'बा'

Submitted by -शाम on 19 June, 2011 - 13:02

मा.बो.वरील तमाम बापांना आणि त्यांच्या बापांना ...फादर्स डे निमित्त समर्पित.....

गावी थोरवी आईची रुपं बापाचं स्मरुणं
अरे झुंजला झीजला रानं जीवाचं करुनं

जातं वढीलं माईनं जगा कौतिकाचं बोल
सुपातल्या धानासाठी सांग राबलं रं कोणं?

खरं लाडिक बोलून घास भरविते आई
तिच्या ओंजळीला बळं भाऊ येतं रं कुठूनं?

सडा-रांगोळ्या अंगणी तिच्या किती आठवणी
घाम ढेकळात त्याचा झाली माती रं सुकूनं

आसवात माऊलीच्या कशी ममता कळते?
धरी बाप नरड्यात ओला हुंदका दडूनं

आई अमृताची येल तिची मायेची सावली
उभा आधाराला राही बाप पिचल्या पाठीनं

लेकरांच्या सुखासाठी बाप राबला राबला
लेका पायामधी बूट त्याची फाटकी वहाणं...

मायबाप जीव दोन दोन्ही समान समान
मोल सारखं दोघांच नाही थोर कुणी उणं...
--शाम

गुलमोहर: 

क्या बात हैं, श्याम.. अप्रतिम काव्य, कुठेही नाटकीपणा नाही, शब्दांचा अवास्तव सोस नाही...
निखळ, स्वच्छ..!! खुप मस्त, लई आवडेश.. Happy

Pages