"आमचा छकुला" -- एक संवाद शिल्पा आणि श्रीपादशी

Submitted by हेमांगी on 29 July, 2011 - 20:48

अपत्यप्रेम किंवा वात्सल्य ही एक सार्वभौम संवेदना आहे. या अनेकपदरी ,अनेकरंगी भावनेचे सारेच आविष्कार मनमोहक असतात. पण कधी कधी अशा सनातन संवेदनांची एखादी छटा जणू नवा अर्थ घेऊन येते!
आपले दोन मायबोलीकर मित्र नुकतेच दुसर्यां दा पालक बनले आहेत. एका मुलीच्या जन्मानंतर दुसरं मुल दत्तक घेण्याचा त्यांचा विचार त्यांनी प्रत्यक्षात आणला आहे! काही महिन्यांपूर्वी दीपांशू त्यांच्या घरी, त्यांच्या जवळ आला आहे. ! त्यांचा हा विचार, आणि हा अनुभव याविषयी त्यांनी मायबोलीकर मित्रांशी बोलायलाच हवं असं मला वाटलं!
मायबोलीकरांसाठी त्यांच्याशी साधलेला हा संवादः

सर्वात प्रथम, मुलाखतीच्या सुरुवातीला मला तुमचं मायबोलीतर्फे या निर्णयाबद्दल अभिनंदन ! हा वेगळा विचार केल्याबद्दल आणि तो अंमलात आणल्याबद्दल! आणि त्याच अनुषंगानं पहिला प्रश्न, की या विचाराची सुरुवात कशी झाली-- दोघांपैकी कुणी केली?

शिल्पा - सुरुवात झाली ती आम्ही दोघं भेटलो तेव्हा! कारण आम्हा दोघांनाही independently मुल दत्तक घेण्याचा विचार मनात आलेला होता-- आपण आपल्या आयुष्यात कधीतरी हे पाऊल उचलावं असा. आम्ही दोघं भेटलो तेव्हा एकमेकांशी बोलताना हा विषय निघाला आणि दोघांचंही यावर एकमत झालं होतं!
म्हणजे लग्न होण्याआधीच तुम्ही हा निर्णय घेतला होतात?
श्रीपाद- हो! आम्हाला तेव्हा हे लक्षात आलं की दोघांनाही असं वाटतय तेव्हाच आपोआप हा निर्णयही घेतला गेला.

अरे वा! असा वेगळा विचार मनात आलेले तुम्ही दोघे एकमेकांना भेटणं हा एक मोठा योगायोगच म्हणायला हवा! शिल्पा, मला तुझा मायबोली वर प्रकाशित झालेला एक लेख अजून आठवतो. "काही गुड न्यूज?" या शिर्षकाचा. प्रत्येक जोडप्याला मुल पाहिजेच असा समाजाचा आग्रह असतो त्याविषयी तुझी मतं त्यात मांडली होतीस. पुन्हा सांगशील का त्याविषयी?

शिल्पा- लग्न झाल्यावर दोन्-तीन वर्ष झाली की लोक मुलाविषयी विचारायला लागतात. मला वाटतं की मुल होऊ देणं आणि ते कधी व्हावं हे दोन्ही निर्णय वैयक्तिक असावेत. लोकांकडून ते लादलं जाऊ नये.सामाजिक जबरदस्ती होऊ नये. कारण या बाबतीत आम्ही थोडे वेगळे होतो कारण तेव्हा आमचं लग्न होऊन पाच वर्षं झाली होती. आणि आरोहीचा जन्म झाला तो त्यानंतर दोन वर्षांनी .

बरोबर! पण मग आरोहीच्या जन्मानंतरही तुमचा दत्तक मुलाचा विचार पक्का होता का?

दोघंही: हो!
श्रीपादः हो!कारण आधीपासून आम्ही असंच ठरवलं होतं, की एक मुल होऊ द्यावं आणि एकाला दत्तक घ्यावं!

अरे वा! दत्तक मुल घेण्याचा विचार करण्याच्याही तुम्ही एक पायरी पुढे गेलात असं मला वाटतं! आणि याबद्दल खरोखरी कौतूक करायला हवं तुमचं!

श्रीपाद- हो म्हणजे, वेगळा काही option मनात आलाच नाही. आम्ही अगदी ठरवल्याप्रमाणेच केलं.
शिल्पा- कारण लग्नाआधी आम्ही बोललो असं म्हटलं, ते असंच ठरवलं होतं की एक मुल होऊ द्यायचं आणि एकाला दत्तक घ्यायचं.त्यामुळे वेगळा काही विचार करणे,मतभेद होणे असं नाहीच झालं!

पठडीच्या बाहेर जाऊन असं वेगळं पाऊल उचलण्याचं तुमचं तर ठरलं होतं--पण जेव्हा तुम्ही निर्णय जाहीर केलात तेव्हा तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या काय प्रतिक्रीया झाल्या?

श्रीपाद- घरी सुरुवातीला थोडा विरोधी सूर लागला. हे कशाला, शक्यच नाही होणार इथपासून ते, त्यापेक्षा पाहीजे तर तुम्ही एखाद्या मुलाच्या शिक्षणाचा वगैरे खर्च करा पर्यंत बरीच मतं मांडली गेली. आणि तो जवजवळ १-१.५ वर्षाचा काळ आम्हालाही हे पटवून सांगण्यात गेला. त्यांना conceptually पटलेलं होतं पण प्रत्यक्षात आणायची वेळ आली तेव्हा विरोध झाला!

मला वाटतं, तो विरोध दत्तक घेणे या concept ला नसेल-- आता आरोही झाली , तेव्हा दुसरं मुल दत्तक घेतलं तर सारी समीकरणं बदलतील असं वाटलं असेल आणि तसं वाटणंही साहजिकच आहे!

शिल्पा- खरं आहे. 'मन चिन्ती ते वैरी न चिन्ती 'म्हणतात त्याप्रमाणे, सारे सवाल सगळ्यांच्याच मनात आले असणार. पण आम्ही मात्र पक्क ठरवलं होतं त्यामुळे आम्ही अजिबात गडबडून गेलो नाही!
श्रीपाद - आणि त्यांना हे बरच आधी सांगितलं होतं आम्ही, तर त्यामुळेही फायदा झाला- कारण एकूण परिस्थिती लक्षात घेता, आम्हाला असं वाटलं की यावर उपाय असा काही नाही--वेळ जाऊ देणे हेच उचित ठरेल. काही नातेवाईकांकडून असं ऐकलं, की त्यांना आमचं हे मत पटलेलंच नव्हतं कधी पण आम्हाला वाईट वाटेल म्हणून प्रत्यक्ष वेळ येईपर्यंत बोलले नव्हते! खरं तर हे बरोबर उलट असायला हवं.आणि आम्हाला हेही जाणवलं की काहींना हा विचार पटवून घ्यायला जास्त वेळ द्यायला लागला. उदाहरणार्थ,माझी आई बर्याापैकी लवकर तयार झाली पण माझ्या बाबांना मात्र वेळ लागला.
शिल्पा - पण मग मात्र ते अगदी मनापासून involve झाले. दीपांशूलाच घरी आणायचं असं आमचं ठरलं तेव्हा तो आम्हा सगळ्यांचा निर्णय होता!
श्रीपाद- आम्ही जेव्हा ओरीसाला दीपांशूला भेटायला गेलो तेव्हा ते आमच्या बरोबर होते.त्यांचा मानसिक आणि प्रत्यक्ष सहभाग होता प्रत्येक वेळी.
शिल्पा - आणि आम्हाला पुन्हा एकदा ओरीसा दौरा करावा लागला तेव्हाही सासूबाई इथे येऊन राहिल्या आरोहीला त्यांच्याकडे ठेऊनच आम्ही गेलो होतो- त्यांची मदत नसती तर हे शक्यच झालं नसतं!

तुम्हा दोघांच्या या उत्फुर्त प्रतिसादावरून तुमच्या भावना अगदी लक्षात येताहेत्.मला वाटतं, आधी पटलं नसतानाही, नंतर हा विचार इतक्या मनापासून स्विकारणं - हे खरच कौतुकास्पद आहे! तर शिल्पा तुझ्या घरात तर तुझ्या भावानेही मुल दत्तक घेतलेलं असल्यामुळे, हा विचार रुजलेला आहे ना? तिथे काय अनुभव आला तुला?

शिल्पा- तू मघाशी म्हणालीस तसं, थोडा विरोधी सूर असला तर हाच होता, की आता एक मुल असताना, दत्तक मुल घेणं अवघड जाईल--
श्रीपाद- Frankly, आम्ही पण हा विचार केला--म्हणजे "नको" असं कधीच वाटलं नाही, पण या point वर आम्ही थोडे बोललो आणि आम्हाला जाणवलं की आम्ही दोघंही मनःपूर्वक तयार आहोत. त्यामुळे, मागे फिरण्यासाठी काही कारणच नव्हतं!
दोघांचाही १००% सहभाग हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे.कारण आमचा जेव्हा Home Study चालू झाला, तेव्हा हा मुद्दा पुन्हापुन्हा ते अधोरेखित करत होते, की निर्णय दोघांनी जोडीने घ्यायचा आहे-- दोघांपैकी एकाची थोडीही काही शंका असेल तरी पुढे जाऊ नका!

या home study procedure बद्दल सविस्तर विचारणारच आहे पण त्यापूर्वी माझा एक प्रश्न आहे आरोही बद्दल. मी आरोहीला ओळखते त्यामुळे मला कल्पना आहे तिची प्रतिक्रिया काय असेल त्याबद्दल. तर त्याविषयी सांगा जरा.

शिल्पा- ती अगदी प्रचंड खूष होती, वाट बघत होती. तिने तिच्या शाळेत जाहीर पण करून टाकलेलं होतं, की आमच्या घरी छोटा भाऊ येणार आहे! पण आम्ही दीपांशू ला घरी आणायचं ठरवल्यापासून ते प्रत्यक्षात तो येईपर्यंत वेळ लागणार होता--आणि आमच्या अपेक्षेहून जास्तच लागला तो वेळ! तर आम्हाला वाटत होतं की तिला आयत्या वेळीच सांगावं- पण सोशल वर्कर ने आम्हाला सांगितलं की तसं नाही. सगळ्या process मध्ये ती सामिल असणार तेव्हा तिला सर्व timeline माहीत असायला हवी! म्हणून तिला आम्ही सांगितलं होतं, की तू पहिलीत जायला लागलीस की त्या वर्षात कधीतरी तुझा भाऊ घरी येणार आहे! आणि मग ती खूप वाट बघत होती!

मग हे home study म्हणजे काय असतं? कोण गोळा करतं ही माहिती?

श्रीपाद- भारतातून मुल दत्तक घ्यायचं होतं आणि भारत देशाला "Hague" या संस्थेचं certification आहे. त्यामुळे "Hague" च्या दत्तक संबंधी नियमांचं आम्ही पालन केलं. भारतातलं मुल असल्यामुळे, भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या "authorized list" वर असलेली "adoption agency" निवडायची. आम्ही International Family Services यांच्याशी निगडीत होतो. आणि मग त्यांच्यातर्फे Adopt International या San Francisco based संस्थेने आमच्या केसचा home study केला. त्यांनी पाच interviews घेतले. आमचा दोघांचा वेगवेगळा, मग दोघांचा एकत्र, आरोहीचा एक आणि शेवटी घरी येऊन सगळ्यांशी बोलतात. एका दृष्टीने खात्री करून घेण्यासाठी की घरातल्या सर्वांनी एकमताने निर्णय घेतलेला आहे ना? नवरा-बायको या दोघांनाही कोणताही संदेह नाही ना? ते सांगतात की कुणालाही जराही शंका असेल तरी मग पुढे जाऊ नका.
शिल्पा: ते काही प्रमाणात तुम्हाला वाचायचा प्रयत्न करतात या interviews मधून. social worker नंतर write up लिहिते तो तुमचा psychological write up असतो.
श्रीपाद - हो कारण तोच तर त्यांचा उद्देश असतो. Home study ते फार काटेकोरपणे घेतात -- दत्तक मुलाचा विचार नीट केलाय ना आणि सर्व कायदेशीर बाबी पूर्ण होताहेत ना वगैरेही ते तपासतात. भारतातून दत्तक घेताना, अनेक documents द्यावी लागतात्.एकूण अगदी strict process आहे ही! कारण शेवटी एका मुलाच्या भवितव्याचा हा प्रश्न असतो.
दिपांशूच तुमच्या कुटुंबात कसा काय आला? कसं ठरवलत हे? जरा त्याविषयी ही सांगा.
शिल्पा- तुम्ही त्यांना सांगावं लागतं की तुमच्या अपेक्षा काय आहेत. हे कसं ठरवायचं? तर मग आम्ही जेव्हा आरोहीच्या डॉक्टरांशी सलामसलत केली तेव्हा त्यांनी असं सुचवलं की असं मुल निवडा की ज्याला वाढवताना आरोही कडेही नीट लक्ष पुरवता येईल. त्यानुसार आम्ही ठरवलं की साधारण दोन वर्षांच्या आतलं आणि special needs नसलेलं मुल असावं. एवढच. बाकी काहीच नव्हतं.

मग त्यांनी हा मुलगा--म्हणजे दीपांशू तुमच्यासाठी सुचवला का?

शिल्पा - हो. तुमच्या Home study चा report, तुमचे निकष यानुसार ते त्यांच्या जवळ असलेल्या मुलांचा तुम्हाला referral पाठवतात. त्यात बाळाचा फोटो आणि माहिती असते.medical record असतं.पण एकदम बरेच नाही पाठवत. एका वेळी एकाच मुलाची माहिती पाठवतात. त्या मुलाची तुम्ही निवड नाही केली तर दुसरं referral येतं.
श्रीपाद-आम्हाला आलेलं हे पहिलच referral. आम्ही विचार केला तो हाच ,की आपण याला नीट वाढवू शकू ना? मुल ओरिसातलं आहे त्या मुद्द्यावर काय थबकलो असू तेवढच -- पण एकूण आमच्याकडून निर्णय लगेच झाला!

ते खर-पण एकूण ही सारी प्रक्रिया गुंतागुंतीची आहे.किती वेळ लागला दीपांशूला कायदेशीरपणे घरी आणायला?
श्रीपाद-हो ना! २००८-ते २०१० बरोब्बर दोन वर्षं लागली! आम्ही तर दीपांशूला घरी आणायला अतिशय उत्सूक झालो होतो. खरं सांगायचं तरआमची त्याच्यामध्ये मानसिक involvement खूप झाली होती! मग वाटायला लागलं होतं की उगाचच दीपांशू तिकडे राहातोय.शिवाय ते वेळोवेळी फोटो पाठवतात, प्रगती कळवतात!
शिल्पा- आम्हाला अशाच प्रकारे त्याचा पहिला वाढदिवस miss झाला,दुसरा तरी एकत्र साजरा करता येईल ना असंच वाटायला लागलं होतं!
श्रीपाद- या काळामध्ये तुम्हाला भेटायचं असलं तर त्यातही खूप कागद्पत्र,परवानग्या असे सोपस्कार असतात, त्यामुळे अशा भेटी होणं सोपं नसतं. मुलाला काही गिफ्ट्स् पाठवणं वगैरे तर करताच येत नाही. हे यासाठी की काही कारणांनी दत्तक घेणं जमलं नाही तर मुलाला त्रास होऊ नये! मुद्दा बरोबर आहे, पण त्यामुळे आम्हाला मात्र मधला वेळ फार लांबलचक वाटला.

मला आठवतय, की माझं आणि शिल्पाचं या काळात बोलणं व्हायचं तेव्हा ती सांगायची, की कसा वेळ जातोय फुकट वगैरे!

शिल्पा- हो खरच! त्यातही असं लक्षात आलं की इथे अमेरीकेत बर्याच स्टेप्सना लागला तितकाच वेळ भारतात खूप कमी स्टेप्स ना लागला. इथे जास्त वेळ का जातोय याची कारणं ते कळवायचे. भारतात मात्र ती transparency नव्हती. शिवाय आम्ही ठरवलं होतं की कागदपत्र "पुढे सरकवण्यासाठी" वशिले,लाच वगैरे काहीही करायचं नाही.
श्रीपाद- वेळ लागतोय म्हटल्यावर, गंमत म्हणजे, लोक सुचवायचे सुद्धा-कि ओळख काढू वगैरे. पण आम्हाला राजमार्गानेच जायचय असं आमचं नक्की ठरलेलं होतं! आणि तसच केलं आम्ही.सगळं काही ठीक आहे ना याची पूर्ण खात्री करून घ्यायला हवी आणि त्यासाठी वेळ लागणारच. फक्त अनावश्यक वेळ जाऊ नये असं मात्र वाटायचं. पण एक सांगतो, की या सगळ्या प्रोसेस मध्ये लाच-लुचपत,पैसे खाणं याला काही वावच ठेवलेला नाही त्यांनी. खूप clean आहे! कुणाचेही फोन नंबर्स्-पत्ते अशी काही माहिती देतच नाहीत ते.
शिल्पा- त्यांच्या सगळ्या fees कधी आणि किती द्यायच्या याचं अगदि रितसर documentation केलेलं दिसलं. सगळया रकमा इथेच भरल्या आम्ही. त्याबाबतीत आम्हाला खूपच चांगला अनुभव आला. आम्ही दीपांशूला भेटायला गेलो असताना सर्व मुलांसाठी म्हणून लॉलीपॉपची बॅग नेली होती तयाची सुद्धा त्यांनी पावती केली- इतकी कमालीची खबरदारी ते घेतात.

वा! खूप छान वाटलं हे ऐकायला!

श्रीपाद -हो ना! म्हणूनच मुद्दाम हे सांगितलं आम्ही!!
आता माझा पुढचा प्रश्न आहे तो तुम्हाला इथे ट्रेनिंग दिलं गेलं त्याबद्दल. काय स्वरूप होत त्याचं?
श्रीपाद- हो.इथे आम्हाला जवळजवळ पाच क्लास घ्यावे लागले. आम्ही दीपांशूला दतक घेणं was maybe the least tricky case. कारण तो आमचासारखाच भारतीय वंशाचा. रंग,रुपाने जवळचा वगैरे. पण नाहीतर इथल्या लोकांनी भारतातलं मुल दत्तक घ्यायचं ठरवलं असेल तर त्यांना बरीच तयारी करावी लागते. नातेवाईक, मित्र, आणि इतर लोक पटकन काही प्रश्न विचारू शकतात. अशा वेळी नविन आलेल्या मुलाला, त्याच्या मानसिक स्वास्थ्याला कसं जपावं अशा स्वरुपाचं ट्रेनिंग दिलं जातं.
शिल्पा- उदाहरणार्थ आधीचं मुल तुमच्यासारखं दिसणारं असेल, आणि मग हे दुसरं बाळ वेगळं दिसत असेल तर अनोळखी लोक देखिल, त्या मुलासमोरच पटकन विचारून जातात "Is this your adopted child?'तुम्ही जरी मुलाला ते सांगायचं ठरवलेलं असेल तरी ते असं अचानक सांगावं लागू नये ना!मग तुम्ही त्या प्रश्न विचारणार्यातला सांगायचं की मी तुम्हाला नंतर सांगेन, आपण फोनवर बोलू. आता मुलांसमोर चर्चा नको. काही उदाहरणं देऊन ते त्या situations handle करायला शिकवतात.
म्हणजे लोक काय विचारतील हे तुमच्या हातात नसतं पण त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरं कश देऊ शकाल याबद्दल माहिती देतात

असे क्लास/ट्रेनिंग आवश्यकच आहे असं तुम्हाला वाटतं का?

श्रीपाद-अगदी नक्की. कारण माहीत नसलेल्या, लक्षातही आल्या नसत्या अशा बर्यांच गोष्टी आम्हाला क्लास मधये शिकवल्या.
शिल्पा- मुल घरी आणलं की त्याला आणि तुम्हाला एकमेकांविषयी ओढ निर्माण व्हायला काही काळ जावा लागतो. त्या वेळी लक्षात ठेवण्याच्या काही tips ते देतात. अनाथाश्रमातून आलेल्या बाळाला काही वेळा खाऊ-खेळण्यांची सवयच नसते. किंवा, वाईट वाटलं तर कुणाजवळ जावं अशी कन्सेप्टहि नसू शकते! त्यांना तर भूक लागलेली सांगायची पण जाण नसते काही वेळा--कारण ते वाढलेले असतात आश्रमात. तिथे ठराविक वेळेलाच त्यांना दूध वगैरे मिळत असतं. मग या मुलांना घरी आणल्यावर retrain करावं लागतं. खाणं कुणाकडे आणि कसं मागायचं--इतकच काय तर रडू फुटत असेल तर कुणाजवळ जायचं हेही नव्या पालकांनी शिकवावं लागतं. क्लास मुळे या गोष्टींविषयी आम्हाला माहिती झाली. त्यामुळे क्लास मध्ये सांगतात की नुकत्या जन्मलेल्या आपल्या अपत्या बरोबर पालक वेळ घालवतात, तसाच exclusive time या मुलालाही मिळायला हवा. त्याची तुम्हाला आणि तुमची त्याला ओळख व्हायला हवी.
श्रीपाद-अनाथाश्रम किती चांगला आहे यावर बाळाची प्रगती अवलंबून असते. आमच्या सुदैवाने दीपांशू चांगल्या तर्हेलने वाढलाय. त्याचा सांभाळ करणारी बाई--तिला आईच म्हणतात- तर ती याच्याशी खूप attached होती. आम्ही त्याला इथे आणला तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. असा प्रेमाने वाढवल्यामुळे त्याची मानसिक घडण चांगली झालेली आहे. तरीही आम्हाला असं जाणवलं की त्याच्या हातातल्या वस्तूबाबत तो जास्त possessive असायचा.केळं त्याला आवडतं,पण ते सोलून देण्यापुरतही आमच्या हातात द्यायला तो नकार द्यायचा. अशा वेळी, त्याचा विश्वास कसा संपादन करायचा याचं ट्रेनिंग आम्हाला मिळालेलं होतं! त्यामुळे असे क्लास घेणं आवश्यकच आहे.

इतक्या सगळ्या खटाटोपी, कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला दीपांशूला घरी आणता आलं. त्या वेळी तुम्हाला काय वाटलं? पहिल्या दिवसांतले तुमचे अनुभव कसे होते?

शिल्पा- ताबा मिळाल्यावर, पहिले आठ दिवस आम्ही दिल्लीमध्ये एकत्र घालवले. आम्ही तिघंजण त्याचा व्हीसा होईपर्यंत तेव्हा हॉटेलमध्ये राहीलो. त्या काळात आम्हाला एकमेकांशी खरी ओळख करून घेता आली!त्य दृष्टीने खूप महत्वाचे होते ते आठ दिवस. त्याला काय आवडतं, तो कोणत्या गोष्टीला कसा react होतो हे आम्हाला कळलं.
श्रीपाद- आणि हा खास त्याच्याबरोबर घालवलेला वेळात आम्ही पूर्ण focused होतो. त्या दिवसात आरोही आमच्याबरोबर नव्हती ते योग्य झालं.तो मग आमच्याबरोबर कंफर्टेबल होऊन गेला.
श्रीपाद- अगदी तसच झालं! खरं तर referral आल्यानंतर आम्ही ठरवलं तेव्हापासूनच आम्हाला जवळीक निर्माण झाली होती. तो आम्हाला आमचा वाटतच होता. जवळ राहायला आल्यावर तर प्रश्नच नाही!

आरोहीची काय प्रतिक्रिया झाली. ती भावाची वाट तर बघतच होती. पण sibling rivalry वगैरे कितपत जाणवली तुम्हाला?

श्रीपद-आरोही ला आनंद तर झालाच. आम्ही ही आम्हाला जो दीपांशूच्या वागण्यातून अंदाज आला होता त्यानुसार तिला सूचना देत होतो. उदा: कुठलीही गोष्ट त्याच्या हातातून खेचून घेतली की तो खूप चिडतो तेव्हा तू तेवढं करू नकोस वगैरे. अर्थात तिच्या वयानुसार थोड्याफार adjustments कराव्या लागल्या आम्हाला--पण तिनेही आम्हाला बर्यातपैकी साथ दिली. sibling rivalry जाणवली थोडी पण तिचं असं म्हणणं असत नाही की त्याचे लाड करू नका-- ती म्हणते की माझेही कमी करू नका, एवढच!
शिल्पा- आणि तो करेल तसं करणं --अगदी त्याच्यासारखं रांगणं वगैरे हेही चालू असतं अधूनमधून.शिवाय, त्याच्या सगळ्या कामात तिला मदत करायची असते. अगदी डयपर बदलण्यापासून ते आंघोळ घालण्यापर्यंत. तेव्हा आम्हालाच तिला समजवावं लागतं, की आत्ता तुला हे करणं जमणार नाही वगैरे!

त्याला कुठल्या भाषेची सवय होती?

शिल्पा- तो आधी आश्रमात उडीया ऐकायचा. त्यामुळे ती त्याच्या सवयीची भाषा होती. आम्ही त्यामुळे काही वाक्य वगैरे लिहून आणली होती. पण तो फक्त दोन वर्षांचाच आहे--त्यामुळे मग आम्हाला असं जाणवलं की भाषेचा प्रश्न येणार नाही आम्हाला. मग आम्ही मराठी बोलायला लागलो त्याच्याबरोबर. खरं तर इंग्रजीचाही पर्याय होता- पण मग आरोहीशी आम्ही घरात मराठीच बोलतो. आमचे डॉक्टर आम्हाला म्हणाले त्याला एकावेळी एकच नवी भाषा शिकू दे. म्हणून मग आम्ही त्याच्याशीही मराठीच बोलायला लागलो.

मग त्याला जमायला लागलय का आता मराठी?

श्रीपाद - अगदी व्यवस्थित समजतं त्याला मराठीत बोललेलं. तो फारच लवकर सरावला आपल्या भाषेला!
शिल्पा - "जा , हे तिकडे ठेऊन ये" वगैरे बरोबर करतो. खाणाखुणा कराव्या लागतच नाहीत. म्हणून मग आता आम्ही त्याच्याशी थोडंफार इंग्रजी बोलणंही सुरू केलय.

आता एक महत्वाचा प्रश्न्-दत्तक मुल वाढवताना काय विशेष संकेत पाळावे लागतात? काही गोष्टी मुद्दाम ठरवून कराव्या लागतात का?

शिल्पा- संकेत म्हणशील तर हाच की सतत त्याविषयी वेगळेपणा न वाटू देणं! आपल्याला दुसरं मुल झालं की आपण जसे वागतो, जितपत बदलतो तसच आहे हे--याची आपल्याला आणि आपल्याबरोबरीच्या लोकांना खात्री असली पाहीजे. कुणी भेटलं की सहज विचारू शकतात्--"रुळलाय का तो तुमच्या घरात?" असले प्रश्न निदान मुलंसमोर तरी टाळावेत! किंवा vocabulary विषयी थोडी जागरुकता बाळगणे.पटकन तोंडातून जातं, की आपलं मुल आणि दत्तक मुल--याबाबत जागरूक्पणे प्रयत्न करावा लागतो. आमची अजून एक इच्छा आहे, की इतरांनी असं म्हणू नये की आम्ही फार मोठं समाजकार्य केलंय.आम्हाला असे म्हणणारे लोक भेटले--म्हणून मुद्दाम सांगतेय की तसं कुणाला वाटू नये. आम्ही काही उपकार वगैरे केलेले नाही आहेत. कुठल्याही चांगलं संगोपन करणार्याण पालकांना मुल झालं की जसं ते सार्याीच कुटुंबाचं श्रेय असतं तसच आहे हे! We are all lucky to have each other.
श्रीपाद- लोकांना कौतूक वाटतं, पण त्यामुळे नकळत दीपांशूला वेगळेपणा वाटू नये यासाठी ही काळजी !पण आमच्या मित्रांनी याबाबतीत आम्हाला इतकी मदत केलीय! या सगळ्या adoption process मध्ये त्यांची साथ मिळाली आहे. आम्ही दोन आठवडे आरोहीला त्यांच्याच भरवशावर सोडून भारतात गेलो होतो याला आणायला. आमचे हे जे अगदी जवळचे मित्र आहेत ते आमच्याबरोबर राहिलेले आहेत नेहेमीच! इथे फारसे नातेवाईक नाहीत- पण आमच्या या मित्रांच्या मदतीशिवाय आम्हाला हे शक्यच झालं नसतं!
शिल्पा- मला वाटतं आमच्याबरोबर तेही educate झाले आहेत आता adoption process मध्ये.आणखी एक सांगते, आम्हाला क्लास मधे सांगितलं होतं की अनेक प्रकारची कुटुंब समाजात असतात. आई बाप वेगवेगळ्या वंशाचे/वेगवेगळ्या देशातले असतात. कुणाला दोन मुली असतात तर कुणाला दोन्ही मुलगे. Family with adopted kid is just one of the many types families seen around! आणि हे भान तर अगदी ठरवूनच जोपासावं लागतं.

दीपांशूला तो तुमचा दत्तक मुलगा आहे हे तुम्ही सांगणार आहे का? त्यासंबधी काय विचार आहे तुमचा?

श्रीपाद- खरं सांगू? 'सांगायचं का' हा प्रश्न नसून 'कधी सांगायचं' असा प्रश्न आहे. घरात, बाहेर सगळ्यांना माहिती असताना, न सांगण्याचा पर्याय नसतोच.
शिल्पा- तेही आहे, पण महत्वाचं म्हणजे आम्ही जर आमचा home study करणार्याण सोशल वर्करला "आम्ही सांगणार नाही" असं सांगितलं असतं तर त्यांनी केस पुढेच नेली नसती. त्यांचा मुद्दा असा आहे, की यात काही गैर किंवा लपवावं असं काही नाहीच आहे. त्यामुळे न सांगण्याचा पर्याय ठेऊच नका. "कधी सांगायचं" ते ठरवा. त्यासाठी योग्य वेळ बघून मग त्याला सांगा. शाळेत घालताना शाळेला ही माहीती पुरवण्याची गरज नाही.
श्रीपाद - कारण मग शाळेतल्या शिक्षक वगैरे लोकांच्या मग ते स्मृती मध्ये राहातं-- मुद्दाम नव्हे, पण अजाणता काही वेगळेपण मुलाला जाणवू शकतं. त्यामुळे, मुलाचं वय आणि गरज लक्षात घेऊन सांगण्याची वेळ निवडावी. आम्ही आता नाही --पुढे कधीतरी नक्कीच सांगू.

आता एक शेवटचा प्रश्न-- तुमच्याशी बोलल्यावर, आणि तुमचे हे मनापसूनचे प्रयत्न समजाऊन घेतल्यावर, मला अशी खात्री वाटतेय, की तुमच्या उदाहरण कुणाला तरी नक्कीच स्फुर्ती‍दायक वाटणार आहे. तुम्हाला जर कुणी सल्ला विचारला, तर तुम्ही काय सांगाल?

शिल्पा- दत्तक मुल घ्यावं ही दोघांचीही इच्छा हवी- त्याची खात्री करा. ते ठरलेलं असलं पाहीजे मनापासून.
श्रीपाद- ते नसेल तर पुढे न जाणंच योग्य-- पण ते असेल तर लागणारा वेळ, कायदेशीर बाबी बजावण्याची कामं, त्यातील गुंते हे सारे मुद्दे गौण,तात्पुरते असतात. Just go for it! It is totally worth it!

शिल्पा आणि श्रीपाद या आपल्या मित्रांच्या वेगळा विचार करण्याचं, विचार आणि कृती यांची सांगड घालतानाच्या कळकळीचं आणि त्याहूनही लोभस अशा सहजतेचं मायबोली परिवारातर्फे कौतूक करण्याची मिळालेली ही संधी माझासाठी अतिशय आनंददायक आहे! त्यांना आणि त्यांच्या आरोही, दीपांशूला अनेक सदिच्छा!

------------------------------------------------------------------------------------

शिल्पा-श्रीपाद यांनी वर उल्लेखलेल्या संस्थांची अधिक माहीती :
IFS : International Family Services. The Hague accredited agency authorized to work with India adoptions.
Adopt International : San Francisco based adoption agency contracted by IFS to work on home study and post-placement locally in the bay area.
CARA: Central Adoption Resource Authority : This is an autonomous agency, designated by the Indian Government to be central authority monitoring international adoptions as per Hague Conventions.

गुलमोहर: 

श्रीपाद आणि शिल्पाच मनापासुन अभिनंदन ! खुप मोठं कार्य तुम्ही दोघांनी केलेलं आहे.
हेमांगी ही बातमी मायबोलीकरांपर्यंत पोहचविण्यासाठी धन्यवाद !

अतिशय सुरेख मुलाखत. प्रश्न चहूबाजूंचा विचार करून विचारलेत. शिल्पा आणी श्रीपाद ह्यांनी उत्तरं पण मोकळेपणानी आणी इनफरमेटिवव्ह दिलियेत ज्याचा खूप लोकांना उपयोग होइल.

एक प्रश्न बरेच वेळा adopted parents च्या मनात बाळा विषयी येतो तो मेडिकल चा? त्याची किन्व्हा त्याच्या पेरेंट्स ची मेडिकळ हिस्टरी मिळू शकते का? आणी अनुवंशिक जर काही मेडिकल प्रॉब्लेम असेल,
तर तो कसा हाताळला जातो?

शिल्पा आणी श्रीपाद हार्दिक अभिनंदन नविन बाळाच्या आगमना बद्द्ल.:)

हेमांगी तुझं अभिनंदन इतकी सुंदर मुलाखत घेण्या बद्द्ल.

शिल्पा आणि श्रीपाद, अभिनंदन! तुम्हां दोघांना आणि आरोही आणि दीपांशूला शुभेच्छा Happy
हेमांगी, मस्त मुलाखत, धन्यवाद.

शिल्पा श्रीपाद अभिनंदन. Happy
चांगला झाला आहे संवाद. शिल्पा आणि श्रीपादने मोकळेपणाने उत्तरे दिल्याने माहितीपूर्ण पण आहे.

शिल्पा आणि श्रीपाद अभिनंदन. ताईबाईंना शुभेच्छा! आणि दीपांशूच स्वागत.

हेमांगी, छान प्रश्ण विचारले आहेस आणि शिल्पा आणि श्रीपादनीपण अगदी सविस्तर उत्तरं दिली आहेत.

अप्रतीम!! हेमांगी अगदी सर्वांच्या मनातले प्रश्न विचारले आहेस. शिल्पा, श्रीपाद - हे निर्णय अवघड असतात तुम्ही तो घेतला आणि करुन दाखवलात याबद्दल तुमचे अभिनंदन!

अरोहीला खुप शुभेच्छा आणि दिपांशूचे मित्रपरीवारामधे हार्दिक स्वागत!

शिल्पा, आरोहीच्या जन्माच्याही खूप आधीपासून आपण या सगळ्या विषयावर बोललो होतो अनेकदा. दिपांशुला घरी आणण्याच्या प्रक्रियेदरम्यानही काही वेळेला तुझ्याकडून ऐकलं होतं. त्यामुळे हे सगळं सत्यात उतरलं हे बघून फार मस्त वाटलं. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मोठ्या झालेल्या आरोहिला आणि छोट्या दिपांशुला भेटायचं आहे मात्र आता..

हेम्स, मुलाखत पण फार छान आणि नेमकी घेतलीयेस.

खूप छान आणि माहितीपूर्ण मुलाखत. Happy बर्‍याच गोष्टी नव्याने कळल्या.
शिल्पा-श्रीपाद, एक निर्णय घेऊन त्यावर ठाम राहून पूर्णत्वास नेल्याबद्दल तुमचे अभिनंदन. Happy
या सगळ्यात आरोहीने तुमची साथ दिली त्याबद्दल तिचेही कौतुक.
दीपांशुचे माबोपरिवारात स्वागत.

शिल्पा / श्रीपाद अभिनंदन.

हेमांगी मुलाखत मस्त झाली आहे आणि ही मुलाखत घेण्याचे सुचून ते इथे टाकलेस त्याबद्द्ल धन्यवाद.

गुड जॉब.
सगळ्या कुटुंबाला मनःपूर्वक शुभेच्छा. दोन्ही मुलांना अनेक आशिर्वाद. Happy

हेमांगी- धन्यवाद.

मिनोती- Happy

आम्ही काही उपकार वगैरे केलेले नाही आहेत. कुठल्याही चांगलं संगोपन करणार्याण पालकांना मुल झालं की जसं ते सार्याीच कुटुंबाचं श्रेय असतं तसच आहे हे! We are all lucky to have each other.>> हे फार महत्त्वाचे.

अतिशय आवडली मुलाखत. प्रश्न नेमके आहेत, आणि उत्तरं कोणताही आडपडदा न ठेवून दिलेली!

शिल्पा-श्रीपाद हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

असं काही मनाला उभारी देणारं वाचलं की कशी एक न सांगता येणार्‍या आनंदाची लहर उमटून जाते आत आत....त्यामुळे मन अगदी प्रसन्न, टवटवीत रहातं बराच काळ.
मुलाखत मनमोकळी, माहितीपूर्ण - खूप धन्यवाद हेमांगी.
शिल्पा ,श्रीपाद व बच्चेकंपनीला शुभेच्छा.

शिल्पा-श्रीपाद, तुमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! आरोही आणि दीपांशूला अनेक आशिर्वाद.

हा संवाद वाचून खूप छान वाटलं.
हेमांगी, धन्यवाद Happy

मुलाखत आवडली. श्रीपाद, शिल्पा, तुम्हाला व दोन्ही मुलांना खूप खूप शुभेच्छा!

शिल्पा आणि श्रिपाद तुमच्या दोघांचेही मनापासुन अभिनंदन. नुसते बोलणे आणि प्रत्यक्षात करणे खरच खुप वेगळे आहे. तुम्ही ते करुन दाखवले आहे. तुमच्या भावी आयुष्यासाठी तुमच्या कुटूंबाला शुभेच्छा.

हेमांगी धन्स ह्या मुलाखतीसाठी.

अतिषय सुरेख आणी नेमकी मुलाखत. शिल्पा आणी श्रीपाद तुमचे खूप खूप अभिनंदन !! बोले तैसा चाले.. ह्या उक्ती ला सार्थ ठरवलंत. भावी आयुष्यासाठी खूप सार्‍या शुभेच्छा !!

Pages