वेताळाचे प्रश्न : प्रश्न क्र. २ - रमाकांतने काय करायला हवं ?

Submitted by Kiran.. on 14 June, 2011 - 16:39

रमाकांत हा शून्यातून वर आलेला, अल्पावधीत यश पाहीलेला इसम. एका मोठ्या कंपनीतली चांगली नोकरी सोडून वर्कशॉप टाकतो काय आणि नंतर त्याचं एका मोठ्या उद्योगात रूपांतर होतं काय, सारंच अविश्वसनीय. याला रमाकांतचा मेहनती स्वभाव कारणीभूत होताच तसच माणसं जोडण्याचं त्याचं कसबही ! या प्रवासात काही मित्रांनाही नोक-या सोडायला लावून आपल्याकडे त्यांचं चांगल्या पद्धतीने पुनर्वसन त्याने केलं होतं. त्यामुळं विश्वास टाकून झोपी जावं अशी टीम आपोआपच तयार होत गेली.

यश त्याच्या अजून डोक्यात गेलं नव्हतंं. नाही म्हणायला आपण जगाच्या शाळेत शिकलो असल्याचा त्याला अभिमान होता. मॅनेजमेंटची पुस्तकं, नवे ट्रेंडस याचं त्याला वावडं होतं अशातला भाग नव्हता पण योग्य त्या चिकित्सेशिवाय नव्या लाटेवर स्वार व्हायचा त्याचा स्वभाव नव्हता. अर्थात जेव्हां त्याला पटलं तेव्हां अनेक बदल त्याने झटकन अंमलात देखील आणले होते.

त्याच्या स्वतःच्या प्रॉडक्टमधे सुधारणा करत गेल्याने स्पर्धक कंपन्या आता मागे पडल्या होत्या. हीच वेळ बेसावध राहण्याची असते हे जाणून त्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे त्याचे प्रेझेटेंशन्स सुरूही झाले होते. त्याचा निर्णय हा अचूक ठरला. त्याचं भारतातलं रेप्युटेशन पाहून त्याच्या प्रॉडक्टमधे जपानमधल्या कंपन्यांनी रस दाखवला.

त्याआधी रमाकांतने धंद्याचं एक्स्पानशन करताना मानिनी ठकारच्या ओळखीने एक सिक युनिट विकत घेतलं होतं. त्याचा त्याला फायदा झाला. एक तर मानिनी तिथं एचआर होती आणि ती जपानी भाषेत चांगली प्रवीण होती. साहजिकच मानिनीला जपानी पथक आल्यावर त्यांच्या पाहुणचाराला पाठवण्यात येऊ लागलं. रमाकांतच्या एक लक्षात आलं कि मार्केटिंगच्या टीमपेक्षा मानिनी सरस होती. तिचे एटीकेटस, ग्राहकांशी संवाद साधण्याचं कौशल्य आणि तिचं सुस्वरूप असणं याच्यामुळे तिची छाप पडत होती.

ज्या ज्या वेळी मानिनी उपलब्ध झाली नाही त्या त्या वेळी मार्केटिंगच्या पथकाकडून जपानी पथकाला हाताळण्यात गंभीर चुका झाल्या होत्या. भारतात एक ठीक होतं त्याचं प्रॉडक्ट चांगलं असल्याने धडक मारता आली होती. पण आता विदेशी स्पर्धकांशी टक्कर होती. काळाची पावलं ओळखून त्याने आपलं कॉर्पोरेट ऑफीस शहराच्या पॉश भागात हलवायचा संकल्प सोडला. .

रमाकांत जरी सर्वांशी मैत्रीचे संबंध ठेवून होता तरी कामाच्या बाबतीत तडजोड नव्हती. मानवी चुकांमुळे काम गेलं तर तो स्वतःला माफ करू शकणार नव्हता. नालायकांना मात्र घरचा रस्ता दाखवून त्याने इतरांना इशारा द्यायलाही कमी केलं नव्हतं. अर्थात बहुतांश वेळा त्याने न्यायबुद्धीनेच काम घेतल्यानं त्याने घेतलेल्या निर्णयांबद्दल कधीच अकुठे अवाक्षर निघालेलं नव्हतं.

मानिनीचं महत्व नाही म्हटलं तरी वाढलं. एचआर मधलं तिचं स्थानही तिने कर्तबगारीने मिळवलं होतं. एक दोन कंपन्यात तिने चतुराई दाखवल्याने संप टाळता आले होते. मॅनेजमेंटला विश्वासात घेऊन कामगारांची योग्य बाजू मांडणे, धोके समजावून सांगणे, कामगारांच्या अडचणींची आस्थेने विचारपूस करणे, आहे त्या चौकटीत प्रश्न सोडवण्याबद्दल तिचा हात कुणीही धरू शकत नव्हता. आत्ताचे जीएम पूर्वी एचआर असताना त्यांनाही मानिनीसारख्या तडफेने काम करता आलेलं नव्हतं.

ती त्याची जुनी मैत्रीण असल्याने त्याच्या केबीनमधे तिचा वावर जरा वाढलाच होता. त्यात एक्स्पान्शनबद्दल तिच्यसोबत प्लान्स डिस्कस केल्याने त्याला बरं वाटायचं. आपल्यात मैत्री आहे असं तो मनाला बजावत असला तरी स्टाफमधे मात्र काही वेगळीच चर्चा रंगत होती. मानिनी सुंदर आणि तरूण होती. त्यात ती स्त्री होती. त्यातूनही ती हल्ली सरस ठरत असल्याने स्त्री ला अशा ठिकाणी ज्या चर्चेला सामोरं जावं लागतं त्यातून तीही सुटली नाही. दोघांच्या कानावर काही येत नव्हतं असम नाही पण थेट कुणी बोलत नाही तर इश्यू करण्यात अर्थ नाही असच दोघांनाही वाटून गेलं. दोघंही खूपच प्रगल्भ होते तरीही संयमित असं नातं त्यंच्यात निर्माण झाल्याचं दोघांनाही जाणवत होतं.

कंपनीचे जनरल मॅनेजर रमाकांतच्या वडिलांच्या वयाचे. पण ते ही मानिनीचा सल्ला घेत असल्याने मानिनीला शत्रू तयार व्हायला लागले होते. खरं तर तिने कुणाचंच वाईट केलेलं नव्हतं. कंपनीच्या भल्यासाठीच ती झटत होती. रमाकांत तिच्यावर अवलंबून रहायला लागला होता. अर्थात आपल्या सहका-यांमधले सूक्ष्म बदल त्याच्या नजरेतून सुटले नव्हते. ते त्याला अस्वस्थ करीत होते. कारण समजत होते पण उमजत नव्हते.

एके दिवशी रमाकांतला जर्मनीमधे जावं लागलं. त्याच वेळी महत्वाचं जपानी पथक येणार असा निरोप मिळाला. त्याने जीएम आणि मानिनीबरोबर मिटींग घेतली. मार्केटिंग मॅनेजरला बोलवायची त्याला आवश्यकता भासली नाही. मानिनीने त्याला लाही काळजी करू नकोस मी सांभाळीन सगळं अस तोंडभरून आश्वासन दिलं. जाता जाता त्याने मार्केटिंग टीमला मानिनीला सपोर्ट करायला सांगितलं.

तो गेला मात्र .. आणि इकडं मानिनीच्या मुलीची तब्येत अचानक खराब झाली. तिच्या तोंडाला फेस यायला लागला म्हणून रात्री तिला डॉक्टरांकडे पळवलं. तिचे मिस्टरही बेंगलोरला होते. त्यांचा फोन स्विच ऑफ येत होता. डॉक्टरांनी विषबाधेचं कारण सांगितलं. ताबडतोब तिच्यावर उपचार सुरू झाले. मुलीला तापही येत होता. सकाळी मिटींग होती. तिला काय करावं सुचेना. सकाळी तिने जीएमला फोन करून रडतच परिस्थितीची कल्पना दिली. जीएमना कळत होतं पण आजची मिटींग किती महत्वाची आहे ते ही समजत होतं. रमाकांत परत आल्यावर त्याला काय सांगायचं हे त्यांना समजत नव्हतं. शेवटी त्यांनी तिच्यावरच निर्णय सोपवून मार्केटिंग टीमला परिस्थिती सांगितली. मानिनी असल्याने आपल्याला काय काम अशा रिलॅक्स मूडमधल्या टीमने होमवर्क केलाच नव्हता.

मिटींगचा पार फज्जा उडाला...........आणि तरीही मार्केटिंग विभाग खुषीत होता !!

रमाकांत आल्याबरोबर त्याला ही बातमी समजली आणि त्याचा संयम सुटला. ताबडतोब मिटिंग ठरली. मुलीला आईची गरज असल्याने मानिनी येऊ शकली नाही. ती मिटींग वादळी झाली. मार्केटिंग स्टाफ नाराज होताच पण इतरही हेडस ना मानिनीचं वर्चस्व खटकत होतं. रमाकांत बरसल्यावर स्टाफकडून तिच्यावरच अपयशाचा ठपका ठेवला गेला. आमच्या कामात तिने लुडबूड केल्याने आम्हाला काम करणं अशक्य झालय असं एकाने तोंडावर सांगितल्यावर रमाकांत गंभीर झाला.

मार्केटिंगचा एक माणूस गमावणं काय असतं हे त्याला माहीत होतं. मानिनीची परिस्थिती त्याला समजत होती. तिच्या मुलीला तो पाहूनही आला होता. त्याचबरोबर हा उद्योग त्याने कुणा एकासाठी काढला नव्हता. मानिनीसाठी उद्योग पणाला लावायचा का हा प्रश्न होता. दुसरीकडे न्यायबुद्धीही गहाण टाकता येत नव्हती.

त्याच वेळी मानिनीची फजिती व्हावी म्हणूनही मार्केटिंग टीमने एक प्रोजेक्ट बळी दिल्याचं त्याला जाणवत होतं. मोठाच पेचप्रसंग होता. सध्यातरी त्याला मानिनीशी चर्चा करता येण्यासारखी नव्हती. त्याने जीएम साहेबांना बोलावून घेतलं. खूप खल झाला.

पेचप्रसंगात रमाकांत मार्ग काढू शकेल हा जीएमना विश्वास होताच.

त्याने या परिस्थितीत काय तोडगा काढायला हवा ?

( आपल्या कल्पनाशक्तीला ताण देऊन बिनधास्त सहभागी व्हा. येऊद्यात उत्तरं ! येउद्यात तोडगा. योग्य उत्तराला तारांकित केलं जाईल. त्याहीपेक्षा अचूक उत्तर त्याची जागा घेईल. आपलं उत्तर सर्वोत्तम असेल तर ते अढळ राहील . )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. एवढा चांगला बिझीनेसमन असूनही रमाकांतने मानिनीच्या स्कील्सकरता काहीच बॅकपचा विचार का नाही केला? तिला लहान मुलगी आहे माहित असताना कधी आजारपणामुळे तिला येणं अशक्य असू शकतं ही शक्यता गृहित धरायला हवी होती त्याने.
२. मिटींगला मार्केटींग टिमलाच वगळणं ही दुसरी चूक.
३. मानिनीला काढणंही योग्य नाहीच. त्यामुळे मार्के. टीम डोक्यावर बसेल. मार्केटींग टीमल्लच समज देऊन पुढे त्यांनाही जे चालू असेल त्यात सहभागी करुन घ्यावं.

रमाकांतचं वागणं खटकलं.
१.त्याने मानिनीवर ईतके अवलंबून रहायला नको.मार्केटींग टिम वरिल त्याचा अविश्वास खटकला.
२.ऑफिसमधे त्याच्या आणि मानिनीच्या बाबतची चर्चा कानी येऊन ही त्याकडे दुर्लक्ष करणे हेही खटकले.
३. मार्केटिंग टिमचे स्पष्टीकरण बरोबर, पण कॄती चुकीची. त्यांना कंपनीच्या हितापेक्षा स्वतःचे प्रश्न/हित महत्वाचे वाटले.
४. जीएम जे स्वतः रमाकांत पेक्षा वयाने मोठे आहेत त्यांनी वेळीच रमाकांतला परिस्थीतीची जाण करुन द्यायला हवी.

अश्या परिस्थीतीत रमाकांतने,
१. मार्केटिंग टिम, जीएम , मानिनी यांच्या सोबत तात्काळ मिटिंग बोलावून खडे बोल सुनावने
२. कंपनीच्या व्याल्युज, एथिक्स, कस्टमर रिलेशन, कोड ऑफ कंडक्ट, क्वालिटी पॉलिसी संबंधी विचारमंथन करवून त्या प्रत्यक्षात कश्या अवलंबता येतील त्याबाबत सर्वांना(स्वता:ला सुद्धा) प्रशिक्षण देणे.
३. कोणालाही कामावरून कमी करण्याची अवश्याकता नाही.

रमाकांत कंपनीचा मालक म्हणुन कमी पडलाय.

१. मानिनीवर अवलंबुन राहताना तीचा बॅकअप तयार करून ठेवायला हवा होता. कोणतीही कंपनी एका व्यक्तीवर अवलंबून असणे कंपनी च्या द्रुष्टीकोनातुन घातक आहे. वेळ सांगुन येत नाही.

२. प्रत्येक कंपनी त माणुसकीची बाजु असणे अत्यावश्यक आहे, त्यामूळे कोणालाही कमी करणे चुकीचे आहे, पण त्याचवेळी प्रत्येकाला चुकीची आणि जबाबदारीची जाणिव करून देणे ही आबश्यक आहे.

३. काही प्रमाणात चुक मानिनीची सुद्दा आहे, जबाबदारी घेताना एक हाती (वन मॅन आर्मी) न ठेवता मार्के. टीम ला सुद्दा सहभागी करुन घ्यायला पाहिजे होते, कारण अश्या परिस्थितीत यशाला जसे कोणी भागीदार नसते, तसे अपयशाला ही कोणी भागीदार नसते. आणि मानिनी शेवटी एच. आर. आहे, सेल्स + मार्केटिंग नाही.

४. जी.एम च्या अनुभवाचा फायदा अश्या वेळेस करताच आला असता, जी.एम म्हणजे काही पोरखेळ नव्हे.

५. प्रत्येक कंपनीत Risk Mitigation Strategy आणि Operational Policy असते आणि ती राबवण्यात रमाकांत आणि जी.एम. कमी पडले, ती जबाबदारी त्यांनी स्विकारली पाहिजे

६. कोणत्याही कंपनीत व्यक्तींचा आणि विभागांचा ताळमेळ असला पाहिजे, कोणीही कधीही (मालकाशिवाय) वरचढ होता कामा नये तरच कंट्रोल राहतो.

७. एक सार्वत्रिक मिटिंग घेऊन घडलेल्या प्रकाराचा ऊहापोह करून असे प्रकार पुन्हा घडणार नाही ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे.

८. सर्वात महत्त्वाचे म्हणजे क्लायंट पासुन काहीही न लपविता क्षमा मागुन पुन्हा संधी मिळते का ते आजमावुन पाहिले पाहीजे, कारण असे रमा़कांत बाबतीत घडले, तसे त्यांच्या बाबतीत ही घडु शकते, त्यामुळे ते ही सत्यता आजमावुन एक संधी देऊ शकतात

सायो, टिल्लू छान प्रतिसाद आहेत. मुद्दे नेमके आणि पटण्यासारखेच आहेत.

प्रफुल्लशिंपी यांचा प्रतिसाद तारांकित करण्यात येत आहे.

प्रफुल्ल शिंपींचं तारांकित स्थान जोवर यापेक्षा अचूक प्रतिसाद येत नाही तोवर कायम राहील. येऊद्यात बिगी बिगी !!

मानिनीचं स्पेश्यलायझेशन '

मानिनीचं स्पेश्यलायझेशन ' एचआर' होतं , आधीच्याही कंपनीत व नंतर रमाकांतच्या कंपनीत तर तिनं हे सिद्धही केलं होतं. तिला जपानी येत असल्याने व इतर कारणांमुळे जर ती मार्केटींगसाठी अधिक उपयुक्त व मार्केटींग टीमपेक्षां सरस वाटली होती , तर तिला 'एचआर'ऐवजी 'मार्केटींग' द्यायला हवं होतं, निदान गंभीरपणे तो विचार व त्याबाबत निर्णय व्हायला हवा होता. किंवा, 'एचआर' तिच्याकडेच ठेऊन जपानपुरता तिच्या विशिष्ठ सरसतेचा कंपनीला लाभ करून घ्यायचा होता [ आणि तें योग्यही होतं ], तर कंपनीच्या व्यवस्थापन आराखड्यामधे ही व्यवस्था चपखलपणे बसवणं आवश्यक होतं. मला वाटतं याबाबत ' ड्यूटीज व रिस्पॉन्सिबिलीटीज'ची संदिग्धता हीच या घोळाच्या मूळाशी आहे. आतां मात्र मार्केटींगचा ताबा तिच्याकडे देणं म्हणजे दुफळीला आमंत्रण देण्यासारखं आहे.
तोडगा -
जपानसहीत सर्व मार्केटींगची पूर्ण जबाबदारी मार्केटींग विभागाचीच असेल; जपानविषयक कामासाठी जपानी भाषा व रितिरिवाज अवगत असलेला/ली नवीन अधिकारी मार्केटींग विभागात नेमून त्याला/तिला एक वर्ष फक्त मार्गदर्शन व प्रशिक्षण मानिनी देईल.
या एक वर्षाच्या काळात जपानी कंपन्यांबरोबर अतिशयच महत्वाची मिटींग असेल तर रमाकांत किंवा मार्केटींग विभाग मानिनीची मदत घेऊं शकेल पण जबाबदारी मात्र मार्केटींग विभागाचीच राहील.

हे म्हणजे भारतीय क्रिकेटसारखं झालं. बॅक अप प्लान हाच मुख्य प्लान बनलाय. ब-याचदा हे चालून जातं. जगाच्या शाळेत तरी चलता है हाच अ‍ॅटिट्युड शिकवला जातो. अचानक येऊ शकणा-या परिस्थितीसाठी विचार करणं हे जगाच्या शाळेत मान्य नसतं म्हणूनच जुगाडसंस्कृती वर वेळ मारून नेण्याकडे कल असतो.

मानिनीचं व्यक्तिमत्व, जपानी भाषा अवगत असणं इ. इ. ही लॉटरी होती. यात कर्णधार म्हणून रमाकांतचं कौशल्य काहीच नाही. पण हाताशी आहे तर उपयोग करून घ्यायचा दृष्टीकोण योग्यच आहे. अर्थात मार्केटिंग टीमला तिच्या लेव्हलला आणण्याचे प्रयत्न झाले पाहीजेत.

यशस्वी होण्यासाठी स्टीव्ह वॉ चा दृष्टिकोण हवा. मार्क वॉ सारखा जागतिक किर्तीचा क्लासिक फलंदाज, त्यातून तो जुळा भाऊ, तरीही त्याला घरी बसवायची लक्झरी त्याच्याकडे होती. जेसन गिलेस्पीला अधून मधून ब्रेक देण्याची चैन तो करू शकत होता आणि तरीही तो यशस्वीच राहीला. याचं कारण म्हणजे त्याने नेहमी स्पेशलायझेशन वर भर दिला. आणि मानवी मर्यादा लक्षात घेऊन त्याच तोडीची बॅक अप टीमही तयार ठेवली. अर्थात यात ऑस्ट्रेलियन बोर्डाचाही वाटा आहेच. विषय तो नाही.

पार्ट टाईम खेळाडूंवरही जग जिंकता येतं हे भारताने दाखवून दिलेलं असलं तरी हे यश टिकाऊ वाटत नाही हेच १९८३ नंतर २०११ पर्यंतचा प्रवास दाखवून देतो. तसच कर्णधाराचं महत्वही अधोरेखित करतो.
१९८३ पर्यंत क्रिकेट जगतात दबदबा राखून असणारं वेस्ट इंडीज क्रिकेटही क्लाईव्ह लॉईडच्या निवृत्तीनंतर लयास गेलं. नुसती टीम असून चालत नाही तर कर्णधाराकडे काम करवून घ्यायची हातोटीही लागते.

जनरम मॅनेजर या संस्थेकडं या दॄष्टीने लक्ष पुरवायला हवं. मालकाच्या अनुपस्थितीत कर्णधार तेच आहेत. खरं तर कॉर्पोरेट कार्यालयामधे स्थलांतरित होताना जीएमना पूर्णवेळ कर्णधार म्हणून जबाबदारी घ्यायची सवय लावायला हवी.

सध्या निर्माण झालेला प्रॉब्लेम हा तात्कालिक आहे. पण तो सोडवतांना भविष्यात निर्माण होणा-या असंतोषाची बीजं त्यात नसतील असा तोडगा काढता येणं सहजशक्य आहे.

रमाकांतपर्यंत हे सगळे मुद्दे पोहोचवण्यात आलेत. त्याला खूपच उपयोग झाला. त्याने काय केलं हे कळवतोच.. तोपर्यंत येऊद्यात अजून Happy