साल्हेरचा वेढा :

Submitted by वेताळ_२५ on 25 July, 2011 - 08:14

salher21.jpg

इ.स. १६७० मध्ये बागलाण भागात मराठे मोगल संघर्षाने उग्र स्वरूप धारण केले होते. औरंगजेबाने मराठ्यांचा नि:पात करण्यासाठी महाबतखान या महापराक्रमी आणि मातब्बर सरदाराला मुद्दाम दक्षिणेच्या स्वारीवर पाठविले होते. परंतु ऐषारामाची चटक असलेल्या महाबतखानाकडून कसलीही भरीव कामगिरी होण्याचे चिन्ह दिसेना. अहिवंतचा दुर्गम किल्ला जिंकताना महाबतखानाने आपले सारे शौर्य पणास लावले. परंतु किल्ला सर करण्याचे श्रेय शेवटी खानदेशचा सुभेदार दाऊदखान यास मिळाले. त्यानंतर तरी मराठ्यांचा मोड करण्याचे काम महाबतखानाने निष्ठापूर्वक करायला हवे होते. परंतु राजश्रीनी पारनेर (जि. अमहदनगर) येथे तळ ठोकला आणि प्रत्येक दिवस ख्यालीखुशालीत घालविण्यास सुरवात केली. अमीर लोकांकडून जबरदस्तीने त्याने मेजवान्या उपटण्यास कमी केले नाही. औरंगजेबाच्या कानावर ही वार्ता गेली. कोणीतरी तिखटमीठ लावून कळविले की, ’महाबतखान आतून शिवाजीला सामील आहे.’ त्यामुळे बादशाह संतप्त झाला आणि त्याने महाबतखानाला परत बोलविले. त्याच्या जागी आपला "दूधभाऊ" बहादूर कोका? (बहादूर कोकलताश) याला दक्षिणेत पाठविण्याचे ठरविले. बहादूरखानाने बादशहाचे समाधान करताना, ’तुम्ही दिल्लीची पातशाही खुशाल करणे आपण शिवाजीवर जातो त्यास हालखुद ठेवितो, त्याचे लष्कर पातशाही मुलखात न येईल असे करितो. पातशाहांनी फ़िकीर न करावी.’ अशा आशयाचे उदगार काढले अशी नोंद सभासदाने आपल्या बखरीत केलेली आहे.

बहादूरखानाने दक्षिणेत आल्याबरोबर साल्हेरच्या किल्ल्याकडे कूच केले कारण मोगल सेनेने अगोदरच किल्ल्याला वेढा घातलेला होता. परंतू मराठ्यांनी मोगलांची दाणादाण उडविण्यास सुरवात केलीली होती. मोगलांच्या तर्फ़े इखलासखान मियाना मोठ्या शर्थीने मराठ्यांना तोंड देत होता. शिवाजी महाराजांच्या योजनेप्रमाणे प्रतापराव गुजर सरसेनापती वरघाटाकडून आणि मोरोपंत पिंगळे कोकणातून साल्हेरकडे आलेले होते. त्यामूळे मोगलांच्या दोन्हीं बाजूच्या फ़ळीवर मराठ्यांना अचानकपणे हल्ला करणे शक्य झाले.साल्हेरला झालेली लढाई घनघोर स्वरूपाची होती. मराठ्यांनी नेहमीच्या गनिमीकाव्या ऎवजी उघडउघड "सुलतान ढवा" करून मोगलांना घेरले होते. या लढाईचे वर्णन करताना सभासद लिहतो, ’चार प्रहर दिवस युद्ध जाहले. मोगल, पठाण, रजपूत रोहीले, तोफ़ाची, हत्ती, उंटे, आरावा घालून युद्ध जहाले. युद्ध होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला की, तीन कोस औरस चौरस आपले व परके माणूस दिसत नव्हते.’

इतर कोणत्याही लढाईपेक्षा साल्हेरच्या लढाईचा तपशील सभासदाने ब-याच बारकाव्याने दिला आहे. साल्हेरची लढाई मराठ्यांना अभिमानाची आणि प्रतिष्ठेची वाटली असावी कारण मैदानावर समोरासमोर लढाई करून मोगलांचा पराभव करण्यात मराठे या लढाईत यशस्वी झाले. गनिमी कावा हा तर मराठ्यांच्या युद्धशैलीचा खास प्रकार होता. परंतू सामन्याची लढाई देऊन आपण त्यातही मोगलांपेक्षा कमी नाही असे साल्हेरला मराठ्यांनी सिद्ध केले म्हणून "साल्हेरची लढाई" मराठ्यांच्या इतिहात महत्वपूर्ण मानणे आवश्यक आहे.

या लढाईत मोगलातर्फे इखलासखान मियाना, बहलोलखान (बहादूरखान ?), अमरसिंग, त्याचा मुलगा मुहकमसिंग हे मोठ्या त्वेषाने लढत होते. मराठ्यांच्या बाजूचे सेनापती प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे, आनंदराव मोहीते, व्यंकाजी दत्ता, रुपाजी भोसले, सूर्यराव काकडे, शिदोजी निंबाळकर, खंडोजी जगताप व गोदोजी जगताप, मानाजी मोरे, विसाजी बल्लाळ, मोरो नागनाथ, मुकुंद बल्लाळ इत्यादी अनेक बिनीचे सरदार लढत होते. सभासदाला या लढाईचा बराच तपशील स्मरणात असावा. त्याने सर्व मराठे वीरांची नावे आठवून यादी दिली आहे.
प्रत्यक्ष युध्दात प्रचंड रक्तपात झाला. रक्ताचे पूर वाहीले. रक्ताचा चिखल झाला. त्यामध्ये हत्ती, घोडे आणि उंट फसू लागले. दोन्ही बाजूची मिळून दहा हजार माणसे मारली गेली. जनावरे किती मारली याची गणनाच करणे शक्य नव्हते.

मोगलांची हानी बरीच झाली. राव अमरसिंग आणि त्याचे काही सहकारी लढाईत ठार झाले. मुहकमसिंग आणि स्वत: इखलासखान जबर जखमी झाला. मराठ्यांची हानीही झाली. सूर्यराव काकड्यासाऱखा तेजस्वी हिरा तोफेचा गोळा लागून धारातीर्थी पतन पावला. सभासद लिहीतो, 'सूर्यराव म्हणजे सामन्य योद्धा नव्हे. भारती जैसा कर्ण योद्धा त्याच प्रतिमेचा, असा शूर पडला, परंतू युद्धात अखेर मराठ्यांचा जय झाला, मोगलांचा सारा सरंजाम त्यांच्या हाती आला. १२५ हत्ती व सहा हजार घोडे आणि तितकेच उंट मराठ्याना मिळाले. अलंकार, नाणी, कापडचोपड यांची तर गणतीच नव्हती.

शिवाजीमहाराजांना हे आनंदाचे वृत्त समजल्यावर खबर आणणार्‍या जासूदाना त्यांनी सोन्याची कडी घातली. जे मर्द मराठे जिवाची बाजी लावून लढले त्यांना महाराजांनी अपार द्रव्य दिले आणि त्यांची संभावना केली. दिलेरखान हे युद्ध झाले तेव्हां साल्हेरपासून काही अंतरावर होता. त्याला पराजयाची वार्ता कळताच तो मागच्या मागे पळला.

सक्सेना लिहीतो, 'या युद्धाची वार्ता कळताच बहादूरखान मोठ्या तातडीने बागलाणाकडे रवाना झाला. परंतु तो तेथे जाण्याच्या अगोदर साल्हेरवर जय मिळवून मराठे कोकणात उतरले होते.' बहादूरखान मराठ्यांच्या पाठलागावर निघाला. त्याची हिंमत कुठपर्यंत आहे हे महाराज जाणून होते.त्याच्या विषयी त्यांनी उद्गगार काढले 'बहादूरखान पेंडीचे गुरू आहे त्याचा गुमान काय आहे?'

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुगल म्याप वर Sālher fort, Maharashtra हा सर्च दिल्यावर पुढील ठिकाण मिळाले. नाशिकच्या उत्तरेस वणी, त्याही उत्तरेस जिथे A दाखवला आहे तिथे साल्हेरचा किल्ला आहे, अर्थातच याच्या जवळपासच हे युद्ध झाले असेल.
salher fort near Nashik-Vani-1.JPG

या लढाई व्यतिरीक्त अने़क लढाया शिवकाळात झाल्या पण त्याविषयी
काही वाचनात कधी आले नाही.
सविस्तर माहीतीबद्दल धन्यवाद.

खुप छान माहिती ... Happy
आम्ही मायबोलीकर मावळे साल्हेर-मुल्हेर पायथा घालुन आलोय...
तो परिसर भन्नाट आहे.त्याचा वृतांत आनंदयात्रीने http://www.maayboli.com/node/22324 येथे दिला आहे

साल्हेरच्या लढाईची उत्तम माहिती पण एक मोठी चूक जाहली आहे बहुदा.. Happy

साल्हेरच्या लढाईनंतर आणि दिलेरखान माघारी पळाल्यानंतर औरंगजेबाने बहादूरखान यास दख्खनवर रवाना केले. बहादूरखान याचा साल्हेर युद्धाशी काहीच संबंध आलेला नाही.

बहादूरखान पेंडीचे गुरू आहे त्याचा गुमान काय आहे?' असे राजे म्हणाले तेंव्हा ते परळी, चंदन-वंदन, कोल्हापूर, रायबाग, हुकेरी हा प्रदेश जिंकण्यासाठी त्याभागात गेलेले होते.

"दूधभाऊ" बहादूर कोका? (बहादूर कोकलताश)

'दुधभाऊ' ह्या शब्दाबद्दल प्रा. दत्ता भगत त्यांच्या संपादित सभासद बखरीत म्हणतात,

'दुधभाऊ ' हा नातेदर्शक शब्द होय. एकच स्त्रीला २ भिन्न पुरुषांपासून होतात ते दुधभाऊ. पतीच्या मृत्युनंतर अथवा घटस्फोटानंतर दुसरे लग्न करण्याची स्त्रीयांना संमती असते त्या समाजात हे नाते संभवते. इथे (सभासद बखरीत) हा शब्द वापरला जातो ह्याचे आश्चर्य वाटते.

दूधआई हा शब्द माहित होता, समजा मूल लहान असतानाच आई गेली किंवा काही कारणाने जर एखाद्या स्त्रीला मुलाला स्वतःचे दूध पाजणे शक्य नसेल तर दुसर्‍या एखाद्या स्त्रीला तिचे दूध पाजण्यासाठी बोलावित असत.
कदाचित अशा दूध आईचा मुलगा म्हणजे दूधभाऊ तर नसेल ?

बरंच विस्कळीत आहे. धाग्याचा उद्देशच कळला नाही.
अहिवंतचा दुर्गम किल्ला जिंकताना महाबतखानाने आपले सारे शौर्य पणास लावले. परंतु किल्ला सर करण्याचे श्रेय शेवटी खानदेशचा सुभेदार दाऊदखान यास मिळाले. त्यानंतर तरी मराठ्यांचा मोड करण्याचे काम महाबतखानाने निष्ठापूर्वक करायला हवे होते. परंतु राजश्रीनी पारनेर (जि. अहमदनगर) येथे तळ ठोकला आणि प्रत्येक दिवस ख्यालीखुशालीत घालविण्यास सुरवात केली.
१. महाबतखानाला राजश्री संबोधणे चूक.
२. अहिवंत जिंकल्याचे श्रेय दाऊदखानाला मिळाल्यावर महाबतखानाने मोहिम सोडून नाशिकला येऊन उन्हाळ्याचे दिवस काढले आहेत. पुढे सुरतच्या दक्षिणेला असलेल्या पारनेरा दुर्गावर जाऊन तो चैन करीत राहिला आहे. नगरच्या पारनेरला नव्हे...

३. औरंगजेबाने दाऊदखानालाही परत बोलावून घेतले. १६७१ चा पावसाळा सुरु झाल्याने मोठी मोहिम निघणे अशक्य होते. दिलेरखान व बहादूरखान सुरतजवळ होते. पावसाळ्यानंतर (october end) हे दोघे बागलाणात शिरले व साल्हेरला वेढा दिला. त्यांच्याबरोबर इखलासखान मियाना, मुहकमसिंह चंदावत, राव अमरसिंह चंदावत हे सरदार. फौज ४०-५० हजार. वेढा टाकून हे दोघे मोकळे झाले. दिलेरने पुढचा विचार केला, दोघांनीही वेगवेगळ्या मार्गांनी शिवाजीराजांच्या राज्यावर तुटून पडावे व राज्य ताब्यात घ्यावे.
४. दिलेर नाशिक मार्गे पुण्याकडे निघाला तर बहादूर नगरच्या दिशेने सुप्याजवळून पुण्याच्या पूर्व अंगाने.. दिलेरने वेगवान हालचाली करत कूच केले. इथेच वाटेत कळवणजवळ्च्या कण्हेरगडाला त्याने वेढा घातला आणि कण्हेरगडाच्या रामजी पांगेर्‍याचा दैदिप्यमान पराक्रमी इतिहास घडला.. ती युद्धकथा नंतर सांगिन.
५. या बातम्या कळताच राजे खेड-शिवापुराहून राजगडला गेले. यावेळी मोरोपंत पिंगळे पायदळासह बागलाणातून कोकणांत जव्हार- रामनगर काबीज करायला उतरले होते व प्रतापराव गुजर घोडदळासह नगर- औरंगाबादकडे होते. दिलेरखान वेगाने पुण्याच्या दिशेने येत होता.
६ इथे राजांचा अलौकीक प्रतिशहाचा डाव ठरला. दिलेर पुण्याकडे येऊ द्यावा. त्याला इतरत्र असा सज्जड दणका द्यायचा की पुण्याचा त्याचा शह ढिला होइल. मोगलांचं मोठं सैन्य साल्हेरला वेढ्यांत होतं. त्याला तडाखा दिला की दिलेर उलट्या पावली फिरला पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी मोरोपंत व प्रतापरावांना साल्हेरीवर चालून जाण्यास सांगितले.

पुढील अत्यंत रोचक अशा संग्रामाचे वर्णन द्यायला हवे होते. त्या अप्रतिम चालीची मझा नकाशाशिवाय नाही. त्याचा वेगळा धागाच काढावा लागेल.
पक्क्या, घे हे काम हातात.

हेम,

>>....रामजी पांगेर्‍याचा दैदिप्यमान पराक्रमी इतिहास ....

हा रामजी पांगेरा म्हंजे वणी-दिंडोरीच्या लढाईतला का? महाराज सुरतेच्या दुसर्‍या स्वारीवरून येत होते (इ.स. १६७०). तेव्हा दिंडोरीच्या आसपास मोगल त्यांना आडवे गेले. ही लढाई मर्‍हाट्यांच्या खास अकलेचा आणि शौर्याचा नमुना आहे. पक्का भटक्या जिला कांचनमांचनची लढाई म्हणतो ती. लढाई आणि रामजी दोघांचीही अधिक माहिती मिळाल्यास बरं होईल. .

आपला नम्र,
-गा.पै.

बे, Happy
लढाईच्या strategy चं रोचक वर्णन वाचायला मिळेल असं वाटलेलं. पण इथे फक्त लढाईआधीचं आणि नंतरचं एवढंच दिलंय. उद्देश अजूनही कळलेला नाही. मज्ज्जा आहे ती लढाईत..

गामा,
कांचनमांचनच्या लढाईत रामजी पांगेर्‍यांचा उल्लेख माझ्या वाचनात नाही. काही संदर्भ मिळू शकेल कां? प्रतापगड युद्धांत अफजलखानवधाच्या वेळी त्यांनी चांगली कामगिरी केलेली होती.

हेम,

बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या शिवचरित्रात महाराज सुरतेच्या दुसर्‍या स्वारीवरून परत येत असतांनाचे प्रकरण आहे. मला आठवतंय त्याप्रमाणे तीत महाराजांकडे भरपूर ओझे असल्यामुळे स्वारीचा वेग बराच मंदावला होता. त्यामुळे कोणी एक मोगली सरदार (नाव आठवत नाही :-() त्यांना आडवा गेला. अशा बिकट प्रसंगी महाराजांनी आवाहन केले तर सुमारे सातशे गडी लढाईला उभे राहिले. त्यांचा नायक रामाजी पांगिरा होता असं आठवतं.

माझ्या आठवणीचं आपण अथवा इतर कोणी खरंखोटं केलं तर बरं होईल. कारण या घडीला माझ्याजवळ शिवचरित्र नाहीये.

आपला नम्र,
-गा.पै.

गामा,
कणेरागडच्या युध्दाबाबत सभासद बखरीत उल्लेख मिळतो तो खालील प्रमाणे.

रामजी पांगेरा म्हणून हशमांचा हजारी [त्यानें] हजार लोकांनिशी कणेरागड आहे. त्याखालें
दिलेलखानांशी युध्द केले. हजार लोक थोडे देखून दिलेलखानं यानें फौजेनिशी चालून घेतले. रामाजी पांगेरे यांनीं आपले लोकांत निवड करून, निदान करावयाचें आपले सोबती असतीले ते उभे राहणे, म्हणून निवड करितां सातशें माणूस उभें राहिले. तितकियांनी निदान करून भांडण दिधलें दिलेलखान याची फौज [इनें] पायउतारा होऊन चालून घेतलें. चौफेरा मावळे लोक वेढिले.
एक प्रहर टिपरी जैसी शिमग्याची दणाणते तैसे मावळे भांडिले. दिलेलखानाचें बाराशें पठाण राणास आणिलें मग सातशें माणूस व रामजी पांगेरा सर्वही उघडे बोडके होऊन एकएकास वीस वीस तीस तीस जखमा तिराच्या, बर्चीच्या लागल्या. लोक मेले. मोठे युध्द जालें. मग दिलेलखान यानीं तोंडात अंगोळी घालून एक घटका आर्श्चय केले.

पुढे चाफळला समर्थ रामदासस्वांमिना राज्याभिषेकाचे आमंत्रण द्यायला राजे स्वत: गेले होते. चाफळहून परत येताना प्रतापराव गुजरांच्या विनंतीवरून राजे स्वत: रामजी पांगेर्‍याच्या घरी जाऊन आले होते.

धन्यवाद वेताळ!

बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या शिवचरित्रात दिंडोरीच्या लढाईचे वर्णन आहे. ती, कण्हेरगडाची आणि कांचनमांचनची लढाई बहुधा एकच असावी. साहजिकच रामजी पांगेर्‍याची लढाईसुद्धा हीच असणार. हरीश कापडियाच्या 'Trek the Sahyadris' मधला एक संदर्भ इथे मिळतोय.

या लढाईविषयी अधिक माहिती मिळाल्यास बरे होईल. माझ्या आठवणीनुसार महाराजांना या लढाईतून चिक्कार जनावरे मिळाली. महाराज सुरतेची लूट घेऊन चाललेत याचा सुगावा शत्रूला लागला होता. त्यामुळे शत्रूनेही लूट वाहून नेण्याच्या उद्देशाने बरीच जनावरे (घोडे, उंट, इ.) आणली होती. ती सारी महाराजांच्या हाती लागली. शिवाय इतर लूट ती वेगळीच.

ही लढाई नेहमीपेक्षा वेगळी आहे कारण महाराजांचा सैन्यवेग (ट्रूप्स मूव्हमेंट स्पीड) अतिशय मंदावला होता. तरीही महाराजांनी शत्रूवर कशी मात केली हे जाणून घ्यायला आवडेल. Happy

आपला नम्र,
-गा.पै.

गामा,
कण्हेरगडाची लढाई आणि कांचनमांचनची लढाई (वणी-दिंडोरी) या दोन्ही लढाया वेगवेगळ्या आहेत.

साल्हेरला जेंव्हा बहादूरखानाने वेढा घातला. त्यावेळी दिलेरखान त्याच्या मदतीला साल्हेरकडे निघाला, रामजी पांगेरा व त्याच्या सहकार्‍यांनी त्याला कणेरागडाकडेच रोखला. हि कण्हेरगडाची लढाई.

ऑक्टोबर १६७० मधे शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सूरत लुटली. मोगलांना हा मोठा धक्काच होता. लुट घेउन येताना महाराजांना मोगलांनी अड़विण्याचा प्रयत्न केला. मोगल सेनापती दाउदखान कुरेशी आणि महाराजांची लढाई झाली पण महाराजांना अडवणे मोगलांना जमले नहीं आणि राजे लुट घेउन स्वराज्यात परतले. याच लढाईला वणी-दिंडोरी किंव्हा कांचनबारीची लढाई म्हणतात. इथे पहा

वेताळ,

या दोन लढाया वेगवेगळ्या असतील तर हरीश कापडियाच्या 'Trek the Sahyadris' मधला संदर्भ चुकीचा आहे. शिवाय इसवी सन १६७२ हाही चुकला आहे.

बरोबर?

-गा.पै.

@ गामा,
trek the sahyadri मधील तो संदर्भ चुकीचाच आहे. सुरत लूट दुसर्‍यांदा ऑक्टो. १६७०, कांचनबारीची लढाई तेव्हाचीच. ती वेगळी व १६७२ ची कणेरगडाची लढाई वेगळी.
बाबासाहेबांच्या 'राजा शिवछत्रपती' मध्ये कांचनबारीच्या लढाईत रामजी पांगेर्‍यांचा कुठेही उल्लेख नाही.

@ वेताळ,
साल्हेरला जेंव्हा बहादूरखानाने वेढा घातला. त्यावेळी दिलेरखान त्याच्या मदतीला साल्हेरकडे निघाला,
अहो, पुन्हा चूक.... सविस्तर वर दिलंय तरी!
इ.स. १६७२ च्या पावसाळ्यानंतर (october end) दिलेर व बहादूरखान बागलाणात शिरले व साल्हेरला वेढा दिला. त्यांच्याबरोबर इखलासखान मियाना, मुहकमसिंह चंदावत, राव अमरसिंह चंदावत हे सरदार. फौज ४०-५० हजार. वेढा टाकून हे दोघे मोकळे झाले. दिलेरने पुढचा विचार केला, दोघांनीही वेगवेगळ्या मार्गांनी शिवाजीराजांच्या राज्यावर तुटून पडावे व राज्य ताब्यात घ्यावे. दिलेर नाशिक मार्गे पुण्याकडे निघाला तर बहादूर नगरच्या दिशेने सुप्याजवळून पुण्याच्या पूर्व अंगाने.. दिलेरने वेगवान हालचाली करत कूच केले. इथेच वाटेत कळवणजवळ्च्या कण्हेरगडाला त्याने वेढा घातला आणि कण्हेरगडाच्या रामजी पांगेर्‍याचा दैदिप्यमान पराक्रमी इतिहास घडला.

हेम,

तुमच्या माहितीबद्दल धन्यवाद! Happy

कांचनबारीच्या लढाईचं नवल वाटतं की तिच्यात शिवाजीमहाराजांनी सैन्याचे दोन भाग केले होते. सुरतेच्या अवजड लुटीमुळे त्यांचा सैन्यवेग फारच कमी होता.पारंपारिक व्यूहरचनेप्रमाणे सैन्याने लुटीचे रक्षण करायला पाहिजे, मात्र महाराजांनी सरळ दोन भाग केले आणि मुख्य सैन्याने शत्रूवर हल्ला चढवला. याकरिता वाघाचं काळीजच हवं. लूट जणू उघड्यावर पडली होती. परंतु मराठे जिंकल्यामुळे लूट तर सुरक्षित राहिलीच, वर शत्रूची जनावरेही सापडली.

या लढाईबद्दल अधिक माहिती मिळेल काय?
उदा:

१. सैन्याचे दोन भाग करायचं कोणी सुचवलं?
२. महाराजांचा सैन्यवेग किती होता आणि शत्रूचा किती होता?
३. शत्रूकडे जनावरे होती. त्यामुळे शत्रूच्या सैन्यवेगावर मर्यादा आली का?
४. महाराजांनी लूट पुढे पाठवून दिली की मागे सोडून सैन्य पुढे सरकवले?
५. लढाई केव्हा सुरू झाली आणि किती वेळ चालली?
६. लढाईनंतर ज्यादा जनावरांमुळे सैन्यवेग अधिकंच मंदावला का?
७. महाराजांनी नंतर कुठला सुरक्षित किल्ला गाठला?

आपला नम्र,
-गा.पै.