हाण त्याच्या टाळक्यात : नागपुरी तडका

Submitted by अभय आर्वीकर on 4 August, 2011 - 22:42

हाण त्याच्या टाळक्यात : नागपुरी तडका

ऊठ मर्दा ऊठ
आवळून घे मूठ
हाण त्याच्या टाळक्यात
पायामधला बूट

सत्तेपुढे शहाणपण
जेव्हा व्यर्थ जाते
माणुसकीचे लचके तोडून
लाचखोर खाते
पौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

अन्यायाची सीमा जेव्हा
मर्यादेला लांघते
तुझे हक्क तुडवून
तिरडीवर बांधते
शेपटी तेव्हा खाली नको, वाघासारखा ऊठ
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

पोशिंद्याच्या छाताडावर
हरामींच्या मौजा
तेव्हा राज्य करतात
लुटारूंच्या फौजा
सत्ता आणि दलालांची, कर ताटातूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

माय तुझी बैलावाणी
राबराबून मेली
गल्लीमध्ये मुळं अन्
दिल्लीमध्ये वेली
अभयाने शोध घे, कोणी केली लूट
अन्
हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

                                                गंगाधर मुटे
-------------------------------------------------

गुलमोहर: 

मस्त !!

कविता अप्रतिम्,पण खरोखरच बुट हानायची पाळी येते (निवड्णू़क) तेव्हा आम्ही सुट्टी उपभोगत घूट घेत बसलेलो असतो.

मुटेजी,
लई भारी..तुफानी, मर्मावर घाव घालणारी कविता !
या ओळीं वाचुन या पोशींद्याची लेकरं आता नक्कीच आणखीन पेटुन उठतील यात शंका नाही
Happy

नादखुळा, टांगा पलटी घोडे फरार....

मुटेजी , तुमचा तडका नेहमीच लाजवाब असतो... त्यात कवितेला काकांनी दिलेली चाल, व्वा!!!