आहेच. यातून प्रेरणा घेऊन दादाभाई नवरोजींनी पुढे संशोधन करून Poverty and un-British Rule नावाचा ग्रंथ सिद्ध केला (इ.स.१९०१). नामवंत अर्थतत्ज्ञ कोयाजींनी रानड्यांचं केलेलं मूल्यमापन इथे पाहायला मिळेल. रानडे हे भारतीय अर्थशास्त्राचे पितामह होय.

लेखाबद्दल आभार! Happy

आ.न.,
-गा.पै.

<इंग्रजांनी पद्धतशीरपणे शिवाजी दरोडेखोर होत अम्हणून अपप्रचार चालवला होता. >

मराठ्यांनी इंग्रजांच्या वखारी लुटल्यावर ते मराठ्यांना दरोडेखोरच म्हणणार. त्यांच्या दृष्टीने तो अपप्रचार कसा?

चिनूक्स,

आपले आणि परके हा भेद आहे. आपला तो बाब्या आणि परक्यांचा तो कार्टा ही पद्धत जगात सर्वत्र आचरली जाते. Happy

आपला नम्र (बाब्या),
-गामा पैलवान

अवल - खूपच सुरेख लेख - न्यायमूर्तींचे सर्व कर्तृत्व एवढ्या छोट्या लेखात मांडणे खरंच अवघड आहे - पण खूप छान लिहिलंय....

<तत्कालिन समाजाची नस त्यांनी बरोब्बर ओळखली होती. ' येथील समाज स्थितीशील आणि पुराणप्रिय आहे. जरा कुठे नव्याचा वास आला की तो बुजतो.' त्यामुळे कोणताही बदल सुचवताना तो नवा आहे असे सांगण्यापेक्षा जुन्या परंपरेचे हे नवे रूप आहे असे सांगण्याचा प्रघात न्या. रानडेंनी पाडला<> हे भारी आहे.

Er.Rohit, त्यांना तसे करायला भाग पडले असले तरी त्यांनी त्या आपत्तीचे संधीत रुपांतर करुन रमेच्या आयुष्याचे सोने केले हे आपण सोयिस्कररित्या विसरलात. तेव्हा तुमची मळमळ कृपया इथे तरी व्यक्त करु नका.

चांगला लेख. मला आवडला.

टिळक आधी स्वराज्य मग समाज्सुधारणा ह्या मताचे होते. पहिले स्वतंत्र होवु मग आम्ही आमचं बघुन घेवु. अशी त्यांची धारणा होती. त्यांनी रानडें ना कायम विरोध केला, कारण त्यांना ह्या नव्या विचारांमुळे समाजात आणि त्या योगे लोकांच्यात फुट पडायला नको होती. तिकडे एनर्जी घालण्या पेक्षा सगळं लक्ष स्वातंत्र्य मिळवण्या कडे असलं पाहिजे असे त्यांचे मत होते. समाज विरोध किंवा समाजाचा रोष पत्करुन त्यांना हवे ते प्रबोधन झाले नसते, स्वतंत्र्य लढ्याला लोकांची साथ मिळाली नसती. म्हणुनच परदेशी जाऊन आल्यावर त्यांनी प्रायष्चीत्त घेतले. समाजाच्या रुढी तोडुन, माणसे तोडुन त्यांनी काहीही केले नाही. त्या मागे जास्तित जास्त जनमत मुख्य उद्देशा कडे वळवणे हा विचार होता. त्यामुळे त्यांनी अशा माणसाना कायम विरोध केला.

अनेकदा बोलणे आणि प्रत्यक्ष करु शकणे ह्यात अंतर असते. अनेक अडचणी आणि विघ्न मध्ये येतात. पण जे हातात असते त्याने उदाहरण द्यायचा प्रयत्न रानड्यांनी केला. जसे आपल्या पत्नीला सुविद्य करणे. लोकांत इंग्रजीत भाषण करता येई पर्यंत रमाबाईंची मजल गेली होती. ( दुर्दैवाने आजही अनेक स्त्रीया आहेत ज्यांना इंग्रजी सोडा, आपल्या मात्रुभाषेतही शिक्षण मिळत नाही. कीतिही फुकट शिक्षण दिले तरी " काय करायचय शिकुन?" असा सूर आज ही आहे. ) अनेक विधवा विवाहांना त्यांन्नी प्रोत्साहन दिले.

त्यामुळे त्या काळात काय होवु शकले नाही पेक्षा काय झाले किंवा काय केले गेले. ह्याचा विचार जास्त महत्वाचा आहे. सावित्री बाई फुले, महात्मा फुले, डॉ आनंदि बाई जोशी, रमाबाई रानडे, आगरकर, ह्यांसारखे लोक आहेत म्हणुन आम्ही आज शिकुन इथे नेट वर त्यांच्या कार्याची चर्चा करु शकत आहोत. नाहीतर आम्हीही अजुनही फक्त चार भिंतीं मध्ये राहिलो असतो.

मराठ्यांनी इंग्रजांच्या वखारी लुटल्यावर ते मराठ्यांना दरोडेखोरच म्हणणार. त्यांच्या दृष्टीने तो अपप्रचार कसा?>>>>>

ते आमचा देश लुटत होते, तरी त्यांची वखार लुटली गेल्यावर आमचा शिवाजी "दरोडेखोर"?

आमच्या सारखे त्यांनी अनेक देश लुटले तरी ते साव, त्यांना विरोध केलेले सगळे चोर ?

मोहन कि मीरा .. अनुमोदन

महात्मा फुले, डॉ आनंदि बाई जोशी, रमाबाई रानडे, आगरकर, ह्यांसारखे लोक आहेत म्हणुन आम्ही आज शिकुन इथे नेट वर त्यांच्या कार्याची चर्चा करु शकत आहोत. नाहीतर आम्हीही अजुनही फक्त चार भिंतीं मध्ये राहिलो असतो. >>> ++++++++++ १०००००००

सर्वांना धन्यवाद !
माहितीसाठी काही : ( इथे शिवाजीला एकेरी उल्लेखले आहे, त्यात त्याचा उपमर्द करायचा अजिबात हेतू नाही हे कृपया लक्षात घ्यावे. )
शिवाजी - इंग्रज संबंध - महत्वाच्या घटना :
१. राजापूर वखार, १६६० : १६५९ मध्ये अफजल खानावर विजय मिळवल्या नंतर मराठी फौजा कोकणात उतरल्या. त्यांनी दाभोळपर्यंत मजल मारली. दाभोळचा आदिलशाही अधिकारी राजापूरला पळून गेला. त्याचा पाठलाग करीत मराठी सैन्य राजापूरला पोहोचले. राजापूरचा सुभेदार अब्दुल करीमने घाबरून आपली जहाजे घेऊन पळू लागला. तेव्हा राजापूरच्या इंग्रजांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले. ( कारण त्याने इंग्रजांकडून कर्ज घेतले होते, अन तो पळून गेला असता तर इंग्रजांचा आर्थिक तोटा झाला असता. ) मराठ्यांनी त्याचा ताबा मागितला. परंतु इंग्रजांनी ते मानले नाही. तेव्हा मराठ्यांनी राजापूर वखारीवर हल्ला केला. इंग्रजाचा राजापूरमधील दलाल बालाजी याला मराठ्यांनी पकडले.
२. राजापूर वखार, १६६१: सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला. या वेढ्यासाठी आवश्यक असा दारुगोळा इंग्रजांनी पुरवला होता. शिवाय इंग्रजी सैन्यही या वेढ्यात सामिल झाले होते. पुढे याच वर्षी शिवाजीने राजापूरवरती मोठी फौज पाठवली. आणि राजापूर वखार लुटवली. जमिनीखालची संपत्ती मिळवण्यासाठी पूर्ण वखार खणून काढली. काही इंग्रजी अधिकार्‍यांना मराठ्यांनी ताब्यातही घेतले. पुढे अनेकदा या कैद्यांबद्दल इंग्रजांनी शिवाजीशी पत्रव्यवहार केला. अखेर १६६३ मध्ये या कैद्यांची शिवाजीने सुटका केली.
३. सुरत लूट १६६४ : सुरत लूटताना परकीय वखारी लुटण्याचा शिवाजीचा अजिबात विचार नव्हता. त्यानुसार कोणत्याही वखारीला हात लावला गेला नाही. इंग्रजांच्या वखारी शेजारी हाजी सैय्यद बेग या श्रीमंत व्यापार्‍याचा वाडा होता. त्यामुळे आपल्या वखारीला धोका होऊ नये म्हणून इंग्रजांनी त्याला संरक्षण द्यायचे ठरवले. परंतु मराठ्यांनी हा वाडा लुटला. इंग्रजांनी मराठ्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शिवाजीने निरोप पाठवला की इंग्रजांनी नुकसानभरपाई म्हणून तीन लाख रुपये मराठ्यांना द्यावेत. परंतु त्याबद्दल कोणताच तगादा न लावता मिळालेली लूट घेऊन शिवाजी परतला.
४. सुरत लूट, १६७० : याही वेळेस परकीयांच्या वखारींना धक्का लावला गेला नाही.
५. राजापूर वखार, १६७२ : १६६१ च्या घटनेमुळे राजापूर वखारीचे जे नुकसान झाले होते त्याबद्दल इंग्रजांनी वेळोवेळी शिवाजीशी पत्रव्यवहार केला. अखेर १६७२ मध्ये शिवाजीने पाच हजार होन नुकसान भरपाई देण्याचे तत्वतः कबूल केले.
६. हुबळी वखार १६७३ : आदिलशाहीशी चाललेल्या युद्धा दरम्यान मराठ्यांनी हुबळीची इंग्रजांची वखार लुटली.
७. राजापूर वखार १६७४ : पुन्हा चर्चा होऊन शिवाजीने नऊ हजार होनांची नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. ही भरपाई इंग्रजांनी राजापूरमधल्या जकातीतून इंग्रजांनी ती वसूल करून घ्यावी असे ठरले.
८. राज्याभिषेकाच्या वेळेस १६७४ मध्ये इंग्रजांशी पुन्हा बोलणी झाली. शिवाजीने नुकसान भरपाई देण्याचे तत्वतः कबूल केले परंतु अखेर पर्यंत त्याने ही नुकसानभरपाई दिली मात्र नाही.
या शिवाय काही बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, इंग्रजांनी वेळोवेळी शिवाजीच्या कारभारात हस्तक्षेप केला, शिवाजीच्या अनेक शत्रूंना त्यांनी दारुगोळया पासून सैन्य पुरवण्यापर्यंत मदत केली होती.
या सर्व बाबींचा विचार आपण आजच्या काळात न करता मध्ययुगातल्या संदर्भात विचार केला पाहिजे. त्या वेळची राजकीय परिस्थिती, शत्रू-मित्र या संदर्भातली त्या काळची गणिते आणि मध्ययुगातील राजकारण याचा संदर्भ लक्षात ठेऊन विचार केला पाहिजे.
धन्यवाद.

<ते आमचा देश लुटत होते, तरी त्यांची वखार लुटली गेल्यावर आमचा शिवाजी "दरोडेखोर"?>

ते अधिकृत परवानगी घेऊन व्यापार करत होते. 'देश लुटणं' हे नंतरचं. राज्यबिज्य करण्यात त्यांना मुळीच रस नव्हता सुरुवातीला. आणि त्यांची मालमत्ता लुटणार्‍यांना ते दरोडेखोरच म्हणणार. 'महान देशभक्त' कसे म्हणतील?

>> 'महान देशभक्त' कसे म्हणतील?
बर मग तुम्हाला म्हणायचय काय ? इंग्रज चांगले होते आणि शिवाजी नाही ? Uhoh

Pages