बी एम एम २०११ : सर्वसाधारण व्यवस्थापन

Submitted by webmaster on 28 July, 2011 - 14:09

बी एम एम २०११ : सर्वसाधारण व्यवस्थापन कसं होतं?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अधिवेशनात कार्यक्रम खूपच छान होते. पण ते संख्येने अजस्त्र (अगणित म्हणू हवे तर!) होते. त्यामुळे कित्येक चांगल्या कार्यक्रमांचा आस्वाद घेता आला नाही.

सुरज एक तारे अनेक..वेळ एक कार्यक्रम अनेक.. या समस्येमुळे मला तरी बहुतेक सर्वच कार्यक्रमात श्रोते सदोदित सचिंत मुद्रेने बसलेले दिसत होते. 'मी अमुक एका कार्यक्रमाला बसलो आहे खरा. पण छे! तिकडे तो दुसरा कार्यक्रम चालू आहे. तिकडे जावे की काय?' असा एक सार्वत्रिक प्रश्न, सगळ्याच कार्यक्रमातील श्रोत्यांना पडलेला दिसत होता. बर्याच ठिकाणी श्री ना अथवा सौ ना एका कार्यक्रमाला बसायचे होते आणि त्याचवेळी त्यांच्या अर्धान्गाला दुसरीकडे जायचे होते. त्यांचे मग लाडाचे संवाद आणि एक दोन वाक्यात संपूर्ण कार्यक्रमाचे काढलेले वाभाडे (म्हणजे 'चल अगं तिकडे जाऊ.. हे काय भंकस चालू आहे' वगैरे.), प्रेक्षकात बसून ऐकताना करमणूक होत होती. यावर उपाय म्हणून काही जोडपी दारातूनच डोकावून पाहत होती (आम्ही कधीच रिस्क घेत नाही!). पण चिंता स्थायी होती हे खरेच. आपण काय बघतोय, या पेक्षा आपलं काय चुकतं आहे हा विचार जास्त प्रबळ होता.

त्यामुळेच बहुतेक सर्व कार्यक्रम चालू असताना मधेच नवी मंडळी जथ्याने येत होती आणि बसलेल्या पैकी काही जुनी मंडळी जथ्याने उठून जात होती. (बसलेल्यांच्या पायावर पाय देऊन सॉरी हं! असे म्हणत..)

बृमम पुरस्कार वितरणाच्या वेळेस हे अगदी प्रकर्षाने जाणवले. शंकर महादेवन अजून पूर्ण पणे विंगेत गेला देखील नव्हता, की मंडळी पाखरांसारखी जथ्याने उठून मार्गस्थ झालेली होती. 'मंडळी कृपया बसून घ्या. आता पुरस्कार द्यायचे आहेत.' या वारंवार केलेल्या विनंतीचा देखील काहीही उपयोग झाला नाही. अगदी ठार बहिरट (हे आडनाव नाही! ) असल्यासारखी मंडळी तडक निघून गेली..आणि शेवटी अगदीच घोंगडी चे मालक शिल्लक राहिले होते. घाई आणि पुढे काय!!

शास्त्रीय संगीताचा हाउस फुल कार्यक्रम चालू होता, त्याच वेळेस कीनोट स्पीच चालू होते. माझ्या अंदाजा प्रमाणे 'स्वरांगण' आणि 'समीप रंगमंच' हे दोन कार्यक्रम देखील एकाच वेळेस चालू होते.
उद्घाटनाचा कार्यक्रम आणि सतारीचा कार्यक्रम देखील असेच एकमेकात अडकले होते. शेवटी दुपारी ११.३० वाजता सतारीवर अहिर-भैरव ऐकायला मिळाला. अर्थात त्यामुळे 'स्वामी' बघता आले नाही.
नशीब म्हणजे 'मराठी बाण्याच्या' जोडीला अजून काही नव्हते!!

या सर्वात कडी म्हणजे ज्या मंडळीनी एक दिवसाचा पास काढला होता ती मंडळी तर दिवस भर रॉकेट सारखी हिंडत होती. त्यांना श्वास घ्यायची देखील उसंत नव्हती. ती कार्यक्रमाला जात नव्हती तर एका कार्यक्रमात घुसून तशीच पुढच्या कार्यक्रमात बाहेर पडत होती. एक दिवसात सगळ्या (म्हणजे all!!) कार्यक्रमाना 'touch' करून पैसा वसूल चा प्रयत्न जोरात चालू होता.

एक नक्की की सर्वच कार्यक्रम अतिशय उत्कृष्ठ दर्जाचे होते. आणि म्हणूनच एक प्रेक्षक म्हणून अधिवेशनाच्या शेवटी, थोडे पहिले आणि बरेच पाहायचे राहून गेले असे वाटत राहिले.

कार्यक्रमांचा दर्जा वाढवणे नक्कीच साध्य झाले आहे. आता त्यांच्या संख्येवर लक्ष देता येईल का?
तसेच सकाळी नवाच्या ठोक्याला नाच-गाण्याचे कथा-कवितेचे रंगीत-संगीत कार्यक्रम ठेवू नयेत असेही सुचवावेसे वाटते..

बोस्टन मध्ये कार्यक्रमांची वेळ ठरवताना या गोष्टीवर जरूर विचार व्हायला हवा असे वाटते.