पानसेबाई

Submitted by संदीप चित्रे on 18 July, 2008 - 11:46

“अरे व्वा ! शाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले. आपल्या तिसरीच्या बाई अजून कुणालाच ‘चेंगट’ किंवा ‘शुंभ’ म्हणाल्या नाहीयेत !”

पानसेबाईंची पहिली आठवण मनात ठसलीय ती अशी !!

कोवळ्या वयाचं मन अगदी टीपकागद असतं ! चांगलं-वाईट जे कानावर पडेल तर अगदी आतपर्यंत शोषलं जातं. दुखर्‍या शब्दाने टच्चकन पापणीत येतं आणि हसऱ्या शब्दाने डोळ्यांत आभाळ मावतं !

आमच्या पानसेबाई दिसायला कशा होत्या सांगू? अशा छान शिडशिडीत होत्या. रंगाने तांदळापेक्षा गव्हाजवळच्या होत्या. पाठीचा कणा ताठ होता. चालणं झपझप नि हालचाली झटपट होत्या. आवाज खणखणीत होता पण बोलणं मात्र मृदू होतं. खरंतर नुसतंच आवाज खणखणीत होता हे सांगून भागणार नाही. त्यांच्या आवाजाला एक नादमय गोडवा होता. मुख्य म्हणजे वाणी अगदी स्पष्ट होती. खरंतर त्यांची निवृत्ती काही वर्षांपलीकडेच उभी होती, पण ती जाणीव फक्त चेहऱ्यावरच्या काही सुरकुत्यांना आणि केसांच्या चांदीला होती. त्या केसांचा नीट बसवलेला छोटा अंबाडा बांधायच्या आणि ह्या सगळ्या वर्णनाला योग्य अशी नऊवारी साडी नेसायच्या. नऊवारी साडीमुळे तर त्या आम्हाला शाळेत शिकवणार्‍या आजीच वाटायच्या ! त्यांच्या हाती एक छोटी कापडी पिशवी असायची.

पानसेबाईंच्या शिकवण्याबद्दल तर काय सांगू? म्हणायच्या जे आवडेल ते आधी कर ! त्या सगळ्या मुलांच्या पालकांना एक आवर्जून सांगायच्या की मुलं अभ्यास करतात हो, फक्त त्यांना गोडी लागायला पाहिजे. ती गोडी कशी लागेल तेव्हढं आपण बघायचं. तेव्हा नीट कळायचं नाही पण आता समजतं की किती मोठी गोष्ट त्या सोप्या भाषेत सांगायच्या. नुसत्या सांगायच्या नाहीत तर आमच्याबरोबर रोज जगायच्या. ‘तारे जमीन पर’ बघताना पानसेबाईंची खूप आठवण आली. त्यातला ‘राम शंकर निकुंभ’तरी वेगळं काय म्हणत होता? मुलांचं शक्तिस्थान नीट वापरलं तर त्याचा उपयोग इतर ठिकाणीही करता येतो !!!

एखादा मुलगा खिडकीतून बाहेर बघत बसला असेल तर थोडा वेळ त्याला तसंच बघू द्यायच्या. उगाच ओरडून त्याची तंद्री भंग नाही करायच्या. मग त्याच्या जोडीला सगळ्या वर्गालाच बाहेर बघू द्यायच्या. झाडावरचा एखादा पक्षी दाखवायच्या. मोकळ्या मैदानापलीकडल्या रस्त्यावरून धावणारी लालचुटूक बस दाखवायच्या. मग बोलता-बोलता अलगद सगळ्यांचं लक्ष, त्या जे काही वर्गात शिकवत असतील त्याकडे, वळवायच्या. खिडकीबाहेर बघायला सुरूवात केलेला मुलगाही आपोआप परत मनानेही वर्गात यायचा !

लहानपणी आपण खूपदा ऐकतो की अक्षर कसं मोत्याच्या दाण्यासारखं हवं ! पानसेबांईंचं अक्षर तसंच होतं … मोत्याच्या दाण्यासारखं ! नुसतं वहीतलंच नाही तर फळ्यावर लिहिलेलंसुध्दा !! बरेचदा असं दिसतं की फळ्यावर लिहिताना अक्षर नीट येत नाही. काहीजण टेकडी चढतात तर काही टेकडी उतरतात !!! काहींचं अक्षर लहान आकारापासून सुरू होतं ते मोठं होत जातं ! काहींचा हत्ती निघतो आणि पूर्णविरामापाशी मुंगी पोचते !!! सलग एका ओळीत, एका मापाची अक्षरं लिहू शकणारे कमीच ! पानसेबाईंना फळ्यावर लिहिताना पाहूनच शिकलो की, पेनने वहीवर लिहिताना, पेन धरलेला हात आपण वहीवर टेकवतो पण फळ्यावर हात टेकवायचा नसतो .. फक्त खडू टेकवायचा आणि लिहायचं !

मला वाटतं पानसेबाई सगळ्या मुलांना खूप आवडायच्या त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्या प्रत्येकातलं वेगळेपण शोधायच्या, जपायच्या आणि जोपासायच्याही. माझ्यापुरतं सांगायचं तर पानसेबाईंनी बहुतेक लगेच ओळखलं की ह्याला अभ्यास करण्यापेक्षा पुस्तकं वाचायला आवडतं आणि धड्यातली उत्तरं पाठ करण्यापेक्षा भाषणाचं पाठांतर आवडतंय. वक्तृत्वस्पर्धा आणि नाटकांमधे भाग घेण्यासाठी त्यांनी सतत प्रोत्साहन दिलं. कधी त्यांना मोकळा तास असला तर स्वत: जरा आराम करण्याऐवजी नाटक, भाषण असली खुडबूड करणाऱ्या आम्हा पोरांवर मेहनत घेत बसायच्या.

मला आठवतंय त्या वर्षी शाळेच्या गॅदरिंगला त्यांनी मला ‘सिंहगडचा शिलेदार’ असं भाषण दिलं होतं. ते शिवाजी महाराजांच्या मावळ्याचं स्वगत अशा प्रकारचं होतं. भाषण पाठ करून घेणं आणि आवाजातले चढ-उतार ह्यावर शाळेत पानसेबाईंनी आणि घरी आईने जातीने लक्ष दिलं होतं. माझी आईसुद्धा शिक्षिका असल्याने शाळेत आणि घरीही शिक्षिकांचं जातीनं लक्ष होतं. आईनं खूप हौसेनं मावळ्याचा पांढरा ड्रेस, कमरेला शेला, खोटी तलवार, डोक्यावर आडवी पगडी वगैरे असं सगळं आणलं होतं. मिशीच्या जागी पेन्सिलने रेष काढली होती. कॉलेजमधे नंतर पुरूषोत्तम करंडक वगैरे केलं पण स्टेजमागच्या खोलीत मेक-अप करताना छातीचे ठोके आपसूक वाढण्याचा पहिला अनुभव म्हणजे ते मावळ्याचं स्वगत !

स्टेजवर गेल्यावर समोर बसलेले असंख्य चेहरे बघून पहिले काही सेकंद बोबडीच वळली ! सगळ्या चेहर्‍यांचा मिळून एक मोठ्ठा चेहरा समोरच्या अंधारातून आपल्याकडे बघतोय असं वाटायला लागलं !! शरीराचा तोल एका पायावरून दुस़र्‍या पायावर अशी अस्वस्थ चुळबूळ सुरू झाली, छातीचे ठोके माईकमधून सगळ्यांना ऐकू जातायत असं वाटायला लागलं, दोन्ही हाताच्या तळव्यांना दरदरून घाम..! भरीत भर म्हणून, पाठांतराच्या कप्प्यावर, मेंदूनं विस्मृतीचं आवरण घालून ठेवलं !! थोडक्यात म्हणजे फजितीची पूर्वतयारी झाली होती !!

अस्वस्थपणे भिरभिरत्या नजरेला विंगमधल्या पानसेबाई दिसल्या. त्यांच्यातल्या आजीने नेहमीचं, ओळखीचं स्मित दिलं. त्या नजरेतल्या विश्वासाने धीर दिला, हुरूप वाढला !! हिंदी सिनेमात कसं… मारामारी संपली की पाऊस थांबतो आणि स्वच्छ ऊन पडतं ना तसं काहीतरी डोक्यात झालं. समोर कुणीच दिसेनासं झालं आणि मोकळ्या जागेत शाळेतल्या खुर्चीवर बसून पानसेबाई नेहमीसारख्या भाषणाची तयारी करून घेतायत असं वाटलं. “आदरणीय शिक्षक आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो” हे भाषण सुरू करण्याआधीचे शब्द आठवले !(एकदम टिपीकल शाळकरी बरं का !!) त्यानंतर साधारण पाच मिनिटे माझ्यपुरतं घड्याळ थांबलं होतं..आपण काहीतरी बोलतोय एवढंच जाणवत होतं. मग आठवतोय तो एकदम टाळ्यांचा आवाज आणि पाठीवरून फिरणारा पानसेबाईंचा हात ! नेहमीसारखाच… आश्वासक नि अभिमानपूर्वक !! ‘भीड चेपणं’ किंवा ‘स्टेज फ्राईट जाणं’ ज्याला म्हणतात ना ते त्या दिवशी घडलं !

पुढच्या वर्षी चौथीत गेल्यावर शिक्षिका बदलल्या आणि पाचवीपासून तर माध्यमिक शाळा झाली. नंतर कधीतरी पानसेबाई जाता-येताना भेटायच्या पण मग त्या निवृत्तही झाल्या.

नवीन दिवस उगवताना जुने दिवस मावळत असतात. ‘एकदा पानसेबाईंना भेटून यायला हवं’ हा विचार खूपदा मनात यायचा पण त्याचा आचार कधी झालाच नाही. ‘शाळा सुटली, पाटी फुटली’ ! कॉलेज, मित्र-मैत्रिणी, करियरची तयारी, नोकरी … ठराविक टप्यांप्रमाणे वेग घेत गाडी चालू राहिली. एखाद्या स्टेशनवर घटकाभर थांबून पानसेबाईंची विचारपूस राहूनच गेली. काही वर्षांपूर्वी समजलं पानसेबाई गेल्या ! देवासारख्या आल्या होत्या, त्याच्याकडेच परत गेल्या !! मनातली बोच अजून तीव्र झाली !!

असं म्हणतात युधिष्टिराला यक्षाने विचारलं होतं की मनुष्याच्या जीवनातली सगळ्या विचित्र गोष्ट कुठली? युधिष्टिर म्हणाला की आपण एक ना एक दिवस मरणार हे माहित असूनही मनुष्य असा वागतो की जणू तो अमर आहे. गोष्ट अशीच काही आहे ना? चूकभूल घ्यावी पण मतितार्थ तोच. ‘एकदा पानसेबाईंना भेटून यायला हवं’ ह्यातलं ‘एकदा’ कधीतरी जमवायलाच हवं होतं.

एक वर्ष.. फक्त एकच वर्ष पानसेबाई मला शिकवायला होत्या पण काय देऊन गेल्या ते सांगता येत नाही ! बकुळफुलं ओंजळीत कितीवेळ होती ते महत्वाचं नसतं… मनात सुगंध दरवळतच राहतो !!!
---
गुरुपौर्णिमा - २००८
---

गुलमोहर: 

वा!
प्रत्येकाच्या बालपणी अश्या कोणी पानसे बाई किंवा बर्वे सर असतात की जे तुमचे बालपण व्यापून टाकतात.
त्यांचे स्मरण गुरुपौर्णिमेच्या दिवशी करणं म्हणजेच खरी गुरुपौर्णिमा
गोदेय

सही लिहिलेय रे संदीप! खूपच आवडले!

बकुळफुलं ओंजळीत कितीवेळ होती ते महत्वाचं नसतं… मनात सुगंध दरवळतच राहतो>>>>>>>>...
वाह !
मस्तच लिहिल आहे. Happy

सुंदर!

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

वा.. खूप आवडला लेख संदीप..! नऊवारी म्हटल्यावर मी जरा चमकलेच! कसं वाटत असेल न? खरंच आज्जी शिकवतीय असं वाटत असेल... आवडल्या पानसे बाई.. आणी लेख पण!!

छान लिहिलयस संदीप. आवडलं.
सध्या 'टीचर' नावाचे पुस्तक वाचतेय त्यात पण अशीच छोटी मुलं आणि त्यांच्या बाई आहेत, ज्या त्यांना कधीच मारत नाहीत की ओरडत नाहीत,
गोंधळ कमी करा सांगत नाहीत, प्रत्येकाला आवडेल असे सगळे करु देतात पण आंतरिक शिस्त मात्र लावतात, तुझ्या पानसेबाई पण अश्याच वाटल्या. Happy

संदीप आवडलं ललीतआणि पानसे बाई.

आपण एक ना एक दिवस मरणार हे माहित असूनही मनुष्य असा वागतो की जणू तो अमर आहे>>
अगदी खरं आणि आता हे वाक्य मनात जपून ठेवणार आहे.

तुझं लिखाण इथे न वाचता ब्लॉगवर वाचलं पण म्हटलं प्रतिसाद इथे द्यावा.
पानसेबाई आवडल्या आणि डोळ्यासमोर त्यांची मूर्ती उभी राहिली. अशा बाई तिकडच्या(इथेही सगळेच शिक्षक चांगले असतात असं नाही) शाळेत सर्वांनाच मिळाल्या तर मुलांना शाळा किती आवडू लागेल.

संदीप, सुंदर व्यक्तिचित्रण. असं कुणी किती काळ आयुष्यात येऊन जातं, ते महत्वाचं नाहीये. तू म्हणतोयस तस्सं... बकुळफुलांच्यासारखं... कारण मनाला लागलेले सुगंधाचे कण शरीरासारखे धुवून जात नाहीत नाही? कधीही तो कप्पा उघडला की दरवळ आहेच.
आणि ते युधिष्टीराचं अगदी अगदी.

संदिप.... मस्त लिहिलंय एकदम.. खुप आवडलं.

मला एकदम आमच्या कमल बापट बाई आठवल्या या वर्णनावरुन, अगदी अश्याच पण पाचवारी साडीतल्या.
दहावीचे वर्ग संपल्यावर आम्हा सगळ्याना घरी जेवायला बोलावले होते त्यानी.
खुप आवडायच्या त्या, पण शाळा संपल्यावर वाटायचे, त्याना कुठे आपण लक्षात असणार ? कसे भेटावे त्याना ?
पण त्यानी माझी हि समजून खोटी ठरवली.
दहावीनंतर तब्बल १५ वर्षानी, माझी वहिनी त्याना भेटायला गेली होती. ( त्या तिच्या नात्यातल्या म्हणून ), तर चौकशी करता करता, अगं मग तू दिनेशला नक्कीच ओळखत असशील, असे त्यानीच विचारले ? पूढे त्यांची अनेकवेळा भेट झाली.

पण एका आवडत्या गुरुला आपणही आवडलो होतो, हि सुखद भावना, अजूनही आयुष्य उजळतेय.

छान आहेत तुमच्या पानसेबाई आणि हा लेख पण. असे शिक्षक मिळणे जसे पुण्याचे तसे आयुष्यभर त्यांची आठवण जपुन ठेवणारे शिष्य पण पुण्याचेच Happy

खूप मस्त झालाय लेख! पानसे बाई आवडल्या.. वक्तृत्वाच्या आधीचे जे वर्णन केले आहे त्याला तोड नाही.. मी पण हे सगळे अनुभवले आहे. त्यामुळे ते ते अगदी तस्संच जाणवायचं असं आठवून खूप मजा आली. अंधारातला चेहरा.. माईकमधून ऐकू येणारे ठोके ..अगदी अगदी मस्त! आणि पुढे आपण नुसतंच काय काय बडबडतोय पण नक्की काय ते न जाणवणं!! बरोब्बर शब्दात पकडलंयस तू त्या वेळच्या डोक्यातल्या विचारांना!
एक ना एक दिवस मरणार हे माहित असूनही मनुष्य असा वागतो की जणू तो अमर आहे ह्यातलं ‘एकदा’ कधीतरी जमवायलाच हवं होतं>> खरंय!!
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
रोके तुझे कोई क्यूँ भला
संग संग तेरे आकाश है

मनापासून धन्यवाद ... मित्र / मैत्रिणींनो !
ह्या लेखाच्या निमित्ताने आपण सगळेच बालपणात रमलो ह्यात खूप काही मिळालं Happy

संदिप,
खुप छान लिहिलयस. आवडल.

छान आहे...आवडल

खूप छान... मला सर्वात आवडले ते त्यांचे मुलांची तंद्री भंग न करता त्याना वर्गात मनाने परत आणणे. मला अजूनही कॉलेजपेक्षा शालेय जीवनच खूप जवळचे वाटते.

पानसे बाई खुप आवडल्या संदीप. तू छानच उभं केलं आहेस त्याचं व्यक्तिचित्र. प्रार्थमिक शाळेच्या आठवणी आल्या.. खरचं तेव्हाचे शिक्षक, वर्गसोबती ह्याच्या आठवणी एक हळवा कोपरा असतो. आजही गुरुपौर्णिमेला पहिली आठवण मला माझ्या बालवर्ग आणि पहिलीच्या बाईंची येते..

संदीप छान लिहिलयस.
तुझ्या पानसे बाईंसारख्याच मला माझ्या 'कापसे बाई' आठवल्या..

बकुळफुलं ओंजळीत कितीवेळ होती ते महत्वाचं नसतं… मनात सुगंध दरवळतच राहतो !!!>>>
सुंदर!!

सुरेख लिहील आहेस रे Happy
जुना अल्बम, जुनी संदूक आणि जुन्या आठवणी काढताना खूपच छान वाटत ना रे Happy आपल स्वतःच अस काही तरी असत त्यात Happy

माझ्या ४ थी च्या कदमबाईन्चीच आठवण झाली बघ.

मस्त लिहीले आहेस संदीप. एकदम आवडले.

सन्दिप मस्तच!! खुप आवडलं.

kai surekha lihilay! amachya shaletalya mahajanbainchee athavan alee. Magachya bharat vareet tyana avarjoon bhetoon ale hote ani khoop masta vatale hote.

sorry can not type in maarthi... pan bhavana pohachavyat ase vatale mahnoon type karaety.

पानसेबुवांची रिक्षा ?
दिवाळीअंकाच्या रिक्षेनंतर पाअसेबाइंच्या रिक्षात बसलो आम्ही. आता बजेट संपलं.
लिखाणाचा कारखाना काढला तई वाचनाचा नाही काढता येत Lol

Pages