कार्स २ - क्रॉसओव्हर

Submitted by केदार on 27 June, 2011 - 09:02

दुर दुर कुठल्या तरी समुद्राच्या मध्यभागी एक छोटीसी नाव एका जासूसाला एका संकेत स्थळी घेऊन जाते आणि अचानक सिक्युरिटी जहाज येते आणि त्या छोट्या जहाज चालकाच्या अंगावर ओरडते, काय चाल्लय? इतक्या रात्रीचा फिरतोस? घरी जा सरळ, तो छोटा जहाज चालक बिचारा निघतो पण त्या पिटुकल्या जहाजावरील तो जासूस मात्र शिताफीने त्या मोठ्या जहाजाला लटकतो आणि त्यांच्यासोबत पुढचा प्रवास करतो.
ते मोठे जहाज तेल विहिरींकडे निघालेले असते, अनेक विहिरी (आपल्या बॉम्बे हाय सारख्याच) तिथे दिसतात. खरतर बॉम्बे हाय पाहून आम्ही हाय खाल्ली होती पण तो जासूस, छे तो कसला हाय खाणार? तो शिताफीने सगळ्या सुरक्षा रक्षकांच्या नजरेतून निसटत निसटत पार मोगॅम्बोच्या असिस्टंट पर्यंत जाऊन पोचला. पाहतो तर काय? तिथे एक मोठा व्हिडीओ कॅमेरा ( हो तोच तो १० वर्षांपूर्वीचा जो आम्ही बेस्ट बाय मधून विकत घेतला होता आणि आता अँटिक वस्तू म्हणून जतन केलेला आहे तो) असतो आणि त्या भोवती सर्व व्हिलन तो कॅमेरा काय घडवू शकतो ह्याचे वर्णन ते करत असतात. पण हाय रे दुर्दैव अचानक काही जणांची नजर आपल्या जासूसाकडे जाते आणि सुरु होते डॅनियल क्रेग सारखी फायटिंग. अहो साक्षात डॅनियल क्रेग, शॉन कॉनरी, बॉसनन बाप्पा ह्या सगळ्या बॉन्डांचं मिश्रण म्हणजे आपला नविन जासूस, तो काय ह्या व्हिलनच्या लोकांना ऐकतो. तिकडे व्हिलन शेट, 'कितने आदमी है रे' असे म्हणे पर्यंत हा बापू पार पळून गेला अन त्या जहाजांना फसवून तो डिप डिप समुद्रात डिप मारून निघून जातो.

आता इतका वेळ आम्ही हा बॉन्डपट मन लावून, चुळबुळ न करता बघत होतो आणि जनू बांडे आत्ता येईल, मग येईल अशी वाट पाहत होतो तर जनू आलाच नाही, उलट आम्हास बाजूला बसलेल्या स्नेहलता वहिंनींनी ज्ञान दिले की. 'अहो भावोजी, तुम्ही काय अलिबाग वरून आलात का? हा कार्स २ आहे, बॉन्डपट नाही! आँ तिच्या मारी, पण वहिनी सुरूवात तर बॉन्डपटाला साजेशी आहे, आम्ही उतरते झालो, पण बंड्याने पाठीत रपाटा दिला आणि वर मखलासी केली की, स्नेहलता म्हणते ते गुपचूप ऐकून घे.
नक्की काय घोळ आहे म्हणून आम्ही कावरेबाबरे होऊन इकडे तिकडे पाहिले तर आजूबाजूला छोटी छोटी मुलं होती. म्हणलं हे काय विपरीत? ह्या एवढ्या ढिशूम ढिशूमी मध्ये ही सगळी लहान पोरं चिअर अप करताना बघून आम्ही विचार केला की कोणता बॉम्ब कसा फुटतो आणि मशीनगनी मधून गोळ्या कशा ताडताड बाहेर पडतात हे वय वर्षे ४-५ असतानाच कळलेले बरे. पिढी हुशार होते!

तो जासूस म्हणजे फिन मॅकमिसील, बॉन्डचे नवीन नाव. आणि इथेच आम्हास दुसरा धक्का बसला, माय नेम इ़ज बॉन्ड, जेम्स बॉन्ड असे ऐकायची सवय आम्हास. पण ह्याचे नाव ते मोगॅम्बोचे लोकंच घेत होते. अन काय ती अ‍ॅस्टॉन मार्टिन, अन काय त्याचे रुप, तो सहज दुसर्‍या अवतारात जाऊ शकतो, ते बघून आम्हास परत एकदा हिंदू संस्कृती जाज्वल्य अभिमान वाटला, अहो अवतार हे फक्त आमच्या धर्मात असतात. पण स्नेहलता वहिनी परत ओरडल्या, अहो भाऊजी त्या डायरेक्टरने अवतार नावाचा सिनेमा पाहिला आहे अन असे डिस्गाईज करणे कार्स मध्ये घ्यायचे ठरवले. आम्ही ह्या ज्ञानामृतामुळे वहिनीकडे फार आदराने पाहिले.

एकतर बॉन्ड पटात एवढ्या सुंदर (रापचिक म्हणायचे आहे, पण श्लील-अश्लील वाले लोक गोंधळ घालतील) ललना असतात तश्या ललना इथे नाही ह्या दुखा:त आम्ही होतो, तितक्यात तिथे परत जुन्या कार्स मधले जुने गाव अन जुना हिरो लाईनटिंग मक्विन दिसला. (आता कार ला तो कार का म्हणलं म्हणून आमच्या अंगावर नका येऊ बॉ, एक तर कारला तो कार म्हणने आम्हालाही जिवावर आले आहे पण ती कार आणि तो कार असे कार्स मध्ये असते म्हणे) आणि आम्ही निःश्वास सोडला की कदाचित ती पूर्वीची एवढी मोठ्ठी फायटिंग ही कदाचित दुसर्‍याच भलत्या एका बॉन्डपटाचा प्रीव्ह्यू म्हणून दाखवला असणार अन आम्ही वेंधळेपणामुळे त्यालाच कार्स समजून बसलो. पण परत स्नेहलता वहिनीनी आमच्याकडे रागात पाहून बंड्यास कानात सांगीतलं की, ह्या भावोजींनी पुढच्या वेळी पिक्चरास आणत जाऊ नका. आम्ही मुग गिळून गप्प बसलो. (हो त्यांनीच दुपारचे जेवण दिले होते.) आता तो बॉन्ड शेवटपर्यंत काराच राहतो. (नेमाडे!! अन कारवरची कोटी म्हणा अन सोडून द्या) पण तिकडे अजून एक फॉर्म्यूला वन वाला भिडू फ्रान्सिस्को लै जोरात असतो, परत त्याची अ‍ॅक्सेंट इटॅलियन दाखवली अन त्याला मक्विनला हरवायचे असते. (आता आम्हास त्या टेलाडेगा नाईटस ची आठवण येणे अपरिहार्य होते, तिथेही अशीच अमेरिकन फ्रेंच जुगलबंदी दाखवली होती, आम्ही काय तेच ते जोक परत मारता असे मनातल्या मनात म्हणालो कारण वहिनींची भिती!) मग काय तो जुना मेटर आपल्या ह्या नवीन फ्रान्सिस्कोला वचन देतो की, ".माझा मित्र तुझ्याशी लढत देईन" मग मक्विनला प्रश्न पडतो की आपल्या प्रेयसीला काय सांगायचे, पण ती म्हणते, "नाथ, रघूकुल रित सदा चली आयी, प्राण जाय पर वचन न जाये" झालं. मग आमचे मक्विन बाप्पा लढायला तयार होऊन जपानला जातात, तिथे हे रेसचे गुर्‍हाळ चालू होते ते लंडन मध्येच संपते.

अनेक लढाया, मोठमोठ्या मशिनगन बघून आम्हास हा चित्रपट नक्की लहान मुलांचा आहे की टिनेजचा हा प्रश्न पडला, आम्ही उत्साहाने स्नेहलता वहिनीकडे पाहीलं, त्या जोरात उतरल्या, अहो भाऊजी कार १ मध्ये लहान मुलं, आता कार्स मोठ्या झाल्या. (विनोद मोठा झालाच्या धर्तीवर) तर टिनेजला आवडणारे दाखवावे की नाही? हा टिनेजचा पिक्चर आहे. बरं बॉ. मग तुम्ही ४ वर्षाच्या मुलाला का हो आणले? हा प्रश्न न विचारता, आम्ही वहिनी, घरी गेल्यावर फक्कड पैकी चहा करा नेहमीसारखा, असे सांगून आमच्या चहाची सोय केली.

एसयुव्ही अन साधी कार ह्यांची मिळून कॉर्सओव्हर नावाची नवीन कार तयार होते, तसा हा कार्स व बॉन्डपट मिळून हा कार्स २ आहे. ३डी इफेक्ट अतिशयं सुदंर. एकुणच मांडणी, सिनेमोटोग्राफी, डिझाईन वगैर वगैरे उच्च. सगळं चांगलं पण तरीही पिक्चर नक्की लहान मुलांसाठी नाही असे वाटत राहते. प्रि टिन किंवा टिन साठी नक्कीच चांगला.

ढिंग ना ना ढिंग ना ना ढिंग नाना ढिग, टॅडँटडा .. असा शेवट होऊन आम्ही हा ड्यु बॉन्डपट पाहून बाहेर पडलो.

पाच पैकी ३ स्टार

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेम्स बॉन्ड - कार्स टू बघीतला. मला आवडला, मजा आली बघायला. अ‍ॅनिमेशन, त्यातले डीटेलिंग, मारामारीच्या वेगवेगळ्या युक्त्या इ. धमाल आहे पण हा सिनेमा नक्कीच ४-५ वर्षांच्या मुलांसाठी नाही. मोठ्यांनी मात्र बघायला हवा.
याला (असे काही असले तर) PG-9 वगैरे असले काही तरी सर्टीफिकेट द्यायला हवे होते.

सगळं चांगलं पण तरीही पिक्चर नक्की लहान मुलांसाठी नाही असे वाटत राहते>>अगदी.. प्रोमोज बघुन जरा कल्पना आली होती... एक तर त्या लहान मुलाना प्लॉट काय कळणार .. मुलांना नकोच घेऊन जायला मग..
"नाथ, रघूकुल रित सदा चली आयी, प्राण जाय पर वचन न जाये" >>>>>ह्ह्पुवा
परीक्शण एकदम Happy

केदार Lol

नक्कीच बघणार आहे. पहिला कार्स बघणारे आता थोडे मोठे झाल्याने जरा पुढच्या वयाच्या पोरांसाठी बनवणे साहजिक आहे (मनमोहन देसाईने असे का केले नाही?) पण एकदम टीन्स?

तरीही डिस्ने-पिक्सार चे असे चित्रपट नेहमी लहान आणि मोठ्यांसाठी भरपूर करमणूक असलेले असतात. हाही नक्कीच असेल. मूळ कार्स सुद्धा आधी समीक्षकांनी नीमो वगैरेंइतका चांगला नाही असेच म्हंटले होते पण मला प्रचंड आवडला, त्यात ती रूट ६६ ची कथा गुंफल्याने फारच मस्त झाला होता. अशा चित्रपटांत काही गोष्टी दुसर्‍यांदा बघताना जाणवतात.

Happy