तुम्हे याद हो के न याद हो - ७

Submitted by बेफ़िकीर on 10 June, 2011 - 03:39

माणसाने पैसा आणि निसर्गाने प्रेमभावना निर्माण केली नसती तर जग खूप वेगळे असते. स्वतःलाच पुन्हा निर्माण करत राहणे या हेतूने निसर्गाने मानवी मनात पेरलेल्या भावनांचा उद्रेक होऊन पुढे निसर्गाच्या मूळ हेतूव्यतिरिक्तही कित्येक असे वेगळेच आणि केवळ मानवी हेतू साध्य होत राहतील याची निसर्गाला कल्पना नसेल असे नाही. असेलच कारण त्यानेच सर्व निर्माण केले. पण....

.... पण मानवाने स्वतःच स्वतःच्या सुरक्षितेततेसाठी निर्माण केलेले सामाजिक कायदे आणि निसर्गाकडुन मिळालेल्या भावना या दोनमधील युगानुयुगे चाललेले युद्ध अजूनही चालूच राहणार आहे.

पहला प्यार, पहिली नजरमे मै हमेशा हमेशाके लिये तुम्हारा हो गया, मै तुम्हारे लिये अपनी जानतक दे दुंगी वगैरे वगैरे वाक्ये एका वेगळ्याच आकर्षणातून निर्माण झालेली असतात हे माणूस मान्य करायच्या मनस्थितीत नसतो. त्यात त्याला अपमान वाटतो त्याच्यादृष्टीने असलेल्या त्याच्या प्रामाणिक प्रेमाचा! आणि सहवासातून निर्माण झालेले प्रेम हे इतर कोणत्याही प्रेमापेक्षा सहस्त्रपटींनी सत्य, शुद्ध आणि निर्हेतूक म्हणावे लागेल.

एखाद्या माणसाचे मन कोणत्याही एखाद्या क्षणी पुस्तकासारखे वाचायला मिळाले तर? करोडो सूक्ष्म भावनांचे तरंग येऊन ते आपल्या मनावर आपटेपर्यंत पुढचे करोडो तयार होत असतील.

पण सिंहगडच्या त्या अभूतपूर्व वातावरणात उमेशचे मन वाचले असते तर ठळकपणे चार गोष्टी सहज आणि सतत्याने उठणार्‍या तरंगांसारख्या भिडत राहिल्या असत्या. कोवळे वय, कोवळ्या वयातील त्या भावना आणि त्या भावनांप्रती असलेली प्रचंड निष्ठा वगैरे, ज्यांना पुढच्या जबाबदारीच्या, रुक्ष आणि काटेरी भौतिक जीवनाची वाळवी लागलेली नसते आणि लागेल असे वाटतच नसते आणि लागते हे ... नीटसे माहीतही नसते...

त्या कोवळ्या मनात आत्ता चारच विचार होते. दोन दु:खी करणारे आणि दोन अगाध सुखी करणारे!

पायाची जखम आणि वाड्यात निवेदिताच्या आईने व्यक्त केलेला तीव्र विरोध या भावना त्याला काट्यांसारख्या बोचत होत्या आणि क्षमाचा ग्रूप गडावरून खाली निघून गेला आणि मगाशी आलेल्या भयंकर पावसामुळे बहुतेक सगळेच लोक गडावरून खाली उतरून गेले आहेत आणि आता या अतीभव्य आणि निसर्गाचा दिलखेचक आविष्कार असलेल्या पहाडावर आपण दोघेच पुढचा काही काळ व्यतीत करायचा आहे... या दोन सुखद भावना!

तिला अजून माहीतच नव्हते त्याला लागलंय ते! इतक्या पावसात, संपूर्ण अंग भिजलेले असतानाही, दम लागतच होता. पण एकदाहा दरवाजा मागे पडला आणि... निथळत असलेल्या तुरळक झोपड्यांमधून भजी, पिठलं भाकरीच्या मार्केटिंगच्या आरोळ्या उठल्या. काहीही ठरलेले नसताना आपोआपच दोघेही सर्वात जवळच्या झोपडीत सरळ आत गेले आणि एका मोडक्या बाकावर मूकपणे बसून राहिले. तिचे लक्ष नाही हे पाहून उमेशने पटकन जवळच पडलेले एक जुनाट कापड आपल्या सॉक्सवरून पावलाला बांधून ठेवले आणि तितक्यात त्याला दोन अत्यंत जुन्या चपलाही दिसल्या. ज्या जेमतेम त्याला आल्या असत्या असे वाटून त्याने भजी तळणार्‍या बाईला विचारले..

"मावशी या चपला कुणी वापरत नाहीये का??.."

हे लोक चाणाक्ष असतात. दिसायला कितीही बेंगरूळ असले तरीही! लगेच त्या बाईने उमेशच्या पायांकडे पाहिले. तेवढ्यात निवेदिताने विचारले.

"हे काय रे बांधलंयस??"

"अगं उजवं पाऊल दुखतं माझं मधूनमधून... मागे लहानपणी फ्रॅक्चर झालं होतं ना.."

तिला जर आत्ता समजलं असतं की त्याला लागलंय तर ती ताबडतोब खाली उतरून जाऊ याच्याच मागे लागली असती.

"प्वाराच्यायत... "

"द्याल का मला??"

"ईस रुपई"

"वीस?? काहीही का आपलं?? विचारलं म्हणून??"

"किती द्येनार??"

"पाच रुपये देईन.. जुन्याच आहेत की??"

"धा द्या.. "

कुठे वीस, कुठे पाच अन कुठे दहा! त्या कोसळून गेल्यानंतर रिमझिमत सगळ्यांची उडालेली धांदल पाहून खुसखुसणार्‍या पावसात बार्गेनिंग काय करायचंय?? चप्पल हवीय, विकायचीय का, हो विकायचीय आणि विकत घेतली. संपलं!

बर्‍या बसल्या पण त्या चपला त्याला!

गड चढताना आपण तीन वेळा ताक, दोन प्लेट भजी आणि दोन मडकी दही भरलेलं आहे हे माहीत असूनही दोघांनी मिळून दोन प्लेट भजी संपवल्या आणि वर तीन कटिंग दोघात! आत्ता मात्र उम्याला एक बिडी मारावीशी वाटत होती. कारण त्या टपरीत विल्स आणि ब्रिस्टॉल विकतही होते. पण ते शक्य नव्हतं!

तो आत बसलेला असतानाच निवेदिता झोपडीच्या बाहेर गेली आणि पाऊस कितपत थांबलाय की पडतोच आहे ते बघू लागली.

तिचे ते दर्शन पाहून मात्र आत बसलेला उमेश खिळलाच! येणारे जाणारे तुरळक लोकही तिच्याकडे वळून वळून पाहात होते. संपूर्ण भिजलेली, कपडे अंगाला चिकटून देहाची सर्व वळणे स्पष्ट करत होते. तिला त्याचे भान होतेही आणि नव्हतेही! भान असले तरी काय करणार? त्यापेक्षा असून नसल्यासारखे वावरणे बरे! तेवढ्यात कुठूनशी एक सिंहगडवरच वास्तव्य करणारी जख्खड म्हातारी अचानक उपटली आणि तिने निवेदिताला काही कळायच्या आतच स्वतःच्या दोन्ही हातांची बोटे तिच्या कानांवर ठेवून स्वतःच्या कानांवर कडाकडा मोडली.

"अप्सराय ग बाई दिसायला.. तुलाबी इंद्रच मिळो.."

पावसाने भिजली नसेल इतकी शरमेने भिजली ती! आणि खटकन मान वळवुन आत पाहिले तर उमेशही बावळटासारखा त्याच प्रकाराकडे बघत होता. तिने झटकन मान पुन्हा वळवली आणि ती सरळ पुढेच निघाली. चपलांचा आणी भजी चहाचा व्यवहार संपवून उमेशही लगबगीने तिच्यामागोमाग निघाला. आत्ता येत असणारा पाऊस हा पावसाळ्यातील पावसासारखा मनाला आणि देहाला रेशमी स्पर्श करून मातीत मुरत होता.

किती वेळ चालत होते तसे काय माहीत ते! कित्येक मिनिटे! अगदी देव टाके मागे पडले तरी समजले नाही. कारण समोर होता फुललेला दैदीप्यमान निसर्ग आणि सोबत होती कुतुहलाचे मनोरे उंचावणारी, उंचावतच ठेवणारी!

दोघे! फक्त दोघे! दोघेच! तो स्पॉट असा होता की डाव्या बाजूला तानाजीचा कडा, समोर एक खोल, विशाल दरी, त्या दरीतून येणारा 'माणसालाही मागे ढकलेल असा वारा' आणि आजूबाजूला कित्येक अंतरावर कुणीही नाही. पावसाचे थेंब तनामनाला शिरशिरी आणण्यासाठी राबत होते. अबोला बोलत होता. शांतता हृदये जवळ आणत होती. वारा उडणार्‍या केसांबरोबर मनातील विचारांची कारंजीही उडवत होता. लेण्यातील मूर्तीसारखे दोघे कट्यावर बसलेले होते. कुणीही आजूबाजूला नसण्याच्या भावनेने मनात इतके खोलवर घर केलेले होते की आता जणू सर्व काही यंत्रवतच होणार होते. उमेश एकटक दरीकडे पाहात असतानाच मधूनच अबोल झालेल्या नीतूकडे पाहात होता. नीतू मात्र निसर्गाचाच एक भाग असल्यासारखी झाली होती. किंवा निसर्ग हाच तिचा एक भाग असल्यासारखा!

कोणत्याही भौतिक विचारांना आता तेथे शिरकाव नव्हता. दैनंदिन जीवनात आपण कोण आहोत, काय करतो, आपल्या काय काय अडचणी आहेत, आपल्याकडून काय काय अपेक्षित आहे.. सारे सारे आता मागे पडलेले होते..

आता समोर होता मैलोनमैल पसरलेला सह्याद्री! जो पावसाळा नसूनही हिरवटला होता. एक अथांग दरी! खूप खूप लांब राजगड! त्याचा बालेकिल्ला तोरण्याच्या आणि सिंहगडाच्या उंचीला खिजवत होता. एका बाजूला त्याहीहून दूर दिसणारे किंवा जवळजवळ न दिसणारे पुणे!

अद्वितीय! अद्वितीय क्षण होता तो! असे क्षण मनाचा तो कोपरा व्यापतात जेथे भूतकाळ झाडून साफ करणारा भविष्याचा झाडू पोहोचूच शकत नाही. जेथे सर्व काही फक्त शुभच असु शकते. निसर्गाच्या विराटतेपुढे आपल्या अस्तित्वाचे नगण्यत्व जेथे फक्त अनुभवत बसायचे असते. त्यावर भाष्य करून आपल्या नगण्यत्वाला आणखीनच नगण्य नसते करायचे. जेथील दरी पडण्यासाठी नसते तर सखोलतेची जाणीव करून घेण्यासाठी असते. जेथील कड्याची उंची केवळ निरखून तोंडात बोटे घालून चार वाक्य बोलण्यासाठी नसते तर आकाशाला गवसणी घालण्यासाठी काय करावे लागेल याचा अंदाज घेण्यासाठी असते. जेथील वारा शरीराला सुखद वाटावे इतक्याचसाठी नसतो तर मनावरील मरगळ, मनातील दुराभिमान, वाईट इच्छा, क्षुल्लक आकांक्षा या सर्वांना उडवून नेण्यासाठी असतो. जेथे पडत असलेला पाऊस रेनकोट घालण्यासाठी नसतो तर..... आपले व्यक्तीत्व धुवून काढण्यासाठी असतो..

आणि अशात दोन असे जीव... जे आपण एकमेकांना आवडतो हे माहीत असल्यासारखे असूनही ते व्यक्त करणे योग्य वाटू नये अशा सामाजिक परिस्थितीत होते.... आणि त्यांना आत्ता कोणत्याही व्यक्तीकरणाच्या पलीकडे घेऊन जात होते ते मुग्ध करणारे वातावरण... !!!!

"तो पक्षी बघ... "

तीन शब्द! वातावरणाला एक तितकाच सुरेख आणि नाजूक भेद! तो भेद सामावून पुन्हा सरोवरातील गूढ आणि अथांग शांत निळसर पाण्याप्रमाणे झालेले ते वातावरण!

दरीच्या मध्यावर कुठेतरी... तो एक पक्षी... जमीनीच्या गुरुत्वाकर्षणाला, सोसाट्याच्या वार्‍याला, पडणार्‍या थेंबाना आणि भुलवणार्‍या नभाला न जुमानता हवेतच स्थिर झालेला... पंख फडवफडवत जागच्याजागीच... निसर्गाचे ते स्वरूप अनुभवण्यासाठी स्वतःसाठी असा एक खास थांबा निर्माण करत..

आणि तो पक्षी बघण्यासाठी निवेदिता जेथे वाकली आहे तेथे जाणे अत्यावश्यक होते.... तिच्या समीप जात तेथे झुकून दोन क्षण तो पक्षी पाहून त्याने निवेदिताकडे पाहिले.. तीही तो पक्षी पाहून अवाक झालेली असल्याने तसेच भाव उमेशच्या चेहर्‍यावर आहेत का हे तपासण्यासाठी उमेशकडे बघत असलेली.. आणि अचानक उमेशच्या नजरेत पक्ष्याच्याजागी आपले विचार सुरू झाल्याचे समजल्यामुळे ओठांवर जीभ फिरवत झटकन दुसरीकडे बघू लागली..

मात्र उमेश तेथून हालला नाही...

शांततेला वाचा प्राप्त झाली होती... हालली निवेदिताही नव्हतीच.. किती काळ झाला होता एकमेकांना आवडून.. तर फक्त चार पाच दिवस!

आणि काय अर्थ होता त्या नात्याला?? काहीही नाही.. नातेच नव्हते.. पण असे कसे होते की एकदम कुणीतरी इतके आवडते की माणूस त्याच्या स्मृतीतून बाहेरच येऊ शकत नाही??

कसे होते यावर विचार कुणीच करत नव्हते... मनांना आता नि:शब्दता नावाच्या भाषेत व्यक्त होण्याची सवय झालेली होती...

सर्व काही ठरल्याप्रमाणे दोघे एकमेकांच्या नुसतेच निकट बसले...

किती वेळ?? कुणास ठाऊक! घड्याळ या वस्तूला अर्थ नसलेले ठिकाण होते ते!

स्वतःचा श्वास ऐकू येणे ही एकमेव क्रिया घडत होती...

"किती मस्त वाटतं ना इथे??"

शांतता आणि तीही व्यक्तीकरणाला उत्कटतेचे बांध घालणारी शांतता शेवटी असह्य होऊन उमेशने भावनेच्या खोळंबलेल्या प्रवाहाला शब्दांचा उतार निर्माण करून दिला....

स्वप्नील लोचनांनी उमेशच काय तर स्वतःच्याही जाणिवांच्या पुढे गेलेली नीतू एकटक दरीकडे पाहात म्हणाली..

"खूप... खूपच मस्त..."

ते शब्द तिचे तिला तरी ऐकू गेले होते की नाही कुणास ठाऊक! प्रेमकथेचा कदाचित सर्वात सुंदर टप्पा असावा हा!

"आणि... आपण.. म्हणजे.. दोघेच इथे... "

उमेशकडे अजिबात न बघताही केवळ डोळ्यांच्या पापण्यांना काहीसे झुकवून निवेदिता तो पुढे काय बोलणार हे ऐकायला जीवाचे कान करत होती...

"म्हणजे.. आपण दोघे .. येऊ शकलो... हेच मला.."

"म... मलाही..."

कुणालाच खरे वाटत नव्हते की ते आत्ता तिथे आहेत... जर मृत्यू असेलच नशिबात तर तो अशा क्षणी अशा ठिकाणीच यावा म्हणजे भूतल सोडताना भूतलावरील सर्वोत्कृष्ट जागा आणि वेळ मनात कायमची राहील..

"तुला... असे नाही वाटले की... क्षमाही चाललीय तर.."

"मीही... घरी जावे.............. असे??"

"हं..??"

"वाटले.. "

"म... मग??"

"पण..... "

"..????"

"........ "

"पण काय... ब्...बोल ना???"

निवेदिता अजूनही त्या पक्ष्याकडेच पाहात होती... आता मात्र तो सैरभैर उडू लागला होता.... आता स्थैर्याची त्याला गरज नव्हती... कारण वर कड्याच्या कट्यावर असलेल्या दोन मनांमधील विचारांमधील स्थैर्य संपूर्ण नष्ट झालेले असून आता त्या मनांमधील विचार घोंघावत घोंघावत वार्‍यालाही लाजवत आहेत हे त्याला जाणवले होते...

उमेश मात्र निविदेताकडे पाहात होता.. तिचे ओले केस उडत होते.. तिच्या ओठांवरचा ओलावा शोषायलाच जणू पाऊस पडत असावा... एखाद्या चित्रकाराने त्याच्या व्याख्येतील सौंदर्याचे सर्व निकष समाविष्ट करून एखाद्या कशाततरी धुंद झालेल्या युवतीचे चित्र काढावे तशी ती आत्ता दिसत होती...

"परत... परत असे.. नसते ना जमले??"

"कसे..... .. कसे सांग ना??"

"असा.. म्हणजे पाऊस.. असा वारा... "

"आणि??"

"आणि.. इतकी छान.. सकाळ.."

"आणि??"

निवेदिताने खूप खूप साहस करून मान वळवली... कुतुहलाचे डोंगर डोळ्यात घेऊन उमेश तिच्याकडे पाहात होता.. जे उत्तर ऐकायचे आहे त्या उत्तराच्या अपेक्षांचे समुद्र कानात घेऊन तो ऐकत होता..

मगाशी कसेसे कट्यावर रेलून बसलेले दोघे आता आपोआपच ताठ उभे राहिलेले होते... त्यांच्या मनांना या स्थितीत आणणारा निसर्ग हा आता एक व्यत्यय झाल्याप्रमाणे ते त्याच्याकडे जणू पूर्ण दुर्लक्षच करत होते..

निवेदिताची मान खाली झुकली होती... तिच्यापासून केवळ फुटभर अंतरावर उमेश तिच्याकडे मंत्रावल्यासारखा बघत उत्तर ऐकण्यासाठी अधीर झाला होता..

"आणि काय??"

"आणि आपण... दोघंच..."

"... पण... पण असं.. का पण असं??"

उमेशचा अधिक खोलात शिरणारा प्रश्न आत्ता यायलाच नको होता. ही ती पातळी नव्हती जेव्हा इतकी उत्तर देण्याचा मनमोकळेपणा दोघात असतो.

निवेदिता म्हणाली...

"मला माहीत नाही... तूच सांग.."

"मी... मी तर येणारच नव्हतो.."

उमेशचा आवाज घोगरा झाला होता.. आवाज आपलाच आहे असेही त्याला वाटले नसते..

दचकलेल्या निवेदिताने एकदम वर पाहिले..

"का??"

"मला माहीतच नव्ह्ते की तूही जाणार आहेस सिंहगडला.. "

निवेदिताला वाटत होते की क्षमा घरी निघून गेल्यानंतर हा येणार नव्हता असे हा म्हणत आहे. पण आता सगळाच खुलासा झाला की हा मुळात घरातून सिंहगडला येणारच नव्हता.. आणि आपण येणार असे कळल्यावर आला..

समोरसमोर फुटभर अंतरावर एकमेकांच्या डोळ्यात डोळे मिसळून बोलत असताना अचानक असा खुलासा झाला आणि निवेदिताचे पाणी पाणी झाले...

झर्रकन त्याला पाठमोरी होत ती पुन्हा कट्यावर बसली.. उमेशला आता काय करावे हे समजेना.. तिला आपले म्हणणे आवडले आहे की त्याचा राग आला आहे हेच त्याला समजत नव्हते...

तिच्या त्या प्रसंगातून ते अचानक डिसकनेक्ट झाल्यासारखे दोन पावले मागे फिरून पुन्हा कट्यावर बसणे हे त्याला काहीसे बिचकवूनच गेले... त्यामुळे तिच्या चेहर्‍यावरचे भाव पाहण्यासाठी तोही थोडासा पुढे गेला आणि मान वाकवून निरखून पाहू लागला तसे ते जाणवल्यामुळे ती पटकन म्हणाली.. \

"चल... निघू... "

नक्कीच तिला राग आलेला आहे हे उमेशला समजले.. पण मग ती स्वतः तरी 'कारण आपण दोघं होतो' असे का म्हणाली असेल?? असा विचार करून चार पावले पुढे चालत गेलेल्या निवेदिताच्या मागे फरफटल्यासारखी पावले उचलत तो निघाला..

अचानक म्हणाला..

"सॉरी... "

ती मागे वळली...

"का??"

"तुला.. मी तसं बोललेलं... आवडलं नाही ना... ??"

ती पुन्हा अबोल होऊन चालू लागली..

"थांब... निवेदिता... इथेच थांब.. "

ती थांबली, वळली आणि पुन्हा त्याच स्पॉटवर आली..

त्याच्या समोर येऊन उभी राहिली आणि त्याच्याकडे पाहू लागली..

"हा स्पॉट... या स्पॉटवर... जे काय आहे ते मिटवून टाकू एकदाचं... मला माफ करून टाक.. मला खरोखरच... तू येणार आहेस हे एकमेव कारण होतं इथे येण्याचं... आणि.. आपण दोघंच येणार हे तर... हे तर फारच मोठं कारण होतं.. पण.. बहुतेक मी तसं म्हणणं... तुला आवडलं नसावं.. हो ना??.. यापुढे... मी कधीही पुन्हा असे काहीही म्हणणार नाही... तुला राग येईल असे... पण... प्लीज मनात.. मनात काहीही ठेवू नकोस.. जे काही मी इथे बोललो... ते याच स्पॉटला विसरून जा... प्लीज.."

निवेदिता ठामपणे त्याच्याकडे बघत होती... गांभीर्याची परिसीमा तिच्या चेहर्‍यावर पसरलेली होती... अबोलतेची सर्वोच्च पातळी मनाने स्वीकारलेली होती... यंत्रवत हालचाली करत ती पुन्हा त्याच कट्यावर जाऊन बसली.. उमेश अजूनही तसाह स्तब्ध होता.. ती काय म्हणते हे ऐकण्यासाठी आतुरलेला...

आणि.. निवेदिताने ते वाक्य उच्चारलं... ज्याचा अर्थ समजायलाही त्या खुळ्याला काही क्षण लागले.. आणि समजला तेव्हा... त्या क्षणी.. या संपूर्ण विश्वातला तो एकमेव आणि सर्वात अधिक आनंदी माणूस होता..

"मी.. मला.. रागबिग नाही आला... मलाही... मलाही.. तुझ्याचसाठी यायचं होतं......."

अशावेळेस काय करायचे असते, काय करायला पाहिजे आणि काय करतात... याची काहीही माहिती नसतानाही..

उमेश पुढे झाला.. तो पुढे झाला तशी मात्र ती उठून उभी राहिली... दोघांचे धपापणारे नि:श्वास एकमेकांना जे काही सांगत होते ते समजून घ्यायला आणि मान्य करायला मने तयारच होत नव्हती.... बंधनांचा विचार मनांना नि:श्वासांच्या भाषेचे भाषांतर करून घ्यायला मज्जाव करत होता...

पण व्हायचे ते झालेच... निसर्ग जिंकला... माणूस पुन्हा हारला..

काहीही कळायच्या आत उमेशने निवेदिताला जवळ ओढले.. तिला जणू हे अपेक्षितच असावे की काय असा तिचा चेहरा होता.... अत्यंत गंभीर.. त्याच्याकडे रोखठोकपणे पाहणारा.. मात्र.. पुढचे तिच्या कल्पनेतही नव्हते...

आजवर चुंबनाचा एकही अनुभव नसलेल्या उमेशने आपले ओठ अत्यंत आवेगात तिच्या ओठांमध्ये गुंफले...

... शरीरांमधून आता लाव्हा उसळत होता.. जाळ्यात अडकलेल्या मासोळीप्रमाणे तडफडणार्‍या निवेदिताची हालचाल काही क्षणातच थंडावत थंडावत उमेशच्या हालचालींना पुरक होऊ लागली..

कसलेही भान न उरलेले ते दोन जीव जीभेने एकमेकांच्या जीभेला आणाभाका देत होते.... एक नवाच साक्षात्कार होत होता... कोणत्याही भाषेचा आधार न घेता प्रेम व्यक्त होत होते...

नीतूच्या मखमली स्पर्शाने बेभान होऊन उमेश आपले स्वतःचे अस्तित्वही विसरून तिच्यात गुंफत चालला होता... तिच्या केसांच्या गंधाने त्याला जग जिंकल्याचा आनंद कसा असतो याची जाणीव होत होती...

आणि एका क्षणी... एका क्षणी निवेदिताला ते भान आले..

धाडकन तिने त्याला बाजूला सारले.. ढकलून दिले... दोघेही क्षणभर एकमेकांकडे पाहात राहिले.. उमेश अपराधी भावना घेऊन तर निवेदिता नुकत्याच घेतलेल्या चुंबनाच्या जादूचा परिणाम असह्य होऊन..

उमेशला ती रागावल्यासारखे जाणवणार तेवढ्यात निवेदिता त्याचा हात हातात घेऊन त्याला तिथून दूर न्यायला लागून कुजबुजल्यासारखी म्हणाली...

"चल आता... हे सगळं करायचं नसतं आत्ता... चल ना????"

आयुष्यातील सर्वात गुलाबी, सर्वात सोनेरी आणि सर्वात आनंददायी सकाळ अनुभवत दोघेही काही मिनिटातच देवटाक्यापाशी पोचले..

देवटाक्याचे थंडगार पाणी पिऊन पुन्हा पिठलं भाकरीसाठी पुढे निघताना निवेदिता विचार करत होती... एक मुलगी असूनही आज तिने चूक केलेली होती... हे सगळं इतकं सहज आणि इतकं लगेच होणं तिला अपराधी जाणीव देत होतं.... तिच्या नाकाचा शेंडा आणि कानांच्या पाळ्या लालेलाल झालेल्या होत्या... पुन्हा अबोला सुरू झालेला होता.. पण आता तिच्याकडे पर्याय काहीच नव्हता.. जे मनात होतं ते अत्यंत घिसाडघाईने व्यक्त झाल्यासारखे तिला वाटत होते.. पण आता बेभानपणे ते पुढे रेटावंच लागणार होतं... उमेशवर जीव तिचाही जडला होताच.. पण .. हे सगळं असं व्हायलाच नको होतं तिला.. प्रेमाच्या अनंत पातळ्या असतात... ज्या पार केल्यानंतर ही पातळी येते... पण ही पातळी आजच... आणि पहिलीच आली होती.... या अशा वेडावणार्‍या निसर्गामुळे... अजून ओठांना तो राकट स्पर्श जाणवत होता... शरमेने कससं वाटू लागलेलं होतं.. मान वर करावीशी वाटत नव्हती... सगळं काही व्यवस्थित झाल्याशिवाय पुन्हा असं काहीही घडू द्यायचं नाही हे तिने मनोमन ठरवून टाकलं होतं..

सहज घड्याळात पाहिलं!

साडे तीन?????????

साडे तीन कधी वाजले??? अकरा वाजता तर क्षमाचा ग्रूप खाली गेला.. इतका वेळ काय केलं काय आपण???

पिठलं भाकरी, ताक आणि पुन्हा दही.. ठेचा आणि कांदा... असं सुग्रास ग्रामीण भोजन करून दोघे गड उतरायला लागले तेव्हा साडे चार झालेले होते...

... आणि गड उतरले तेव्हा साडे पाच!

आणि पुढची बस होती साडे सहाला..

एक तास अबोलपणे आणि काहीसा उदास पश्चात्ताप मनात घेऊन दोघे बसले होते... मधेच उमेशने चहा आणला... तो पिऊन झाला... त्या स्पॉटवर झालेल्या प्रसंगापासून बोलणे जुजबीच राहिलेले होते...

शेवटी एकदाची बस आली... या बसला फारशी गर्दीच नव्हती.. कारण गडावर येणारे मुशाफिर तर मगाचच्याच दुपारच्या चारच्या बसने निघून गेलेले होते...

कातरवेळ! उदासीचा पूर वाहवणारी वेळ! हळूहळू सूर्याची किरणे अंधारात सामावत मनावर काळीसावळी छाया पसरवत निघालेली... अंधाराला आपण जिंकणार याची जाणीव झालेली... प्रकाशाला हारणार याची.. खिन्नतेला आपले साम्राज्य पसरत, वाढत असल्याची... उत्साहाला आपण आटत असल्याची...

औदासीन्याची कमाल मर्यादा तेव्हा गाठली गेली जेव्हा गाडीतले इतर तीन प्रवासी, ज्यात दोन भाजीवाल्या म्हातार्‍या होत्या, ते सगळे पुढच्या भागात डुलक्या घेऊ लागले, कंडक्टर ड्रायव्हरच्या केबीनमध्ये जाऊन र्स्त्याकडे एकटक पाहू लागला... आजूबाजूला सर्वत्र अंधार आणि फक्त बसमधले दोन मिणमिणते दिवे... आणि रस्त्यावर बस चालल्याहा खडखडाट!

दुपारी झालेला तो प्रकार आता काहीसा बोचरा वाटत असतानाच... उमेशने आणखीन एक धक्का दिला तिला..

"सॉरी निवेदिता... एक गोष्ट ... मला अप्पाने .. तुला आत्ता सांगायला सांगीतलेली होती.. का ते माहीत नाही.. पण आत्ताच..."

अंधुक उजेडात तिने आपल्याकडे मान फिरवलेली त्याला जाणवली तशी त्याने स्वतची मान खाली घातल्याचे तिलाही जाणवले....

ती धसका घेतल्याच्या आवाजात बोलतात तसे म्हणाली..

"काय... झालं??"

"आपण... आपण दोघंच इकडे आलोयत असं कळल्यावर... तुझ्या आईने.. "

"...."

"....."

"काय... अरे काय केलं आईने?????"

"त्या खूप ओरडल्या म्हणे क्षमाला.. "

"क्काय???"

निवेदिताने तर अक्षरशः रडवेली होऊनच हा प्रश्न विचारला...

"आणि... मूर्खा.... हे तू मला आत्ता सांगतोस??? तो आप्पा म्हणाला म्हणून???"

"प्लीज... प्लीज रडू नकोस... ते सगळं मिटलंय आता.. "

"असं कसं मिटेल??? माझे बाबा आता फाडून खातील मला... आईसुद्धा..."

"प्लीज रडू नकोस... त्या सगळ्यांनी मिळून सांगीतलंय की... ते तिघे आणि क्षमाही आपल्याबरोबर आहेतच.. त्याचमुळे क्षमा क्लासला गेलीच नाही.. ती वर्षाबरोबर चिंचवडला गेलीय.. आणि आता कसबा गणपतीपाशी उभी राहणार आहे.. अप्पा, राहुल्या आणि विन्याही दिवसभर बाहेरच थांबलेत... तेही आपल्यासाठी तिथेच उभे राहणार आहेत.. आणि.. सगळ्यांनी मिळून ... वाड्यात जायचंय.. "

रडता रडताच अत्यंत तीव्र स्वरात निवेदिता म्हणाली..

"हे सगळं इतकं सोपंय??? सोपय हे सगळं इतकं??? ... नालायकपणा केलाय आज आपण... "

"प्लीज ऐकून घे.... यात माझा काहीच प्लॅन नव्हता.. सगळं तुझ्यासमोरच झालं... पण आपण येताना बसमध्ये बसल्यानंतर वाड्यात काय झालं ते मला कसं समजणार??"

"हो पण ते तिघे सांगायला आले होते ना??? त्यानंतर मला सांगायला नकोस तू???"

निवेदिता आता निर्भत्सना करत होती उमेशची!

"अगं... प्लीज.. म्हणजे.. आता एकदा तुझ्या आईला असं सांगण्यात आलंय की आपण सगळेच गडावर आहोत म्हंटल्यावर आपण न जाऊन तरी काय करणार होतो??? कुठे थांबणार होतो???"

"मला काही माहीत नाही ते... तू खोटं बोललायस... "

"फक्त... फक्त आपल्या दोघांसाठी गं..."

"हे असं खोटं बोलून काहीही नकोय मला... "

खाड! म्हणजे हिला आपण सहज, सामाजिक संमतीने मिळालो तरच हवे आहोत... अन्यथा ती आपल्यासाठी एकही नियमही मोडणार नाहीये..

अत्यंत हादरला उमेश.. खूप घाबरून त्याने तिचा हात हातात घेऊन तिला समजावण्याचा प्रयत्न करताच तिने तीव्रपणे त्याचा हात झिडकारला...

... आणि अत्यंत दु:खी मनस्थितीत पुढचा प्रवास सुरू झाला.. सगळंच संपलं होतं... सर्वच दिवसावर विरजण पडलं होतं..

बसचा तो प्रवास अनंताचा प्रवास असल्यासारखा वाटत होता... निवेदिता मधूनच मुसमुसत होती आणि मधूनच बाहेर बघत खिन्नपणे विचार करत होती...

घरी जाऊन कसल्या प्रसंगाला तोंड द्यावे लागणार आहे याची धास्ती मनाला सैरभैर करत होती...

... शेवटी एकदाची बस पुण्यात शिरली आणि भी मा मारुतीपाशी दोघे उतरले...

आता निदान भरपूर गर्दी तरी होती रस्त्याला....

... दमलेले, थकले भागलेले आणि सर्व आनंद हारव्न बसलेले हे युगुल.. तब्बल वीस मिनिटांनी कसबा गणपतीपाशी पोचले..

अप्पा, राहुल, विन्या आणि क्षमाचे चेहरे उतरलेले होते..

.. निवेदिता तर लगबगीने घरीच निघाली क्षमाला घेऊन..

क्षमाने तिला थांबवले आणि म्हणाली..

"आधी काय काय प्रकार झालेत वाड्यात ते ऐकून घे... तुला निदान उत्तरे तरी देता येतील..."

आता मात्र माणसांत आल्याप्रमाणे निवेदिता सगळ्यांसमोर ढसाढसा रडू लागली... क्षमाने तिला थोपटले..

अप्पा म्हणाला...

"तुझ्या आईंनि आकाशपाताळ एक केले... संपूर्ण वाडा डोक्यावर घेतला.. प्रत्येक माणसाला बोलला त्या... पण आम्ही हे सगळं ... तिथे येऊन तुम्हाला... कसं काय सांगणार??"

आता निवेदिता आप्पावरच उसळली..

"एवढं सगळं झालेलं आहे आणि तुम्ही अगदी आम्हाला भेटून हे कॅमेर्‍याचं डबडं देऊन आलात.... हे सांगता येत नाही मला.. की एवढा गोंधळ झालाय ते??"

"तुम्ही करू काय शकला असतात पण??? औषध तर पुण्यातच मिळतं ना??"

आता उमेशही हादरला... निवेदिताने तोंडावर हात ठेवला.. प्रचंड घाबरून विचारले..

"अप्पा... काय झालंय सांग मला.. कसलं औषध??"

"ढेकूण झालेत तुमच्या खोल्यांमध्ये... त्यामुळे तुझ्या आई आरडाओरडा करत होत्या... ते तुम्हाला कशाला सांगायचं आम्ही???"

हातातली पर्सच भिरकावली निवेदिताने आप्पावर! तो ती चुकवून पळू लागताच उम्या त्याला धरायला धावला.. क्षमा, विनीत आणि राहुल्या खदाखदा हासू लागल्यावर निवेदिताने क्षमाला बडवून काढले.. तो सर्व मार क्षमाने हासत हासत झेलला...

तेवढ्यात आप्पाला धरूनच उमेश परत आला...

उमेश - नालायक आहात हरामखरांनो... तुमचे हाल कसब्यातल कुत्राही खाणार नाही...

विनीत - हो पण मी आता प्यासात काहीतरी खायला चाललोय.. तुझ्या पैशाने..

सगळेच हासत हासत निघाले.. क्षमा निवेदिताला घेऊन निघाली आणि मागे या चौघांकडे बघत म्हणाली..

"रडल्यावर नीतू जास्त छान दिसते नाही???"

उमेश पोरीसारखा लाजतोय तोवर राहुल म्हणाला...

"सर्दी झाली असेल तिला.. ती कसली रडतीय.. ??"

त्याला वेडावून दाखवत निवेदिता क्षमाबरोबर निघाली तेव्हा तिला मागे अप्पाचे वाक्य ऐकू आले..

"उम्या?? येड्या ही कसली रे चप्पल ?? "

तेवढ्यात क्षमाचे लक्ष निवेदिताच्या बुटांकडे गेले..

"ई.. हिने दादाचे शूज घातलेत.. "

तोवर उम्याने स्वतःच्या चपला काढून फेकून दिल्या होत्या आणि आता तसाच प्यासाला जायला निघाला होता..

तेव्हा राहुल ते वाक्य म्हणाला.... ते वाक्य ऐकून निवेदिताने उमेशच्या पायाकडे पाहिले.. आणि काळजाचे पाणी झाले तिच्या पाणी... त्या दोघांच्या त्या नजरानजरीला मराठी भाषेत शब्द नाही...

"उम्या??? लेका एवढं रक्त येत असून चाललास तू??? कुणासाठी रे???"

गुलमोहर: 

हळूहळू एक एक भाग वाचते आहे मात्र पूर्ण कादंबरी वाचल्यावरच प्रतिसाद द्यायचा हे ठरवले होते. पण हा भाग प्रचंड जादुई होता. ह्यावर प्रतिसाद न देणे म्हणजे मनातल्या उर्मी दाबल्यासारखे झाले असते, म्हणून प्रतिसाद द्यायचे ठरवले. फारच मनापासून लिहिलाय बहुतेक हा भाग... खुपच आवडला. ही कादंबरी खुपच मस्त रंगते आहे. साधी-सुधी, हलकी-फुलकी प्रेमकथा खुपच सुंदर पद्धतीने फुलवता आहात... Happy 'हाफ राईस...' सारखीच मनाला भावते आहे ही कादंबरी... बाकीचे भाग नंतर वाचेन.
कीप इट अप, बेफिजी!!! असेच छान, पॉझिटिव्ह आणि तुमच्या गझलांसारखेच हळूवार लिहित रहा... Happy

सानि याना अनुमोदन(प्रतिसाद न देणे म्हणजे मनातल्या उर्मी दाबल्यासारखे झाले असत). खरच अस ठरवल होत कि सगळे भाग वाचु (जमल तसे) आणि मगच प्रतिसाद देऊ वॅगरे पण रहावलच नाहि, अगदि यात्रिक पद्धतिने लॉगिन केले गेले.

भुषणराव खरच नाद खुळा लिहिता तुम्हि.

कामाच्या व्यापामुळे नाहि जमत माबोवर यायला पण..... मि सायलेंट मोडवर वचत अस्तो.
खुप छान चाल्लिय कादंबरि, अतिशय हळुवार, नाजुक नाजुक वळणे घेत...... मजा येतेय(नेहमि सारखि)
Happy