संस्कार १ - येतोच... आलोच...

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

अतिशय लगबगीने मी घर आवरत होते. आलेल्या माणसाला उगाच नस्ता पसारा दिसायला नको. सगळ्या घरात व्यक्ती फिरणार तर उगाच कुठली बाहेर पडलेली वस्तू दिसायला नको. पटपटा आवरून मग माझं आवरून तयार रहायचं होतं. सगळीकडचं जागच्याजागी करून अगदीच दिसत होती तिथली सगळी धूळ पुसून मी हुश्श केलं. घाईने अंघोळीला पळाले. सांगितल्या वेळेच्या १५ मिनिटं अगोदर माझ्यासकट माझं घर तीटपावडर लावून तयार होतं.

आता सुरू झाली प्रतिक्षा. हॉलमधे बाकी भारतीय बैठक आहे आणि एखादीच खुर्ची. भारतीय बैठकीवर बसले असते तर परत चादर उस्कडली असती. मी खुर्चीवरच बसून रहायचं ठरवलं. सांगितल्या वेळेला अगदी आतूरतेने मी बेल वाजण्याची वाट बघत होते. नाही वाजली. भारतीय प्रमाण वेळेनुसार अजून अर्धा तास शिल्लक होताच म्हणा. पण एव्हाना सगळं आवरण्यात ब्रेकफास्टला फाटा मारल्यामुळे पोटात कावळे कोकलायला लागले होते. आता किचनमधे जाऊन काहीतरी करून घ्यायचं म्हणजे परत पसारा. परत तो आवरा आणि तेवढ्यात बेल वाजली म्हणजे? असा विचार करत मी चुळबुळत खुर्चीवर बसून होते.

खूप वाजून गेले आणि बेल वाजलीच नाही. भुकेने आणि वाट बघण्याने डोकं तडकलंच होतं. पोटातल्या कावळ्यांना न्याय द्यायचं ठरवलं शेवटी. त्या आणि बाकी कामांना लागले. हे असं सलग आठवडाभर चाललं. आता माझा संताप आणि वैताग उतू जाऊन जाऊन संपायला आला होता. फोनवर फोन करणे, संताप व्यक्त करणे याचाही कंटाळा आला होता. पण अडला हरी.... करणार काय.

असेच सीन्स आयुष्यात वारंवार घडत होते. घडतायत. बेल वाजवणारा माणूस वेगळा एवढाच काय तो फरक.
गैरसमज करून घेऊ नका हो एवढी लफडी नाही करत मी. केलीच तर त्या लोकांची एवढी वाट नाही बघणार. मी त्यांची वाट बघावी हे भाग्य ज्यांच्या नशिबी ते म्हणजे विविध फिटिंग्ज करणारे लोक. केबल, गॅस, फोन इत्यादी. दर वेळेला मी घर बदलल्यावर या लोकांच्या नशिबात मी त्यांची वाट बघणं असतं. फोनवर अमुक दिवशी येतो, अर्ध्या तासात येतोच असं सांगून हे कधीच येत नाहीत. आपल्याला कुठलीतरी सर्व्हिस हवीये आणि ती जोडून देऊन हे आपल्यावर डोंगराएवढे उपकार करणारेत हे त्यांचं ठरलेलं असतं. सर्व्हिस चार्ज आणि बक्षिस असं दोन्ही आपल्याकडून उपटूनही उपकारच असतात ते. त्यामुळे त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसणं हे आपलं जिवितकार्यच आहे असं हे लोक समजतात. आपल्याला बाकीची कामे, पोटापाण्याचे व्यवसाय काहीही असत नाहीत (तरीही आपण सर्व्हिस जोडून घेणार असतो आणि बिलंही भरणार असतो ते राहूद्या).

आठवडाभर तंगवल्यावर यांची हृदये द्रवतात. मग अचानक एक दिवस आपलं घर तिटपावडरविरहित असताना, आपण बाहेर निघालो असताना हे उगवतात. ते आल्या वेळेला काम करून घेतलं नाही तर आपलाच गुन्हा असतो. मग आपली अतिप्रचंड महत्वाची मिटींग का असेना. या लोकांच्यापुढे ते झ्याडम्याडच ना हे त्यांचं पक्कं ठरलेलं असतं.

तर असं सध्या चालू आहे माझ्या आयुष्यात. कधी चुकून फोन करून वेळच्या वेळेला एखादा माणूस आलाच तर धक्का बसेल मला.

आपल्याला गरज असते त्यामुळे आपल्याकडे हे झेलण्याशिवाय पर्याय नसतोच पण कधी कधी समोरच्याची गरज असूनही समोरचा असंच वागतो ते मात्र मला आश्चर्याचं वाटतं. नवर्‍याला दहादा फोन करून असिस्ट करायला येऊ पाहणारे स्ट्रग्लर्स, मला असिस्ट करायला इच्छुक असलेले माझेच काही विद्यार्थी, मला या क्षेत्रात काही करायचंय तर मदत कराल का अश्या आर्जवासकट फोन करणारे ओळखीपाळखीचे लोक हे पण जेव्हा भेटायची वेळ ठरवून त्या वेळेला गायब असतात, येत नाहीये/ उशीरा येतोय असं काही कळवण्याची जरूरही समजत नाहीत तेव्हा अश्यांना कोणी का काम द्यावे हा विचार अर्थातच केला जातोच. त्या माणसावर फुली मारली जाते. आणि आपला खलनायक होतो ते वेगळंच.

दिलेली वेळ न पाळणे, येऊ शकत नसू तर कळवायचेही कष्ट न घेणे, कामासाठी फोन न करताच टपकणे ही सगळी वृत्ती नक्की काय दाखवते? समोरच्याचा/ त्याच्या वेळेचा अनादर? की स्वतःच्याच कामाबद्दल अनादर? की अजून काही?

हे संस्कार उत्तम असण्यातलं हे एक कलम नसावं का?

-------------------------
संस्कार हा शब्द इतक्या सहजपणे वापरतो आपण. त्याची नक्की व्याख्या काय करायची? काय काय असतं या संस्कारांच्यात? इत्यादीचा शोध घ्यायचा प्रयत्न. सध्यातरी केवळ माझ्या अनुभवातून.

प्रकार: 

ह्म्म...
माझीही अशी अनेकदा चिडचीड होते. या 'आलोच...येतोच' म्हणणार्‍या मंडळींपायी घरात थांबून रहावं लागतं, त्यापायी बाहेरची कामं राहून जातात; नेमकी तीच घरातल्या इतरांच्या दृष्टीनं भयंकर महत्त्वाची असतात; आपली स्पष्टीकरणं त्यांना पटत नाहीत; 'जमणार नव्हतं तर आधीच सांगायचं ना' हे कानावर पडतं; आणि त्यानंतर जे घडतं ते ... वगैरे, वगैरे Proud

नी...

लेख वाचला... काही काळा पुर्वी (आणी अजुनही) मनात हेच प्रश्न ऊभे रहात होते...
आपलं महत्व वाढवायचं असेल तर समोरच्याला वाट पहायला लावा, या तत्वाचा जनक कोण असेल?, ह्याचं ऊत्तर सापडत नाही...
'चलता है/ चालतय/ IST' या मागचं एकच कारण आहे, ते म्हणजे आपण लोकांनी 'वेळेची किंमत' (समोरच्या गरजूची) अजुनही ओळखलेली नाही. माझे काही अनुभव सांगतो

१>१९७६-७७ ची गोष्ट. आम्ही कुडाळला रहात होतो. घरातल्या एका लाकडी स्टूलचा पाय मोडलेला. वडिलांनी बरेच कष्ट घेऊन एक सुतार शोधुन घेउन आले, आणी त्याला ते स्टूल दाखवले. सुताराने आपल्या पद्धतीने स्टूलाची मापं घेतली आणी म्हणाला, 'हो! करुन देऊया... फक्त, परवा होळी आसा, तेचे ५ दिवस झाले काय करुन द्येवया...'. आणि त्या महाशयाने आपली हत्यारांची पिशवी त्या स्टूलवर ठेऊन निघून गेला. होळी झाली, शिमगा पार पडला, गुढि-पाडवा झाला, राम-नवमी होऊन गेली... पण त्या सुताराचा काही पत्ता/ मागमूस लागेना. शेवटी एक दिवस विनयने (परदेसाई) वैतागून त्याची हत्यारांची पिशवी उचलुन एका दुकानात (जिथे तो सुतार म्हणे कधी तरी यायचा) ठेवली. त्या नंतर आज दिवस पर्यन्त आम्हाला त्या सुताराचे दर्शन घडलेले नाही.
२>सुतार, प्लंबर, ईलेक्ट्रीशीयन, मेकॅनीक... असे कारागीर (जे स्वतःला कलाकार म्हणवून घेतात), यांचे अनुभव आलेले असल्यामुळे, या लोकांची Basic Skills निरिक्षणातून मी स्वतः शिकून घेतली. आज घरातल्या जुजबी दुरुस्त्या मी स्व्तः करतो. सध्या पुण्यात ज्या भाड्याच्या घरात रहातो, तिथला बाथरुमचा नळ एकेदिवशी बर्‍यापैकी गळायला लागला. मी बाहेरगावी गेलेलो असल्याने बायकोने एका प्लंबरला (टोलवा-टोलवी झाल्या नंतर) बोलावून आणलं. त्याने स्व-कमाई करण्या करता नादुरुस्त झालेला नळ पूर्ण-पणे बदलून (सोबत ईतर मोड-तोड करून) काम करुन निघुन गेला. काही दिवसांनी किचन मधल्या बेसिनचा नळ तसाच वाहू लागला. मी त्याच प्लंबरला शोधुन पुनः बोलावले. त्याने सवयी प्रमाणे टोलवा-टोलवी सुरु केली. दोन दिवस वाट बघितली. तिसर्‍या दिवशी मी स्व्तःच उठलो, प्लंबर जिथे बसतो त्या दुकानात गेलो. नळासाठी लागणारी Washers विकत घेतली, घरी येऊन किचन मधला नळ मी दुरुस्त केला. संध्याकाळी धावत-पळत प्लंबर महाशय माझ्या कडे दुरुस्ती करायला आले. त्याला शांतपणे 'मी स्वतःच नळ दुरुस्त केला' हे ऐकवून, आल्या पावली माघारी पाठवले. जाता-जाता 'सायब गरीबाच्या पोटावर मारु नका, चूक झाली' अशी वरदेखली विनवणी करायला तो कलाकार विसरला नाही...
३> आता सध्या जिथे काम करतो तिथे Design Dept. मधल्या सहकार्‍याने केलेला प्रताप (आज हा सहकारी दुसर्‍या ठिकाणि काम करतोय). Production Manager कडे Client कडुन एक Design File आलेली जी Older Version मधे होती. Design मधे काही आवश्यक फेर-फार करणं गरजेचं असल्याकारणाने, ती File आमच्या कडच्या Latest Versionमधे Convert करणं भाग होतं. माझ्या या पराक्रमी सहकार्‍याने या गोष्टीसाठी पूर्ण आठवडा खर्ची घातला. काही सेकंदांच्या कामासाठी एक पूर्ण आठवडा, ही गोष्ट आमच्या P. M. ला कशी मानवली कोण जाणे...
४> Hotel Industry मधे काम करताना बर्‍याच वेळा परदेशी पाहुण्यांना त्यांना अपेक्षीत असलेल्या सेवा-सुविधा मला द्याव्या लागायच्या. कबूल केलेल्या वेळेत अपेक्षीत सुविधा (निर्धोकपणे चालणारी) पुण्यतल्या हॉटेलमधे मिळतेय, याच गोष्टीचं परदेशी पाहुण्यांना मोठं अप्रूप वाटायचं...

नीरजा अगदी अगदी. मात्र तु उल्लेख केलेल्या लोकांच्या बाबतीत म्हणजे प्लंबर, गॅसवाले, इतर टेक्निशियन्स यांच्या बाबतीत मी गृहितच धरते की हे लोक सकाळी सांगून संध्याकाळी येणार. त्यामुळे त्यांची वाट बघत स्ट्रेस वाढवून घ्यायच्या भानगडी माझ्याबाबतीत होत नाहीत.

माझी खरी चिडचिड होते अमुक वाजता भेटायचं ठरतं आणि त्यावेळी शहराच्या दुसर्‍या टोकावरुन ती वेळ पाळायला आपण गाडी, रिक्षा, टॅक्सी करुन पोचतो आणि पोचल्यावर फोन करतो तेव्हा कळतं ती व्यक्ती अजून घरुन निघालेलीच नाही किंवा नुकतीच निघतेय तेव्हा. त्या व्यक्तीला हमखास काही अर्जन्ट काम निघालेलं असतं, फोन आलेले असतात. आपण मात्र हातातली कामं बाजूला ठेवून निघालेलो असतो ते असा वेळ फुकट घालवायला. त्यातूनही भेटी कॅज्युअल असतील तर काही फरक पडत नसतो, तेव्हढी उशिरा जायची सवलत आपणही घेतोच अनेकदा. पण बर्‍याचदा महत्वाच्या चर्चा असतात, कामं असतात त्यावेळी असं झालं की खरंच संताप होतो. नुसती वाट बघण्यात वेळ गेला की मग त्यादिवशी जे काही काम असेल त्यातला पूर्ण इंटरेस्टच जातो. आपला स्ट्रेस वाढतो लक्षात आल्यावर आता उपाय म्हणून पुस्तक वाचणे, काही लिस्ट वगैरे बनवण्याची कामं करणे इत्यादी उद्योग करते किंवा ज्या व्यक्तींच्या बाबतीत असे अनुभव येतात त्यांना पुढच्या वेळी भेटायला जाताना अजिबात लवकर निघायचे कष्ट घेत नाही. आरामात हातातली कामं संपवून निघते.
मुंबईसारख्या शहरात जेव्हा ट्रॅफिक, पाऊस अशा गोष्टी खरंच आपल्याला वेळ पाळू देत नाहीत तेव्हा निदान हातातल्या मोबाईल फोनचा वापर करुन अमुक इतका उशिर होतो आहे असं कळवण्याची कर्टसी तरी दाखवावी इतकंच.

मास्तर, अगदी अगदी.
शर्मिला, अगं सकाळी येणारा संध्याकाळी तरी येतो. मधे घर बदलल्यावर टाटा स्कायने रिलोकेशनसाठी तब्बल ८ दिवस खाल्ले. बर त्यांचे इंजिनियर म्हणवून घेणारे टेक्निशियन्स इतके उर्मट की ज्याचं नाव ते.
आता आमच्या घरमालकांनी एक कोणीतरी हिरा हेरलाय महानगरचं कनेक्शन करून देण्यासाठी. त्याच्या थ्रूच सगळं करायचंय. तो बेसिक फॉर्म द्यायला येणार होता तेव्हा त्याने ५ दिवस आज येतो-उद्या येतो करत काढले. शेवटी तुमची कामं आहेत तशीच आमचीही कामं आहेत. मी रिकामटेकडी नाही असा बराच फुटकळ वाद घातल्यावर आला. आता पुण्याहून घरमालकांची सही इत्यादी सोपस्कार करून मी आलेय पण हा हिरा उगवतच नाहीये. आणि कालपासून त्याचा फोनच बंद आहे. Sad

खरंच कठीण आहे. आणि तुझ्या लागोपाठच्या शिफ्टींगमुळे तुला हे अनुभव आता इतक्यांदा घ्यायला लागलेले असणार की स्ट्रेस, चिडचिड करुन घेऊ नकोस सांगणच फिजूल आहे.

मलाही बरेवाईट अनुभव आलेत. आता स्पर्धेमुळे परिस्थिती थोडी सुधारलीये. ज्यांनी वेळ पाळली/येण्याआधी फोन केला/येणार नसल्याचा फोन केला त्यांची स्तुती/शिफारस मी जरूर करतो.
सोलापुरात ज्ञान प्रबोधिनी शाळेचे कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू व्हायचे. अगदी प्रमुख पाहुणे आले नसतील तरी!! जेंव्हा प्र. पाहुणे येतील तेंव्हा (शक्य असेल तर) कार्यक्रम थोडा वेळ थांबवून त्यांचा सत्कार व्हायचा. हे एकदा कळल्यावर लोकं देखिल वेळेवर येउ लागले.
हे संस्कार या विषया खाली घेतलस ते आवडलं! तु लिहिलस त्याप्रमाणे या वृत्तीचा आणि व्यक्तीच्या शैक्षणीक/सामाजीक परिस्थितीचाही काही संबंध नाही. स्वतःला फार भारी समजणारे पण असं वागतात. आश्चर्य याचं वाटतं की, इतरांना वाट पहायला लावणारे, स्वतःवर तीच वेळ आली की चिडचिड करतात. संस्कार म्हणजे माझ्यासाठी तरी एकच Golden Rule.... Do not do to others that which we do not want them to do to us.

प्रबोधिनीतल्या कार्यक्रमावरून आठवलं...
पृथ्वी ला तिसर्‍या घंटेनंतर आत प्रवेश देत नाहीत. मग तुमच्याकडे नाटकाचं तिकीट असलं तरी. बहुतेक जगभरातल्या मोठ्या/ महत्वाच्या थिएटर्समधे हा नियम आहे. पावसाळ्यात पृथ्वीला हा नियम थोडा शिथील करतात फॉर ऑब्व्हियस रिझन्स. पण एरवी मला तरी हा नियम फार योग्य वाटतो. अरे नाटक बघायलाच येताय ना मग पूर्ण आस्वाद घ्या ना. आणि ते नाही तर इतरांना/ नटांना तुमच्या उशीराचा का त्रास?
कदाचित सुरूवातीला हा नियम घातल्यावर लोकांना त्रास झाला असेल. थोडं फ्रिक्शन झालंच असेल पण आता पृथ्वीला जायचं म्हणजे वेळेत जायला हवं हे लोकांना कळून चुकलंय.

वेळेचा संस्कार घडवावाच लागतो! स्वतःच्या वेळेचा सन्मान करणे व दुसर्‍याच्या वेळेचाही सन्मान करणे. इतरांना आपली वाट बघायला लावणारे लोक खरे तर त्याबाबतीत स्वतःचा व दुसर्‍याचा अवमानच करत असतात.
वेळेची संकल्पना मेट्रो शहरे, शहरे, गावे, खेड्यांत वेगवेगळी असते. शहरात अर्धा तास उशीर म्हणजेही आपल्याला जास्त वाटतो. तर खेड्यात ''आत्ता येतु की'' म्हणणारा माणूस त्याच दिवशी उगवेल याची शाश्वती नसते!!

शहरात देखील आपण वेळेवर पोचायचं आणि समोरच्याने आरामात उशीरा, आधी तसे काहीही न कळवता यायचे हा अनुभव तर मला असंख्य वेळा आलाय. मी त्याबद्दल नाराजी दाखवली/ नापसंती व्यक्त केली तरी ''तू फारच करतेस बुवा!'' किंवा ''जरा इकडे -तिकडे झाला थोडा उशीर तर असं काय बिघडतं? इतकं काय अर्जंट आहे?'' अशा तर्‍हेची वाक्यं ऐकायला मिळतात, वर इतरांकडे माझ्या नापसंतीची तक्रारही केली जाते! मग त्या व्यक्तीला पुन्हा कधी भेटायचा प्रसंग आला की मी मुद्दाम उशीरा, टंगळमंगळ करत जाते. Proud की वर, ''केवढा उशीर! गेल्या वेळी मला उशीर झाला तर किती वैतागलीस, आणि आज स्वतः मात्र उशीरा आलीस!'' असे म्हणणारे महाभागही असतात! म्हणा बापडे!

करेक्ट! वेळेची किंमत हवीच. किंमत नसते हेही सत्यच Sad लोकांना दुसर्‍याच्या वेळेला किंमत आहे हेच मुळात पचत/ कळत नाही. उर्मटपणा तर असा की बास!

ह्यावरून आठवलं- ए आर रहमानची बायोग्रफी ज्या लेखिकेनं लिहिली आहे- तिने मनोगतात लिहिले आहे- ए आरने स्वतःबद्दल जितकं मला सांगितलं नाही, तितकं मला त्याच्या वेटिंग रूममध्ये बसून कळालं! Happy

नी, टाटा स्कायवाल्यानं लांबूनच टाटा केला काय गं. मस्त लिहिलं आहेस. बर्‍याच लोकांच दु:खणं आहे हे. जमत नसेल तर येतो, बघतो, ट्राय करतो हे कशाला पाहीजे. पण एखादे वेळी होतो उशीर तेव्हा स्पष्टीकरणाच्या बाता लांबल्या कि जास्तच चिडचिड होते. आम्ही वैदिक गणिताच्या तासाला येतो येतो म्हणून टांग द्यायचो. तेव्हा मास्तरांनी सलग तीन दिवस मडक्याला जसा आकार देतात ना तसे संस्कार आमच्यावर केले. त्या भट्टीत जरा जास्तच पकलो त्यामुळे आता ह्या गोष्टीवर आवर्जून लक्ष देतो.

एकदम पटण्यासारखा हलका फुलका सुरू होवून सिरियसली संपलेला लेख. वाचायला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व Happy
मी परवा एक वाढदिवसाच्या पार्टीला गेले तर होस्ट मंडळी पण नव्हती आली.

''तू फारच करतेस बुवा!'' किंवा ''जरा इकडे -तिकडे झाला थोडा उशीर तर असं काय बिघडतं? इतकं काय अर्जंट आहे?'' >>ह्याने जास्ती चीडचीड होते Sad

झकास लिहलंय, पटलं!
आपल्यामुळे दुसर्‍याचा वेळ वाया घालवणं हा गुन्हा आहे याची पुसटशी जाणीवही नसते अशा लोकांना.
आमची आधीची मेसवाली सुध्धा अशीच. लवकर डबा द्या म्हणून हजारदा सांगूनही दारात तासभर उभं राहील्याशिवाय बाईनं कधी भिक्षा वाढली नाही!
नाईलाजाने अन् रागाने मेस सोडली. तिथले काही महाभाग आजही भेटतात. आजही तेच चालूये. हे भिक्षा मागणार बाई तासाभराने वाढणार. कारण काय तर जेवण चांगलं!
'आमचं प्रोडक्ट चांगलंय ना मग कस्टमरने थांबायलाच हवं' माणसं काय अन् कंपन्या काय, भारतात बर्‍यापैकी हाच खाक्या चालतो!
भारतात चांगली सेवा न मिळण्यामागच्या अनेक कारणांपैकी वेळ न पाळणं हे एक महत्वाचं कारण. काही अपवाद अन् चांगले अनुभवही आहेत. आवर्जून सांगावं तर एच.डी.एफ.सी. बँक. मला तरी कधी त्रास नाही झाला. वेळ पाळण्यापासून सेवे पर्यंत. पण हे एकंच नाव आठवतं. बाकी गाढवंच! असो!

आवडलं...

Working across cultures च्या सेमिनार मध्ये आवजून भारतातल्या वेळ " पाळण्याच्या" सवयीबद्दल शिकवतात..

माझ्या कंपनीच्या भा रतीय ओफिस च्या डेड्लाइन बाकी देशापेक्षा २ दिवस आ धीची सांगितलेली असायची..

<<<शहरात देखील आपण वेळेवर पोचायचं आणि समोरच्याने आरामात उशीरा, आधी तसे काहीही न कळवता यायचे हा अनुभव तर मला असंख्य वेळा आलाय. मी त्याबद्दल नाराजी दाखवली/ नापसंती व्यक्त केली तरी ''तू फारच करतेस बुवा!'' किंवा ''जरा इकडे -तिकडे झाला थोडा उशीर तर असं काय बिघडतं? इतकं काय अर्जंट आहे?'' अशा तर्‍हेची वाक्यं ऐकायला मिळतात, वर इतरांकडे माझ्या नापसंतीची तक्रारही केली जाते! मग त्या व्यक्तीला पुन्हा कधी भेटायचा प्रसंग आला की मी मुद्दाम उशीरा, टंगळमंगळ करत जाते. की वर, ''केवढा उशीर! गेल्या वेळी मला उशीर झाला तर किती वैतागलीस, आणि आज स्वतः मात्र उशीरा आलीस!'' असे म्हणणारे महाभागही असतात! म्हणा बापडे!>>>>

हे अगदी पटलं,
<<<''केवढा उशीर! गेल्या वेळी मला उशीर झाला तर किती वैतागलीस, आणि आज स्वतः मात्र उशीरा आलीस!'' असे म्हणणारे महाभागही असत<<< हे तर अगदी अगदी अगदी

ए आरने स्वतःबद्दल जितकं मला सांगितलं नाही, तितकं मला त्याच्या वेटिंग रूममध्ये बसून कळालं! >>> सहीच! Happy म्हणजे कधी कधी वाट बघण्यातही फायदा असतो. (पण तेच त्या लेखिकेनं 'ए आर नं मला ताटकळत ठेवलं' अशी भूमिका घेतली असती तर हे घडलं असतं?)

अय्यो पण लले मला इलेक्ट्रिशियन्स, फिटर्स, प्लंबर्स यांच्याबद्दल फारसं जाणून नसतं घ्यायचं. त्यात फायदाही नाही माझा. Proud

आपल्या कामासाठी महत्वाच्या माणसांकडे ताटकळायला लागणं, खेपा मारायला लागणं हे मी स्ट्रगलच्या सुरूवातीच्या काळात भरपूर केलंय. अजूनही अनेकदा करते. जेव्हा तुम्ही नवशिके असता तेव्हा तुमचा खरंच इंटरेस्ट कितपत आहे, तुमची खरंच कामाची इच्छा किती आहे हे चाचपडायला पण हे अनेक सिनियर लोक तुम्हाला ताटकळत ठेवू शकतात, खेटे मारायला लावू शकतात किंवा या कारणाबरोबरच त्यांचं शेड्यूल पण असं की पर्याय नसतो हे ही कारण असतंच. त्याबद्दल माझी तरी तक्रार नाहीच. कदाचित अश्या पोझिशनला आयुष्यात कधी पोचले तर मीही असंच करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण मुद्दा अश्यांच्याबद्दल नाहीच ना.

पटेश!
खासकरुन 'मिटींग शार्प अ‍ॅट ३' अशी मेल पाठवून बॉसच उशीरा येतो तेंव्हा तर जाम डोकं फिरतं.
रच्याकने, या लेखाचा उद्याच्या वविला लोक वेळेवर पोहोचण्यास काही फायदा होईल काय Proud

आमच्याकडे एकजण त्यांच्या देशातुन आलेल्या पाहुण्यांबरोबर ब्रन्चसाठी येणार होते. ते दुपारी साडेतीनला आले आणि रात्री दहाला डिनर करुन गेले. त्यांना सकाळी अकराला फोन केला तर म्हणे उशीरा उठलोय, येतोच बारापर्यंत... परत फोन केला तर म्हणे दीडपर्यंत येतोच. साडेतीनला आल्यावर समजले की ते गराज सेल बघत होते कारण त्यांना देशात घेऊन जायला (प्रींटर, टुल्स सारख्या) काही वस्तु हव्या होत्या. आम्ही दोघांनी डोक्यावर बर्फ ठेवला होता! लेकीला मोशन सिकनेसचा कधी कधी त्रास होतो. त्यामुळे आम्ही १०-१५ मिनीट रस्त्यात थांबलो तर आधी ज्यांच्याकडे जाणार असतो त्यांना फोन करुन तसे कळवतो.

नी अगदी मस्त topic आहे गं. तू खूप छान लिहिलयस "सांगितल्या वेळेच्या १५ मिनिटं अगोदर माझ्यासकट माझं घर तीटपावडर लावून तयार होतं" खूप आवडलं अगदी असंच असतं BTW तू कोकणस्थ आहेस का? ..कोकणस्थ सोडून बाकिच्यांनी दिवे घ्या Proud ..आणि सर्वत्र नियमाला अपवाद हे असतात हे माहित असून हे लिहायचं धाडस करत आहे..ह्या वर कृपया वाद विवाद करु नये..पण "माझ्या/ स्व" मते >९५% कोकणस्थ लोकं वेळ पाळणारे असतात.

लिहावं तेव्हढं कमीच वाटेल! पण मलाही हा अनुभव खूप वेळा आलाय especially लोकांना जेवायला बोलावल्यावर..त्यामुळे .."एव्हाना सगळं आवरण्यात ब्रेकफास्टला फाटा मारल्यामुळे पोटात कावळे कोकलायला लागले होते. आता किचनमधे जाऊन काहीतरी करून घ्यायचं म्हणजे परत पसारा. परत तो आवरा आणि तेवढ्यात बेल वाजली म्हणजे?" हे अगदी अगदी अगदी पटलं!
शमा

Pages