मुरांबा, पापड, चटणी, कोशिंबीर

Submitted by वर्षा_म on 12 July, 2011 - 01:27

भुंगा आणि बागुलबुवाच्या आमंत्रणाला मान देउन

*********************************
मुरांबा

कैरी आणि साखरेसारखे
भिन्न स्वभावाचे आपण
एकमेकांच्या आयुष्यात आलो

एकमेकांना संभाळत
कधी मनाला मुरड घालत
वर्षानुवर्षे एकत्र राहिलो

आता नाते इतके मुरल्यावर
खराब होण्याच्या भितीपोटी
वेगळी काळजी घेण्याची
गरजच उरली नाही!

*********************************

पापड

लग्नापुर्वी माझ्याच विचारात
सदैव मश्गुल तू
आता जेव्हा कायम
मला दुर्लक्षित करतोस

तेव्हा

प्रेमात पडल्यावर काय काय
पापड लाटले होते
ह्या आठवणीनेही
माझा तिळपापड होतो!

*********************************

चटणी

साधु महाराजांनी
दोघांना सुखी संसाराचे
कानमंत्र दिले

रोजची भांडणे संपली
आणि सुरुवात झाली
गोड गोड संसाराला

काही दिवसातच
कंटाळले दोघेही
वरवरच्या गुळचट पणाला

शेवटी न रहावुन
झालीच एकदाची भांडणे

आता कसे तृप्त तृप्त वाटतेय
गुळचट जेवणात खमंग
चटणीची चव काही ओरच!

*********************************

कोशिंबीर

प्रेम म्हणजे नक्की काय
सुख-दु:ख, आवड्-निवड
एकमेकांबरोबर शेअर करणे...

डोळ्यावर पट्टी बांधुन
फक्त मनाने
दुसर्‍याच्या मनाचा ठाव घेत
आंधळी कोशिंबीर खेळणे

मिसळलेल्या मनाच्या कोशिंबीरीवर
सहजीवनाची फोडणी
म्हणजेच खमंग आयुष्य!

>>>>>>>>>>>>>>>>>>>
भुंग्या हापिसात आल्यापासुन तासभर हेच खरडतेय... तुझ्या डाव्या बाजुच्या नादात माझी नोकरी गेली तर जेवणाचे ताट मिळणे मुश्कील Uhoh

Pages