ती आणि तो..

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

त्याचं नदीशी नातं खूप जुनं. म्हणजे अगदी रोज नाही, तरी नियमितपणे तो इथे नदीकिनारी येऊन तासनतास रेंगाळायचा. आपली सुख दु:ख हक्कानी या नदीशी बोलायचा. धीरगंभीरपणे नदी सगळं पहायची ऐकुन घ्यायची. कधी एखाद्या खळाळत्या लाटेनी कोपरखळी मारुन त्याला हसवायची देखील. नदीची आठवण त्याला छळायची. खूप दिवसात नाही यायला मिळालं किनार्‍यावर की बेचैन व्हायचा तो.

नदीचं तसं नव्हतं ना पण, तीला तशी कुणाची आठवण काढायची सवयच नव्हती. ती आपली आपल्याच भरती ओहोटीच्या चक्रात अडकलेली युगानुयुगे. पोटात किती भोवरे आणि किती वादळं दडवूनही तीचा धीरगंभीर चेहरा मात्र तसाच, सांगणार तरी कुणाला आणि काय? कोण समजून घेईल हे सगळं? नदीला आपल्या मिठीत सामावून घेणं, कसं शक्य होतं कुणालाही? एक ...दोन ...पाच पहाता पहाता पाच वर्ष निघुन गेली नाही आपल्या दोस्तीला? नदीने मनातला एक हळवा विचार एका लाटेसरशी धुडकावून लावला. यापूर्वीही आपण ही चुक केलीये ना एकदा मैत्री करण्याची .. त्या मैत्रीची परीणती आपल्या अवखळ, अल्लड खळाळत्या चेहर्‍यावर हा धीरगंभीर साज चढवण्यात झाली हे इतक्या लवकर कसं विसरतोय आपण..

या नदीची त्याला तशी भिती कधीच वाटली नव्हती पण हल्ली हल्ली जरा जास्तच बिनधास्त वागत होता का तो? तसं त्याचं वागणं नदीलाही आवडत होतंच की. त्याची ती सलगी, बेफिकीरी, सगळ्यातला आनंद हवाहवासा वाटत होता. पाण्यात पाय सोडून तो बसला की नदीलाही त्याचे पाय किती तर्‍हांनी कुरवाळावेसे वाटत होतेच ना?

त्याचवेळी नदीच्या मनात कुठे तरी शंकेची पाल चुकचुकत होती. "काहीतरी चुकतंय, नक्कीच काहीतरी हातून सुटतंय" हा ओळखतो का आपलं खरं रुप? आपल्या पोटात दडलेली असंख्य वादळं आणि भोवरे याला गिळून तर नाही ना टाकणार? आपलं खरं रुप पाहिल्यावर आज आपल्यावर जीव ओवाळून टाकणारा हा मित्र द्वेष करेल का आपला? कि झटकून टाकेल आपल्याला एखादी पाल झटकावी तसं? हा याचा हवाहवासा वाटणारा बिनधास्तपणा याला आपल्यापासून कायमचं दूर तर घेऊन जाणार नाही ना? किती आणि कसं समजावू याला...

मग एके दिवशी जे व्हायचं होतं तेच झालं तो नेहेमीप्रमाणे बिनधास्त... विश्वासानं नदीजवळ आला खरा. पण आजची नदी नेहेमीची नव्हती. आज तीच्या पोटातल्या अनंत वादळांना उधाण आलं होतं.. तीच्या पोटातल्या जीवघेण्या भोवर्‍यांनी कुठल्या कुठे भिरकावलं त्याला? तो हेलपाटला "हीच का ती नदी? इतके वर्ष आपण हिच्याबरोबर तासनतास घालवले, आणि तरी तीचं खरं रुप ओळखलंच नाही तर आपण.." नदी हताशपणे रडत राहीली "नको रे असं म्हणूस.. खरंच मी नाहीये अशी..मी तीच आहे तुझी सखी" तीचा आक्रोश त्याच्यापर्यंत कधीच पोचला नाही.... संपलं अखेर सगळं.. नदीने कुणाशी मैत्री करुन कुणात गुंतू नये हेच खरं... तीचा धर्म वहात रहाणं कुठेच कुणा एकात गुंतून न पडता..अखंडपणे..

प्रकार: 

नदीने कुणाशी मैत्री करुन कुणात गुंतू नये हेच खरं... तीचा धर्म वहात रहाणं कुठेच कुणा एकात गुंतून न पडता..अखंडपणे..>>>>>>>> अप्रतिम.......... खूप खोल अर्थ आहे.........

नदीने कुणाशी मैत्री करुन कुणात गुंतू नये हेच खरं... तीचा धर्म वहात रहाणं कुठेच कुणा एकात गुंतून न पडता..अखंडपणे
सही लिहिलयं..
हे खुप मोठ्ठ वाक्य वाटलं.
Happy