आयआयटी स्वप्न - वास्तव

Submitted by मंजूताई on 2 August, 2011 - 02:56

जुलै महिना म्हणजे पालक व विद्यार्थ्यांसाठी धावपळीचा. अकरावी, अभियांत्रिकी, आयआयटी,वैद्यकीय, परदेशी उच्चशिक्षण अश्या अनेक प्रवेश प्रकिया करण्यात काही यशस्वी पालक-विद्यार्थी दंग आहेत तर आता पुढे काय? हा प्रश्नाने त्रस्त झालेले हताश पालक-विद्यार्थी आहेत. असे हताश पालक आपण केलेल्या कष्टाचा,खर्चाचा, वेळेचा त्याबदलात आपल्या पदरात काय पडले ह्याचा हिशोब मांडत बसले आहेत. मोठं ध्येय असणे हा नक्कीच गुन्हा ठरत नाही. आपल्या पाल्याने उच्च शिक्षित असावं, खूप पैसा कमवावा हे प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं आणि असावंही. एक काळ असा होता पाल्याने एक पदवी (बीए/बीकॉम्/बीएस्सी) एखाद दुसरा चूकून्-माकून किंवा त्याच्या बुध्दीनुसार, इच्छेनुसार डॉक्टर इंजिनीयर झाला तर भरुन पावत होते. काळ बदलत गेला. सरकारी शैक्षणिक धोरण बदलत गेले. सर्वांसाठी तांत्रिक शिक्षण धोरण जाहीर झाल्याबरोबर पावसाळ्यात छत्र्या उगवाव्या तसे जागोजागी अभियांत्रिकी महाविद्यालय जन्माला आली त्याचबरोबर आयआयटी महाविद्यालयांची संख्या दोनवरुन सतरावर गेली. आपलं पाल्याने इंजिनीयर बनाव हे स्वप्न पालकांना पैशाने विकत घेता येऊ लागलं. स्वप्न इंजिनीयर पुरतं सीमित न राहता आणखी मोठं होतं गेलं. आता स्वप्न होतं आयआयटीचं. पाल्याने आयआयटीतून शिक्षण घ्यावं अन थेट अमेरिका गाठावी असं पालकांना वाटू लागलं. हेच चाणाक्ष शिक्षकांनी म्हणावं की दुकानदारांनी हेरलं न शिकवणी वर्गाची द्कानं थाटल्या गेली. हळुहळू शिकवणी वर्गाचंही ब्रंडींग झालं त्याचबरोबर पालकांसाठी इभ्रतीचा प्रश्न. 'ढ' मुलांसाठी शिकवणी किंवा मी शिकवणीला जातो हे सांगायला लाज वाटायची हे कधीच इतिहास जमा झालंय. पण आज मी कुठल्याही शिकवणीला जात नाही हे जर का कोणी सांगितलं तर कोणी विश्वास ठेवणार नाही किंवा वेड्यात तरी काढतील. काही वर्षांपुर्वी दहावी झाल्यावर ह्या शिकवणी वर्गाला प्रवेश घेतल्या जायचा. आज ब्रॅडेड शिकवणी वर्गात प्रवेश मिळवायला चाचणी द्यावी लागते आणि ही चाचणी पार करण्याकरिता नववीपसूनच शिकवणी वर्गाला जावं लागतं. हे जर का असंच चालू राहिलं तर शिकवणी कोणत्या वर्गात लावायची? का ह्याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे, विचार करण्याची गरज आहे. श्री नारायणमुर्ती(इन्फोसिस), श्री अरविंद केजरीवाल(सामाजिक कार्यकर्ते व मॅगेसेस पुरस्कार विजेते), श्री जयराम रमेश(मंत्री) पद्मश्री वॅरीयर (मोटोरोला), चेतन भगत (लेखक) असे अनेक आयआयटीयन्स मुलांचे आदर्श आहेत ही खूप चांगली गोष्ट आहे. पण त्यापाठीमागे निव्वळ पैसा कमवणं हाच एक उद्देश तर नाही ना? मग काय आमच्या मुलांनी आयआयटीचं ध्येय ठेवायचं नाही का?
श्री कुळ्कर्ण्यांनी कर्ज काढून आपल्या एकुलत्या एक तन्मयला दोन वर्ष कोट्याला शिक्षणासाठी ठेवलं. बारावीत चक्क नापास झाला. मुलाला कदाचित अपेक्षित निकाल असावा पण पालकांना मोठा धक्का होता. त्यातून सावरून त्याच्या क्षमतेनुसार व इच्छेनुसार नवीन अभ्यासक्रम निवडून शिक्षण चालू ठेवलं. राहुलने कुठल्याही शिकवणी वर्गाला जायचंच नाही असं ठरवलं होतं. सगळ्यांनी त्याला वेड्यात काढलं पण त्याचा निश्चय पक्का होता. त्याने ठरवल्याप्रमाणे त्यानी स्वाध्याय केला आणि आयआयटी पवईला प्रवेश घेतला. आज 'सुपर थिर्टीचं' आदर्श उदाहरण सगळ्यांसमोर आहे. क्षमता असलेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील तीस विद्यार्थ्यांना ही संस्था घडवत आहे, मार्गदर्शन करत आहे.
आयआयटीचं ध्येय समोर नक्की कोणती कारणे आहेत आपल्या अतृप्त इच्छा-आकांक्षा मुलांवर लादत तर नाही ना? चांगली नोकरी तर चांगली बायको/नवरा? खूप पैसा मिळवणे? परदेशी जाऊन खूप पैसा कमवणे? हे पडताळुन पाहण्याची गरज आहे. गरज आहे मुलांची आवड, त्यांची क्षमता, त्यांची इच्छा ह्या सगळ्यांची सांगड घालण्याची. 'इच्छा तिथे मार्ग' पण प्रश्न आहे इच्छा कोणाची व योग्य मार्ग शोधण्याची.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजू तुम्हाला नक्की काय म्हणायचे ते समजले नाही. लेख खुपच विस्कळीत आहे.

आजतरी आयआयटीत जाण्याची महत्वाकांक्षा भारतातले सगळ्यात चांगले शिक्षण आपल्याला मिळावे आणि आपली उन्नती व्हावी याचसाठी आहे/असावे. आणि उन्नतीची सुरवात ही पैशातच होते ना? एखादा गरिबीने गांजलेला फाटका माणुस जर खुप चांगल्या कविता करत असेल तर त्याच्या टॅलेंटपेक्षा 'अरेरे किती टॅलेंटेड आहे, पण फायदा काय, पैसे नाही कमावता येत त्याला' याचीच चर्चा जास्त होते. त्यामुळे आधी हातात पैसा येणे आवश्यक आहे. त्यानंतरच 'पैशाने सगळे विकत घेता येत नाही' हे वाक्य सहजपणे बोलता येते. गरिब माणुस हे वाक्य नाही बोलु शकत.

आणि आयआयटीत जाणारे सगळेच फक्त पालकांच्या इच्छेखातर जाताहेत हेही पुर्णपणे खरे नाही. माझ्या ओळखीत दोघे आहेत, एक आता ११वी आणि एक १२वीत. दोघेही स्वतःच्या इच्छेने १०ची परिक्षा झाल्यझाल्या आयआयटी एंट्रन्सच्या तयारीमागे लागलेत. ही दोन वर्षे इतर सगळ्या गोष्टी सोडुन फक्त अभ्यास करणार आहेत. आणि हे स्वतःच्या मर्जीने. आयआयटीत जायचे नी त्याच्यानंतरची स्पर्धा वगैरे ही त्यांची महत्वाकांक्षा आहे. त्यांच्या पालकांची नाही.

ह्म्म्म खरच या लेखातुन नक्की काय सांगायच आहे ते कळाले नाही. आयआयटीमधे जाणे योग्य की अयोग्य ? कोणी जावे आणि कोणी जाऊ नये ? की कोणीही जाऊ शकते ?

साधना, महेश,
हा लेख नसून चर्चा प्रस्ताव आहे. आज नववीत जात नाही तो ब्रॅडेड क्लासला प्रवेश मिळावा म्हणून शिकवणी वर्गाला जातात हो त्याच्यासाठी पण परीक्षा द्यावी लागते. क्लासवाल्यांचा फोन येतो तुमच्या पाल्याला अ‍ॅड्मिशन देतोय लगेच प्रवेश घ्या अमुकतमुक सवलत देतो. पालक हुरळून जातात आपला मुलं खरंच हुशार आहे. अनेकवेळा फसवणूक होते. ह्या विषयाची सर्वांगी चर्चा करण्यासाठी एक कार्यक्रम घेतला. प्रवेश घेतलेल्या पालकांची मुलाखत, आयआयटील निवृत्त प्राध्यापकांच मनोगत व संवाद असा कार्यक्रम घेतला. त्याबद्दल लिहीणारच आहे. आपल्या सगळ्यांच मत जाणून घ्यायचं आहे.