झाडारडती

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

गलीबाळु: अरे, ऐकलस का? झाडे सुसमंजस असतात म्हणे. तुम्ही त्यांच्या आजुबाजुला प्रार्थना केली तर ती जास्त चांगली वाढतात.
फाटेफोडु: खरंच? पण कोणत्या भाषेत करायची प्रार्थना?
गलीबाळु: अर्थातच संस्कृत. तीच तर वैश्वीक भाषा आहे. खुद्द देवांची पण.
फाटेफोडु: पण मग खरोखर फरक पडायला उच्चार अगदी योग्य असावे लागतील ना?
गलीबाळु: हो, पण कोणतीच इतर भाषा संस्कृतच्या जवळही पोचणार नाही.
फाटेफोडु: पण सगळ्या मानवांना सुद्धा तर संस्कृत कळत नाही. मग झाडांचे काय बोला? आणि झाडांना प्रार्थनेनी मदत होत असेल तर माणसांना पण नाही का होणार?
गलीबाळु: होतेच तर!
फाटेफोडु: पण मग शिव्याशापांनी वाईट परिणाम पण व्हायला हवा.
गलीबाळु: ऊं, होत असतो, पण लोक स्वत:करता त्याविरूद्ध कवच रचायला आपसुक शिकतात.
फाटेफोडु: आपल्याला चांगल्या गोष्टींविरुद्ध सुद्धा कवच बनवता येते का?
गलीबाळु: कोणी तसे का करेल?
फाटेफोडु: असेच वाटले म्हणुन विचारले आपले.
गलीबाळु: तुझे नेहमी काहीतरी भलतेच असते. मग झाडांच्या सामंजस्या बद्दल ठरले सगळे?
फाटेफोडु: हो बहुतेक. नाही, अजुन एक प्रश्न आहे: कोणी प्रार्थना म्हंटल्यागत सुरबद्ध स्वरुपात शिव्या दिल्या तर?
गलीबाळु: शब्दांवरुन कळेल की ते.
फाटेफोडु: त्यांना भाषा नसेल समजत तर नाही कळणार.
गलीबाळु: हं
फाटेफोडु: मला वाटते ते लाघवावरुन ठरावे. म्हणुनच तर आपण निवडणुकीगणीक भयंकर नेत्यांना निवडुन आणतो.
गलीबाळु: भलत्या विषयावर नको जाऊस.
फाटेफोडु: पण आपल्याला नाहीच समजत राजकारणी भाषा आणि आपण त्यांच्या साखरवाणीला भुलतो.
गलीबाळु: राजकारण्यांना विसर - जेंव्हा तुमच्या मनात चांगले विचार असतात तेंव्हा ते झाडांना बरोब्बर कळतात.
फाटेफोडु: ओह, झाडांनी बेबल मासे तर पाळले नसतात?
गलीबाळु: बेबल मासे? हा काय प्रकार आहे म्हणे?
फाटेफोडु: डग्लस अॅडम्सने त्यांचा शोध लावला होता. बेबल मासा जर कानात ठेवला तर तो आपल्या मेंदुतील तरंगांवर जगतो व त्याचबेळी ते तरंगरुपी विचार इतरांना कळेल अशा स्वरुपात आसमंतात उत्सर्जीत करतो. परग्रहवासियांशी संधान साधण्याकरता हे मासे अत्यावश्यक आहेत.
गलीबाळु: आपण त्यांच्याबद्दल काहीच कसे ऐकले नाही? मी कसे त्यांच्याबद्दल काहीच ऐकले नाही?
फाटेफोडु: राजकारणी लोक त्यांना एरीया ५१ मधे गुप्ततेत ठेवतात. ते जर बाहेर पडले तर सगळेच लोक एकमेकांना समजु शकतील, व युद्धे बंद होऊन राजकारणी लोक बेकार होतील.
गलीबाळु: पण कुठे तरी त्यांचे प्रयोग झाले असतील ना?
फाटेफोडु: विंदा करंदीकरांनी एटु नामक देशात त्यांच्या वापरा बद्दल सांगीतले आहे. आता तिथल्या लोकांना सतत बोलत रहावे लागते. इतरांना आपले विचार कळु न देण्याचा तोच एक मार्ग आहे त्यांच्याकडे.
गलीबाळु: काहीतरी आठवतय खरे त्या प्रकारचे.
फाटेफोडु: चल तर गोषवारा घेऊ या - जर झाडे सुसमंजस असतील तर त्यांना लोकांची प्रार्थना कळते (भाषा न कळताही), बेबल मासे अस्तित्वात आहेत, राजकारणी लोक त्यांना एरीया ५१ मधे ठेवतात (एरीया ५१ पण अस्तित्वात आहे), आणि विंदा करंदीकरांनी बेबल मास्यांवर एटु देशात प्रयोग केले आहेत.
गलीबाळु: चांगला मतितार्थ.

विषय: 
प्रकार: 

{ आता तिथल्या लोकांना सतत बोलत रहावे लागते. इतरांना आपले विचार कळु न देण्याचा तोच एक मार्ग आहे त्यांच्याकडे} Happy

Pages