मला खात्री आहे : अंतीम

Submitted by विशाल कुलकर्णी on 1 August, 2011 - 07:20

मला खात्री आहे : मागील भाग

आता पुढे........................................

"राणे, वेड तुम्हालाच नाही तर ते लागायची पाळी माझ्यावर सुद्धा आलीय! शिशुपाल आणि सुकुमार ही एकाच व्यक्तीची दोन रुपे आहेत म्हणावे तर शिशुपालला भेटलेली , ओळखणारी माणसे आहेत. तुम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे आश्लेषादेखील त्याला ओळखतेय. सुकुमारच्या असिस्टंटनेही त्याला ओळखलेय. आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला त्याचे प्रेतही तिथेच सापडलेय. काय गोंधळ आहे देवच जाणे? माझे शास्त्रही अपुरे पडतेय इथे राणे."

"डॉक्टर, खरंच तर शिशुपालचा आत्मा नसेल शिरला सुकुमारच्या अंगात?"

"कमॉन राणे. असं काहीही नसतं."

"मग हे काय आहे डॉक्टर? माझाही विश्वास नाहीये असल्या गोष्टींवर. पण मग या सगळ्या अनाकलनीय प्रकारांमागे नक्की काय आहे?"

"सुकुमार खरोखरच एखाद्या मानसिक रोगाने आजारी आहे की मग या जगात खरोखर पिशाच्च, भुत-प्रेत अशा योनीही अस्तित्वात आहेत? की त्याने पद्धतशीरपणे हा प्लान आखलाय."

राणे आणि डॉक्टर बराच वेळ एकमेकांकडे नि:शब्द होवुन पाहात राहीले.

"मी पाहतो डॉक्टर काय करायचे ते? एक कल्पना आहे डोक्यात. माझ्यामते काहीतरी राहून गेलय माझ्या तपासात."

*************************************************************************************

"ते एकुण पाच मित्र होते साहेब. सुकुमार, शिशुपाल, आश्लेषा, शैलजा आणि अजुन एक पाचवा कुणीतरी त्यांच्याबरुबर असायचा. पण तो आमच्या कॉलेजच्या नव्हता. त्यामुळे त्याची कायबी म्हायती नाय बगा आपल्याला. पन ह्ये सगळंजण त्याला राजुल म्हणायचचं. तो पाचवा एम.बी.ए. करत होता हितल्याच कुटल्यातरी कालेजातुन. पण एक मातुर नक्की, या पाचजणांची दोस्तीमातुर येकदम दृष्ट लागण्यासारखी होती."

इन्स्पे. राणे आश्लेषाने दिलेल्या माहितीचा आधार घेवुन सुकुमारच्या कॉलेजमध्ये येवुन पोचले होते. पण कॉलेजमधील बहुतांश स्टाफ बदलला होता. सुदैवाने कॉलेजमधील कदम नावाचा एक जुना प्युन या लोकांना ओळखणारा निघाला होता.

"मी नुकताच चिकटलो होतो साहेब कालेजात. तेव्हा ही गँग सेकंडला होती. फकस्त त्या शिसुपालसायबांनी कालेज मध्येच सोडलं होतं बगा. लै शिरीमंत होतं त्ये घरचं."

"मला एक सांगा कदम, या लोकांमध्ये कधी भांडणं झाल्याचं आठवतय का तुम्हाला?"

तसा कदम एकदम चपापला.

"झालती सायेब. लै मोठी भांडनं झालती. आवो म्हनुन तर शिशुपालसायबाने कालेज मधातनंच सोडलं ना. ते शैलजामॅडमवरनं कायतरी झगडा झाला होता बगा. "

आणि कदम बोलतच राहीला...................

**********************************************************************************************

सोमवार...

माथेरान पोलीस स्टेशन

"सानप, बाईचा मृत्यु कसल्याश्या भयानक धक्क्यानं अचानक हार्ट अटॅक आल्याने झालाय हे पोस्ट मार्टेम रिपोर्ट सांगतोय. पण तो शिशुपालचाही मृत्यु कसलासा धक्का बसुन झालाय हे पटत नाहीये. त्या कदम प्युनच्या सांगण्यानुसार शैली ही अतिशय भित्र्या स्वभावाची होती आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ती एक हार्ट पेशंट होती. एकवेळ जर असे गृहित धरले की हा सगळा प्लॅन शिशुपालचाच होता. तर बर्‍याचश्या गोष्टी जुळताहेत. म्हणजे बघा....

सुकुमार आणि शैलीने मिळुन आपल्याच मित्राच्या, म्हणजे शिशुपालच्या प्रेमभावनांची अतिशय कृर थट्टा केली होती. चार चौघात त्याच्या प्रेमाची टर उडवली होती. त्यामुळे संतापून जावून त्याने सुकुमार आणि शैली या दोघांवर सुड उगवायचे ठरवले. बहुदा त्याने बरीच वर्षे हे सगळे विसरायचा प्रयत्नही केला..त्याच्याच सांगण्याप्रमाणे. पण शेवटी त्याने आपला सुड अंमलात आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आधी तो सुकुमारला भेटला. आपल्या तथाकथित आत्महत्येचे सुतोवाच केले. नंतर त्याने आपला पुढचा प्लान अंमलात आणला. त्याने त्या भागातल्या एका पोलीस इन्स्पेक्टरचा उपयोग करुन घेतला. मी त्या चौकीच्या सबइन्स्पेक्टर शिंदेंना भेटलो. त्यांनी कबुल केलय माझ्याकडे की त्या रात्री त्यांना एक फोन आला होता. त्या अज्ञात फोनकर्त्याने सांगितले की माहीमच्या समुद्रापाशी एक प्रेत पडले आहे. शिंदेंच्या माणसांनी जावुन प्रेत कलेक्ट केले तेव्हा त्याच्या अंगावरील पाकीटात त्यांना ते सुकुमारविषयक पत्र मिळाले ज्यात आपले दहन सुकुमारने करावे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांनी ते प्रेत सुकुमारच्या स्वाधीन केले. मला खात्री आहे की त्या शिंदेला नक्कीच पैसे मिळालेत या प्रकरणात, पण तो कबुल करत नाहीये आणि मी ते सिद्ध करु शकत नाहीये."

"पण राणे साहेब, सुकुमारने ते प्रेत शिशुपालचे म्हणुन कसे ओळखले? जर तो मृत इसम शिशुपाल नव्हता तर सुकुमारने ते लगेच ओळखले असते. मग त्याने ते प्रेत शिशुपालचे म्हणुन कसे स्विकारले असावे?"

"सुडाच्या भावनेने पेटलेला माणुस कुठल्याही थराला जावु शकतो सानप. पैशाची शुशुपालजवळ काही कमी नव्हतीच.मग बहुदा त्याने फेस मास्किंग किंवा तत्सम काही ट्रीटमेंट करुन त्या प्रेताला आपला चेहरा दिला. आणि ते प्रेत सुकुमार आणि कंपनीच्या स्वाधीन केले. आता हे सगळे उपद्व्याप कशासाठी? तर त्याला एक मित्र म्हणुन सुकुमार आणि शैली दोघांचेही विकपॉईंट्स माहिती होते. शैलीचं अतिशय भित्रं आणि हार्टपेशंट असणं आणि सुकुमारचा आजार या दोन्हीची कल्पना त्याला होती. दोन महिन्यापुर्वी मेलेला शिशुपाल जर चालत्या-बोलत्या स्वरुपात अचानक शैलीच्या समोर येवुन उभा राहीला तर नक्कीच तिला प्रचंड शॉक बसणार होता. अगदीच नाही पण एक शक्यता त्या धक्क्याने सुकुमारचा जुना आजार बळावण्याचीही होती. त्या शॉकने अगदीच शैली जरी मरण पावली नाही तरी तिचा खुन करुन तो आरोप त्याला सुकुमारवर थोपता येणार होता. अर्थात सुकुमार आणि शैलीच्या स्वभावाची, विकपॉईंट्सची पुर्ण माहिती असल्यानेच त्याने ही रिस्क घेतली होती. रिस्कच, कारण एक शक्यता अशीही होती की त्याला पाहुन शैली किंवा सुकुमार दोघांवरही अपेक्षीत परिणाम न होता ते नॉर्मल राहु शकले असते. त्या परिस्थीतीत मग कदाचित त्याने एखादा बॅकप प्लान पण तयार ठेवलेला असणारच. पण आपला बॅकप प्लान वापरायची त्याच्यावर वेळच आली नसावी. त्याचा शैली आणि सुकुमारविषयीचा ठोकताळा खरा ठरला. त्याला जिवंत समोर बघून शैली त्याला पिशाच्च समजली आणि त्याक्षणीच हार्ट अटॅक आला तिला. ते बघून सुकुमारचा स्वतःवरचा ताबा सुटला............"

राणे क्षणभर थांबले.

"बस्स सानप. माझे सगळे विचार इथेच येवुन थांबताहेत. कारण यापुढे काय झालं ते फक्त सुकुमार सांगु शकेल आणि तो तर वेड्यासारखाच वागतोय. आज आश्लेषा त्याला घेवुन येते म्हणालीय. पण आजही त्याची अवस्था फारशी सुधारली असेल असे वाटत नाही. देव करो आणि तो नॉर्मल झालेला असो. तो जर नॉर्मल झालेला असेल तर कदाचित काही प्रकाश पडु शकेल रहस्यावर."

"साहेब, त्या पाचव्या माणसाबद्दल काही माहिती कळली का? तो अजुनही गुढच बनुन राहीलाय. अर्थात तो या केसमध्ये कुठेही येत नाहीये. पण कदाचित त्याला काही माहिती असण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाहीये."

"बरोबर आहे तुमचे म्हणणे सानप. आज आश्लेषाला या राजुलबद्दल विचारणार आहेच मी. बघू काय काय उजेडात येतेय ते."

********************************************************************************************

थोड्या वेळाने साधारण ११ च्या सुमारास आश्लेषा सुकुमारला घेवुन चौकीला हजर झाली. सुकुमारची नजर पाहिल्यावर मात्र राणेंची प्रचंड निराशा झाली. त्याच्या डोळ्यात अजुनही तीच वेडसर झलक, भीती कायम होती. त्यांनी आश्लेषाकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहीले. तिच्या नजरेतील निराशा , दु:ख बघून त्यांनी एक थंड सुस्कारा सोडला. हि आशा तर संपली होती. आता राजुलबद्दल काही माहिती मिळाली तरच.

"सानप, त्या कोरगावकरला बोलावले आहेत ना तुम्ही. त्याच्याकडुन कन्फर्म करुन घ्यायचे आहे की त्यांच्या हॉटेलात उतरलेला सुकुमार हाच होता म्हणुन."

"बोलावलेय साहेब, येइलच तो दहा-पंधरा मिनीटात."

"गुड...!"

"आश्लेषा, तुम्ही जेव्हा कॉलेजात होता, तेव्हा तुमच्याबरोबर अजुन एक पाचवा मित्र असायचा. तो सद्ध्या कुठे असतो? तुम्ही त्याच्याबद्दल काही बोलला नाहीत त्या दिवशी?"

एक क्षणभरच आश्लेषाचा चेहरा अगदीच बारीक झाला, पण लगेच तिने सांगुन टाकले.

"सॉरी त्या दिवशी सुकुबद्दल बोलण्याच्या नादात लक्षातच आले नाही. तो राजुल, तो गेली कित्येक वर्षे अमेरिकेत आहे. फारसा संपर्क नाही राहीलेला त्याच्याशी आता. अधुन मधुन ईमेलवर बोलणं होतं तेवढंच."

"कमाल आहे, एवढा जवळचा मित्र आणि अजिबात संपर्क नाही म्हणजे.................."

राणेंनी वाक्य अर्धवटच सोडलं.

"अजिबात नाही असं नाही, म्हटलं ना ईमेलवर असतो अधुन मधुन."

"ह्म्म्म्म.......

तेवढ्यात सुकुमार जोरात उसळला आणि खुर्चीवरुन खाली पडला. तसे आश्लेषा हातातला मोबाईल टेबलवर टाकुन पटकन उठली आणि सुकुमारला उचलायला म्हणुन धावली. राणेही पटकन उठले. उठता उठता त्यांची नजर तिच्या मोबाईलवर गेली. मोबाईल वाजत होता पण आश्लेषाचे त्याच्याकडे लक्षच नव्हते. ती सुकुमारकडे लक्ष देण्यात गुंतली होती. राणेंनी पटकन फोन उचलला तोवर तो कॉल डिस्कनेक्ट झाला होता. पण तेवढ्याने राणेंचे काम झाले होते. त्यांनी पटकन आपला कार्यभाग साधुन घेतला.

"येवु का साहेब?"

कोरगावकर ही येवुन पोहोचले होते. सगळ्यांनी मिळुन सुकुमारला परत उठवुन नीट खुर्चीवर बसवले.

"काय झाले सुकुमार?" आश्लेषाने काळजीने उचलले.

"तो आला होता, मला जोरात ढकलले त्याने. आई गं........" त्याने डोक्याला हात लावला. बहुदा खोक पडली होती. भळाभळा रक्त यायला लागले होते.

"सानप, त्याला फर्स्ट एड द्या आणि लगोलग डॉक्टरकडे घेवुन जा. आश्लेषा तुम्ही जा त्याच्या बरोबर. मी नंतर येवुन भेटतो तुम्हाला दवाखान्यातच. तोवर तिथेच थांबा."

"कोरगावकर..........

"हा तोच आहे साहेब. सुकुमार बापट. पण कसला दिसायला लागलाय. चारच दिवसात त्याची काय अवस्था झालीये साहेब. आला तेव्हा केवढा देखणा दिसत होता. "

"धन्यवाद कोरगावकर, त्याला ओळखल्याबद्दल. खुप काही भोगलय बिचार्‍याने या चार्-पाच दिवसात."

सानप, सुकुमार आणि आश्लेषाला घेवुन जवळच्या दवाखान्यात निघुन गेले. आणखी काही प्रश्न विचारुन राणेंनी कोरगावकरांना जायला सांगितले, तसे कोरगावकर जायला निघाले. तेवढ्यात काहीतरी आठवल्याने राणेंनी खिश्यातुन मोबाईल काढला. क्षणभर आठवुन एक नंबर प्रेस केला.

"..........................." पलिकडून कोणीतरी फोन उचलला.

"हॅलो इन्स्पेक्टर राणे बोलतोय. माथेरान पोलीस स्टेशन...!"

"......................................"

इतक्यात काहीतरी आठवल्याने त्यानी फोन कानापासुन बाजुला केला आणि जवळ उभ्या असलेल्या एका शिपायाला सांगितले...

"कांबळे, तो कोरगावकर अजुन बाहेरच आहे का बघा बरं? त्याला बोलवा जरा !"

परत मोबाईल कानाल लावला...

"हॅलो..." पलिकडुन फोन कट झाला होता.

कांबळे कोरगावकरांना घेवुन आत आले होते.

"हा, साहेब्..काही विचारायचं राहुन गेलं का?"

"एक मिनीट, कोरगावकर. बसा थोडं!"

राणे परत तो नंबर लावायचा प्रयत्न करत होते. पण आता पलिकडचा फोन स्विच ऑफ होता. राणेंनी एक शिवी हासडली आणि फोन बंद केला.

"कोरगावकर, तुमचं पुर्ण नाव काय हो?"

"साहेब..., म्हणजे....... माझं नाव आर. जे. कोरगावकर."

"मी पुर्ण नाव विचारलं तुला राजुल!"

राणेंनी बाँबशेल टाकला तसे कोरगावकर उडालेच.

"माझं नाव राजेंद्र आहे साहेब, राजेंद्र जनार्दन कोरगावकर. राजुल्...कोण?" कोरगावकरांनी उलटा प्रश्न केला.

"याची तपासणी कर कांबळे, याच्या खिशात एक स्विच ऑफ असलेला मोबाईल सापडेल तुला."

कांबळे पुढे सरसावले तसे कोरगावकर धप्पकन खुर्चीत बसले. राणेंनी खुणेनेच कांबळेंना थांबायला सांगितले. समोरच्या टेबलवरचा ग्लास कोरगावकरांच्या समोर केला. कोरगावकरांनी गटागट सगळे पाणी पिवून टाकले.

"कोरगावकर, आता तुम्हीच सगळे सांगताय की मी बोलू?"

राणेंनी एक खडा टाकला, पण त्यांना माहित नव्हते की त्यांनी चक्क विश्वकप जिंकुन देणारा बॉल टाकला आहे.

"ठिक आहे राणेसाहेब. तुम्हाला माझे नाव कळलेय त्या अर्थी सगळेच कळले असावे. ठिक आहे, मी सगळे सांगतो. पण एकच गोष्ट मनापासुन सांगतो राणेसाहेब की सुकुमारने शिशुपालचा खुन केला नाही. आत्मसंरक्षणासाठी म्हणुन त्याने शिशुपालवर एकदम रागाच्या भरात हल्ला चढवला आणि कदाचित त्यामुळेच शिशुपालचा मृत्यु झाला."

कोरगावकरांनी एका दमात सगळे सांगुन टाकले.

"तुम्ही मला सर्व घटनाक्रम जरा सावकाशीने आणि सविस्तर सांगणार का कोरगावकर?"

आपल्या चेहर्‍यावरचा आनंद लपवत राणेंनी अतिशय शांतपणे आपले बेअरींग सांभाळत कोरगावकरांना विचारले. तसे कोरगावकर बोलायला लागले.

"हा सगळा प्लान अतिशय थंड डोक्याने आखण्यात आला होता साहेब. शिशुपाल आपला अपमान, चार चौघात झालेली बेइज्जती मुळीच विसरला नव्हता, उलट अगदी थंडपणे त्याने मधला बराचसा काळ जावु दिला. सुकुमार आणि शैली आता सुखात नांदताहेत याची खात्री झाल्यावर तो आपला सुड उगवायला बाहेर पडला. शैली आणि सुकुमार या दोघांचेही विकपॉईंटस त्याला चांगले माहीत होते."

राणे स्वतःशीच हसले. त्यांची थेअरी बहुदा योग्य मार्गावर होती. कोरगावकरने पुढे बोलणे चालु ठेवले.

"आधी त्याने सुकुमारला भेटून आपल्या आत्महत्येच्या प्लानची बातमी त्याच्या कानावर घातली. सुकुमारच्या या आजाराबद्दल तुम्हाला माहीती आहेच. अशा काही धक्कादायक गोष्टी घडल्या की मग त्याला हा त्रास पुन्हा सुरु होतो. कधी कधी तर तो जाम व्हायोलंट होतो. शिशुपालच्या कल्पनेप्रमाणेच त्याच्या आत्महत्येच्या गोष्टीबद्दल ऐकुन सुकुमार कमालीचा अस्वस्थ झाला होता.

तशात एक्-दोन दिवसात त्याने एक अनोळखी प्रेत त्याच्या चेहर्‍यावर आपल्या चेहर्‍याचा मास्क चढवून पोलीसांमार्फत आमच्यापर्यंत पोचवले. बहुदा तो पोलीस इन्स्पेक्टरही त्याला सामील असावा. कारण त्याने पोस्टमार्टेम न करताच तो मृतदेह आमच्या ताब्यात दिला होता. खरेतर त्याचवेळी आम्हाला संशय यायला हवा होता. पण त्या इन्पेक्टरने 'पोस्टमार्टेम न करण्याची' हमी देत आमच्याकडुनही पैसे उकळले होते. आम्ही घाईघाईत त्या देहाचे अंत्यविधी उरकुन रिकामे झालो. बहुदा शिशुपालचा अंदाज होता की यामुळे सुकुमारचा आजार परत उफाळुन वर येइल. पण त्याचा अंदाज चुकला. आम्ही सगळे बरोबर असल्याकारणाने असेल किंवा शैलीच्या प्रेमामुळे असेल, सुकुमार त्या मानाने खुप लवकर सावरला, पण व्हायचा तो परिणाम झालाच होता. त्या काही दिवसात सुकुमार २-३ वेळा त्या आजाराच्या सीमारेषेवर जावुन आला. शिशुपालचा पहिला वार तरी वर्मी लागला होता.

त्यानंतर आम्हीच मागे लागुन सुकुमारला शैलीला घेवुन कुठेतरी बाहेर जावुन यायला सुचवले. सुकुमारचा कंजुसपणा लक्षात घेता तो कुठेही जायला कचकच करणार हे माहीत होतं. म्हणुन मग मी त्याला माथेरानचं आमचं हॉटेल सुचवलं. तिथेही त्याला कन्सेशन मिळवुन देइन हे कबुल केल्यावर पठ्ठ्या तय्यार झाला एकदाचा. पण बहुदा शिशुपाल आमच्यावर नजर ठेवुनच होता.

त्याने संधी साधली. त्या रात्री कसा कोण जाणे पण हॉटेलच्या स्टाफची नजर चुकवून तो सुकुमारच्या रुमपर्यंत पोचलाच."

मध्येच राणे बोलले....

"पण त्या दिवशी सुकुमारच्या तोंडून शिशुपालचे बोलणे ऐकायला मिळाले आम्हाला. डॉक्टर निंबाळकरांच्या क्लिनीक मध्ये. तेव्हा शिशुपाल म्हणाला की त्याला सुकुमारनेच बोलावले होते. सगळ्यांसमोर तो आणि शैली, शिशुपालची माफी मागणार होते म्हणे."

"शिशुपाल बोलेलच कसा साहेब? तो तर मेलेला होता आणि भुत वगैरे असल्या गोष्टींवर तुमचा विश्वास असेल असे मला नाही वाटत. निदान माझातरी नाही. शैलीच्या मृत्युमुळे सुकुमारचा जुनाच आजार पुन्हा उफाळून आला होता. सुकुमार मुळातच मनाने खुप चांगला असल्याने त्याच्या सदसत् विवेकबुद्धीला शेवटपर्यंत वाटत होते की आपण शिशुपालची माफी मागावी. त्याने तेच डोक्यात धरले असावे व त्या ट्रान्सच्या अवस्थेत तो तसे बोलुन गेला असावा."

कोरगावकरांनी एका दमातच राणेंच्या शंकेचे स्पष्टीकरण देवुन टाकले.

"एनी वेज सॉरी मध्येच डिस्टर्ब केल्याबद्दल, तुम्ही कंटिन्यु करा."

"हा तर त्या दिवशी कसा कोण जाणे पण शिशुपाल अचानक सुकुमारच्या रुमवर येवुन पोचला. सुदैवाने मी तेव्हा सुकुमारच्या रुमवरच होतो. आम्ही तिघेही गप्पा मारत बसलो होतो. दारावर टकटक झाली. शैली दाराजवळच होती. तिने पुढे होवून दार उघडले आणि जोरात किंचाळी मारुन खाली पडली. आम्ही तिला सावरायला पुढे धावलो, पुढे दारात शिशुपाल उभा होता. अंगातले कपडे मळलेले, डोक्यावरचे उरले सुरले शिल्लक केस पिंजारलेले, तशा अवस्थेत त्याचे पुढे आलेले दात खुपच भयानक दिसत होते."

"हॅलो दोस्तांनो, कसे आहात सगळे? मला इथे बघून आश्चर्य वाटलं असेल ना?"

तिथल्याच आरामखुर्चीत टेकत तो बोलला...

"शिशुपाल, तू? अरे पण तू तर...., अरे आम्ही तूला .... म्हणजे त्या प्रेताला......, माझ्या तोंडातून शब्दही नीटपणे बाहेर पडत नव्हते."

"इतक्या सहज आत्महत्या करेन मी? असे वाटलेच तरी कसे तुम्हाला? तो अपमान, ती बेइज्जती विसरलो नाहीये मी. गेली कित्येक वर्षे अक्षरशः रात्रीच्या रात्री जागुन काढल्याहेत मी. झोपच यायची नाही. डोळे मिटले की डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहायचा. अरे वतनदार मार्कंडाच्या नावाने आजही पंचक्रोशीत दरारा आहे. हिंमत होत नाही कुणाची एक शब्द काढायची आणि त्या दिवशी इतके सगळे लोक माझ्यावर हसत होते. माझ्या मुर्खपणाची टर उडवत होते. तो अपमान माझ्या मनावर कोरला गेला होता राजुल. मी सुड घ्यायला आलोय. ते दिवस, त्या झोपेविना घालवलेल्या रात्री..., व्याजासहीत सगळे परत हवेय मला.

अगदी व्यवस्थित प्लान केलं होतं सगळं मी. आधी सुकुमारची भेट घेवुन माझ्या तथाकथीत आत्महत्येचं पिल्लु त्याच्या कानात सोडून दिलं. मग तो मृतदेह मिळवून तुमच्यापर्यंत पोचवला. अरे हाँगकाँगवरुन मास्क तयार करुन घेतला होता त्यासाठी. मग त्या इन्स्पेक्टरला पटवून पोस्ट मार्टेम होवु न देता ते प्रेत तुमच्यापर्यंत पोचवलं. तुम्ही सगळ्यांनी मिळून जड अंतःकरणाने आपल्या जुन्या मित्राला अग्नि दिलात...........!

शिशुपाल वेड्यासारखा हसायला लागला.

"मला माहीत होतं, कमालीची भित्री असणारी शैली आणि हा मनोरुग्ण सुकुमार आपल्या मेलेल्या मित्राला असा जिवंत पाहिल्यावर शॉक होणार. ती तर गेलीच बघ.....! एक काम तर पुर्ण झालं. आता हा सुकुमार.... तो यावर कसा रिअ‍ॅक्ट करतोय ते बघायचं? त्यानंतर तू आणि आश्लेषा आहातच."

आणि तेवढ्यात सुकुमार 'शैली' म्हणत जोरात किंचाळला. मी शिशुपालला सोडून वेगाने त्याच्याकडे धावलो. सुकुमार जोरजोरात शैलीला हलवत होता. शैली जागी हो, जागी हो म्हणून ओरडत होता. शेवटी शिशुपालचा अंदाज खरा ठरला होता. प्रचंड घाबरलेली शैली.... बहुदा तिला हार्ट अटॅक आला असावा. मला काहीच सुचेना. शैली मृतावस्थेत समोर पडलेली. शिशुपाल वेड्यासारखा विजयी मुद्रेने हासत होता. मी सुकुमारला सावरायला म्हणुन हात पुढे केला तर त्याने एका हाताने मला जोरात ढकलुन दिले. या सुकुमारबद्दल मी ऐकले होते पण आधी कधीच पाहीला नव्हता मी हा सुकुमार. त्याच्या अंगात प्रचंड ताकद आली होती बहुदा. एका हाताने त्याने मला बाजुला केले आणि शिशुपालवर तुटून पडला. जोर जोरात त्याने शिशुपालच्या पोटात लाथा-बुक्क्या मारायला सुरुवात केली.

मी भानावर आलो. सगळी ताकद एकवटून सुकुमारला शिशुपालपासुन दुर केले व त्याला धरुन ओढतच माझ्या रुमवर नेले. तोपर्यंत सुकुमारची शुद्ध हरपली होती. मी त्याला माझ्या रुममध्ये झोपवून परत त्यांच्या रुमकडे आलो. ते दृष्य बघवत नव्हते. इतका वेळ हसत खेळत विनोद करणारी सुंदर शैली जमीनीवर वेडीवाकडी होवून पडली होती. त्या धक्क्याने तिचा वासलेला 'आ' आणि भयाने पांढरे झालेले डोळे तसेच उघडे होते. शिशुपाल गलितगात्र होवुन आरामखुर्चीत पडलेला होता. मी पुढे होवुन त्याची नाडी चेक केली. मला ज्याची भीती वाटत होती तेच घडले होते. सुकुमारच्या मारामुळे शिशुपाल जागीच गतप्राण झाला होता. बहुदा एखादा फटका वर्मी बसला असावा."

इथे राणे थोडे चमकले पण त्यांनी कोरगावकरला डिस्टर्ब केले नाही. तो बोलतच होता.

"मला सगळ्यात प्रथम डोळ्यासमोर आला तो पोलीसांनी बेड्या घातलेला सुकुमार. आधीच शैलीच्या मृत्युने तो बेभान झाला होता त्यात पोलीसांनी पकडले असते तर ... तर तो वेडाच झाला असता साहेब. मला दुसरे काही सुचलेच नाही. मला त्या क्षणी योग्य वाटले तो निर्णय मी घेतला. मी ठरवले की सद्ध्यातरी सुकुमारला लपवून ठेवायचे, तो २-३ दिवसात जरा नॉर्मल झाला की नीट समजावून पोलीसांच्या स्वाधीन करायचे. त्याने शिशुपालवर केलेला हल्ला एकप्रकारे आत्मसंरक्षणार्थच होता. कारण शिशुपाल त्या दोघांनाही संपवायचे या उद्देश्यानेच आलेला होता. त्यामुळे आत्मसंरक्षणाच्या मुद्द्याखाली त्याची सुटका करवुन घेणे फार वघड नव्हते. कदाचित थोडीफार शिक्षा झाली असतीही पण या अवस्थेत पोलीसांच्या स्वाधीन करुन त्याला कायमचे वेडे करण्यापेक्षा ती शिक्षा परवडली असती. म्हणुन मग मी एक मित्र या नात्याने मैत्रीचे कर्तव्य बजावले. कायदा धाब्यावर बसवून मी सुकुमारला लपवुन ठेवले. राणेसाहेब, पहिल्यांदा जेव्हा तुम्ही हॉटेलात या केसच्या तपासासाठी आलात तेव्हा सुकुमार माझ्या रुममध्येच होता. माझी रुमची तपासणी करण्याचा विचार तुमच्या डोक्यात येणे शक्यच नव्हते. मी त्या गोष्टीचा फायदा घेतला. नंतर त्या दिवशी लगेच आश्लेषाला बोलावून तिला परिस्थितीची कल्पना दिली. साहेब, सुकुमार आणि शैलीचे लग्न होण्याआधीपासुन आश्लेषाचे सुकुमारवर प्रेम होते. नंतर सुकुमारने शैलीशी लग्न केल्यानंतर ती त्यांच्या मार्गातुन बाजुला झाली होती. पण आमची मैत्री आणि आश्लेषाचे सुकुमावरवरील प्रेम मात्र कायम होते. त्यामुळे ती लगेचच त्याला घेवुन जायला तयार झाली. पण तिच्या प्रेमानेच गोंधळ केला. तिला सुकुमारची तशी वाईट अवस्था बघवेना आणि तुम्हाला कळवले. या अपेक्षेने की त्याची अवस्था बघितल्यावर कदाचित त्याला योग्य ती वैद्यकीय मदत मिळु शकेल. तिच्याशी बोलता बोलता माहिती काढून तुम्ही आमच्या कॉलेजपर्यंत पोचला असावात. सुदैवाने आमच्या गृपचा पाचवा सदस्य अर्थात मी , त्या कॉलेजचा नसल्याने माझ्याबद्दल कुणालाच माहिती नव्हती म्हणुन मी निर्धास्त होतो. पण कसे कोण जाणे तुम्ही माझ्यापर्यंत पोचलात? "

"तुमचीच घाई नडली कोरगावकर ! आश्लेषा आणि सुकुमार तुम्हाला इथे भेटणार होतेच, पण तुम्हाला चैन पडली नाही. तुम्ही आश्लेषाला फोन केलात, त्यावेळी ते दोघेही इथे माझ्यासमोर बसलेले होते. तुमच्या दुर्दैवाने नेमके त्या वेळी परत सुकुमारला तो अटॅक आला आणि त्याला सावरण्याच्या नादात आश्लेषाचे तुमच्या फोनकडे दुर्लक्ष झाले. पण तिचा फोन तिने सुकुमारला सावरण्यापुर्वी टेबलवर टाकला होता. नेमका मी तो बघितला. कॉल 'राजुल'चा होता. मी पटकन आश्लेषाचे लक्ष सुकुमारमध्ये गुंतलेय हे बघून तिच्या मोबाईलवरुन राजुलचा नंबर टिपून घेतला. नंतर जरा निवांत झाल्यावर मी लगेच त्या नंबरवर फोन लावला. सवयीप्रमाणे तुम्ही हॅलो केलेत आणि तुमचा आवाज मी ओळखला. पण मी गडबडीत माझे नाव सांगुन गेलो आणि तुम्ही फोन कट केलात. पण तुमचा आवाज ओळखल्याने मी कांबळेला सांगुन लगेच तुम्हाला परत बोलावले आणि तुम्ही पकडले गेलात. काही गोष्टी योगायोगानेच घडतात कोरगावकर."

राणेंनी हसुन सांगितले तसे कोरगावकरांनी कपाळावरचा घाम पुसला.

"म्हणजे तो पर्यंत तुम्हाला यापैकी काहीच कळाले नव्हते? माझीच घाई झाली तर! पण तुम्ही राजुल म्हणुन हाक मारल्यावर मात्र मी घाबरलो साहेब. आणि त्यामुळे नकळतच सर्व काही कबुल करुन बसलो. पण माझा विश्वास ठेवा राणेसाहेब, प्लीज सुकुमारचा यात काहीही दोष नाही. त्याने जे काही केलं ते सगळं त्या क्षणिक हिस्टेरियामुळे केलं. त्याने ठरवून शिशुपालचा खुन नाही केला. विश्वास ठेवा साहेब. सुकुमार आजारी आहे, खुनी नाही. प्लीज साहेब, आत्मरक्षणाच्या नावाखाली त्याला वाचवता येइल ना?"

"तुम्ही उगीचच हा गोंधळ वाढवून ठेवलात कोरगावकर. त्या अवस्थेत त्याला वाचवणे सोपे होते. कारण तुमच्या माहितीसाठी म्हणुन सांगतो शिशुपालचा मृत्यु सुकुमारच्या मारहाणीमुळे झालेला नाहीये. अगदी पोस्टमार्टेममध्ये मारहाणीचे कसलेच पुरावे किंवा चिन्ह आढळलेले नाहीये. बहुतेक त्या रागाच्या भरात त्याने मारलेल्या लाथा शिशुपालला तितक्या जोराने लागल्याच नव्हत्या. त्याचाही मृत्यु कुठल्याश्या धक्क्याने हार्ट अटॅक येवुनच झालाय. आता त्याने नक्की काय बघीतलय ते तोच जाणे? त्या मुळे तिथेच जर राहीला असता तर सुकुमारची मदत करणे सोपे होते, पण आता तो पळून गेल्याने किंवा तुम्ही त्याला पळवून लावल्याने त्याची बाजु अवघड झाली आहे. पण डोंट वरी...... त्याची एकंदर अवस्था बघता त्याला खरोखर एखाद्या मानसोपचारतज्ञाची गरज आहे. रादर मी तर म्हणेन त्याला काही दिवस एखाद्या मनोरुग्णालयात तज्ञांच्या निरीक्षणाखाली ठेवणे अत्यावश्यक आहे. त्याचा हा आजार त्याच्याबरोबरच त्याच्या आजुबाजुच्यांनाही घातक ठरु शकतो. मी माझ्या परीने त्याची केस मजबुत करण्याचा पुर्ण प्रयत्न करेन कोरगावकर. डॉक्टर निंबाळकरही आपल्या बाजुने साक्ष देतीलच. पण यापुढे लक्षात ठेवा, कुठल्याही परिस्थितीत कायदा हातात घेण्याचा किंवा कायद्याची दिशाभुल करण्याचा विचारही करु नका. या अवस्थेत जर सुकुमारच्या हातुन नकळत का होइना पण जर एखादा गुन्हा घडला असता किंवा अगदी आश्लेषालाच जर काही इजा झाली असती तर ते केवढ्यात पडले असते. त्या परिस्थितीत त्याला मदत केल्याबद्दल तुम्हीही कायद्याच्या कचाट्यात अडकला असता. अर्थात आताही तुम्ही गुन्हेगार ठरलाच आहात पण माझ्यातर्फे मी पुर्ण प्रयत्न करेन तुम्हाला मदत करण्याचा. ऑल द बेस्ट. कांबळे यांना ताब्यात घ्या. आणि सानपांना फोन करुन त्या दोघांनाही म्हणजे सुकुमार आणि आश्लेषा यांनाही ताब्यात घायला सांगा. माफ करा कोरगावकर, पण कोर्टाचा निकाल हातात येइपर्यंत मी तुम्हाला कोणालाच मोकळे सोडू शकत नाही. "

"कांबळे, चहा सांग रे एक, आलं टाकुन द्यायला सांग मावशीला."

राणेंनी सुटकेचा निश्वास टाकला. एक विचित्र केस अनपेक्षीतपणे सहज सुटली होती. डोक्यावरचे ओझे कमी झाले होते.

त्यानंतर २-३ महिने केस चालली. सुकुमारच्या वकीलाने आत्मसंरक्षणाच्या मुद्द्याखाली ही केस चालवली. कोरगावकरांना माफीचा साक्षीदार करुन घेण्यात आले. आश्लेषाचा प्रत्यक्ष असा सहभाग नव्हताच तरीही तीने मदत केली असल्याने तिला कोर्टातर्फे दंड लावण्यात आला आणि सुकुमारची रवानगी पुढील उपचारांसाठी ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये करण्यात आली.

***********************************************************************************************

सहा महिन्यानंतर..........

स्थळ : सुकुमारचे घर. सुकुमार नुकताच बरा होवून घरी परत आलेला होता. पुन्हा एकदा तिघे मित्र सुकुमार, आश्लेषा आणि राजुल उर्फ राजेंद्र कोरगावकर एकत्र जमले होते.

"आयला सुक्या, कसे काढलेस रे हे सहा महिने त्या वेड्याच्या इस्पितळात?"

ग्लासमधली व्हिस्की तोंडात रिकामी करत राजुलने विचारले.

"इप्सित प्राप्तीसाठी बरच काही करावं लागतं मित्रा. जर मी ते सहा महिने काढले नसते तर तुम्ही असे कोट्याधीष झाला असता का राजुलराव? काय आशु?"

सुकुमारने समोरच्या प्लेटमधले खारवलेले काजु तोंडात टाकत आश्लेषाला जवळ ओढले, तशी ती त्याला चिकटलीच.

"खरेच, कसला स्पॉटलेस प्लान होता सुकुमार! हॅट्स ऑफ टू यु बडी, हॅट्स ऑफ.....!! आणि या प्लानमध्ये आम्हालाही सामील करुन कोट्याधीष बनवल्याबद्दल अजुन थँक्स !!"

राजुलने उभे राहून सुकुमारला अगदी नाटकीपणे वाकुन मुजरा केला.

"अरे गेले कित्येक वर्षे या दिवसाची प्रतीक्षा करत होतो. मुळात आश्लेषावर प्रेम असुनही शैलीशी लग्न केले तेच मुळी तिच्या बापाच्या अब्जावधीच्या इस्टेटीवर डोळा ठेवुनच. पण तिच्या बापाचा विरोध होता आमच्या लग्नाला. पण एकदा पाऊल पुढे टाकल्यावर मागे घेणे अशक्य होते, एक ना एक दिवस बापाचे हृदय विरघळेल याची खात्री होती. कारण त्याने सांभाळलेला तो स्वतःला शैलीचा भाऊ म्हणवणारा सुशील, कितीही म्हटले तरी तो उपराच होता. आज ना उद्या म्हातारा पघळणार आणि नाहीच पघळला तर तो गचकल्यावर का होइना त्याची इस्टेट शैलीचीच होणार होती. असाही कॅन्सरचा पेशंट असलेला तिचा बाप फार जगणार नव्हताच. त्यामुळे आशुची समजुत काढून मी शैलीबरोबर लग्न केले. बाप विरोधात असल्याने शैली नोकरी करायला लागली. घरी ती आणि ऑफीसात आश्लेषा, सगळे कसे व्यवस्थित चालु होते. पण अचानक तिला आमचा संशय यायला लागला. तिच्या संशयामुळे आश्लेषाला नोकरी सोडावी लागली. गेल्या वर्षी तिचा बाप मेला तेव्हा मरताना आपली सगळी इस्टेट तिच्या नावाने करुन गेला होता. त्यामुळे आता मला शैलीची गरज उरली नव्हती. त्यामुळे शैलीचा मृत्यु होणे आवश्यक होवुन बसले होते. कारण त्याशिवाय तिची सगळी संपत्ती माझ्या नावाने कशी काय होणार होती? पण तिचा मृत्यु हा माझ्या मुळावर उठायला नको होता.

अशा वेळी शिशुपाल उपयोगी आला. कॉलेजमधला तो प्रसंग.., खरेतर शिशुपालने ते तेव्हाही तेवढे मनावर घेतले नव्हते. तू नही तो और सही, और नही तो और सही अशा वृत्तीचा शिशुपाल त्याला त्या क्षुल्लक अपमानाचे काय वाटणार होते. त्यातुनही तो आपला मित्र होता. त्याच्याशी बोलता बोलताच एक कल्पना डोक्यात आली. शैलीला कायमचे दुर करण्याची!

त्यानंतर सहा महिन्यांनी ठरल्याप्रमाणे शिशुपाल मला भेटायला ऑफीसमध्ये आला. ऑफीसमधल्या आणखी एक्-दोघांना भेटून तो मला भेटायला आल्याचा पुरावा आम्ही तयार केला. नंतर मीच अज्ञात फोनकर्ता बनुन त्या सब इन्स्पेक्टर शिंदेंना फोन करुन त्या मृतदेहाची बातमी दिली. त्या आधी शिशुपालने त्याचे अंडरवर्ल्डमधले काँन्टॅक्ट वापरुन स्वतःचाच एक फेस मास्क बनवुन घेतला होता. ठरल्याप्रमाणे शैलीला बरोबर घेवुन आपण तो मृतदेह म्हणजे शैलीच्या दृष्टीने शिशुपाल तिच्या डोळ्यांसमोरच दहन केला. स्वतःच्या डोळ्यासमोर जाळलेला शिशुपाल पुन्हा जिवंत होवुन समोर आल्यावर हार्ट पेशंट शैलीला भीतीमुळे धक्का बसणार हे गृहितक मांडून हा सगळा प्लान केला होता. झालेही तसेच. शिशुपालला बघितले आणि शैलीला त्या भीतीने हार्ट अटॅकच आला. तरी मेली नव्हती साली. मग मी तिचे नाक तोंड दाबुन तिला संपवले. वर परत तिचा 'आ' वासुन ठेवला जेणेकरुन बघणार्‍याला संशय यावा की काहीतरी भीतादायक बघितल्याने तिला धक्का बसुन हार्ट अटॅक आला असावा. सगळं काही व्यवस्थीत पार पडलं.

"सुकुमार, यार पण त्या डॉक्टर निंबाळकराचे काय? त्याच्या संमोहनाचा तुझ्यावर काही असर कसा झाला नाही.?"

राजुलने विचारले.

"त्याचाही विचार आधीच करुन ठेवला होता रे. कारण मी या आजाराच्या नावाखाली वेडाचे नाटक करायचे असे ठरले होते. त्यामुळे पोलीस तपासणीसाठी संमोहनतज्ञाचा उपयोग करणार हे नक्की होते. त्यामुळे हा शिशुपाल मला ऑफीसमध्ये येवुन भेटायच्या आधी सलग सहा महिने मी संमोहनशास्त्राचे धडे घेत होतो. खासकरुन संमोहनापासुन स्वतःचा बचाव कसा करायचा याचे धडे घेत होतो. त्याचा बरोबर फायदा झाला. तो साला, डॉक्टर निंबाळकर समजत होता की मी त्याच्या संमोहनाखाली आहे. मी मनातल्या मनात त्याच्या मुर्खपणावर आणि माझ्या यशावर हसत त्या अवस्थेचा मजा घेत होतो. खरेतर आधी प्लान असा होता पोलीसांना सांगताना शिशुपालने सहज गंमत केली, पण त्यामुळे भलतेच घडले. शैली प्राणाला मुकली आणि सुकुमारच्या डोक्यावर परिणाम झाला असे स्कुप करायचे ठरले होते. पण शिशुपालच्या आकस्मिक आणि अनपेक्षीत हार्ट अटॅकमुळे झालेल्या मृत्युमुळे सगळाच प्लान चेंज करावा लागला.

पण त्याने फारसे काही बिघडले नाही. पुढची सर्व जबाबदारी तुझी आणि आशुची होती आणि ती तुम्ही जबरदस्त पार पाडलीत. पोलीस चौकीत आलेला तुझा फोन, त्याकडे दुर्लक्ष करुन आशुचे माझ्याकडे झेपावणे, झेपावताना फोन इनस्पेक्टरच्या समोर त्याला सहज दिसेल असा टाकणे..... कसलं बेमालुमपणे केलस तू आशु हे. त्या येड्याला जरासुद्धा संशय आला नाही. तो स्वतःचीच पाठ थोपटत बसला. खरेतर हे आपण ठरवल्याप्रमाणेच घडत होते. अगदी त्या कॉलेजच्या कदम प्युनला पैसे देवुन आपल्याला हवी ती माहिती राणेपर्यंत पोचवण्याचे कामही.

"एवढं सगळं करुन, आपल्याच बायकोचा पद्धतशीरपणे थंड डोक्याने खुन करुनही कोर्ट म्हणतं. "बिच्चारा सुकुमार!" कोर्टाला म्हणे त्याची दया येतेय.....

"सगळ्यात मोठा विनोद होता रे तो!"

आश्लेषा तो प्रसंग आठवून आठवुन हसायला लागली.

"पण एक गोष्ट कळली नाही यार........"

हातातला ग्लास पुन्हा एकदा भरत सुकुमारने प्रश्नार्थक चेहरा करत विचारले....

"काय रे?" काजुचा बकणा तोंडात टाकत राजुल म्हणाला.

"यार एक गोष्ट लक्षात नाही. एरव्ही एवढा ठणठणीत असलेला शिशुपाल, त्याला त्या दिवशी अचानक हार्ट अटॅक कसा काय आला असावा?"

"येस यार सुकुमार, मलाही तेच कोडं पडलंय. जसं आपलं ठरलं होतं त्याप्रमाणे शैलीचा मृत्यु झाला की मी गपचुप तुला माझ्या खोलीत पोचवले. त्यानंतर हॉटेलचा अंदाज घेवुन मला शिशुपालला तिथुन गुपचुप बाहेर काढायचे होते. मी ठरल्याप्रमाणे रस्ता साफ केला आणि शिशुपालला फोन केला बाहेर ये म्हणुन सांगण्यासाठी, तर हा बाबा फोन उचलायलाच तयार नाही. म्हणुन मी परत रुमवर गेलो. तर मघाशी हसत असलेला शिशुपाल तिथेच आरामखुर्चीत आ वासुन पडला होता...अगदी शैलीप्रमाणेच. त्याचे डोळे जणु काही भीतीने साकळलेले! आपण त्या रुममधुन बाहेर पडल्यावर नक्की काय झाले कुणास ठाऊक...! पण मी लगेच निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे फ़ार विचार न करता त्या रुमचा दरवाजा आतून लावुन घेतला. आपल्या प्लानींग प्रमाणे तुझी रुम बरोबर माझ्या रुमच्या खालीच होती. बस तू माझ्या खोलीतुन लटकवलेल्या दोराला धरुन खिडकीच्या मार्गाने मी वर माझ्या रुममध्ये पोहोचलो. राहता राहीला प्रश्न खिडकीचा पण तिची खालची खिट्टी जरा लुज आहे. खिडकी जोरात लावुन घेतली की खिट्टी खाली पडते आणि खिडकी आतुन बंद !"

"ह्म्म्म ते गुढ मात्र कायम सतावत राहील यार. शिशुपालचा आकस्मिक मृत्युचे कारण काय असावे? त्यांचे काय पाहीले असावे की भीतीने त्याचे प्राणच गेले?"

सुकुमारने ग्लास तोंडाला लावला.....

...

...

"मी सांगु? मला एक सांग सुकु..., तुला जर तुझी पाच मिनीटापुर्वी मरण पावलेली, म्हणजे तुच मारलेली बायको... खिडकीपलिकडे, त्या अंधार्‍या दरीत, अधांतरी तरंगत खिडकीच्या बाहेर दिसली असती, तीने जर तुला," ए सुकुमार, खिडकी उघड ना रे, इथे बाहेर खुप थंडी आहे." अशी विनंती केली असती तर तुझे काय झाले असते?

मी सांगते.. तुला अगदी खात्रीने हार्ट अटॅक आला असता. जसा शिशुपालला आला. नक्की.... मला खात्री आहे!"

...

..

..

आवाज वरच्या बाजुने येत होता. सुकुमारने एकदमच डोक्यावरच्या छताकडे पाहीले. छतावरचा पंखा पुर्ण वेगात गरगर फिरत होता आणि पुर्ण वेगात फिरणार्‍या त्या पंख्यावर बसुन शैली तिघांकडे बघून जोर जोरात हासत होती....

"Now, it's your turn my dear hubby !! तुझ्यानंतर त्या दोघांची पाळी. तू इकडे आलास की मग एकेकाला मी दिसायला लागेन."

सुकुमार 'आ' वासुन पंख्याकडे पाहात होता. राजुल आणि आश्लेषा वेड्यासारखे एकदा त्याच्याकडे तर एकदा फिरणार्‍या त्या पंख्याकडे पाहात होते. कुणास ठाऊक सुकुमारच्या डोळ्यांना दिसणारे दृष्य त्यांना कधी दिसणार होते?

तुम्हाला दिसत्येय का काही.......? म्हणजे पंख्यावर बसलेली शैली? नसेल तर तुम्ही सेफ आहात....

निदान सद्ध्यातरी..!!

fan.jpg

समाप्त.

गुलमोहर: 

@ निळुभाऊ :
<<<शिशुपालला बघितले आणि शैलीला त्या भीतीने हार्ट अटॅकच आला. तरी मेली नव्हती साली. मग मी तिचे नाक तोंड दाबुन तिला संपवले.>>>>

हार्ट अटॅकची बेसिक लक्षणे म्हणजे छातीत वेदना सुरु होतात, अंगाला थंडगार घाम सुटतो, श्वासोच्छास अनियमीत होतो आणि छातीच्या ठोक्यांचा वेग अनियमीत होतो. त्यामुळे अशा अवस्थेत पेशंटला छातीवर मसाज करणे, कृत्रीम श्वासोच्छास देणे असे प्राथमिक उपचार दिले जातात. हार्ट अटॅकचा परिणाम कमी होण्यासाठी. त्या ऐवजी तर पाच मिनीट जरी त्या व्यक्तीचे नाक आणि तोंड दाबुन धरले तरी हार्ट अटॅकची तीव्रता अजुनच वाढते आणि त्या व्यक्तीचा मृत्यु होवु शकतो. सुकुमारने नेमके तेच केलेले आहे. नाक-तोंड दाबले म्हणजे काय लगेच उशी वगैरे तोंडावर दाबलेली नाहीये. जो माणुस प्रत्येक शक्यतेचा एवढा विचार करतोय, मुळात म्हणजे तिचा मृत्यु हार्ट अटॅकने आला असेच त्याला दाखवायचे तो एवढासा विचार करणार नाही का? त्यामुळे झाले एवढेच की शैलीच्या हार्ट अटॅकची तीव्रता अजुन वाढली आणि तिचा मृत्यु झाला. म्हणजे मृत्युचे कारण हार्ट अटॅकच येणार. कारण नाक फक्त दोन बोटाच्या चिमटीने दाबले आणि एका हाताने तोंड दाबुन धरले तरी पुरेसे आहे. (अर्थात त्या व्यक्तीला ऑलरेडी हार्ट अटॅक आलेला असताना, नॉर्मल व्यक्तीवर तेवढे पुरेसे पडणार नाही) एक लक्षात घे मित्रा, इथे नाक-तोंड दाबण्याची क्रिया ही फक्त हार्ट अटॅकची तीव्रता वाढवण्यासाठी केलेली आहे. त्यामुळे पोस्ट मार्टेममध्येही मृत्युचे कारण हार्ट अटॅक असेच दाखवणार.

पोलीसांच्या वरताण पोस्टमार्टम माबो कर करतात राव>>>>>>>> Lol

एक लक्षात घे मित्रा, इथे नाक-तोंड दाबण्याची क्रिया ही फक्त हार्ट अटॅकची तीव्रता वाढवण्यासाठी केलेली आहे. त्यामुळे पोस्ट मार्टेममध्येही मृत्युचे कारण हार्ट अटॅक असेच दाखवणार.>>>>>>>>>> रच्याकने, विशाल इतके डिटेल्स देवु नकोस रे.... उगाच चाफा यावरुन एखादी कथा लिहुन तुला गोवेल त्यात.... Light 1 Light 1

विशल्या, जबरी रे ! पण मी केलेला अंदाज खरा ठरला की नाय भाव? Wink
एंडवा बहुत बढीया Happy गफलतची जोरदार आठवण दिलीस Happy

विशाल, छान फुलवली आहेस कथा.. मस्त.. इंटरेस्टिंग.. पहिले २ भाग जास्त आवडले.. Happy
पुढची कथा टांगत ठेवून लिहू नकोस प्लीजच.. उत्सुकता कमी होते मग. रोज एक तरी भाग टाकायला तयार असला पाहिजे, ओके? Happy

मस्त झाली आहे मालिका.

विशालराव अर्थात द्वीस्ट मास्टर आपले अभिनंदन !

Happy कथा आवडली पण मलाही पहिले दोन भागच जास्त आवडले.

रच्याकने, तुझ्यापासून सावध रहायला हवं फार विचार करुन खुन करवुन घेतोस तू कथेतल्या पात्राकडून Wink

धन्यवाद मंडळी !
दक्षे, तुझ्या प्रश्नाचं उत्तर .....
पुढच्या भयकथेची नांदी आहे ती. त्यात येतीलच सर्व कारणे Happy

Pages