डॉ आयडा स्कडर या पुस्तकाविषयी..

Submitted by शांकली on 25 June, 2011 - 11:47

डॉ आयडा स्कडर -(लेखिका - वीणा गवाणकर) एका उत्तुंग व्यक्तिमत्वाचा परिचय

प्रिय वीणाताई,
साधारणपणे ६ महिन्यापूर्वी आपले डॉ. आयडा स्कडर हे पुस्तक माझ्या हातात आले, आणि वाचल्यानंतर कार्व्हरनी जसं मनात घर केलं तसंच यांनी पण केलं. तुम्ही जर डॉ आयडा स्कडर यांच्याबद्दल लिहिलं नसतं तर या आभाळा एवढ्या व्यक्तिमत्वाची ओळखच झाली नसती.

डॉ आयडा स्कडर - जवळ जवळ ९० वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या एक सेवाव्रती डॉक्टर! ज्यांच्यामुळे सेवाव्रती या शब्दाला अर्थ लाभला.
याच देशातील माणसांनी आपल्याच बांधवांसाठी त्याग केला, त्यांना मदत केली, त्यांची सेवा केली तर ते स्वाभाविक आहे. पण ज्या व्यक्तीला आधी वैद्यकीय पार्श्वभूमी नाही, परक्या वातावरणात, परक्या संस्कारामध्ये आणि पूर्णपणे भिन्न समाजात स्वतःची नाळ जोडून घेणं; इतकं मोठं कार्य या लोकांसाठी करणं हे केवळ आश्चर्यजनक आहे.
तुमच्या प्रस्तावनेमध्ये तुम्ही लिहिलंय की त्यांना खरंतर चार चौघींसारखं आयुष्य जगायचं होते. त्या सुंदर तर होत्याच पण त्यांचं लग्नही ठरण्याच्या मार्गावर होते. पण आजारी आईच्या मदतीला म्हणून त्या भारतात येतात काय आणि एका रात्री केवळ स्त्री डॉक्टरांच्या अभावी ३ हिंदी गर्भवती मुली ( हो मुलीच! १३ -१४ वर्षाच्या कोवळ्या मुलीच!) मृत्युमुखी पडतात काय !
आणि हे सहन न होऊन त्यांनी आपल्याच मनाशी एक दृढ निश्चय केला आणि त्या न्यूयॉर्क मध्ये विमेन्स मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेऊन परत भारतात आल्या. नुसत्याच आल्या नाहीत तर येताना दवाखान्याच्या उभारणीसाठी अमेरिकेतून निधी पण गोळा करून आल्या. पण त्यांच्या तळमळीची किंमत इथे भारतात होती कोणाला?
अंधश्रद्धा, विचित्र रूढी, परंपरा, विकृत कल्पना यांमध्ये आपला समाज सापडला होता. (होता कसला, काही शहरे सोडली तर भारतात फारशी वेगळी परिस्थिती अजूनही नाही!) तरी सुद्धा इथल्या लोकांना समजून घेत, स्वतःचं मन स्थिर ठेवत , येईल त्या अडचणीतून व्यवस्थित मार्ग काढत त्यांनी अथक प्रयत्न केले.
पुस्तक जस जसं वाचत जावं ,तस तसं एकएक घटना, प्रसंग वाचून आपण सुन्न होतो आणि त्याच वेळी थक्कही होतो.
जे कार्य डॉ. आनंदीबाई जोशींना इथे करायच होतं, त्यांचं ते कार्य, त्यांचं ते स्वप्न या अमेरिकन स्त्रीने पुरं केलं - काय म्हणावं या बाईला? आपण ज्या पंचकन्यांचं सकाळी स्मरण करतो त्यांच्याच तोडीच्या डॉ. आयडा वाटतात.

पण सर्वात खेदाची आणि लाजिरवाणी गोष्ट ही की त्यांच्याबद्दल , त्यांच्या कार्याबद्दल खुद्द वेलूर मधे असणारी अनास्था आणि उपेक्षा! त्यांच्याबद्दल फारशी काही माहितीच नसणे! खुद्द वेलूरमधे ही स्थिती तर बाकी भारतात त्यांच नावही माहित नसणं यात आश्चर्य वाटायला नको. तुम्ही मोठया आशेने वेलूरला गेलात आणि तुमच्या पदरी निराशा पडली. एवढ़या थोर व्यक्तीचं स्मारक तर जाउंदे पण त्यांच्यावरील एखादा लेख, थोडी माहिती.. काही नाही.

या उलट परिस्थिती अमेरिकेत! डॉ.आनंदीबाई जोशी यांच्याबद्दल ! एक हिन्दू मुलगी अमेरिकेत वैद्यकीय शिक्षण घ्यायला येते याबद्दल त्यांना किती कौतुक वाटले. फिलाडेल्फिया मेडीकल कॉलेजमध्ये त्यांचा थिसीस, त्यांचे लिखाण अजून जपून ठेवलंय. ज्या Carpenter कुटुंबात त्या राहिल्या होत्या,त्या कुटुंबाने त्यांनी वापरलेल्या वस्तू अजून जपून ठेवल्या आहेत. थिओडोसिया कार्पेंटर यांची पणती Nancy Cobstone ह्यांच्या कडे त्या वस्तू अजून आहेत. शिवाय पोकीप्सी गावी डॉ. आनंदीबाईंची समाधी (कार्पेंटर कुटुंबियांच्या दफन भूमीतच) असून त्यावर १/२ वाक्यात त्यांच्या जीवनकार्याचा उल्लेख केला आहे.

केवढा विरोधाभास हा! पण म्हणूनच वीणाताई मला असे वाटते की मराठी वाचकांवर तुमचे उपकार आहेत. डॉ. आयडा स्कडर यांच्यावर जर तुम्ही लिहिलं नसतं तर आम्हाला त्या कळल्याच नसत्या. इतकं अभ्यासपूर्ण, हृदयाच्या गाभ्यातून आलेलं हे व्यक्तिचित्रण वाचकाच्या मनाचा ठाव घेते.

तुमचे अनौपचारिक आभार मानण्यासाठी म्हणून हा पत्र प्रपंच..

कळावे,

आपली,

सौ. अंजली

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शांकली, सुंदर.
वीणाताई गवाणकरांचं अजून एक - एक होता कार्व्हर वाचून बघ. ते ही असच छान पुस्तक आहे. दोन्ही मुलांना वाचून दाखवता येण्याजोगी.

अंजुताई, छान लिहीलं आहेस. पुन्हा एकदा डॉ. आयडा स्कडर पुस्तकाची आठवण करून दिल्याबद्धल धन्यवाद. दोन वर्षांनी मायबोलीवर आले. Happy

धन्यवाद!! या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल. कार्व्हर खुप आवडलं होतं. हे पण आवडेल नक्कीच असे दिसतेय.

मी पण वाचलय हे पुस्तक. खरंच छान आहे.
>> म्हणूनच वीणाताई मला असे वाटते की मराठी वाचकांवर तुमचे उपकार आहेत. डॉ. आयडा स्कडर यांच्यावर जर तुम्ही लिहिलं नसतं तर आम्हाला त्या कळल्याच नसत्य>>>> अनुमोदन Happy

शांकली,
धन्यवाद ! या पुस्तकाबद्दल माहिती दिल्याबद्दल, आम्हाला तुमच्यामुळेच तर कळालं.
हे पुस्तक पण वाचणारच.
Happy

वीणा गवाणकरांनी अनुवादित किंवा लिहीलेली सगळीच पुस्तकं छान आहेत.
कार्व्हर, लीझ माईटनर .....त्यांमुळं हे वाचलच पाहीजे.
या पुस्तकपरिचयाबद्दल धन्यवाद !

धन्यवाद सर्वांना,
जेव्हा प्रथम हे पुस्तक मी वाचलं त्यानंतर मी बराच वेळ सुन्न होऊन बसले होते. आपण काय वाचून बसलोत हेच कळेना आणि परत मी ते वाचलं. सोप्या, साध्या शब्दांत लिहिणं खूप अवघड असतं, पण वीणाताई ते सहज लिहून जातात. त्यांना ह्या पत्राची एक प्रत पाठवली आणि सहज, मी मा बो वर प्रतिक्रिया देत असते म्हणून इथे पण दिलं; इतकच.

छानच असेल. वाचायला हवं.

कार्व्हर वाचलं तेव्हा मी लहान होतो. सुन्न झालो होतो. कित्येकदा रडलो होतो. तेव्हापासून मी मुलांच्या वाढदिवसाला हेच पुस्तक आवर्जून भेट देतो . लीझ माईटनरचा उल्लेख झालाय वर.. जबरदस्त बाई !!! पुढे या पुस्तकाचीही भर पडली..

शांकलीजी भेट देण्यायोग्य असेल तर आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार !!!

हे पुस्तक मला अजिबात आवडले नाही. विस्कळित आहे. काही ठिकाणी इंग्रजीचे भाषांतर केल्यासारखी भाषा आहे.

त्यांचा आवाज
रच्याकने
माझ्या थोरल्या मुलीने सी एम सी हून काऊन्सेलिंग चा कोर्स केला आहे.तिने मला डॉ स्कडर बद्दल सांगितले होते.त्या तिथे बहुश्रुत व अत्यंत श्रद्धेने परिचित आहेत
हा त्यांचा आवाज
www.youtube.com/watch?v=jV-HYXbXvho