अस्वस्थ मनाचे किडे

Submitted by सागर कोकणे on 3 August, 2011 - 11:05

माणसाचं मन हे फार चंचल असते. जन्मल्यापासूनच त्याला प्रत्येक गोष्टीचं कुतूहल असते. मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हणतात कारण विचार करणं हे कित्येकदा त्याच्या हाताबाहेर गेलेले असते. असंख्य विचारांनी आपले मन कायम गुंतलेले असते. म्हणून आजचा हा लेख काही अशा गोष्टींसाठी ज्या करायच्या तर असतात किंवा कराव्याश्या वाटतात पण आपणच त्या करणे टाळतो आणि मग अस्वस्थ मनास अजून बेचैन करून सोडतो. याला आम्ही सभ्य भाषेत किडे म्हणतो कारण मनातल्या मनात ते वळवळ करत राहतात. ते असणे तसे फायद्याचेही असते नाहीतर माणूस आळशी आणि मंद बनत जातो. याउलट जो सतत काहीना काही विचारांनी अस्वस्थ राहतो तो पुढे पुढे जात राहतो. ( तत्त्वज्ञान पुरे !)

आपल्याला हवे तसे वागण्याचे आपल्याला स्वातंत्र्य आहे म्हणून एखाद्या क्षणी आपल्याला एखादी गोष्ट करावीशी वाटली तरी ती करता येईलच असे नाही. परीक्षेच्या दिवसात मला नेहमी वाटते की आपण परीक्षेला जातो असे सांगून कुठेतरी दुसरीकडेच फिरायला जावे. परीक्षा न देऊन होणारे नुकसान लक्षात घेतले की आपण शहाण्या मुलासारखे मनास मुरड घालतो. परीक्षा हॉल मध्ये गेलो कि मला नेहमी गाणी गुणगुणावीशी वाटतात पण गाणार कशी ? कविताही सुचतात कधी-कधी पण लिहिणार कुठे ? हातात आलेली प्रश्नपत्रिका सोपी आहे हे पाहून शेजारच्या बाकावरील मित्रास आनंदाने टाळी द्यावीशी वाटली तरी ती देता कुठे येते. परीक्षेच्या दिवसात क्रिकेटची मॅच असणे, आवडता चित्रपट टी. व्ही. वर लागला असणे यासारख्या गोष्टी मनास अस्वस्थ करत राहतात. पण सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडल्या तर 'तडजोड' हा शब्दच जन्मला नसता. 'तडजोड' या एका शब्दापायी माझ्या आयुष्यातील असंख्य आनंदाच्या क्षणांना मुकावे लागते. अर्थात 'याला जीवन ऐसे नाव' असे कुणीतरी म्हटले असेल त्यात याचाही समावेश होत असावा.

पावसात भिजायला कोणाला आवडत नाही ? पण जसजसे वय वाढते तसा पाऊस केवळ येता-जाता भेटून जातो. पावसाच्या पाण्यात होड्या सोडायला, साचलेल्या डबक्यात उड्या मारत पाऊस एन्जॉय करणे आपणच सोडून देतो. एकीकडे हव्याहव्याश्या वाटणार्‍या अशा बर्‍याच इच्छा आपल्या प्रतिमेवर डाग लागू नये म्हणून सोडून देतो. त्यापेक्षा' डाग अच्छे हैं' म्हणत थोडा एन्जॉय केले तर नक्कीच चांगले.

भटकंतीची आवड असणार्‍यांना, विकांतात डोंगरवाटा तुडवणार्‍या पावलांना एकदा निसर्गाचा सहवास लाभला की आपले भौतिक सुखसोयींनी नटलेले आयुष्य सोडून तिथेच ध्यानमग्न कायम राहावे असे वाटणे सहज शक्य आहे. पण करियर,पैसा,घर या गोष्टी पुन्हा मागे खेचतात. अर्थात माघारी परतताना आठवणींचा ठेवा घेऊन परतलो तरी परतल्यावरही मन कुठेतरी 'दूर दूर नभपारच असते'. मग पावसाचे निमित्त साधून पुन्हा पावले तिकडेच वळतात.

मी भटकंतीला गेलो की गड-किल्ल्यांवर कुठे काही नावे लिहून येत नाही पण काहीतरी हरवून येणे, खरचटून घेणे किंवा अशाच लक्षात राहण्यासारख्या गोष्टी करणे हे ना चुकता होते. आणि ते तसे नाही झाले की मग काही मजा नाही. एखाद्या उंच ठिकाणी गेलो कि मला नेहमी तिथून काही तरी फेकून द्यावेशे वाटते. इतिहासाशी नाते जोडणारे गड-किल्ले यांच्या माथ्यावर पोहोचल्यावर तिथल्या वातावरणाशी न जुळणाऱ्या वस्तू म्हणजे मोबाईल, गॉगल्स, कॅमेरे तिथल्या खोल दरीत टाकून द्याव्या असे फार वाटते. या सगळ्या सुखसोयी त्या आनंदापुढे खुजा वाटतात म्हणून टाकून द्याव्याश्या वाटतात पण टाकता येत नाहीत.

सिद्धिविनायकला जायला रात्री कधी घराबाहेर पडलो तर नेहमीचे रहदारीचे रस्ते मोकळे दिसू लागतात. मला नेहमी त्या निर्मनुष्य रस्त्यांवर झोपून जावेसे वाटते. रस्त्याच्या मधोमध आपलेच राज्य असल्यासारखे चालायचे...जगाची पर्वा न करता.कधीतरी बिनधास्तपणे विदाउट तिकीट प्रवास करावा असे वाटते, कधीकधी तोच लोकांना फसवून कमावलेला पैसा गरीबांत वाटून टाकावा असेही वाटते पण असले स्वच्छंदी आयुष्य हवेहवेसे वाटले तरी तसे वागता येत नाही ही खंत आहेच..

मध्यंतरी 'चेतन भगत'चे 'One Night @ call centre' वाचण्यात आले. आपल्या बॉसची धुलाई करणे ही तमाम नोकरदार भारतीयांची फॅंटेसी कशी आहे हे त्यांनी लिहिले होते. या ठिकाणी आपले हात बांधलेले असतात म्हणून ही फॅंटेसी प्रत्यक्षात येत नाही पण कधी असे काही करायला मिळाले तर काय आनंद होईल. हे सगळे मनाचे किडे आपण सभ्यतेच्या बुरख्याखाली दडपतो. हा सभ्यतेचा बुरखा आपली प्रतिमा सांभाळतो पण मनास कुठेतरी बोचत राहतो. वयाला शोभत नाही म्हणून मन मारत आपल्या इच्छाना मुरड घालणे कित्येकांनी केले असेल ज्याची अनेकदा काहीच आवश्यकता नसते.

आयुष्यात आपल्याला हवे तसेच वागायचे असे म्हटले तरी काही बाबतीत बंधने येतातच आणि ती मोडता येण्यासारखी असून ही मोडत नाही कारण आपल्याला त्याचे दुष्परिणाम ठाउक असतात. त्याहूनही फार खटकते ते म्हणजे संगणकाप्रमाणे इथे UNDO करता येत नाही आणि या एका गोष्टीमुळे बरेच आनंद मुकतात. विशाची परीक्षा घेऊ नये असे म्हणतात कारण त्याचे परिणाम आपल्याला ठाऊक असतात आणि शिवाय हेही की ही क्रिया अंडू करून त्याचा परिणाम नाहीसा होत नाही. देवाने आपल्या आयुष्याच्या प्रोग्रॅममध्ये अंडू ला रीप्लेस्मेंट म्हणून 'संयम, सामंजस्य,अनुभव' असे काही गुण दिलेत जे वापरायला कुणालाच आवडत नसावेत.

या सगळ्या गोष्टी थोड्या अशक्यप्राय वाटतात किंवा त्या केल्याने होणारे नुकसान माहित असल्याने आपण त्या करायचे टाळतो पण अशा ही बर्‍याच गोष्टी आहेत ज्या केवळ एका कारणासाठी आपण करावयाचे टाळतो ते म्हणजे 'लोक काय म्हणतील!' . मुलांच्या बाबतीत हा प्रकार कमी असेल पण हा विचार बऱ्याच मुली करत असाव्यात. समाजातील आपली प्रतिमा खराब होऊ नये म्हणून मनातील बऱ्याच इच्छा आपण मनातच ठेवतो. त्या कधी पूर्णत्वास येतच नाहीत. या बाबतीत मुले बहुतेकदा बिनधास्त वागण्यामुळे हवे तसे वागू शकतात आणि त्यांना तसे स्वातंत्र्य देण्यात समाजाला काहीच गैर वाटत नाही.

नवीन फॅशनेबल कपडे घालण्यापासून ते मित्रांबरोबर फिरायला जाण्यापर्यंत सगळीकडे 'लोक काय म्हणतील' याचा विचार केला जातो. डेरी मिल्कची एक जाहीरात आठवली ज्यात ''नीना कुलकर्णी' प्रथमच जीन्स घालून घराबाहेर पडतात. नवीन गोष्टींचा शुभारंभ करण्यासाठी आपल्याला चॉक्लेटची गरज आहे कि लोकांचा विचार न करण्याची. आपल्या आयुष्यातल्या करीअर पासून लग्नापर्यंत कित्येक गोष्टी आपण लोकांचा विचार करूनच ठरवतो आणि ते ही आपल्याला हवे ते करण्याचे स्वातंत्र्य असूनही. हे सारे काही अस्वस्थ करत राहते मनाला तरीही आपण हट्ट काही सोडत नाही.

मी ब्लॉग लिहायला सुरूवात केली त्याचे कारण ही असेच काहीसे आहे. प्रत्यक्ष आयुष्यात ज्या गोष्टी, जे विचार मांडता येत नाहीत ते ब्लॉगवर लिहिता येतात. सोशल साईटस वर जास्त रमणारे लोक एकलकोंडे असतात असे वाचले होते पण आपल्या विचारांशी सहमत होणारे मित्र इथे भेटत असतील जे प्रत्यक्षात कधीच भेटत नाहीत तर त्यात काहीच गैर नाही. ब्लॉगला आपली खुली रोजनीशी म्हणता येईल कारण आपण आपल्या मनातलेच इथे मांडतो पण सगळ्यांसमोर. मनातील घुसमट, मनाची होणारी तगमग यास कुठेतरी वाट करून द्यावी असे वाटले तर त्यात काही वावगे नाही. आणि ही अस्वस्थता असल्यामुळेच तर अजूनही लिहितो आहे. ती कायम राहील याचीही खात्री आहेच त्यामुळे ब्लॉग कडे दुर्लक्ष झाले तरी जेव्हा-केव्हा मनात हे नभ दाटून येतील तेव्हा हा पाऊस इथे बरसत राहीलच.

गुलमोहर: 
शब्दखुणा: