सदस्य प्रवेश |
ग्रूप’मी एकदाच काय, पण हज्जारदा परत परत हेच करेन... तुझं ज्यात कल्याण आहे असं माझ्या सत्सदविवेक बुद्धीला वाटतं ना, तेच मी करेन... तुझी मैत्रिण म्हणून माझं तेच कर्तव्य आहे... लहान मुलासारखा हट्टं करतोयस. म्हणे बोलू नकोस माझ्याशी.... गाढवा, अशा अवस्थेत एकटा कसा रहाशील?... विनी तीन महिन्यांची प्रेग्नंट आहे... गुरूला तिचं करतानाच पुरे होतय... माझ्याकडे येऊन तुला रहायचं नाही... हा कसला हट्ट तुझा? दिपू येऊन रहातोय ना तेव्हढ्यासाठी? दिल्या त्याची ट्रान्सफर रद्द करून घेतोय तुझ्या हट्टापायी.. कळतय का काही तुला? अरे, त्याची नोकरी जाईल अशाने... अक्कलशून्य आहेस... बरा असतास तर...’ तिथेच चुळबुळत उभ्या दिपूला काय करावं सुचेना. अनू रूमच्या बाहेर पडलीही होती. त्याने जवळ येऊन विशूच्या खांद्यावर थोपटलं, ’तुला माहितीये अनूचं काय ते... उद्या सकाळी येतो रे... डोक्याला त्रास करून घेऊ नकोस. पण ती म्हणतेय ते खराय रे. एकटा राहू देणार नाही तुला आम्ही. आमच्याकडे येऊन रहायचं नाही तर नाही म्हणून सांग, तिला. पण मग सगळा बाडबिस्तारा घेऊन ती तुझ्याकडे येईल... माझ्यासकट... ते बघ काय ते... आणि या वेळी मी अनूच्या बाजूने आहे.’ थकून विशूने डोळे मिटून घेतले. अनूचं अस्तित्वं ती गेल्यावरही त्याला अवतीभवती जाणवत राहिलं.... ’तुझा खास दोस्त आणि तुझी मैत्रिण... प्रेम करतात एकमेकांवर... लग्नं करतायत.... येत्या डिसेंबरात... प्रेम करतात.. बेहद्द... दोस्त आणि जीवाभावाची... मैत्रिण...’ कुजबुजत स्वत:शी बोलताना कधी आवाज चढला त्याचं त्यालाच कळलं नाही... ते ऐकून नर्स आली, ’मि. विशाल, तुम्ही बोलावलत? काही हवं आहे का?' तिला त्याने हातानेच नाही म्हणून सांगितलं. त्याचं सलाईन वगैरे तपासून ती निघून गेली. ***************************************** तिच्यासमोर कसलेही जोक्स मारायला त्यांना काहीही वाटायचं नाही. महिन्यातल्या त्या चार दिवसात तिची काळजी घ्यायचे चौघेही. बहीण नसलेल्या, घरापासून दूर हॉस्टेलवर आयुष्य गेलेल्या विशालला जरा कठीणच गेलं... अनूचं ग्रूपमध्ये वावरणं. ग्रूपमध्ये रिलेशनशिप्स सुरू करून गोंधळ करायचा नाही असं ह्या पंचायतनाने ठरवलं होतं. मग कधीतरी दिल्याची मैत्रेयी आणि गुरूची विनीही आल्याच ग्रूपमध्ये. पोरींमध्ये अडकून वाट लावलीत ग्रूपची म्हणून आधी त्या दोघांना फटकारणारी अनू नंतर वेळोवेळी या दोघींच्या बाजूने ह्या सगळ्यांशी भांडायला उभी रहायची. पुढे कधीतरी अनूने तिला दिपूबद्दल वाटणारं खास मनातलं... दिपूच्याही आधी विशालला सांगितलं. विशाल भांडला होता तेव्हा तिच्याशी, ग्रूपमध्ये आता तूच गोंधळ घालतेयस म्हणून. तिलाही पटलच. तिचं गाठोडं गुंडाळून त्याने सरळ दिपूसमोर आणून उभी केली होती. प्रसंगी चिडून त्यांच्यापैकी कोणाचाही कान पकडू शकलेली, त्यांना धपाटे घालणारी अनू, दिपूच्या समोर ओंजळीत चेहरा घेऊन उभे होती. लाजेने कोळ झालेली अनू, तिच्याकडे एकटक बघणारा दिपू सोडून समाधानी मनानेच डोळे पुसत निघाला होता ना तो? लग्न करून सेटल झालेले दिल्या आणि गुरू, येत्या डिसेंबरात गाठ बांधणारे दिपू-अनू, अजून कार्तिकस्वामी म्हणून सगळ्यांकडून लाड करून घेणारे, फुलपाखरी आयुष्यात रमलेले आपण, ग्रूपवर पाखर घालून अनू.... असच आयुष्य निर्वेध चालू रहाणार.... सोप्पं, सहज. नक्की कधी ह्या खुळावलेपणात भरकटलो आपण? आपल्याला स्वत:ची लाज कशी वाटत नाहीये? का हे चूक असूनही इतकं खरं, इतकं नितळ वाटतय? पूजेच्या तयारीसारखं पवित्र, सुंदर... कसे बहकलो आपण? एखाद्या मोठ्ठ्या गहन मेझमधून वाट शोधत हिंडताना, चुकलेल्या चौदाव्या वळणावर कळून काय फायदा... की चौदाव्यांदा चुकलो? त्या मेझचं एक ठीकय... परत जाऊ... पण मनाच्या चाललेल्या वाटा अशा सहजासहजी पुसता थोड्याच येतात? एकाच काडीचे दोन तुकडे केले आणि दूर... एकमेकांपासून दूर भिरकावले... तर त्यातला प्रत्येक तुकडा कसं तुकड्यातच अर्धवट, अपूर्ण आयुष्य जगतो... तसं मला जगायचं नाहीये. म्हणून मी अजून पोरीत अडकलो नाहीये. माझा हरवलेला तुकडा सापडेल ना.... तेव्हा सोडणार नाय आपण, जान कुर्बान करू एकवेळ पण पुढलं आयुष्यं तुकड्या-तुकड्यात घालवणार नाही... हे त्याचं तत्वज्ञान अख्ख्या ग्रूपने गंभीर चेहरे ठेवून ऐकून घेतलं होतं आणि मग पोट फुटेस्तोवर हसले होते सगळेजण. वेळोवेळी त्याला तुकडोजी, अर्धवट, हाफ, एकद्वितियांश वगैरे नावांनी चिडवून झालं होतं. अनूमध्ये आपलं अडकणं... नक्की कधी घडलं हे? आठवत का नाहीये आपल्याला? आठवतायत त्या अनूच्या सगळ्या क्षणांना दिपूचा संदर्भ आहे, सुगंध आहे, चौकट आहे... महाबळेश्वरला... पहाटे सायकलिंगला बाहे पडायचं. पुढे-मागे झालं तरी सगळ्यांनी सनसेट पॉइंटला भेटायचं... हा दिप्याचा दुसर्या दिवसाचा प्लान. पेंगुळलेल्या इतर चौघांपैकी कुणालाही हा प्रश्न पडला नाही की दिप्या सकाळी सनसेट पॉइंटला का भेटायचं ठरवतोय? सनसेट पॉईंटला सगळ्यात आधी पोचलेले विशू आणि अनू... पोटात दुखेपर्यंत दिप्याच्या मूर्खपणाबद्दल हसत राहिले... वेळोवेळी दिप्याची तक्रार घेऊन आलेल्या अनूला विशूनेच समजावलं होतं अन अनूशी मुर्खासारखा भांडून आलेल्या दिपूला विशूनेच तिची माफी मागायला लावली होती... नेपाळच्या ट्रॅकिंगच्या ट्रिपमध्ये अनू कधी नव्हे ती, आपल्या दिसण्याबद्दल, टापटिप रहाण्याबद्दल जागरुक झालेली दिसली.... एका काळ्याशार चांदण्या रात्री, ’चल रे जरा माझ्याबरोबर’, म्हणून अनूने विशूला फिरायला बाहेर काढलं होतं.... तेव्हाच दिपूबद्दलच्या तिच्या भावना बोलून दाखवल्या होत्या. पुढे विशूनेच निस्तारलं म्हणा, सगळं... कोणार्कला, नक्षीदार खांबाला टेकून बसलेला दिपू आणि त्याच्या खांद्यावर मान टेकून मंद स्वरात घोरणारी अनू.. हे विशूचं सगळ्यात आवडतं शिल्पं होतं... ********************************************************************************** अनू ग्रूपमध्येच काय पण सगळ्यांच्या घरच्यांनाही हवी-हवीशी वाटणारी. तिचं अवतीभवती वावरणं सुखावतं आपल्याला. आपल्यासाठी काळजी करणं, आपल्याला ओरडण, आपल्याशी भांडणं... सगळंच एका वेगळ्या अर्थाने ’आपल्यासाठी, आपलं’ मानायला लागलोय आपण. हे चूक आहे हे सुद्धा नाकबूल केलं आपल्या निर्लज्ज मनाने? मिटल्या डोळ्यांना फक्त तिच्या येण्याची आस असते, तिचा सूक्ष्म अंगगंध आपल्या श्वासाला किती तीव्रतेने जाणवतो, तिच्या पावलांची चाल आपले कान बरोब्बर टिपतात.... आपण.... आपण चाहूल घेतो आजकल तिची. एकदा का कुणाची चाहूल घ्यायची सवय लागली की... त्याचं व्यसन व्हायला वेळ लागत नाही... माणसाची श्वापदं झालेली बघितलीत. विशाल नुसत्या ह्या विचारांनी शहारला.... पलंगावरून खाली उतरला आणि हळू हळू चालत बाल्कनीत येऊन... थकून बसला.... गेल्या काही दिवसात परिचित झालेला आकाशाचा तुकडा निरखत... हॉस्पिटलच्या आजूबाजूच्या झाडांचा वास येत होता... रानाला असतो तसा... ह्या हिरव्या ताज्या वासाने छाती भरून घेत असताना... एकदम त्याला आठवलं... हॉस्पिटलमध्ये यायच्या चार दिवस आधीचीच गोष्टं... एका शनीवारी सकाळी, अनूकडे पहिल्या चहाला गेले होते.. तो आणि दिप्या... ओलेकिच्च केस झटकत उभ्या अनूला दिपू सकाळच्या पेपरमधली बातमी वाचून दाखवत होता... आणि त्याला मध्येच तोडत विशूने अनूला विचारलं होतं... शॅम्पू बदललायस तू? चकित अनूने दिप्याच्या हातातला पेपर काढून घेऊन त्याच्याच डोक्यावर मारीत म्हटलं... घ्या शिका, काहीतरी. सुंभ्या तुझ्या लक्षात यायला हवं हे.... विशू विचार करीत किती वेळ तसा तिथे बाल्कनीत बसला होता, कुणास ठाऊक... ************************************************************************************** गुरूही सुटलाच मग, ’मी सांगतो तुला, अरे गेली असेल... फुलांचा गुच्च नायतर फ़ेअरवेल कार्डं असलं कायतरी घ्यायला... इकडे आम्ही उल्टे टांगलेले आणि तिकडे ह्या पोरी मॅचिंग ओढणी शोधण्यात...’ इतक्यात विशूने आपली चाकांची खुर्ची गर्रकन फिरवली आणि लांबून त्याला अनू-दिपू येताना दिसले... म्हणजे दिपू अनूला चालवत आणत होता... नाहीतर जणू कोसळलीच असती अनू... विशू वळला म्हणून त्यांना अनू-दिपू दिसले. विशूला सोडून सगळेच अनूभोवती जमले... मंद हसत ती नुस्तच ’अरे, काही नाही रे, साधंच... श्रमाचाच ताप असणार... हा विश्या जातोय त्याचंही असेल.. दु:ख का काय म्हणतात ते', असलं बोलत राहिली. होता तिथेच थांबून विशू अपलक बघत राहिला... तिच नसणं, तिचं येणं, तिचं असणं... सगळंच खोलवर बाणासारखं रुतलं... अगदी खोल... डोळे मिटून त्यानं मग त्या आठवणीची हलक्या हाताने घडी घातली... दोन प्राजक्ताची फुलं त्यावर ठेवून तो कप्पा आपल्या हातांनी बंद केला... ...आणि डोळे उघडले... त्याला दिसला तो आपल्या वेगळा आपला जीवाभावाचा ग्रूप... अनूच्या भोवती जमा झालेला... त्या सगळ्यांना जवळ धरणारी... बांधणारी अनू.... एकमेकांना घट्ट धरून, एकमेकांच्या आधाराने 'एक' झालेला... ग्रूप! अनूसह सगळेच जवळ आले... दिपू आणि अनूचं भांडण झालं होतं.. विशूने अचानक कुणा आत्ये-बहिणीकडे स्वित्झर्लंडला जाण्यावरून... अनूने आपल्याकडे रहायला येण्याचा इतका जोर लावला नसता तर विशू शेवटी ऐकला असता वगैरे वगैरे.... ह्यावर कधी नव्हे ते अनू काही बोललीच नाही... नेहमीसारखी आपलं मत हिरीरीने मांडत भांडलीच नाही... त्यावरूनही दिपू चिडला होता... ’साल्या, तू सुद्धा असा आहेस ना, नेमका हवा तेव्हा वंटास हो, रे... तुम्ही आणि तुमची प्रिन्सिपल्स.. का काय म्हणायची ती... बोडक्याची प्रिन्सिपल्स. अख्ख्या ग्रूपला नष्टं करणारी कसली आलीत तत्वं.... तुमचा इगो... साल्यांनो... ही सुद्धा कमीची नाहीये... इतरांना हज्जार गोष्टी ऐकवेल... आता स्वत:च्या अंगाशी आलंय... तर...’, दिपू चिडून रडवेला झाला होता. फुटणार्या ग्रूपकडे बघून हवालदिल झाला होता... कुणाला दोष द्यावा ते कळंत नव्हतं त्याला... लहान मुलासारखा त्रागा चालला होता. ’दिपू, गप्पं बस. जरा स्वस्थं बस... मी कुठेतरी चंद्रावर वगैरे कायमचा जात नाहीये. हा दिल्या नाहीका जातंय बदली होऊन? तसंच समज... आणि मी अनूवर चिडून जात नाहीये... उगीच तिला छळू नकोस. पूर्ण बरा झालो की भेटूच रे... काय लहान मुलासारखं करतोस?’, विशूने दिपूला समजवायचा प्रयत्नं केला. अनूही गप्प गप्पंच होती.... थोडेतरी सैलावू म्हणून.... विशूजवळ अनूला ठेवून कॉफी-खायला आणायला गेले सगळे... अनूने विशूची खुर्ची ढकलत मोठ्ठ्या काचेच्या खिडकीशी आणली. त्याच्या बाजूला दुसरी खुर्ची ओढून घेऊन नुस्तीच बसली. खिडकीबाहेर बघत विशू काही-बाही बोलत राहिला. तो तिच्यावर रागावून जात नाहीये, स्वित्झर्लंडला जास्त चांगले डॉक्टर्स आहेत, ती आत्ये बहीणही बोलावतेय अनेक वर्षं, ह्या सगळ्याबद्दल, ग्रूप बद्दल, तिच्या-दिपूच्या लग्ना बद्दल, गुरू-विनीच्या बाळाच्या नावाबद्दल, दिल्या-मैत्रेयीवर लक्ष ठेवण्याबद्दल, तिने दिपूचा मूर्खपणा समजून घेण्याबद्दल, अधून मधून त्यांनी भेटण्याबद्दल, तो पूर्ण बरा झाला की त्याच्या परत येण्याबद्दल... इथलं-तिथलं बरचसं.... अनूही खिडकीबाहेर बघत शांतपणे ऐकत राहिली. शेवटी न राहवून उठली आणि गुढगे टेकून त्याच्या समोर बसली... आता विशूला तिची नजर टाळता येईना... ’विशू, मी... मला कळतेय तुझी तडफड.... तू बोलला नाहीस, दाखवलं नाहीस तरी... मला... मला कळलय’ विशू चमकला.... ’नको रे.... तू खरंच ग्रेट आहेस... माझ्यासाठी... माझ्यामागे तू होतास पहाडासारखा.... तुला हे सगळं एकट्यानेच निस्तरायचंय, विशू... कसं करशील रे?.... विशूने डोळ्यातलं पाणी लपवण्यासाठी मान खाली घातली. अनू उभी राहिली आणि परत एकदा अबोल झाली... मागे वळून न बघता जाणार्या विशूला सगळं सगळं दिसत होत... मागे दिल्याने हवेत उंच मारलेली उडी, गुरूने दिपूच्या पाठीवर थाप मारून मग आपणच वाजवलेल्या टाळ्या, दिप्याचं गुरूच्या टाळ्या किंवा दिल्याच्या उड्या संपून आपल्या ’हाय-फाय’ला कोण कधी प्रतिसाद देतो त्याची वाट बघत दोन्ही हात हवेत धरून ठेवणं... विनीचं अनूला बिलगुन आळीपाळीने मुसमुसणं आणि हसणं, अन अनूने उगारलेली मूठ... त्याला पाठीत एकच बुक्की घालायला... अन त्याच पालथ्या मुठीने डोळे पुसणारी... समाप्त. |
|
केवळ अप्रतिम...! आज खरं तर जरा गडबडीत होते, पण तुमची कथा म्हटल्यावर कथा न वाचता जाणे अशक्यच होते. मस्त, सुंदर खुपच!
तशी थोडीशी मीही रिलेट करते या कथेशी. मी आणि माझा नवरा, दोघेही एकाच ग्रुपमधले. आणि आमच्या ग्रुपमध्येही मी एकटीच मुलगी होते. तुम्ही लिहिल्या प्रमाणे सगळे खुप जपायचे मला, खुप लाड करायचे. कॉले़जमध्ये मैत्रीणी हेवा करायच्या असा ग्रुप मिळाला म्हणुन. एकाची ओरल एक्झाम असली तरी पाचही जण हजर असणार तिथे. सगळीकडे बरोबरच जाणार आम्ही. 'तो' ग्रुप म्हणुन संबोधायचे सगळे.
अगदी इंजि.ची परीक्षा संपल्यावर माझ्या हट्टाखातर 3D 'छोटा चेतन' बघितला होता सगळ्यांनी. पुर्ण सिनेमाभर माझी चेष्टा चालु होती.
थँक्यु दाद, तुम्ही ते सगळे जुने दिवस उभे केलेत डोळ्यांसमोर.... ते दिवस, तो दंगा, एकत्र केलेला अभ्यास, भांडणं सगळं आठवलं...
आणि जाणवलं की ते सगळं दूर गेलंच नव्हतं, इथेच माझ्या मनाच्या एका कोपर्यात आहे लपलेलं..
धन्यवाद.
"रोप-बीप नाहीच एकदम सडा पडल्यावरच कळतय, ", "डोळे मिटून त्यानं मग त्या आठवणीची हलक्या हाताने घडी घातली... दोन प्राजक्ताची फुलं त्यावर ठेवून तो कप्पा आपल्या हातांनी बंद केला"", "मनाच्या मातीला लागलेला प्राजक्ती दरवळाचा शेवटचा कण""..
वा ! अप्रतीम.. एकदम दाद स्टाईल !!
सही ... किती छान रंगवलय . कॉलेजातले ते दिवस आठवले , मित्र , मैत्रिणी आठवले , ग्रुप आठवला ...
प्रत्येक क्षण उभा राहिला डोळ्यासमोर ..
माझेही जुने छान - वाईट दिवस आठवले...चुकाही झाल्या होत्या त्या अजाणत्या वयात. त्यामुळे ग्रुप फुटला पण चांगल्या आठवणी ताज्या झाल्या.
दाद, अप्रतीम आहे कथा! वाचल्याबरोबर जुन्या आठवणी परत जाग्या झाल्या. एखाद्या पुस्तकाच्या पानात आपण चॉकलेटची चांदी जपून ठेवलेली असते. अनेक दिवसानी ते पुस्तक उघडले की ती चांदी बाहेर येते आणि वार्यावर हलकेच हिंदोळे घेत घेत अलगद जमीनीवर बसते. अगदी तश्शी अवस्था झाली.
दाद, 'फुलं' लिहून जितकं हसवलंस त्याहून जास्त 'गृप' लिहून गदगदवलंस बघ........... अगदी आत, खोल खोल रुतेल असं लिहिलं आहेस...
दाद दिल्याशिवाय नाहि रहावत "दाद". मनातला हळुवार कप्पा अलगद उलगडल्यासारख झालय्. आभारी आहे दाद.
बाप रे!!! दाद काय लिहितेस ग.
रोप-बीप नाहीच एकदम सडा पडल्यावरच कळतय...
अप्रतिम.
सुंदर...!
अप्रतिम,
किति सुरेख लिहित तुम्हि. एक क्षणभर वाटल हि कथा नाहिच हे सगळेच खरेखुरे हाडामासाचेच आहेत.
apratim
नेहमीप्रमाणेच छान लिहिलय.
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**
Ekadam "Touch" zal.......
khupach chhan lihates daad...
शलाका आवडली गं कथा.. मस्त जमलीये.
दाद, नेहमीप्रमाणेच अप्रतिम!!
का माहित नाही पण उगाचच 'दुनियादारी'ची आठवण झाली..
दाद अगदी एक वैयक्तिक संदर्भामूळे कथा खुप आवडली. आमचा पाच जणांचा एक ग्रुप होता. १५ वर्षे आमची मैत्री होती. त्याकाळात मुलामुलीनी एकत्र वावरायची प्रथा नसल्याने ग्रुपमधे कुणीच मुलगी नव्हती. पुढे आमचा ग्रुप फुटला. पुसटसा संपर्कही नाहि राहिला आता.
हि कथा वाचून वाटले, एखादी मुलगी असती तर आमच्या ग्रुपमधे.
असे नसते झाले.
मस्त कथा........
हर एक ओळ निव्वळ सुंदरच ग, काय म्हणु? अप्रतिम.
छान आहे कथा एकदम. कॉलेज मधे असतान आमचा पण असाच पाच जणिंचा गृप होता. आमचे पण ठरले होते कुणा मुलाला ह्यात न घेण्याचे. शेवटच्या वर्षात जाइपर्यंत त्यातल्या दोघींचे सुर जुळलेच कोणा-कोणाशी. त्यातला एकिचा बी एफ (आता नवरा) आमचा वर्गमित्र होता (आहे). पुढे नंतर तिसरिने ह्याच्यावर तिचाही जीव जडला होता असे मला सांगितले. मला तर टक्कल पडायचे बाकी राहिले. एक तर मी आणि चौथीला heartless women असे म्हणत. कोणाला काही chocolate, etc मिळाले कि आम्ही ते गट्टम करौन खिदळत असु. त्यांच्या चंद्र-तर्यांच्या "श्टोरिज" म्हणजे आमच्या खिदळण्याला उधाण. त्यात हे काय नविनच असे वाटले. अर्थात तिलाही ते माहित होते. नंतर योगायोगाने माझे आणि ह्या चौथीचे साधारण एकाच वेळी "love marriage" झाले. कहर म्हणजे ह्या चौथीने तिच्या नवर्याला स्वताच मनातील भावना सांगितल्या होत्या. मग काय बाकी सगळ्यांनी चिडवुन चिडवुन भरपुर उट्टे काढले
दाद.. दाद... दाद... दाद..
धन्यवाद. आपल्यातले बरेच जण परत एकदा 'कॉलेजवारी' करून आलेले दिसतात ह्या निमित्ताने.
मी ह्या कथेचे दोन शेवट केले. एक सुखांन्त जो इथे दिलाय. आणि दुसरा.... वेल, तो ही पोस्टलाय.
http://www.maayboli.com/node/2043
हा शेवट आवडलेला दिसतो बर्याच जणांना... तो आवडतो का बघूया...
रडवलेत तुम्ही मला................ खुपच ..... शब्दच सुचत नाहीत.
दाद, कथा सुंदर आहे. आणि हाच शेवट चांगला आहे.
अनुचे येऊ नकोस असे सुचवणे हे पटले नाही. म्हणजे, ती तस करेल अस वाटत नाही.
कथा छोटी वाटली. कारण बहूतेक वाचायला सुरवात केल्यापासूनच 'दुनियादारी' कादंबरी आठवत राहीली.
पुन्हा एक सुरेख कथा दाद..
अप्रतिम!
ते कॉलेज सोनेरी दिवस -----------!
विसरताच येणार नाहित.
दर्शा
ह्ह्ह्म्म्म्म........... सव्या म्हणतोय तसच..
मलाही दुनियादारी आठवलं.
खूप मस्त वाटलं.
..प्रज्ञा