माझं स्वप्न

Submitted by सखीप्रीया on 20 June, 2011 - 22:47

पाऊस्....धुव्वाधार कोसळणार्‍या अविरत जलधारा नजरेसमोर असव्यात. मी व्हरांड्यात आरामखुर्चीत निवांत विसावलेली. व्हरांड्याच्या तिनही बाजूंनी हिरवीगार झाडे-जी पावसाच्या गारव्याने ओली चिंब भिजलेली. मधुनच येणार्‍या वार्‍यामुळे डोलणारी जणू स्वतःच्या धुंदीत मस्तावलेली - जणू कुठलंतरी मधुर संगीत एकत असलेली. मीही हातात गरमागरम कॉफीचा, वेलचीचा सुगंध दरवळणारा मग हातात घेऊन कोणत्यातरी आवडीच्या सुरावटींना मनात्,कानात साठवत असलेली. वाहणार्‍या वार्‍याच्या तालावर पाऊसही धुंद झालेला. धुरकट धुक्यासारखा मधुनच माझ्या अंगावर असंख्य तुषार उडवत मला साद घालणारा. समोरुन येणारी पायवाट, बाजुला भिजलेली मखमली हीरवळ. ईतर कशाचीही जाणीव, चाहुल लागु न देणारी निस्तब्ध शांतता.
मी सावकाश पायर्‍यांवर कधी विसावले हे माझे मलाच न कळलेली. आता तर त्या पर्जन्यराजानं मला अर्ध्-अधिक भिजवलेलं. पावलाखाली वाहणार्‍या झुळझुळणार्‍या पाण्यानं मलाही केफात कधीच ओढलेलं. तशीच एका अनिवार ओढीनी मी त्या पाऊलवाटेवर अनवाणी उभी राहीलेली. क्षणात मी चिंब भिजलेली. मनाच्या अत्यानंदात मी स्वतः भोवतीच असंख्य गिरक्या घेतल्या.
अन आतातर निसर्ग, पाऊस, तो हिरवा गारवा माझ्यात की मी त्याच्यात संपूर्ण सामावलेली. आमच्यातले अंतराय कधीच विरघळलेलं. ओतप्रोत समाधानानं ओलेती मी व्हरांड्याच्या खांबाला टेकून उभी रहावी. आता नजरही मिटलेली. फक्त पावसाचं कोसळणं, समुद्राची गाज कानी अन वार्‍याच्या आवाजात माझं शांत होणं.
अशा त्या अलवार, हळव्या क्षणी खांद्यावर प्रिय स्पर्शाची जाणीव व्हावी. मी वळावं आणि त्याच्या मिठीत विरघळून जावं यासारखा परमोच्च आनंद असूच शकत नाही.

गुलमोहर: 
शब्दखुणा: