पानसे ***** आहे

Submitted by बेफ़िकीर on 18 May, 2012 - 05:41

"पानसे आला का रे?"

कर्माने म्हणजे पानसेच्या बॉसने आपल्या दुसर्‍या सबऑर्डिनेटला मध्याला विचारले

"पानसे कुठला येतोय? गल्लीतली म्हातारी मेली असेल एखादी"

मध्याने वर न बघताच कर्माला निरुत्तर केले. करमाळकर सिनियर मॅनेजर होता. मध्या सिनियर ऑफीसर आणि पानसे बार्गेनेबल कॅटेगरी, म्हणजे वर्कर, पण मार्केटिंगमध्ये कामाला. त्याच्यामागे युनियन, त्याला हात लावणे फक्त 'व्हीपी अ‍ॅन्ड अबोव्ह' ला शक्य. बाकीच्यांनी त्याला फक्त झापणे शक्य.

पानसे ऑफीसचे टायमिंग पाळायचा नाही. ऑफीस त्याचे टायमिंग पाळायचे. पानसे आला याचा अर्थ पानसे आला असा व्हायचा. पानसे येणार आहे, पानसे येऊ शकेल, पानसे येणार होता, पानसेला आज यावे लागेल आणि पानसे येताना दिसला या वाक्यांना झाट अर्थ नाही हे नीलायम ऑटो कंपोनन्ट्समधल्या टुकार सप्लायरलाही माहीत होते.

आणि पानसे आला.

पानसे आला आहे ही नीलायममधील बातमी होती.

पानसे आला आणि ऑफीस चूपचाप झालं. आता कर्मा पानसेला धुणार हे सगळ्यांना माहीत होतं. साडे अकरा वाजलेले होते. पानसे काल तर आलाच नव्हता. आज वेळेवर यायच्याऐवजी साडे अकराला आला होता आणि कोणाहीकडे न बघता स्वतःच्या खुर्चीवर बसून टेबलवर डबा ठेवून त्यातला अर्धा डबा त्याने खाल्ला.

डबा अर्धा खाऊन झाल्यावर हात धुवून तो पुन्हा येऊण बसला की मग त्याच्याशी बोलण्यात अर्थ आहे हे प्रत्येकाला माहीत होते.

तो हात धुवून येऊन बसला आणि कर्माकडे ढुंकून न बघता मध्यालाच डायरेक्ट म्हणाला..

"म्हैंद्राचं स्मॉल एन्ड काढलं का रे?? च्यायला माझ्या घरी फोन त्यांची लाईन बंद पडली म्हणून.. बायको असली वैतागली.. म्हणाली फेकून द्या तो फोन रस्त्यावर"

मध्याने कर्माकडे पाहिले. ऑफीसमधील प्रत्येकाने दुसर्‍या कोणा ना कोणाकडे पाहून शेवटी कर्माकडे पाहिले. आता कर्मा आऊट झालेला होता. पण आवाज संथ आणि खाली ठेवत त्याने विचारले.

"पानसे.. काल कुठे होतास तू?"

"डुक्कर मधे आलं... मधलं बोट गाडीखाली सापडलं... आज येणारच नव्हतो..."

उत्तर ऐकून कर्मा पेटलेला होता, पण तसे दाखवले नाही त्याने. हे नवीन उत्तर होते. प्रकारच नवीन होता उत्तराचा.

"डुक्कर कसं मधे आलं???"

"त्याच्यावर आपला काय कंट्रोलेक्का?"

"पण हे कुठे झालं?"

"काल सकाळी ऑफीसला येताना.. बर्वे होता की तिथे..."

"कोण बर्वे?"

"मोगरा नाक्यावरचा चहावाला"

"त्याचा काय संबंधय? तो काय मला सांगणारे तुला डुक्कर चावलं हे?"

"चावलं? चावलं नाही मधे आलं..."

"पण मग तू पडलास का?"

"फुल्ल आडवा.. गाडी चालूच... माझा पंजा हॅन्डलखाली.. पब्लिक धावलं... डुक्कर तर तीरासारखं धावलं"

"हे तू काल फोन करून का नाही सांगितलस??"

"आज येणारच होतो... म्हणलं आजच सांगू..."

"आणि कालची कामं कोणी करावीत असं तू ठरवलेलं होतंस मनातल्या मनात?"

"काल काय काम होतं?? स्मॉल एन्ड तर काढायचं होतं... "

हे मात्र कर्माला पटलं. काल खरंच स्मॉल एन्ड काढणे सोडले तर पानसेला काही कामंच नव्हतं.

"बरं आत्ता स्मॉळ एन्ड काढ आणि लेलँडचं बुश काढ तीन हजार... पेमेंट आलंय..."

"लेलँडचं बुश नाही काढणार आपण.. "

"का?"

"अहो तीस दिवसांनी पैसे द्यायचे ते नव्वद दिवसांनी देतायत... आपणही शिकवूकी त्यांना..."

कामाच्या संदर्भात 'कम अ‍ॅक्रॉस' होणारे कस्टमर्स वगैरे हे पानसेचे वैयक्तीक शत्रू असायचे. कर्मा काही निर्णय घेऊ शकेल यावर त्याचा फारसा विश्वास नव्हता.

"मी सांगितलंय आज तीन हजार पाठवतोय म्हणून.. एक पेमेंट आलेलंय... तू काढ बुश"

पानसेने बोट वर केलं. त्याला बॅन्डेज होतं.

"काय?"

"बोट गेलंय... डी ओ मला नाय काढता येणार..."

आता पर्यायच नव्हता. हा आला कशाला ते समजत नव्हतं. कर्माने नेहमीचा उपाय म्हणून मध्याला डोळे उडवून खुण केली.

पानसे 'आलो' असे म्हणून पलीकडच्या गच्चीकडे निघाला. आता तो अर्धी विल्स ओढणार हे डिपार्टमेंटच्या प्रत्येकाला समजले.

मध्याने पहिले पानसेचे काम करायला घेतले. नाहीतर कर्मा त्यावरून बोलला असता. पानसे गेलेला पाहून मध्या कर्माला हळूच म्हणाला

"पानसेचं वाढलंय हां कर्मा"

तेथे फक्त जी एम अ‍ॅन्ड अबोव्ह साहेबांना साहेब म्हंटले जायचे. सगळे तेथे दशकानुदशके असल्यामुळे त्यांच्यातीलच कोणी ना कोणी वर पोचलेले होते, त्यामुळे बरेचजण बहुतेकांना नावानेच हाक मारायचे.

कर्माने मध्याच्या स्टेटमेन्टवर नुसती मान हालवून काहीतरी पुटपुट केली आणि आलेला कॉल उचलला.

तास दिड तास झाला तरी पानसे दिसला नाही याचा अर्थ तो प्लँटमध्ये चकाट्या पिटायला गेला असणार हे सगळ्यांना माहीत होते.

पानसे दुपारी साडे चारला वर आला. पावणे पाचला ऑफीस सुटायचे. पानसे चार चाळीसला पॅकिंग करायला घ्यायचा.

त्याला पाहून भडकलेला कर्मा ओरडला..

"पानसे... डिपार्टमेन्टला बसायला काय प्रॉब्लेम असतो तुला? कुठे भटकत होतास?"

"मारुती रिजेक्ट झालंय खाली.. सॉर्ट करत होतो..."

कर्मा आणि मध्या जागचे उडाले

मारुती रिजेक्ट झाले याचा अर्थ मारुती आता खरंच एस ओ बी काढून घेणार आणि काँपिटिटरला देणार

आपल्याला उगाच वरून बांबू... मारुती रिजेक्ट झाले????

ह्या भडव्याने खालून फोन करून का सांगितले नाही?

"पानसे? सांगितले का नाहीस मला?"

"मेल केलीय की?"

बोट गेलेल्या माणसाला डी ओ काढता येत नाही आणि मेल कशी केली याने? आणि खालून वर इन्टरकॉम असतान मेल का केली? आणि आपण मेल पाचनंतर बघतो हे याला माहीत आहे म्हणून याने मुद्दाम मेल केली का? अनेक चिडचिड निर्माते प्रश्न कर्माच्या मनात येत असतानाच त्याने मेल तपासली. तो मेल पावणे पाच नंतर तपासायचा कारण तो पर्यंत नुसती प्रेझेन्टेशन्स, बॉसेसना उत्तरे आणि कस्टमर्सचे कॉल्स चालू असायचे. अगदीच काही पेटलेले असले तर मेल तपासली जायची. आणि कर्माला आठवत होते की अर्ध्याच तासापूर्वी त्याने मेल तपासलेली असताना मेल नव्हती. आपण डी ओ साईन करण्यात वेळ फार घालवतो असे कर्माला उगाचच वाटू लागले. रिफ्रेश केले तर दिसले की पानसेची मेल आहे. 'मारुती लॉट रिजेक्टेड'

मेल अशी होती:

डिअर कर्मा

मारुती रिजेक्टेड २३० पार्ट्स. आय सॉर्टेड. नाऊ क्लीअर. प्रॉब्लेम इन फायनल फिनिशिंग. १६ मायक्रॉन्स. टेल बन्या. रिगार्ड्स. पानसे.

टेल बन्या म्हणजे काय? बन्या म्हणजे क्वॉलिटीचा ए व्ही पी होता, निनाद बनकर नावाचा. पानसे कर्माला म्हणत होता की बन्याला तू सांग. हाच ऑर्डरी सोडतोय.

"पानसे, फोन का नाही केलास?"

" सॉर्टिंग मलाच करायला सांगितले असतेस ना? "

हे उत्तर देताना पानसेने पिशवी खांद्याला लटकवली होती.

पानसेने काम पूर्ण करून मग कळवले आहे याचा राग मानायचा की त्याला शाबास म्हणायचे कर्माला समजेना.

"मी अत्र्यांना सांगतो"

अत्रे म्हणजे कर्माचा बॉस. तोही एव्हीपी. एवढा मोठा प्रॉब्लेम त्यांना समजायलाच हवा होता. तर पानसेने अत्रेची जाहीर लाज काढली.

"अत्रे इमेलवर विचारेल हाऊ इट हॅपन्ड... त्याला काय कळतंय मेकॅनिकल?"

पिशवी हालवत पानसे निघून जाताना हे वाक्य बोलला. डिपार्टमेन्टची तेरा माणसे वजा कर्मा वजा मध्या हासली.

कर्माने उच्च इंग्लिशमध्ये इमेल लिहिली. अ‍ॅड्रेस्ड टू निनाद बनकर आणि कॉपी टू अत्रे प्लस अनेक जण इन्क्ल्युडिंग मध्या आणि पानसे. मारुती हा कस्टमर खरा तर मध्याचा असल्यामुळे मध्या पहिला स्टोअर्सला धावलेला होता.

स्टोअर्सला मध्याला समजले की पानसेने एकहाती पार्ट्स सॉर्ट केले. मायक्रोमीटर साल्याने कसा पकडला असेल हे मध्याला समजेना. त्याने वर फोन करून कर्माला हे सांगितले.

पानसेच्या बाबतीत इतरांचा प्रॉब्लेम असा व्हायचा की त्याला प्रचंड शिव्या द्यावाश्या वाटूनही देता यायच्या नाहीत.

पानसे निवांत निघून गेल्यानंतर अत्रे, कर्मा, मध्या, निनाद बनकर आणि इतर काही जण यांच्यात तुफान फोनाफोनी आणि इमेलबाजी झाली. चूक दुसर्‍यावर ढकलणे आणि स्वतःचा स्कोअर करणे यात सर्वांचे दिड दोन तास गेल्यावर वर व्हीपींना ही न्यूज अत्रेंनी कळवली. मार्केटिंगचा शश्प संबंध नसून व्हीपी सर्वांवर समान भडकले आणि त्यांनी दिल्ली ऑफीसला फोन करून मारुतीला यावेळी २३० पार्ट्स कमी मिळतील हे सांगायला आणि त्यांचा राग शांत करायला सांगितले.

हे सगळे झाल्यानंतर कर्माच्या लक्षात आले की वेळच्यावेळीच जर पानसेने हा प्रॉब्लेम आपल्याला सांगितला असता तर मध्याला खाली जाऊन सॉर्टिंगमध्ये किमान सहभागी आहोत असे दाखवायला लागले असते आणि मध्याचे स्वतःचे आणि तो करत असलेले पानसेचे काम राहिले असते. पानसेचे उपकार दोघांच्याही लक्षात संध्याकाळी साडे सात वाजता आले ते एका चहाच्या टपरीवर. पण पानसे हे रसायन असे होते की त्याने उपकार केले हे समजूनही दोघे त्याला शिव्याच देत होते. वास्तविक प्रॉडक्शन आणि क्वॉलिटीने सॉर्टिंग करायला हवे होते, पण ते लोक त्यांच्या कामात व्यस्त असलेले पाहून पानसेने स्वतःच त्यांना 'मी करतो हे' असे सांगितले होते.

"मादरचोत आहे पानसे' या कर्माच्या विधानावर मध्याचेही एकमत झाल्यावर दोघे आपापल्या घरी निघाले.

==========================

सलग आठ दिवस पानसे कामाला आला. आला खरा, पण बिड्या फुंकणे, गुटखा खाणे आणि प्लँटमध्ये छाती पुढे काढून फिरणे, कारण सॉर्टिंग केले होते ना, या व्यतिरिक्त त्याने काही केले नाही. त्याच्या वाटच्या कस्टमर्सच्या डी ओ तेवढ्या सकाळी साडे दहाच्या हात स्टोअर्सला पोचवायचा आणि तर्गो करून फिरायचा. त्याचे आणि मध्याचे डी ओ स्टोअरला देण्याच्या टायमिंगवरून वाजले. त्याचे असे झाले की अत्रेंना स्टोअरने ईमेल केली की डी ओ आमच्याकडे वाट्टेल तेव्हा येतात आणि आम्ही डिसपॅच करायचा होय? दुपारी एक च्या आत डी ओ पोचल्या पाहिजेत. मध्याकडे जास्त कस्टमर्स असल्याने त्याच्या डी ओ दुपारी अडीचच्या सुमारास पोचायच्या. पानसे स्वतःच्या चिमूटभर डी ओ सव्वा दहाला पोचत्या करून इकडे तिकडे फिरू लागायचा. यालाही मध्याची हरकत नव्हती. पण एकदा पानसे सर्वांदेखत म्हणाला की मध्याच्या डिलीव्हरी ऑर्डर्स होतात त्यावेळात दहा बायकांची डिलीव्हरी होऊ शकेल. झालं, खरे तर कर्माही हासला. पण नीट हसू शकला नाही. मध्याने आग्यावेताळाचे स्वरूप धारण करून दहा मिनिटे पानसेची तासली तर पानसे खदाखदा हासतोय. मध्याची बडबड डिपार्टमेन्टच्या हासण्यात विरून गेली. त्या संध्याकाळी मध्या चहासाठी कर्माबरोबर थांबला नाही.

दुसर्‍या दिवशी मध्याने काही कारणाने रजा काढली तर सव्वा दहा वाजता पानसेने दोघांच्याही डी ओ तयार केल्या आणि सहीसाठी कर्मापुढे टाकल्या.

"पानसे... आज मध्याच्याही आहेत हां डी ओ..."

"घेतल्यात की ह्याच्यात???"

" झाल्या????"

" मग त्याला किती वेळ लागतोय???"

डिपार्टमेन्ट वाट पाहात होते. कर्मा त्या मध्याच्या डी ओ मध्ये काहीतरी चूक काढेल. स्वच्छ, अचूक डी ओ होत्या. कर्माने मुकाट सही केली.

"पानसे ... सुंदरमचं पत्र आलंय... "

" फेकून द्या... "

पलीकडचे सेक्रेटरीएटचे लोकही अवाक झाले.

कर्मामध्ये अजून थोडा जीव होता.

"कन्फॉर्मन्स मागतायत..."

"आधी तीस दिवसात पैसे द्या म्हणाव... कन्फॉर्मन्स गेला *********"

पानसेला शिव्यांमध्ये काही वाटायचेच नाही.

कर्माने सुंदरमचे पत्र स्वतःच्या ड्रॉवरमध्ये घुसवले. नंतर बघू ही पॉलिसी त्याला बरी वाटली त्या पत्राबाबत.

तर पानसे स्टोअरच्या नारळीकरवर ओकला.

"त्या नारळीकरला म्हणाव अडीचच्या आत डी ओ पाहिजेत ना? मग साडे दहाच्या आत डी ओ दिल्या तर दुपारी एकच्या आत डिसपॅचची आई घालून संपली पाहिजे"

"काय बोलतोस पानसे?"

"म्हणजे??? हे तुम्ही लिहायला पाहिजेत अत्र्यांना..."

पानसे कोणालाही कामे शिकवायचा.

कर्माला मात्र मनोमन ते पटले. त्याने खरंच एक ईमेल खरडली अत्रेच्या नावाने.

'डिअर सर,

वुई हॅव्ह बीन गिव्हिंग द डी ओ ज इन द टाईम लिमिट मेन्शन्ड बाय द स्टोअर्स. वुई अल्सो हॅव अ रिक्वेस्ट दॅट इफ द एन्टायर सेट ऑफ डी ओ ज इज अ‍ॅव्हेलेबल विथ स्टोअर्स बाय इलेव्हन ए एम, द डिसपॅचेस शूड बी इफेक्टेड अ‍ॅन्ड ओव्हर बाय टू पी एम.

थॅन्क्स अ‍ॅन्ड रिगार्ड्स

पी एन करमाळकर'

कॉपी नारळीकरला होती. नारळीकर ती मेल वाचून उसळला आणि त्याने वर कर्माला फोन केला.नारळीकर सिनियर होता. कर्माने फोन उचालयच्या आत तो पानसेने उचलला.

"पानसे... कर्मा कुठे आहे?"

"आहे की इथे... काय झाले??"

"फोन दे कर्माला..."

"काय झालं काय?"

"तुला काय करायचंय??"

"मेल घुसली का?"

डायरेक्ट विचारले पानसेने. नारळीकर क्षणभर अवाक झाला. मग म्हणाला...

"पानसे.. तोंड सांभाळत जा... "

"काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा.... अहो असिस्टंट जी एम आहे ना तुम्ही?? त्या गोखले आणि पाटलाला लावा की धक्क्याला?? म्हणाव आल्यायत डी ओ वेळेवर... आता करून दाखवा म्हणाव डिसपॅच.. तुम्ही तोंडाला येईल त्या मेला पाठवताय अत्रेला.. ते चालतं का? मी होतो स्टोअर्सला तेव्हा साडे बाराला आम्ही गोट्या खेळायला मोकळे व्हायचो.... आपापल्या"

नारळीकरने फोन आपटला. या भाषेत कर्मा आयुष्यात नारळीकरशी बोलू शकला नसता.

तेवढ्यात खुद्द अत्रेचा त्या ईमेलवर रिप्लाय होता, अ‍ॅड्रेस्ड टू नारळीकर अ‍ॅन्ड कॉपी टू कर्मा. थेट लिहिलेले होते, नारळीकर, प्लीज एन्शुअर डिसपॅच टेक्स प्लेस बाय टू पी एम अ‍ॅन्ड कन्फर्म टू मी.

.......खलास

या दिवशीचा डिसपॅच अगदी दोनला नाही, पण पावणे तीनला उरकला. नारळीकर स्वतः उठून मागे लागला होता. नंतर त्याने ईमेल केली अत्रेला, कॉपी टू कर्मा. अत्रेचा रिप्लायही आला, 'गुड' म्हणून.

त्या संध्याकाळी चहा प्यायला कर्माने पानसेला थांबवले होते टपरीवर. 'मध्या मादरचोत आहे, पटापट डी ओ करत नाही' असे दोघांचे एकमत झाल्यावर दोघे निघून गेले आपापल्या घरी.

============================

अत्रेने इतके तडकून कधी पानसेला केबीनमध्ये बोलावले नव्हते. त्यात पुन्हा कर्मा तिथे असून कर्माशिवायच पानसेला बोलावले. पानसे निवांत बिडी फुंकून झाल्यावर निघाला

"पानसे, तुला मी एकशे दहा इमेल्स केल्यात आत्तापर्यंत... तुझे एकही उत्तर नाही...व्हाय? प्लीज एक्प्लेन"

"साहेब... मी प्रत्येक इमेलबाबत कर्माशी बोललो आहे आणि कर्माला सगळे सांगितले आहे.."

"तुला मी इमेल पाठवतोय आणि तू कर्माला सांगतोयस?"

"साहेब... मागे एकदा मी तुम्हाला उत्तर दिले तेव्हा कर्मा म्हणाला मला आधी सांगत जा... मी त्यांना सांगत जाईन....."

"एस्कॉर्टची एन्क्व्यारी एम ई ला कशी काय गेली? तुला माहीत नाही डेव्हलपमेन्ट सेलला पाठवायचे??"

"पाठवली की?"

"त्यांना कॉपी गेलीय... ओरिजिनल एम ई ला गेलीय..."

"त्यानं काय फरक पडतोय??? "

"डोन्ट आस्क मी... क्वेश्चन्स"

"अहो साहेब राजेसाहेबांना कॉपी मिळाल्यावर ती ओरिजिनल आहे का काय आहे याच्याशी काय मतलब आहे त्यांना? डेव्हलपमेन्टची प्रोसेस कॉपीवरून करता येणार नाही का?"

"पानसे... यू कान्ट बी आस्किंग क्वेश्चन्स टू मी... आर यू गेटिंग मी???"

अत्रे वाईट सरकलेले होते.

पानसे वेगळ्या टोनमध्ये आला ते पाहून. अगदी खासगीत बोलावे तसे...

"साहेब मी सांगू का? राज्यांना आता डेव्हलपमेन्टचे लोड झेपतच नाही... आमचा कमिन्सचा पिव्हट आठ महिने रेंगाळलाय.... त्यामुळे ते असली कारणं सांगतात.. मला सांगा साहेब..कॉपीवरून प्रोसेस सुरू करायला फक्त त्यांचा इगोच आड येतोय ना? आणि मी कुठे फॉर्वर्ड करायचे असते हे काही??? हे कर्मा करतो... त्याने मला दोन ठिकाणी पाठवायला सांगितले आणि मी एकीकडे ओरिजिनल आणि एकीकडे कॉपी पाठवली..."

"लेलँडच्या पेमेंटचे काय झाले?"

"मी सांगतोय सप्लाय थांबवा तर बुश पाठवत बसलेत..."

आता अत्रेंचा आवाज टीपेला गेला...

"तू इथे हुकूम सोडायला नाहीयेस...पेमेंटचे काय झाले याचे उत्तर दे..."

"सोळा लाख आले की परवा?"

"बास झाले तेवढे तुला???? तेवीस लाखाचे आऊटस्टँडिंग आहे... "

"साहेब माझं म्हणणंच कोणी ऐकून घेत नाही... त्यांना आपण बुश पाठवले नाही तर नाक दाबून तोंड उघडते तसे ते पैसे पाठवतात की नाही बघा...मी मोजून सात दिवस बुश पाठवले नाही म्हंटल्यावर त्यांचे मोठे साहेब माझ्याशी बोलले.. त्यांना मी तोंडावर सांगितले एकरकमी चोवीस लाख रिलीज झाले तर तीन हजारचा लॉट धाडतो... तेव्हा सोळा लाख निघाले"

अत्रे थिजले होते. अशोक लेलँडच्या सप्लाय चेनचा जी एम हा खर्‍या अर्थाने मोठा माणूस समजला जायचा. त्याचे नांव रामचंद्रन. अत्रेंनी त्याला दोन तीनदा डिनर ऑफर केलेले होते. रामचंद्रनच्या हातात सत्ता होती. पानसे अचाट होता. त्याने रामचंद्रनला हे उत्तर दिलेले असणार यात अत्रेंना काहीही संशय वाटत नव्हता. नाहीतर तसेही आत्तापर्यंत लेलँडकडून सोळा लाख एकरकमी कधीच निघाले नव्हते. आणि ते सोळा लाख आणून ओव्हरड्यू कमी केले म्हणून कर्मा सगळीकडे पाठ थिपटून घेत होता.

"तू बोललास रामचंद्रनशी???"

"रामचंद्रन काय करणारे साहेब?? मी मूर्तींशी बोललो...."

अत्रे सपाट

मूर्ती हे रामचंद्रनचेही बॉस होते. आधी त्या माणसाने या पानश्याला का फोन करावा हे अत्रेंना समजेना. आणि पानश्याने मूर्तीला खडसावले म्हंटल्यावर हात जोडणे शोभणार नाही म्हणून अत्रे नुसते बघत बसले पानसेकडे. एका दिवसात त्या मूर्तींनी तिसराच सप्लायर उभा करून निलायमला गुडघ्यांवर आणले असते. आणि पानसे त्यांना म्हणतोय एकरकमी चोवीस लाख आले नाहीत तर बुश विसरा.

"पानसे... तू जागेवर जा..."

अत्रेंना यापेक्षा अधिक बॉसगिरी करणे जमलेच नाही... पानसे स्वतःच्या केबीनमधून बाहेर पडावे तसा इकडे तिकडे बघत बाहेर पडला.

बाहेर पडला तो पर्चेसला गेला आणि ओजळेला म्हणाला ...

" स्टील तुझा आजा आणणार का? प्रिमियर बोंबलतोय दिड महिना... कामं करा कामं..."

ओजळे पानसेकडे ढुंकूनही न बघता स्वतःच्या पीसीत डोके घालून बसला. पानसे म्हणत होता ते खरे होते. प्रिमियरला लागणारी शीट्स आलेलीच नव्हती दिड महिना. आणि अजून काही दिवस आली नाहीत तर ओजळे व्हीपींच्या केबीनमध्ये बसलेला आढळला असता. पण पानसेशी बोलणे म्हणजे ... जाऊदेत...

ओजळेची पी ए स्वाती हसू दाबत होती. ओजळेचा त्या डिपार्टमेन्टमध्ये असलेला दरारा गुटख्याच्या एका सुस्कार्‍यात उतरवत पानसे एम ई कडून डेव्हलपमेन्ट सेलला गेला.

राजे चष्मा लावून कागद तपासत बसले होते. एक नंबरचा हरामखोर माणूस स्वभावाने

पानसे बिनद्क्कत दार उघडून त्यांच्यासमोर येऊन बसला तशी त्यांनी त्यांच्या पानाची पिंक कचर्‍याच्या बादलीत नेम धरून उतरवत डोळे आणि घशाच्या शिरा ताणून खर्जातल्या आवाजात पानसेला विचारले..

"भडव्या.. एस्कॉर्टची एन्क्वायरी कोणाला पाठवायची समजत नाही का?"

"कामं टाळायचीयत तुम्हाला... दुसरं काही नाही.. जसं काही ओरिजिनल आली असती तर दुसर्‍या दिवशी कॉम्पोनन्ट देणार होतात अत्रेंना... काय सांगता राजे.. वय काय.. पोझिशन काय... वागता काय.."

"यू?.... यू गेट आऊट..."

"चाललोच आहे... पण पुन्हा पोरकट कंप्लेन्ट केलीत तर मुलगी कोणाबरोबर कधी आणि कुठे पळाली ते शॉपमध्ये खडूने लिहून ठेवीन...."

राजेचे भरीत झाले होते.

आपल्या दिवटीचे या भुताला कसे कळले या विचारात राजे अवाक होऊन बघत असताना दार फडाडकन त्यांच्या तोंडावर आपटून पानसे क्वॉलिटीकडे निघाला होता...

क्वॉलिटीचा झंवर त्याला 'तुला कर्माचा कॉल होता' म्हणाला..

पानसेने निवांत कॉल केला कर्माला इन्टरकॉमवर...

"हां पानसे बोलतोय..."

"पानश्या..."

कर्माचा आवाज टीपेला पोचला होता..

"काय झालं?"

"रेल्वेचं टेंडरच भरलं नाहीस तू???"

" मिळतं काय त्याच्यात? पैसे चारून दोन टक्के मिळतात.. त्याच्यासाठी एवढी झवझव...????"

"पानसे... ताबडतोब व्हीपी ब्लॉकला ये..."

आज पहिल्यांदाच पानसे चरकला. वर्मांसमोर बसायचं म्हणजे तोंडाला गुटख्याचा वास येता कामा नये हे त्याच्या लक्षात आलं. त्याने भराभरा चुळा भरल्या आणि तोंडावर सपकारे मारून धावत्या चालीने अ‍ॅडमीन ब्लॉकला पोचला.

दाराशीच कर्मा उभा होता. कर्मा एकटा नव्हता. त्याच्याबरोबर अत्रेही तिथे उभे होते. पानसेने रेल्वेचे एक टेंडरच भरले नव्हते मोठे. जनरल आपलं त्याने स्वतःच ठरवलं होतं की रेल्वेच्या बिझिनेसमध्ये काही मिळत नाही. आणि रॉ मटेरिअल येऊन पडलेले होते. टेंडर न भरताच. वर्किंग कॅपिटल या महिन्यात घुसणारच होते.

अत्रे आणि कर्माचे चेहरे हिंस्त्र झाले होते. ते पानसेकडे असे बघत होते की याला आता आत जाऊन बाहेर आलो की हाकलूनच द्यायचे.

वर्मांच्या पीएने तिघांना आत बोलावले. आत गेले तर आतला गारवा जितका प्लेझंट होता, गालिचा जितका सुखद होता तितकाच वर्मांचा चेहरा 'कोल्ड'! अत्यंत कोल्ड.

सगळे बसले. वर्मांनी अत्रेंना विचारले.

"व्हाय डिड यू नॉट फिल द टेंडर??????"

वर्मांच्या आवाजात दुसर्‍याला तुच्छ लेखण्याची आणि दुसर्‍याला त्याची कसलीच पात्रता नाहीये हे दाखवण्याची शुद्ध इच्छा व्यक्त होत होती.

"सर.. वुई अवरसेल्व्ह्ज आर शॉक्ड... इट्स डेलिगेटेड टू धिस गाय... ही जस्ट डिडन्ट डू इट..."

वर्मांनी पानसेकडे दगडी थंडपणाने पाहिले आणि पुन्हा अत्रेला विचारले.

"त्याने ते केले नाही आणि तुम्हाला दोघांना आज जाग आली..."

"सर मी ट्रॅव्हल करत होतो... आणि कर्मा ऑडिटमध्ये होता... "

"म्हणजे तुम्ही ह्याला विचारलेच नाहीत की टेंडर भरलेस की नाही...."

"सर तो दर वर्षी भरतोच... म्हणजे आम्हाला अशी काही शंकाच आली नाही... "

आता वर्मांची नजर पानसेच्या डोळ्यांमध्ये घुसली... क्षणभरच चरकलेला पानसे त्याच्या नेहमीच्या बिनधास्त मूडमध्ये यायला दोन एक क्षण गेले तेवढेच...

"काय रे??? टेंडर का भरले नाहीस??? "

पानसे नुसतेच बघत राहिला. उत्तर द्यावे की नाही हेच त्याला समजत नव्हते.

"तुझा मेमो काढू का मी आता? रेल्वेतला एक्झिस्टन्स एक वर्ष गेला तर काय होईल काही माहितीय का तुला?"

"सर रेल्वेचं काम आपण नको करायला... "

पानसेचा आत्मविश्वास पाहून अत्रेसुद्धा अंतर्बाह्य हादरला. कर्मा तर व्हीपींकडेही बघत नव्हता आणि पानसेकडेही.

पण तो आत्मविश्वास पाहून वर्मा मात्र एकदम भानावर आले. असले उत्तर त्यांना आजवर कोणीच दिलेले नव्हते.

"का? का नको करायला?"

"सर कॉस्टिंग तुम्ही बघताच... दोन टक्के ऑन पेपर मिळतात... पण त्यातले सस्पेन्स अकाऊंटमध्ये सव्वा टक्का जातात एन्टरटेन्मेन्टखाली त्या रेल्वेवाल्यांच्या... अर्धा पाऊण टक्क्यांसाठी एक्स्पोर्टची डेव्हलपमेन्ट थांबवायची आणि रेल्वेत एक्झिस्टन्स आहे हे मिरवायचे यापेक्षा ते स्टील जनरल मोटर्सला वापरले तर तीस टक्के प्रॉफिट आहे..."

वर्मांनी लॅपटॉपवरची आपली बोटे बाजूला करून तो लॅपटॉप स्टॅन्डबायवर टाकला आणि अत्रेकडे बघत म्हणाले...

"इफ इट इज नॉट दॅट ल्युक्रेटिव्ह देन डोन्ट डू इट अत्रे????"

"येस... येस सर... शुअर.."

"फोकस ऑन एक्स्पोर्ट"

"शुअर सर..."

विद्वान पानसे आपल्या दोन्ही वरिष्ठांबरोबर निवांत चालत बाहेर आले. आत्ता एक मिनिटापूर्वी आत कोणता विषय झाला हे जणू माहीतच नसल्याप्रमाणे कर्माकडे बघत म्हणाले..

"मी उद्यापसून तीन दिवस नाहीये हां कर्मा.. दोन्ही पोरी मामाकडे चालल्यात.. हिला म्हंटलं तिसरा हनीमून करू"

हनीमून असे तोंडी कारण देऊन रजा काढणारा पानसे हा निलायम कंपोनन्ट्समधला एकमेव कर्मचारी ठरला.

त्या दिवशी संध्याकाळी अत्रेंच्या केबीनमधून चहा घेऊन कर्मा बाहेर पडत होता तेव्हा त्याचे आणि अत्रेंचे एकमत झाले होते की पानसे मादरचोत आहे.

=============================

रुमाले कर्मासमोर बसला होता. मध्या आणि डिपार्टमेन्टचे सगळेजण तिथे जमले होते. रुमाले पानसेच्याच गल्लीतला आणि निलायममध्ये वर्कर होता...

"ब्लड जात होतं साहेब उल्टीतून कैक दिवस... बोलला नाही... अ‍ॅडमीट झाला... तीन दिवस होता.. आय सी यू मध्ये.. सिरियसच होत गेला... आज सकाळी एक्स्पायर झाला.. पोरींचा आणि वहिनींचा आक्रोश पाहावत नाहीये सर... "

मध्या आणि कर्माच्या डोळ्यातल्या धारांबरोबर सगळ्याच डिपार्टमेन्टच्या डोळ्यांमध्ये ओल आली होती.. आणि सगळ्यांच्या तोंडात त्या तीन शब्दांपैकी दोन शब्द तेच राहून एका नव्या शब्दाला घेऊन येत होते... 'आहे' ऐवजी 'होता' हा तो नवा शब्द...

'पानसे मादरचोत होता'

=========================================

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

छान Happy

"चाललोच आहे... पण पुन्हा पोरकट कंप्लेन्ट केलीत तर मुलगी कोणाबरोबर कधी आणि कुठे पळाली ते शॉपमध्ये खडूने लिहून ठेवीन...." Rofl Rofl Rofl Rofl

भन्नाट लिहीलय बेफी...
वाचतांना मकरंद अनासपूरे ची आठवण झाली

आवडली...
पानसे डोळ्यासमोर उभा राहीला. आमच्याकडे एक रियाझ म्हणून होता, टेस्टींग लॅबला. दुसरा पानसेच जणु Happy

परत एकदा बेफिस्पर्श! कथा छानच आहे. शेवट अनपेक्षित.

>> मी होतो स्टोअर्सला तेव्हा साडे बाराला आम्ही गोट्या खेळायला मोकळे व्हायचो.... आपापल्या
Rofl

-गा.पै.

जबरदस्त व्यक्तीचित्रण...... मी हा असला पानसे पाहिलाय... फक्त नाव वेगळं आहे....... म्हणजे होतं.

छान रंगवलेय.... आवडली... प्रत्येक कंपनीत असा एक पानसे असतो.. त्याचा फायदा उचलायचा की त्रास करून घ्यायचा हे आपले आपण ठरवायचे असते..

chaan chaan..................... kaatha Happy

Pages