तशी माझी मीच रिक्षा फ़िरवतच असतो म्हणा. मी गेली अनेक वर्षे टिव्हीवरच्या मालिकाच काय, टिव्हीच बघणं सोडून दिलय. त्यामूळे वाचनाला, मित्रांच्या संपर्कात रहायला, इतर छंदांना भरपूर वेळ मिळतो.
श्रीयुत गंगाधर टिपरे हि मन लावून बघितलेली शेवटची मालिका. त्या आधी, तू तू मै मै पण बघितली होती. भारत एक खोज ची तर वाट बघत असायचो.
यावेळच्या भारतवारीत, पावसामूळे कधी कधी घरी बसावे लागायचे. आई कुठलीतरी मालिका बघत बसलेली असायची. त्यावेळी जाणवलेले हे काही.
अर्थात मला हे माहित आहे, कि माझ्या या लेखनाने इतर कोण, माझी आईदेखील मालिका बघणे सोडणार नाहि. त्यमूळे हे स्वगतच समजायचे.
१) विषय
मालिकांचे विषय हे एका ठराविक वर्तूळातच फ़िरताना दिसताहेत. कौटुंबिक ताणतणाव याचे नुसते गुर्हाळ चाललेले असते. आताशा अभावानेच दिसणारे एकत्रित कुटुंब या मालिकांत असते. आणि ते गुण्यागोविंदाने एकत्र नांदताना क्वचितच दिसते. ताणतणावात काही खास कारणे दिसली नाहीत, तरी कुठल्यातरी सूनेला घराबाहेर नक्की काढलेले असते आणि प्रॉपर्टीच्या पेपर्सवर कुणाकडून सह्या नक्कीच हव्या असतात. नुसत्या पेपर्सवर सह्या करुन, तेसुद्धा घरातल्या घरात असे कायदेशीर दस्ताऐवज तयार करता येतात का ? घटस्फोटाचे कागद पण असेच तयारच असतात, त्यावर नुसती सही करायची असते. तीसुद्धा घरच्या घरी. धन्य रे बाबांनो. तमाम गृहिणींना उत्तम जी.के. मिळतय म्हणायचे.
२) बिझिनेस
प्रत्येकाचा काहितरी बिझिनेस नक्कीच असतो, पण तो कसला ते मात्र शेवटपर्यंत कळत नाही. ऑफ़िसेसमधले वातावरण तर काय वर्णावे ? या दिग्दर्शकांना स्वत:ची ऑफ़िसेस पण नसतात का ? एका टिपिकल दिवसात ख-याखु-या ऑफ़िसात जे काही घडू शकते, त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे, पण या लोकांना ते माहितच नसते.
३) घरातला वावर
पुर्वी आशा काळे कशी स्वत:च्या पदराने नवरोबाचे बूट पुसून द्यायची, तसे आता होत नाही. (त्याच पदराने चहाचा कप पण पुसायची ती !) पण मालिकांतल्या बायकांना घरात काही काम असते, असे कधी जाणवतच नाही. अगदी घरात नोकर चाकर असले तरी, घरातील माणसांना अनेक कामे स्वत:च करावी लागतात. दोघे नवराबायको नोकरी करणारे असले तरी, दोघांनाही घरातली कामे उरकावीच लागतात. पण मालिकातल्या माणसांना मात्र तसे काहिही काम नसते. म्हणून तर कटकारस्थाने करत असतात.
मला आवर्जून नातीगोती नाटकातल्या आईच्या घरातील वावराचा उल्लेख करावासा वाटतो.
त्यात ती आई, घरातील इतक्या वस्तू हाताळते, त्यांची ने आण करते कि ते घर आणि ती आई अगदी खरीखुरी वाटते. पण मालिकेतल्या बायका मात्र कचकड्याच्या बाहुल्याच वाटतात.
४) अभिनय
समजा दोन बायका बोलत असतील, तर एकीच्या तोंडावर, बये तूला भाजून खाऊ की तळून खाऊ असे भाव, तर दुसरीच्या तोंडावर, धरणीमाय पोटात घेईल तर बरं, असे भाव. यापेक्षा वेगळे काही दिसते का कधी ? कायम चढ्या आवाजात बोलणे, (लाऊड) सदैव डोळे रोखून वा वटारून बोलणे म्हणजे यांचा अभिनय. रडायचे म्हणजे गळा काढूनच रडायचे. कधी कधी तर ते रडणे मला बघायलाच काय, ऐकायला सुद्धा असह्य होते. पापण्यांनी रोखून धरलेले पाणी, डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू... असे उत्तम
क्लोज अप्स आठवताहेत मालिकांमधले ?
अभिनयाची उस्फुर्तताच जाणवत नाही. सुप्रिया चा अभिनय म्हणजे उस्फ़ुर्तता, असे समजले तरी चालेल. एरवी असा नैसर्गिक अभिनय करणारे कलाकारही, मालिकांचा अतिरेक झाल्याने यांत्रिक अभिनय करताहेत, असे वाटायला लागलेय.
५) आवाजाची फ़ेक
एकच एक ठराविक पट्टीतला आवाज, म्हणजे सीमा. परवा भरतच्या, निलम प्रभुंच्या बीबीवर मी, त्यांच्या महानंदा या नभोनाट्याची आठवण काढली होती. कधीचे आहे ते नभोनाट्य, काही कल्पना ? ते किमान १९७२/७३ सालातले असणार. आज जवळ जवळ ४० वर्षे झाली (ते परत कधी ऐकलेच नाही) तरी त्यातले संवाद विसरलेलो नाही. ते चार भागात प्रसारित झाले होते. त्यातल्या दुस-या भागातील संवांदाची उत्कटता तर गुंतता ह्रुदय हे, या नाटकात पण जाणवलेली नव्हती.
मराठीत एके काळी उत्तम आवाज कमावलेल्या कलाकार होत्या. आशा पोतदार, फ़ैयाज, भक्ती बर्वे, लालन सारंग, रिमा, सुधा करमरकर, आशालता, सुमन धर्माधिकारी, विजयाबाई..
नुसत्या आवाजावरुन त्या एखादी व्यक्ती उभी करू शकत असत. (आठवा जाणता राजामधली, जिजाबाई)
या थोर कलाकारांचे मार्गदर्शन आजच्या मालिका कलाकारांना लाभायला हवे होते.
बहुतेक मालिका घरातल्या घरातच असतात. आपण एकमेकांशी बोलायला, फ़ोनवर बोलायला, स्वत:शी बोलताना एकाच पट्टीत बोलतो का ?
६) कपडे
कपड्यांच्या बाबतीत पण ठराविक भडक रंगाचेच कपडे दिसतात. सेटच्या रंगसंगतीशी ते जूळतीलच असे काही नसतेच. आणि असा विचारही केलेला नसतो. शिवाय ते कपडे, नुकतेच इस्त्री केलेले, पदर पण व्यवस्थित पिन अप केलेला !
त्या कपड्यात बहुतेक कलाकार अवघडलेलेच वाटतात. मला आठवतय, बॅरिष्टर नाटकाच्या वेळी सुहास जोशींनी, असे सांगितले होते, कि विजयाबाईंनी त्यांना नाटकातल्या साड्या, घरी नेसायला लावल्या होत्या. वापरुन जुन्या झालेल्या साड्याच नाटकात वापरल्या होत्या. असा विचार कुणी करतं या मालिकांसाठी ?
७) प्रकाशयोजना
भगभगीत प्रकाश हाच कायम. सकाळची, संध्याकाळची वेळ, घरात कधी जाणवतच नाही. कायम टळटळीत दुपार. अनेक मराठी नाटकांत, प्रकाशयोजनेचा उत्तम विचार केलेला दिसतो. पण मालिकेत रात्रीच्या अंधारात सुद्धा, प्रत्येक झाडामागे प्रखर पांढरा दिवा लावलेला दिसतो. अपु-या प्रकाशात उत्तम चित्रीकरण करणारे कॅमेरे आता नक्कीच उपलब्ध आहेत.
८) चित्रीकरण
तेच ते ठराविक अँगल्स. त्याबद्दल काहीही विचार नाही. दर दोन मिनिटांनी झूम इन करत तीन वेळा घेतलेला क्लोज अप. वर्षानुवर्षे यात काही म्हणुन बदल झालेला नाही. एखादया दृष्याचा, रचनात्मक नजरेतून विचार केलाय असे जाणवतच नाही.
दूरदर्शनच्या पहिल्या वहिल्या कॅमेरामन्सच्या तूलनेत आज काही फ़ार पुढे आलो आहोत असे वाटतच नाही.
९) मेकप
याचा तरी काही विचार केलेला असेल, अशी अपेक्षाच करता येत नाही. चेहर्यावर थापलेले रोंगण, रंगवलेले केस, लावलेला विग सगळे सगळे कळून येते. टिकल्यांच्या जागी गोंदण, एकावर एक चढवलेल्या टिकल्या, दंडावरचे गोंदण, कोरलेले डोळे... यक.
१०) शरीर ठेवण
बहुतेक हिरो हे ठराविक साच्यातून काढलेल्या शरिराचेच नव्हे तर चेहरेपट्टीचे पण. अगदी नगाला नग. एकाला काढावा आणि दुस-याला झाकावा. म्हणून तर मालिकेत बदलत असावेत.
सिनियर कलाकारांनी, कामाचा अतिरेक करुन चेहर्याची, शरीराची लावलेली वाट पण बघवत नाही. अशा शरीराने व चेहर्याने, ते बरा अभिनय करतील, अशी अपेक्षा तरी कशी बाळगायची ?
आधी मला वाटायचे कि आपण हिंदीचे अनुकरण करतोय. (एक उदाहरण देतो, आपल्याकडे एखाद्याला हाक मारायला म्हणजे सांत्वनाला जाताना, पांढरेशुभ्र कपडे घालायची रित होती का, कधी ?) पण आता कळले कि इंग्रजी मालिकांत पण फारसे काही वेगळे नसते.
चला मन मोकळे करुन टाकले. काहि ओझरती दृष्ये बघून जर मला इतका ताप होत असेल, तर नियमित मालिका बघणार्यांच्या सहनशीलतेचा, हेवाच करायला हवा मी.
माझे तर दोन रिमोट मोडले
माझे तर दोन रिमोट मोडले वापरून वापरून. टीवीचा एक रिमोट कुत्र्याने चावून टाकला. >>>>>>
ना रहेगा रिमोट, ना देखनी पडेगी सीरीयल!! असा विचार करणारा अश्विनीमामीचा कुत्रा किती हुशार आहे.
दिनेशदा, एवढे सर्व प्रतिसाद
दिनेशदा, एवढे सर्व प्रतिसाद पाहून तुम्हाला कळलच असेल कि खरंच ह्या मालिकांमुळे सर्वजण कसे त्रस्त झाले आहेत. मी ह्यावर माझ्यापरीने एक तोडगा काढला. माझ्या सासूबाईंना पाच वर्षापुर्वीच एक वेगळा टिव्ही घेऊन दिला. त्यामुळे त्या रूमचे दार ओढून घेतले की, ह्या मालिकांचा थेट आमच्यावर हल्ला होत नाही
दिवसाले जवळ्-जवळ ८-९ तास त्या टी.व्ही. बघतात. आणि ऑफिसमधून आल्यावर ह्या मालिका सहन करण्याचे त्राण आमच्यात नसते.
गाणे आणि डान्सच्या शो नी पण
गाणे आणि डान्सच्या शो नी पण असाच वैताग आणलाय. काय तुमचे ते गाणे म्हणायचे, नाच-बिच करायचा तो करा, मुकाट जे काही मार्कस मिळतील ते घ्या आणि चालू पडा ना. नाही प्रत्येक शो मध्ये कुणीना कुणी तरी अत्यंत गरीब घरातला असतोच. मग त्याचे खासगी जीवन चव्हाट्यावर आणायचे..मग त्याने, त्याच्या बायकापोरांनी, आई बापांनी, शेजार्यापाजार्यांनी यथाशक्ती अश्रूपात करायचा.
मला तर वाटते हे रियालीटी शो वाले स्पर्धकांना ग्लिसरीनच्या बाटल्या पण पुरवत असावेत.
लगेच जज भारावून जाऊन पाठ केलेली वाक्ये म्हणून दाखवणार...त्या रितिक रोशनच्या डान्स शो मध्ये तर कुणाला तरी बाद केले तर तिची बहीण का मैत्रिण का कुणीतरी सांगत होती...त्याने शाळा केली नाही, कॉलेज केले नाही, फक्त तो डान्सच करत होता. आज तर त्याला बाद केले तर तो आयुष्यात परत कधी डान्स नाही करणार...
अरे मुस्काडा ना त्याला मग...
अजून एक वात आणणारा प्रकार म्हणजे, कुणीही सेलिब्रिटी आली की यांचे डायलॉग्स ऐकण्यासारखे...
मै बचपनसे आपके साथ डान्स करना चाहती थी.
अरे, वयाच्या तिसर्या वर्षी जेव्हा रितीकचे नाव कधी कुणाला माहीती नव्हते तेव्हापासून तुम्ही कसे काय ठरवून ठेवता बुवा...
त्याबाबतीत मग मराठी सारेगमप खूपच दर्जेदार वाटते
माझ्याकडे पण दोन टीवी आहेत व
माझ्याकडे पण दोन टीवी आहेत व पाव्हणे आले तर मी कटाक्षाने ते बंद ठेवते. खरे सांगू का २५ वर्षे खूप पार्ट्या पाव्हण्यांना बघणे वगैरे सर्व इमानदारीत केले. आता थोड्या मी टाइम ची अपेक्षा वाटते. मुंबई सारख्या ठिकाणी घरे लहान असतात व टीवी भल्या मोठ्या कॅबिनेट मध्ये ड्राविन्ग रूम मध्ये ठेवतात. याचा नक्कीच त्रास होतो. जिथे कमी ऐकू येणारे वयस्कर लोक असतात तिथे तर मोठ्या आवाजातील टीवी मुळे खूप त्रास होतो इतरांना. आपल्या वैयक्तिक बेडरूम मध्ये आरामात कमी आवाजात हवे ते कार्यक्रम बघण्यात काय त्रास आहे? रच्याकने आज टीवी बंद ठेवून घर साफ केले
आता रात्री आयफा २०११ बघणार.
हॅट्स ऑफ प्रॉडक्शनच्या
हॅट्स ऑफ प्रॉडक्शनच्या बर्याच मालिका मला आवडल्यात. खिचडी, साराभाई vs साराभाई, बा बहु और बेबी, मिसेस तेंडुलकर, रिमोट कंट्रोल, एक पॅकेट उम्मीद.
पहिल्या दोन निखळ विनोदी. डोके बाजूस ठेवुन बघाव्यात.
बाकीच्यांमध्ये नोकरदार मध्यमवर्गीय लोकांचे आयुष्य दाखवलेले. यातल्या एकाही मालिकेला वर दिनेशदांनी लिहिलेले १-१० मुद्दे लागू होत नाहीत. सगळे अभिनेतेही टॉप क्लास.
आम्ही आयफा सोडून गॉसिप गर्ल
आम्ही आयफा सोडून गॉसिप गर्ल बघायला लागलो. आयफात सर्व उगीचच लवयू टोरांटो म्हणून कोकलत आहेत. नाही सांगितले तर तो सोहळा अंधेरीतच आहे असेच वाट्ते आहे. : )
खिचडी , साराभाई बद्दल अनुमोदन.
ह्म्म्म्म खरच आहे दिनेशदा वात
ह्म्म्म्म खरच आहे दिनेशदा वात आणतात या मालिका..कथानक कुठे सुरु झालं ? कुठे संपल काहीच कळत नाही..या गोजिरवाण्या ( लाजिरवाण्या )घरात काय अन चार दिवस सासूचे ( जे कित्यक वर्षांपासुन संपतच नाही त)
काय असंभव सारखी खिळवुन ठेवणारी मालिका आलीच नाही परत. खरच अशा वेळी चाणक्य भारत एक खोज्,व्योमकेश बक्शी सारख्या मालिकांची आठवण येते. नव्या मालिका बघुन वाटतं ही आधुनिकता पेहरावात च आली विचारांमधे नाही.ह्म्म्म्म्म्म नया जमाना,नये लोग नइ सिरिअल्स..हे बघणारे लोक भरपुर आहेत,
प्रेक्षकांनी उत्तम मालिका
प्रेक्षकांनी उत्तम मालिका उचलून धरल्या तर मराठीतील वा इतर भाषांतील देखील उत्तम कथा टिव्हीवर येऊ शकतात. मराठीत आजवर आनंदी गोपाळ, रथचक्र, पडघवली, गोट्या,स्वामी आदी कादंबर्या मालिकांच्या रुपात समोर आल्या आहेत.
हिंदितही श्याम बेनेगल, सत्यजित रे यांनी उत्तम कथा पेश केल्या. मालगुडी डेज कुणी विसरू शकेल का ? त्या काळात सर्व मालिकांना दिल्लीच्या मंडी हाऊस मधून संमती मिळवावी लागे. आणि एक्स्टेंशनसाठी देखील परवानगी मिळवावी लागे. पण त्यातूनच काही दर्जेदार मालिका समोर आल्या.
अजूनही मराठीत अनेक कादंबर्या आहेत, ज्यावर उत्तम मालिका होऊ शकतात. (उदा. बारोमास) या कादंबर्या एकवेळ लोक वाचणार नाहीत, पण मालिकांच्या रुपात त्या नक्कीच जास्त लोकांपर्यंत पोहोचतील.
शिवाय या कादंबर्यामधून साचेबंद शहरी वातावरण न दिसता, खरा भारत दिसेल.
पण त्याच त्याच कथानकाच्या मालिका माथी मारल्या आणि नाईलाजाने का होईना, प्रेक्षकांनी त्या बघितल्या, तर कशी सुधारणा व्हायची ? चार दिवस... चे कथानक सलगरित्या रोहिणी हत्तंगडी ला तरी सांगता येईल का आता ?
अश्विनी म्हणतेय तशा काही दर्जेदार इंग्रजी मालिका आहेतही. (मला अजूनही हिअर इज ल्यूसी आठवतेय.) पण जेष्ठ नागरिकांना त्या रुचतीलच असे नाही. भारतीय पर्याय हवाच.
या बाबतीत बी .बी.सी
या बाबतीत बी .बी.सी एन्टरटेन्मेन्ट वर काही दर्जेदार इंग्रजी मालिका बघायला मिळतात. रिआलिटी शो आता नकोसे झालेत हे मात्र खर. यु टी.वी वरचे काही कार्यक्रम तर बादच करायला हवेत.
बीबीसीने बहुतेक अभिजात
बीबीसीने बहुतेक अभिजात इंग्रजी नाटकांचे चित्रीकरण करुन ठेवलेय. आपल्याकडे आनंदच आहे.
आपली कित्येक नाटके आणि ती जिवंत करणारी कलाकार मंडळी आता काळाच्या पडद्याआड गेलीत.
निकत्याच एक्झिट घेतलेल्या रसिका ओकचे, "हलकं फुलकं" नावाचे नाटक होते त्यात ती ७ वेगवेगळ्या भुमिका करत असे. आता कुठे बघायला मिळणार त्या ? सिडी पण नाही दिसली कुठे.
मस्त लेख दिनेशदा.. हे सगळे
मस्त लेख दिनेशदा.. हे सगळे प्रश्न गेली कित्तेक वर्ष मलाही पड्लेत..
अर्थात आता बरेच वर्ष मराठी हिंदी मालिकांशी संबंध नाही येत म्हणून खूपच बरं वाटतय
आणि भारतात घरी पण आता हे सगळं कमी झालय हे चांगलच आहे
ती चार दिवस सासुचे नामक मालिका अजूनही चालू आहे का?
मी भारतात असताना माझ्या आत्याच्या साबा अगदी नचुकता बघायच्या
मला सारखं वाटायचं की रोहिणी हट्टन्गडी सारखी गुणी अभिनेत्री कशी काय ती मालिका इतके वर्ष करू शकते देवच जाणे
ह्या कलाकारांना डेली सोप मधे
ह्या कलाकारांना डेली सोप मधे चांगले पैसे मिळतात. आणि तेही रोज. त्यामुळे अभिजात कलाकृती निर्माण होत नाहिये हे त्यांनाही माहीत असते पण पैसा सोडवत नाही. मराठीपेक्षाही हिंदीत जास्त्..म्हणजे जवळपास चौपट पैसे मिळतात त्यामुळे आपले चांगले आणि वाइट दोन्ही कलाकार हिंदीत मालीकांमधे जातात त्यामुळे मराठीत दुय्यम तिय्यम नट नट्या राहिल्या आहेत आता फक्त.
आज वाचला हा बिबी.. सगळं
आज वाचला हा बिबी.. सगळं तंतोतंत पटलं
बरंच काही आहे लिहिण्याजोगं, कुठुन सुरुवातू?
टीवीचा वाईट परिणाम म्हणजे
टीवीचा वाईट परिणाम म्हणजे आपण फार गुंततो त्यात. नॉर्वे मध्ये ज्याने हत्याकांड केले त्याने सांगितले कि डेक्स्टर नावाची सीरीअल त्याने बघून पार आत्मसात केली होती. ही अतिशय रक्तरंजित सीरीअल आहे. व त्यात हिरो विजिलांटि जस्टिस करत असतो.
पोलिस व गुन्ह्यावर आधारित सीरीअल्स जसे सीएस आय, लॉ अॅंड ऑर्डर वगैरे बघूनही एकाने आपल्याच मैत्रीणीवर बलात्कार करून तिला इतर गुन्ह्यात फ्रेम केल्याची बातमी आहे.
बादवे मी परवा एक रेसीपी पाहिली व्हेज अकबरी. आज सकाळी पाहिली पनीर बिरबली.
उषा फूड प्रोसेसर चे डेमो पण पाहिले रंजक होते. व खूप डिस्काउंट प्लस एक किटली व इस्त्री फ्री होती.
दिनेशदा सह्हीच लिहीलयत. एका
दिनेशदा सह्हीच लिहीलयत. एका चॅनेलवरच्या सगळ्या मालिंकामध्ये एकाच विषयाची लाट आलेली असतो. मालिका कधी गुण्यागोविंद्याने नांदताना दिसतच नाही. नेहमी प्रॉब्लेम्स चालुच असतात. त्याच्यातील बायका सतत नविन कोरेच कपडे घालुन घरात वावरत असतात.
दिनेशदा, तुमचं हे स्वगत आता
दिनेशदा, तुमचं हे स्वगत आता फक्त तुमचंच न राहता, अनेकांचं झालंय. बहुतांश मालिकांची 'गिर्हाईकं' म्हणजे गॄहिणी-वृद्ध हेच आहेत. सतत असल्या (असल्या म्हणजे सास बहू, कट-कारस्थानं, विबासं, आई-बापाला न सांभाळणारी मुलं, आजच्या काळातसुद्धा बुरसटलेले आचार-विचार असलेले लोक वगैरे, वगैरे) मालिकांच्या सतत हॅमरिंगमुळे नकळत बरेच जण चांगलं नीट चालत असलेलं आयुष्य आणि व्यवस्थित असलेले नातेसंबंध खराब करु लागलेत. सुरुवातीला ठीक आहे, काहीतरी टाइमपास..... असं म्हणून बघायला सुरु केलेली मालिका, कधी-कधी इतकी टॉप प्रायोरिटी बनते की जेवणाखाण्यापासून अनेक गोष्टी त्या मालिकेच्या वेळेनुरुप 'अॅडजस्ट' केल्या जातात. पण हे दुष्टचक्र झालंय आणि कोणी आणि कसं थांबवायचं हा एक गहन प्रश्न म्हणता येईल. कारण पैसा मिळतोय म्हणून कलाकार काम करतायत, स्पॉन्सर्स आहेत, टिआरपी वाढतोय म्हणून चॅनल्स मालिका दाखवतायत, आणि आपण पामर आपले गुंतत चाललोय
आजकाल कुठल्याही डेली सोप
आजकाल कुठल्याही डेली सोप मध्ये एक नोटीस केलंय की कुणी? सगळ्या नायिका रडुबाई छाप, लग्ना आधी ड्रेस, स्कर्ट वगैरे मॉडर्न फॅशनेबल कपडे घालणार्या पण लग्न झाले के लग्गेच साडी (ती ही साधी नाही तर काठा-पदराची [बेळगावी सिल्क]) नेसणार्या (ते ही पिन-अप न केलेला पदर!), मंसू-टिकली-हातभर बांगड्या असणार्या, कायम नट्ट्या-पट्ट्यात वावरणार्या, सासू वा तत्सम कुणीतरी शत्रूंकडून कट्-कारस्थानाचे शोषण होत असलेल्या, सारखे अश्रु ढाळणार्या, "मेरा सिंदूर ही मेरा सबकुछ" हे वाक्य बाबा वाक्यम् प्रमाणम् असलेल्या अशाच का असतात???
आजच्या युगातल्या इव्हन गरीब घरातल्याही स्त्रिया अशा नसतात. सुजाण, सुविद्य, समोरच्या अडचणींवर मात करण्याची जिद्द बाळगणार्या, कॅज्युअल कपडे घालणार्या, स्वतःची डीग्निटी ओळखणार्या नायिकेचे चित्रण कुठेच नाही
कुठलाही सण आला की प्रत्येक
कुठलाही सण आला की प्रत्येक मालिके मध्ये त्या पूर्ण आठवड्यात तेच दळण दळत बसतात. पुन्हा आपले ते साड्या नि दागिन्यांचे प्रदर्शन. नोकरी करणारी, डेली प्रॉब्लेम्स शी यशस्वी रीतीने डील करणारी नायिका मालिकांच्या जगात अस्तित्त्वातच नाही का? :उद्वेग:
मित यांना अनुमोदन. मागे
मित यांना अनुमोदन.
मागे लोकसत्ताच्या एका पुरवणीत मी एका माध्यम तज्ज्ञाची मुलाखत वाचली होती. त्याचे नाव आठवत नाही. पण लक्षात राहिलेले सांगतो.
१) चित्रपट किंवा मालिका आपण मनोरंजन, वेळ घालवणे, आपल्या मनातील भावनांचा निचरा होऊ देणे या कारणासाठी बघतो. यात सिनेमा हे माध्यम कमी हानी घडवते. कारण ३ तासांत ती कथा संपते. पडद्यावरील हिंसाचार, उत्तेजक दृश्ये, भीतीदायक प्रसंग पाहिल्यावर प्रेक्षक बाहेर पडतात तेव्हा त्यांचे उत्तेजित मन निवलेले असते. मालिका रोज सुरु असतात. प्रत्येक भाग प्रेक्षकांनी खिळून पाहावा आणि पुढच्या भागाची वाट बघावी असेच चित्रण केले जाते. त्यामुळे उद्या काय होणार, ही उत्सुकता कायमच राहते. जर ही सवय कायम राहिली तर anxity हा विकार उत्पन्न होऊ शकतो तसेच रक्तदाबही वाढू शकतो. मालिका बघण्याच्या वेळी वीज अथवा केबल गेली तर लोक चिडचिडे होतात. लहान मुले मालिकांमधील प्रसंगांचे अनुकरण करू पहातात.
२) चित्रपटाच्या पडद्याशी प्रेक्षकांची भावनात्मक गुंतवणूक होत नाही पण दूरचित्रवानीच्या पडद्याशी मात्र लोक तद्रूप होतात. संगणकात जशा नेटवरून नको त्या फाईल्स, व्हायरस, कुकीज घुसतात तसे मालिकांतील भडक व छापील संवाद, ती वेशभूषा नकळतच प्रेक्षकाच्या मनात ठाण मांडून बसतात आणि त्या फाईल्स कधीच डीलीट होत नाहीत. पुढे सवयीने लोक तशीच नाटकी भाषा बोलू लागतात.
आपल्या बर्याच सामाजिक बदलांचे, समस्यांचे मूळ टीवी आहे.
अश्विनी, मालिकांचा असाही
अश्विनी, मालिकांचा असाही परिणाम !!!
मानसिक गुंतवणुक तर आकाशवाणीच्या कार्यक्रमातदेखील असायची. आपली आवड, प्रपंच, बिनाका
गीतमाला हे कार्यक्रम जेवणं वगैरे आटपून अंगणात बसून ऐकलेले आठवताहेत. शिवाय रेडीओसमोर
बसायला हवे, असे काही नव्हते. गेल्या पिढीतल्या आई लोकांची जेवणे, वनिता मंडळ / गृहिणी /
आपले माजघर अशा कार्यक्रमांच्या तालावरच होत असत.
मालिकेतील कलाकारांना मिळणारा पैसा हा काही निर्मात्याच्या खिश्यातून जात नाही. जाहिरातीतून
मिळतोच कि. जितेंद्रला बालाजी फ़िल्म्स मधून जेवढा फ़ायदा झाला, तेवढ्या त्याच्या अभिनय
कारकिर्दीतून पण झाला नसेल.
पद्धतशीर मार्केटींग करुन, या मालिका प्रेक्षकांच्या माथी मारल्या जाताहेत. दुसरा काही पर्यायच
राहिलेला नाही. दूरदर्शन सुरु झाले तेव्हा शिक्षणावर भर दिला जाईल, असे सांगितले जात होते.
साधे लोकसंख्या नियंत्रणाचे, कचरा व्यवस्थापनाचे लोकशिक्षण होऊ शकलेले नाही.
मी अलिकडेच बीबीसीचा योगहर्टवरचा माहितीपट बघितला. जगभरात या उत्पादनाचा एवढा
उदो उदो केला जातो, कि अनेक लोकांना त्याचे व्यसन लागलेय. (जसे काही आपण पुर्वी
दही खातच नव्हतो.) उत्पादन आरोग्याला हानीकारक आहे असे नाही, पण दूधाच्या तूलनेत
चौपट किमतीला ते विकत घ्यावे लागते.
मित, मंदार, निंबुडा --
मित, मंदार, निंबुडा -- आमच्याकडे फक्त आईच या मालिकांची शिकार झालीय. कधी कधी तर दरवाज्यात कोण आलय हे न बघताच, दरवाजा उघडते. (लक्ष टिव्हीकडे. )
निंबुडा - उडान सारखी मालिका नंतर आलीच नाही. हे कुठलं कल्चर आपल्या माथी मारताहेत ते कळत नाही. आपल्या परिचयाच्या कुठल्याच मराठी घरात असे वातावरण / अशा बायका दिसत नाहीत.
मंदार - उपाय काय रे ?
उडान सारखी मालिका नंतर आलीच
उडान सारखी मालिका नंतर आलीच नाही. >>> खरंच! तसे रजनी, दामिनी वगैरे मालिका होत्या असे आठवतेय. पण सध्याच्य डेली सोप्स मध्ये साड्या आणि दागिने यापलीकडे कथा नाही.
सगळ्यान्ना अनुमोदन दिनेशभौ,
सगळ्यान्ना अनुमोदन
दिनेशभौ, हिअर इज ल्युसी ही मालिका जेव्हा दाखवत होते त्याकाळी म्हणजे १९७४ ते ७६ च्या दरम्यान, आख्खा एपिसोड बघितल्यावर त्यान्च्या भाषेतील एखाद शब्द कळला तरी वहावा अशी आमचि व आईची स्थिती असली तरीही, त्या मालिकेचे चित्रिकरण्/विषय्/सादरीकरण्/प्रसन्गनिष्ठ हालचाली व हावभाव/अभिनय इत्यादी बाबी इतक्या उत्कृष्टरित्या दाखविलेलया असायच्या की भाषा समजल्याविनाच दिग्दर्शकाला काय सान्गायचे/दाखवायचे आहे ते कळून यायचे व ती मालिका बघणे कधीही कण्टाळवाणे झाले नाही
श्रीमंतीचा झगमगाट, कोर्ट,
श्रीमंतीचा झगमगाट, कोर्ट, दवाखान्याचा रिपीट, अगदी मरणाला टेकलेलाही मरत नाहीच पण काही झालेच नाही या अविर्भावात कामाला लागतो, अगदी १० दा मेला तरी. भारतीय संस्कॄतीचे दर्शन व्हाव म्हणुन अट्टाहस केवळ दिखावुपणासाठी त्यांच्या चेहर्यावरुन फिरणारे कॅमेरे, पुन्हा दुसर्या भागात वा दिग्दर्शक जेव्हा सांगेल तेव्हा भांडायला तयात, अगदी सार नांत दिसरुन.
मी कुठलीच सिरीयल बघत नाही, आता तर गाण्याचे कार्यक्रम सुध्दा बंद केले पाहणे मस्त पैकी फिरायला जातो. फार तर न्युज चॅनेल पाहतो. बस !
मंदार-माहितीसाठी आभारी... पण
मंदार-माहितीसाठी आभारी...
पण कसं थांबवायचं हे.... दुरदर्शनच्या सुरुवातीच्या काळात मनोरंजन १०% आणि माहितीवर्धक कार्यक्रम ९०% असं प्रमाण होतं. आणि 'मनोरंजन' सदरात मोडणारे कार्यक्रम खरंच मनोरंजन करायचे.... आता प्रत्येक चॅनल फक्त आणि फक्त धंदा करायला मैदानात उतरतंय आणि स्पर्धेत टिकण्यासाठी दुरदर्शनलाही तडजोड करावी लागतीये. प्रत्येकजण पैसा कमवतोय आणि पैसा कोणाला नकोय. बर उद्या सरकार (सेन्सॉरबोर्ड) पण यावर निर्बंध नाही आणू शकत. (स्वातंत्र्यावर गदा वगैरे म्हणत गदारोळ होईल). म्हणूनच म्हणालो, हे एक दुष्टचक्र झालंय.
चांगल्या मालिका, कार्यक्रम
चांगल्या मालिका, कार्यक्रम एकमेकांना सुचवून, त्या त्या वेळेस त्या आवर्जून लावून त्याची आवड निर्माण होते का बघता येइल. एकदा एक दोन भाग आवडले की मग लोक लक्षात ठेवून बघतात.
पौर्णिमा ने हाय टेन्शन हा क्विझ कार्यक्रम सुचवला होता. तो काल बघितल्यावर असे वाटले की आता नेहमीच बघायला हवा. खरे म्हणजे हा कार्यक्रम शाळकरी मुले सहज बघू शकतात तेव्हा म्हणजे ८ च्या सुमारास ठेवला पाहिजे. नेमका हा उशीरा आहे आणि त्या जंक मालिका प्राईम टाईमला. ऑगस्ट पासून सुरू होणारे केबीसी तरी लौकर आहे का बघू.
येथेच वरती आणखीही काही मालिका सुचवल्या आहेत. त्याही चेक करतो.
>>मंदार - उपाय काय रे ? मला
>>मंदार - उपाय काय रे ?
मला तरी सापडलेला नाही. पत्रकारांनी काही भरीव लेखन करावं अशी अपेक्षा ठेवण्यासारखे दिवस राहिलेले नाहीत.
वर फारेण्डाने काही सुचवलं आहे ते उपयुक्त ठरू शकेल.
आणखी एक डोकेदुखी म्हणजे जिकडेतिकडे कसले तरी उत्सवसदृश्य कार्यक्रम सुरू असतात.
जणू जिकडेतिकडेचोहिकडे आनंदी आनंद पसरला आहे आणि सगळीकडे सुबत्ता नांदते आहे.
तुम्ही जस्ट डान्स किंवा इतर
तुम्ही जस्ट डान्स किंवा इतर उत्सव सेरेमनीज चे सेट पाहिले आहेत का? डोळे दुखून जातात. लायटिंगच्या गणपती समोर बसल्यासारखे वाटते. भडक सेट व कपडे, लाउड संगीत. त्या आयफा मध्ये तर प्रत्येक जण लैच ओरडत होतं.
बघितलंय ते. प्रचंड ताप होतो.
बघितलंय ते. प्रचंड ताप होतो. म्हणून असलं काही दिसलं तर पटकन चॅनल बदलतो.
मुळात चॅनल सर्फिंग ही सवय घालवतो आहे आता. जे हवं आहे बघायला ते लक्षात तरी ठेवायचं किंवा चक्क लिहून ठेवायचं. सर्फिंग फक्त नॅट जिओ, डिस्कवरी वगैरेंवर.
दिनेशदा, अगदी मनातलं
दिनेशदा,
अगदी मनातलं !
सेन्सॉर बोर्ड याला काही करु शकणार नाही का ? जनमत घेऊन सरकारला बंधन आणता येईल
मीही गेल्या कित्येक वर्षात एकही मालिका पाहिली नाही
बहुतेक लोक हे बघण्यात अगदी अडिक्ट झालेले दिसतात,अगदी सुशिक्षित लोक देखील या भंपक,बुद्धीला न पटणार्या (निर्मात्याच्या बुद्धीची रोज किव करावी अशीच कथा,घटना,प्रसंग दाखवले जात असुनही) या रटाळ मालिका पाहताना पाहुन मला थोडं विचित्र नक्कीच वाटतं,या वरुन वैचारिक उंची, प्रगल्भता दिसुन येत नाही का ?
Pages