मायबोली - कृषीवल रसग्रहण स्पर्धा - २०११

Submitted by Admin-team on 29 July, 2011 - 14:29

krushival-maayboli-big.jpgनवनवीन पुस्तकं वाचली जावीत, त्यांवर चर्चा व्हावी, हे वाचनचळवळीच्या दृष्टीनं अत्यावश्यक असतं. लेखक, वाचक आणि प्रकाशक यांच्यातलं नातंही अशा देवाणघेवाणीतून दृढ होतं. सध्याच्या काळात ते महत्त्वाचंही आहे. मायबोली.कॉम हे संकेतस्थळ वाचनचळवळ जोमदार व्हावी, यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतं. मायबोली - कृषीवल रसग्रहण स्पर्धेचा हा उपक्रमही या प्रयत्नांचाच एक भाग आहे.

मायबोली - कृषीवल रसग्रहण स्पर्धेनिमित्त तुम्ही तुमच्या एखाद्या आवडत्या पुस्तकाबद्दलचे तुमचे विचार शब्दबद्ध करायचे आहेत, त्या पुस्तकाचं रसग्रहण करायचं आहे. मात्र, कोणत्या पुस्तकांचं रसग्रहण केलं जावं, याबाबतच्या दोन लहानशा अटी मात्र आहेत. १. कविता, कथा, कादंबरी, ललितलेख, अनुभवकथन, आत्मकथन, प्रवासवर्णन, समीक्षा, संपादित साहित्य असा कुठलाही साहित्यप्रकार या स्पर्धेसाठी वर्ज्य नाही. मात्र, इतर भाषांतून मराठीत अनुवाद झालेली पुस्तकं या स्पर्धेसाठी विचारात घेतली जाऊ नयेत. २. तसंच, १ जानेवारी २००८नंतर प्रकाशित झालेल्या मराठी पुस्तकांचंच (पहिली आवृत्ती) रसग्रहण स्पर्धेसाठी ग्राह्य धरलं जाईल.

या स्पर्धेच्या विजेत्यांना मिळतील दै. कृषीवलनं प्रायोजित केलेली बक्षिसं.

पहिलं बक्षीस - रु. १५००/-
दुसरं बक्षीस - रु. ११००/-
तिसरं बक्षीस - रु. ७५०/-

याशिवाय पंचवीस वर्षांखालील विद्यार्थी स्पर्धकांसाठी रु. १०००/-चं एक विशेष पारितोषिक.

टीप : सर्व बक्षिसे मायबोली खरेदीच्या गिफ्ट सर्टिफिकेटांच्या स्वरूपात मिळतील.

स्पर्धेचं स्वरूप -

१. या स्पर्धेसाठी 'रसग्रहण स्पर्धा - ऑगस्ट २०११' हा नवीन ग्रूप १ ऑगस्टला उघडण्यात आला आहे. या ग्रूपचं सभासदत्व घेतल्यावर तुम्हांला तिथे रसग्रहण लिहिता येईल. १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट, २०११, या कालावधीत तुम्ही या स्पर्धेच्या ग्रूपमध्ये नवीन लेखनाचा धागा उघडून रसग्रहण लिहू शकता.

तुमच्या प्रवेशिका सर्वांना वाचता याव्यात म्हणून हा धागा सार्वजनिक करण्यास कृपया विसरू नका.

२. धाग्याच्या शीर्षकात पुस्तकाच्या आणि लेखक/लेखिकेच्या नावाचा उल्लेख असावा. उदाहरणार्थ, भालचंद्र नेमाड्यांच्या 'हिंदू' या कादंबरीचं रसग्रहण करणार असाल, तर धाग्याचं शीर्षक - रसग्रहण स्पर्धा - 'हिंदू' - ले. भालचंद्र नेमाडे - असं असावं.

३. स्पर्धेचा निकाल सप्टेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात जाहीर केला जाईल.

नियम व अटी -

१. ही स्पर्धा फक्त मायबोली.कॉमच्या सभासदांसाठीच आहे. आपण मायबोलीचे सभासद नसाल तर इथे नवं खातं उघडून आपण मायबोली.कॉमचे सभासद होऊ शकता. हे सभासदत्व विनामूल्य आहे.
२. एक व्यक्ती (आणि एकच आयडी Happy ) जास्तीत जास्त दोन प्रवेशिका पाठवू शकते. मात्र, यांपैकी एकाच प्रवेशिकेचा बक्षिसासाठी विचार केला जाईल.
३. फक्त मराठी पुस्तके या रसग्रहणासाठी स्वीकारली जातील.
४. रसग्रहणासाठी निवडलेल्या पुस्तकाची पहिली आवृत्ती १ जानेवारी, २००८नंतर प्रकाशित झालेली असावी.
५. रसग्रहणासाठी विषयाचं व साहित्यप्रकाराचं बंधन नाही. मात्र, अनुवादित साहित्याचं रसग्रहण स्वीकारलं जाणार नाही.
६. एखाद्या काव्यसंग्रहातल्या एकाच कवितेचं, कथासंग्रहातल्या एकाच कथेचं, किंवा पुस्तकातल्या एका प्रकरणाचं / वेच्याचं रसग्रहण ग्राह्य धरलं जाणार नाही. रसग्रहण संपूर्ण पुस्तकाचंच असावं.
७. रसग्रहणासाठी शब्दमर्यादा - किमान ७५० शब्द आणि जास्तीत जास्त १५०० शब्द.
८. रसग्रहणासोबत पुस्तकाचं, लेखकाचं व प्रकाशकाचं नाव, तसंच प्रकाशनाची तारीख देणं आवश्यक आहे.
९. रसग्रहणात संपूर्ण कविता अथवा एखाद्या कवितेचा / कथेचा मोठा भाग असू नये.
१०. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

या स्पर्धेसाठी पुस्तक निवडणं सोपं जावं, म्हणून इथे जानेवारी, २००८नंतर प्रकाशित झालेल्या पुस्तकांची यादी दिली आहे. या यादीत पुस्तकाचं, लेखकाचं, प्रकाशनाचं नाव, तसंच प्रकाशनाचं साल आहे. ही यादी परिपूर्ण व अचूक असावी यासाठी आम्ही प्रयत्न केलेले असले, तरी काही त्रुटी असू शकतात. काही पुस्तकं किंवा प्रकाशनसंस्था या यादीतून निसटू शकतात.

ही रसग्रहण स्पर्धा आयोजित केली आहे दैनिक कृषीवल आणि मायबोली.कॉम यांनी. कृषीवल हे नव्या आकांक्षेसह नव्या आकाशात झेपावणारे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे वृत्तपत्र. कालपर्यंत प्रादेशिक असणार्‍या या दैनिकाने आता सीमोल्लंघन केले असून, आता ते राज्यस्तरीय दैनिक म्हणून सिद्ध झाले आहे. ‘शाश्‍वत विकासासाठीची भविष्यवेधी चळवळ’ अशी स्वत:ची ओळख सांगणार्‍या कृषीवलने समग्र-सर्वंकष विकासाची भूमिका सदैव घेतली आहे.

कृषीवल हे शेतकरी चळवळीतून जन्माला आलेले हे रायगड जिल्ह्यातील वृत्तपत्र. ७५ वर्षांपूर्वी खोत-सावकार-जमीनदार यांच्या बेलगाम जोखडाखाली शेतकरी वर्ग पिळला जात होता. या प्रस्थापितांच्या विरोधात नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘करु किंवा मरु’ अशा जिद्दीने व इर्षेने शेतकर्‍यांची चळवळ कार्यरत झाली होती. अशा परिस्थितीत नारायण नागू पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली चरी या गावातील शेतकर्‍यांचा संप घडवला. सहा वर्षे चाललेला हा देशातील शेतकर्‍यांचा पहिलाच संप. या चरीच्या संपाविरुद्ध काँग्रेसधार्जिण्या वृत्तपत्रांनी टिकेची झोड उठवली. त्यांच्या अपप्रचाराला उत्तर देण्यासाठी आणि आपल्या शेतकरी चळवळीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी नारायण नागू पाटील यांनी ७ जून १९३७ रोजी साप्ताहिक कृषीवल सुरु केले. या साप्ताहिक कृषीवलचे संपादक नारायण नागू पाटील हेच होते. त्यांचे कर्तबगार पुत्र श्री. प्रभाकर पाटील यांच्या संपादकत्वाखाली कृषीवल दैनिक म्हणून प्रसिद्ध होऊ लागले. त्यानंतर जयंत पाटील आणि सौ. सुप्रिया जयंत पाटील यांनी सर्व सोयींनी युक्त अशा यंत्रणेतून दैनिक कृषीवल आकारास आणले. या दैनिकाचा ७ जून २०११ रोजी अमृतमहोत्सव सुरु झाला आहे. अमृतमहोत्सवी वर्षात श्री. संजय आवटे यांच्या संपादकत्वाखाली न्यू लूक कृषीवल प्रसिद्ध होणार आहे. या प्रकल्पात नारायण नागू पाटील यांच्या चौथ्या पिढीचा सक्रीय सहभाग आहे. मुख्य संपादक संजय आवटे आणि व्यवस्थापकीय संचालक सौ. चित्रलेखा पाटील या ‘न्यू लूक मिशन’चे नेतृत्व करीत आहेत.

awate1.jpgमायबोली - कृषीवल रसग्रहण स्पर्धेचे एक परीक्षक श्री. संजय आवटे असणार आहेत. एक साक्षेपी संपादक आणि पत्रकार म्हणून त्यांची ख्याती आहे. लोकसत्ता, लोकमत, पुढारी या वृत्तपत्रांचं संपादकपद त्यांनी भूषवलं आहे. या वृत्तपत्रांतून त्यांनी लिहिलेले स्तंभ बरेच गाजले होते. अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय परिसंवादांत त्यांनी भाग घेतला आहे. 'पाकिस्तान - लष्करी सत्तेचे अर्थरंग', 'नियतीशी करार - नव्या जगाचे नवे आकलन', 'बराक ओबामा : बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड', 'कला-कल्पतरुंचे आरव' आणि 'ग्लोबल वॉर्मिंग - खरे काय, खोटे काय' ही त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.

sujata_deshmukh.JPGसुजाता देशमुख या मायबोली - कृषीवल रसग्रहण स्पर्धेच्या दुसर्‍या परीक्षक असणार आहेत. साक्षेपी संपादक, अनुवादक आणि पत्रकार म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्या ’इंडियन एक्स्प्रेस’मध्ये वार्ताहर आणि ’यूनायटेड न्यूज ऑफ इंडिया’मध्ये सहसंपादिका होत्या. ’मिळून सार्‍याजणी’ या मासिकाचं संपादकपद त्यांनी यापूर्वी भूषवलं आहे. राजहंस प्रकाशनाच्या संपादिका म्हणून त्यांनी अनेक वर्षं काम केलं. ’माझंही एक स्वप्न होतं’, ’बाइकवरचं बिर्‍हाड’, ’तिची मोहिनी’, ’नीलची शाळा’, ’देश माझा, मी देशाचा’ (श्री. लालकृष्ण अडवाणी यांचं आत्मचरित्र) यांसह आठ पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. सध्या ’माहेर’ मासिकाच्या आणि मेनका प्रकाशनाच्या पुस्तक विभागाच्या त्या मुख्य संपादिका आहेत.

आपण सर्व उत्साहानं सहभागी होऊन रसग्रहण स्पर्धेचा हा उपक्रम यशस्वी कराल, ही खात्री आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संजय आवटे का? व्हेरी गुड. छानच होईल उपक्रम.

नावं इथे आधी नोंदवायची का की डायरेक्ट रसग्रहण टाकली तर चालेल?

नाव नोंदवावे लागत नसेल. हे पहा-
१. या स्पर्धेसाठी 'रसग्रहण स्पर्धा' हा नवीन ग्रूप १ ऑगस्टला उघडण्यात येईल. या ग्रूपचं सभासदत्व घेतल्यावर तुम्हांला तिथे रसग्रहण लिहिता येईल. १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट, २०११, या कालावधीत तुम्ही या स्पर्धेच्या ग्रूपमध्ये नवीन लेखनाचा धागा उघडून रसग्रहण लिहू शकता.

रसग्रहणाची स्पर्धा?? जरा अजब वाटत आहे. रसग्रहण मुळातच त्या व्यक्तीला आवडलेले (किंवा नाही आवडले म्हणून) असते ना? म्हणजे त्याचे वैयक्तीक मत तो रसग्रहणात मांडतो. त्याची स्पर्धा कशी होऊ शकेल?

शर्मीला,
लालू यांनी लिहिले आहे त्याप्रमाणे ग्रूप चालू केला की त्यात नवीन लेख लिहू शकता.

केदार,
रसग्रहण, परिक्षण किंवा पुस्तकाबरोबर झालेल आपला प्रवास म्हणा.
एखादं पुस्तक का आणि कसं आवडलं, हे इतरांना सांगणं, हा मुख्य उद्देश आहे. स्पर्धा हा त्याचा लहानसा भाग झाला.

स्पर्धा 'कृषीवल' ने आयोजित केली आहे. अभिनंदन. पुस्तक रसग्रहण करणार्‍यांची चांगलीच कसोटी लागणार इथे. ह्या अभिनव उपक्रमाला कृषीवलच्या प्रोत्साहनाबद्दल त्यांचे विशेष आभार.

मायबोलीची पाखरे आता पंख विस्तारतायेत याचा अभिमान वाटतो. Happy

< admin | 4 August, 2011 - 14:30
टण्या,
ते पुस्तक "वाचू आनंदे" मध्ये लिहून दुसर्‍या पुस्तकाचे रसग्रहण या स्पर्धेत देऊ शकता Happy >

अ‍ॅडमिन नी स्मायली टाकला!!!!

:कांदा कुठाय??:

* अ‍ॅडमिन साहेबांचा आयडी हॅक झालाय का? Light 1

मायबोली - कृषीवल रसग्रहण स्पर्धेचे आयोजक, प्रायोजक आणि स्पर्धेत भाग घेणा-या सर्वांचे अभिनंदन !

सध्या ’माहेर’ मासिकाच्या आणि मेनका प्रकाशनाच्या पुस्तक विभागाच्या मुख्य संपादिका असलेल्या सुजाता देशमुख या स्पर्धेच्या दुसर्‍या परिक्षक असणार आहेत.

रसग्रहण स्पर्धा छानच चाललीय. जरा अजून जास्त आणि भरभर यायला हवीत. म्हणजे सध्या वेळ आहे तोवर चांगल्या चांगल्या पुस्तकांवर सविस्तर वाचायला मिळेल हा स्वार्थी हेतू Proud मनाजोगं पुस्तक आठवलं आणि वेळेत झालं लिहून तर नक्की भाग घेणार.

या स्पर्धेसाठी पुस्तक निवडणं सोपं जावं, म्हणून इथे जानेवारी, २००८नंतर प्रकाशित झालेल्या पुस्तकांची यादी दिली आहे. >>>> ती लिंक चालत नाहीये. बघणार का ?

मायबोली कृषीवल रसग्रहण स्पर्धेच्या प्रवेशिका स्विकारायला फक्त एक आठवडा राहिला आहे. आतापर्यंत बर्‍याच प्रवेशिका आल्या आहेत. तुम्ही देखील अनेक पुस्तकं वाचली असतील, त्यातली काही तुम्हाला भावली/आवडली असतील. तर तुम्हाला ती का आवडली हे इतर हजारो वाचकांपर्यत जरूर पोचवा.

रसग्रहणाच्या तांत्रीक बाबींमध्ये अडकून न रहाता तुम्हाला एखाद्या पुस्तकाबद्दल मनापासून जे वाटते ते मोकळेपणाने लिहा.

<< ३. स्पर्धेचा निकाल सप्टेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात जाहीर केला जाईल.>> सप्टेंबरचा दुसरा आठवडा तर उलटून गेलाय. निकाल जहीर झाला का ? असल्यास कुठे ?