तुम्हे याद हो के न याद हो - ९

Submitted by बेफ़िकीर on 15 June, 2011 - 02:03

"मला काहीही माहीत नाही... क्षमाने आग्रह केला म्हणून ऐन पहाटे जायला निघालो... तर क्षमाचाच क्लास होता.. आमचे तिघांचेही ठरले की ताबडतोब घरी यायचे... पण क्षमाने पुन्हा आग्रह केला आणि आम्ही दोघेच सिंहगडावर गेलो... तेथे क्षमाचा ग्रूप होता.. पण ते परत निघालेले होते... आता सिंहगड चढून वर गेल्यानंतर लगेच काय उतरायचं म्हणून थोडा वेळ फिरायचे ठरले.... पण भयंकर पाऊस आला आणि आम्ही दुपारपर्यंत अक्षरशः अडकलो... यात तुम्हाला काय प्रॉब्लेम दिसतोय तेच मला समजत नाही... क्षमा सांगतीय, मी सांगतोय तरीही विश्वास नाही याला काही अर्थच नाही... "

अत्यंत वैतागून उमेशने उत्तर दिले तरीही धुमसत होतेच प्रकरण! क्षमा तर भित्र्या सशाप्रमाणे एका कोपर्‍यात नुसती बसून होती. मोठाच प्रॉब्लेम झालेला होता. आता तर निवेदिताशी बोलायला जायचे म्हणजेसुद्धा तिला भीतीच वाटणार होती. नाहीतर नितुच्या वडिलांना वाटायचे की ती मुद्दाम तिला फितवायला येत आहे.

प्रकरण इतके टोकाला पोचेल याची कल्पनाच नसल्याने उमेश आणि क्षमा हादरलेले होते खरे तर! उमेशचे आई वडीलही खूप खूप डिस्टर्ब्ड होते. आरामात एकटे आजोबाच होते. ते निवांत चहावर चहा ढोसत बसलेले होते. मधेच उमेश अत्यादराने आणि अवाक होऊन आजोबांकडे पाहात होता. त्यावेळेस ते त्याच्याकडे पाहात डोळा मारत होते. क्षमाला तर आपले आजोबा हा असा प्रकार असू शकेल यावर विश्वासच ठेवतायेत नव्हता. अनंतरावांना, म्हणजे उमेशच्या वडिलांना मात्र आजोबांची पूर्ण कल्पना होती. ते लहान असताना आजोबा किती टेरर होते याच्या सर्व आठवणी ताज्याच राहिल्या होत्या त्यांच्या मनात!

आत्ताची अवस्था अशी होती की नवीनच राहायला आलेल्या बिर्‍हाडातील एक मुलगी, जी अजून पुरती परिचीतही नाही, तिच्याबरोबर आपला मुलगा एकटाच सिंहगडावर फिरल्याबद्दल त्या मुलीच्या पोलिस वडिलांनी सर्वांदेखत तमाशा केला होता आणि परिणाम उलटाच होऊन आजोबांनीच त्यांना झापले होते. त्यानंतरही त्या मुलीचे वडील स्वतःच पोलिस खात्यात असल्यामुळे तक्रार करायला चौकीवर धावले तेथे त्य मुलीचे वय पाहून तक्रार नोंदवण्याचे सर्वाधिकार तिला देण्यात आले आणि ती काहीही तक्रार नाही असे म्हणाली. तत्पुर्वी आजोबांना आप्पा तेथेच घेऊन गेलेला होता व त्यांची तक्रार, की आपटे सब इन्स्पेक्टर यांनी वाड्यात दमबाजी केली, ही नोंदवून घेता घेताच आपटे तेथे आले व त्यांनी तो प्रकार थांबवलेला होता.

वास्तविक पाहता शांतपणे आयुष्य जगणार्‍या राईलकर दांपत्याला हा प्रकार अजिबातच झेपेनासा होता. उमेशचा प्रचंड राग आलेला होता दोघांनाही! पण त्यात आणखीन एक तिढा असा होता की मुलगी तर पोलिस बापासमोरही बिनधास्त म्हणतीय की तक्रार दाखल करणार नाही आणि ती स्वतः फिरलीही उमेशबरोबर सिंहगडावर!

त्यामुळे आपल्या उमेशचा नक्की किती दोष हेच ठरवता येत नव्हते. अशीही शंका मनात येत होती की इतक्या कमी दिवसात खरंच यांचं प्रेमबिम बसलं की काय! आणि वातावरण अशा विचारांमध्ये असतानाच हळूहळू निवळू लागलं होतं!

पण आपट्यांकडचं वातावरण कसं काय निवळणार?

तिकडे तर अपमानांचे डोंगर होते. एक तर आधीच वाड्यात सर्वांदेखत राईलकर आजोबांनी पार अगदी हेटाईच करून टाकलेली होती. त्यातच मुलीने चौकीवर खुद्द बापाच्याच विरुद्ध निकाल लावून टाकला होता.

त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. घरी आल्या आल्या आपटेंनी निवेदितावर हात उगारला तोच आईने तो हात धरला आणि भेसूर स्वरात ती म्हणाली...

"अजिबात मारायचं नाही माझ्या मुलीला..."

बायकोचं हे रूप पहिल्यांदाच बघत असलेल्या आपटेंनी किंचित सौम्य भूमिका घेतली त्याच क्षणी आई मागे वळली आणि तिने स्वतः, आयुष्यात पहिल्यांदाच, निवेदिताला फडाफडा मारायला सुरुवात केली.

निवेदिता रडत तर नव्हतीच, पण शांतपणे मार खात होती. शेवटी आईच दमली आणी तिला वाईटही वाटू लागलं!

आई - काय झालं सांग... असे कसे गेलात तुम्ही!

काहीही न ठरवताही अगदी उमेशसारखीच कहाणी निवेदिताने सांगीतली.

आणि ती कहाणि विश्वसनीयच होती. जे भाग न सांगण्यासारखे होते ते सहज टाळूनही उरलेली कहाणी अगदी सीमलेस वाटावी अशी!

कितीतरी वेळ आपटे स्वतःही बघत होते मुलीकडे! अत्यंत थंड नजरेने! आत्ताच या मुलीने आपल्याच खात्यातल्या एका कनिष्ठ अधिकार्‍यासमोर आपला पचका केलेला आहे आणि समोरच्या म्हातार्‍याने तर पार इज्जतच घालवलेली आहे हा अपमान सलत होता त्यांना!

पण निवेदिताच्या कहाणीत मात्र काहीही खोटे आढळत नव्हते. सुर्वे नावाच्या ज्या पोलिसाने त्यांना ते सांगीतले होते त्याच्या मते तो स्वतःही कितीतरी वेळ पावसामुळे अडकून पडलेला होता.

पण हे सगळे मान्य केले, आपली मुलगी केवळ आणि केवळ शुद्ध हेतूने तेथे वावरत होती हे कळले, तरीही झालेला अपमान? भर वाड्यात एका जुन्या म्हातार्‍याने वाट्टेल ते बोलावे? आणि कांबळे पी एस आय नेही आपण खुद्द हजर असताना आपल्या मुलीलाच तक्रार आहे की नाही ते विचारावे?

या अपमानाचा बदला कसा घेणार?

तब्बल दहा मिनिटे घरात नि:शब्द शांतता होती.

आणि अकराव्वे मिनिट चालू झाले तेव्हा आपटेंनी काळ्या दगडावरची रेघ असावी असे वाक्य टाकले.

"दुसरी जागा बघणार आहे मी आज पासून... मग कॉलेज लांब असो नाहीतर मंडई लांब असो... आणि दुसर्‍या जागेत जाईपर्यंत वाड्यात एकाशीही एक अक्षरही बोलायचे नाही"

त्यांचे हे वाक्य ऐकून दोघीही गार पडलेल्या होत्या. खरे तर निवेदिता अधिक! कारण आईच्याही दृष्टीने खरे तर इतकी बदनामी झालेल्या जागेतून दुसरीकडे जाणे योग्यच होते. पण वाड्यात एकाशीही एक अक्षरही बोलायचे नाही हा नियम मात्र अवघड होता. चार चौघांमध्ये राहून असे कसे वागता येईल असा प्रश्न त्यांच्या ओठांपर्यंत येऊन दहा वेळा पुन्हा मनात परतलेला होता. आत्ता आपटेंसमोर तोंड चालवण्यात काही अर्थच नव्हता हे त्या माउलीला व्यवस्थित ठाऊक होते.

मात्र आपटेंच्या मनात तिसरेच कट शिजू लागलेले होते. ज्याची कल्पना त्यांचा चेहरा बघून कुणालाही येणे शक्य नव्हते.

==============================================

"लायसंन??"

"......."

"लायसंन दाखव..."

"सॉरी सर... विसरलं..."

"कुटं विसरलं??"

"सर घरी राहिलंय लायसेन्स"

"कुणाची गाडी??"

"मित्राची.."

"कोन मित्र?? नांव काय त्याचं??"

"विनीत... विनीत गुजर..."

"क्काय??"

"विनीत गुजर..."

"बामन का??"

"हो..."

"अन तू??"

"मी पण..."

"काय मी पण??? नांव काय??"

"सचिन जोशी.."

"काय करतात वडील??"

"वारले.."

"आई??"

"आईपण नाहीये.."

"कोनाबरोबर र्‍हातोस??"

"मोठा भाऊ..."

"किती शिकलायस??"

"बारावी.. फेल.."

"नियम कितवीत असतात ट्र्याफिकचे??"

".. सॉरी सर..."

"कितवीत असतात??"

"चुकलं माझं.."

"कि त वी त असतात नियम??"

"सर... तसे म्हणजे.. शाळेत असे नियम नाही शिकवत सर.."

"बापाला **यला शिकवतोस??"

"सर.. काय असेल तो दंड सांगा.. मी भरतो... पण शिवीगाळ क..."

खण्ण!

"आई**... कुनाची चोरलीस गाडी??"

"स्सर... सर मारू नका सर..."

खण्ण!

"चल तुला घालतो आत भडव्या.. म्हन्जे समजंल.. चाल्ल??"

त्या दिवशी काहीही कारण नसताना आप्पाने चौकीवर जाऊन पंधरा वीस मिनिटे फुकट फटके खाल्ले. ही बातमी वाड्यात कशी काय लागली कुणास ठाऊक? पण आप्पाचा दादा आणि विनीत मात्र प्रचंड वेगात तेथे पोचले. बहुधा रस्त्यावर वाड्यातल्या कुणीतरी पाहिलेलं असावं!

दादाने बर्‍याच विनंत्या करून आणि विनीतने स्वतःचे लायसेन्स आणि गाडीची कागदपत्रे दाखवून आप्पाला सोडवले.

मात्र त्या दिवशी.... आप्पाच्या वहिनीने... प्रचंड तमाशा केला..

.... आणि एक मोठा फरक पडला आप्पाच्या आयुष्यात...

घरात फक्त आन्हिकांपुरता पाय टाकायचा... वाड्यातल्या चौकात झोपायचं.. घरात यायचं नाही... आप्पाच्या मोठय भावाला काहीही बोलताआलं नाही बायकोपुढे... आप्पाचा लहान पुतण्या खूप खूप रडला...

आणि सोबतीला आणखीन एक घटना घडली... दुपारी चारच्या सुमारास राहुल, विनीत आणि उमेश... या तिघांनीही आपापल्या घरच्यांना ठामपणे सांगून टाकलं...

आज रात्रीपासून चौघेही चौकात झोपणार होते.... मात्र... त्यांना हे माहीत नव्हते की...

त्या आधी आणखीन एक मनस्ताप होणार होता..

========================================

साडे सहा वाजता तीन पोलिस वाड्यात आले आणि चारही मित्र, उम्याचे वडील आणि आजोबा या पाचही जणांना भयानक दम देऊ लागले.. त्यांच्या हातात एक कागद होता जी म्हणे 'कंप्लेन' होती... पी एस आय आपटे साहेबांची... की त्यांच्या मुलीला फितवून सिंहगडावर नेले आणि त्या प्रकरणाची चौकशी करायला स्वतः आपटे साहेब गेले तेव्हा त्यांना दमबाजी केली...

आता काय करणार?

आता मात्र आजोबाही हतबल होते कारण चक्क कायदेशीर पेपर हातात होता..

उम्याच्या वडिलांनी खूप घासाघीस करून नऊशे रुपये देऊन प्रकरण आटोक्यात आणले तेव्हा पोलिसांनी कागद फाडून त्यांना सांगीतले...

"आपटे साहेब तक्रार करायला चाललेच होते... आम्हीच म्हंटलं मुलीचा प्रश्न आहे.. उगाच काहीतरी करू नका.. त्यामुळे कच्ची तक्रार केली होती... "

पी एस आय आपटेंनी आपला हिसका सगळ्या वाड्याला दुसर्‍याच दिवशी दाखवला होता.

आता हिसका खायला फक्त उमेश राहिलेला होता. ते त्याच्याहीकडे बघणारच होते.

पण आज झालेला मनस्ताप काही क्षण विसरण्यासाठी आणि खोटा का होईना पण काही घटकांचा आत्मविश्वास मिळवून आपटेला शिव्या देण्यासाठी... कुणीही एक शब्दही न उच्चारता...

रात्री पावणे नऊला सगळे चालत चालत प्यासाला येऊन बसलेले होते...

============================================

विनित - पैसे कितीयत प्रत्येकाकडे??

राहुल - पुरले नाहीत तर उद्या देऊ... प्यासावाला काय म्हणणार आपल्याला..

विनित - तसं नाही... एक अंदाज असायला हवा आपल्याला...

प्रत्येकाने खिसे उपडे केले टेबलवर!

एकशे सदुसष्ट !

तीन क्वार्टर सहज! वर बिड्या, चकणा आणि अगदीच वाटलं तर आणखीन नाईनटी! नाहीतरी आजपासून चौकातच झोपावे लागणार होते.

विनित - ओ... रम द्या.. आधी एक निप द्या.. आं?? नाही नाही... प्लेन पाणी... सोडाबिडा नाही...

राहुल - आपटेला कुत्र्यासारखा मारला पाहिजे..

आप्पा - नीट बोल... उद्या याचं लग्नबिग्न झालं तर माझ्या सासर्‍याला शिव्या द्यायचास म्हणून भडकेल..

राहुल - गेला उडत... च्यायला सरळ गेमाच टाकतोय रे??

विनित - नाही पण आप्पा लायसेन्स पाहिजेच की??

आप्पा - अरे पण बामन बामन म्हणजे काय??

राहुल - उम्या... लेका ... वाईट झालं रे पण?? आपटेनी ते तिघं पाठवलेले होते ते... त्यांना म्हणजे पार लाचबिच देऊनही आपला अपमान व्हायचा तो झालाच..

'तुमचा अपमान', 'तुमचा सत्कार' असे शब्दच माहीत नव्हते कुणाला! जे काय ते 'आपलं'!

आप्पा - का रे?? गप्प का बसलायस??

उमेशची मान एकदम खाली गेली. त्याला त्याच्या डोळ्यात आलेलं पाणी कुणाला दिसू द्यायचं नव्हतं!

विन्या - काय झालं रे उम्या??

उमेश - तुम्ही सगळे... एवढे शांत कसे काय रे??? आप्पाला मारलं लेका त्या हवालदाराने..

आप्पा - उम्या.. म्हणून तू रडावंस??? लेका आपण त्याच्या केसाला तरी धक्का लावू शकणार आहोत का??? एक आलेला प्रसंग पटकन संपला असं समजायचं आणि आठवायचाही नाही तो प्रसंग आता आपण..

पुन्हा 'आपण'! मार एकट्या आप्पाने खाल्लेला होता.

उमेश - ... आ... आप्पा..

उमेशचा ओलावलेला आवाज ऐकून सगळेच चरकून त्याच्याकडे पाहू लागले.

उमेश - खूप ... लागलं का रे???

उमेशचा हुंदका प्यासाने पहिल्यांदाच पाहिला.

पण आप्पा कशाकशावर हुंदके देणार?? नांव अगदी आप्पा वगैरे असलं तरी बावीसच वर्षाचा मुलगा होता. आणि... आजच वहिनीने घरातून कायमचे हाकलून दिलेले होते... दादा त्यावर काहीही बोलू शकलेला नव्हता... हा आघात मोठा की हवालदाराने मारले तो आघात मोठा??

विनित - आप्पा... मी असं बोलू नये... पण... त्या खोल्यांवर तुझाही हक्क असायला हवाच ना??

आप्पा - अंहं.. बाबांनी जायच्या आधी भाडेपावती दादाच्या नावावर केली.. मला म्हणाले.. रिकामटेकडा फिरतोस... जेव्हा स्वखर्चाने खोली बांधू शकशील तेव्हा माझे आशीर्वाद गृहीत धरच!

आप्पाचे डोळे कोरडे ठण्ण होते. आइ बाकीच्या तिघांचे ओलावलेले!

काही बोलण्यासारखं उरलेलंच नव्हतं !

आप्पा या जगात एकटा झालेला होता! कायमचा !

आणि तो अजिबात एकटा नाही आहे हे रक्तातला शेवटचा थेंब उरेपर्यंत या तिघांमधला प्रत्येकजण त्याला जाणवून देणार होता.

प्यासा आप्पा! प्यासा हॉटेलमध्ये खराखुरा प्यासा एकच होता. सचीन जोशी, उर्फ आप्पा!

राहुल - प्या तिच्यायला... भ्येंचोद या जगातल्या माणसांमध्ये काहीही अर्थ नाही... त्यापेक्षा ही रम बरी.. साली निष्ठेने चढते... चीअर्स!

चार ग्लास किणकिणले. चार घोट चार घशांमधून आत गेले. चार घसे जळले. रम रक्तात मिसळत मिसळत मेंदूवर राज्य गाजवू लागेपर्यंत नि:शब्द शांतता होती.

आणि दुसरा पेग भरला गेला तेव्हा उमेशने एक पूर्ण बोळा झालेला कागद टिचकीने टेबलवर टाकला.

राहुलच्या जवळ पडल्याने राहुलने तो कागद उचलला असला तरी विनीतने प्रचंड उत्सुकतेने त्यात डोके घातले. आप्पा स्तब्धपणे राहुल आणि विन्याच्या चेहर्‍यावरचे भाव न्याहाळत होता.

उमेश मात्र आपला ग्लास रिचवत खालीच बघत होता टेबलाकडे!

राहुलने ते कागदावरचे शब्द उच्चारले.

"४२३ ब गुरुवार पेठ... राहायला जाणार"

कुणाची चिठ्ठी होती, कोण राहायला जाणार असले मूर्ख प्रश्न कुणाच्याही मनात आले नाहीत.

उरलेल्या तिघांचे मतही न घेता प्यासातील एका वेटरला राहुलने डायरेक्ट सांगून टाकले.

"हे भरलेले पेग पिऊन आम्ही निघतोय.. दोन तासांनी येऊ... हा अ‍ॅडव्हान्स.. "

मान डोलावत वेटर एकशे सदुसष्ट रुपये मोजून निघून गेला.

आणि त्याच क्षणी प्रत्येकाचा भरलेला दुसरा पेग एकाच घोटात संपला.

पंचविसाव्या मिनिटाला ४२३ ब गुरुवार पेठ या वास्तूसमोर उभे राहून चौघांनी अर्वाच्य शिवीगाळ केली तसे त्या वाड्यातले काही पब्लिक बाहेर आले.

त्यांना फुकटची दमबाजी करून चौघे पुन्हा प्यासालाच यायला निघाले तेव्हा विन्याने मागे जमलेल्या अती सभ्य जमावाला उद्देशून इरसालपणे एक दम देणारे वाक्य उच्चारले...

"उद्यापासून इथे राहायला येतोय भाडखाऊंनो... वाड्यात फालतूगिरी चालायची नाही आम्हाला.. समजलात काय?? आपटे म्हणतात मला आपटे..."

एकमेकांना टाळ्या देऊन हासत हासत प्यासामध्ये सगळ्यांनी तहान भागवली आणि शांतपणे रास्ते वाड्यात परतले.

चौकात घातलेल्या अंथरुणावर पसरले आणि पाचव्या मिनिटाला घोरायलाही लागले....

पण... तिघेच! ...

तिघेच घोरत होते... एक जागाच होता..

उमेश राईलकर!

त्याने हळूच ... अगदी हळूच... पण अतिशय व्यवस्थित नेम धरून.. एक कागदाचा बोळा समोरच्या खिडकीत टाकला..

अंहं! नाही पडला बरोबर! खालीच पडला... आपटे कुठे होते काय माहीत!

वीस मिनिटे आभाळाकडे पाहात असलेला उमेश शेवटी उठला... सगळीकडची चाहुल घेत अलगद पावलांनी निवेदिताच्या खिडकीपाशी गेला.. अर्थात नशिब बलवत्तर की इतके सगळे होऊनही ती खिडकी उघडीच होती... फक्त पडदा लावलेला होता..

उमेशने भयंकर काळजी घेत हळूच तो बोळा पुन्हा उचलला.... आणि ... त्याहूनही जास्त काळजी घेऊन तो नीतुच्या खिडकीतून आत टाकला...

एक अत्यंत आनंदाची बातमी त्याने आपल्या प्रेयसीला कळवून टाकली होती...

... 'तुम्हाला ती जागा मिळणार नाही याची सोय करून आलो आहोत'.....

ही चिठ्ठी वाचून तिचा आपल्याबद्दलचा आदर दुणावणारच नाही तर शतपटीने वाढेल याची खात्री वाटत असतानाच उमेश पुन्हा या तिघांच्या शेजारी येऊन पहुडला...

... आणि???... ओहो... ओहो... चक्क दिवा... चक्क लाईट लागला त्या खोलीतला...

चिठ्ठी वाचली गेल्याचे प्रचंड समाधान मनात मावत नसतानाच उमेश तिकडे हळूच पाहात होता...

..... आणि हळूहळू ती खिडकी व्यापली गेली...

.. हातात तो कागदाचा बोळा घेऊन....

............................निवेदिताची आई खिडकीत उभी होती...

गुलमोहर: 

उमेशने भयंकर काळजी घेत हळूच तो बोळा पुन्हा उचलला.... आणि ... त्याहूनही जास्त काळजी घेऊन तो नीतुच्या खिडकीतून आत टाकला...

... अरेरे असा वेडेपणा कसा केला त्याने.

किति उशिर नविन भागाची.................लवकर द्या जरा ..........नाही तर परत मागील भाग वाचावे लागतील.......... Happy