ग्रूप - ३

Submitted by दाद on 18 July, 2008 - 00:41

कथा - ग्रुप ३

आपला ग्रूप आठवतो का? विशू, अनू, दिप्या, गुरू, दिल्या आणि शिवाय दिल्याची मैत्रेयी आणि गुरूची विनी?
(ती गोष्टं वाचावी लागेल ह्यातले संदर्भ लागायला)
ग्रूप १ - http://www.maayboli.com/node/2023

वेल, आयुष्य थांबत नाही... कुणासाठीच! पुढे चालूच रहातं.... पण माणसाचं मन?
आपल्या विशूच्या भाषेत सांगायचं झालं तर, ’एकाचवेळी जगातली सगळ्यात सुंदर आणि...'

******************************************************************
’हॅलो, विशू, कसा आहेस तू?’
दिपूचा सभ्य शब्दात, शांत स्वरात प्रश्न ऐकून विशूला खात्रीच पटली की काहीतरी घडलय आणि लपवायचा खास प्रयत्नं चाललाय.

’मस्तय रे. तू बोल. लग्नाची तयारी कुठपर्यंत? पत्रिका पाठव रे... त्याशिवाय यायचा नाही मी’, विशू म्हणाला

’तयारी म्हणजे काय... चाललीये. शालीताई आहे का?’, दिपू ने विचारलं. विशूला कळेना, ह्याला शालीताईशी काय बोलायचय?

’अरे, तब्येतीचं काय! ऑपरेशन व्यवस्थीत झालय, मी आहे लाड करायला, छान सुधारतोय तो. एकटा हिंडतो, फिरतो... का रे?’, शालीताईचं बोलणं ऐकून विशूला जाणवलं की, ग्रूपमध्ये काहीतरी घडलय, आपल्याला सांगण्यापूर्वी दिप्या आपल्या तब्येतीची चाचपणी करतोय. त्याने शालीताईच्या हातून रिसिव्हर काढून घेतला.

’दिप्या, काय झालय? मी ठीक आहे. बोल तू.’ विशूचा नेहमीचा आश्वासक आवाज ऐकून मात्र दिप्याला रहावलं नाही.

’विशू, अरे अनूचे वडील गेले रे, आठ दिवस झाले.’ दिपू बोलत होता.
विशूला एकदम कॉलेजचे दिवस आठवले.
*****************************************************************
अनूचे आई-वडील - तो एक अनूच्या घरचा गुंताच होता. वडील प्रचंड हुशार, मोठ्या आंतर्देशीय कंपनीत मोठ्या हुद्द्यावर. आई प्रख्यात गायनॉकॉलॉजिस्ट. दोघांना आपल्या कामापुढे एकमेकांसाठी वेळ नाही आणि घरासाठीही नाही. लहान वयापासून एकुलत्या एक मुलीला आधी दाईकडे मग जर मोठी झाल्यावर बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवलं. आई-वडिलांच्या कल्पनेतल्या ’चांगल्या शिक्षणाच्या’ विचित्र चक्रातून पिळल्या जाणाया अनूला ग्रूप आणि तिथे मिळणारं प्रेम म्हणजे सर्वस्व होतं.
घरातल्या कोणत्याच संस्कारांची साधी बाळगुटीही न देणाया आई-वडिलांना, विशेषत: आईला, तिचं ह्या मुलांच्या ग्रूपमध्ये वावरणं मात्रं खटकायचं. यावरून खूप भांडणं व्हायची. हॉस्टेलवरून अनू सुट्टीत घरी जायला नाखुष असायची. त्यातल्या त्यात वडील वेळ काढून अधुन मधुन का होईना पण येऊन भेटून जात. तेव्हढ्या वेळासाठी अनू त्यांची छोटी प्रिन्सेस बनून जात असे. ते काही तास तिचे सर्वोच्च आनंदाचे असायचे.

अशाच एका भेटीत त्यांनी अनूला त्यांच्या एका मैत्रिणीबद्दल सांगितलं. त्यांचे संबंध गेली काही वर्षं असून, फार पुढे गेले असल्याचंही सांगितलं. नुकतच हे तिच्या आईलाही कळलय, त्यांनी समंजसपणे हे असंच चालू ठेवायचं ठरवलय, अनूसाठी! तिचं घर मोडू नये म्हणून ते घटस्फोट वगैरे घेणार नाहीयेत, आईनेही एखादा मित्रं शोधला तर त्यांची हरकत नाही....

ऐकता ऐकता अनू हिस्टेरिक झाली होती. 'चालते व्हा... परत मला भेटायचा प्रयत्नही केलात तर मी जीव देईन...' असं किंचाळत तिने वडिलांना जवळ जवळ हाताला धरून तिच्या खोलीबाहेर काढलं होतं.

ती कितीही घराबाहेर राहिली असली तरी, मनातल्या मनात का होईना पण परतायला एक ’घर’ म्हणून जे काही होतं.... ते ढासळून भुईसपाट झालं होतं. हे असलं सत्यं झेलण्याइतकी ती वयाने मोठी नव्हती, कणखर नव्हती... बाहेर राहून कितीही स्वत:ची काळजी स्वत: घेण्याइतकी खंबीर असली तरी....जो सगळ्यात मूळचा अन मोठ्ठा विश्वास... ज्याच्या बळावर जगातली सगळी पाखरं आकाशात झेप घेतात, जी घरट्याची ऊब पंखांत बळ भरते... तेच घरटं, तोच विश्वास क्षणात नाहिसा झाला.

******************************************************************
दिपू बोलत होता,’.....तिला भलताच शॉक बसलाय.. म्हणजे तुला माहितेये ना, तिच्या घरचा काय तो गोंधळ. आजपर्यंत कधी आई-वडिलांचं तोंड बघितलं नाही. अरे, मी किती दिवस सांगतोय की आई-वडिलांना लग्नाला बोलवूया. शेवटी रागावलोही. म्हटलं, चांगलं नाहीये हे आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी.... पुढे-मागे मुलं होतील तेव्हा त्यांना नकोत काय आज्जी-आजोबा दोन्हीकडचे?
अरे, रागावली माझ्यावर जाम.... आधी भांडली आणि मग बोललीच नाही दोन दिवस.’, दिप्याने श्वास घ्यायला थांबला

’पण प्रॊब्लेम तो नाहीये. पंधरा दिवसांपूर्वी तिच्या आईचा फोन आला... ही बोलेचना. मीच बोललो. वडिलांची तब्येत एकदम बिघडलीये म्हणाल्या.
मी काय बोलणार?... सांगतो अनूला, बघतो कसं काय ते... असलंच बोललो. विशू, अरे अनू त्यावरूनही भांडली माझ्याशी. कशाला असल्या लोकांशी बोलतोस म्हणून.....
आणि आता हे वडिलांचं ऐकल्यावर... अरे एकदम गप्प झालीये. डॉक्टरांकडे यायला तयार नाही. कुणाशीच बोलत नाहीये. ऑफिसातही गेले नाहीये पाच-सात दिवस. अगदी जबरदस्ती केली तर दोन घास कसेबसे गिळते’, दिपूने एका श्वासात सगळं सांगितलं त्याला.

’विशू तू बोलशील तिच्याशी? तिचे जवळचे असे आपणच रे... माहेरचं असं कुणी नाही ना, ज्यांच्याशी बोलेल जरा मन मोकळं करून. तू... तुझं ऐकते ती. थोडं बोलली तरी बरं वाटेल रे तिला... पण हे असं गप्पं गप्पं.... विश्या, .... माझ्याच्याने सावरत नाहीये... मला काळजी वाटतेय तिची’, दिपूचा आवाज हलायला लागला होता.

’दिपू, हॅलो... हे बघ, मी बोलतो तिच्याशी. आणि अशी काळजी करू नकोस, रे. ठीक होईल सगळं. तू जरा फात्र्याच आहेस. आणि हे बग, मी बराच झालोय. लागलच, तर येऊही शकेन. तू काळजी करू नकोस’, विशूचं हे ऐकून दिपूचा जीव भांड्यात पडला.

******************************************************************

विशूला ते दिवस आठवले.....

’माझ्यासाठी, त्यांच्या लेकीसाठी ते.... ते दोघं, सहजपणे नवरा-बायकोच्या नात्याला वेशीवर टांगणार आहेत बरं का... माझ्यासाठी.....', तिरस्काराने भरलेल्या स्वरात रडत रडत अनू बोलत होती. '... सामंजस्याने व्यभिचार करणार आहेत, माझे आई-वडील.... श्शी!. त्यांच्या स्वत:च्या असल्या निर्लज्ज वागण्याचं ओझही ’मुलीसाठी’, असं माझ्या खांद्यावर टाकून... असला नालायक विचार करून......., कसले रे आई-वडील.....’,
अनूचं हुंदके देत बेभान होऊन रडणं बघून सगळेच भांबावले होते. कसं सावरावं तिला ते कोणालाच कळत नव्हतं. साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले, सगळेच आड वयाचे. असलं काही घडू शकतं हाच मुळी मोठ्ठा धक्का. त्यातून बाहेर पडण्याचं काय अन कसं.... कसलं सुचवणार होते!
पण ते होते म्हणून अनू सावरली. वेळोवेळी आपल्या खोलीत नाहीतर नदीकाठी किंवा लायब्ररीतही जगापासून अन आपल्यापासूनही स्वत:ला लपवायचा प्रयत्नं करणार्‍या अनूला शोधून काढुन काढून ग्रूपमधल्या प्रत्येकाने तिला ग्रूपमध्ये ठेवली... माणसात ठेवली.

’तू खाल्लं नाहीस तर मी ही खाणार नाही’ म्हणून हट्टाला येऊन बसून रहाणारा, उपास जराही सहन न होणारा विशू.
’ए, बघतोय मी, गेल्या दीड तासात हसली नाहीयेस.... चेहर्‍याच्या मसल्स ना व्यायाम हवा’ म्हणून काही नाही तर गुदगुल्या करून तिला हसवणारा गुरू,
’तुला आवडतो ना, म्हणून मुद्दाम शिकून घेतला...’ असं म्हणून चार वाट्या पिठाची तव्याबाहेर रांगोळी घालत, एक डोसा घडवून तिला खाऊ घालणारा दिल्या,
’झोपलीयेस ना गं, जागी राहून विचार करत बसू नकोस.... झोप हं... झोपलीसच होतीस होय! बरं बरं... बघ मी फोन ठेवला की लग्गेच परत डोळे मीट....’ असला रात्री-अपरात्री फोन करून तिच्यावर लक्ष ठेवून दिपू.
किंवा कधीतरी, ’आज तुझ्या हातची भुर्जी हवी’ म्हणून सगळं सामान तिच्यासमोर ठेवून चौघांनीही घातलेलं रिंगण.

अनूने परत मागे वळून बघितलं नव्हतं. पण वयापेक्षा लवकर लवकर मोठी होत गेली. अगदी आवश्यक तितकेच पैसे आईवडिलांनी उघडलेल्या तिच्या अकाऊंटमधून घ्यायची. पुढे पुढे तर ते ही नाही. सुट्ट्यांमध्ये छोट्या मोठ्या नोकया करायची.... ह्या स्वाभिमानी, मैत्रिणीचा चौघांना अभिमान होताच पण त्यांच्या घरच्यांनाही फार फार वाटायचं, तिच्याविषयी. ह्या चौघाची काळजी घेणारी, मायेनं आपुलकीनं बघणारी, वेळप्रसंगी सुनावणारी.... सगळ्यांनीच आपली म्हटली होती, तिला.

लग्नाची, दोघांच्या एकत्र घरट्याची, भावी आयुष्याची, दीपूसह आतुरतेनं स्वप्नं बघणारी, त्यावर अखंड चिवचिवणारी अनू, तिच्या आई-वडिलांचा विषय काढला, की आधी गप्प व्हायची... हळू हळू आपल्या आयुष्यात त्यांना स्थान नाही... हे उघड बोलून दाखवू लागली होती.
लग्नाला आई-वडलांना बोलवायचं नाही.... ह्यावर अनू इतकी ठाम होती की, प्रयत्नं करूनही दिपूही तिला बधवू शकला नाही. विशूशी बोलला तेव्हा, खूप काळजीत वाटला, विशूला तो. आपली मुळं तोडून वागणं तिलाच नाही तर आपल्या भावी आयुष्याला हे चांगलं नाही, कुटुंबाला चांगलं नाही... एव्हढं कळत होतं दिपूला पण.... हे अनूला समजवायला तो जवळ जवळ असमर्थ होता.

आजवर इतरांना संभाळणारी ही त्यांची मैत्रिण... स्वत: इतकी कोसळली होती की, तिला संभाळणं मुश्किल होऊन बसलं होतं.
विशूसाठी, जावं की नाही हा प्रश्नच उरला नव्हता.

*****************************************************************
विशूचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. हीच का अनू? दुपारचा दीड वाजलाय तरी अजून पायजम्यात? डायनिंग टेबलवर, समोर चहाचा सुकलेला कप, केस कसेतरी विस्कटलेले, एक हात कपाळाला आधार देऊन, कुठेतरी खिडकीबाहेर शून्यात नजर लावून....

अनूला ओळखणारा कुणीही धास्तावेल असं दृश्य. एखादी तरतरीत हिरवीगार वेल सुकून, मलूल होऊन पडावी तशी अनू दिसत होती. कसल्याही प्रसंगांत, झंझावातात ग्रूपमधल्या कुणाहीसाठी आधार म्हणून उभी रहाणारी हीच का आपली सखी?

न राहवून विशू पुढे झाला. त्याची चाहूल लागून अनू नुस्ती वळली आणि हसून म्हणाली, ’विशू... आलास?’
एकवेळ रडली असती तर जास्तं बरं झालं असतं असलं तिचं ते हसणं बघून विशू गलबलला.
स्वयंपाकघराची अवस्था बघून इथे अनूच काय पण कुणीच कित्येक दिवसांत वावरलं नसल्याचं दिसत होतं. दिपू पुढे होऊन म्हणाला, ’बस रे, कायतरी मस्तं खायला घेऊन येतो आणि दिल्या, गुरूला घेऊनच येतो येताना’.

विशूने गडबडीने सांगितलं त्याला, ’खायला नको रे काही. मला भूक नाहीये. सगळ्यांना घेऊन ये रे.... सावकाश ये. गडबड नाही काही’

काय ते समजून दिपू ’येतो’ म्हणून गेलाही.

******************************************************************

’अनू, तुझ्या बाबांचं कळलं. आय ऍम सो सॉरी.’, विशू म्हणाला.

’ते राहूदे. तू कसा आहेस? तब्येत कशी आहे आता? शालीताई काय म्हणतायत?...’ त्याचं बाबांविषयीचं बोलणं ऐकूच न आल्यासारखं अनू बोलत होती.

’भेटायला गेलीस?’ विशूने तरी विचारलच.

’वेळ कुणाला आहे इथे? ऑफिसमध्ये मरणाचं कामय. विनीला बरं नव्हतं मध्ये तेव्हा बन्नू माझ्याकडेच होता. तुला काय माहीत? दिपूलाही मदत करावी ....’ अनू बोलत असतानाच विशूने तिची खुर्ची बसल्या बसल्या फिरवली. अन अनूला सामोरी घेतली.

एका एका शब्दावर जोर देत त्याने परत तोच प्रश्न विचारला, ’भेटायला गेले होतीस का? अनू?’

शांतपणे त्याच्या डोळ्यात बघत अनूने उत्तर दिलं नाही, पण प्रश्न विचारला, ’कुणाला? विशू कुणाला भेटायला जायला हवं होतं मी?’

’आईला. तुझ्या आईला, अनू’, विशूने समजावण्याच्या सुरात म्हटलं.

’का? का जाऊ मी? मला... मला... सगळं माहीत असताना विचारतोसच कसं? आणि... आणि कोण तू विचारणारा? हज्जार मैलावरून आत्ता येतोयस. काय हक्क आहे तुझा?’, बेभान होऊन ओरडणार्‍या अनूचे दोन्ही हात हातात धरून ठेवत विशू फक्त एकटक बघत राहिला तिच्याकडे.

शेवटी त्याचेच हात घट्ट धरून त्यावर डोकं टेकून मोकाट रडत सुटली. ’काय करू रे? काय झालय मला? काही कळत नाहीये. तुटतय आत काहीतरी... आतडी पिळवटणारं, खूप खूप दुखणारं..., विशू’

विशूने तिला रडू दिली. थोडी मोकळी झाल्यावर विशू बोलू लागला.

’अनू, इकडे माझ्याकडे बघ. सगळ्यात आधी स्वत:ची कीव करायची थांबव. एक विचारतो. खरं खरं सांगशील?
आत्ता तुझं मन तुला खातंय. बाबांना आपण तेव्हा तसं वागवायला नको होतं. किमान नंतर इतकं तरी तोडून टाकायला नको होतं... हे तुला आत्ता उमगतय. बरोबर?’

अनूने ओल्या पापण्या फडफडवीत मान हलवली, ’पण... अरे.. मी तेव्हा..’

विशूने तिला मध्येच थांबवली, ’अनू, ठीकय. ’मी तेव्हा नकळत्या वयात होते’, ’मोठी झाल्यावर वेळ निघून गेली होती’, ’आणि त्यांचं वागणं गैरच होतं’... वगैरे वगैरे हे तुझं समर्थन, तू मोठ्ठ्याने जगाला ओरडून सांगू शकतेस. पण कितीही मोठ्याने ओरडलीस तरी तुझ्या मनाला ते पटणार नाही. ते पटत नाहीये म्हणूनच तुझी ही अवस्था झालीये.
यू आर नॉट आट पीस विद युवरसेल्फ़.
आत्ता मोठी झाल्यावर तुला कळतय की आई-वडिलांनी जे घर म्हणून तुझ्यासाठी संभाळायचा प्रयत्नं केला, त्यासाठी जी कसरत केली, ती सगळी तुझ्यासाठी होती. आत्ता तुला कळतय की मनाने दूर गेलेले दोन जीव एकत्र का राहू शकत नाहीत. आणि रहातात तेव्हा तशाच प्रबळ कारणासाठी. तशाच एखाद्या नाजुक कारणासाठी असली अधांतरी फरपट सोसतात. तुझ्या आई-वडिलांसाठी ते कारण ’तू’ होतीस, अनू.
कुणालातरी आपल्या मनाच्या आत आत जागा देणं अन अशी हक्काची जागा दुसर्‍या कुणा हृदयात मिळवणं ही मानवी मनाची किती मोठी भूक आहे हे तुला आत्ता मोठी झाल्यावर कळतय ना?. जे तुझ्या वडिलांनी केलं, ते नैसर्गिक होतं, स्वाभाविक होतं....
जे तुझ्या हातून झालं ती फक्तं त्यावरची तीव्र प्रतिक्रिया होती. त्या वयाला, त्या परिस्थितीत तुझ्याकडून त्याहून वेगळी अपेक्षा कशी करणार? त्या एका आवेगाच्या भरात तुझ्यामते तू नाळ तोडलीस... पण खरच तोडलीस का? नीट विचार करून सांग, तोडलीस का?’

क्षणाचाही विलंब न लावता अनूने होकारार्थी मन हलवली, ’होय. मी संबंध तोडले माझ्या आई-वडिलांशी. मला घृणा आली त्यांच्या वागण्याची... म्हणून... म्हणून... तोंडही बघितलं नाही...’ हट्टाने ठासून बोलताना अनूच्या चेहयावर संताप दिसत होता.

’ही जी चीड आहे ना ती तुझी त्यांच्याबद्दलची नाही, तुझ्या स्वत:बद्दलची आहे. संबंध तोडलेस. भेटली नाहीस, तोंडही बघितलं नाहीस... पण नाळ तोडलीस का? त्यांच्यावरलं तुझं प्रेम, जे तुझ्या असण्याचा एक भाग आहे, अजून आहे.. ते! ते उखडून फेकलस का? मुळापासून उचकटून भिरकावून दिलस का? ते केलय म्हणत असलीस ना, तर... तर आज तुझी जी अवस्था आहे, ते एक थोतांड म्हणीन मी. कांगावा, शुद्ध नौटंकी...’, विशूचं हे ऐकून त्वेषाने तिथून उठून जाण्यासाठी अनू उठली.

तिला न थांबवता विशू म्हणाला, ’हे तुझं उध्वस्त होणं, विकल होणं, ही तुझी दशा, हे नाटक नाहीये हे मलाही माहितीये, अनू.
कळवळून, आतडं पिळवटून काढल्यासारखं टाहो फोडावा असं वाटण्याइतकं जे दुखतय ती... ती तुझी न तोडलेली मुळं, तुझी न तुटलेली नाळ दुखतेय.... हे आधी कबूल कर. स्वत:वर चिडून, त्यांच्यावर चिडून, जगावर चिडून... तू स्वत:ला दुखावते आहेस. तुझ्यावर प्रेम करणार्‍या दिप्या आणि बाकीच्यांना दुखावते आहेस.
अनू, तुझं त्यावेळचं वागणं स्वाभाविक होतं, हे खरय. आणि ते बरोबर की चूक ह्याचा शहानिशा आत्ता करणं योग्य होणार नाही. पण गेली अनेक वर्षं आई-वडील नसल्यासारखं वागणं मात्रं स्वाभाविक नाही. पहिला रागाचा आवेग ओसरल्यावर जी मनाची चौकशी व्हायला हवी होती, मनांची, नात्यांची जोडणी व्हायला हवी होती ती झाली नाही.

अनू, मला माहितीये तुझी काय अवस्था आहे ते. वडिलांना घालवून देऊन अन नंतर आई-वडिलांशी संबंध तोडून तुझ्या मते तू विषय संपवलास. पण खर्‍याअर्थाने तू तुझ्या मनाचा एक नांगर तिथे टाकलास.
हो. हा माझा फंडा आहे. आयुष्यं एक प्रवाह आहे... वाहतं पाणी. राग-लोभाच्या आवेगात आपण जेव्हा वागतो ना, तेव्हा एक नांगर टाकतो. जितका आवेग मोठा तितका नांगर जास्तं जड आणि खोलवर जाऊन रुतलेला. आपल्यामते त्यानंतर आपण आयुष्यं वल्हवायला सुरूवात केलेली असते. आपल्यामते आपण त्यापासून दूर जातो... पण जात कुठेच नाही.’

विशू स्वत:शीच बोलल्यासारखा बोलत होता, ’...शरीरासारखी मनाची फरपट करता येत नाही. मन! हं! जगातली एकाचवेळी सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात भिकारचऽ*%* गोष्टं! हटेल असतं सालं. कधीतरी ताण असह्य होतो आणि मनाच्या तारा तुटेपर्यंत ताणल्या जातात.’

अनू एव्हाना परत त्याच्या समोर बसली होती. अपलक नजरेने त्याच्याकडे बघत एकचित्ताने ऐकत होती.

’अनू, तू टाकलेला नांगर उचलायची वेळ आलीये. बाबांना शेवटचं भेटूही शकली नाहीस, त्यांची काही सेवा करता आली नाही ह्याच्या दु:खाचा भार घेऊन तो नांगर अजूनच जड झालाय, खूप खूप खोलवर आत गेलाय. आईला जाऊन भेट.
एकदम सगळं सुरळीत होणार नाहीये, हे लक्षात घे. तशी अपेक्षाही ठेऊ नकोस.
जुने विषय निघणार आहेत. तू कशी दुखावली गेलीस हे सांगताना आई कशी दुखावली गेली हे ही ऐकावं लागेल. हळूवार हाताने दोघिंनी एकमेकांच्या मनातले सल काढायचे आहेत. तळव्यात रुपलेला एखादा काटा काढताना आपण कसं दुसर्‍या टोकदार वस्तूचा वापर करतो? काहीच मिळालं नाही तर दुसरा काटाच वापरतो. मोठी जखम होणार नाही असं जपत आतला काटा काढायचा.... आणि अनू, हे दोन्ही काटे मग दूरवर फेकून द्यायचे. पुन्हा कुणाच्याच पायी येणार नाहीत असे.
आईशी जवळीक साधताना तिथं पडलेले सगळे नांगर वर काढता येतील तुला.’

अनूचे डोळे निवळलेले दिसू लागले. विशू बोलतच होता, ’अनू, हे एका फटक्यात होणारं नाही. मनाचे हे गुंते म्हणजे नेहमीचं साधं किल्लीचं कुलुप नाही. की आपलं फिरवली किल्ली अन उघडलं. ह्यातली किल्ली हा सुद्धा कुलुपाचाच एक भाग आहे हे ध्यानात घे. चुकीचा वळसा आणि अजून घट्ट गुंता... पण हे तुलाच करायचय. कुलुपही तुझ्याकडे अन किल्लीही.
तुला जमेल ते. नव्हे, माझी खात्री आहे, तुला जमेलच.’

विशू बोलायचा थांबला. अनूने त्याचे दोन्ही हात हातात घेतले अन घट्ट धरीत, आतून येणारा गहिवर थोपवीत म्हणाली, ’कुठे होतास रे इतके दिवस?’.

स्वत:ला सापडलेली अनू बघून भानावर आलेला विशू तटकन तिथून उठला अन खिडकीबाहेर बघत उभा राहिला.

कळवळून अनूने विचारलं, ’अरे देवा.... विशू,.... का का आलास मग परत?’

वळुनही न बघता विशू म्हणाला, ’नांगर... माझा नांगर उचलायला आलो, अनू. माझा नांगर उचलायला!’
समाप्त.

गुलमोहर: 

पुन्हा रडवलंस... कुणीतरी यावर एक छानसा चित्रपट काढा रे...

नांगर....... ग्रेट फंडा, दाद!!
.
नेहमीप्रमाणेच कथा उच्च.... ह्याउप्पर काही दाद देता येत नाही.

दाद, अगं किती सुंदर लिहितेस आणि त्यापेक्षाही सुंदर विचार करतेस. मनाचा गुंता म्हणजे साधं किल्लीचं कुलुप नाही >> खुप छान.. आणि त्या गुंत्याचं टोक हातात देणारा मित्र.. great....

एकदम स्पीचलेस झालोय...........

दाद,नेहमीप्रमाणेच महान ..... ...
तुझे परिपक्व विचार तुझ्या सर्व लिखाणांमधुन ठायी ठायी जाणवत असतात.. ग्रेट आहेस तू!!!

उच्च!! खूप आवडली कथा, कन्सेप्ट्,मांडणी.. सगळंच !! हॅट्स ऑफ !!!

आईग्गं!
काय लिहिलं आहेस दाद! एकन्एक शब्द पटला! खूपच सुरेख!

आयुष्यं एक प्रवाह आहे... वाहतं पाणी. राग-लोभाच्या आवेगात आपण जेव्हा वागतो ना, तेव्हा एक नांगर टाकतो. जितका आवेग मोठा तितका नांगर जास्तं जड आणि खोलवर जाऊन रुतलेला. आपल्यामते त्यानंतर आपण आयुष्यं वल्हवायला सुरूवात केलेली असते. आपल्यामते आपण त्यापासून दूर जातो... पण जात कुठेच नाही.’
सही........

'ह्यातली किल्ली हा सुद्धा कुलुपाचाच एक भाग आहे हे ध्यानात घे. चुकीचा वळसा आणि अजून घट्ट गुंता...' क्या बात! प्रत्येक शब्द पटला अन आत उमटला! जियो!

दाद ला योग्य दाद देण्याइतकी शब्दसंपत्ती माझ्याकडे नाही. तर 'छान, खूप आवडलं !' एवढंच म्हणते.

तळव्यात रुपलेला एखादा काटा काढताना आपण कसं दुसर्‍या टोकदार वस्तूचा वापर करतो? काहीच मिळालं नाही तर दुसरा काटाच वापरतो. मोठी जखम होणार नाही असं जपत आतला काटा काढायचा.... आणि अनू, हे दोन्ही काटे मग दूरवर फेकून द्यायचे. पुन्हा कुणाच्याच पायी येणार नाहीत असे.

अप्रतीम.
नि:शब्द....

रडू येतंय मला ..खूप मोठ्याने!! डोळ्यातून पाणी यायचं नाही थांबवणार मी. तुझ्या ग्रुप च्या दोन्ही कथा सलग वाचल्या... योगायोग म्हणजे आजच मी जवळपास दीड वर्षानी माझ्या कॉलेजमधे गेले होते. आणि तिथलं काम झाल्यावर पार्किंग मधे बसून दिसणारा आमचा कट्टा न्याहाळत होते... कितीतरी वेळ.. सगळं होतं तसंच आहे.. पण त्या कट्ट्या वरचा माझा ग्रुप... तो कुठंच दिसत नाहीये.. पार्किंग मधला डबा खातानाचा चिवचिवाट ऐकू का येत नाहीये?? न आवडणार्‍या मॅडम लेक्चर घ्यायला चाललेल्या असताना आडवाटेने पळून जावंसं नाही वाटत आहे..पळताना फिसकन हसताना धरायचा हात कुठे आहे??
मी जातीये..अशाच एका माझ्या दूर असलेल्या मैत्रीणीशी बोलायला...
दाद , तुला सलाम!! बाकी काही बोलू शकत नाही मी आत्त्ता. पण काही नांगर तसेच असू द्यावे न काढता.. कधी आठवण झालीच तर मागं फिरायला...
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
रोके तुझे कोई क्यूँ भला
संग संग तेरे आकाश है

मला कळत नाहिये कि मनोव्यापारातले इतके सखोल द्वंद्व मांडताना वास्तवाशी जोड्लेल्या नाळेला कशी दाद देवू !
जे काही रसायन जमलयं ते एकदम सही आहे. उत्तम आहे, लेखनाची लय कमालीची सांभाळली आहे
लिहित रहा....लिहितच रहा....लिहित रहाच....
गोदेय

अप्रतीम या पलिकडे शब्दच नाही सापडत Happy

.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **

हा भाग खुपच प्रिडीक्टेबल असुनही मांडनी आणि संवाद ईतके उच्च आहेत की वाचनात माणूस गुंतुन जातो.

ग्रुप सुरुवाती पासुन परत एकदा मोठ्या प्रमानावर निट लिहुन हे दोन्ही भाग ऐकत्र केलेस तर ऐक ऐकांकीका होऊ शकेल. सध्या आम्ही ऐक ऐकांकीका शोधत आहोत त्यात ही फिट्ट बसेल. लिहुन देशील का? मी आमच्या ग्रुप मध्ये वाचन करेन.

_ पोस्ट थॉट्स - दोन्ही भागात सेट्स फारतर अडीचच आहेत. ( ऐक कुठलेही घर, कट्टा, थोडा विमानतळाचा भाग, व दुसरी खोली विशुची) त्यामुळे नेपथ्यपण बजेट मध्ये निट बसु शकते. - हा भाग वाचुन माझ्यातला दिग्दर्शक जागा होतोय बहुतेक. पुर्ण लिहायचे मनावर घेच.)

बाप रे दाद फारच वरच्या पातळीवर लिहिता तुम्ही. कुठल्या तरी पोस्टला उत्तर देताना तुम्ही वयाने मोठ्या असल्याचा उल्लेख केला आहे. तरिसुद्धा कॉलेजमधुन नुकत्या निघालेल्या ह्या सर्व मुला-मुलींची मानसिकता इतकी प्रत्ययकारी कशी काय रंगवली आहे ? खुपच ग्रेट.
.
राग-लोभाच्या आवेगात आपण जेव्हा वागतो ना, तेव्हा एक नांगर टाकतो. जितका आवेग मोठा तितका नांगर जास्तं जड आणि खोलवर जाऊन रुतलेला >>>>> हा विचार खुपच छान आणि विचार करायला लावणारा आहे.

धन्यवाद, सगळ्यांचेच. आशूबाई, हळव्या का तुम्ही? का गं?
सिंडरेला, 'अहो' नाही म्हटलस तरी चालेल गं (आवडत असल्यास म्हणही... मला काहीही चालतं). तुझ्या "आश्चर्याचं' कारण सोप्पय. मी फक्तं वयाने मोठी आहे Happy

केदार, एकांकिका? भलतच! कधीच केला नाहीये तो प्रपंच. आत्ता विचार करू जाता, आवडेल लिहायला. तुला स्वतंत्र मेलते त्याबद्दल. धन्स, रे. (मस्तच वाटलं).

हा 'नांगर' फंडा कधीतरी उपटला डोक्यात, त्यावर लिहायचं ठरलं. मग वेगळी पात्रं निर्माण करण्यापेक्षा आपल्या ग्रूपलाच हाताशी धरलं.... इतकच.

फारच सुरेख...
"नांगर" कल्पना तर सहीच

कुणालातरी आपल्या मनाच्या आत आत जागा देणं अन अशी हक्काची जागा दुसर्‍या कुणा हृदयात मिळवणं ही मानवी मनाची किती मोठी भूक आहे >>>>

माझ्या वाचनात आलेले ही तुमची पहिलीच कथा आहे... तुमच्या विचारान्ची परिपक्वता खुप खोल आहे. वाचल्यानंतर फार प्रकर्षाने जाणवलं कि नाण्याची दुसरी बाजु सुद्धा समजुन घेता आली पाहिजे, जी तुम्ही एवढा नाजुक विषय हाताळतानाही दाखवली आहे. कारण कथा कल्पनेतली असली तरी विचारांमधली सुस्पष्टता प्रत्यक्षात असल्याशिवाय लिखाणात उतरत नाही.

पुन्हा एकदा Hats Off!

उत्तम कथा (परत एकदा)
दाद, आता एखादी वाईट कथा लिहून दाखवलीस तर तू खरी उत्तम लेखीका Happy
कथा प्रेडिक्टेबल होती. फक्त नांगर हा फंडा त्या नावाने परत सांगितलास. ते नाव, कन्सेप्ट, आवडला. आणि लिहिलेस जबरीच. त्यामूळे गुंगून गेलो.
केदार, दाद, एकांकिका बनवा रे, मी येतो पहायला. किंवा शूट करून अपलोड कर.

विलाप, धन्यवाद.
सव्यसाची, वाईट कथा आणि उत्तम लेखिका! Happy
हातखंडा हेच खरं. ठरवून वाईट लिहिता यायला हवं. खरय. प्रयत्नं करेन आणि इथे लोकांनी शिव्या घातल्या तर तुझं नाव सांगेन. धन्स रे. एकांकिकेचं बघुया.

प्रत्येक वाक्य खूप खोलात विचार करायला लावणारं, थोडेसे शाब्दीक जड झालय. पण नक्कीच हलवते, एक मिनीट आपणच आपल्या आत पहायला शोधायला लागतो की असे कधी आवेशात आपण वागलो का? ..anyways...

खुपच प्रश्न निर्माण केलेत तुम्ही. खरेतर मानवी मन हे नेहमी प्रेमाच्या, आपुलकिच्या शोधात असते. जरा कुठे ओलावा दिसला कि लगेच नांगर टाकायला सुरु. पण मग एकदा टाकलेला नांगर का उचलायचा? आणि कुठेच नांगर नाही टाकला तर मग जीवनाचे तारु शीड नसल्याप्रमाणे भरकटत जाईल त्याचे काय? आणि विशु जसा नंगर उचलायला आला, तसे नांगर उचलणे एवढे सोपे आहे का?
आयष्यात असे खुप नांगर आहेत, सर्वांची पुन्हा एकदा आठवण तु करुन दिलीस. पुन्हा जखमा ओल्या झाल्या. धन्यवाद दाद.....

दाद तुझी शैली नेहमीप्रमाणेच गुंगवून टाकणारी आहे.
पण ही कथा मला एवढी अपील नाही झाली (वाचकाधिकार बजावतेय). काही संवाद, विचार मला थोडे कृत्रिम आणि जास्त विस्तारित वाटले. अनूच्या पात्राला जास्तच ग्लॉरीफाय केलेय असंही वाटलं.
तू सगळ्याच प्रतिक्रिया पॉझिटिव्हली घेतेस हे माहीतीय म्हणून लिहीले. आणि तुझं आधीचं लिखाण या मनातलं त्या मनात इतकं जवळच वाटलं म्हणून पण.

खरय. शब्दबंबाळ झालीये कथा.
अगदी खरं खरं सांगायचं तर, 'नांगर' हा फंडा मांडण्यासाठी मी आपल्य ग्रूपला वेठीला धरलं. फारसा विचार केला नाही, पात्र रचनेबद्दल... त्यामुळे असेल का?
माहीत नाही.
आपण भावनेच्या भरात एखादी कृती करून बसतो. त्याक्षणी काही घाव देतो आणि काही घेतोही. हे मनाचे घाव.... वेळीच त्यातलं शस्त्रं उपटून काढलं नाही तर... दोन्हीकडचे हं... तर झालेली जखम फक्त चरत जाते.
बरेचदा दुसर्‍याला केलेली जखम साफ करता करता आपली भरून येते... हा अनुभव आहे. बरेचदा आपण ते नाकारतो तरी किंवा 'पुढे कधीतरी करू' म्हणून बाजूला ठेवतो.
अनूच्या बाबतीत तिनं "झालं ते सगळं ठीक आहे" असं म्हणून नाकारलेला आपला भूतकाळ असा अचानक समोर येऊन ठाकतो. तो सुद्धा, आता परतून मलम लावायचं तर आपलं माणूस त्या जखमांसह पार पल्याड, आपल्या कक्षेच्या बाहेर पोचलेलं.
ही असहाय्य करणारी अवस्था आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी पाठिशी उभा राहणारा सख्खा मित्रं.
विशू खूप बोललाय ह्यात. मी अजून विचार करतेय की हीच पात्रं वापरली तरी, हा एकतंत्री संवाद कसा बदलता येईल?
बघू....
पण मनुस्विनी, मित्रा, तुमचा अभिप्राय 'on the spot' आहे.

नितीन, नांगर न टाकता आयुष्याचा प्रवाह अव्याहत चालू देणं हेच तर जीवन (ideally, हं). कारण नांगर टाकला की थांबणं आलच. आयुष्याच्या अंताला, अशी नांगर-विरहीत आयुष्याची नाव अगदी अलगद समुद्राला जाऊन मिळावी ह्यापरतं सुख ते काय.
शीड म्हणाल तर हवं... संस्कारांचं, मोठ्यांच्या आशीर्वादाचं, भगवद्कृपेचं! वल्हंही हवच... त्याविना नाव हलेल म्हणता?
ideally हे हवं आणि ते ही हवं.... म्हणायला सोप्पं आहे नाही सगळं?
असो... कथेपेक्षा टिप्पणी मोठी Happy (एक नवीन म्हण)

एकदम कबुल, दाद. पण असे नांगरविहीन जीवन जगणे शक्य आहे? नाहीतर मग सर्वसंगपरित्याग करुन जंगलात जाऊन रहावे लागेल. तु म्हणतेस ते ही खरे आहे, हे हवं आनी ते पण हवं........ दुनियादारीत नायकाच्या तोंडी एक वाक्य आहे, लहान मुलाला जसे चॉ़कलेट दिले आणि क्याटबरी पुढे केली तर त्याला ते दोन्ही पण हवे असते. (चु.भु.दे.घे.) असो.
संस्कारांचं, मोठ्यांच्या आशीर्वादाचं, भगवद्कृपेचं वल्हं हवंच. मान्यच.....

Pages