मीना प्रभु

Submitted by सायो on 21 July, 2008 - 00:32

मीना प्रभूंचं 'माझं लंडन', ऍमेझॉनवरचं पुस्तक(नाव लक्षात नाही), ग्रिकांजली, तुर्कनामा, इजिप्तायन वाचून संपवलं आहे. बाकी कशाही पेक्षा मला त्या सगळीकडे एकट्याने फिरतात ह्याचचं कौतुक जास्त वाटतं. बाकी ऐतिहासिक़ उल्लेख नी माहितीचा ओवरडोस असतो त्यांच्या प्रवासवर्णनात(निदान माझ्याकरता तरी.शाळेत इतिहासाच्या तासाला बसल्यासारखं वाटतं). पण तरीही विकत घेऊन आवर्जून वाचते नेहमी.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मीना प्रभू यांच्या ११ पुस्तकांचा संच विकत घेतला होता. नुकतीच सर्व पुस्तके वाचून झाली.

रोम राज्य फारसे आवडले नाही पण बाकीची मात्र छान आहेत.

मीना प्रभुंच्या प्रवास-वर्णनांवरची चर्चा खूपच वाढली. रंगली असं मी म्हणणार नाही कारण त्यात भाग घेतलेल्या बहुतेक मंडळींची मतं ठाम होती आणि तीच तीच मतं पुन्हा पुन्हा मांडण्यामुळे चर्चा रंगण्यापेक्षा काहीशी कंटाळवाणी झाली.
प्रवास-वर्णन हा साहित्यप्रकारच नाही, त्यामुळे मीना प्रभु 'साहित्यिक'च नाहीत असं मानणारे काही जण आहेत. विशेषतः त्यांनी साहित्य-संमेलनाची निवडणूक लढवल्यामुळे काही जणांना आपल्या शेपटीवर पाय पडल्यासारखं झालं. त्यांनी या निवडणूक प्रकरणात मित्रांपेक्षा शत्रूच जास्त मिळवले असावेत असा माझा कयास आहे. एकंदरीत, लेखिका आणि व्यक्ति म्हणूनही, त्या काहीशा वादग्रस्त ठरल्या.
वाचन-संस्कृती मंदावत असल्याची सार्वत्रिक हाकाटी सुरू असतानाच, त्यांची पुस्तकं 'बेस्ट-सेलर' ठरत गेली, त्यांच्या आवृत्यांवर आवृत्या निघायला लागल्यावर अनेकांचा 'पित्त-विकार' बळावला की काय असं वाटू लागलं.
समीक्षा मग ती 'आस्वादक' असो किंवा 'पंडिती' थाटाची प्राध्यापकी असो, ती करताना खरं म्हणजे वर नमूद केलेले मुद्दे गैरलागू असले पाहिजेत पण तसं क्वचितच घडतं. आडवळणाने, समीक्षकांचे पूर्वग्रह त्याच्या मतप्रदर्शनात डोकावत रहातात.

'मीना प्रभुंची 'ऐपत' चांगली असल्याने त्यांना इतके प्रवास करता आले, तेही विमानानं, टॅक्सीनं वगैरे. त्यात नवल ते काय?' किंवा 'एकटीने प्रवास केला त्यात असं काय मोठं झालं?' किंवा ' फक्त प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या म्हणजे काय प्रवास केला का?' असे ताशेरे बहुदा पूर्वग्रहातून येतात. त्यांचा संबंध साहित्य-गुणांशी क्वचितच असतो. शिवाय, प्रेक्षणीय स्थळं सोडून प्रवास करणारे टूरिस्ट कितीसे असणार? त्याच प्रमाणे, प्रेक्षणीय स्थळं वगळून लिहिलेलं प्रवास-वर्णन वाचनीय ठरण्याची शक्यता कमीच.

स्थळांच्या वर्णनाबरोबरच प्रवाश्याचे बरे-वाईट अनुभव, त्याच्या [किंवा तिच्या] प्रतिक्रिया, मनात उठलेले विचार तरंग या सर्वांमुळे प्रवास-वर्णन रंजक होतं. मीना प्रभुंच्या पुस्तकात अशी रंजकता मला आढळली. एखाद्या देशाला भेट देण्यापूर्वी [किंवा नंतरही पुस्तक लिहिण्यापूर्वी ] त्या देशाचा इतिहास आणि संस्कृती यांचा बराच अभ्यास त्या करतात असं दिसतं. ती माहिती [अवांतर म्हणू या, हवं तर] सर्वसाधारण प्रवास-वर्णात अभावानंच आढळेल. त्याच बरोबर, तिथल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरांचा आजच्या कुटुंबात, समाह-जीवनात आणि शासन-व्यवस्थेत येणारा प्रत्यय त्या नोंदवत जातात, ते मला आवडतं.

Alice Albinia यांचं 'Empires of the Indus' हे पुस्तक माझ्या अत्यंत आवडत्या पुस्तकांपैकी एक. ते प्रवास-वर्णन आहे का सिंधु नदीच्या दोन्ही तीरांवरच्या प्रदेशांचा सांस्कृतिक इतिहास आहे का आजच्या समाज, कुटुंब आणि शासन या सगळ्या व्यवस्थांचं वर्णन आहे हे नेमकं सांगता यायचं नाही. त्या पुस्तकात हे सगळं आहेच, शिवाय त्याहूनही खूप काही आहे. [अनेक वेळा प्रयत्न करूनही मी भालचंद्र नेमाड्यांची 'हिंदु' दोनेकशे पानांपुढे वाचू शकलो नाही, जरी ती कादंबरी आहे.] अल्बिनियाबाईंचे वैयक्तिक अनुभव तर चित्तथरारक म्हणावेत असे आहेत. ते पुस्तक [कादंबरी नसतानाही] आपण झपाटल्यासारखं वाचत जातो. पण म्हणून मी ते पुस्तक आणि मीना प्रभुंची प्रवास-वर्णनं यांची तुलना करणार नाही.

अ‍ॅलिस अल्बिनिया आणि मीना प्रभु अगदी वेगळ्या प्रकृतीच्या, प्रवृत्तीच्या आणि स्थितीतल्या लेखिका आहेत. अल्बिनिया ह्या समाज-शास्त्राच्या एक तरुण संशोधक. त्यांनी जवळ जवळ अडीच वर्षं, सिंधु नदीच्या अंतापासून ते उगमापर्यंत प्रवास आणि संशोधन [एकटीनं] करण्यात घालवली. अशक्यप्राय म्हणावं अशा चिकाटीनं आणि धैर्यानं त्यांनी हे संशोधन केलं, साहसं केली. मीना प्रभु तशा नाहीत. त्या एक अभ्यासू प्रवासी [टूरिस्ट] आहेत. जाता जाता त्या इतिहास आणि संस्कृती, सद्य स्थिती यांबाबतची आपली निरीक्षणं नोंदवतात, एव्हढंच. पण त्यांची ही निरीक्षणं, भेटलेल्या स्व्यक्तींची स्वभाव-वर्णनं आणि भाव-चित्रं यांमुळे सर्वसाधारण टूरिस्ट-गाईडपेक्षा त्यांची पुस्तकं वेगळी वाटतात, ऊठून दिसतात हे नाकारता येणार नाही.

आता एखादं पुस्तक सगळ्यांनाच आवडेल असं नाही. पण 'न आवडलेलं' पुस्तक आणि 'टाकावू' पुस्तक हा फरक आपण करायला हवा असं मला वाटतं. मीना प्रभूंची पुस्तकं चिनूक्सना आवडली नाहीत, हे ठीकच. ती पुस्तकं टुकार आहेत असं तर ते म्हणत नाहीत ना? मग झालं तर. आपले मुद्दे त्यांनी काही झालं तरी स्वीकारालेच पाहिजेत असा आग्रह कशासाठी? त्यांचे मुद्दे कुणाला न पटले तर तसं म्हणून पुढे जावं हेच योग्य नाही का?
-प्रभाकर [बापू] करंदीकर.

या 'धाग्या'वर पुलंच्या 'अपूर्वाई' आणि 'पूर्वरंग' या पुस्तकांचे उल्लेख आले आणि प्रवास-वर्णनं म्हणून ती पुस्तकं मापदंड ठरली आहेत, असं ही म्हटलं गेलंय. पुल, वपु अशा काही लेखकांच्या बाबतीत जे स्तुतीपर नाही ते बोलणं / लिहिणं धाडसाचंच असतं कारण ते उदंड लोकप्रिय साहित्यिक आहेत. त्यातून पुल म्हणजे तर महाराष्ट्राचं 'लाडकं' व्यक्तिमत्व वगैरे आहेत. मी शाळकरी मुलगा असताना 'अपूर्वाई' वाचलं आणि मला तेंव्हा ते [अर्थातच] प्रचंड आवडलं होतं. त्यातली व्यंगचित्रं मला 'ग्रेट' वाटली होती. त्यामानानं 'पूर्वरंग' फिकट वाटलं असलं तरी आवडलं होतंच. या पुस्तकांना प्रवास-वर्णन म्हणावं की नाही याचा विचार करण्याचं ते वय नव्हतं.

आताही 'ते' लेबल त्या पुस्तकांना फिट्ट बसतं की नाही याची चर्चा निरर्थक असं मला पक्कं वाटतंय. तरीही, मीना प्रभूंच्या प्रवास-वर्णनांच्या संदर्भात त्या पुस्तकांचे उल्लेख येत राहिले, म्हणून त्या बाबतची माझी मतं नोंदवण्याचं धाडस करतो आहे.

पुढे वय वाढल्यावर, पुलंची ती दोन पुस्तकं रूढार्थानं प्रवास-वर्णनं नाहीत असं माझं मत बनलं परंतु 'अपूर्वाई' हे एक अत्यंत वाचनीय पुस्तक आहे आणि मराठीत एक नवा 'जानर' पुलंनी रूढ केला. इतकंच नव्हे तर लोकप्रिय केला हे माझं तेंव्हाचं मत आजही कायम आहे. पण पुढे काय झालं की जॉर्ज मिकीसचं How To Be An Alien .हे अत्यंत गाजलेलं पुस्तक वाचनात आलं आणि एकदम ट्यूब पेटली की, 'आपण इतकी वर्षं एका नव्या स्टाईलचं आणि जानरचं श्रेय पुलंना देत आलो, पण ती स्टाईल मुळात मिकिसची आहे. पुलंनी ती सहीसही उचलली आहे आणि मराठीत रुजवली आहे.'

दुसर्‍या महायुद्धानंतर [बहुदा] लगेचच जोर्ज मिकिसचं ते पुस्तक प्रसिद्ध झालं असावं. अतिशय खुसखुशीत भाषेत त्यानं इंग्रज माणसाच्या अफलातून फिरक्या घेतल्या आहेत. इंग्रजाची ती सुप्रसिद्ध विनोद-बुद्धी युद्धाच्या प्रभावाखाली काहीशी लोपली होती. त्यामुळेच पी.जी. वूडहाऊसने जर्मन युद्धकैद्यांच्या छावणीत राहून जी उपरोधिक भाषणं केली ती सहेबाच्या पार डोक्यावरून गेली आणि बिचार्‍या वुडहाऊसच्या कपाळावर 'देश-द्रोही' असा शिक्का मारला गेला होता. पण युद्ध संपल्यावर साहेबाची ती जगप्रसिद्ध विनोदबुद्धी पुन्हा ताळ्यावर आली असावी, त्यामुळे मिकिसचं पुस्तक अतिशय लोकप्रिय झालं.

मिकिस हंगेरीतून स्थलांतरीत होऊन इंग्लंडच्या आसर्‍याला आलेला एक निर्वासित पण त्यानं इंग्रजीतल्या विनोदाचा 'लहेजा' नुसता पकडलाच नाही तर त्या वरताण लिखाण केलं. इंग्रजी विनोदाच्या दालनात त्यानं एक समृद्ध उपदालनच उघडलं म्हणानात? त्याच्या पुस्तकातही व्यंगचित्रांची सुंदर सजावट आहे. ['अपूर्वाई' तोही ढाचा पकडला गेला आहेच आणि तेंव्हा तो अभिनव ठरला होता.] त्यानंतर याच 'जानर' मधे मिकिसनं जपान, अमेरिका, जर्मनी, इस्राएल, द. अमेरिका इ. अनेक देशांबाबत 'How To' अशी पुस्तक-मालिका लिहिली आणि ती सगळी पुस्तकं गाजली. ती पुस्तकं लिहिताना मिकिसनं त्या त्या देशांचा प्रवास केला होताच. तथापि तेवढ्यावरून त्यांना कोणी प्रवास-वर्णनं मानलं नाही, [मापदंड वगैरे तर सोडाच.] आजमितीस इंग्लंड मधल्या एखाद्या वाचनलयात तुम्ही मिकिसची पुस्तकं शोधलीत तर ती 'विनोद' या विभागात सापडतील, प्रवास-वर्णनांच्या विभागात नाही.

आता काही disclaimers नोंदवून ठेवलेली बरी. [१] अपूर्वाई आणि पूर्वरंग ही पुस्तकं वाचनीय आहेत असंच मला आजही वाटतं पण मी त्यांना प्रवास-वर्णनं म्हणू धजत नाही. [२] कॉपी करताना पुल पकडले गेले असं मला मुळीच म्हणायचं नाहीय. कॉपी फार तर 'स्टाईल' ची आणि 'जानर'ची आहे असं म्हणता येईल. [३] पुल एक ग्रेट लेखक आहेत याबाबत मी शंका काढत नाहीय.

-प्रभाकर [बापू] करंदीकर.

करंदीकर, मिकेशच्या शैलीचं सहीसही अनुकरण पुलंनी केलं आहे असं मला वाटत नाही पण मिकेशचा त्यांच्या प्रवासवर्णनावर प्रभाव आहे हे मलाही मिकेश वाचताना जाणवलं होतं. आणि पुल त्यांच्या समकालीन अनेक महत्त्वाच्या-बिनमहत्वाच्या लेखकांचा, त्यांना भावलेल्या लेखनाचा उल्लेख करताना मिकेशचा कधीच उल्लेख करत नाहीत हे थोडंसं आश्चर्यकारक वाटतं.
मला इथे पुलंनी मुद्दाम शैलीचा स्रोत लपवायला हे केलंय असं अजिबात म्हणायचं नाहीये पण मला कायम कधीतरी मनाच्या एका कोपर्‍यात पडलेला प्रश्न आहे हा Happy

नुकतीच इटली, ग्रीसची मोठी ट्रिप झाली आहे. त्यासाठी जी तयारी केली होती - वाचन, ऑनलाईन तिकिटे, तिथला लोकल प्रवास इ. इ. त्यामधे आवर्जून रोमराज्य दोन्ही भाग आणि ग्रीकांजली विकत घेऊन वाचून काढलं. पुस्तक एकदा वाचलं, बरं वाटलं. पण परत उचलून वाचावंसं वाटलं नाही. शैली आवडली नाही किंवा पुस्तकाने फार गुंतवून ठेवलं नाही. खरेतर मला इतिहास वाचायला आवडतो. कोणत्याही देशाचा असो. पण ही पुस्तके ना धड प्रवासवर्णन, ना धड इतिहास, ना प्रवास मार्गदर्शन असं काहीसं झालं. एक चांगली गोष्ट म्हणजे या देशांवर मराठी भाषेत काही माहिती मिळते.

मला मीना प्रभुंच्या साहित्यिक राजकारणाबद्दल काहीच माहिती नाही. कदाचित साहित्य संमेलने वगैरे पासून आम्ही कोसो दूर असतो म्हणून पण असेल. पण तरीही ही पुस्तके वाचताना बर्‍याचदा "एकटी असणं" "लेखिका म्हणून संग्रहालयांची प्रवेश तिकिटे फुकट मिळवणे", "Behind the scenes tours किंवा संग्रहालयांच्या गुप्त खजिन्याच्या स्पेशल भेटी" हे सगळं अति रंगवून लिहिलं आहे. निदान इटलीमधे तरी पैसा टाकला तर सगळ्या मोठ्या संग्रहालयांना स्पेशल भेटी देता येतात.

खरेतर काहीजणांनी हा मुद्दा मांडला आहे. पण मागणी तसा पुरवठा, पैशासाठी प्रवास आणि लेखन हे जाणवते. त्या स्वतः लंडन मधे राहिल्या आहेत, इंग्रजी बोलू शकतात यामुळे एकटीने प्रवासाचा मुद्दा तर किरकोळ आहे. जरी मागच्या पिढीतल्या असल्या तरी. निदान इटलीबाबत तरी लोकल प्रवासाचे तंत्र सर्व युरोपभर सारखेच आहे. ते फिगर आउट करणे काही विशेष नाही. त्या पार्श्वभूमीवर ही पुस्तके अगदीच सामान्य वाटली.

खूप अवांतर होतंय, पण पुलं आणि मिकॅश मधलं ह्या साम्यावर बर्‍याच पूर्वी भाष्य केलं गेलं असावं. पुलंच्या 'दाद' पुस्तकात त्यांनी ह्याबद्दल त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या एका लेखाला पत्रोत्तर पाठवलं होतं ते आहे. त्यात ते स्वतःवर मार्क ट्वेनच्या इनोसंट्स अब्रॉड चा संस्कार झाला असंही म्हणतात.

करंदिकर... दोन्ही पोस्टींना + ११११

रच्याकने...

मागे एकदा जयंत नारळीकरांचा एक लेख वाचला होता. त्यांच्या आत्मचरित्रातला आहे. केंब्रीज चे दिवस त्यात नमुद केलेले आहेत. त्यांनी त्यात आथवण लिहिली आहे, की पु.ल. आणि सुनीता बाई जेंव्हा पहिल्यांदा केंब्रीज ला गेले, तेंव्हा त्यांनी भारतिय आणि मराठी विद्यार्थी म्हणुन नारळीकर आणि त्यांचे एक स्नेही, ह्या दोघांची भेट घेतली होती. आणि त्या वेळेस ह्या दोन विद्यार्थ्यांनी त्यांना सगळं केंब्रीज ३ -४ दिवस फिरवुन दाखवले. अनेक इमारती स्पेशल परमिशन काढुन आतुन दाखवल्या. पण पु.ल नी ह्याचा उल्लेख त्यांच्या पुस्तकात केला नाही. त्यावेळेस जयंत नारळीकर (तरुण असल्याने) खट्टु झाल्याची त्यांनी नोंद केली आहे.

नारळीकरांनी "मोठ्या माणसांच्या छोट्या गोष्टी" ह्या सदरात वरील प्रसंगाची नोंद केली आहे.

ते काही पु.ल. विरोधी नाही. उलट त्यांच्या लेखनाचे चहातेच आहेत.

( आधीच लिहिते की ही के फक्त आठवण आहे. मला स्वतःला पु.ल. प्रचंड आवडतात. त्यांच्या वर ही टीका नाही. त्यांना काही मर्यादा असतिल पुस्तक लिहिताना. )

मी मीना प्रभूंच्या प्रवास वर्णनाला सुरुवात "दक्षिण रंग" (द्क्षिण अमेरिका वर आधारित) या पुस्तकापासून केली आहे. ते अजून अर्धे वाचून झाले आहे... वाचन चालू आहे. पुस्तक छान आहे. इतिहास प्रत्येक ठिकाणी द्यायलाच हवा त्याशिवाय प्रवास वर्णन कधीच पूर्ण होत नाही असे मला वाटते.

मी मात्र fan आहे मीना प्रभूंच्या लेखनाची. अगदी आपण तिथे त्यांच्याबरोबर फिरतोय हा फील येतो.

बापू करंदीकरांच्या ६ सप्टेम्बर २०१२ च्या पोस्टबद्दल मला म्हणायचे आहे. मिकेश ची पुस्तके मी वाचलेली नाहीत . त्याची शैलीही मला माहीत नाही. पण मिकेशची शैली आणि पुलंह्ची शैली ही योगायोगाने जुळत असावी. कारण मुळात पुस्तकासाठी हे लेखन पुलंनी केले नव्हते असे मला आठवते. मुळात पुलं ना त्यांच्या इंग्लंड दौर्याबद्दल लिहा यला किर्लोस्कर मासिकासाठी शंकरराव किर्लोस्कारानी मागे लागून प्रवृत्त केले व त्याची लेखमाला 'किर्लोस्कर' मधून प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली . ही मासिक लेखमाला होती. ( किर्लोस्कर, स्त्री, मनोहर या मासिकांना साहित्यिक वर्तुळात गमतीने 'लोखंडी मासिके' मासिके म्हटले जाई. :)) या लेखमालेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून त्याचे पुस्तक करण्याची कल्पना नंतरची ! त्यामुळे एका विषिष्ट फॉर्मॅटसाठी शैली ठरवून , बेतीव लिखाण ते वाटत नाही...
एखादी सोईस्कर शैली अदरवाईजही अनुकरणे तसेही अपराधात्मक नाही असे मला वाटते..

Mikes चा उल्लेख मिकेश असा योग्य केल्याबद्दल वरदाचे खास कौतुक! Happy बहुतेक तो मुळचा ज्यर्जी (gyorgy) मिकेश असणार.

A Country Full of Aliens : A Briton in Hungary: या हंगेरीवरील इंग्लिश लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाच्या नावाला मिकेश या हंगेरियन माणसाच्या इंग्लंडवरील पुस्तकाचा संदर्भ तर नसेल ना?

हा धागा मस्त आहे! बरेच काही नवीन वाचायला मिळाले! मीना प्रभुंची काही पुस्तके वाचली आहेत. सगळी चांगली वाटली पण फक्त one time read. जर त्या देशात जायची वेळ आली तर कदाचित पुन्हा चाळेन! पु.लं.च्या अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा या सगळ्याची मात्र पारायणे झाली आहेत! अर्थात ती नुसती प्रवासवर्णनं नाहीत हे माहिती होतं (कसं ते माहिती नाही)! मिकेश ची पुस्तकं वाचली पाहिजेत शोधून!

मीना प्रभुंच्या १२ पुस्तकांचा संच डिस्काऊंट प्राईसला मिळत आहे. इच्छुकांनी लाभ घ्यावा. मी बुक केला माझा सेट..इंडियात फोन करुन Happy आता इंडियाला गेल्यावर थोडी तिकडे वाचेन थोडी इकडे घेऊन येईन Happy

मीनाताईंचं जपान वाचून काढलं आत्ता. विशेष आवडलं नाही. जपान बद्दलच्या माझ्या कल्पनांना उलट खिंडार पडलं वाचून. सारखी आपली श्राईन्स, मंदिरं..नाहीतर मग हिरोशिमा नागासाकी!
रटाळ , एकसुरी होतं.....................
मला त्यांचं वाट तिबेटची मात्र खूप आवडलं होतं....एकदा शांघाय ते ल्हासा ट्रेन ने प्रवास करायचा आहे.............!!

जॉर्ज मिकीसचं How To Be An Alien .हे अत्यंत गाजलेलं पुस्तक वाचनात आलं आणि एकदम ट्यूब पेटली की, 'आपण इतकी वर्षं एका नव्या स्टाईलचं आणि जानरचं श्रेय पुलंना देत आलो, पण ती स्टाईल मुळात मिकिसची आहे. पुलंनी ती सहीसही उचलली आहे आणि मराठीत रुजवली आहे.' >>> प्रभाकर उर्फ बापू करन्दिकर आणि वरदा याण्नी वर या पुस्तकावर चर्चा केलेली आहे. त्यावरून हे पुस्तक अफलातूनच असावे हा अन्दाज येतो. हे पुस्तक ऑडिओ बुक, म्हणून यु ट्युब वर आहे ( अर्थातच मोफत : इन्टर्नेटचा खर्च अलाहिदा). थोडे ऐकले . धमालच आहे . वाचताना मजकुराचा खट्याळ टोन बरोब्बर पकडला आहे.
https://www.youtube.com/watch?v=Ji8ovow5Pz4&t=231s&ab_channel=sabri-%D8%...

https://www.youtube.com/watch?v=pGalDrOx5xA&ab_channel=galaxysata

Pages