उद्योजक आपल्या भेटीला- दिलीप आणि कालिंदी पळशीकर

Submitted by Admin-team on 5 July, 2011 - 23:33

'अतिथी महाराष्ट्रीय शाकाहारी जेवण'. दिलीप आणि कालिंदी पळशीकर यांनी पुण्याची खाऊगल्ली असणार्‍या जंगली महाराज रस्त्यावर गेली अठ्ठावीस वर्षं दिमाखात चालवून आपला मराठी बाणा जपलेलं नाव! अपार परिश्रम, आरोग्यदायी स्वच्छता आणि सर्वोत्तम दर्जाचे सातत्य या तीन आधारस्तंभांवर उभं असलेलं 'अतिथी' हे कोणत्याही उद्योगासाठी एक अनुकरणीय उदाहरणच आहे. 'अतिथी'च्या कालिंदी पळशीकर यांच्याशी त्यांच्या या शून्यातून उभ्या केलेल्या अतिथीविश्वाबद्दल मायबोलीकर आशूडी यांनी केलेले छोटेखानी हितगुज खास मायबोलीकरांसाठी.
IMG_0098.jpg
***

प्रश्न- तुमच्या ह्या व्यवसायाचा प्रवास कसा सुरू झाला?
कालिंदी : लग्नाच्या आधीच यजमानांनी राहत्या बंगल्याच्या जागी एक हॉस्टेल व हॉटेल काढायचे योजिले होते. अठ्ठावीस वर्षांपूर्वी म्हणजे १९८३ साली जंगली महाराज रस्त्याला आजच्या इतके ग्लॅमर मुळीच नव्हते. परंतु आमची जागा प्रशस्त होती. तळमजल्यावर हॉटेल, त्यावर हॉस्टेल व सर्वात वर आमचे घर अशी रचना झाली. हॉटेल काढले तरीही ते फक्त महाराष्ट्रीयन पदार्थांचेच असले पाहिजे हा माझ्या यजमानांचा आग्रह तेव्हापासूनच होता. तेव्हा आजच्यासारख्या वीकेंड्सला हॉटेलांबाहेर 'वेटिंग'च्या रांगा लागत नसत. मात्र अनेक लोक केवळ नोकरी शिक्षणासाठी पुण्यात वास्तव्याला येत, त्यांना 'घरच्यासारखे जेवण' मिळायला हवे याकडे त्यांचा कटाक्ष होता. आज सगळीकडे 'मराठी पाट्यां'चा नियम लागू केला आहे. अतिथीमध्ये मात्र मराठी जेवण, मराठमोळे वातावरण आणि मुख्य म्हणजे मराठीतच बोलले पाहिजे असा अलिखित नियम होता. आमच्यापुढे मुख्य प्रश्न अनुभवाचा होता. पहिल्याप्रथम आम्हाला हॉटेल चालवण्याचा अजिबात अनुभव नसल्याने आम्ही काही वर्षं फक्त होस्टेल चालवायचे व हॉटेल इतर कुणाला तरी चालवायला देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आमच्या यशातला महत्त्वाचा घटक ठरला. हॉस्टेलमुळे आम्हाला दरमहा निश्चित रक्कम मिळायला सुरुवात झाली तसेच हॉटेल चालवण्याचे धडेही आम्ही घेऊ लागलो. त्याचवेळी आउअटडोअर केटरिंगही सुरु केले. त्यामुळे स्वयंपाकशास्त्राचे 'अंदाज' या कळीच्या मुद्द्याचे अनुभव गाठीशी येऊ लागले. हळूहळू आम्ही हॉटेलचीही संपूर्ण जबाबदारी घेतली. आधी बाहेरचे आचारी, स्वयंपाकीणी पगारावर ठेवून पाहिल्या. पण त्यांची अनियमितता, फसवणूक टाळायची असेल तर स्वत: पदर खोचण्याशिवाय पर्याय नाही हे माझ्या लक्षात आले. याचकाळात यजमानांना मोठा अपघात झाला व ते जवळपास तीन वर्ष आजारी पडले. दोन छोट्या मुलांना सांभाळून हा सारा डोलारा सांभाळताना माझी खरी कसोटी लागली. भांडी घासण्यापासून सारी कामे मी एकटीने करायची तेव्हा. सुरुवातीला मी आईला "एका भांड्यात किती होईल?" असे विचारत असे!

IMG_0044.jpgप्रश्न- या धंद्यामध्ये कोणत्या प्रश्न-समस्यांचा सामना सतत करावा लागतो?
कालिंदी : सतत डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं म्हणजे काय ते या व्यवसायात नक्की समजतं. इथे कोणत्याही मशिन्सशिवाय उत्पादनाच्या दर्जाचे सातत्य राखावा लागणारा हा कारखाना आहे. एकाही पदार्थाच्या चवीत जराही बदल ग्राहक स्वीकारत नाहीत. आजवर ज्या चवीच्या जोरावर नाव कमावलं आहे ते टिकवून ठेवणं तितकंच कठीण असतं. तसेच इथे स्वयंपाकघरात फसवणूक होण्याची शक्यता दाट असते. कित्येकदा कामगार लोकांचा इकडचा तिकडचा राग कामावर निघू शकतो. मग तिखट, मीठ जास्त पडणे, भाज्या मोठाल्या चिरणे, जाड पोळ्या असे प्रकार दिसून येतात. त्यामुळे खेळीमेळीचे वातावरण टिकवून ठेवणे, त्यांना कामाच्या ठिकाणी आपलेपणाची जाणीव होणे फार महत्त्वाचे ठरते. याकरता आम्ही घरातले चारही जण रोज त्यांनी बनवलेलेच जेवतो. यामुळे स्वच्छ, आरोग्यपूर्ण अन्नाची आम्हालाही खात्री पटते. नोकरांची धरसोड वृत्ती. प्रामाणिक, विश्वासू कामगार मिळवणे ही या व्यवसायातली मेख आहे. हे लोक गावाकडून येतात तेव्हा त्यांना स्वच्छतेच्या साध्या सवयीही ठाऊक नसतात. थुंकणे, नाक शिंकरणे इथपासून त्यांना धडे देऊन ग्राहकासमोर अदबीने उभे करेपर्यंत फार मेहनत घ्यावी लागते. त्यातून त्यांची गावाकडची शेतीची इ कामे निघाली की पसार. ते परत यायचीही खात्री नसते. कच्च्या मालाचा पुरवठा करणार्‍या व्यावसायिकांसोबतही तुम्हाला मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे लागतात. हॉटेलच्या प्रत्येक वाढदिवशी नातेवाईकांऐवजी आम्ही गॅस वाहून आणणार्‍यांपासून ते पापडवाल्यापर्यंत अतिथी शी निगडीत असलेल्या प्रत्येक कष्टकर्‍याला अगत्याने जेवायला बोलावतो. त्यादिवशी ते अतिथी चे प्रमुख अतिथी असतात! त्याचबरोबर आणखी एक समस्या म्हणजे महागाई. पेट्रोल, गॅसचे दर वाढले, अन्नधान्य भाज्या महाग झाल्या की त्याची झळ आम्हाला बसतेच. मात्र रिक्षावाल्यांसारखे लगेच आम्हाला आमचे रेट वाढवता येत नाहीत. रेट वाढवले की आणखी सेटबॅक बसतो. अत्यंत काळजीपूर्वक विचार करुन हा निर्णय घ्यावा लागतो.

प्रश्न- या व्यवसायात आणखी कोणत्या नवीन संधी खुणावत आहेत? किंवा या व्यवसायाशी संबंधित नसलेले एखादे काम भविष्यात हाती घेण्याची इच्छा?
कलिंदी - आज मागे वळून पाहताना गेल्या अठ्ठावीस वर्षात या व्यवसायात बरेच बदल होत गेले. आज गल्लोगल्ली 'डायनिंग हॉल' निघाले आहेत. तसेच देशी-विदेशी पदार्थांच्या स्पर्धेत आपला पारंपारिक मराठमोळा बेत टिकवून ठेवणे अवघड आहे. सुरुवातीची गंमतीशीर अमर्यादित थाळी (ज्यात भात व पोळी मर्यादित!) जाऊन आता अमर्यादित, मर्यादित, मिनी थाळी असे आटोपशीर प्रकार आले आहेत. तसेच ग्राहकांचा कल बघून आता मराठी स्नॅक्स (कांदा भजी, पोहे, शिरा, थालीपीठ, धिरडे इ) आणि आईस्क्रीमही अतिथी मध्ये सुरु झाले आहे. तसेच आपल्या सणांचे वैशिष्ट्यपूर्ण जेवणही त्या त्या सणाला इथे असते. आता हॉस्टेल बंद करुन लॉजिंग बोर्डिंग सुरु केले आहे. आमच्या पुढच्या पिढीला यात रस असेल तर आणखी काही नावीन्यपूर्ण कल्पना मनात आहेत. पण या क्षेत्रात कष्टापेक्षा पैसा कमी असल्याने आजच्या आयटीयुगात मुलांचा कल नक्की कसा आहे ते अजूनी गुलदस्त्यातच आहे.

प्रश्न- नव्याने हा व्यवसाय करू बघणार्‍यांना काही सांगू इच्छिता? काही आवडते, स्वतःला पटलेले असे 'कोट' वगैरे?
कालिंदी - या व्यवसायात पडायचे असेल तर स्वयंपाकाची इत्थंभूत माहिती तुम्हाला हवी. नुसतं गल्ल्यावर बसून स्वतःचं हॉटेल नाही चालवता येत. कुठलेही कष्ट करण्याची तयारी हवी. पडेल ते काम लाज न बाळगता केले तर यश तुमचेच आहे!
***

'अतिथी'चा हा इतिहास ऐकताना मी भारावून गेले होते. खरोखर कोणताही अनुभव गाठीशी नसताना केवळ कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या भांडवलावर अठ्ठावीस वर्षांचा हा उमदा व्यवसाय प्रवास अचंबित करतो. लग्न झाल्यावर मनुष्यबळ पाठीशी नसताना एकामागून एक येणारी आव्हाने झेलत दिलीप आणि कालिंदी पळशीकर या दांपत्याने ज्या समर्थपणे 'अतिथी' उभे केले आहे आणि त्यांना त्यांच्या कुटुंबीयांची जी साथ लाभली आहे त्याला तोड नाही. 'अतिथी देवो भवः' ही उक्ती हे दोघे आजवर अक्षरशः जगत आले आहेत. त्या सर्वांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मायबोलीतर्फे शुभेच्छा देऊन व त्यांच्याकडून मायबोलीला दिलेल्या शुभेच्छा स्वीकारून मी निघाले.
***

दिलीप व कालिंदी पळशीकर यांच्यासाठी काही प्रश्न असतील, तर स्वागत आहे. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन, आणि पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा.
आशूडी मुलाखत इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

इतिहास खरोखर भारावून सोडतो.
मुलाखत शेअर केल्याबद्दल धन्यवाद. हॉटेल व्यवसायामधे उत्तम व्यवस्थापन महत्वाचे. रिस्कही तेवढीच इन्व्हॉल्व्ह असल्याने लक्षही तितकेच द्यावे लागते.
वर्षानुवर्षे एक वेगळेपण टिकवून ठेवणे हिच या व्यवसायाच्या यशाची 'गुरुकिल्ली' आहे.

अनेक वर्ष व्यवसाय सुरु ठेवणे आणि त्यासाठी तो फायदेशीर ठेवणे ही कसरत यशस्वी केल्याबद्दल श्री व सौ पळशीकर यांचे अभिनंदन. 'अतिथी' आणि श्री व सौ पळशीकर यांना भरपुर शुभेच्छा!!!

आशू, छान झालिये मुलाखत.
श्री. व सौ. पळशीकरांना अनेक शुभेच्छा.

माझ्याकडून प्रश्नः
यापुढे कोणतं नवं आव्हान तुम्हाला खुणावतंय?

छान. धन्यवाद आशू. Happy

एखादे हॉटेल कसे सुरु करतात? त्याच्या बिझनेस प्लॅन मध्ये कुठले घटक असावेत.
अंदाजे किती गुंतवणूक लागते? किती स्टाफ लागतो कमीतकमी?
ब्रेक इव्हन पॉईंट पर्यंत किती काळ लागतो?

छान आटोपशीर मुलाखत.

हॉटेल व्यवसायाच्या परवान्यासंबंधी काय अनुभव?
गल्लोगल्ली हॉटेलं निघत आहेत, त्यांचा स्वच्छता, योग्य ते परवाने असे काही निकष लागू होत नाहीत. उलट सचोटीने वागणार्‍यांनाच त्रास जास्त होतो- ह्याबद्दल काही अनुभव/ सांगावेसे वाटेल?

खरंच प्रेरानादायी !
माझे काहि प्रश्न आहेत.
१) परवान्याचे काय,( खर्च वेळ किति)
२) कमित कमि किति भांडवल लागेल ?
३) स्वतः स्वयंपाकाचे शिक्शण घ्यावे लागेल का?
४) चवित सातत्य कसे

छान मुलाखत. रोजच्या स्वैपाकातुन एक दिवस सुट्टी हवी असेल , तर हे आमचं ठरलेलं ठिकाण आहे. स्वच्छता, चव, पदार्थ या सर्वांबाबत अगदी छान अनुभव.

लेख खुपच मनाला भावला खरे सागायचे तर अतिथि त नेहेमिच आपलेपनाने स्वागत होते हा मझा स्वता;चा
अनुभव आहे बरे का तेथिल जेवन अगदि घरच्या सारखे आहे स्वस्त आनि मस्त जरुर जाउन अनुभवा तेथला
आपलेपना अश्विनिने मुलाखतपन मस्त आतोपशिर घेतलिय

मी पुण्यात आले कि नेहमी "अतिथी" मध्ये जातेच. अतिशय सुग्रास जेवेन मिळण्याची हमखास जागा!!!! दिलीप राव आणि कालिंदी all द बेस्ट!!

मंजू
ऑकलंड न्यूझीलंड

उत्तम मुलाखत. शुभेच्छा.
विद्यार्थी असतांना अतिथीमध्ये खूप वेळा जेवले आहे. वाजवी दर आणि चांगले जेवण.

अतिथीशी ओळख करुन घेऊन मायबोलीकरांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आभार मानून कालिंदी व दिलीप पळशीकर यांनी आपल्या प्रश्नांना दिलेली उत्तरे त्यांच्याच शब्दांत.

*यापुढे कोणतं नवं आव्हान तुम्हाला खुणावतंय?
पारंपारिक महाराष्ट्रीयन जेवणामध्ये सतत नवनवीन प्रयोग करत यशस्वी करुन दाखवणं हे एक आव्हानच आहे.

*एखादे हॉटेल कसे सुरु करतात? त्याच्या बिझनेस प्लॅन मध्ये कुठले घटक असावेत.
अंदाजे किती गुंतवणूक लागते? किती स्टाफ लागतो कमीतकमी?
ब्रेक इव्हन पॉईंट पर्यंत किती काळ लागतो?
परवान्याचे काय,( खर्च वेळ किती)
कमीत कमी किती भांडवल लागेल ?

हॉटेल सुरु करायचे असेल तर प्रथम जागेची सोय बघावी लागते. 'जागेची जागा' म्हणजेच लोकेशन, आकारमान हे मुख्य घटक असतात व त्यावर एकूण गुंतवणूक अवलंबून असते. हॉटेल कुठे, किती मोठे, कोणत्या पध्दतीचे सुरु करायचे आहे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. जागेच्या किमती ठिकाणानुसार बदलतात हे तर आपल्याला माहित आहेच. जागा मालकीची की लीजवर घ्यायची हा पण गुंतवणूकीचा विचार आहे.
जागा उपलब्ध झाल्यावर आपण निवडीनुसार हॉटेलचा प्रकार (मल्टिक्युजिन रेस्टॉरंट इ.) ठरवला की गुंतवणूकीचा पुढचा टप्पा येतो. इथे आपण इच्छेनुसार बजेट कमीजास्त करु शकतो. मात्र कायदेशीर बाबींमध्ये सर्वात आधी फायर ब्रिगेडचे NOC, शॉप अ‍ॅक्ट, आरोग्य परवाना व पोलीस NOC अत्यावश्यक आहे. हे सारे दरवर्षी रिन्यू करावे लागते. पहिल्या वेळेस मात्र याला २-३ महिने जातात व खर्च अंदाजे पाच हजार येतो. आता किचन, टॉयलेट, ड्रेनेज, पार्किंग यांच्या मापांचे नियम काटेकोर झाले आहेत. ते पाळणे आवश्यक असते. जागा असल्यास अतिथी सारखा सेटप सुरु करायला दोन ते तीन लाख लागतील. सुरुवातीला किचनपासून वाढप्यांपर्यंत एकूण १०-१२ स्टाफ लागेल. ब्रेक इव्हन पाँईंट पर्यंत तरीही ३-४ वर्षे सहज जातात.

*हॉटेल व्यवसायाच्या परवान्यासंबंधी काय अनुभव?
नेहमीचेच, सगळी डॉक्युमेंटस तयार असतील तर वेळ लागत नाही.

*गल्लोगल्ली हॉटेलं निघत आहेत, त्यांचा स्वच्छता, योग्य ते परवाने असे काही निकष लागू होत नाहीत. उलट सचोटीने वागणार्‍यांनाच त्रास जास्त होतो- ह्याबद्दल काही अनुभव/ सांगावेसे वाटेल?
नाही. सचोटीने वागून आम्हाला आजवर एकदाही पश्चात्तापाची वेळ आली नाही ही आनंदाची गोष्ट. अतिथी मध्ये सार्‍या गोष्टी नियमाबर हुकूम असतात. हॉटेल्सचे वेळोवेळी पोलीस चेकिंग होते पण आजवर एकदाही काहीही समस्या उद्भवली नाही. अनेक हॉटेल्समध्ये जागेचा शेड्स इ टाकून बेकायदेशीररित्या वापर केला असेल तिथे अतिक्रमण करुन आल्यावर पोलीस इथे जेवायला आल्याचे प्रसंग घडतात!

* स्वतः स्वयंपाकाचे शिक्षण घ्यावे लागेल का?
याबद्दल तर आपण मुलाखतीत बोललोच आहोत. स्वयंपाक्यांकडून फसवले जायचे नसेल, ग्राहकाला उत्तम सेवा द्यायची असेल तर स्वयंपाकाचे ज्ञान आवश्यक आहे.
* चवीत सातत्य कसे
चव घेऊनच अर्थात! पण त्यासाठी आधी तुम्हाला चव तीच आहे ना हे ओळखता यायला हवं!

अतिथी ला मायबोलीकरांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल अनेकानेक धन्यवाद! मायबोलीकरांसाठी आम्हीही सदिच्छा चिंतितो.