भारतीय किनारे खरोखर सुरक्षित आहेत काय ?

Submitted by महेश on 28 June, 2011 - 15:16

मेल मधे आलेला लेख खुप चांगला उद्बोधक वाटला म्हणुन येथे देत आहे.

या MV Wisdom पासून आपण काही शहाणपणा शिकणार आहोत का?
उठता बसता शिवाजी महाराजांचं नाव घेणारे राज्यकर्ते आणि विरोधी पक्ष लाभलेल्या राज्यात आपण राहतो आहोत. पण आपली सामुहिक शिवभक्ती दाढी वाढवून किंवा घराला बुरुज बांधून, शिवजयंतीला नाचून किंवा फार तर ढोंगी शिवभक्तांना शिव्यांची लाखोली वाहूनच व्यक्त होवू शकते. त्यांची दूरदृष्टी, किल्ल्यांच्या सुरक्षेची काळजी,किंवा नैतिक उंची या भानगडी आपल्यापर्यंत फारशा पोचत नाहीत, परवडत तर अजिबात नाहीत.
२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर भयंकर हल्ला झाला. केवळ १० अतिरेक्यांनी सगळी मुंबईची सुरक्षा यंत्रणा ४ दिवस वेठीला धरली. यासाठी लागणारा सगळा दारूगोळा आणि अत्याधुनिक संपर्क साधनं घेवून ते समुद्रमार्गानी मुंबईत शिरले. त्यानंतरच्या काळात प्रत्येक सुरक्षा अधिकारी आणि संबंधित किंवा असंबद्ध मंत्री आपल्याला जोरदार भाषण देवून सांगत होते, की आता मुंबई आणि पश्चिम किनारपट्टीच्या रक्षणाची पुरेपूर काळजी घेतली जाईल, त्यासाठी पैसा कमी पडू दिला जाणार नाही, वगैरे वगैरे.
त्या हल्ल्यानंतर आपण मुंबईच्या किनारपट्टीवर काय काय बघितलं?
२३ मार्च २०१०: तट रक्षक दलाचे विवेक नावाचे जहाज इंदिरा गोदीत दुरुस्तीसाठी उभं असताना त्याच्यावर ग्लोबल प्युरीटी नावाचे मालवाहू जहाज आपटल्यामुळे उलटलं, आणि तळाला गेलं. दुरुस्तीच्या काळात याच्या रक्षणाची जबाबदारी कोणाची, तसच इंदिरा गोदीत असे अपघात होवू नयेत, हे कोण पाहणार, हे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.
१० ऑगस्ट २०१०: खालेजा आणि चित्रा नावाच्या २ मालवाहू जहाजांची मुंबई बंदरालागत ५ किलोमीटरवर टक्कर झाली, आणि जहाजातून समुद्रात कोसळलेल्या कंटेनर्सच्या भितीनी मुंबई बंदर काही काळ बंद ठेवावं लागलं. जवळजवळ ४०० टन खनिज तेल समुद्रात सांडले. नौदलाला बरीच डोकेफोड करून हा मार्ग मोकळा करावा लागला. पण मुंबईचे किनारे, आणि विशेषतः तिवराच्या किनाऱ्यांच, पर्यावरणाचं बराच नुकसान थांबवता आलं नाही. मच्छीमार अनेक दिवस मासेमारी करू शकले नाहीत. ज्या परिसरात जहाजांची वाहतूक पूर्णपणे बंदर व्यवस्थापन नियंत्रीत करत असते, तेथील या महागड्या आणि धोकेदायक अपघाताची जबाबदारी कधी नक्की झालीच नाही.
३१ ऑगस्ट २०१०: डॉल्फीन, आणि नंद हजारा या जहाजांची इंदिरा डॉक मध्ये टक्कर झाली. चौकशीमध्ये स्पष्ट झालं, की गोदीतल्या जहाजांचे वाहतूक नियंत्रण करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, त्यांचे प्रशिक्षण पुरेसे नाही, आणि त्यांना नियमांचे पुरेसे गांभीर्य नाही.
३० जानेवारी २०११: नोर्दीक्लेक (चूक भूल द्यावीघ्यावी) नावाचे मालवाहू जहाज, भारतीय नौदलाच्या विंध्यगिरी नावाच्या (फ्रिगेट श्रेणीच्या, विमानवाहू ) लढाऊ जहाजावर समोरासमोर आदळलं. आश्चर्य असं, की लढाईत मोठ नुकसान सहन करूनही लढत राहण्यासाठी बांधलेल्या विन्ध्यगीरीच्या इंजिनाला आग लागली. ती विझवण्याच्या प्रयत्नात बोटीत इतकं पाणी शिरलं, की हे लढाऊ जहाज चक्क बुडल!. त्या दिवशी या जहाजात नौसैनिक, अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय असे सगळे, अन्य ४ नौदलाच्या बोटींसह समुद्र सहलीला गेले होते. सुदैवाने कोणाला जीव गमवावा लागला नाही. नंतरच्या चौकशीत असं कळल, की या एकूण गोंधळात भाग घेतलेली ५ नौदलाची आणि २ मालवाहू अशा जहाजांपैकी काहींनी आपला ठरलेले, आखून दिलेला मार्ग सोडून दिला होता. रस्त्यावर गाडी चालवताना समोरच्या लेनमध्ये घुसल्यामुळे, थोडक्यात बेदरकारपणे वाहन हाकल्यामुळे, हा मोठा अपघात झाला. Vessel Traffic Management System नावाची अत्याधुनिक यंत्रणा दोन्ही जहाजांवर असूनही हा अपघात झालाच. माझगाव गोदीत १९८१मध्ये ७१ कोटी रुपये खर्चून उभारलेलं हे जहाज ५ महिन्यांच्या प्रयत्नानंतर काही दिवसांपूर्वी एकदाचं बाहेर काढलय. आता ते दुरुस्त करून पुन्हा वापरता येवू शकतं का, याचे प्रयत्न सुरु होतील.

Juhu_Jahaj.jpg

जुहू चौपाटीवर रुतलेल्या जहाजाकडे मोठ्या उत्सुकतेने पाहणारे हौशी मुंबईकर

वरवर बघता यापेक्षा किरकोळ वाटणारं, पण या सगळ्या अपघातांपेक्षा जास्त गंभीर प्रकरण आहे, ते गेल्या १५ दिवसांपासून बांद्र्याच्या किनाऱ्यासमोर रुतलेल्या MV Wisdom नामक जहाजाचे.
काय आहे याचा इतिहास? हे कुठून इथे आलंय? कुठे निघाल होत? का? आणि ते असं भरकटल कस काय? हे थेट किनाऱ्याशी भिडेपर्यंत कोणालाच कळलं नाही, की कोणालाच थांबवता आलं नाही? जर हे धूड बांद्र सी लिंकला धडकले असते तर? याचे मालक कोण? त्यांना याची काही काळजी कशी नाही? असे अनंत प्रश्न या जहाजाने उभे केले आहेत. आपण थोडक्यात या साऱ्या प्रश्नांचा उलगडा करायचा प्रयत्न करूयात.
या जहाजाचा प्रवास सुरु झाला तो १९८४ साली, जर्मनीत, हम्बुर्गमध्ये. त्याचं मूळ नाव ‘ओलांदिया’. त्यानंतर अनेक वेळा देश, मालक, नाव, आणि अवस्था बदलत बदलत सध्या त्याची मालकी कोणाकडे आहे, ते मात्र नक्की सांगता येत नाही. सिंगापूरच्या ‘अल् युनायटेड मेरीटाईम बिझनेस प्रा. ली.’ चे नाव बोटीच्या कागदपत्रांमध्ये आहे. पण अलंग च्या एखाद्या भंगार व्यापाऱ्याने हे विकत घेतलं असेल, असं बोललं जातं. मुंबईत गोदी च्या आसपासच्या पानवाल्यापासून अनेकांना हे गुपित ठाऊक असेल, पण अधिकृतपणे मात्र ‘तपास चालू आहे’. २६ वर्ष समुद्रावर भटकल्यावर आता हे जहाज गुजराथमधील अलंग बंदरात आणून रीतसर भंगारमध्ये काढायची तयारी सुरु झाली होती. हा शेवटचा प्रवास स्वत:च्या बळावर करण्याची शक्ती या जहाजात नव्हती. त्यामुळे अपघातात निकामी झालेली गाडी ‘टोचन’ करून न्यावी तसं वीजडम् ला न्यायच ठरलं.
६०० टन वजनाच, इंजिन बंद असलेलं, रिकाम जहाज खेचून नेण हा प्रकार धोकेदायक समजला जातो. जगात सगळीकडे प्रत्यक्ष ओढण्यासाठी २ टग बोटी, आणि एक राखीव टग बोट बरोबर जाणे आवश्यक समजतात. शिवाय हे लटांबर किनाऱ्यापासून पुरेसे लांबून न्यावे आणि त्याला ज्या बंदरात जायचयं ते जवळ आलं, की मग किनाऱ्याकडे येताना अन्य जहाजे, दीपस्तंभ, वगैरेपासून सांभाळून, शक्यतोवर तटरक्षक दलाच्या मार्गदर्शनाखाली आणावे असे संकेत आहेत. या शिवाय या सगळ्या जहाजांनी स्वतंत्रपणे जवळच्या किनाऱ्यावरच्या अधिकाऱ्यांना दर काही तासांनी संपर्क करून आपण कुठे आहोत ती जागा (अक्षांश, रेखांश), वाऱ्याची दिशा, वेग, लाटा, हवामान वगैरे माहिती कळवत राहणे, आणि त्यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणेही आवश्यक असते.
आता प्रत्यक्षात काय काय घडल? वीजडम् लं ओढायला ‘सीबल्क प्लोव्हर’ नावाची एकच टग बोट हजर होती. शेवटी भंगार जहाजावर एवढा खर्च करायचं काही कारण मालकांना दिसेना. शिवाय भारतातच तर जायचं, काही गडबड झाली, तरी सांभाळून घेवू, असा एक आत्मविश्वास त्यांना असेलच. हे जहाज कोलंबोहून निघालं, ते केव्हा तरी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात. खरं तर हा काळ श्रीलंका किंवा दक्षिण भारताच्या किनारपट्टीवर मान्सूनचे वारे सुटण्याचा, आणि समुद्र खवळलेला राहण्याचा. त्यामुळे असे धोकेदायक प्रवास टाळले जातात, किंवा मान्सून सुरु व्हायच्या आत घाईघाईने उरकले जातात. पण कोलंबो बंदराबाहेर या जहाजाने बराच वेळ घालवला. कदाचित या काळात वीजडम् च्या खरेदीचा व्यवहार पूर्ण झालं असेल. प्रत्यक्षात जेव्हा २९ मे रोजी प्रवास सुरु झाला, तेव्हा कोलंबो बंदराच्या अधिकाऱ्यांकडे नोंद केली गेली, की आता हे जहाज केरळात कोच्ची बंदराकडे निघालं आहे. या वेळेपर्यंत हे ‘सीबल्क प्लोव्हर’ दर ६-८ तासांनी आपण कुठे आहोत, हे कोलंबोला कळवत होते. या टग बोट वर उपग्रहाच्या माध्यमातून भर समुद्रातही चालणारी आधुनिक मोबाईल यंत्रणा होती, आणि अर्थात ही यंत्रणा चालवू शकणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्गही असेल. पण कोलंबोहून निघाल्यानंतर, ३०मे २०११ च्या संध्याकाळी ६ नंतर, या जहाजाने एकदाही कुठल्याही बंदराशी संपर्क करून आपले ठिकाण वगैरे कळवायचे कष्ट घेतले नाहीत. जर हे प्रकरण कोच्चीला बंदरात गेलं असेल, तर त्यांच्याकडे याची नोंद नाही. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर, मुंबई पर्यंत, लहान मोठी २१ बंदरे आहेत. शिवाय नौसेनेची ठिकाणे, दीपस्तंभ, स्वतंत्र वाहतूक नियंत्रक, या प्रत्येक ठिकाणच्या रडारवर हे जहाज दिसलं असेल. यांची क्षमता किमान १०० किलो मीटर पर्यंत असते. शिवाय वीजडम् मध्ये काहीच माल नव्हता. इंधनही नव्हतं. त्यामुळे हे जहाज जवळजवळ सगळं पाण्याच्या पातळीच्या वर असेल. अशा परिस्थतीत तर ते नुसत्या डोळ्यांनाही बऱ्याच लांबून दिसत असेल. शिवाय या परिसरात जी अन्य मालवाहू, किंवा नौदलाची, तट रक्षक दलाची जहाजं असतील, त्यांनाही रडारवर ही जोडगोळी दिसली असेल. जर एखादे अनोळखी जहाज, कुठलाही संपर्क न करता या परिसरात दिसत असेल, तर त्या जहाजाला संपर्क करून सावध करणे, संपर्क नं झाल्यास प्रत्यक्ष स्पीडबोट वगैरे पाठवून जहाजाला तंबी देणे किंवा गरज असेल तर मदत देणे, हे तट रक्षक दलाचे रोजचे कामच आहे. प्रत्यक्षात भारताच्या सागरी हद्दीत दीड हजार किलोमीटर प्रवास करणाऱ्या या जहाजाबाबत असे काही घडल्याची अधिकृत नोंद नाही. या प्रवासात त्यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न कदाचित अन्य जहाजांनीही केला असेल. आणि संपर्क नं झाल्याबद्दल, किंवा किनाऱ्याच्या फार जवळून अशी धोकेदायक बोट जात असल्याबद्दल त्यांनी तक्रारही केली असेल. पण अशा तक्रारीचं काय झालं, हे काही कोणी अधिकृतपणे सांगायला तयार नाही.
शेवटी, हा १५०० किलोमीटरचा प्रवास संपवल्यानंतर, मुंबई बंदर आणि बॉम्बे हाय च्या तेल विहिरींच्या मधून पुढे आल्यानंतर, ११जूनला, या दोन्ही बोटींना बांधून ठेवणारा दोर/ साखळदंड तुटला, आणि वीजडम्चं पुढचा प्रवास फक्त वारा, समुद्राच्या लता, आणि प्रवाह यांच्या मर्जीवर चालू झाला. सीबल्क प्लोव्हर ने, म्हणे, या घटनेची माहिती लगेच तट रक्षक दलाला दिली होती. पण आता पोलिसांनी जी तक्रार नोंदवली आहे, त्याच्यात असं लिहिलंय, की अशी काही माहिती दिली नाही. इकडे वाऱ्यावर भरकटत वीजडम् किनाऱ्याकडे आलं, आणि बांद्द्रा सी लिंक पासून अगदी जवळ, जुहू चौपाटी जवळ, वाळूत फसल. ते किनारपट्टीपासून इतकं जवळ आहे, की लोक त्याला बघायला गर्दी करायला लागले आहेत.
सागरी सुरक्षेची ‘डोळ्यात तेल घालून’ काळजी घेणाऱ्या सगळ्या यंत्रणा कुचकामी होत्या, की त्यांना काही सूचना मिळाल्या होत्या? मागच्या वेळेला अतिरेक्यांनी एक मच्छीमार नौका ताब्यात घेतली, आणि केवळ पाठीवर उचलून आणता येईल इतकेच समान त्यांना घेवून येत आले. या ६००० टन क्षमतेच्या जहाजातून काय काय आणता आलं असतं? बंदुका, दारूगोळा, लष्करी ट्रक्स, की एखादा लहानसा अणुबॉम्ब? किती माणस येवू शकली असती? हे जहाज बॉम्बे हाय परिसरात, तेल विहिरीवर किंवा तेलवाहू जहाजावर आपटलं असतं तर? काही नौकानयन तज्ञांचे मत असे आहे, की दोर तुटल्याची कथा ही शुद्ध बकवास आहे. भरतीची वेळ, वाऱ्याचा वेग, सागरी प्रवाह, याचं गणित मांडून बांद्द्रा सी लिंक वर आपटेल, अशा बेतानी हे जहाज मुद्दाम योग्य जागी आणून सोडून दिले. आणि केवळ नशिबानी, वाऱ्याची दिशा थोडी बदलल्यामुळे, तिथून ३-४ किलोमीटर दूर येवून रुतल. पण लिंकवर आपटले असते तर? १६,००० कोटी रुपये पाण्यात गेले असते. शिवाय जगभर बेअब्रू झाली असती, ती वेगळीच.
यातला सगळ्यात मोठा, महत्वाचा मुद्दा आहे तो सर्व सुरक्षा यंत्रणांनी हा विषय उपेक्षेनी मारण्याचा. टगबोटीच्या कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून, त्यांना हे रुतलेले जहाज काढायला मदत करण्यासाठी थांबवून ठेवणे, या पलीकडे या संदर्भात काहीही कारवाई झालेली नाही. हे जहाज रुतल्यावर त्याचा एक नांगर टाकून ते स्थिर करणारे कोणीतरी या जहाजावर होते. त्यांचे पुढे काय झाले? ते कुठे गेले? त्यांना कोणी शोधतय का? केरळ पासून मुंबईपर्यंत या जहाजांना संपर्क करायचा कोणी प्रयत्न केला का? कोच्ची, मंगलोर, पणजी, मार्मागोवा, जवाहरलाल नेहरु पोर्ट, बॉम्बे हाय या महत्वाच्या ठिकाणी (तरी) जहाजांच्या प्रत्येक संपर्काचे लॉग बुक ठेवलेले असेल. त्यात अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील. किंवा नवीन प्रश्न निर्माण होतील.
नौकानयन, बंदर व्यवस्थापन, किंवा सागरी सुरक्षा या विषयाचे अजिबात ज्ञान नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला पडलेले काही प्रश्न:
१) वीजडम् आणि सीबल्क प्लोव्हर, या दोन्ही जहाजांवर Automatic Identification System होती का? ती चालू होती का?
२) समुद्र प्रवासास अयोग्य जहाजांना भारताच्या सागरी हद्दीत प्रवेश करतांना भारताची परवानगी घेणे आवश्यक आहे, आणि अशा जहाजांना परवानगी नाकारण्याचा, किंवा योग्य अटींवरच प्रवेश देण्याचा पूर्ण अधिकार, आंतरराष्ट्रीय संकेतानुसार, भारताला आहे. अशी परवानगी मागितली होती का? दिली होती का? काय अटींवर?
३) असे धोकेदायक, आणि स्वत:ची ओळख लपवलेले जहाज सागरी हद्दीतून १,५०० किलोमीटर प्रवास करेपर्यंत सुरक्षा व्यवस्थेच्या नजरेला पडले नाही का? की ‘आपल्या माणसांच्या’ गाड्या जशा टोल नं भरता, जकात नाक्यावर नं थांबता निघून जावू शकतात, तशी काही व्यवस्था या जोडगोळीसाठी झालेली होती?
४) अशा ‘टग – टो’ प्रवासासाठी सागरी वाहतूक विभागाच्या महानिर्देशाकांनी १९७४ साली एक नियमावली लागू केली होती. या प्रकरणात तिची पूर्ण अंमलबजावणी झाली का? गेल्या ३६ वर्षांत जगात, विशेषत: संपर्क साधने आणि अतिरेकी कारवाया या २ संदर्भात जे फरक पडले, त्यानुसार या नियमात काही बदल करावेसे वाटले नाही का?
५) या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांचे मौन बेफीकीरीतून आले आहे, की त्यामागे स्वत:ची कातडी वाचवण्याचा साधासा विचार आहे?
सागरी सुरक्षेबद्दलइतके निष्काळजी राहणे आपल्याला परवडेल का? अशा परिस्थितीत शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा आपल्याला काही अधिकार आहे का? एकीकडे सतत मोगलांशी लढाया चालू असताना, भविष्यातल्या शत्रूंना शह देण्यासाठी नवीन सागरी किल्ले बांधून किंवा जुने दुरुस्त करून, त्यासाठी पाण्यासारखा पैसा आणि मनुष्यबळ खर्च करणाऱ्या राजाची दूरदृष्टी असणारे राज्यकर्ते आता कुठून आणायचे? ठरलेल्या कर्तव्यात चूक करणाऱ्या प्रतापराव गुजरांना ‘काम पूर्ण झाल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका’ असे ठणकावून सांगणाऱ्या महाराजांचे सहकारी एवढ्या शब्दाखातर प्राण द्यायला तयार होते. आजच्या राज्यकर्त्यांमध्ये असे काही करण्याचे नैतिक बळ आहे का? मोक्याच्या जागी बदली मिळवतांना मोजून पैसे देणारा अशा वेळी त्याचे कर्तव्य बजावेल की त्याची गुंतवणूक वसूल करायची संधी म्हणून अशा एखाद्या जहाजाकडे दुर्लक्ष करेल? काही गडबड झाली, तर सांभाळून घेणारे साहेब आहेतच.
पण राज्यकर्त्यांना आणि सरकारी बाबूंना शिव्या देवून आपली जबाबदारी संपते का? योग्य माणसे या जागांवर बसवण्याची काळजी नं घेणारा आपला समाज, नक्की कुठल्या टप्प्यावर धडा शिकेल? ‘मला काय त्याचे’ हा प्रश्न एक दिवस अचानक गैरलागू बनतो, हे आपल्याला कधी कळणार? आपल्याला कदाचित शिवाजी निर्माण करता येणार नाही. पण सुरक्षा नियमाचा आग्रह धरणारा एखादा सावळ्या जर आपल्याला भेटला, तर त्याला दमदाटी करून, किंवा चहापाणी देवून, त्यालाही बनचुका करायच्या ऐवजी आपण त्याचे कौतुक करून, नियम पाळून, त्याचा उत्साह तर वाढवू शकतो!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

महेश आत्ताच वाचलं. काळजी करण्यासारखे आहे खरे. पण ही बेपर्वाही, पूर्वनियोजितही असू शकेल.
भावनगरजवळच्या त्या अलंगशी माझा काही काळ संबंध होता. जहाजांच्या भंगारकामात काही धोकादायक रसायने असू शकतात. जगात आणखी कुणीही हे काम अंगावर घ्यायला तयार नाही म्हणून ती अलंगला आणतात. तिथे जहाजावरच्या सामानासकट लिलाव होतो. (काही अंधश्रद्धामूळे जहाजावरच्या वस्तू जहाजावरच सोडल्या जातात.) अलंगला या वस्तूंचा बाजार भरतो.
या अलंगला गोड्या पाण्याची अजिबात सोय नाही, पण तिथला उथळ समुद्र या कामासाठी योग्य असल्याने तिथे हा उद्योग चालतो.

वि.सू. - जर हा लेख मेल मधून आला आहे तर लेखकाचा उल्लेख होणे अत्यावश्यक आहे.

दिनेशदा मी माबोवर हा लेख प्रसिद्ध करण्याआधी मेल केलेल्या व्यक्तीला विचारले होते.
पण ज्यांच्याकडून मेल आले त्यांना देखील ते असेच फॉरवर्डेड मधे मिळाले होते.
त्यामुळे मुळ लेखक कोण हे माहित नाहीये.
मला आश्चर्य एका गोष्टीचे वाटते की पार श्रीलंकेवरून निघाल्यापासुन मुंबईला पोहोचेपर्यंत आपल्या कोणत्याच किनारा रक्षक दलाने याची दखल कशी घेतली नाही ?

Atul Patankar | 30 June, 2011 - 11:47 नवीन
हा लेख मी लिहिला आहे, आणि माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केला आहे.

प्रतिक्रिया, प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे.
>> shocked.gif

हा लेख मी लिहिला आहे, आणि माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केला आहे.

अतुल

हा लेख वर्तमान पत्रास पाठवलाय का? नसेल तर जरूर पाठवा, वाचनीय आहे

अतुल, अतिशय माहितीपुर्ण आणि विचार करायला लावणारा लेख आहे.
वर्तमान पत्रांना पाठवला नसेल तर खरच पाठवा.
तुम्ही सुचवल्याप्रमाणे हि ट्रायलही असु शकते Sad
सागरी हद्दीत किनार्‍यांवर योग्य प्रकारे चेकींग होत नाही याविषयी एक अहवाल मुंबईवरचा हल्ला व्हायच्या थोडा आधीच कुणीतरी दिला होता असे ऐकिवात आहे. कुठे दुवे कच्चे आहेत आणि कशाप्रकारे , कुठुन लोक घुसु शकतात हे देखील म्हणे या अहवालात होते. तो बहुधा कचर्‍याच्या पेटीत गेला. चेकिंग मधे ढिलाई ठेवण्याचे एक कारण अमली पदार्थाचा चोरटा व्यापार हाही आहे असे वाटते.

महेश , हा लेख इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

मी ही हेच लिहिणार होते की हा लेख वर्तमानपत्रात पाठवण्याच्या योग्यतेचा आहे, जेणेकरून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल.

टी.व्ही.वर जे दाखवत होते त्यात जुहूच्या समुद्रकिनार्‍यावर गणपती विसर्जनासाठी लोटते तशी गर्दी लोटली होती ह्या फुटकळ 'विझडम' ला बघायला. रिपोर्टर सांगत होती, की पुढच्या भरतीच्या वेळेस येणार्‍या मोठ्ठ्या लाटेमुळे हे जहाज आत (समुद्रात) जाण्याची शक्यता आहे. पण त्या अपेक्षित लाटेच्या उंचीएवढी लाट/लाटा आल्या तर मुंबईत परत २६ जुलैसारखी परिस्थिती ओढवू शकते. त्यामुळे एकंदर कठीण परिस्थितीच आहे.

बाकी सुरक्षेबद्दल जे लिहिलंय ते खूपच विचार करण्यासारखं व गंभीर आहे.

अतुल, अतिशय माहितीपुर्ण आणि विचार करायला लावणारा लेख आहे.
वर्तमान पत्रांना पाठवला नसेल तर खरच पाठवा. >> अनुमोदन!

महेश धन्यवाद इथे टाकल्याबद्दल.

भारतीय किनाय्रांची अवस्था मंदिरातल्या घंटेसारखी झाली आहे, कोणीही या आणि वाजवून जा. ... योग्य माणसे या जागांवर बसवण्याची काळजी नं घेणारा आपला समाज, नक्की कुठल्या टप्प्यावर धडा शिकेल?>>> १००% true...
...............वाचनीय लेख

मायबोलीवर अनेकांनी लेख पेपरला द्यायला सुचवले आहे. non technical किंवा अप्रसिद्ध व्यक्तींनी केलेल्या लिखाणाबाबत वर्तमानपत्रे फार उत्साह दाखवत नाहीत. माझा आधीचा अनुभव फार बरा नाही. तरी पण, तुम्ही आणि काही मित्रांनीही आग्रह केल्यामुळे पुन्हा एकदा पाठवून बघीन.

अतुल, अतिशय माहितीपुर्ण आणि विचार करायला लावणारा लेख आहे.
वर्तमान पत्रांना पाठवला नसेल तर खरच पाठवा. >> अनुमोदन!

महेशना धन्यवाद.

अगदि आभ्यासपुर्ण लेखन. लिहिण्याबद्दल अतुल यांचे तर पोस्ट टाक्ण्याबद्द्ल महेश यांचे धन्यवाद.

योग्य माणसे योग्य सरकार ही hypothetical situation आहे. भारतात कूठलेही सरकार आले व किती ही योग्य माणसे आली तरी कूठलाही महत्वाचा निर्णय घेणे हे बन्धन कार क नाही. कुठल्याही गोश्ठी वर निर्णय घेवुन एका नवीन वादाला जन्म देण्या पेक्षा निर्णय टा ळ ण्या ची प्रव्रुत्ती ह्या सरकारची आहे.
वरळी बांद्रा सी लिन्क ला बान्धायला १० वर्ष लागली पण चीनला भर समुद्रात ३८.८ कीमीचा पूल बान्धायला फक्त ५ वर्ष् लागली. नरीमन पोइन्ट ते बोरीवलीहा जलमार्ग योजना लाल फीतीत वर्ष
अडकून पडली व आता त्या टेन्डर ची मुदत ही सम्पली आहे.

गेल्या ६४ वर्षात देशाची परीस्थीती पहा. भारतावर ५ यु द्ध लादली गेली. भारता ने स्वताला nuclear bombने सुस्जीत केले पण त्यानंतरही ९/११ सरखा ह ल्ला झालाच. हल्ल्या नतंर दाखवलेली
सहनशीलता वैगेरे बाब वगळता हा प्रथम हल्लाकरण्याच धाडस दु श्म न दे शा म ध्ये झा ले ह्या चा वि चा र क र ण्या ची ग र ज आ हे.

आता जगभरत राजेशाही विरुद्ध मोहिम / उठाव होतो आहे. त्या देशांना लोकशाही हवी आहे म्हणे. त्यांनी भारताचा उदाहरण घ्यावा व निर्णय घ्यावा.

विवेक, लोकशाही असो किंवा राजेशाही असो त्यामधे स्वार्थ बाजुला ठेवून सामाजिक बांधिलकी जपणारे नेते असतील तर ती व्यवस्था यशस्वी होते. उदा. लालबहादूर शास्त्रींसारखे अनेक नेते असले पाहिजेत.

ज र चीन ला सी लिन्क बान्धायला दिला असता तर त्यांनी तो २.६ महीन्यात बान्धला असता.

सर्व जगगा चा वीव्ह india & china v/s rest of world असा आहे पण भार त ची न च्या जवळ पास तरी आहे का ? गेल्या २० वर्षा तील चीन ची भरारी पहाता त्यातील फोल पणा आपल्या ला समजेल.

स्विस् बन्के तील पैसा सोडा, फक्त पीकलेल्या धान्याची ठीक रखवाली व योग्य वितरण केले तरी
भारतात जनतेला उपाशी झोपवे लागणार नाही. दर वर्षी ८०००० टन धान्य योग्य storage facility नसल्याने खराब होवून जाते. २५ ते ३० % धान्य waste होउन जाते.
Food Coporation of India ( FCI) ची ही जवाबदारी आहे पण त्यान्ची storage facility गेल्या १० वर्षात वाढ ण्या ऐ व जी घट्ली. भारता कडे Common Wealth Games आयोजना साठी पैसा आहे पण धान्य साठवन्या साठी लागण्यार्या storage facility बान्ध ण्या साठी पैसा नाही.

भारतासाठी लोक शाहि उपयुक्त आहे का?

अहो पण राजेशाही किंवा हुकूमशाही किंवा लष्करशाही याची उदाहरणे जगाने आजवर पाहिली आहेतच की. लोकशाहीच्या तुलनेत या अशा राज्यव्यवस्था काही खुप छान आहेत असे नाहीये. उलट लोकशाही मधे सत्ता कोणा एकाच्या हाती एकवटली जात नाहीये हे बरेच आहे.

दैनिक सकाळमधे आलेली बातमी,

मुंबई - जुहू चौपाटीवर गेल्या 20 दिवसांपासून गाळात रुतून बसलेल्या सिंगापूरच्या एम. व्ही. विस्डम जहाजाला आज तेथून सुरक्षितरीत्या हटविण्यात सिंगापूर सॅल्वेज कंपनीला आज दुपारी यश आले. या जहाजाला आता मुंबई समुद्राबाहेर नेण्यात आले असून तेथून जहाजाला पुढे गुजरातच्या अलंग बंदरात नेण्यात येणार असल्याची माहिती शिपिंग महासंचालनालयाच्या वतीने देण्यात आली.

खवळलेल्या समुद्रामुळे भरकटलेले विस्डम जहाज 11 जूनला जुहूच्या किनाऱ्यावर लागले होते. नौदलाच्या वतीने खूप प्रयत्न करूनही या जहाजाला तेथून हलविण्यात यश न आल्यामुळे अखेर सिंगापूरच्या स्मित इंटरनॅशनल कंपनीला तिला हटविण्याचे काम सोपविण्यात आले. आज स्मित लुंबा या मुख्य जहाजासह भारतातील अश्‍मी या टग बोटीच्या साह्याने विस्डमला ओढण्यात आले व साधारण दुपारी एकच्या सुमारास जहाजाला जुहू चौपाटीवरून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. आता हे जहाज मुंबई बंदराबाहेर नांगरण्यात आले असून तेथून त्याला गुजरातला नेण्यात येणार आहे. तेथे त्याची मोडतोड करण्यात येणार आहे.

सिंगापूरचा फ्लॅग असलेले एम. व्ही. विस्डम हे मालवाहू जहाज अनेक वर्षांच्या वापरानंतर भंगारात काढण्यासाठी श्रीलंकेच्या कोलंबो येथून गुजरातमधील अलंग बंदरात मोडतोडीसाठी नेले जात होते. वाटेत या जहाजाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे अरबी समुद्रातून हे जहाज एका मोठ्या टगला मोठमोठ्या दोरखंडांच्या साह्याने खेचून नेण्यात येत होते. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून चार नॉटिकल मैल अंतरावर असताना 11 जूनला आलेल्या या जहाजाचे दोरखंड सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसामुळे तुटले. पुढे हे जहाज भरकटत जुहू चौपाटीच्या किनाऱ्यावरील वाळूत रुतले. हे जहाज पाहण्यासाठी रोज लाखो मुंबईकर त्यांच्या लहान मुलांसह जुहू चौपाटीला भेट देत होते.

एमव्ही विस्डमची ठळक वैशिष्ट्ये
फ्लॅग- सिंगापूर
वजन- 9 हजार टन
लांबी- 147 मीटर
रुंदी- 22 मीटर

आपण आपल्या चुकांपासून काहीही शिकायला तयार नाही, हे दर्शवणारी आजची ताजी बातमी - एक फ्रेंच माणूस त्याच्या जहाजातून गेट वे ऑफ इंडियाला येईपर्यंत त्याला कोणीही अडवलं नाही!

आपली सागरी सुरक्षा अजूनही भगवान भरौसे असल्याचं दिसतंय. चक्क नौदलाच्या तळावर एका पाणबुडीत स्फोट होवून ती बुडाली. हे लिहीपर्यंत कारण माहित नव्हते, आणि १८ नौसैनिकांचा पत्ता लागत नव्हता. http://www.ndtv.com/article/india/ins-sindhurakshak-fire-explosion-18-na...

अतुल पाटणकर,

सिंधुरक्षक ही रशियन बनावटीची किलो क्लास पाणबुडी आहे, ह्या पाणबुडी वरील तंत्रज्ञान बरच जुन
आहे हे सर्वमान्य आहे.

काही वर्षांपुर्वी एक रशियन पाणबुडी K141 Kursk अगदी अश्याच अपघातात बुडाली होती. ह्या अपघातावर
National Geography वर एक लघुपट ही आला होता , ज्यात अपघाताची कारण मिमांसा केली होती.

आताच रिफीट करून आलेली ही पाण बूडी अश्या अपघाता ला बळी पडते ह्याच आश्चर्य वाटत,

१. ही पाणबूडी बनवणार्या रशीयन लोकांनी पुर्वीच्या अपघातापासून काही शिकल नाही आणी आताच्या
पाणबुडी मघ्ये बदल केला नाही ?
२. आपल्या नौदलातील तांत्रीकी विभागाने अश्या अपघाताची दखल घेतली नाही आणि जरुरी असलेली
दक्षता घेतली नाही.
३. रशियन लोकांनी आवश्यक बदल सुचवले पण आपल्या नौदलाने त्या कडे दुर्लक्ष केल.

ह्या वरच्या शक्यतेतील काय खर असेल ? आतातरी आपली लोक जागी होतील का ?